शरद जोशी: सत्यशोधनाच्या वाटेवरील यात्रिक

शेतकरी नेते , शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांची आज जयंती . त्यानिमिताने शरद जोशींनी आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या विषयात काय योगदान दिलं?  समाज व देशासाठी ते किती महत्वपूर्ण होतं?, हे सांगताहेत त्यांच्या स्नेही ,लेखिका वसुंधरा काशीकर. लेख काहीसा मोठा आहे . पण शरद जोशी हा माणूस नेमकेपणाने समजून घेण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी व टीकाकारांनीही अवश्य वाचावा असा हा लेख आहे – संपादक

……………………………………………………

– वसुंधरा काशीकर

शरद जोशींचे एक ‘अर्थतज्ज्ञ’, ‘विद्वान शेतकरी नेता’, ‘आंदोलनकर्ता’, ‘योद्धा शेतकरी’ अशा वेगवेगळ्या शब्दात आजवर अनेकांनी मूल्यमापन केलं आहे. त्यांचा मोठेपणाही सर्वमान्यच आहे. तरीही यापलीकडे अनेक पैलू शरद जोशींच्या व्यक्तीमत्वाला होते. इतिहासात त्यांची नोंद, शेतकऱ्यांना सर्वप्रथम मोठ्या प्रमाणावर संघटीत करणारा, त्यांच्यात स्वाभीमान आणि आत्मविश्वास जागवणारा विद्वान शेतकरी नेता अशीच प्रामुख्याने होईल; पण मला वाटतं त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक मितींमधली ही एक मिती आहे. मी जेव्हा जेव्हा शरद जोशींना भेटले, त्यांच्याशी बोलले आणि त्यांना ऐकलं तेव्हा तेव्हा त्यांच्या वेगळेपणाचे, लोकविलक्षण व्यक्तिमत्वाचे कवडसे सापडत राहीले आणि मी ते पकडण्याचा प्रयत्न करीत राहीले.

शरद जोशींच्या साऱ्या जीवनाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते यात्रिक होते. आणि जो यात्रिक असतो त्याला प्रयोग आणि प्रवास कसा चुकणार…सत्यशोधनाची त्यांची ही यात्रा अखेरपर्यंत सुरू होती. या यात्रिक वृत्तीवर अल्लामा इकबाल साहेबांचा एक सुंदर शेर आहे. शायर म्हणतात,

बहुत उसने देखे है, पस्त-ओ-बुलंद

सफर उसको मंजिल से बढकर पसंद

सफर जिंदगी के लिए बर्ग-ओ- साज

सफर है हकीकत हजर है मजाज

शायर अशा एका माणसाबद्दल बोलतो आहे ज्याने प्रचंड जीवन पाहिलं आहे, अनुभवलं आहे. आयुष्यात त्या माणसाने खूप चढउतार बघितले आहे. तरीही त्याला मुक्कामाच्या ठिकाणापेक्षा प्रवासच अधिक पसंत आहे. प्रवास म्हणजे जणू काही आयुष्यातली अत्यावश्यक, गरजेची शिदोरीच. प्रवास हेच सत्य आहे तर विराम हा मृत्यू आहे किंवा माया आहे. हा शेर शरद जोशींना तंतोतंत लागू होतो.

ज्ञानोत्तर कर्म

संस्कृतात एक वचन आहे, ’’य: क्रियावान स पंडित:’’ हे त्यांना अगदी चपखल लागू पडतं. ते पंडीत तर होतेच पण सक्रिय, क्रियावान पंडीत होते. अनेक विद्वान लोक आपल्याला अवतीभवती दिसतात, पण त्यांची विद्वत्ता समाजाच्या भल्यासाठी, काही समस्या सोडवण्यासाठी, मानवी जीवन सुखकर करण्यासाठी कामी लागताना दिसत नाही. स्वत:च्या ज्ञानसाधनेत ते अत्यंत रमलेले असतात. ही बोथट आत्ममग्नता मग माणसाला स्वार्थी बनवते, निबर बनवते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परीषदांमध्ये जाणं, तिथल्या सुंदर, अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेल्या एअर कंडिशंड हॉलमध्ये बसून पेपर प्रेझेंटेशन करणं, आपल्या रेझ्युमेमध्ये सातत्याने या यादीची लांबी वाढवत नेणं, मग हेच काम होऊन बसतं. ‘ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत’…फार नाही पण किमान दोन फुले देण्याचाही विसर पडतो…जोशींमध्ये ही निबरता कधीच आली नाही. त्यांची करूणा वांझोटी नव्हती. त्यासाठी त्यांनी किती भीषण किंमत चुकवली हा इतिहास साऱ्यांनाच माहीत आहे. आपल्याकडे सामान्यत: परिस्थिती अशी आहे की, जो विद्वान आहे तो सार्वजनिक जीवनापासून दूर राहतो, कारण सार्वजनिक जीवनातला धबडगा, व्यक्तिगत स्वातंत्र्याचा होणारा अपरिहार्य संकोच आणि अशांतता विद्वान लोकांना नको असतो. ती त्यांना झेपत नाही, आणि जे सार्वजनिक जीवनात उतरताना दिसतात, झोकून देऊन काम करतात, ते सामान्यत: अभ्यासू नसतात. शरद जोशी हे दोन्हींचं अद्भूत मिश्रण होते. म्हणूनच एकाचवेळी अभ्यास आणि त्याला कृतीची जोड देणाऱ्या अपवादात्मक नेत्यांमध्ये जोशींचं नाव अग्रस्थानावर राहील.

शरद जोशींची ‘’ज्ञानोत्तर कर्म’’ ही भूमिका मला खूप महत्वाची वाटते. याचं कारण असं की, सामाजिक प्रश्नांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा अभ्यास केला तर असं दिसून येतं की, सामाजिक कार्यकर्ते वा नेते आधी प्रश्नाला भिडतात मग प्रश्नाचा अभ्यास करतात किंवा एकदम समस्या सोडवायला जातात आणि नंतर समस्या समजून घेतात. यामुळे कामात बऱ्याचदा भावुकता, शास्त्रीय विचारांचा अभाव, असे दोष आढळून येतात. आपल्याकडे सामाजिक काम करणारी मंडळी अनेकदा तो विषय पूर्णपणे अभ्यासून त्या कामात उतरत नाहीत. भावनेच्या हिंदोळ्यावर ती हिंदकळत राहतात आणि त्या समस्येचा कुठलातरी पदर पकडून आयुष्यभर तेच काम करत राहतात. समस्येचा सर्वांगीण अभ्यास न करता केलेले ते कामही मग त्याच दर्जाचे राहते. शरद जोशींचे वैशिष्ट्य हे की, त्यांनी ज्या कामात आपल्याला उतरायचे त्या समस्येचा अगोदर पूर्ण अभ्यास केला आणि मग प्रत्यक्ष कामात ते उतरले. शेतकऱ्यांच्या प्रश्नाल हात घालण्याआधी त्याचा विचार आणि कृतीच्या स्तरावर त्यांनी संपूर्ण अभ्यास केला. विचार आणि कृती मी या अर्थाने म्हणते आहे की, त्यांनी अर्थशास्त्र, बाजार भाव, बाजारपेठ कोणत्या तत्वावर चालते, तेजी, मंदी या सर्व संकल्पना सैद्धांतिक आणि अभ्यासाच्या पातळीवर नीट समजून घेतल्या होत्या. त्यासाठी त्यांनी अॅडम स्मिथ पासून रिकार्डो, जॉन स्टुअर्ट मिल पर्यंत सर्व विचारवंताची पुस्तकं वाचली. शेतीच्या उगमापासून ते शेतीत आजवर झालेल्या बदलांचा त्यांनी शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास केला. त्यानंतर त्याला कृतीची जोड दिली म्हणजे आंबेठाणला साडे-तेवीस एकर कोरडवाहू जमीन घेऊन शेती केली. उंटावरून शेळ्या हाकण्याचं काम जोशींनी कधीच केलं नाही.

