विवेकाच्या आधारे बदलाची सुरुवात करूया!

साभार-साप्ताहिक साधना

(डॉ.दाभोलकर यांच्या ‘मॅग्नम ओपस’ कंपनीने काढलेल्या दहा ऑडिओ भाषणांचे रूपांतर ‘विवेकाचा आवाज’ या पुस्तकात करण्यात आले आहे, त्यातील हे एक भाषण. हे पुस्तक साधना प्रकाशनाकडून डॉ.दाभोलकरांच्या सहाव्या स्मृतिदिनी आज 20 ऑगस्ट 2019 रोजी पुणे येथे प्रकाशित होत आहे. विवेकवाद नेमका काय असतो, त्याची आपल्या आयुष्यात कशी पेरणी करायची हे सांगणारं डॉ . दाभोलकरांचं आवर्जून वाचावे असे हे भाषण)

-डॉ. नरेंद्र दाभोलकर

अंधश्रद्धा निर्मूलनापासून विवेकवादापर्यंत वाटचाल केलेला चळवळीतला एक कार्यकर्ता किंवा एक सजग नागरिक म्हणून मी काय करू शकतो? मी माझी विवेकबुद्धी प्रखर करू शकतो. माझ्या प्रखर विवेकबुद्धीने मी नवी समतावादी मूल्यं निर्माण करू शकतो आणि माझ्या स्वत:च्या जीवनामध्ये मी त्यांचं आचरण करू शकतो. त्या प्रभावामुळे आजूबाजूच्या कुटुंबांमधल्या व्यक्ती हे करायला लागतील आणि कदाचित समाजामध्येदेखील हा बदल होणं शक्य होईल. म्हणजे व्यापक समाजपरिवर्तन होऊन समाजाचं मूल्यपरिवर्तन कधी होईल ते होईल, परंतु ते जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मी माझ्या विवेकबुद्धीमधून नव्या प्रमाणमूल्यांच्या निर्मितीचं आचरण सुरू केलं पाहिजे आणि जरी आचार करता आला नाही, तरी मी योग्य मूल्यांचा उच्चार केला पाहिजे.
……………………………………;…………………

अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही जरी अंधश्रद्धा निर्मूलनापासून सुरू झाली, तरी अंधश्रद्धा निर्मूलन ते शास्त्रीय विचारपद्धती, शास्त्रीय विचारपद्धती ते वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन ते धर्मचिकित्सा, धर्मचिकित्सा ते धर्मनिरपेक्षता आणि धर्मनिरपेक्षता ते विवेकवाद आणि मानवतावाद या मार्गाने ही चळवळ पुढे जाण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे स्वाभाविकपणेच ‘विवेकवाद’ हे मूल्य अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या व्यापक तत्त्वज्ञानाचा भाग आहे. ‘विवेकवाद’ हे कशाचं तत्त्वज्ञान आहे? विवेकवाद हे सुखी जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. मात्र एकाच वेळेला हे सुख भौतिक आहे, बौद्धिक आहे, भावनिक आहे, नैतिक आहे आणि सर्जनशील आहे. दुसऱ्या बाजूला, हे सुख अखिल मानवजात, अखिल प्राणीमात्र आणि निसर्ग यांच्याशी सुसंगत आहे. आणि तिसऱ्या बाजूला, हे सुख ज्या वेळी अस्तित्वात येतं, त्या वेळी साध्य-साधन शुचिता पाळली जाते. त्यामुळे अशा सम्यक आणि व्यापक अर्थाने ‘विवेकवाद’ हे सुखी जीवनाचं तत्त्वज्ञान आहे.

याच्या आधी मानवी इतिहासामध्ये सुखी जीवनाचा जो प्रयत्न झाला होता, तो धर्माने केला होता. जगातल्या सगळ्या धर्मांनी दोन प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. त्यांपैकी एक प्रश्न म्हणजे, What is truth? दुसरा प्रश्न म्हणजे, What is good? – पहिला प्रश्न, सत्य काय आहे? दुसरा प्रश्न, इष्ट काय आहे? सत्य काय आहे, हे गॅलिलिओ सांगत होता आणि गॅलिलिओने सांगितलेलं सत्य हे धर्मग्रंथामधल्या सत्यापेक्षा वेगळं होतं. त्यामुळे गॅलिलिओला एकान्त कारावासाची शिक्षा झाली. परंतु कोंबडी झाकली म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही, या उक्तीप्रमाणे गॅलिलिओ १६४२ साली मरण पावला आणि १९९२ साली, म्हणजे बरोब्बर ३५० वर्षांनी पोपने जाहीर केलं की, ‘आम्ही गॅलिलिओला दिलेली शिक्षा चुकीची होती. त्यासाठी आम्ही माफीची याचना करतो’. याचा अर्थ असा की, सत्य काय आणि असत्य काय, याचा निर्णय ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या साहाय्याने घेण्यावर आता संपूर्ण जगात शिक्कामोर्तब झालेलं आहे. कितीही मोठा धर्माधिकारी आजारी पडू दे. त्याला जर उपचार करून घ्यायचे असतील, तर तो धर्मग्रंथाचा आधार घेत नाही; तज्ज्ञ डॉक्टरांचाच आधार घेतो. त्यामुळे एका क्षेत्रामधून धर्माने निर्णायकपणे माघार घेतली.

