विमी- बॉलीवूडमधील सर्वात दर्दनाक मौत झालेली देखणी अभिनेत्री

समीर गायकवाड

जगणं सुंदर आहेच पण या सुंदर जगण्याचा भयाण नरक कसा होतो, आयुष्याची, स्वप्नांची धूळधाण कशी होते याची आर्त शोकांतिका म्हणजे देखण्या विमीची चित्तरकथा. विमी जेव्हा अनंताच्या यात्रेस गेली तेव्हा तिचा मृतदेह शेंगा-फुटाणे विकायच्या ठेल्यावरून सांताक्रूझच्या स्मशानभूमीत नेला होता. तिच्या सर्वांगाला दारूचा वास येत होता आणि तिचा मित्र जॉली याच्यासह फक्त चारेक माणसे तिचं पार्थिव ठेवलेला हातगाडा ढकलत नेत होते. हिंदी सिनेमाच्या इतिहासात सर्वात उपेक्षित असा भयाण मृत्यू विमीचाच झाला आहे. अनेक अभिनेत्री, अभिनेते अत्यंत उपेक्षित अवस्थेतून गेले पण कोणाच्याही वाट्याला तिच्यासारखे भोग आले नाहीत. काळ्याशार मासोळी डोळ्यांची, आरसपानी देहाची, कमनीय बांध्याची, गोऱ्यापान रंगाची, चाफेकळी नाकाची, मोत्यासारख्या दंतपंक्तीची अन नाजूक ओठांची, बाहुलीसारखी दिसणारी देखणी विमी वयाच्या अवघ्या चौतीसाव्या वर्षी देवाघरी गेली. “सौदर्याचा हा शाप कशासाठी दिला ?’ असं प्रश्न त्या विधात्याला तिने नक्कीच विचारला असेल.

……………………………………………..

विमी ही पंजाबच्या जालंधरमधील सुबत्ता असणाऱ्या घरात १९४३ मध्ये जन्माला आलेली देखणी मुलगी. तिच्या कुमार वयात तिने गायनाचे धडे गिरवले होते. गायनाची आवड, घरचा पैसा आणि अंगचे देखणेपण यामुळे ती किशोर वयातच मुंबईत आली आणि पुढचे शिक्षण सुरु ठेवले. ऑल इंडिया रेडीओच्या मुंबई केंद्रावरून मुलांच्या आकाशवाणीच्या कार्यक्रमात तिने बऱ्यापैकी सहभाग नोंदवला होता. मुंबईच्या सोफिया कॉलेजमधून तिने मानसशास्त्र विषयाची कला शाखेची पदवी घेतली. कोलकात्यातील हार्ड वेअर व्यवसायाचे किंग समजल्या जाणाऱ्या अगरवाल कुटुंबियाचा वारस शिव अगरवाल हा कामानिमित मुंबईला आल्यावर त्याची विमीशी भेट झाली आणि त्या भेटीचे रुपांतर प्रेमात आणि प्रेमाचे रुपांतर पुढे विवाहबंधनात झाले. जातीने पंजाबी असणारे तिचे कुटुंबिय या लग्नाच्या विरोधात होते. या घटनेपासून त्यांनी तिच्याशी जे संबंध तोडले ते परत कधीच जोडले नाहीत. त्यांचं हे अंतरजातीय लग्न मुलाकडच्या कुटुंबियांना देखील पसंत नव्हते पण त्यांनी तेव्हा तरी टोकाची भूमिका घेतली नाही आणि तिला सून म्हणून स्वीकारलं. नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं…..

कोलकत्त्यात एका अलिशान पार्टीत बॉलीवूडचे प्रसिद्ध संगीतकार रवी आणि विमी यांची गाठ पडली. देखण्या विमीला पाहून रवी चकित झाले. त्यांनी तिला मुंबईस आल्यास इंडस्ट्रीत काम मिळवून देण्याचा शब्द दिला. त्या दिवसानंतर विमीने आपल्या पतीकडे मुंबईला जाण्याचा हट्ट धरला. विमीने मुंबईच्या मायानगरीचा हट्ट धरला तेंव्हा त्या कुटुंबाने देखील त्या दांपत्याची साथ सोडली. शिव अगरवाल मात्र आपल्या आईवडिलांना सोडून विमीसह मुंबईला आला. ते वर्ष असावं १९६४ च्या आसपासचं.