खऱ्या अर्थाने विज्ञानवादी

शरद जोशी हे खऱ्या अर्थाने ‘’विज्ञानवादी’’ होते. विज्ञानवादी या अर्थानं की, विज्ञानात प्रयोग आणि पुरावे याशिवाय कशालाही स्थान नाही. निरंतर प्रयोग करत राहणं, आपण काढलेल्या निष्कर्शांची पुन; पुन: पडताळणी करत राहणं, मगच अंतिम निष्कर्षाप्रत येणं हा विज्ञानाचा गाभा आहे. जोशींनी शेतकऱ्याच्या दारिद्र्याच्या समस्येचा शोध घेण्यासाठी स्वत: विकत घेऊन शेती केली. एका दाण्याचे हजार दाणे करणारा शेतकरी दरिद्री का राहतो आणि एक किलो लोखंडाचं एका किलोपेक्षा अर्धा ग्रॅमही जास्त लोखंड न करू शकणारा, न वाढवू शकणारा कारखानदार कसा श्रीमंत होतो. हे कोडं जेव्हां जोशींना पडलं तेव्हा ते शेतकऱ्यांच्या अन् कारखानदारांच्या मुलाखती घेत बसले नाहीत किंवा शेतकरी वा कारखानदार यांना त्यांनी प्रश्नपत्रिका सोडवायला दिली नाही तर युनोतून सरळ उठून त्यांनी आंबेठाण गाठलं अन् शेती सुरू केली. एडवर्ड जेन्नरने जसं दोन दशकांपेक्षा जास्त काळ अखंड, अविरत संशोधन केलं अन् मग देवीचा विषाणू शोधला अगदी तशीच साधना शरद जोशींची होती. त्या अर्थाने जेन्नर सारख्या वैज्ञानिकांना विज्ञानातले संत आणि जोशींना सार्वजनिक जीवनातले संत म्हणता येईल.

भारतातील दारिद्र्याची अनेक कारणं अनेकांनी सांगितली. कोणी पूर्व कर्मात त्याची उत्तर शोधली. कोणी नियतीवाद सांगितला. काहींनी इंग्रजांनी भारताची केलेली लूट हे कारण सांगितलं. जातीव्यवस्थेमुळे निर्माण झालेली विषमता आणि समानतेचा अभाव हे ही कारण सांगितलं गेलं. औद्योगिकीकरणाचा अभाव, वाढत्या लोकसंख्येने विकासाची फळ खाणे ही देखील कारणं सांगण्यात आली. पण जोशींनी सर्वप्रथम पुराव्याने हे दाखवून दिलं की, शेतकऱ्याच्या आणि शेतीच्या शोषणात ही कारणं दडलेली आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही त्यामुळे दारिद्रय आहे, आणि शेतमालाला भाव न मिळण्याचे कारण सरकारचं धोरण आहे. हे दुष्ट चक्र प्रथम जोशींनी उलगडून दाखवलं. इतकेच नाही तर शहरीकरणाचं, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचं कारणही त्यांनी साधार सांगितलं. शहरीकरण वेगानं का होत आहे कारण शेती तोट्यात आहे, खेडी स्वयंपूर्ण नाहीत. शेतीत तोटा होतो म्हणून मग शहरात स्थलांतराचं प्रमाण वाढतं. शहरं फुगतात, बकाल होतात. शहरांच्या पायाभूत सुविधांवर ताण येतो. झोपडपट्टी, बालमजुरी, अस्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न हे सगळे प्रश्न मुळात शेतीच्या दारिद्र्याची बाय प्रॉड्क्टस् आहेत. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर ४५ टक्के लोकसंख्या आज शहरात राहते. १९७१ साली महाराष्ट्राची जितकी लोकसंख्या होती तेवढी संख्या आज शहरी भागात राहते आहे. यातून शहरी भागात झोपडपट्टी निर्माण झाली. धारावी सारख्या महाकाय झोपड्या निर्माण झाल्या. या झोपड्यात मानवी जगण्याचा संकोच झाला. लोक पशूपातळीवरचं जीवन जगू लागले. शहरात गुन्हेगारी वाढली. वेश्याव्यवसाय वाढला. बालमजुरी वाढली. लोकसंख्या वाढीनं जीवनसंघर्ष अधिकच तीव्र झाला. वाहतूक कोंडीतून अधिक गंभीर प्रश्न निर्माण झाले. या प्रश्नांवर स्वतंत्र रीतीने काम करणारं स्वयंसेवी संस्थांचं जाळं उभं राहिलं. एकेक संस्था एक एक प्रश्न घेऊन काम करू लागली, पण मुळात शहरं का फुगली ? या सर्व समस्यांचं मूळ नेमकं कशात आहे ? हे प्रश्न जर संपवायचे असतील तर काय करावं लागेल यावर काम कुणीच करत नाही. शरद जोशींनी या परिघावरच्या प्रश्नांना हात घालण्याऐवजी शेतीमालाला भाव दिला तर ग्रामीण भागात संपत्ती निर्माण होईल आणि ग्रामीण भागातून स्थलांतर थांबेल. त्यातून शहरातील हे परिघावरचे प्रश्न सुटतील अशी मांडणी केली .नागरीकरणाच्या वाढत चाललेल्या समस्या सोडवायला शरद जोशी अजूनही उत्तर आहेत. वर्तुळावरच्या परिघाचा एकेक बिंदू घेऊन काम करण्यानं होणार नाही तर केंद्रावर काम करावं लागेल तेव्हा या समस्या सुटतील हे त्यांनी निदर्शनास आणून दिलं.