पण धर्माचं दुसरं महत्त्वाचं क्षेत्र होतं, What is good? – चांगलं काय आणि वाईट काय? भलं काय आणि बुरं काय? सत्‌ काय आणि असत्‌ काय? कुजीवन कशाला म्हणायचं आणि सुजीवन कशाला म्हणायचं? लक्षात घ्या, ‘धर्म’ या संकल्पनेचं नीट आकलन करून घेण्याची गरज आहे. मार्क्सचं एक वाक्य नेहमी सांगितलं जातं- Religion is the opium of the people – धर्म ही अफूची गोळी आहे; पण त्याच्या आधी मार्क्स असं म्हणाला होता- but before that, it is heart of the heartless people; sole of the soleless mind; sigh of oppressed. म्हणजे, ती अफूची गोळी आहे; पण त्याआधी माणसाने स्वत:च्या नैतिक मुक्तीसाठी फोडलेली ती शेवटची आर्त किंकाळी आहे. म्हणजे अधिक चांगलं नैतिक जीवन जगता यावं, यासाठी सगळ्या धर्मांचा उदय झाला.

दोन हजार वर्षांपूर्वी ख्रिश्चानिटी उदयाला आली. त्या वेळी युरोपमध्ये गुलामांचा सरसकट बाजार भरत होता आणि व्यापार होत होता. गुलाम पतीपत्नींना झालेल्या मुलावरदेखील त्याच्या आईवडलांचा अधिकार नव्हता. झालेला मुलगा कुणालाही विकण्याचा राज्याला अधिकार होता. अशा वेळेला ‘स्वत:वर प्रेम करता, तसं प्रेम शेजाऱ्यावर करा’, असं सांगणाऱ्या ख्रिश्चानिटीचा उदय झाला आणि स्वाभाविकपणे त्यामुळे ख्रिश्चानिटीला रोमन सम्राटांचा मोठ्या प्रमाणात विरोध होता. किंवा ६००-७०० वर्षांपूर्वी ज्या वेळी अरबस्तानामध्ये इस्लामचा उदय झाला, त्या वेळी अरबस्तानामध्ये टोळ्यांचं साम्राज्य मानलेलं होतं. त्या टोळ्या एकमेकांशी सतत भांडत असायच्या. यात प्रचंड खूनखराबा आणि रक्तपात व्हायचा. बायकांना कुणीही, कितीही, कसंही वापरावं, उपभोगावं आणि फेकून द्यावं, अशी स्थिती होती. अशा वेळेला ‘इस्लाम म्हणजे शांती’, असा एक अर्थ असलेला आणि ‘तुम्ही एकपत्नीत्व धारण करा आणि पत्नीची मान्यता असली, तरीदेखील तुम्ही जास्तीत जास्त चार बायकांशी लग्न करू शकाल,’ असा १४०० वर्षांपूर्वी क्रांतिकारी असलेला नीतीचा संदेश इस्लामने दिला. याचा अर्थ असा की, मानवी जीवनामध्ये ‘नीती’ येण्यासाठी धर्माचा उदय झाला.

म्हणजे माणूसही नीती पाळायला लागला, याचं कारण काय? काही वेळेला तो धर्माच्या श्रद्धेने नीती पाळत होता; काही वेळेला तो देवाधर्माच्या भीतीने नीती पाळत होता. काही वेळेला तो देवाधर्माच्या प्रीतीने नीती पाळत होता. काही वेळेला तो पारलौकिक कल्याणासाठी नीती पाळत होता. काही वेळेला तो मोक्षाच्या इच्छेपायी नीती पाळत होता; परंतु ‘धर्माच्या धाकामुळे माणूस नीतीने वागतो’, अशा स्वरूपाची एक सार्वत्रिक समजूत होती आणि आहे. म्हणजे कान्टचं एक प्रसिद्ध वाक्य आहे- ‘या दोन गोष्टींचा जो जो विचार करावा, तो तो माझं मन आश्चर्याने भरून येतं. पहिली गोष्ट म्हणजे, अफाट तारकांनी भरलेलं हे नभांगण’. आता, नभांगणातल्या केवळ आपल्या आकाशगंगेमध्ये सूर्यापेक्षा मोठे असे 200 अब्ज तारे आहेत आणि अशा एक हजार कोटी आकाशगंगा आत्तापर्यंत सापडलेल्या आहेत. त्यामुळे त्याचा जर विचार केला, तर आपलं मन विस्मयाने भरून येईल, ही गोष्ट स्वाभाविक आहे.

त्याने सांगितलेली दुसरी गोष्ट म्हणजे, ‘माणसाच्या मनात नीतीची भावना येते कुठून? नीतीने वागलं नाही, तर भीती वाटते, ती कोणाची असते? ‘सगळं जग माझ्या विरोधात गेलं तरी चालेल, पण मी नीतीनेच वागेन’, अशी हिंमत माणूस कशाच्या आधारे बाळगतो?’ आणि मानवी इतिहासामध्ये ज्ञात असलेली याची उत्तरं होती, ‘माणसाच्या मनामध्ये नीतीची भावना धर्मापासून, देवापासून येते. नीतीने वागलं नाही, तर देवाची आणि धर्माची भीती असते; आणि ‘सगळं जग माझ्या विरोधात गेलं तरी चालेल, पण मी नीतीनेच वागेन’, ही हिंमत माणूस देवाच्या आणि धर्माच्या साहाय्याने बाळगतो’. म्हणजे खरं म्हटलं तर, धर्माच्या नीतीचा उद्देश चांगलाच होता. प्रत्यक्षामध्ये मात्र ‘देवाच्या आळंदीला निघाले आणि चोराच्या आळंदीला पोहोचले’, असा प्रकार झाला.