विमीवर काही अभिनेत्रींचा प्रभाव होता. स्वतःला ती अमेरिकन चित्रपट, दूरचित्रवाहिनीवरची अभिनेत्री जॉन क्रॉफर्ड आणि हॉलीवूडच्या मूकपटाच्या जमान्यातली सेक्सी खलनायिका थेड बेरा यांची पौर्वात्य वारसदार समजे. मुंबईत आल्यानंतर पाली हिलमधल्या आपल्या अलिशान अपार्टमेंटमध्ये ती पतीसोबत राहू लागली. मुळचीच श्रीमंत असणारी विमी गोल्फ आणि बिलियर्डस अशा राजेशाही खेळांची शौकीन होती. त्या काळी तिच्याकडे स्पोर्ट्स कार असल्याची नोंद आहे. भल्या मोठ्या ओव्हरकोटसनी अन डिझायनर ड्रेसेसनी तिचा वॉर्डरोब खचाखच भरलेला असे. अत्यंत लॅव्हीश आणि स्टायलिश लाईफ स्टाईल जगणारया विमीला संगीतकार रवी बी.आर.चोप्राकडे घेऊन गेले, त्यांनी आपला शब्द पूर्ण केला. त्यांनी विमीला काम मिळवून दिले. रवीच्या या देखण्या ‘फाईंड’वर बी.आर.चोप्रा एकदम खुश झाले, त्यांनी तिला त्या काळच्या शिखरावरील असणारया राजकुमार आणि सुनीलदत्तच्या सोबत लॉन्च करत ‘हमराज’मध्ये लीडरोलमध्ये घेतलं. विमी रातोरात ‘स्टार’ झाली. १९६७ मध्ये ‘हमराज’ रिलीज झाला आणि तो ब्लॉकबस्टर हिट झाला.

मार्च १९६८ च्या ‘फिल्मफेअर’च्या कव्हरवर ती झळकली. त्या काळच्या सर्व सिनेपत्रिकात तिच्या तसबिरी छापून येऊ लागल्या. १९६८ मध्ये लगेच विमीचा पुढचा चित्रपट आला, ‘आबरू’ त्याच नाव होतं. ‘आबरू’मध्ये तिच्या सोबत त्या वर्षीचा बेस्ट न्यू फाईंड असा ज्याचा लौकिक झाला होता तो दीपककुमार होता. अशोक कुमार,ललिता पवार आणि निरुपा रॉय असे इतर तगडे आणि नामांकित अभिनेते त्यात होते. पण टुकार कथानक अन सुमार निर्मितीमूल्ये यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिस डिझास्टर ठरला ! १९६७-६८ मध्ये साईन केलेले तिचे ‘रंगीला’, ‘अपोइंटमेंट’ व ‘संदेश’ या नावाचे चित्रपट कधी आले न गेले काही कळाले देखील नाही. मात्र चर्चेत कस राहायचं याच तंत्र तिला चांगलेच अवगत झालं होतं. ती लेट नाईट पार्ट्यांना जात राहिली, फोटो शूट करत राहिली अन त्यातूनच ती कधी एक्सपोज होत गेली तिलाच ते कळले नाही. १९७० च्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ती चक्क बिकिनी घालून गेली होती ! नाही म्हणायला ‘पतंगा’ या आणखी एका चित्रपटाने तिला थोडंसं टाईम एक्सटेंशन मिळवून दिलं, अन्यथा तिची आणखी लवकर दुर्गती झाली असती.

