शरद पवारच सेनानी, नव्या स्वातंत्र्यसंग्रामाचे!

#साभार: दैनिक दिव्य मराठी

स्टेटमेंट/ #संजय_आवटे

———————————————–
महाराष्ट्रात #महासरकार आले,
देशभर जातील ही ज्वाला आणि फुले

शरद पवार हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आहेतच. पण, आज ते लोकोत्तर नेते ठरले आहेत. आजवर एकही निवडणूक पवार हरलेले नाहीत. त्यांना हव्या त्या पद्धतीने त्यांनी आजवर निवडणुका फिरवलेल्या आहेत. निकालानंतर सरकारे बनवलेली आहेत. क्रिकेटचं मैदान असो वा कुस्तीचा आखाडा, भल्याभल्यांची बोलती त्यांनी बंद केली आहे. महाराष्ट्राला आणि देशाला याचं अपार कौतुक आहे. साहेबांनी एकदा मनात घेतलं की गेम झालाच बॉस, याचं त्यांच्या चाहत्यांना एवढं भारी वाटत आलं आहे की त्यातून पवार म्हणजे विलक्षण प्रतिभेचे चाणक्य असल्याची प्रतिमा तयार होते. पवार चाणक्य आहेत आणि चंद्रगुप्तही आहेत. त्यांनी आजवर केलेले राजकारण निव्वळ अफाट आहे. साहेब पराभूत होऊच शकत नाहीत, ही त्यांच्या चाहत्यांची एवढी खात्री की, साहेब अडचणीत आले तरी तो ‘साहेबांचाच गेम’ म्हणेपर्यंत लोकांची मजल जाते.

अशा शरद पवारांनी आणखी एक निवडणूक ‘जिंकणे’ आणि आपल्याला हवे तसे सरकार स्थापन करणे, यात म्हटले तर नवल काय?

पण, हीच तर गंमत आहे.

या वेळचे शरद पवार केवळ चाणक्य नव्हते. चंद्रगुप्त नव्हते. असे काहीतरी होते या शरद पवारांच्या व्यक्तिमत्त्वात की जे महाराष्ट्राने कधी पाहिले नव्हते. या वेळचे पवार आत्यंतिक झपाटलेले होते. जणू एखाद्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या सेनानींसारखे ते धावत होते. पवारांचे वाचन चांगले आहे. आकलन विलक्षण आहे. देश स्वतंत्र झाला, तेव्हा गांधीजी नौआखालीत अनवाणी धावत होते आणि हिंसेचा आगडोंब विझवत होते. अशा अनेक गोष्टी त्यांनी वाचलेल्या असणार. यावेळचे पवार असे काहीतरी भासत होते. या संपूर्ण निवडणुकीत त्यांच्या धावण्याला असा काही व्यापक हेतू होता. ऐतिहासिक काम आपल्याला करायचे आहे, याची समज होती. ते काम किती अवघड आहे, याचा अंदाज त्यांना लोकसभा निवडणुकीनंतरच आला होता. मात्र, आपल्या आयुष्याचे हेच तर प्रयोजन आहे, अशा ‘करू वा मरू’ मिशनसह ते धावत होते.

जवळचे दुरावले. पक्ष गलितगात्र झाला. आता या पक्षाला उभारी देणे अशक्य असल्याची भाषा सर्वत्र सुरू होती. अशावेळी शरद पवार बाहेर पडले. मुद्दा त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा होताच, पण त्याहूनही अधिक महाराष्ट्राचा होता. राज्यावर आणि देशावर मोठे संकट आले आहे. ते दूर करणे ही आपली जबाबदारी आहे, असे त्यांना वाटत होते. तात्कालिक फायद्यातोट्यांच्या परिभाषेत राजकारणाचे मोजमाप करण्याइतके पवार सामान्य नाहीत. यशवंतराव चव्हाणांनंतर महाराष्ट्राची काळजी आपल्याला वाहावी लागणार आहे, अशी भूमिका घेत वाट चालणारा हा नेता आहे.