भारत विरूद्ध इंडिया

भारत विरूद्ध इंडिया या संकल्पनेचं पेटंट जोशींकडे जातं. ही विभागणी सर्वप्रथम त्यांनी केली. आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक त्याहीपेक्षा ‘आत्मविश्वास’ अशा सर्व स्तरावरची जमीन-अस्मानची ही विषमता तीच्याकडे शरद जोशींच्या भारत विरूद्ध इंडियानं लक्ष वेधलं गेलं. आज अनेक जण भाषणात, बोलताना त्याचा उल्लेख करतात पण सर्वप्रथम ही विभागणी करण्याचं श्रेय, निर्विवाद शरद जोशींचं आहे. एकाच देशात एक ‘गरीब भारत’ आणि दुसरा ‘श्रीमंत इंडिया’ कसा वसतो आहे हे शरद जोशींनी ध्यानात आणून दिलं. योद्धा शेतकरी मध्ये ते म्हणतात, ‘’इंडियातील श्रीमंत बापाची निरूद्योगी तरूण मुलं एकेका बैठकीला, चैनमौजेखातर, ताजमहालसारख्या महागड्या हॉटेलमध्ये पाच-पाच दहा हजार रूपये उडवतात आणि आमच्या भारतातील खेड्यातील एखादी म्हातारी पाच पैशांचं नाणं धुळीत पडलं तर ते शोधण्यासाठी अर्धा अर्धा तास डोक्यावर उन्हाचा मारा सहन करते ! इंडियातील लहान मुलं मऊ मऊ उशीवर डोके ठेवून पहाटेची साखरस्वप्न पाहत असतात, तेव्हा भारतामधील त्यांच्याच वयाची मुलं डोक्यावर पाटी घेऊन शेण गोळा करायला बाहेर पडतात! इंडियामधली मुलं झोपून उठली की, ओव्हल्टीन टोस्ट असा नाश्ता घेऊन, युनिफॉर्म घालून महागडया शाळेत इंडियन अभ्यास करण्यासाठी जातात आणि भारतामधली मुलं शिळ्या भाकरीचा चतकोर चघळून तांब्याभर पाण्यानं भूक भागवून हातात काठी घेऊन जनावरांच्या मागं माळावर जातात! एका देशातील दोन माणसांमध्ये असा फरक मी इतक कुठल्याही देशात पाहिला नाही ! एका बाजूला चैन-मौज ऐषआराम आणि दुसऱ्या बाजूला भणंग दारिद्र्य!’’

खेड्यातल्या गरीब भारताला ध्रुवबाळाप्रमाणे कशी सापत्नभावाची वागणूक मिळते हे आजही दिसतं. शहरात लोडशेडिंग नाही आणि खेड्यात १२-१२ तास लोडशेडिंग..मग त्यातूनच शहरात माणसं अन्  खेड्यात काय जनावरं राहतात काय हे विचारण्याचं धैर्य शेतकऱ्यात शरद जोशींमुळे आलं. एक लक्षात घेतलं पाहीजे की, इंडिया-भारत ही मांडणी करताना कुठेही श्रीमंतांबद्दल दुस्वास किंवा मत्सर नाही. ही मांडणी कुठल्याही नकारात्मक भूमिकेतून किंवा कोल्ह्याला द्राक्षं आंबट या मानसिकतेतून झालेली नाही. ही विषमता मानवनिर्मित आहे. एकाच्या शोषणातून दुसरा श्रीमंत होतो आहे हे जगापुढे आणणं आणि ही विषमता दूर करणं हा यामागचा उद्देश आहे. निसर्ग निर्मित विषमतेबाबत माणूस काहीच करू शकत नाही. म्हणजे कोणी काळा कोणी गोरा, कोणी उंच कोणी ठेंगणा, आणि ही निसर्ग निर्मित विषमता आहे म्हणून जग सुंदरही आहे. वैविध्यपूर्ण आहे. पण मानवनिर्मित अन्याय, विषमता दूर करणं माणसाच्या हातात आहे आणि ती झालीच पाहीजे. हेच म्हणणं फुल्यांचं होतं, आंबेडकरांचं होतं.

शरद जोशींचं मला प्रकर्षानं जाणवणारं मोठेपण हे की, शरद जोशींनी निरक्षर, अडाणी शेतकऱ्याला अर्थसाक्षर केलं. शेतकरी संघटनेनं महाराष्ट्रात युनिव्हर्सिटीचं काम केलं आहे. खेड्यातील अडाणी शेतकरीही उत्पादनखर्च काढू लागले. शेतकऱ्याची मुलं डंकेल प्रस्तावासारख्या महाकठिण शिफारसी, आकडेवारी असलेल्या अहवालावर अगदी गावाच्या पारावार बसून बोलू लागली. शेतीवर सरकार किती खर्च करतं ? परदेशातलं सरकार किती सबसिडी देतं? भारतात उणे सबसिडी आहे म्हणजे काय आहे? हे सगळं सामान्य शेतकरी बोलू लागले. सामान्य निरक्षर शेतकऱ्यांनाही अर्थसाक्षर करण्याची शरद जोशी यांची किमया हे लोकशाहीला फार मोठं योगदान आहे. कारण शेवटी लोकशाहीचा दर्जा हा त्या व्यवस्थेतील माणसांच्या एकूण समजेवर अवलंबून असतो. -या सामान्य माणसांना शरद जोशी यांनी ज्याप्रकारे जागं केलं, सुजाण बनविलं ते -अविश्वसनीय वाटावं असंच आहे. कापूस एकाधिकार योजना, साखर कारखाने जो भाव देतात तो भाव ठरविण्याची पद्धत, सामान्य शेतकरी अभ्यासून त्याला आव्हान देवू लागला. गावोगावच्या सोसायट्या, कृषी उत्पन्न बाजार समित्या यांचं लोक मूल्यमापन करू लागले. यातून भ्रष्टाचार दूर व्हायला मदत झाली. शेतकऱ्यांची लूटमार कमी झाली.

