-शेखर पाटील
चीनी कंपन्यांबद्दल कुणी कितीही कुरकुर केली तरी आज भारतातील बहुतांश बाजारपेठ याच देशातील प्रॉडक्टनी ओसंडून वाहत असल्याचे कुणी अमान्य करणार नाही. सुईपासून ते अजस्त्र इंडस्ट्रीयल उपकरणांपर्यंत ‘मेड इन चायना’चा सर्वत्र बोलबाला असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. कधी काळी चीनी वस्तूंकडे हेटाळणीच्या नजरेने पाहिले जात असे. ‘चायना आयटम म्हणजे नो गॅरंटी’ अशी खिल्ली उडवली जायची. मात्र हा शिक्का पुसुन काढत ”चीनी प्रॉडक्ट म्हणजे स्वस्त पण गुणवत्तापूर्ण !” अशी ओळख गत काही वर्षांमध्ये झालेली आहे. याला कारणीभूत ठरलेल्या कंपन्यांपैकी एक म्हणजे शाओमी होय. भारतात या कंपनीने आपल्या कारभाराची पाच वर्षे नुकतीच पूर्ण केलेली आहेत. याच अल्प कालखंडात भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेवर वर्चस्व मिळवून अन्य डझनवारी प्रॉडक्टसच्या माध्यमातून पाया अजून मजबूत करण्यात या कंपनीला यश आले आहे.
वैयक्तीक अथवा व्यावसायिक पातळीवर आपल्याकडे डायव्हर्सीफिकेशन अर्थात वैविध्यता नसेल तर आपण तग धरू शकत नाही. यामुळे प्रत्येक जण करियरसाठी नेहमी दोन-तीन पर्याय ठेवत असतो. तर अनेक व्यावसायिक जाणीवपूर्वक आपल्या बिझनेसमध्ये वैविध्य आणत असतात. या अनुषंगाने डायव्हर्सीफिकेशनचा विचार केला असता शाओमीला अख्ख्या जगात तोड नाही. ही कंपनी काय बनवत नाही हे विचारा ! आपल्याला शाओमीचे फक्त स्मार्टफोन्सच माहित असतील. मात्र यासोबत विविध इलेक्ट्रॉनीक्स उपकरणांमध्ये शाओमीने विस्तार केला आहे. यात स्मार्ट टिव्ही, टॅबलेट, लॅपटॉप, स्मार्टवॉच, फिटनेस ट्रॅकर्स आदींपासून ते स्मार्ट लाईट, इयरफोन्स, पॉवर बँक्स, ड्रोन, इलेक्ट्रीक स्कूटर्स, एयर/वॉटर प्युरिफायर्स, रोबो, अनेक अॅसेजरीज आणि मुलांच्या खेळण्यांपर्यंतची विविध उत्पादने शाओमीने बाजारपेठेत सादर केली असून याला उदंड प्रतिसाद लाभला आहे. याला विविध सॉप्टवेअर्स व अॅप्सची जोडदेखील आहेत. तर क्राऊंडफंडींगच्या माध्यमातून अतिशय नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट सादर करण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. शाओमीला चीनची अॅपल कंपनी म्हणून ओळखली जाते. आणि याच शाओमीने अॅपलला घाम फोडलाय हेदेखील तितकेच खरे.