मात्र, अट्टल खेळी करू शकणारा मुत्सद्दी राजकारणी अशी त्यांची प्रतिमा उत्तरोत्तर तयार होत गेली आणि त्या प्रतिमेत त्यांच्या मूळ राजकारणाचा आत्मा कधी हरवला, ते त्यांनाही समजले नाही. शरद पवारांना या निवडणुकीच्या निमित्ताने तो आत्मा गवसला. आपल्यावरचा डागही त्यांना धुऊन काढायचा होता. पाऊस एवढा जोराचा आला की भलेभले वाहून गेले, त्यात पवारांवरचे असे अनेक डागही धुऊन निघाले.

या निवडणुकीत पवारांना कोणताही ‘गेम’ करायचा नव्हता. त्यांना भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे होते. निकालाने ती शक्यता दिसली. पुढे शिवसेनेच्या आक्रमकतेमुळे कायम राहिली. भाजपला नमवणा-या शरद पवारांनी सेनेला पटवले. सोनियांना मनवले. हे सरकार येणार, अशी औपचारिकताच उरलेली असताना महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. प्रचंड भूकंप झाला. राष्ट्रपती राजवटीत झोपलेला महाराष्ट्र जागा झाला, तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले होते. आणि, अजित पवार उपमुख्यमंत्री.

बहुमत नसताना रात्रीत हालचाली करुन भल्या सकाळी शपथ घेण्याची हीच चूक देवेंद्र फडणवीसांना महागात पडली. ते तोंडावर आपटले, तर अजित पवार यांचे राजकीय करीअर धोक्यात आले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा सोबत असतील, तर आपण काहीही करू शकतो, या अतिरेकी आत्मविश्वासातून भाजपने केलेली खेळी त्यांच्या अंगलट आली. भाजपकडे असलेल्या चाणक्यांचे अंदाज सपशेल चुकले आणि शरद पवार हेच खरे चाणक्य ठरले. ‘अंधाधुन’ सिनेमालाही लाजवेल, अशा घडामोडी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत सुरू होत्या. त्या थरारपटाचा समारोप झाला. मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांना भाजपने फोडले आणि गुपचुप सरकार स्थापन केले. अजित पवार यांच्याकडे अपवाद वगळता आमदारच नव्हते. मात्र, त्यांच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा फायदा घेऊन तांत्रिक मुद्द्यांवर आपण विश्वास ठराव जिंकू, अशी खात्री भाजपला वाटत होती. आपण काहीही करू शकतो, हीच ती उद्दाम खात्री.

शरद पवार नावाचा चाणक्य इथेही ठामपणे उभा राहिला. सर्वोच्च न्यायालयात तर आव्हान दिलेले होतेच, पण पवारांनी त्यांच्यासोबत असलेल्या १६२ आमदारांची मीडियासमोर अभूतपूर्व अशी परेड केली आणि वातावरणच पालटले. सर्वोच्च न्यायालयाने उद्याच्या उद्या, बॅलट पेपरवर मतदान घ्या आणि लाइव्ह टेलिकास्ट करा, असा निकाल दिल्याने तर ‘पारदर्शक’ देवेंद्रांच्या पायाखालची वाळू सरकली. देवेंद्र – अजित दोघांनीही राजीनामे फेकले. अजित पवारांना काहीच कळत नाही हे खरे, पण इतक्यांदा अशा स्वरूपाचे प्रसंग घडूनही त्यांना शरद पवार आजपावेतो समजलेले नाहीत. अजित पवार रुसले तेव्हा पवारांनी समजावले. पण, थेट शत्रूला जाऊन मिळाल्यानंतर त्यांचे बंड मोडून काढणे ही पवारांसाठी सामान्य गोष्ट होती. ८० वर्षांच्या ज्या नेत्याच्या वलयावर कॉंग्रेसने स्वतःची लाज राखली आणि राष्ट्रवादीने मुसंडी मारली, त्या नेत्याला सोडणे ही आत्महत्या आहे, हे कोणत्याही सामान्य माणसाला समजेल! पण, कमालीची घाई झालेल्या या साठी उलटलेल्या आततायी पुतण्याला काका समजलेच नाहीत. ‘मोदी है तो मुम्किन है’, यावर अजित पवारांचा एवढा विश्वास की असल्या कैक मोदींना पवार सहज लोळवू शकतात, हे त्यांच्या लक्षातच आले नाही.

