शब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक … 

प्रवीण बर्दापूरकर

आमच्या पिढीनं काळ्यावर पांढरं करायला सुरुवात केली तोपर्यंत कवी आणि कथालेखक म्हणून नागनाथ कोत्तापल्ले यांचं नाव मराठी साहित्याच्या प्रांगणात चर्चेत आलेलं होतं . हा लेखक खूप समजून उमजून लिहितो , अनेकदा तर आपल्याला जे म्हणावसं वाटतं तसंच लिहितो अशी जवळीक कोत्तापल्ले यांच्या लेखनाविषयी तेव्हाही वाटायची . तेव्हा ते बीडला प्राध्यापक होते आणि शिक्षकांविषयी आदराची स्थिती वाटावी असा तो काळ होता . याचं कारण एक तर शिक्षक तळमळीनं शिकवत , ‘शहाणे करुन सोडावे विद्यार्थीजन’ ही वृत्ती  तेव्हाच्या शिक्षकांत होती आणि दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांनीही मन लावून वर्गातच शिकण्याचे ते दिवस होते .  कुठल्या तरी कामानिमित्त तेव्हा बीड मार्गे जात असता एकदा कोत्तापल्ले यांना भेटलोही . ते वर्गावर होते . बाहेरुन बघितलं तर शिकवण्याची त्यांची मस्त तंद्री लागलेली होती आणि विद्यार्थीही मन लावून नोटस् घेत होते मोठं विलोभनीय असं ते दृश्य होतं . अध्यापनातली तन्मयता नागनाथ कोत्तापल्ले यांच्यात कायमच राहिली असं नव्हे तर पुढे जाऊन त्यांच्यातल्या शिक्षकाने अनेक विद्यार्थ्यांच्या पालकाचीही भूमिका निभावली .

एक आधीच सांगून टाकायला हवं , मी काही नागनाथ कोत्तापल्ले गुरुकुलातला विद्यार्थी नव्हे . लेखक म्हणूनही कोत्तापल्ले यांच्याशी माझी फार कांही घसट नव्हती . अधूनमधून भेटी होतं . गप्पा होतं . ‘आपण दोघंही मराठवाड्याचे’ हा मृदगंध  आमच्यातल्या त्या गप्पांना असे .  कोत्तापल्ले यांनी एखादी नवीन असाइनमेंट स्वीकारली की , आवर्जून जाऊन त्यांना त्या नव्या पदाच्या खुर्चीत बघण्याचा नाद जणू मला लागला होता . शिक्षण संपलं . मी पत्रकारितेत आलो आणि स्थिरावलोही . हा मधला दहा-बारा वर्षांचा काळ आमच्यात मुळीच संपर्काचा नव्हता . नागपूरला ते कुठल्या तरी कार्यक्रमाला आले तेव्हा भेटायला गेलो तेव्हा गप्पांतून लक्षात आलं की ,  भेट न होता आम्ही दोघांनीही परस्परांविषयी स्वत:ला अपडेट ठेवलं होतं . एव्हाना नागनाथ कोत्तापल्ले नावाचं झाड   कवी , कथाकार , कादंबरीकार , समीक्षक , शिक्षक असं विविधांगी बहरलेलं होतं . या झाडाला लागलेली फुलं आणि फळंही आगळ्याच  कर्तृत्वानं  त्यांचं बहरुन आलेली  होती  . मराठी भाषा आणि साहित्य विषयक अनेक समित्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं कुलगुरुपद , चिपळूणला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे याच कर्तृत्वाचे बहर होते .

नागनाथ कोत्तापल्ले यांच्यातला कथा लेखक अगदी सुरुवातीपासूनच मला जास्त भावत गेला . त्यांच्या कथा काळाच्या पुढे जाणाऱ्या असल्याचं जाणवत असे . त्यांची भाषा सामाजिक बांधिलकी आणि मानवी संवेदनेची होती . दृष्टीकोन पुरोगामी डावीकडे झुकलेला ,नव्याचं स्वागत  करणारा अगत्यशील होता आणि वर्तन विवेकी होतं  .  साहित्याच्या विविध प्रांतात मुशाफिरी करण्याच्या कैफात त्यांच्यातला कथा लेखक बराचसा मागे पडला असंही माझं मत आहे आणि हे मी त्यांना बोलूनही दाखवत असे . मुक्तिबोधांची ‘जन हे वोळतू  जेथे ’ ही माझी आवडती एक  कादंबरी आणि नागनाथ कोत्तापल्ले यांची  ‘उलट चालीला प्रवाहो’ ही माझी अतिशय आवडीची कादंबरी  ; आवडत्या या दोन्हीतील  शब्द साधर्म्य लक्षणीय आहे . ‘उलट चालीला प्रवाहो’ या कादंबरीचा  नायक  नारायण अनेक वर्षे माझ्या स्वप्नात पिंगा घालायला येत असे ,  असं जर आज कुणाला सांगितलं तर त्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही कारण . पत्रकार केवळ साहित्यातल्या बातम्या देतात असाच बहुसंख्य लोकांचा समज आहे पत्रकार साहित्याशी असे  एकाग्र होतात यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही पण ते असो . नागनाथ कोत्तापल्ले यांच्या ‘गांधारीचे डोळे’ , ‘सावित्रीचा निर्णय’ या कथांचा पोत साहित्याच्या सर्व निकषांवर अस्सल भरजरी आहे यात शंकाच नाही . कोत्तापल्ले यांचा स्मरणात राहिलेला आणखी एक लेख म्हणजे ‘चळवळीचे साहित्यशास्त्र’ . मुळात चळवळींना काही साहित्य मूल्य किंवा शास्त्र असतं . याची जाणीवच ( काही मोजके समीक्षक वगळता ) तोवर विकसित झालेली नव्हती . कोत्तापल्ले यांच्या या मजकुरानं चळवळींकडे बघण्याचा दृष्टीकोनाच साहित्यिक अंगानं मग उलगडत गेला .

