शरद पवारांच्या सहभागामुळे चर्चेत असलेला वर्धा लोकसभा मतदारसंघ

-टीम मीडिया वॉच

राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी अशी ओळख असलेल्या वर्धा लोकसभा मतदारसंघात यावेळी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष यांच्या उमेदवारांत थेट लढत आहे. वर्धा मतदारसंघाच्या भटकंती दरम्यान विद्यमान  खासदार रामदास तडस यांच्याविषयी असलेली सर्व समाज घटकांमध्ये असलेली नाराजी, ही  प्रकर्षाने जाणवते. तडसांबद्दलची नाराजी ही भाजपसाठी मोठी डोकेदुखी झाली आहे. दुसरीकडे शरद पवारांनी  माजी आमदार अमर काळे यांना काँग्रेसमधून आयात करून थेट आपल्या पक्षाची उमेदवारी दिल्याने ते चर्चेत आले आहेत . शरद पवारांच्या उपस्थितीमुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तेव्हाचा उत्साह काही दिवस टिकलाही; मात्र मतदानाला अवघे काही दिवस उरले असताना काळे यांच्या कॅम्पमध्ये पैशाचा ठणठणाट असल्याने  सुरुवातीला घेतलेली आघाडी ते गमावतात की काय , असे चित्र निर्माण झाले आहे. 

वर्धा लोकसभा मतदारसंघात खालील १० मुद्दे महत्त्वाचे ठरताहेत 

१) जातीय समीकरण

तेली व कुणबीबहुल असलेल्या वर्धा मतदार संघात मागील दहा वर्षापासून खासदार रामदास तडस यांच्या रूपाने तेली समाजाला प्रतिनिधीत्व मिळाले आहे. माजी खासदार दत्ता मेघे यांच्यानंतर  कुणबी समाज लोकसभेच्या राजकारणातून वंचित राहिल्याने यावेळी या समाजामध्ये कमालीची एकजूट दिसून येत आहे.  कुणबी समाजातील सारे समाज घटक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे उमेदवार अमर काळे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. मतदान संघाचा विचार करता साधारण ८० टक्के कुणबी मतदार हा काळे यांच्याकडे तर २० टक्के कुणबी मतदार तडस यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ६० टक्की तेली मतदार हा रामदास तडस यांच्याकडे तर ४०  टक्के मतदार काळे यांच्याकडे जातील, असं राजकीय जाणकार मानतात.  या जातीय समीकरणाचा पहिल्यांदाच भाजपला फटका बसेल, असे चित्र आहे.

२) रामदास तडस यांच्याबद्दल तीव्र नाराजी 

२०१४ आणि २०१९  मध्ये च्या निवडणुकीत  निर्विवाद विजय मिळवणारे रामदास तडस यांना यावर्षी Anti-incumbency Factor ला सामोरे जावे लागत आहे. गेल्या १० वर्षात तडस यांनी काय काम केले , असा प्रश्न लोक विचारत आहेत. सांगावे असे कुठलेही भरीव काम १० वर्षात तडस यांच्या नावावर जमा नाही . सिंदी रेल्वे,वर्धा शहर येथील  रेल्वेचे उड्डाणपूल अशी अनेक काम अर्धवट अवस्थेत आहेत.

३) महाविकास आघाडीची एकजूट

 या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकजुटीने काम करत आहेत.  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) , शिवसेना (उद्धव ठाकरे) या पक्षांचे कार्यकर्ते एकत्रितपणे कामाला लागल्याचे दिसत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापासून या एकजुटीचा प्रत्यय  वर्धेकरांनाही आला आहे.  तुलनेत भारतीय जनता पक्षात अजूनही नाराजी नाट्य सुरूच आहे.

४) मोदी सरकारविषयी नाराजी 

मागील दहा वर्षात शेतकऱ्यांची झालेली दुरावस्था, शेतमालाचे घसरलेले भाव, जीवनावश्यक वस्तूच्या वाढलेल्या किमती या साऱ्या बाबी यावेळी भाजपाच्या  विरोधात आहे.  त्यामुळे ग्रामीण भागात कुठेही मोदी लाट असल्याचे चित्र नाही.  मतदार हे स्वतःच आपले प्रश्न  भाजपा उमेदवार व पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर मांडत आहेत.   दोन वर्षापासून साठवून ठेवलेला शेतमाल विकायचा कसा हा प्रश्न भेडसावणाऱ्या शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत निर्णायक ठरेल , असे दिसत आहे.

५) तडस यांच्या घरातील कौटुंबिक संघर्ष

 खासदार रामदास तडस यांच्या  कुटुंबातील संघर्ष निवडणुकीच्या तोंडावर तीव्र झाला आहे त्यांचे चिरंजीव पंकज तडस व त्यांच्या पत्नी पूजा तडस यांच्यातील वाद आता राजकीय स्वरूपात पुढे आला आहे.  पूजा तडस यांनी सासऱ्याच्या विरुद्ध उमेदवारी अर्ज भरला व मिळेल त्या व्यासपीठावर ती आपली भूमिका मांडत आहे. सोशल मीडियातून याविषयातील अनेक किस्से समोर येत आहे.