शेतकऱ्याला अर्थसाक्षर केलं

शरद जोशी गेल्यानंतरचा एक प्रसंग सांगावासा वाटतो. ते गेल्यावर मी त्यांच्या पुण्यातल्या बोपोडीच्या घरी, त्यांच्या मोठ्या मुलीला (श्रेया शहाणे) आणि त्यांच्या केअर टेकर दर्शनी दिदी यांना भेटायला गेले होते. मी गेले तर दुपारचे ३ वाजले असावेत. श्रेयाताई आणि त्यांचे पती सुनील हे दुपारचा आराम करत होते. त्याच रात्री मुंबईहून सुनील यांचं कॅनडासाठी फ्लाईट होतं. मी दिदींशी बोलत होते. तर अचानक दार वाजलं. दिदींनी दार उघडलं तर दारात एक ६५-७० च्या वयातला  वयस्कर माणूस आणि एक तरूण मुलगा. माणसाने अर्ध्या बाह्यांचा शर्ट आणि पँट घातला होता. मुलाने जिन्स घातली होती. पाटील असं त्यांनी स्वत:चं नाव सांगितलं. हे जोशी साहेबांचं घर आहे नं. त्या वयस्कर माणसाने विचारलं. दिदी म्हणाल्या हो. तर तसेच आत या म्हणण्याची वाटसुद्धा न बघता ते आतमध्ये आले. तो माणूस सांगू लागला, मी नाशिकहून आलो. साहेब गेल्याचं कळलं..फार मोठा माणूस..घरचा पत्ता माहित नव्हता. एवढंच माहित होतं की, साहेब पुण्यात राहतात, मग पत्ता शोधत शोधत आलो. हे ऐकल्यावर माझ्या मनात प्रश्न आला, एवढया ७०-८० लाख लोकसंख्येच्या पुण्यात यांनी शरद जोशींचा पत्ता कसा शोधला असेल. पण प्रश्न विचारणार तर तो माणूस काही थांबायलाच तयार नाही. गावाकडचा माणूस असल्याने शहरी सोफिस्टेकेशनशी काय परिचय..अत्यंत नैसर्गिक पद्धतीने प्रश्नांची सरबत्ती आणि चौकश्या सुरू झाल्या..तुम्ही कोण..मग दिदींनी स्वत:ची माहिती दिली. मग परत माझ्याकडे बोट दाखवून ह्या कोण..मग दिदींनी त्यांना माझ्याबद्दल सांगितलं. मग पुन्हा पहिलेचं पालुपद सुरू.. शरद जोशी फार मोठा माणूस, फार त्याग केला त्या माणसानं. तेवढ्यात श्रेयाताई आली. मग दिदींनी सांगितलं की, ही शरद जोशींची मोठी मुलगी. त्यावर परत ते श्रेयाताईला शरद जोशी फार मोठा माणूस हेच सांगू लागले. बोलता बोलता अचानक तो माणूस म्हणाला, ‘’आज माझं जे घर आहे त्याचं श्रेय साहेबांना आहे. त्यावेळी साहेबांनी उसाला भाव मिळावा म्हणून आंदोलन केलं होतं. त्यांच्या आंदोलनामुळे उसाला एकदम भाव मिळाला. हातात कधी नव्हे तो एकदम पैसा आला आणि मी पहिलं काम केलं ते म्हणजे घर बांधलं. माझं घर होण्याचं श्रेय फक्त शरद जोशींना आहे. त्यांच्यामुळे माझं घर झालं. त्यांच्यामुळे आम्हाला अर्थशास्त्र कळलं. सरकारने आयात केली तर देशातल्या शेतकऱ्याच्या मालाच्या भावावर काय परिणाम होतो, निर्यात केली तर काय परिणाम होतो. मुळात आयात-निर्यात म्हणजे काय, खुली अर्थव्यवस्था म्हणजे काय, देशांतर्गत खुली व्यवस्था म्हणजे काय..हे सगळं साहेबांनी शिकवलं. नाहीतर आम्हाला काय कळत होतं हो..भाव पडले काय, वाढले काय काहीच समजायचं नाही’’…नाशिकहून इतक्या दूर जोशींचं घर शोधत तो कृतज्ञता व्यक्त करायला आला होता. त्यांचा मुलगा मला म्हणाला, ‘’अहो सारखं म्हणत होते म्हणे, जोशी साहेबांच्या घरी घेऊन चल’’. ती कृतज्ञता व्यक्त नसती केली तर त्या माणसाला चैन पडली नसती. त्यांना श्रेयाताईने चहाचं विचारलं. त्यांनी पाणीही घेतलं नाही. म्हणाले, ‘’साहेब गेले म्हणून भेटायला आलो. बस बाकी काही नाही..या तुम्ही कधी तिकडे..आपण फिरायला जातो तसं या हवं तर, पण तुमच्या वडिलांनी काय काम केलं आहे बघायला याच…शेतकऱ्यांच्या देवघरात साहेबांचा फोटो आहे’’…त्या माणसाच्या शब्दाशब्दातून, हावभावातून, संपूर्ण देहबोलीतून कृतज्ञता पाझरत होती…कृतज्ञेचे भाव चेहऱ्यावर असताना आणि ते व्यक्त करताना माणूस किती सुंदर दिसतो हे मी प्रथमच अनुभवत होते…

दुसरा एक प्रसंग आठवतोय. शेतकरी संघटनेचा एक तरूण कार्यकर्ता, त्याला जोशी संघटनेचा स्टार प्रचारक म्हणायचे. त्याचं भाषण ऐकायचा योग आला. अमरावतीला की दर्यापूरला सभा होती. नेमकं आठवत नाही. समोर मैदानात ५०-६० हजार शेतकरी बसले होते. त्यांचा स्टार प्रचारक खुली अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि ती कशी फायद्याची आहे हे शेतकऱ्याला समजावून सांगत होता. माझे कान नकळत टवकारले गेले. खुली अर्थव्यवस्था आणि त्याचे फायदे हा माणूस शेतकऱ्यांना कसा समजावून सांगणार..मी साशंक होते..त्याने उदाहरण दिलं…’’खुली अर्थव्यवस्था म्हणजे काय सांगतो..पूर्वी जव्हा गावात एकच चक्की होती..तेव्हा जव्हा आपन दळण दळाईले जायचो..तवा तो कसा माजल्यासारखा करे. डबा ठेऊन जा..टायम लागंल…जास्त बोलायच काम नाही..अन् आपन् पन् एकून घेवो..आपल्याले भी इलाज नव्हता ना..अन् त्याले भी माईत होतं हे कुठं जाऊच शकत नाही माह्याशिवाय..कारन काय गावात एकच चक्की होती…मंग काय झालं गावात जवा दुसरी चक्की खुलली तवा याचा माज लगेच उतरला..कौन तर आता काम्पिटिशन आली ना याले…(शेतकऱ्यांच्या तुफान टाळ्या) मंग टर्रावनं बंद..भाषा बदलली त्याची, टर्रेलपना जाऊन..या नं भाऊ..घाई असन तर लगेच देतो ही भाषा आली..ही आहे खुली व्यवस्था..(पुन्हा टाळ्या) देशातल्या दुसऱ्या राज्यातच नाही तर जिथं कुठं आपल्या मालाले चांगला भाव मिळल तिथं जाऊन आपन आपला माल विकू शकतो’’. खुल्या अर्थव्यवस्थेमुळे मक्तेदारी संपते, स्पर्धेने गुणवत्ता वाढते हे खुल्या अर्थव्यवस्थेचं मर्म त्यानी काय सोप्या शब्दात सांगितलं होतं. मी अक्षरश: थक्क झाले. ते भाषण ऐकणं हा पुन्हा एक सौंदर्य अनुभव होता. भल्या भल्या विद्वानांना, अर्थतज्ज्ञांनासुद्धा इतक्या सोप्या शब्दात खुली अर्थव्यवस्था समजावून सांगता येणार नाही. असे कार्यकर्ते, वक्ते शरद जोशीनी तयार केले. कार्यकर्ते प्रशिक्षित करण्यावर शरद जोशींनी सर्वात मोठा भर दिला. त्यासाठी आंबेठाणला सतत प्रशिक्षण शिबिरं आयोजित केली जात होती. आज राजकीय पक्षात आणि संघटनांमध्ये ही प्रक्रियाच थंडावली आहे. त्यामुळे केवळ सर्व पक्ष संघटनात केवळ नेत्यांची हुजरेगिरी करणारे कार्यकर्ते तयार झाले आहेत. पण शरद जोशींच्या चळवळीत अभ्यासू कार्यकर्ते निर्माण झाले.