१९७४ मध्ये रिलीज झालेला शशीकपूरबरोबरचा ‘वचन’ हा तिचा शेवटचा चित्रपट, तो देखील आधी साईन केल्यामुळे हाती टिकून होता. १९७१ नंतर तिच्या कोणत्याही मुलाखती छापून आल्या नाहीत, नाही तिचे कुठे फोटोशूट झाले. तिचा पती तिला घरी परतण्याविषयी विनवू लागला. देखणेपणाचा टोकाचा गर्व, हेकेखोर स्वभाव असणाऱ्या आणि पैशाचा काहीसा अहंकार असलेल्या विमीने आयुष्यात आणखी एक चुकीचा निर्णय घेतला, ती पतीपासून विभक्त झाली. अगदीच डी ग्रेड चित्रपट निर्माण करणारया जॉली नामक चित्रपट निर्मात्यासोबत ती राहू लागली. कमाई शून्य अन राहणी खर्चिक तशात दारूचे जडलेले व्यसन यामुळे ती पुरती कर्जबाजारी झाली. शिव अगरवालने विमीच्या नावावर केलेल्या ‘विमी टेक्सटाईल्स’ या कोलकात्यातील उद्योगाला जॉलीने विकून टाकले अन तिची देणी फेडून टाकण्याचे नाटक केले. जॉली तिला छोट्या सिनेमांच्या निर्मितीच्या थापा मारत राहिला अन ती त्याला भुलत राहिली. मुलाखतीत ती ज्या सिनेमांबद्दल बोलायची ते सिनेमे कधी सेटवरच गेले नाहीत. तिला अगदीच विपन्नावस्था आली.आपण पैशासाठी इंडस्ट्रीत आलो नाही असं तेव्हा प्रत्येक मुलाखतीत सांगणारी विमी नंतर अक्षरशः एक रुपयाला देखील महाग झाली होती. प्रचंड मानसिक तणाव सहन करीत अपयशाच्या खोल गर्तेत बुडून गेलेल्या विमीने सामाजिक बंधने झुगारून दिली, नाती तोडली, स्वतःला अतिमूल्यांकित केलं अन ती पक्की नशेबाज झाली. त्यामुळे हाती लागेल ती दारू ती पिऊ लागली. ही प्रचंड उलथापालथ तिच्या आयुष्यात केवळ बारा वर्षाच्या एका तपात झाली ! तिशीतली एक देखणी अभिनेत्री फिल्मफेअरच्या कव्हरवरून उतरली आणि काही वर्षात बाजारात जाऊन बसली, ती देखील दारूच्या काही घोटासाठी !!

खरे तर चोप्रा कॅम्पचा इतिहास बघितला तर असं लक्षात येतं की त्यांनी पडद्यावर आणलेले नवीन चेहरे फेल गेले तरी ते त्यांना वारंवार संधी देत गेले. पण फुटक्या नाशिबाची विमी याला देखील अपवाद ठरली. चोप्रांच्या ‘हमराज’च्या पोस्टिंगमध्ये त्यांनी विमीचे तोंड भरून कौतुक केले पण नंतर तिला सिनेमे दिले नाहीत. बी.आर.चोप्रा तिच्याशी असं का वागले याचं कोणतंच उत्तर कोणापाशीही मिळत नाही. विमीला इंडस्ट्रीमधील कुठल्या को स्टारने देखील का मदत केली नसावी ,याच उत्तर मात्र मिळतंय. विमी विजनवासाच्या बेड्यात गुंतली तेंव्हा जॉलीने तिचा बाजार मांडला, तिचे अविरत शोषण केलं. प्रसिद्धी सोडा पण तिचा ठावठिकाणा देखील कुणी पुसला नाही इतकी तिची बदनामी अन बदहाली झाली. भरीस भर तिच्याबद्दल इतक्या भयंकर कहाण्या अन अश्लाघ्य चर्चा झाल्या की तिचा कुणी शोधच घेतला नाही.

आयुष्याच्या शेवटच्या पाच सहा वर्षात ती कुठलीही मिळेल ती दारू पित होती. त्यातलीच काही वर्षे तर तिने वेश्याव्यवसायदेखील केला, तिचा लिव्ह इन मधला जोडीदार जॉली तिला वेगवेगळ्या हॉटेल्सवर घेऊन जायचा…काहींनी तर तिला रेड लाईट एरियात देखील पॉइंट आऊट केले होते. तिच्या देखण्या शरीराचे अनेक पुरुषी श्वापदांनी मन मानेल तसे लचके तोडले आणि त्या बदल्यात ते तिला दारू देत गेले. ती पितच राहिली. दारूआडून ती स्वतःवर सूड उगवत राहिली. तिच्या अब्रूची लक्तरे वेशीवर मांडण्यात तिचा ‘हमराज’ म्हणवून घेणारा जॉली हाच पुढे होता, हे तिचं दुदैव. पण तिला त्याचाही रागलोभ नव्हता. ती कधीच या सगळ्याच्या पल्याड गेली होती. विमीच्या शेवटच्या दिवसात तर त्यानंही तिच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर तिच्या देहाची झालेली विटंबना अत्यंत पाशवी आणि अगतिकतेच्या कातळकड्यावरून झालेल्या कडेलोटाची होती.