म्हणजे माणसाला मुक्त करणारी नीती त्याला अधिकाधिक जाचक ठरायला लागली आणि त्याचबरोबर ती दांभिक बनायला लागली. बायबलमध्ये लिहून ठेवलेलं आहे की, एक वेळ सुईच्या नेढ्यातनं उंट पलीकडे जाईल, परंतु स्वर्गामध्ये श्रीमंताला प्रवेश मिळणार नाही. एवढ्या प्रच्छन्नपणे ख्रिश्चन धर्म गरिबाच्या बाजूने होता; पण ज्या वेळेला राजाने आणि पोपने ख्रिश्चन धर्मावर पकड मिळवली, त्या वेळेला पोपने मुक्तीचे परवाने काढले. म्हणजे तुम्ही पोप महाशयांना तुमच्या कुवतीनुसार पाच हजार, दहा हजार, पंधरा हजार, पन्नास हजार रुपये द्यायचे. तुम्ही दिलेल्या किमतीनुसार तुमचा परवाना काढला जाणार. तुम्ही मेल्यानंतर तुमच्या दफनपेटीमध्ये तो परवाना ठेवण्यात येणार. नंतर तुम्ही आकाशातल्या दरबारात गेल्यानंतर तिथला देवदूत तुमचा परवाना बघणार. तुम्ही जर पन्नास हजार रुपये दिले असतील, तर तुम्हांला पहिल्या रांगेत बसवणार; पाच हजार दिले असतील, तर मागच्या रांगेत बसवणार. म्हणजे, ज्याच्यासाठी धर्माची निर्मिती झाली, तो हेतूच धोक्यात यायला लागला.

किंवा व्यवहार कसा होता? डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी चिडून विचारलंय की, ‘ज्या ठिकाणी कुत्री-मांजरी जाऊन पाणी पितात, त्या ठिकाणी तुम्ही माझ्या बांधवांना पाणी पिऊ देत नाही. ज्या ठिकाणी गुरंढोरं जाऊन बसू शकतात, त्या देवळामध्ये तुम्ही मला बसू देत नाही. माझ्या हाताखालचा चतुर्थ श्रेणीचा अधिकारीदेखील माझ्या अंगावर लांबनं फायली फेकतो…’ पुढे त्यांनी असा संतप्त सवाल केलाय, ‘Are these people are demons or devils or fools?’ म्हणजे, ही माणसं कोण आहेत? महामूर्ख आहेत की सैतान आहेत? आणि त्यावर त्यांनीच उत्तर दिलंय, ‘ही माणसं चांगली आहेत’. मग ही माणसं अशी का वागतात? कारण तसं वागावं ही त्यांची धर्माज्ञा आहे. आपल्या असं लक्षात येईल की, आज स्त्रीशिक्षणाचा सगळीकडे उदोउदो होतो, पण ज्या वेळेला महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबार्इंनी मुलींना शिकवायला सुरुवात केली, त्या वेळी पुण्यामधल्या शहाण्यासुरत्या लोकांनी काढलेली पत्रकं आपण पाहिली, तर आपल्याला हसू येईल. त्या पत्रकांमध्ये लिहिलेलं होतं – ‘हा फुले असं म्हणतोय की, मुलींना शिकवायला पाहिजे, पण मुलींना अजिबात शिकवता कामा नये. कारण मुली जर वाचायला आणि लिहायला शिकल्या, तर वाचायला शिकलेल्या मुली वाईट-साईट पुस्तकं वाचतील आणि लिहायला शिकलेल्या मुली नवऱ्याला चावट चावट पत्रं लिहितील’.

हे ऐकल्यानंतर आज आपण हसतो; परंतु महात्मा फुलेंचे वडील हसले नाहीत. फुलेंच्या वडलांनी फुलेंना बोलवलं आणि सांगितलं की, ‘‘मुलींना शिकवण्याचा हा धंदा बंद कर’’. फुले म्हणाले, ‘‘का?’’ फुलेंचे वडील म्हणाले, ‘‘अरे, धर्मामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की, ‘शिकणं हे बाईचं कार्यक्षेत्र नाही’ ’’. फुले म्हणाले, ‘‘असेल, पण ‘मुलींना शिकवायचं’ असं मी ठरवलंय ’’. फुलेंचे वडील म्हणाले, ‘‘धर्माची नीती सगळ्यांनी पाळायची असती. ती अशी तुडवता येत नाही. त्यामुळे धर्माच्या नीतीला स्मरून तू मुलींना शिकवण्याचा धंदा बंद कर’’. तरीदेखील मुलींना शिकवण्याचा हट्ट फुलेंनी कायम ठेवला, त्या वेळी त्यांचे वडील म्हणाले, ‘‘तुला जर मुलींना शिकवायचं असेल, तुला जर धर्माची नीती पाळायची नसेल तू घर सोडून बाहेर पड.’’

म्हणजे धर्माची नीती तपासून मुलीला शिकवता यावं, यासाठी दीडशे वर्षांपूर्वी २१ वर्षांचे महात्मा फुले आणि १८ वर्षांच्या सावित्रीबाई यांनी स्वत:च्या घराचा उंबरठा ओलांडला. त्याच्यामुळे आज स्त्रीशिक्षणाचा प्रसार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झाला. म्हणजे एका बाजूला धर्माच्या नीतीचा उफराटा व्यवहार चालू होता आणि दुसऱ्या बाजूला पारंपरिक मूल्यांची विश्वासार्हताच धोक्यात आली होती. म्हणजे, समजा पारंपरिक मूल्य होतं, पातिव्रत्य. नवरा कसा का असेला, जुगारी का असेना, दारू का पिईना, वेश्येकडे का जाईना; परंतु ‘आपला नवरा हा आपला परमेश्वर आहे’, असं पत्नीने मानायला पाहिजे.