शेतकऱ्यांना स्वाभिमान दिला, सत्तेविरुद्ध उभं राहण्याचं धैर्य दिलं

शरद जोशींचे योगदान बघताना वाटतं की शरद जोशींनी निवडणुका जिंकल्या का? त्यांच्या आंदोलनानी किती रुपयांचा भाव वाढवून दिला? असं आकडेवारीत त्यांच्या आंदोलनाचं आपल्याला मूल्यमापन नाही करता येणार.. आपल्याला शरद जोशी यांच्या आंदोलनाचे मूल्यमापन करताना त्यांनी या राज्यातील शेतकऱ्यांना जो स्वाभिमान दिला, दिनदुबळ्या गरीब शेतकऱ्याला सत्तेविरुद्ध उभं राहण्याचं जे धैर्य दिलं, त्यावर आपल्याला त्यांचं मूल्यमापन करावं लागेल. मुळात शेतकरी हा संघटीत होऊ शकतो आणि त्याचा दबाव गट तयार होऊ शकतो ही बाबच अविश्वसनीय होती. ज्याला ग्रामीण भागातील शेतकरी माहीत आहे त्याला हे जास्त चांगलं समजू शकेल. याबाबतीत त्यांची डॉ. आंबेडकरांशी तुलना करता येईल. आंबेडकरांचे सर्वात मोठे काम हेच आहे की, त्यांनी आत्मविश्वास गमावून बसलेल्या, न्यूनगंडाने ग्रासलेल्या अशा दलित समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. सत्तेविरुद्ध लढता येतं हा विचारच सामान्य माणसात नसतो. नेते आणि सरकारी नोकर म्हणजे आपला मालक आहे असंच सामान्य माणसाला वाटत असतं. गडचिरोलीत एकदा एका आदिवासीने कलेक्टर गावात आल्यावर गुपचुप जाऊन त्याच्या अंगाला हात लावून बघितला होता… म्हणजे त्याला हे बघायचं होतं की,कलेक्टर सुद्धा माणसासारखाच असतो का? इतकी भीती सामान्य ग्रामीण माणसाला असते. मागे एकदा आमच्या मेळघाटात एकदा आदिवासीला एका अधिकाऱ्यानी कोंबडी मागितली. त्याने ती दिली. तेव्हा एक कार्यकर्ता त्या आदिवासीला रागावला. त्यावर त्या आदिवासीनी उलटं विचारले की, कोंबडी साहेबाला नाही तर मग कोणाला द्यायची असते ? शापित चित्रपटातला यशवंत देव हा शेतमजूर असतो. त्याचा मुलगा शहरातून शिकून येतो. तेव्हा मुलाच्या नजरेला नजर न देता त्याच्या पायाकडे बघत तो विचारतो की, ‘तुम्ही’ कधी आलात’ ? स्वत:च्या मुलालाही अरे तुरे म्हणण्याचा आत्मविश्वास त्याला राहीलेला नाही. शेतकऱ्याची ही अवस्था जातीव्यवस्था आणि आर्थिक दारिद्र्यानं करून टाकली होती. शरद जोशींनी या शेतकऱ्याला लढायला उभं केलं हे त्यांचं सर्वात मोठं योगदान म्हणावं लागेल. हाच शेतकरी तुरुंगात गेला. याने महामार्ग अडवले. मामलेदाराच्या नजरेला नजर देवून जाब विचारला. साखर कारखान्यांच्या मस्तवाल चेअरमनला गाडी अडवून भाव का देत नाही हे विचारलं. गावात मंत्री आणि आमदार आले की, त्यांच्यापुढे लोटांगण घालणाऱ्या या पुढाऱ्यांना याच शेतकऱ्यानी गावबंदी केली… गावात यायला रोखलं. या फाटक्या माणसात कोट्याधीश असणारे पुढारी रोखण्याचं सामर्थ्य कशातून आले असेल? या दिन दुबळ्या माणसात सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची ताकद कशातून आली असेल? याचा विचार करताना तर्कशुद्ध उत्तरच सापडत नाही. हे बळ शरद जोशींनी या माणसांना दिलं. गुलामाला फक्त त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या तो पेटून उठेल हे विधान शरद जोशींनी खरं करून दाखविलं. मुख्यमंत्री, मंत्री आणि सारे पुढारी एकजात शरद जोशींना घाबरत. याचं कारण ही पेटून उठलेली माणसं होती. या पेटून उठण्याचं एक कारण हे ही होतं की, सरकार म्हणजे कुणीतरी देणारं आहे आणि आपण कुणीतरी घेणारे आहोत हा भ्रम त्यांनी मोडून काढला. अशी मानसिकता असणारे लोक शासनाला सतत मागतच राहतात. पण शरद जोशींच्या मांडणीतच ‘भीक नको हवे घामाचे दाम ‘ अशी बुलंद घोषणा होती. तेव्हा सरकार देतं म्हणजे उपकार करत नाही तर तो आमचा हक्कच आहे ही त्यांची मुख्य मांडणी होती. शेतकरी सरकारला काहीच देणं लागत नाही तर उणे सबसिडीत सरकारच शेतकऱ्याला काही तरी देणं लागतं आहे हे शेतकऱ्याला इतकं पटलं की त्यामुळे त्याचा न्यूनगंडच निघून गेला. ही शरद जोशींच्या तर्कशुद्ध विचारांची ताकद होती.

त्यांच्या ड्रायव्हरचं म्हणजे बबन मामांचं उदाहरण सांगण्यासारखं आहे. शरद जोशींनी कसे माणसं घडवले त्याचा तो पुरावा आहे. बबन मामांचं वाचन प्रचंड होतं. मॅट्रिकपर्यंत शिकलेले बबन मामा एखादया पीएचडी केलेल्या माणसालाही निरूत्तर करतील इतकं त्यांचं वाचन आहे. बबन मामा अन् मी एकदा बोलत होतो. तर बबन मामा मला सांगू लागले, ‘‘मी लीला मामीला (म्हणजे त्यांच्या पत्नीला) दोनदाच पिक्चर दाखवायला पुण्यात नेलं. एकदा ‘टायटॅनिक’ बघायला आणि दुसऱ्यांदा अमोल पालेकरचा ‘ध्यासपर्व’ सिनेमा बघायला’’. त्यांना र.धो कर्व्यांचं मोठेपण माहीत होतं. म्हणून तो सिनेमा बघायला त्यांनी त्यांच्या बायकोला म्हणजे लीला मामींना नेलं. अशी अभिजात गोष्टींची जाण त्यांच्यात शरद जोशींच्या सहवासात आल्यावर विकसित झाली होती. अनेकदा त्यांच्या तर्कशुद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण बोलण्यानं ते समोरच्याला चकीत करत. अशी माणसं शरद जोशींनी आपल्या तालमीत तयार केली.