६) भाजपा आमदारांची कमिशनखोरी

वर्धा लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात . यापैकी वर्धा , आर्वी, हिंगणघाट, देवळी-पुलगाव हे चार मतदारसंघ वर्धा जिल्ह्यात तर मोर्शी आणि धामणगाव रेल्वे हे दोन मतदारसंघ अमरावती जिल्ह्यात येतात. या सहापैकी चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत . पंकज भोयर (वर्धा) , समीर कुणावार (हिंगणघाट) , दादाराव केचे (आर्वी ) व प्रताप अडसड (धामणगाव) या चारही भाजप आमदारांवर कामिशनखोरीचा आरोप आहे . वर्धा येथील आमदार कामाचे ठेकेदारही स्वतःच ठरवून त्याच्याकडून भरभक्कम पैसे वसूल करतात असा थेट आरोप केला जातो. आमदारांची कमिशनखोरी हा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा आहे .

७) दलित -मुस्लिम मतदारांची एकजूट 

या निवडणुकीत मुस्लिम व दलित मतदार हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकजुटीने मतदान करतील असे, चित्र आहे. एरव्ही भाजप दलित व मुस्लिम मतदारांमध्ये मतविभाजन करण्याचा कसोशीने प्रयत्न करते . यावेळी मात्र त्यांना तशी संधी नाही . त्याचा फायदा महाविकास आघाडी उमेदवाराला होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

८) अमरावती जिल्ह्याची तुटलेला संपर्क

या मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी व धामणगाव रेल्वे हे दोन मतदार संघ येतात.  या दोन्ही मतदारसंघात तडस यांचा संपर्क कमी असणे व ठिकठिकाणी विकासासाठी निधी न देणे यामुळे या चारही तालुक्यात त्यांच्याबाबत कमालीची नाराजी आहे.

९.  तेली समाजाचे नेतेही नाराज

रामदास तडस हे  तेली महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तेली समाजात देशभर त्यांचाआवाका प्रचंड मोठा आहे.  विविध राज्यांमध्ये ते  समाजाच्या कामासाठी फिरत असतात. थेट जातीसाठी भिडणारा हा माणूस असला तरी यावेळी वर्धा जिल्ह्यातील विविध पक्षात विखुरलेले तेली समाजाचे नेत्यांनी तडस यांच्यापासून काहीसा दुरावा ठेवला आहे. लोकसभा निवडणूक आली की तडस यांना समाज आठव. मात्र आमच्या आल्या तडस आपल्या पक्षाचा प्रचार करतात. आमच्यासाठी काहीही करत नाही ही भावना तेली समाजाच्या नेत्यांमध्ये प्रबळपणे दिसून येत आहे त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत समाजाच्या नेत्यांची मिळणारी अंतर्गत मदत यावेळी तडस यांना मिळण्याची शक्यता कमी आहे. महाविकास आघाडीतील  माजी आमदार राजू तिमांडे, वर्धेचे माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, शिवसेनेचे नेते रविकांत बालपांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल वांदिले व भाजपमध्ये नाराज असलेले माजी खासदार सुरेश वाघमारे हे यावेळी तडस यांना  मदत करण्याची शक्यता नाही. गेल्या निवडणुकीत देवळी विधानसभा मतदारसंघातून तेली समाजाचे राजेश बकाने यांचा पराभव करण्यात रामदास तडस यांचा सिंहाचा वाटा होता. आपण तडस यांचे काम निष्ठेने करणार असे त्यांनी सांगितले असले तरी  त्यांच्याविषयी  अनेक शंका आहेत.

१० . अमर काळे यांना शरद पवारांचा आशीर्वाद फळणार?

रामदास तडस यांच्याबद्दलच्या नाराजीमुळे अमर काळे यांना काहीसे अनुकूल वातावरण असले तरी  तेही  तसे फार कार्यक्षम नाहीत. दोन वेळा आमदार असताना फारसा प्रभाव पडेल असे काम त्यांनी केले नाही . त्यांच्यावर जातीयवादाचाही  ठपका आहे. तेली समाजाचे काम ते करत नाही, असा त्यांच्यावर आरोप होतो.  मात्र यावेळी शरद पवारांचा थेट वरदहस्त असल्याने त्याचा फायदा त्यांना होईल, असे मानले जाते . त्यांचे मामा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही  समर्थ साथ त्यांना मिळत आहे.

Previous articleअमरावती लोकसभा मतदारसंघात निकराची लढाई
Next articleयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात ‘शिवसेना विरूद्ध शिवसेना’ 
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.