शिक्षक तोच, जो जिज्ञासा जागी करतो

-हेरंब कुलकर्णी 
……………………………………………

राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याला ओशो विरोध करतात. ते म्हणतात एक शिक्षक राष्ट्रपती झाला यात शिक्षकाचा नाही तर राजकारणातल्या पदाचा सन्मान आहे. राष्ट्रपतीपद हे शिक्षकापेक्षा मोठे आहे, असा संदेश त्यातून मिळतो.  जेव्हा एखादा व्यक्ती राष्ट्रपतीपद सोडून शिक्षक होईल त्याचा जन्म दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा केला पाहिजे.

शिक्षण क्षेत्र हे प्रेमाचे क्षेत्र आहे. त्यामुळे  या क्षेत्रात पुरुषांना बंदी असली पाहिजे .इथे फक्त महिलांनाच शिक्षक होऊ द्यावे अशी स्फोटक सूचनाही ओशो  करतात. पण पुढे स्त्री याचा अर्थ स्त्री चित्त असा सांगून प्रेमळ , हळुवार , कोमल  वृत्ती एखाद्या पुरुषातही असू शकते ,असे ते सांगतात .साने गुरुजी हे त्याचे उदाहरण ठरावे.

…………………………………………………..

आचार्य रजनीश हे नाव उच्चारले तरी अनेकजण दचकतात. ओशोंच्या ६०० पुस्तकांपैकी लोक फक्त एकाच पुस्तकाची चर्चा करतात आणि तेही पुस्तक त्यांनी वाचलेले नसते. जीवनाच्या सर्व पैलूंवर भाष्य करणारे रजनीश हे भारतीय हे भारतीय परंपरेचे भाष्यकार आहेत. ओशोंनी शिक्षणावर केलेले भाष्य फारसे परिचित नाही.  त्यांच्या शैक्षणिक विचारांवर ‘शिक्षा मे क्रांती’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. रजनीशांच्या  इतर विषयांवरील भाष्यासारखे हे भाष्यही आक्रमक आणि अंतर्मुख करणारे आहे.

ओशो म्हणतात की जगात राजकीय क्रांती अपयशी झाली, सामाजिक क्रांती अपयशी झाली. आर्थिक क्रांती अपयशी झाली. त्यामुळे आता फक्त अपेक्षा ही फक्त शैक्षणिक क्रांतीकडूनच आहे. जग बदलण्याची क्षमता ही फक्त आता शैक्षणिक क्रांतीत असल्याने त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे.

शिक्षकाची व्याख्या करताना ओशो म्हणतात की, शिक्षक तोच असतो की जो जिज्ञासा जागी करतो आणि मुलांना साहस आणि अभय शिकवतो.त्यासाठी शिक्षक हा विद्रोही असला पाहिजे.    केवळ माहिती देणे म्हणजे शिक्षण नव्हे. आज शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या ज्ञानात फक्त एक तासाचे अंतर आहे.तो अगोदर एक तास अगोदर नोट्स वाचतो आणि मुलांना माहिती देतो. शिक्षकाने त्यापलीकडे जावून जिज्ञासेचे माध्यम बनले पाहिजे. मुलांकडून आदर मिळण्याची अपेक्षा त्याने सोडून दिली पाहिजे. मुलांना अज्ञाताचा बोध करून दिला पाहिजे, तरच मुले त्याला आदर देतील.

शिक्षकाला मिळणार्‍या आदराचे ते वेगळे विश्लेषण करतात. शिक्षकाला स्वस्त आदर देवून समाज त्याच्याकडून खूप महागाचे काम करून घेतो. प्रत्येक मागची पिढी त्यांचे द्वेष,इर्षा,द्वेष,वैमनस्य,शत्रुता,मूढता शिक्षकाद्वारे नव्या पिढीत संक्रमित करते. त्या पिढीत असलेला अंधविश्वास,अज्ञान,इतिहास,पुराणे यात शिक्षकाच्या माध्यमातून नवीन पिढीला गुरफटून टाकले जाते . शिक्षकाने हे काम करावे म्हणून समाज त्याला आदर देतो.