जातनिरपेक्ष संघटन उभारण्यात त्यांनी महाराष्ट्राला एक मॉडेल दिलं. माझ्या पिढीनं महाराष्ट्रात बहुजन त्यातही मराठा नेतृत्वच बघितलं. पण जोशींच्या शेतकरी आंदोलनाचं वैशिष्ट्य हे राहिलं की, जात हा महाराष्ट्राच्या राजकारणात अपरिहार्य असणारा पैलू शरद जोशींनी या आंदोलनात तरी हद्दपार केला. एक ब्राह्मण माणूस लाखो बहुजन शेतकऱ्यांचं नेतृत्व करील असं गांधीहत्येनंतर ब्राह्मणद्वेष पसरलेल्या राज्यात त्यापूर्वी कुणी सांगितले असतं तर कुणीही त्यावर विश्वास ठेवला नसता, पण शरद जोशीनी ही जातनिरपेक्ष उभारणी केली. पाशा पटेलसारखा मुस्लिम नेताही लोकांनी स्वीकारला. शालिनीताई पाटील यांनी शरद जोशींची जात काढली पण त्याचा प्रतिवाद सामान्य बहुजन शेतकऱ्यांनी केला. इतकंच काय पण शरद जोशींवर जितकं पंचप्राण म्हणून बहुजन माणसांनी प्रेम केलं तितकं खूप कमी बहुजन नेत्यांवर केलं आहे. ही जातीची उतरंड त्यांनी कशी मोडली हा अभ्यासाचा विषय आहे.

आंदोलनाचे शास्त्र

आंदोलन कसं उभं करायचं, ते कसं वाढवायचं याचं शास्त्र शरद जोशींना फारच अवगत होतं. त्यांच्या आंदोलनात लाखोंनी शेतकरी सहभागी झाले. तुरूंगात गेले. प्रसंगी प्राणांचही बलिदान शेतकऱ्यांनी दिलं. त्यांच्या आंदोलन उभारण्याच्या तंत्राचा एक शास्त्र म्हणून अभ्यास होऊ शकतो असं मला वाटतं.

आंदोलनात प्रादेशिक मुद्दाही महाराष्ट्रात महत्वाचा ठरतो. साधारणत: कोणत्याही आंदोलनावर पुणे, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा राहतो असं दिसतं. पण या आंदोलनाचं वैशिष्ट्यं हे राहिलं की, या आंदोलनाचं नेतृत्व विदर्भ मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राकडे राहीलं. चंद्रपूरमध्ये आमदार वामनराव चटप, वर्ध्याला सरोजताई काशीकर, मराठवाड्यात पाशा पटेल, हे नेते पुढे आले, आणि तरीही पुण्या मुंबईच्या मीडियाने त्याची दखल घेतली किंबहुना घ्यावी लागली. जातीप्रमाणे रूढ नेत्याची परिभाषा ही त्यांनी बदलून टाकली.

आपल्याकडे नेते ग्रामीण भागात गेले की, मुद्दाम ग्रामीण पेहराव करतात. बोलण्यात हेल काढतात. गावंढळ, खेडवळ बोलण्याचा प्रयत्न करतात पण ते सगळं खोटं वाटतं. शरद जोशींनी यातलं काहीही केलं नाही. त्यांची शेवटपर्यंत प्रमाण मराठी भाषेचा वापर केला. उगाच कीर्तनकार करतात तसे रूपक, गोष्टीवेल्हाळ असलं ही काही ते खेड्यात बोलले नाही. डंकेल प्रस्ताव ते खेड्यात सांगत होते, ते ही प्रमाण मराठीत. पण तरीही निरक्षर माणसांना ते समजत होतं. त्याचप्रमाणे त्यांनी वेशभूषाही बदलली नाही. टी शर्ट आणि जीन्स पॅंट हा त्यांचा पोशाख कधीच बदलला नाही, तरीही त्यांच्याबद्दल ग्रामीण माणसांना कधी अंतर वाटले नाही. शोभा डेंनी म्हणूनच त्यांना गांधी इन् डेनिम्स ( डेनिम घातलेला गांधी) म्हंटलं होते. भारतीय नेत्यांच्या परंपरेत हे कसे स्वीकारले गेले याचा सुद्धा अभ्यास करायला हवा.

स्वातंत्र्य आंदोलनानंतर सर्वात जास्त महिला शेतकरी आंदोलनात उतरल्या असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इतका आधुनिक पेहराव आणि आधुनिक भाषा असलेल्या शरद जोशींनी या माजघरातल्या स्त्रियांशी कसा संवाद साधला असेल ? या महिलांना यांच्याविषयी कसा आपलेपणा वाटला असेल? नवरा, सासू, जात, गाव ही सगळी बंधनं किलकिली करत या स्त्रिया थेट महामार्ग अडवायला कशा उतरल्या असतील? हे अंतर कसं कापल गेलं असेल याचा स्त्री मुक्तीचा अभ्यास करणाऱ्या विदुषींनी अभ्यास करावा. स्त्री मुक्ती चळवळीचा परीघ शरद जोशींनी विस्तारला असंच म्हणावं लागेल. जी चळवळ केवळ नोकरदार महिलांच्या प्रश्नापर्यंत मर्यादित होती. त्याला त्यांनी व्यापक ग्रामीण परिघावर नेलं. भूमिकन्या सीतेच्या वेदनेशी महिलांच्या दु:खाची नाळ त्यांनी जोडली. लक्ष्मीमुक्ती आंदोलन हा स्त्री मुक्ती चळवळीतील महत्वाचा अध्याय आहे. ती एक रक्तविहीन क्रांति आहे. आजपर्यंत महिलांच्या गुलामीची कारणं ही धर्मात, जाती व्यवस्थेत, आणि तिच्या शारीरिक दुर्बलतेत शोधली जात होती पण शरद जोशी हा एक असा तत्वचिंतक होता की, त्याने सर्वात प्रथम महिलांच्या शोषणाची मुळं ही शेतीत होणाऱ्या शोषणात आहेत हा नवा सिद्धात मांडला. या शोषणातून महिलांचं शोषण अधिक होतं हे त्यांनी लक्षात आणून दिलं.