आता आजची परिस्थिती काय आहे? आपल्यापैकी कोणावर ही वेळ येऊ नये, पण जर आपल्या बहिणीचं लग्न लावून दिल्यानंतर तिच्या पदरी असा बदफैली नवरा आला, तर आपण तिला काय सांगू? आपण तिला असं सांगू की, ‘बाई गं, तुझ्या नशिबामध्ये हा नवरा आहे आणि तो परमेश्वर आहे. त्यामुळे जन्मभर त्याला सांभाळून त्याची सेवा करतच जीवन घालव’. का आपण असं सांगू की, ‘मोठ्या हौसेने तुझं लग्न करून दिलं होतं, परंतु हे काहीतरी उलटंच झालं. तुझ्या पदरी हा बदफैली माणूस आला. सोडून दे त्याला; घटस्फोट घे आणि तू तुझ्या जीवनाची नवीन सुरुवात कर. कारण पातिव्रत्यापेक्षा तुझं व्यक्तिस्वातंत्र्य अधिक महत्त्वाचं मूल्य आहे’. कारण ‘पातिव्रत्य’ हे जुनं पारंपरिक मूल्य होतं आणि आता त्याची जागा ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ या आधुनिक मूल्याने घेतली आहे.

कामगारांनी संप केल्यानंतर मालक जर म्हणाला की, ‘मी आता अत्यंत दयाळू अंत:करणाने तुम्हांला प्रत्येकाला दर महा एकेक हजार रुपयाचं दान देणार आहे’, तर आजचे कामगार म्हणतील की, ‘कुठल्या जगात वावरता! तुम्ही आम्हाला देणार असलेली रक्कम दान नाही, तो आमच्या घामाचा दाम आहे आणि आमच्या घामाच्या दामातूम तुम्हाला जो फायदा मिळतो, त्यातलाच काही भाग तुम्ही आम्हाला देणार आहात’. याचा अर्थ असा की, नव्या इहवादी किंवा विवेकवादी नीतीचा जन्म झाला. ही नीती कशावर आधारित आहे? आपण वैज्ञानिक दृष्टीकोनामध्ये जो कार्यकारणभाव बघितला, त्याच्यावर ही नीती आधारित आहे.

म्हणजे, नीतीचं साधं सूत्र काय आहे? ते सूत्र असं- इतरांनी माझ्याशी जसं वागावं असं मला वाटतं, तसं मी इतरांशी वागावं. इतरांनी माझ्याशी जसं वागलेलं मला आवडत नाही, तसं मी इतरांशी वागू नये. म्हणजे इतरांनी माझ्यावर प्रेम केलेलं मला आवडतं, तर मी इतरांच्यावर प्रेम करावं. इतरांनी मला मदत केलेली मला आवडते, तर मी इतरांना मदत करावी. इतरांनी मला त्रास दिलेला मला आवडत नाही, तर मी इतरांना त्रास देऊ नये. इतरांनी माझी फसवणूक केलेली मला आवडत नाही, तर मी इतरांची फसवणूक करू नये. हा झाला नीतीचा कार्यकारणभाव. त्यामुळे या सारासार बुद्धीने किंवा विवेकाने धर्मापेक्षा वेगळं, एक नैतिक तत्त्वज्ञान उदयाला आलं, ज्याला आपण ‘विवेकवाद’ म्हणतो.

लक्षात घ्या, हे तत्त्वज्ञान धर्माच्या विरोधी नाही, पण ते धर्मापेक्षा वेगळं आहे. ‘व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि त्याची जबाबदारी’ हा या तत्त्वज्ञानाचा पाया होता. म्हणजे प्रत्येकाला सुखाचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे आणि हे स्वातंत्र्य सर्वांना समान आहे, या धर्तीवर हे तत्त्वज्ञान आधारलेलं आहे. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे उपासतापासासारख्या शारीरिक गोष्टी आणि ‘विधवेने लग्न करू नये’, या स्वरूपाची मानसिक बंधनं यांची त्याला गरज नाही. आपण जर नीटपणे विचार केला, तर आपल्या लक्षात येईल की, नीतीचा हा भाग अधिक चांगल्या प्रकारे मानवी संबंध निर्माण करू शकतो किंवा समाजाची प्रगती घडवून आणू शकतो. म्हणजे समजा, एका वर्गामध्ये मुलं आहेत आणि मुलांनी अभ्यास करताना शांत राहण्याची गरज आहे. तर मुलं दोन प्रकारे शांत राहू शकतात. एक तर ‘सगळ्यांनी अभ्यास चालू असताना शांत राहायचं. त्यामुळे सगळ्यांचा अभ्यास चांगला होतो. सगळ्यांना नीट समजतं’, हे गुरुजींनी पटवून दिलं पाहिजे.

दुसरं म्हणजे, मास्तर भयंकर मारकुटे असू शकतात. दंगा केला तर इतकं ठोकून काढतात की, त्याच्यापेक्षा गप्प बसलेलं बरं. दोन्हीही कारणांनी शांतताच राहील, पण अधिक चांगली शांतता पहिल्या प्रकारची असेल. कारण तो स्वत: घेतलेला निर्णय असेल. समजा, ऑफिसमध्ये दोन टेबल्स आहेत. दोन्हीही टेबल्स शेजारी शेजारी आहेत. काम झाल्यावर न मागता लोक स्वखुशीने पैसे देतील, अशा स्वरूपाचं काम दोन्हीही टेबल्सवर आहे. ज्या वेळी पहिल्या टेबलवर काम होतं आणि माणसं पैसे देतात, त्या वेळी खरं तर टेबलवरच्या कारकुनाला ते पैसे घ्यावेसे वाटतात, परंतु बरोब्बर त्याच्या डोक्यावर दत्ताची एक तसबीर असते. त्यामुळे ‘हा तीन तोंडांचा दत्त सतत आपल्याकडे बघतोय’, याची या कारकुनाला भीती वाटते आणि तो पैसे घेत नाही. दुसऱ्या टेबलवरही तसेच पैसे दिले जातात, पण या टेबलवरचा कारकून पैसे देणाऱ्या लोकांना सांगतो की, ‘‘मला या ठिकाणी हेच काम करायला बसवलंय. त्याच्यामुळे तुम्ही मला पैसे देण्याची गरज नाही’’. दोन्हीही टेबल्सवर पैसे घेण्याचं काम होत नाही. पहिल्या टेबलवर ते होत नाही, कारण वर दत्ताचा फोटो आहे. दुसऱ्या टेबलवर ते होत नाही, कारण तिथल्या कर्मचाऱ्याच्या विवेकाचा तो निर्णय आहे.