कोत्तापल्ले विद्यार्थी केंद्रीत शिक्षक होते . नागनाथ कोत्तापल्ले कुलगुरु  झाले तेव्हा माझी मुंबई-नागपूर अशी मुशाफिरी सुरु होती पण मराठवाड्यात पत्रकारितेच्या निमित्तानं चकरा सुरुच असत .  औरंगाबादला आलो की , ‘स्वामी’ श्याम देशपांडे सोबत कोत्तापल्ले यांची  ओझरती का असेना भेट झाली नाही असं कधी घडतचं नसे . अशाच एका औरंगाबाद भेटीत सतीश कुलकर्णी या ज्येष्ठ मित्रानं विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर कसा अन्याय झाला याची कथा सांगितली . त्या विद्यार्थ्याची भेटही घडवून आणली . हे घडलं तेव्हा नेमकं कोत्तापल्ले औरंगाबादला नव्हते . पुढे त्या विषयावर मी एक बातमी लिहिली . ‘लोकसत्ता’च्या पहिल्या पानावर माझ्या नावानिशी ती प्रकाशित झाली ; स्वाभाविकच त्या बातमीची बरीच चर्चा झाली . कोत्तापल्लेंचा फोन आला आणि ‘हा विषय  बातमीचा कशाला करायचामला फोनवर जरी सांगितलं असतं तरी मार्ग काढला असता’ , असं ते म्हणाले . ‘त्या विद्यार्थ्याला माझ्याकडे पाठवून द्या.’ असंही  त्यांनी सांगितलं . त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्याची भेट घेऊन , प्रश्न समजावून घेऊन , त्यातून कोत्तापल्ले मार्गही काढला .

नागनाथ कोत्तापल्ले यांचे  आणखी एक योगदान फारच महत्त्वाचं वाटतं . १९६०च्या आसपास मराठी साहित्याला दलित , ग्रामीण , विद्रोही , वास्तववादी असे धुमारे फुटू लागले . दलित साहित्यानं तर मराठी साहित्यातल्या तोवर  प्रस्थापित संकेत ,  शिष्टाचार आणि रुढींना चक्क हादरेच दिले . नागनाथ कोत्तापल्ले लिहू लागले त्याच्या आसपास आनंद यादव , रा. रं. बोराडे , गणेश चंदनशिव वासुदेव मुलाटे अशा अनेकांनी ग्रामीण साहित्याच्या दालनात उल्लेखनीय योगदान देणं सुरु केलेलं होतं . अस्सल मातीचा गंध असणाऱ्या या साहित्य प्रकाराची चर्चाही सुरु झालेली होती . मात्र , ग्रामीण साहित्याची ठोस अशी समीक्षा होत नव्हती . कोत्तापल्ले यांनी ग्रामीण साहित्याच्या समीक्षेला एक निश्चित वैचारिक दिशा मिळवून देण्याचा ठोस प्रयत्न केला , यात शंकाच नाही .