विमीच्या आयुष्याची अन अब्रूची अशी चिंधड्या उडालेली लक्तरे अखेर काळालाच असह्य झाली असावीत. अतिमद्यप्राशन केल्यामुळे विमीचे लिव्हर बस्ट व्हायला आले होते, काहीही पिऊन आणि कुठेही झोपून अनेकांनी शोषलेल तिचं शरीर एक ओसाड मधुशाळाच झालं होतं. दारू पिऊन बेशुद्धावस्थेत ती रस्त्यावर पडली होती. तिला तिथून उचलून नानावटीच्या जनरल वॉर्डमध्ये शेवटचे काही दिवस ठेवण्यात आलं. हा आराम कित्येक वर्षानंतर तिच्या देहाला मिळाला होता. ही विश्रांती देखील अखेरचीच ठरली, २२ ऑगस्ट १९७७ च्या मध्यरात्रीचा भयाण अंधार तिला इथल्या अंधारकोठडीच्या अक्राळ विक्राळ जबड्यातून काढून आपल्या सोबत घेऊन गेला. आनंदबाजार पत्रिकेत तिच्या कोलकात्त्यातील कृष्णा नावच्या मित्राने श्रद्धांजलीत लिहिलं होतं की, ‘ हा मृत्यू म्हणजे तिची सुटका होती, एका वेदनेतून मोठी सुटका घेऊन आलेली रात्र …’  ‘सिने ऍडव्हान्स’ या सिनेपत्रिकेने तिच्यावर लेख लिहिताना अखरेच्या काळात झालेल्या तिच्या शोषणाबद्दल हळहळ व्यक्त केली होती. विमीच्या मृत्युनंतर तिची अशी अत्यंत त्रोटक दखल इंडस्ट्रीने घेतली. नंतर तर ती लोकांच्या स्मृतीतून बेदखलच झाली.

मला कधी कधी प्रश्न पडतो, डोळे दिपवणाऱ्या या मायानगरीचा हा काळाकुट्ट चेहरा आपल्या आत्म्यावर पांघरून विमीसारख्या कित्येकांनी हे भोग भोगले असतील.  ज्यांची नावे आपल्याला माहिती आहेत, त्यांच्याविषयी आपण जिज्ञासा दाखवून थोडीफार माहिती तरी घेतो. पण ज्यांची कसलीही ओळख निर्माण होऊ शकली नाही, ज्या कळ्या कधी फुलूच शकल्या नाहीत अशा किती जणांच्या वाट्याला हे मरणभोगाहून वाईट भोग आले असतील ? काही कल्पना करवत नाही….परवीन बाबी अल्लाह कडे गेल्यानन्तर तीन दिवसांनी तिच्या देहाचा कुजल्यासारखा वास येऊ लागल्याने कळलं की ती राहिली नाही. तिच्या पश्चात काही संपत्ती होती म्हणून काही वारसदार मृत्यूपश्चात त्या हेतूने तरी तिच्या अवतीभोवती गोळा झाले. पण विमीच्या नशिबी तर हे सुख देखील नव्हते..

ज्या दिवशी देखण्या अभिनेत्रीचे पार्थिव हातगाडीवरती नेलं जात होतं तेव्हा आभाळात निळेसावळे मेघ होते. ‘हमराज’मध्ये याच निळ्या मेघांकडे पाहत विमीला उद्देशून राजकुमारने “नीले गगन के तले, धरती का प्यार मिले …” हे उत्कट गीत पडद्यावर गायलं होतं. हे तेच मेघ होते का ज्यांनी विमीच्या भयाण मरणकळा पाहिल्या, हा प्रश्न माझ्या डोळ्याच्या कडा ओल्या करून जातो. विमी जरी चुकली असली तरी विधात्याने तिला इतकी कठोर शिक्षा द्यायला नको होती असं सतत वाटत राहते. पूर्वी ‘हमराज’ खूप वेळा पाहिलाय तो राजकुमार आणी सुनीलदत्तसाठी, पण आता कधी जर ‘हमराज’ पाहतो तर फक्त आणि फक्त या शापित अभिनेत्रीच्या सुखद दर्शनासाठी. स्वप्नाच्या आणि आयुष्याच्या चिंधड्या उडालेल्या, अकाली मृत्यूमुखी पडलेल्या एका दुदैवी अभिनेत्रीच्या रेखीव छबीच्या आठवणी डोळ्यात साठवण्यासाठीच ,मी आता ‘हमराज’ पाहतो.

(लेखक नामवंत ब्लॉगर व स्तंभलेखक आहेत)

   83809 73977

 

Previous articleलोकशाहीचा पाचवा स्तंभ
Next articleपंकजा मुंडेंसाठी ‘रिकामटेकडा’ सल्ला !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.