यांपैकी अधिक श्रेयस्कर काय आहे? अधिक श्रेयस्कर दुसरा पर्याय आहे. पहिल्या कर्मचाऱ्याच्या डोक्यावरचा दत्ताचा फोटो हलवला, तर कदाचित तो विचार करेल की, ‘आता देव काही डायरेक्ट बघणार नाहीये, आपण पैसे घ्यायला हरकत नाही’. पण दुसरा कर्मचारी म्हणेल की, ‘मी करत असलेल्या कामाचे पैसे जर मला मिळत असतील, तर मी आणखी वेगळे पैसे घेणं योग्य नाही’. त्याच्यामुळे एका बाजूला ही नीती स्वत:च्या विवेकाच्या आधाराचा पाया निर्माण करते. आता दुसऱ्या बाजूला ही नीती काय करते? माणसाचं एक वैशिष्ट्य म्हणजे, माणूस समाजातच वाढतो. समाजाशिवाय जर एकटा माणूस जन्मभर एका बेटावर राहिला, तर त्याच्या विवेकाचा, त्याच्या नीतीचा प्रश्न निर्माण होणार नाही. त्याने रोज सगळ्यांना शिव्या दिल्या काय, अंगावर कपडे घातले काय किंवा नाही घातले काय… काहीही बिघडणार नाही. कारण ज्या बेटावर तो सोडून कोणीही नाही, त्या बेटावर या गोष्टींमुळे कसलेही प्रश्नच निर्माण होणार नाहीत.

पण आपण समाजातच वाढतो. आपण लहान असू, तर स्वाभाविकपणे आपल्याला लोकांचं प्रेम लागतं. आपण वृद्ध असू, तर आपल्याला लोकांची मदत लागते. त्यामुळे स्नेह, प्रेम, दया, परोपकार, करुणा हे सगळं समाजधारणेसाठी आपल्याला लागतं. ते अपरिहार्य आहे आणि श्रेयस्कर आहे, हे आपल्याला कळतं. म्हणजेच व्यक्ती सुखी होण्यासाठी समाज नीतीमान पाहिजे, हे आपल्याला कळतं. पण समाज नीतीमान होण्यासाठी त्या समाजातली व्यक्ती नीतीमान पाहिजे. हा साधा, सरळ कार्यकारणभाव आहे. त्याच्यासाठी परमेश्वराला बोलवून घेण्याची काही गरज नाही.

अर्थात, तरीदेखील जी नीती निर्माण होते, या नीतीची दोन परिमाणं आपण लक्षात ठेवली पाहिजेत. पहिलं परिमाण आहे, समाजव्यवस्थेचं. म्हणजे, ज्या वेळेला सरंजामशाही होती आणि राजाच्या पदरी किंवा प्रचंड मोठ्या जमीनदारच्या पदरी सैन्य होतं किंवा सेवक होते, त्या वेळेला स्वामीनिष्ठा- मीठ खाल्लेलं आहे. त्याला जन्मभर जागलं पाहिजे- हे प्रभावी मूल्य होतं. ज्या वेळेला भांडवलशाहीचा उदय झाला, शेतीत अडकून पडलेल्या लोकांना कारखान्यामध्ये आणण्याची गरज निर्माण झाली, त्या वेळी लोक स्वामीनिष्ठेच्या मूल्यात अडकलेले असल्यामुळे ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ नावाच्या नव्या मूल्याचा उदय झाला. या पद्धतीने परिस्थिती नव्या मूल्याला किंवा नव्या नीतीमूल्यांना जन्म देते, हे लक्षात ठेवायला पाहिजे.

दुसरी गोष्ट म्हणजे, परिस्थिती पूरक असल्याशिवाय तुम्हांला नीतीचं वर्तन केवळ स्वत:ची इच्छा म्हणून फारच मर्यादित अर्थाने करता येतं. म्हणजे शेजाऱ्यावर प्रेम करावं, हे कळणं सोपं आहे. कारण ते उपयुक्तही आहे. प्रश्न असा आहे की, मी झोपडपट्टीमध्ये राहतो. झोपडपट्टीमध्ये १०० झोपड्या आहेत. एकच नळ आहे आणि त्याला सकाळी एकच तास पाणी येतं. तर स्वाभाविकपणे नळावर एकमेकांची भांडी एकमेकांना लागणार आणि शेजाऱ्या-शेजाऱ्यांमध्ये स्वाभाविकपणे पाणी भरण्यावरनं रोज भांडण होणार. जर १००  घरांना १०० नळ असते, तर ही भांडणं झाली नसती. किंवा ‘वृद्धाची सोय प्राधान्याने करावी’, ही नीती आपल्या सगळ्यांना मान्य असते.

पण ज्या वेळी बस स्टँड भरगच्च भरलेला असतो; एकच बस असते आणि ती गावाला जाणारी शेवटची बस असते, त्या वेळी ‘आजूबाजूचे सगळे वृद्ध आणि स्त्रिया हे लोक बसमध्ये चढले का, त्याच्यानंतर मी चढेन’, असं म्हणत आपण थांबत नाही. उलट आपल्यात जास्त ताकद असेल, तर आपण सगळ्यांना मागे रेटून पहिल्यांदा बसमध्ये जागा पटकावतो. जर प्रत्येक माणसाला बसायला निश्चितपणे जागा मिळेल, अशा स्वरूपाची व्यवस्था स्टँडवर असेल, तर वृद्धांचा आदर राखला जाईल. याचा अर्थ असा की, आपल्याला जी नीती पाळायची असते, त्या नीतीला एका सामाजिक वास्तवाचं भान असावं लागतं आणि सामाजिक स्थिती त्या वास्तवासाठी अधिकाधिक अनुकूल असावी लागते. नीती नेहमीच काळाप्रमाणे बदलत असते.