मराठी साहित्याचा परीघ विस्तारला

मराठी साहित्यावर शरद जोशींनी टाकलेला प्रभाव हे सुद्धा योगदान म्हणून बघण्याची गरज आहे. शेतकरी कधीच मराठी साहित्याचा नायक झाला नाही. ते म्हणतात “ हिंदुस्थानच्या सगळ्या भाषामध्ये मला शेतकरी नायक म्हणून कुठं दिसत नाही. साहित्यात शेतकरी म्हणजे दुष्ट, जमीनदाराचा पोरगा, खांद्यावर बंदूक टाकून फिरतो, तमासगिरिणीकडे जातो, पोरी पळवतो किंवा विदूषक असतो, सोंगाड्या असतो. माणसासारखा माणूस हाडामांसाचा शेतकरी मला कोणत्याच साहित्यात सापडत नाही. मराठी नाही, हिन्दी नाही, गुजराथी नाही, कोणत्याच भाषेत नाही. शोधून काढा ही काय भानगड आहे …..?

शरद जोशींच्या आंदोलंनांनंतर मध्यमवर्गीय परिघात अडकलेल्या मराठी साहित्याचा परीघ विस्तारला. त्यांच्या आंदोलंनांनातर शेतकरी हा नायक होऊ लागला. शेतकरी आत्महत्येनंतर आलेल्या ‘बारोमास’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. भास्कर चंदनशिव यांच्यासारखे कथाकार, इंद्रजीत भालेरावसारखे केवळ शेतकरी दु:खावर लिहिणारे लेखक, कवी मराठी साहित्यात लोकप्रिय होऊ लागले. कोणत्याही आंदोलनाचं साहित्य निर्माण व्हावं लागतं. त्यातून आंदोलन अधिक वेगानं पुढे जातं. जसं दलित साहित्य निर्माण झालं आणि दलित चळवळीला जोर धरायला त्याची मदत झाली. शेतकरी ग्रामीण साहित्य निर्माण झाल्यामुळे शहरी मध्यमवर्गीय साहित्य वाचणाऱ्या वाचकाला शेतकरी समजायला मदत झाली. शेतकरी कुटुंबात शिकलेली पहिली पिढी पूर्वी मध्यमवर्गीय लेखकांचं अनुकरण करायची, पण आता तसं न होता ती त्यांच्या दु:खावर लिहायला लागली. शेषराव मोहित्यांच्या ‘असं जगणं तोलाचं’बद्दल शरद जोशींनीच म्हंटलं आहे, की यात काय भरीव आशय आहे! जोशींना मी तसं फार कौतुकाने कोणाबद्दल बोलताना ऐकलं नाही त्या पार्श्वभूमीवर त्यांची ही प्रतिक्रिया महत्वाची आहे. त्यांची ‘पाण भांडवल’ नावाची कथा जोशींना प्रचंड आवडली होती. त्यात एक शेतकरी मोठ्या कष्टानं विहिर खोदतो, पाणी येईल मग उस लावू अशी स्वप्न बघतो. खूप कष्ट करतो, पाणी येतं, उस येतो..असं सगळं तपशीलवार चित्र आहे पण गुऱ्हाळ लावून गूळ विकायला गेल्यानंतर काय स्थिती होते ते विदारक वर्णन वाचवत नाही. जोशींनी म्हटलं आहे की, ‘’हे लहानसं साहित्य माझ्या दृष्टीनं ‘ओल्ड मॅन अँड द सी’च्या दर्जाचं आहे. बारकाईनं तपशील लिहिणारं’’. यात जोशींची सूक्ष्म साहित्यदृष्टी आणि वाचनही दिसून येतं.  ग्रामीण साहित्य संमेलनात शेतकरी प्रश्नावर कविता वाढल्या. यात नक्कीच साहित्य चळवळीचे काम मोठं आहे. पण त्याला आधार देण्याचं खूप मोठ काम या शेतकरी आंदोलनानं केलं हे साहित्याच्या इतिहासाला नोंदवावं लागेल.

आज देशानी खुली अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. कितीही नाकारलं तरी गेल्या २५ वर्षात भारत विकास अनुभवतो आहे. विकास दर वाढला आहे. निर्यात वाढत आहे. आज खुल्या व्यवस्थेचं समर्थन कुणीही करील पण १९९१ पूर्वी खुल्या व्यवस्थेचे समर्थन करणं म्हणजे थेट देशद्रोहीच समजलं जात होतं. अशा वेळी समाजवाद या अतिपवित्र शब्दाला विरोध करणं म्हणजे तुम्ही बहिष्कृत होणं होतं. पण शरद जोशींनी ते धाडस दाखवलं आणि समाजवादाच्या मर्यादा दाखवून खुली व्यवस्था म्हणजे केवळ लूट नाही तर माणसाच्या स्वातंत्र्य प्रेरणेची ती गरज आहे अशी अत्यंत वेगळी तत्वज्ञानात्मक मांडणी केली. खुल्या अर्थव्यवस्थेला तात्विक अधिष्ठान मिळवून दिलं. आज या व्यवस्थेचा लाभ घेणारे ते लक्षातही ठेवणार नाहीत, पण या नव्या व्यवस्थेला या देशात आणण्यात प्रसंगी परदेशी हस्तक अशा शिव्या झेलत शरद जोशींनी हात दिला. डंकेल प्रस्तावावर सारा देश तुटून पडला असताना, डंकेल म्हणजे दुसरी गुलामगिरी असं म्हटलं जात असताना ‘मला डंकेल भेटला तर माझ्या छातीवरचा शेतकरी संघटनेचा बिल्ला काढून त्याच्या छातीवर लावीन” असं  विधान करून त्यांनी नवी अर्थव्यवस्था तोलून धरली हे कसं विसरता येईल ?