शिक्षणातून धार्मिक मन निर्माण व्हावे अशी अपेक्षा ते करतात .परंतु धार्मिक मन याचा अर्थ हिंदू,मुस्लिम अशा अर्थानं धार्मिक नाही तर स्पर्धात्मक नसलेले,हिंसात्मक नसलेले,ईर्षा नसलेले आणि प्रेम,करुणा असलेले मन. याला ते धार्मिक मन असे म्हणतात. शिक्षणातून असे धार्मिक मन निर्माण व्हायला हवे. परंतु असे झाले नाही याकडेही ते लक्ष वेधतात. शिक्षणाचे प्रमाण कमी होते तेव्हा जगात शांतता होती आणि शिक्षणाचे प्रमाण वाढले आणि युद्ध हिंसा वाढली ही विसंगती कशी समजून घ्यायची ? शिक्षण केवळ इतरांवर अधिकार गाजवायला शिकवते.  जो जास्त अधिकार इतरांवर गाजवू शकेल त्याला जास्त शिकलेला मानले जाते

शाळांमधून आदर्श समोर ठेवणे थांबले पाहिजे, याचाआग्रह ओशो धरतात . या आदर्शाच्या भानगडीत नकळतपणे मुलांमध्ये आपण सूक्ष्म भीती निर्माण करतो. खरं तर मुलाला त्याच्यात जे काही आहे ते पूर्णत्वाने विकसित होणे यावर भर द्यायला हवा. कुणासारखे बन असे म्हणून आपण त्याच्यात एक तणाव निर्माण करतो. आज शिक्षणात तुलना करायला शिकवले जाते. पण ओशो सांगतात की, बागेत गुलाबाचे झाड कधीच शेवंतीसारखे होण्याचा प्रयत्न करीत नाही. गुलाब हा गुलाब म्हणून विकसित होतो आणि शेवंती ही शेवंती म्हणून विकसित होते. पण माणूस हा मुलांना एकदुसर्‍यासारखा विकसित करण्याचा का प्रयत्न करतो ? यातून मुलामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. निद्रानाशाच्या तक्रारी आणि डिप्रेशन हे हजारो लाखो मुलांमध्ये निर्माण झाल्याचे ओशो निदर्शनास आणूनआणतात.

इतकी वर्षे शाळेत जाऊन आपण जीवन जगण्याचे काही कौशल्य मुलाला देतो का ?असा अंतर्मुख करणारा प्रश्न ते विचारतात. मुलगा एखाद्या दिवाळखोरासारखा जीवनासमोर काही कागद घेवून उभा राहतो. विद्यापीठे वाढली,पुस्तके वाढली पण दुनियेत जीवनाचा स्तर खाली खालीच येत राहिला. ईर्ष्या वाढतेच आहे. जगात युद्धं , अशांतता सुरू राहणे हा शिक्षणाचा पराभव आहे. शिक्षणातून फक्त अहंकार वाढतो आहे. विनम्रता वाढत नाही.संवेदनशीलता वाढत नाही. तर महत्वाकांक्षा वाढते आणि महत्वाकांक्षा वाढणे हे मनाच्या हीनतेचे लक्षण आहे. प्रत्येकाला आपण no body होण्याची भीती वाटते. स्पर्धा जर हवीच असेल तर आपल्याशीच स्पर्धा असायला हवी. वॅनगोग हा चित्रकार म्हणायचा की. मी माझ्या किती पुढे गेलो इतकाच मी विचार करतो. शिक्षणाने सभ्यता नष्ट होते आहे.