प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्यामुळे नागनाथ कोत्तापल्ले यांच्यासोबत सलग दोन आठवडे राहण्याचा योग आला . जागतिक पातळीवर मराठी संमेलन व्हावं असा तेव्हा अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष असलेल्या कौतिकराव पाटील आणि त्यांच्या गटाचा आग्रह होता आणि नेमका मनोहर म्हैसाळकर व त्यांच्या नेतृत्वाखालील विदर्भ साहित्य संघाचा या विश्व मराठी साहित्य संमेलनाला विरोध होता . मी तेव्हा नागपुरात होतो आणि मनोहर म्हैसाळकरांच्या तंबूतला एक म्हणून साहित्य प्रांती  बरीच लुडबूड करीत होतो तरी , विश्व साहित्य संमेलनाच्या कल्पनेचा मी हिरिरीने पुरस्कार केला . एवढंच नाही तर अमेरिकेत सॅन होजे (San Jose) ला झालेल्या संमेलनात कौतिकराव ठाले पाटील यांच्यामुळे एक प्रमुख वक्ता म्हणून सहभागीही झालो . त्या दौऱ्यात  अर्थातच नागनाथ कोत्तापल्ले हेही होते .  त्यानिमित्तानं मुंबई ते न्यूयॉर्क या सुमारे दोन आठवड्याच्या प्रवासात कोत्तापल्ले यांच्याशी चांगलीच जवळीक निर्माण झाली . त्यांच्यातल्या कथा लेखनावर भरपूर चर्चाही झाली . या काळात कोत्तापल्ले यांच्यासोबत काही मैफिलीही रंगल्या आणि गप्पांतून त्यांच्यातल्या उमदेपणाचाही परिचय झाला . कोत्तापल्ले , कौतिकराव ठाले पाटील , दादा गोरे यांच्यासोबत  नायगरा धबधब्या शेजारी असलेल्या एक हॉटेलात रात्री उशीरापर्यंत रंगलेली मैफल अजूनही स्मरणात आहे .

भारतात परतल्यावरही आम्ही बऱ्यापैकी संपर्कात होतो . एक दिवस कोत्तापल्लेंचा  फोन आला आणि चिपळूणला होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठीचा त्यांच्या नावाचा अर्ज मी नागपूरहून दाखल करावा तसंच त्यांच्या बाजूनं प्रचार करावा  असंही त्यांनी सुचवलं . मी फारच अडचणीत सापडलो कारण हा फोन येण्याच्या पाच-सहा दिवसच आधी ह. मो. मराठे यांचा उमेदवारी अर्ज नागपूरहून दाखल करण्याच्या ‘ह.मों.’ च्या प्रस्तावाला मी अनुकूलता दर्शविली होती . १९७७ पासून ह. मो. मराठे यांच्याशी माझा स्नेह होता . लेखनाच्या अनेक संधी त्यांनी मला दिलेल्या होत्या . त्यांची ब्राह्मणवादी  भूमिका मला साफ अमान्य होती तरी व्यक्तिगत पातळीवर परस्परांत ‘सेंटीमेंटल’ गुपितंही  शेअर करण्याची आमची मैत्री होती . ब्राह्मणवादाच्या ‘त्या’ वादग्रस्त  भूमिकेचा उच्चारही न करता निवडणूक लढवत असाल तरच पाठिंबा देतो’ , ही सेवानिवृत्त विंग कमांडर अशोक मोटे आणि माझी अट ‘ह.मों.’ नी मान्य केली होती आणि आम्ही दोघांनी मिळून ह. मो. साठी मतांची जुळवाजुळवही सुरु केली होती .

थोडसं बोलणं झाल्यावर पाठिंबा न देता येण्यामागची भूमिका मी नागनाथ कोत्तापल्ले यांना सविस्तरपणे सांगितली . माझ्या नकारामुळे आलेली नाराजी स्पष्ट पण सौम्य शब्दांत कोत्तापल्ले यांनी व्यक्त केली . तेव्हाचं बोलणं माझ्या अजूनही स्मरणात आहे , पण त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आता कोत्तापल्लेंच हयात नाहीत म्हणून ते संभाषण इथे देत नाही . कोत्तापल्ले आणि मराठे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले . पुढे त्या निवडणुकीने नाट्यमय वळण घेतलं . एका प्रकाशवृत्त वाहिनीनं ह. मो. मराठे यांचं ब्राह्मणविषयक जुनं वक्तव्य नवं म्हणून सादर केलं आणि निवडणुकीला एकदम कलाटणीच मिळाली . ‘ह.मों.’ विरुद्ध गुन्हाही दाखल झाला . परिणामी विजय हाताशी आलेली ती निवडणूक ‘ह.मो.’ हरले आणि नागनाथ कोत्तापल्ले चिपळूणला झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले . नंतर आमची भेट झाली तेव्हा नागनाथ कोत्तापल्लेंच्या वागण्या आणि बोलण्यात कोणतीही कटुता नव्हती . जे काही घडलं ते त्यांनी उमदेपणानं  घेतलं होतं .

शब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा एक लेखक , तळमळीचा  शिक्षक आणि उमदा माणूस म्हणूनही कोत्तापल्ले यांचं नाव मराठी साहित्यात महत्त्व अत्यंत ठळकपणे नोंदवलं गेलेलं आहे . म्हणूनच कोत्तापल्ले आज आपल्यात नाहीत ही जाणीव विषण्ण करणारी आहे…  

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleशिवरायांचा पराक्रम! माफीवीरांची फलटण…
Next articleनिवडणूक निकाल : थोडी खुशी , थोडा गम !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here