भाजप अजिंक्य आहे आणि त्यांना कोणी हरवू शकत नाही, असे अजित पवारांनाच काय, अनेकांना वाटत होते. लोकसभा निवडणुकीने त्यावर शिक्कामोर्तब केले हे खरे, पण विधानसभा निकालानंतरही अजित पवारांना ते तसेच वाटावे, हा त्यांच्या आकलनाचा पुरावा आहे. अजित यांना काकांची महत्त्वाकांक्षा समजली. त्यांच्या राजकारणाचा वेग समजला. त्या राजकारणाचे ‘स्केलेटन’ समजले. पण, पवारांच्या राजकारणाचा आत्माच त्यांना समजलेला नाही. शरद पवार हा मूल्यभान असलेला, कमिटमेंट असणारा आणि सामान्य माणसांमधून उगवलेला सेंद्रीय नेता आहे. राजकारणातील एकेक ‘गेम’ करत नवनवे मिशन फित्ते करत शरद पवार पुढे पुढे जात होते, तेव्हाही त्यांचे मूल्यभान जागे होते. सुनीताबाईंसारख्या लेखिकेने पवारांना भाबडे पत्र लिहून काही अपेक्षा व्यक्त कराव्यात, एवढी ती कमिटमेंट स्वाभाविक होती. काकाच्या लौकिकावर डोळा असणा-या अजित पवारांना या अलौकिकाची जाणीव होणं शक्य नव्हतं. ती त्यांची क्षमता नव्हती. स्वतःची लायकी लक्षात न घेता अचाट स्वप्ने ते बघत राहिले. त्यासाठी हट्ट धरत राहिले. रूसत राहिले. अधिक लाड झाल्याने एवढे शेफारले की आपण काय करतो आहोत, हेच ते विसरून बसले. पवारांची कमिटमेंट अशी की बाळासाहेबांच्या पुतण्याला मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या पुतण्याला ‘डिसओन’ केले. त्याशिवाय अन्य पर्याय उरलेला नव्हता.

अजित पवारांचे पुढे काय होईल, ते सांगणे अवघड आहे. पण, पवारांसाठी सुंठेवाचून खोकला गेला. आता सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या आपल्या दोन पिढ्यांच्या वारसदारांना घेऊन पवारांना पुढची दिशा स्पष्ट करता येईल. या मंत्रिमंडळात रोहित पवार मंत्री होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय आणि सुप्रियाही सर्वोच्च नेत्या ठरल्या आहेत.

हे सरकार किती वर्षे टिकेल, याविषयीच्या शंका सार्थ होत्या. कारण, परवा परवापर्यंत सर्वजण परस्परांकडे संशयाने पाहात होते. मात्र, देवेंद्र- अजित यांच्या ‘रात्र-कारणा’ने संदर्भच बदलून गेले. तो प्रचंड मोठा धक्का होता. प्रामुख्याने दोघांना. एकतर शरद पवारांना. कारण, त्यांचा पक्ष फुटत होता. त्यांचा पुतण्या फोडत होता. ८० वर्षांच्या नेत्यासाठी हा धक्का साधा नव्हता. मुख्य म्हणजे, ‘हा काकांचाच गेम आहे’, अशा शंकेने लोक त्यांच्याकडे पाहात होते. त्यांची कोंडी दुहेरी होती. दुसरा धक्का होता तो अर्थातच उद्धव ठाकरे यांना. एका रात्रीत त्यांचे स्वप्न भंगले. पण, तिन्ही पक्षांवर हे संकट आल्यानंतर मात्र ते परतवून लावण्यासाठी त्यांनी एकत्र येऊन जे काही केले, त्यातून त्यांच्यात वेगळेच नाते तयार झाले. सुप्रिया ज्या आस्थेने उद्धव यांना धीर देत होत्या, ज्या प्रेमाने रोहित आणि आदित्यशी एकाचवेळी बोलत होत्या, त्यातून वेगळे बंध निर्माण होत गेले. तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते त्यामुळे परस्परांशी जोडले गेले. शरद पवारांनी घरादाराचा विचार न करता, ‘तुमची जबाबदारी माझ्यावर आहे’, असे सांगून या १६२ आमदारांना प्रेमाने सांभाळल्यानंतर तर सर्वांसाठीच ते कुटुंबप्रमुख झाले. ही आघाडी आता जैव आघाडी झाली आहे.