शिक्षकांविषयी ते म्हणतात की, पहिल्या दर्जाची प्रतिभा शिक्षणा क्षेत्राकडे आकर्षित होत नाही.वास्तविक विद्यापीठ दर्जाचे तज्ञ प्राथमिक शिक्षणासाठी नेमायला हवेत आणि मानसशास्त्रज्ञांनी सातत्याने प्राथमिक शिक्षणावर संशोधन करायला हवे. इतके महत्व ओशो प्राथमिक शिक्षणाला देतात. मुलं ४ वर्षाचे होण्यापूर्वी त्यांना कशा प्रकारचे शिक्षण शिक्षण द्यायचे, हे आव्हान असल्याचे ते सांगतात.बालवयात मुलांना खेळायला,नाचायला आवडते. शिक्षण हे खेळ आणि नृत्याशी आम्ही जोडू शकू का ?असा प्रश्न ते उपस्थित करतात. मागच्या शतकाचे एक वेगळे वैशिष्ट्य ते सांगतात. ओशो म्हणतात की, तरुण मुले ही मागच्या शतकाची देणगी आहे. पूर्वी बालविवाह होत. त्यामुळे मुलाचे रूपांतर प्रौढात होत असे. पण आज लग्न उशिरा होत असल्याने तरुण विद्यार्थ्याची निर्मिती झाली आहे. त्यांच्यात प्रचंड ऊर्जा आहे. त्या उर्जेला दिशा देण्यासाठी शिक्षणाची रचना बदलावी लागेल. अन्यथा ती ऊर्जा विघातक दिशेने वाहत जाईल. पाठांतरावर आधारित शिक्षण बंद करून नव्या ज्ञानाची तहान आणि क्षमता निर्माण करायला हवी. मुलाचे रूपांतर आज केवळ एका माहिती संग्रहात झाले आहे. शिक्षणात प्रतिभा विकसित करण्यावर भर दिला पाहिजे ,असे ते सांगतात. शिक्षक हा भूतकाळाशी बांधला गेला आहे आणि विद्यार्थी हा भविष्यकाळाकडे बघतो आहे .यातून दोघेही एकमेकाकडे पाठ करून उभा आहे. मुले चुका करण्यातून जास्त शिकतील असे सांगून ओशो आइनस्टाईनचे एक उदाहरण देतात. आइनस्टाईनने एक प्रयोग ७०० वेळा केला होता. पण प्रत्येक चूक मला निष्कर्षाच्या अधिक जवळ नेते आहे, असे तो म्हणाला होता.

मुलांना मुक्त विचार करता येण्यासाठी मुलांना संदेहवादी बनविले पाहिजे. श्रद्धा ही विवेकी विहार करण्यात अडथळा असल्याचे ते सांगतात. संदेहाची तीव्रतेतून नवीन शोध लागतो .परंपरेच्या आणि भूतकाळाच्या साच्यातील शिक्षण मुलांना देण्यास ओशो विरोध करतात .

आजचे शिक्षण चित्ताला जड आणि जटील आणि वृद्ध बनवते. जीवनाचा संपर्क तोडून टाकते. ज्ञान ,आनंद आणि सौदर्यापासून वंचित करते. विचाराचा संग्रह जडता आणतो. आजचे शिक्षण कृष्णमूर्तीच्या भाषेत what to think शिकवते How to think शिकवत नाही. अशा साच्यात असलेले मन वेगळा विचार करू शकत नाही. जिथे आधार ढाचा श्रद्धा असते तिथे विचार अशक्य असतो. विचार करण्यासाठी आपण साच्यातून मुक्त असावे लागते. शाळामध्ये जाऊन आपली प्रतिभा शाबूत ठेवणे यापेक्षा कठीण काम दुसरे नाही. विद्यापीठांनी मुलांमधील प्रतिभा नष्ट करण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले आहे. इमर्सन एका युवकाबद्दल म्हणाला होता की, विद्यापीठातून बाहेर येवून त्या तरुणाची प्रतिभा शाबूत होती. शाळात आपण जितका शिस्तीचा आग्रह धरू तितकी स्वछंदता प्रतिक्रिया म्हणून वाढत जाते. शिक्षण हे आत्मविवेक देण्यासाठी आहे. आत्मविवेक जर निर्माण झाला नाही तर शिक्षण हे धर्म आणि सत्तेच्या हातातील शस्त्र बनेल.