नव्या तंत्रज्ञानाचा पुरस्कार

जोशींचा आणखी एक प्रकर्षाने जाणवणारा गुण म्हणजे त्यांना तंत्रज्ञानाचं असलेलं भान..त्यांनी सातत्याने नवनव्या तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. त्याचे फायदे दाखवून दिले. स्त्रियांचं आणि एकूणच मानवी जीवन सुखकर, सोपं करण्यात तंत्रज्ञानाचा खूप मोठा वाटा आहे, त्यामुळे मानायचे तर तंत्रज्ञानाचे उपकार माना असं शरद जोशी नेहमी म्हणत. स्त्रियांचे कष्ट कमी करण्यात तर तंत्रज्ञानाने खूपच मोलाची भूमिका बजावली आहे. पाटा-वरवंटा जाऊन मिक्सर आलं, जातं जाऊन चक्की आली, मोगरी गेली अन् वॉशिंग मशीन आली, चुलीच्या फुंकण्या गेल्या अन् गॅस आला, विहिरीचं पाणी दोर बादलीने ओढण्याची आता गरज नाही विहरीवर पंप बसले. शरद जोशींचं एक अख्खं भाषण तंत्रज्ञानाच्या महत्वावर आहे त्यात त्यांनी हरीतक्रांती, बीटी कॉटन यांचा सविस्तर उहापोह केला आहे. त्या भाषणात त्यांनी चार शब्द लक्षात ठेवायला सांगितले आहे. ए-एरोपोनिक्स, बी-बायोटेक्नोलॉजी, इ म्हणजे इथेनॉल टेक्नॉलॉजी आणि आय-इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी. स्वत: शरद जोशी १९९८ साली मी इ-मेल वापरताना बघितले आहे. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी एक आठवण सांगितली. ते सांगतात, ‘’२००६ साली शेतकरी संघटनेने एक शिबीर आळंदीला आयोजित केले होते. त्याची फक्त एकच अट होती की, शिबिराची नोंदणी इ मेलवरुन करायची. आज यात काहीच विशेष वाटणार नाही, पण तेव्हा १० वर्षापूर्वी घरोघरी संगणक नव्हते आणि त्यातही शेतकऱ्यांच्या पार्श्वभूमीवर विचार केला असता त्याचं वेगळेपण जाणवतं.. तालुक्याच्या गावात कुठेतरी एखादा सायबर कॅफे असायचा. अशा काळात शेतकऱ्यांनी संगणक वापरावा म्हणून जोशींची ही आयडिया. मी वृत्तपत्रात इतकं लिहूनही माझा ईमेल नव्हता. ती नोंदणी करायला गावच्या सायबर कॅफेत जाऊन ईमेल उघडला. ती माझी ईमेलची सुरुवात झाली. नोंदणी झाली आणि मग १५ दिवसांनी आळंदीला गेलो. जो पत्ता होता तिथे कुणीच नव्हतं. मी रजा काढून गेलो होतो. खूप चिडलो आणि थेट आंबेठाणला फोन केला. तिकडून उत्तर आलं की, शिबीर रद्द झालं आहे. मी ओरडून म्हणालो, मग कळवायची पद्धत नाही का? तिकडून ते म्हणाले की, तुमच्या ईमेलवर आम्ही शिबीर रद्द केल्याचा मेल पाठवला आहे. तुम्ही बघितला नाही का ? मी गप्प. कारण आम्ही सायबर कॅफेत जाऊन फक्त अकाऊंट उघडलं पण रोज कोण बघणार? तेव्हापासून सतत मेल चेक करायची सवय लागली. आज रोज  दिवसातून 5 वेळा मेल चेक होतो. सर्व पत्रव्यवहार मेलनेच होतो पण हे वळण आम्हा कार्यकर्त्यांना शरद जोशींनी लावलं’’. ही दूरदृष्टी योगदान म्हणून लक्षात घ्यायला हवी.

अजिंक्य केले माझ्या पराभवांनी

सर्वात शेवटचा मुद्दा हा आहे की शरद जोशींचं भारतीय राजकारणाला किंवा राजकीय व्यवस्थेला योगदान काय? हा प्रश्न ऐकताच कुणीही विचारणाऱ्याची खिल्ली उडवेल की, जोशींची तर अनामत रक्कम निवडणुकीत जप्त झाली होती ते काय योगदान देणार? याठिकाणी मला दोन उदाहरणं देणं गरजेचं वाटतं. दिल्ली निवडणुकीनंतर आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांची इंडिया टिव्हीचे संपादक रजत शर्मा यांनी मुलाखत घेतली होती. आम आदमी पक्षाला २०१५ सालच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत न भूतो न भविष्यती असं यश मिळालं होतं. ७० पैकी ६७ जागा या पक्षाने जिंकल्या. ३ जागी जिंकून कशीबशी भाजपने आपली अब्रू राखली. कॉंग्रेसबद्दल तर बोलायलाच नको. त्यावेळी, ‘’तुम्ही राहुल गांधी यांची खिल्ली उडवता पण अमेठीमध्ये तर तुमची जमानत जप्त झाली होती’’ असा प्रश्न रजत शर्मा यांनी विश्वास यांना विचारला. कुमार विश्वास यांनी त्यावर जे उत्तर दिलं ते फार सुंदर आहे. ते म्हणाले, ‘मी हरलो असेन, जमानत जप्त झाली हे ही मान्य पण मी जाऊन लढलो, त्यांच्या पारंपरिक गडात जाऊन लढण्याची हिंमत मी दाखवली हे महत्वाचं नाही का’? “और जमीर जप्त होने से जमानत जप्त होना अच्छी बात है…” आपण हरणारी लढाई लढतो आहोत हे माहित असूनही जेव्हा तुम्ही लढता तेव्हा तुम्ही जिंकलेलेच असता. कविवर्य सुरेश भटांच्या शब्दात “एकेक युद्ध माझे मी हारलो तरीही मजला अजिंक्य केले माझ्या पराभवांनी’’…शरद जोशींचा पराभव झाला असेल, पण शेतकऱ्याला संघटीत करणं, त्याचा अत्यंत प्रभावी दबाव गट निर्माण करणं, शासनाला त्याची दखल घेण्यास भाग पाडणं, आणि शेतकऱ्यात आत्मविश्वास जागवणं याबाबतीत त्यांचे श्रेय अजिंक्य आहे.

दुसरं उदाहरण योगेंद्र यादव यांचं आहे. आम आदमी पक्षाची स्थापना झाली तेव्हा ते म्हणाले होते की, आम आदमी पक्ष किती जागा जिंकेल किवा किती टक्के मतं मिळविल, यापेक्षा हा पक्ष राजकारणाचा अजेंडा किती प्रमाणात बदलू शकेल यातून आम आदमी पक्षाचं मूल्यमापन करायला हवं. मला हा मुद्दा शरद जोशींशी जोडावासा वाटतो. शरद जोशींच्या पूर्वी निवडणुकीत फार तर शेतकऱ्यांचे भले करू अशी भाषा असायची पण आज निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतीमालाला भाव हे सर्वच पक्षांना लिहावं लागतं. आज केंद्रात निवडून आलेल्या भाजपा सरकारनं निवडणुकीत जाहीरनाम्यात उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा दिला जाईल असं वचन दिलेलं आहे. ते पाळणं न पाळणं हा स्वतंत्र मुद्दा आहे, पण या देशात त्यांनी शेतीमालाचा भाव हा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आणून ठेवला आणि योगेन्द्र यादव म्हणतात त्याप्रमाणे राजकारणाचा अजेंडा बदलला हे कसं विसरता येईल.

………………………………………………………………………

(लेखिका राजहंस प्रकाशनद्वारा प्रकाशित ‘शरद जोशी: शोध अस्वस्थ कल्लोळाचा’ या पुस्तकाच्या लेखिका आहेत)

98819 01821

साभार : राजहंस प्रकाशन

‘शरद जोशी: शोध अस्वस्थ कल्लोळाचा’ पुस्तकासाठी क्लिक करा – https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5639446042944183391?BookName=Sharad-Joshi-Shodh-Aswastha-Kallolacha

 

 

Previous articleश्यामच्या आईचे आज काय करायचं…….? 
Next articleशरद जोशी : चैतन्यदायी झंझावात
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.