निकालानंतर हे सारे नाट्य घडले ते आघाडीसाठी चांगले यासाठी कारण त्यातून देवेंद्रांचे गाढव गेले आणि ब्रह्मचर्यही गेले. सुसंस्कृत वगैरे प्रतिमा असणा-या या नेत्याला तडे गेले. राजकारण हा काय खेळ असतो, ते उद्धव आणि आदित्य यांना वेळीच कळल्याने तेही जमिनीवर आले. पहिल्या फटक्यात सत्तास्थापनेचा दावा करताच ते मिळाले असते, तर कदाचित त्या पदाचे गांभीर्य त्यांना तेवढे समजलेही नसते. आणि, अजितच्या बंडाने शरद पवारांनाही लक्षात आले असेलः यापुढे आपल्याविषयी शंकाही येणार नाही, असे राजकारण घडवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे! ही सत्ता किती प्रयासांनी मिळाली आहे, याचे भान तिन्ही पक्षांना आहे. त्यामुळेच आता कोणीही सहजी विकेट फेकणार नाही. देवेंद्रांचा रथ निकालाने जमिनीवर आला होताच. पण, रात्रीच्या शपथविधीनंतर त्यांच्यावर औटघटकेचे मुख्यमंत्री बनण्याची वेळ आल्याने तर ते थेट तोंडावर आपटले आहेत. एकूण काय, निकालाने आणि त्यानंतरच्या खेळींनी सर्वांना आपापली पात्रता समजली आणि आव्हानेही लक्षात आली.

महाराष्ट्रात जे घडले, ते फक्त या राज्यापुरते महत्त्वाचे नाही. पवार म्हणाले तसे महाराष्ट्राला गोवा समजू नका. इथे असे खेळ करणे एवढे सोपे नाही. हे महाराष्ट्रातच घडू शकते, हे खरे;.पण आता ते अन्यत्रही सुरू होईल. लोक बोलू लागतील. विरोधाचा सूर बुलंद होत जाईल. मोदी- शहा असल्यानंतर त्यांना कोणीच विरोध करू शकत नाही, असे एकट्या अजित पवारांना नाही, देशात अनेकांना वाटत असते. त्याला आता तडा जाईल.

महाराष्ट्रात स्थापन होत असलेल्या सरकारचे खरे मोल हे आहे.

किस चीज से डरते हैं वे
तमाम धन-दौलत
गोला-बारूद पुलिस-फौज के बावजूद ?
वे डरते हैं
कि एक दिन
निहत्थे और गरीब लोग
उनसे डरना
बंद कर देंगे

त्यांना भीती हीच तर असते, की लोक आपल्याला घाबरणं बंद करतील!

आणि, आता तेच होईल, ज्याचं त्यांना भय आहे. लोक आता घाबरणं बंद करतील. यांना निवडणुकीच्या रिंगणात आव्हान देता येणं शक्य आहे. यांना राजकीय खेळींमध्ये पराभूत करणं शक्य आहे. कोर्टात यांना धूळ चारणं शक्य आहे. सभागृहात यांची बोलती बंद करणं शक्य आहे. हा मेसेज जाणं फार महत्त्वाचं आहे. शिवसेनेसारखा कालपर्यंत फरफटत जाणारा पक्ष यांच्या मुस्काटात लगावू शकतो, याचा मेसेज फारच जोरकस असतो! उद्या बिहारमध्ये याचा परिणाम होणार आहे. झारखंडची समीकरणे बदलणार आहेत. सगळ्या ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमांची खरी उंची लोक आता जोखणार आहेत आणि विरोधाचा अवकाश रुंदावत जाणार आहे.

या नव्या स्वातंत्र्यसंग्रामाचे सेनापती शरद पवार ठरले आहेत.

98812 56009

(लेखक ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक आहेत)

Previous articleमहात्मा गांधी आणि राज्यघटना
Next articleगांधीजी आणि मीम
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.