शाओमीची आजवरची वाटचालदेखील अतिशय रंजक अशीच आहे. चीनी भाषेत शाओमीचा अर्थ ‘बाजरीचे दाणे’ असा होतो. २०१० साली लेई जून या हिकमती चीन आंत्रप्रुनरने सहा सहकार्यांसह शाओमीची स्थापना केली. वर्षभरात त्यांनी स्मार्टफोन सादर केला आणि यानंतर जो घडला तो इतिहास आहे. फक्त नऊ वर्षाच्या कालखंडात शाओमी या स्टार्टअपला जगातील मातब्बर टेक कंपनीत परिवर्तीत करण्याची किमया लेऊ जून व त्यांच्या सहकार्यांनी केली असून यात भारतीय बाजारपेठेचा मोठा वाटा आहे. जुलै २०१४ मध्ये शाओमीने भारतात प्रवेश केला. फक्त १३,९९९ रूपये मूल्यात उच्च श्रेणीतील फिचर्स असणार्या ‘मी ३’ या स्मार्टफोनला देशभरातील शॉपीजमधून नव्हे तर फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून फ्लॅश सेलच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले. अल्प मूल्यात फ्लॅगशीप फिचर्स आणि विक्रीचे अनोखे तंत्र यामुळे हा स्मार्टफोन सुपरहिट ठरला. एकाच वेळी असंख्य युजर्स आल्याने फ्लिपकार्टची साईट क्रॅश होण्याचे प्रकारदेखील घडले. यानंतर शाओमीने कधीही मागे वळून पाहिले नाही. पहिल्यांदा फक्त ऑनलाईन विक्री करणार्या या कंपनीने हळूहळू ऑफलाईन विक्री तंत्राचीही जोड दिली. आणि भारतीय बाजारपेठेत पहिल्यांदाच किंमतीची गळेकापू स्पर्धा सुरू केली. तोवर भारतात मायक्रोमॅक्स, लाव्हा, झोलो आदींसारख्या भारतीय कंपन्यांनी किफायतशीर मूल्याचे मॉडेल्स सादर केले होते. मात्र त्यांच्यापेक्षा कमी मूल्यात त्यांच्याहून कित्येक सरस फिचर्स असणारे स्मार्टफोन्स सादर करून शाओमीने धमाल केली. यामुळे काही महिन्यांमध्येच या सर्व भारतीय कंपन्यांची जबरदस्त पीछेहाट झाली. यानंतर शाओमीने अन्य चीनी कंपन्यांसह सॅमसंगसारख्या मार्केट लीडरकडे लक्ष केंद्रीत केले. यामुळे अल्प काळात भारतीय बाजारपेठेत सर्वाधीक स्मार्टफोन विकण्याचा बहुमानही संपादन केला. अर्थात, भारतात स्मार्टफोन विक्रीत शाओमी नंबर वन बनली. आता सॅमसंग पुन्हा स्पर्धेत आलीय, तर रिअलमी सारख्या ब्रँडने स्पर्धा निर्माण केली असली तरी शाओमी कंफर्ट झोनमध्ये पोहचली आहे.
स्मार्टफोनची बाजारपेठ कधी तरी सॅच्युरेशनला पोहचेल हे लक्षात घेऊन या कंपनीने आधीच वेगवेगळे प्रॉडक्ट लाँच केले आहेत. यातील स्मार्ट टिव्हीच्या विक्रीतही भारतीयांना शाओमीने आकर्षीत केले आहे. आज या बाजारपेठेतही शाओमी अव्वल क्रमांकावर असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय, वेअरेबल्स अर्थात परिधान करण्यायोग्य उपकरणांसह विविध अॅसेसरीज व लाईफस्टाईल प्रॉडक्टच्या क्षेत्रातही या कंपनीने आपली पकड घट्ट केली आहे. शाओमीचे ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंट तथा भारताचे प्रमुख मनुकुमार जैन यांच्या नेतृत्वाखाली या कंपनीचा धडाका आगामी कालखंडातही कायम राहील अशी शक्यता आहे.
सहाव्या वर्षात पदार्पण करतांना शाओमीसमोर अनेक आव्हाने आहेत. एक तर सॅमसंगने स्मार्टफोनच्या बाजारपेठेवर पुन्हा पहिला क्रमांक मिळवण्यासाठी निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे ग्राहकांना नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट सादर करण्याचे आव्हान शाओमीसमोर आहे. या कंपनीने अलीकडेच फ्लॅगशीप या श्रेणीवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. शाओमीवर आधी भारतात अल्प काळासाठी बंदी लादण्यात आली होती. अन्य कंपन्यांचे पेटंट चोरी करण्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला होता. याच प्रकारचे आरोप शाओमीवर नेहमी होत असतात. याचाचही आगामी वाटचालीवर परिणाम होऊ शकतो. सर्वात महत्वाचे म्हणजे भारत व चीनमधील संबंधांचाही शाओमीच्या वाटचालीवर परिणाम होऊ शकतो. मात्र सध्या तरी शाओमीला भारतात मिळालेले यश हा टेकविश्वातील एक चमत्कार मानला जात आहे.
शाओमीने भारतात दणदणीत यश संपादन केले असतांनाच आपल्या एकाही कंपनीने चीनमध्ये इतके यश का मिळवले नाही ? किंवा शाओमीप्रमाणे एकही भारतीय कंपनी ‘ग्लोबल ब्रँड’ का बनली नाही ? हे विचार मनाला नक्कीच अस्वस्थ करणारे आहेत.
(लेखक नामवंत पत्रकार , ब्लॉगर व टेक्नोक्रेट आहेत.)
92262 17770
https://shekharpatil.com
Nice article