म्हणजे १००  वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये तीन गोष्टी नैतिक मानल्या जात. एक, नेहमी सत्य बोलावं. दोन, ब्राह्मणांनी मांसाहार करू नये. तीन, स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये. आज स्थिती काय आहे? सत्य बोलावं, ही शाश्वत नीती आहे. त्यामुळे आज आणि उद्याही सत्य हेच असणार की, ‘लोकांनी सत्य बोलणं हे समाजव्यवहारासाठी उपयुक्त आहे’. कारण ते शाश्वत नैतिक मूल्य आहे. ब्राह्मणांनी मांसाहार करू नये, हे जर आज आपण ‘मूल्य’ म्हणून सांगायला गेलो आणि मांसाहार करणारे ब्राह्मण अनैतिक असल्याचं मानलं जायला लागलं, तर ती गोष्ट अत्यंत हास्यास्पद ठरेल, कारण शाकाहार करावा की मांसाहार करावा याच्यावरून आजच्या समाजात तुमची नैतिकता जोखली जात नाही.

‘बाईने शिकणं’ ही १०० वर्षांपूर्वी अनैतिक असलेली गोष्ट आज ठळकपणे नैतिक झालेली आहे. कुठलंही सरकार असंच म्हणतं की, ‘आम्हांला पहिल्यांदा महिलांच्या शिक्षणाची सोय केली पाहिजे. कारण प्रदीर्घ काळासाठी त्यांचं शिक्षण मागे पडलेलं आहे’. म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की, समाजबदलासाठी नीतीचा जो पाया लागतो, तो पाया विवेकवादी तत्त्वज्ञानातून निर्माण होऊ शकतो. पण जर ‘मला समाज बदलायचा आहे’, असं म्हटलं, तर लोक विचारतील, ‘समाज कसा बदलतो, हे तुम्हांला माहिती आहे का?’ समाज बदलण्याचे आजचे लोकप्रिय मार्ग कुठले आहेत? पहिला मार्ग आहे राजकारणाचा. दुसरा मार्ग आहे, अर्थकारणाचा. तिसरा आहे, धर्मकारणाचा किंवा जातकारणाचा. चौथा आहे, हिंसाकारणाचा.

यांपैकी राजकारणाचा मार्ग आज या देशामध्ये सामान्यांना जवळजवळ उपलब्धच नाही. कारण निवडणूक आणि राजकीय पक्ष ही प्रत्यक्षामध्ये एक अत्यंत खर्चिक प्रक्रिया झालेली आहे. अर्थकारण हे कधीच आंतरराष्ट्रीय शक्तींच्या ताब्यात गेलेलं आहे. तेही बदलायला तुमच्याकडे फार कमी ताकद आहे. धर्मकारण आणि जातकारण यांच्या आधारे समाज बदलणं हे तर विवेकवादी व्यक्तींना मान्यच होणारं नाही. नक्षलवाद्यांप्रमाणे हिंसेच्या आधारे समाज बदलणं, याला तर तीव्र विरोधच करायला हवा. म्हणजे मला समाज बदलायचा आहे, पण माझ्या हातात राजकारण नाही, अर्थकारण नाही, धर्मकारण मी करू इच्छित नाही, हिंसाकारणाला माझा विरोध आहे. अशा वेळेला माझ्या हातामध्ये एकच गोष्ट राहते. ती म्हणजे, विवेककारण. या विवेककारणाच्या आधारे बदलाची सुरुवात आपण कशी करू शकतो?

ती सुरुवात करायची याचा अर्थ, समाजाची परंपरागत प्रमाणमूल्यं बदलायची. प्रमाणमूल्यं म्हणजे काय? समाजाची धारणा ज्या मूल्यांमुळे होते, त्यांना प्रमाणमूल्यं म्हणतात. वास्तविक, या परंपरागत प्रमाणमूल्यांमुळे समाज संकटात सापडतो. मात्र समाज संकटात सापडूनदेखील परंपरागत प्रमाणमूल्यं दूर केली जात नाहीत. कारण समाजात त्यांच्या संदर्भात मानसिक गुलामगिरी निर्माण झालेली असते. आपण आजूबाजूला जरा डोळसपणाने बघितलं, तर आपल्याला असं दिसेल की, ही प्रमाणमूल्यं राजकीय फसवणूक करतात; आर्थिक पिळवणूक करतात; रूढी-परंपरांचं दडपण निर्माण करतात.

