‘शहा’णे होतील?

(सौजन्य -बेळगाव ‘तरुण भारत’ )

*कर्नाटकात भारतीय जनता पक्ष अक्षरशः तोंडावर आपटला आणि देशात  एकच हलकल्लोळ माजला. भाजपला बहुमत मिळणार नाही हे आकडे सांगत होते. पण, भाजप मानायला तयार नव्हता. आकडय़ांच्या डब्यात वाकडे बोट कोंबून सत्तेचे लोणी लुटण्याची अमित शहांची रणनीती गोवा, मणिपूर किंवा मेघालयाप्रमाणे कर्नाटकात यशस्वी झाली नाही. याचे कारण सर्वोच्च न्यायालयाने तातडीने बहुमत स्पष्ट करण्याचे आदेश येडियुराप्पांना दिले. घोडेबाजार यशस्वी होण्यापूर्वीच उठला. आता याला कितीही नैतिक मुलामा चोपडण्याचा आणि सर्वात मोठा आणि सर्वात छोटा पक्ष अशी उलटी आणि सुलटी उतरंड दाखवण्याचा प्रयत्न झाला तरी निरर्थकच.*
काँग्रेसने जे इतिहासात केले त्याला त्यांच्याचप्रमाणे उत्तर देण्यासाठीच जणू मोदी आणि शहा या जोडीचा अवतार झाला आहे अशा अविर्भावात भाजपचे एकूण एक नेते होते. भाजपच्या एका मुखपत्राने तर कहर केला. समाज माध्यमांवर बेनामी पद्धतीने फिरणाऱया एका संदेशाला मथळा बनवले. ज्यामध्ये कनिष्ठ जातीतील कुमारस्वामींना मुख्यमंत्री करण्यास दोन्ही पक्षातील लिंगायत आमदार तयार नाहीत. ऐनवेळी सभागृहात ते येडियुराप्पा यांच्या बाजूने मतदान करतील असा त्या वृत्ताचा आशय होता. त्याच्या हवाल्याने समाज माध्यमांवर अनेकांनी कल्पनेचे झेंडे अटकेपार फडकवले! प्रत्यक्षात सभागृहात केलेल्या भावनिक भाषणानंतर येडियुराप्पा यांनी बहुमत घेऊन परत येईन असे सांगून हात जोडले. पण, त्यानंतरही ही 2019 ची सुरुवात आहे. अटलजींच्या राजीनाम्याप्रमाणे देशात वातावरण व्हावे म्हणून ही खेळी करण्यात आली असले संदेश फिरू लागले. जणू देशातील संस्था आता संसदीय पद्धतींच्या ऐवजी अशा सोशल मीडियावरूनच चालविल्या जाणार आहेत अशा थाटात प्रपोगंडा हा सुरू राहिला. प्रपोगंडा करून निर्माण केलेले वातावरण आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात जमीन अस्मानचा फरक असतो. काही काळ लोक अशा प्रकारांना भुलतात. मात्र सदा सर्वकाळ नाही हे भाजपने आता लक्षात घेतले पाहिजे. बहुतांश राज्यातील जनता आपल्याला पूर्ण बहुमत न देता कुबडय़ा शोधायला का लावते याचाही बोध या निमित्ताने घेता आला तर ते भाजपच्या हिताचेच ठरेल. या देशाने अनेक लाटा निर्माण झालेल्या पाहिल्या आहेत. नेहरूंचा नव्या स्वप्नांवर आरूढ झालेला काळ, इंदिराजींचा वादळी आणि एकतर्फी काळ अनुभवला आहे. राजीव गांधींना मिळालेले पाशवी बहुमत आणि 19 महिन्यात बदललेला नूर पाहिला आहे. नरसिंहरावांची विद्वत्ता पाहिली आणि त्यांनी खालच्या थराला जाऊन सत्ता वाचवण्यासाठी केलेली धडपडही पाहिली आहे. मनमोहनसिंगांचा उदयाचा काळही पाहिला आणि सत्ता टिकविण्यासाठी सीबीआयचा मनमुराद वापरही पाहिला आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधातले वादळही पाहिले आहे आणि मोदींची लाटही पाहिली आहे. या सगळय़ांचा विचार केला तर कोणत्याही लाटेला आणि कोणत्याही व्यक्तीला या देशावर सदासर्वकाळ वर्चस्व ठेवता आलेले नाही, हे भाजपने ध्यानात