शिक्षणाचे तोंड भूतकाळाकडे आहे, ते भविष्याकडे असले पाहिजे. शिक्षण हे महत्वाकांक्षेपासून दूर असले पाहिजे. महत्वाकांक्षी चित्त हे हिंसक चित्त असते.राजकारण्यापासून शाळा दूर ठेवल्या पाहिजेत . कारण त्यांना क्रमांक १ होण्यात रुची असते. शाळातील स्पर्धा समाप्त करून अहंशून्य व प्रेमपूर्ण जीवनाला सर्वोच्च जीवनदर्शन मानावे. शिक्षकाने मुलांसमोर असलेल्या समस्यांबाबत त्यांच्या  जिज्ञासेला जागृत करावे. मुलांना काही गृहीत धरायला लावणे, अंधाविश्वास हीच समस्या आहे. मुलांना प्रश्न विचारायला लावायला हवेत .प्रलोभन आणि शिक्षा या दोन टोकाला मुलांना नेता कामा नये. प्रलोभन आणि शिक्षेतून मुलांचा कोणताही विकास होत नाही. मुलांना शांत व्हा आणि आनंदीत व्हा असं आपण कधीही सांगितले नाही. मुलं खोटं बोलतात आणि खोटं वागतात याचे कारण तुम्ही सफलतेला महत्व दिले आहे. त्यामुळे कसेही करून यशस्वी व्हायचे असे मुलांनी ठरविले आहे. त्यामुळे सफलतेचे महत्व कमी केले पाहिजे.

.            ‘विद्यावान’ चा अर्थ सांगताना ओशो म्हणतात की ज्यांना जीवनातील श्रेष्ठतर मूल्यांचे भान आहे आणि जे कनिष्ठ मूल्यांचे समर्पण करू शकतो त्याला विद्यावान म्हटले पाहिजे. प्रेमासाठी पैशाला नाकारता आले पाहिजे. कारण अंतिम परीक्षा ही प्रेमाचीच आहे. अंतिम मूल्य हे प्रेमाचेच आहे. जीवनाची श्रेष्ठतम मूल्य हे प्रेम आहे. पण आजचे शिक्षण प्रेम नाही, अहंकार शिकवते.

आजची मुलं बंडखोर आहेत म्हणून शाळा तक्रार करीत आहेत. मुलांमध्ये तोडण्याची अपूर्व क्षमता आहे.  ही ऊर्जा चिंतेची नाही.  या उर्जेतून मुलांना जात, धर्म, पंथ तोडायला लावा. सडलेली नैतिकता तोडायला लावा.

राजकारण आणि शिक्षण याविषयी ओशो म्हणतात “ भारतात राजकारण्यांनी शिक्षणाला वेगळे केले आहे. शिक्षकांनी राजकारणात लक्ष घालू नये. आपले शाळेत काम करत राहावे एवढेच म्हटले जाते. त्यांना माहीत आहे की शिक्षक जर सक्रिय झाला तर सर्व समाजाला शहाणे करेल.  राजकारण्यांना त्याची भीती आहे . त्यामुळे त्याचे काम महान आहे असे सांगून शिक्षकाला मुद्दामहून बाजूला टाकले आहे “

शाळा कॉलेज मधून विद्यार्थी विचारशील होऊन बाहेर पडत नाहीत. विज्ञान शिकून ते वैज्ञानिक होत नाही. शिक्षण व्यवस्थेने केवळ जाणीव विकसित करावी. ‘चोरी करू नका’ हे सांगण्यापेक्षा त्याची संवेदना,जाणीव इतकी विकसित करावी कीtत्याला चुकीचे काम करण्याची इच्छा होणार नाही.

‘खोटे बोलणे संपवायचे असेल तर मग शिक्षण क्षेत्रातील भीती संपवावी लागेल. शिक्षणात ‘आज’ महत्वाचा आहे. तो समजवायला शिकविले पाहिजे. शाळेत चौकस मन विकसित करायला हवे. शिक्षणशास्त्राने मनुष्याची प्रतिभा विकसित करण्यासाठी योगदान दिलेले नाही. केवळ ज्ञान देणे हा शिक्षणाचा हेतू नाही तर ज्ञानाची तहान निर्माण करणे, हे शिक्षणाचे उद्दीष्ट असावे. आपल्या देशात संत निर्माण झाले पण वैज्ञानिक निर्माण झाले नाहीत.

(लेखक सामाजिक , शैक्षणिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत)

8208589195 

Previous articleकलम 370! आता पुढे काय?
Next articleजगावेगळा माणूस
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here