एकेक उदाहरण घेतलं, तर हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. उदाहरणार्थ, आज देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये कुपोषणाचा प्रश्न मोठा आहे. परंतु आजही प्रत्येक लग्नामध्ये साधारणपणे 10 किलो तांदळाच्या अक्षता उधळल्या जातात, आणि सरकारी आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये तीन लाख लग्नं लागतात. म्हणजे दर वर्षी तीस लाख किलो तांदूळ केवळ लोकांच्या डोक्यावर उधळण्यासाठी वापरला जातो. कारण आपली कल्पना असते की, वधू-वरांच्या मस्तकावर त्या अक्षता पोचाव्यात, पण वास्तवात त्या समोर असलेल्या माणसांच्या मस्तकावरच पोहोचतात. त्या रंगवलेल्या असतात. त्यामुळे नंतर त्या गोळा करूनही फायदा होत नाही. याला फुलं उधळणं, टाळ्या वाजवणं असे पर्याय असूनदेखील रूढी-परंपरांच्या दडपणामुळे अजूनही अक्षताच वापरल्या जातात. किंवा;

‘लग्न’ ही गोष्ट दिवसेंदिवस अधिकाधिक खर्चिक होत चाललेली आहे. साधं लग्न म्हटलं, तरी दोन्हीही बाजू एकेक लाख रुपये खर्च करतात; आणि ते लाख रुपये त्यांच्याकडे नसतात. ते कोणाकडून तरी उसनेपासने, कर्जाऊ घ्यायला लागतात किंवा स्वत:च्या आयुष्याची सगळी शिल्लक त्यासाठी वापरावी लागते. आता लग्न साधं केलं आणि तेच पैसे नवरा-नवरीना त्यांच्या संसारासाठी दिले तर? हा मुद्दा लोकांना प्रत्यक्षात जरी पटला, तरी रूढी-परंपरांचं दडपण असं असतं की, लोक लगेच विचारायला लागतात, ‘मग लग्न काय परत परत होतं काय! ते एकदाच होतं. ते लग्न कसं थाटातच व्हायला पाहिजे’. म्हणजे, ‘लग्न थाटातच व्हायला पाहिजे’, हे परंपरागत प्रमाणमूल्य आहे. त्याच्यामुळे समाजाचं नुकसान होतंय, पण त्याच्याबद्दल बोललेलं चालत नाही. कारण त्याच्याबद्दल मानसिक गुलामगिरी निर्माण झालेली आहे. किंवा आर्थिक पिळवणूक. म्हणजे समजा उन्हाळा आहे. तुम्ही बाहेर पडलेले आहात. तुमच्याबरोबर घरातली काही तरुण मुलं आहेत. सगळ्यांना तहान लागली आहे. त्यामुळे तुम्ही कोल्ड्रिंक घ्यायचं ठरवता. बाजूला तुम्हाला कोल्ड्रिंकचं एक दुकान दिसतं. तुम्ही त्या दुकानात जाता आणि ‘‘तुमच्याकडे कोणकोणती कोल्ड्रिंग्ज आहेत?’’, असं दुकानदाराला विचारता. तो म्हणतो, ‘‘आमच्याकडे चांगल्यापैकी उसाचा रस आहे; ताजं पन्हं आहे; लस्सी आहे; ताक आहे; कोकम सरबत आहे; लिंबू सरबत आहे’’. तर सगळी तरुण मुलं एकमेकांकडे पाहून हसायला लागतात. कारण त्यांच्या मनावर हे पक्कं ठसवलेलं आहे की, ‘ठंडा मतलब, कोका कोला’. त्यामुळे ती सगळी मुलं कोका कोला हे पेय मागतात. कदाचित कोका कोला नाही, तर पेप्सी मागत असतील.

वस्तुस्थिती काय आहे? मी आत्ता उच्चारलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये – कोकम सरबत असो; लिंबू सरबत असो; उसाचा रस असो; पन्हं असो; लस्सी असो; ताक असो- कोका कोलापेक्षा किती तरी जास्त पोषणमूल्यं आहेत. तसंच या पेयांची किंमत कोका कोलापेक्षा कमी आहे. भर म्हणजे, माझ्या देशातल्या गरीब बांधवांना त्यामुळे पैसा मिळणार आहे; आणि कोका कोला निश्चितपणे अपायकारक आहे. मात्र अशी अपायकारकता वर सांगितलेल्या इतर पेयांमध्ये नाही. तरीदेखील कोका कोलाचा खप या देशामध्ये सतत वाढता राहतो. कारण ‘कोका कोला पिणं म्हणजेच आयुष्य एन्जॉय करणं’, अशा स्वरूपाचं एक चुकीचं मूल्य किंवा प्रमाणमूल्य समाजामध्ये निर्माण झालेलं आहे. त्यामुळे जरी देशाची अप्रत्यक्ष आर्थिक पिळवणूक झाली – कारण वास्तविक, या देशातलं जे पाणी शेतीसाठी किंवा पिण्यासाठी वापरलं गेलं पाहिजे, ते पाणी प्रचंड प्रमाणामध्ये कोका कोला तयार करण्यासाठी वापरलं जातं- तरीदेखील आपण कोका कोला पितोच!

किंवा आज जर कुणीही राजकारण करायचा विचार केला, निवडणुकीला उभं राहण्याचा विचार केला, तर चटकन पहिला प्रश्न विचारला जातो, ‘तुझ्याकडे पैसे किती आहेत?’ आणि दुसरा प्रश्न विचारला जातो, ‘तुझी जात कुठली? आणि मतदार संघामध्ये कुठल्या जातीचे लोक जास्त आहेत?’ म्हणजे खरं म्हटलं तर आपली लोकशाही सांगते, ‘वन मॅन, वन व्होट, वन व्हॅल्यू’- मी एक माणूस आहे. म्हणून मला एक मूल्य आहे. म्हणून मला एक मत आहे. ह्याचा कसलाही संबंध माझ्या जातीशी किंवा मतदाराच्या उमेदवाराच्या पैशाशी नाही. परंतु प्रत्यक्षामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची प्रलोभनं दाखवून, पैसे देऊन आज मतं मिळवली जातात. अशी राजकीय फसवणूक चालू आहे.