घेतले पाहिजे. देशातील अमूक इतकी राज्ये आणि अमूक इतका जीडीपी असणारा भाग आपल्या वर्चस्वाखाली आहे हे पसरवतानाच त्या राज्यात जनतेने तितकाच तगडा विरोधी पक्षही जन्माला घातलेला आहे याचा भाजपला आपल्या विजयाच्या उन्मादात विसर पडतो आहे. त्यामुळेच गुजरातसारख्या हक्काच्या राज्यातही नव्याने उदयाला आलेली पोरं पक्षाच्या अवतारी पुरुषांना दम लागेस्तोवर चोरटय़ा धावा काढायला लावताना दिसत आहेत. मोदींच्या करिष्म्यावर आपण संपूर्ण भारत पादाक्रांत केला. आता प्रत्येक राज्यात त्यांनाच उतरवू आणि जिंकू असेच भाजपचे धोरण आहे. त्यामुळेच कर्नाटकात येडियुराप्पा चेहरा असले तरी भाजपच्या प्रचारात जीव आला तो मोदींच्या सभांचा झंझावात सुरू झाल्यानंतरच. तोपर्यंत भाजपवर सिद्धरामय्या वरचढ झालेलेच दिसत होते. मठ आणि मठाधीशांना आपल्या बाजूने वळवून भाजपने जुगाड यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही जनतेने त्यांना स्पष्ट बहुमत दिले नाही. काँग्रेसने गोवा, मणिपूर, मेघालयाच्या अनुभवातून बोध घेत कर्नाटकात जनता दलाच्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा देऊ केला आणि दक्षिणेचे व्दार ताब्यात घेण्याचा भाजपचा मनसुबा उधळला जातो आहे असे वातावरण निर्माण झाले. तोच राज्यपालांनी आपल्या विवेकबुद्धीने येडियुराप्पांना संधी देण्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे म्हणा किंवा आमदार फोडण्यात भाजप अपयशी ठरल्यामुळे म्हणा, येडींना अवघ्या दोन दिवसात सत्ताभ्रष्ट व्हावे लागले. अत्यल्पांशकालीन मुख्यमंत्र्यांच्या यादीत त्यांचे नाव दुसऱया क्रमांकावर कोरले. हा भाजपचा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा मुखभंग आहे. यातून बोध घेऊन नेते ‘शहा’णे व्हावेत अशी देशातील जनतेची अपेक्षा आहे. काँग्रेसच्या काळातील घोटाळे, चुकीच्या कारभाराला कंटाळून ज्या जनतेने सत्तांतर केले आणि काँग्रेसला शिक्षा दिली ती काँग्रेस सुधारत असताना भाजप मात्र पूर्वीच्या सत्ताधाऱयांनी ज्या अमर्यादपणे सत्ता वापरली तशी वापरण्याचा आणि आपल्या कृतीचे समर्थन करत, काँग्रेसने केले होते तेव्हा? असे विचारण्याचा वारंवार प्रयत्न करताना दिसते आहे. पण, त्यांना याचसाठी बदलले आहे हे ते सोयीस्कररित्या विसरत आहेत. सत्तेने काँग्रेसला भ्रष्ट केले आता ती भाजपच्या मेंदूवर राज्य करत आहे हेच यातून दिसते. काँग्रेसवर अंकुश म्हणून हिंदूमहासभा, जनसंघ, भाजप या शक्तींना अत्यंत क्षीण असतानाही जनतेने सात दशके जगवले. तेव्हाच्या नेत्यांच्या तत्त्वाच्या राजकारणामुळे भाजपला जनाधार मिळाला. हे विसरून आमच्या आक्रमक शैलीमुळे पराभवाला दूर लोटून आम्ही जेते बनलो अशा अविर्भावात देशातील सत्ताधारी आणि त्यांचे भक्त असतील तर त्यांचा मुखभंग यापुढे वारंवार ठरलेलाच आहे.

(सौजन्य -बेळगाव ‘तरुण भारत’ )

Previous articleकर्नाटकच्या राजकारणात मीडियाचं ओंगळवाणं वर्तन
Next articleबापूंचे नथुरामास पत्र
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here