आता, या परंपरागत प्रमाणमूल्यांमध्ये सत्तासंबंध असतात, हे मला समजतं. पण हे सत्तासंबंध दूर करणं, हा एक मोठा क्रांतीचा भाग होऊ शकतो. तो काही आज शक्य आहे, असं मला वाटत नाही. म्हणजे उदाहरणार्थ, आज स्त्रियांना समाजात दुय्यमत्व आहे. पण स्त्रियांचं दुय्यमत्व जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आहे. म्हणजे राजकारणामध्ये त्यांना 50 टक्के जागा द्याव्यात, हे विधेयक अजून भिजत पडलेलं आहे. अर्थकारणाच्या दृष्टीने विचार केला, तर आजही लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या घराला किंवा जमिनीला तिचं नाव लागत नाही. समाजकारणामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये भ्रूणहत्या चालू आहे आणि अत्यंत चिंताजनक पद्धतीने स्त्रिया आणि पुरुष यांचं प्रमाण समाजामध्ये घटतं आहे. सांस्कृतिक कारणामध्ये जाहिरातीसाठी स्त्रीचा वापर बेलगामपणे कशाही स्वरूपात होतो आहे. ती जर विधवा असेल, तर आजही धार्मिक कामामध्ये तिला ना स्वत:च्या कन्येच्या दानाचा अधिकार आहे, ना मंगल कार्याची सुरुवात ती करू शकते. हे सगळे सत्तासंबंध प्रमाणमूल्यांमध्ये असतात आणि त्या सर्व सत्तासंबंधांच्या विरोधात लढाई करावी लागते. पण जरी ही लढाई मला करता येत नसेल, तरी निदान मी काय करू शकतो? अंधश्रद्धा निर्मूलनापासून विवेकवादापर्यंत वाटचाल केलेला चळवळीतला एक कार्यकर्ता किंवा एक सजग नागरिक म्हणून मी काय करू शकतो?

मी माझी विवेकबुद्धी प्रखर करू शकतो. माझ्या प्रखर विवेकबुद्धीने मी नवी समतावादी मूल्यं निर्माण करू शकतो आणि माझ्या स्वत:च्या जीवनामध्ये मी त्यांचं आचरण करू शकतो. त्या प्रभावामुळे आजूबाजूच्या कुटुंबांमधल्या व्यक्ती हे करायला लागतील आणि कदाचित समाजामध्येदेखील हा बदल होणं शक्य होईल. म्हणजे व्यापक समाजपरिवर्तन होऊन समाजाचं मूल्यपरिवर्तन कधी होईल ते होईल, परंतु ते जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मी माझ्या विवेकबुद्धीमधून नव्या प्रमाणमूल्यांच्या निर्मितीचं आचरण सुरू केलं पाहिजे आणि जरी आचार करता आला नाही, तरी मी योग्य मूल्यांचा उच्चार केला पाहिजे. मला स्वत:च्या मुलीचं आंतरजातीय लग्न कदाचित करता आलं नाही, तरीदेखील ‘जात ही अंधश्रद्धा आहे आणि मुलामुलींची लग्नं जातीच्या पलीकडे जाऊन झाली पाहिजेत’, असं उच्चारणंदेखील महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यामुळे घटनेच्या कर्तव्याचं पालन होतं. या नव्या मूल्यांमुळे व्यक्तीला प्रगल्भता लाभते, प्रत्येक व्यक्तीला मूल्यं असल्यामुळे लोकशाही समर्थ बनते, आणि त्याच्यामुळे समाजाचा फायदा होतो. त्यामुळे नव्या आणि योग्य प्रमाणमूल्यांचा उच्चार याच्यामुळे घटनेच्या कर्तव्याचं पालन, व्यक्तीची प्रगल्भता, व्यक्तीला मूल्यं असल्यामुळे लोकशाही समर्थ बनणं आणि समाज उन्नत होणं हे सगळे फायदे होतात.

अर्थातच, जसं बोलतो, तसं वागत असेल, तर ते कितीतरी अधिक परिणामकारक ठरतं, परंतु योग्य मूल्यांचा उच्चारदेखील महत्त्वाचा आहे. मार्क्सचं एक वाक्य आहे- ज्या वेळी विचार जनसमुदायाची पकड घेतात, त्या वेळी ते भौतिक शक्ती बनतात. भौतिक शक्ती काही फक्त ४४० दाब विजेच्या व्होल्टमध्ये नसते. भौतिक शक्ती काही फक्त धरणाच्या पाण्यामध्ये नसते. भौतिक शक्ती लोकांचे विचार एकवटण्यामध्येदेखील असते. ज्या वेळी महाराष्ट्रातल्या काही गावांमधल्या लोकांचे विचार एकवटले गेले, त्या वेळी पूर्वी अस्वच्छतेची आगार असलेली गावं इतकी देखणी आणि इतकी स्वच्छ झाली की, आपलं बोट तोंडात जावं. याचा अर्थ, ग्रामस्वच्छता अभियानाच्या विचाराने त्या गावांमधल्या लोकांच्या मनाची पकड घेतली आणि त्यातून स्वच्छतेची भौतिक शक्ती निर्माण झाली. त्यामुळे योग्य विचारांनी जनसमुदायाची पकड घ्यावी म्हणून आणि त्याच्यामधून भौतिक शक्ती निर्माण व्हावी म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनापासून विवेकवादापर्यंतची ही वाटचाल अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आग्रहपूर्वक आणि तत्त्वनिष्ठपणे करू इच्छितात.

(शब्दांकन: भाग्यश्री भागवत)

(साभार-साप्ताहिक साधना)

‘विवेकाचा आवाज’ हे पुस्तक अमेझॉन वरूनही ऑनलाइन खरेदी करता येऊ शकेल. त्यासाठी क्लिक करा https://www.amazon.in/…/…/ref=cm_sw_r_cp_apa_i_Z0UwDbT2WJCKJ )

Previous articleडॉक्टर दाभोलकरांना आठवताना…
Next articleरोगापेक्षा इलाज भयंकर
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.