शिवमुद्रेसोबत येणाऱ्या जबाबदारीचे भान असलं पाहिजे!

अमेय तिरोडकर

शिवाजी महाराज सर्वांचे आहेत. ते राज ठाकरेंचे पण आहेत. गाडीच्या काचेवर ते बोटातल्या अंगठीवर शिवमुद्रा असते. लोकं ती सर्रास वापरतात. अभिमानाने. ही मुद्रा वापरणं चुकीचं असूच शकत नाही. ज्यांनी आपल्याला ओळख दिली त्यांची ओळख अभिमानाने आपल्या सतत सोबत ठेवणं यात काहीच चूक नाही. मनसेने त्यांच्या झेंड्यात शिवमुद्रा आणण्यात म्हणून काहीच गैर नाही. फक्त शिवमुद्रेसोबत एक खूप मोठी जबाबदारी आपल्यावर येते आहे याचं भान मनसेने असू द्यावं.

हि जबाबदारी प्रामुख्याने विचारांची आहे. मनसे झेंड्यासोबत विचार पण बदलणार असं म्हटलं जातंय. तसं होतं की नाही हे संध्याकाळी राज ठाकरेंच्या भाषणानंतर समजेल. पण त्यांची जी क्लिप फिरतेय त्यात हिंदुत्व वगैरे उल्लेख आहे.

शिवाजी महाराजांचं राज्य हिंदवी स्वराज्य होतं. हिंदवी ही भौगोलिक संकल्पना आहे. हिंदुत्ववादी स्वराज्य नव्हतं. हिंदुत्व ही राजकीय संकल्पना आहे.

हिंदुत्व ही प्रतिक्रिया आहे. युरोपातल्या फॅसिस्ट विचार प्रणालीनुसार आपल्याकडेही हिंदू धर्माची मांडणी झाली पाहिजे असं वाटणा-यांनी ती केली आहे. यात सावरकर प्रमुख. आज मनसेच्या व्यासपीठावर सावरकरांचा फोटो दिसला. आणि प्रबोधनकारांचा पण! प्रबोधनकारांनी ब्राम्हणी हिंदुत्वाबद्दल शेलक्या शब्दांत काय लिहून ठेवलं आहे ते प्रत्येकाने स्वतःच शोधून वाचावं. मग हे दोन्ही फोटो एकाच रांगेत ठेवण्याचा भोंगळपणा लक्षात येईल.

राज ठाकरे शिवमुद्रेसोबत ‘हिंदवी’ राज्याच्या दिशेने जाणार असतील तर ते स्वागतार्ह आहे. ‘हिंदुत्वा’च्या दिशेने जाणार असतील तर शिवरायांच्या विचारांचा पुन्हा एकदा चुकीचा अर्थ काढला गेला असं म्हणावं लागेल.

शिवरायांचं राज्य हे सगळ्यांचं होतं. त्यात जश्या सगळ्या जातींच्या लोकांना स्पेस होती तशीच धर्माच्याही होती. मुळात शिवकालीन संघर्ष हा धार्मिक नव्हताच. तो राजकीय होता. त्यामुळे शिवरायांच्या विरोधात अनेक हिंदू सरदार लढले आणि शिवरायांच्या बाजूने अनेक मुस्लिम सरदार लढले. आजच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित हिंदू विरुद्ध मुस्लिम चष्म्यातून शिवकालीन संघर्ष बघणं म्हणजे वडाची साल पिंपळाला लावणं. राज ठाकरेंनी ते करू नये.

यात दुसरा मुद्दा आहे. भाजपला महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी शिवसेनेची मदत हवी होती. यातून तब्बल पंचवीस वर्षं मान अपमान गिळून भाजप ‘धाकटी’ होऊन राहिली. २०१४ ला संधी मिळाली तशी ‘थोरली’ झाली. आणि आता या जुन्या नातेसंबंधातली नवी पोझिशन म्हणजे आपलं थोरलेपण टिकावं म्हणून राज्याच्या सत्तेवर पाणी सोडती झाली!

बाळासाहेबांना भाजपच्या ह्या धूर्तपणाचा पुरता अंदाज होता. त्यामुळेच त्यांनी भाजप सेना संबंधात कधी आपला ‘अप्पर हॅन्ड’ सोडला नाही. उद्धव यांची २०१४ ला मजबुरी झाली पण संधी मिळताच भाजपची खोड त्यांनी २०१९ ला मोडली.

भाजपला हाच वेग कायम राहिला तरी एकहाती महाराष्ट्र जिंकायला अजून काही काळ जावा लागेल. तोवर त्यांना राज्यात एका सशक्त ‘धाकल्या’ची गरज आहे. राज यांना ही स्पेस खुणावत आहे का हा माझ्या सारख्यासमोर प्रश्न आहे. जर असं झालं तर राज जे काही ‘महाराष्ट्र धर्म’ वगैरे बोलत आहेत त्यांच्याशीही प्रतारणा ठरेल आणि त्या ‘शिवमुद्रे’सोबतही!

त्यामुळे मराठी मतांसाठीचा हा राज यांचा नवा प्रयोग, प्रयत्न बारकाईने बघितला पाहिजे. जर तो ‘हिंदवी’ दिशेने गेला तर आनंद, जर तो ‘हिंदुत्व’ दिशेने गेला तर मात्र क्लेशदायक.

प्रयोग करून बघत राहणं हे चांगल्या माणसाचं लक्षण असतं. त्यातच वाढीच्या शक्यता असतात. आयुष्याच्या सगळ्या क्षेत्रांना हे लागू आहे. राजकारणालाही. चांगला नेता प्रयोग करण्याची हिंमत दाखवतोच. राज यांनी ती दाखवली आहे म्हणून कौतुक. पण हा प्रयोग करताना धार्मिक राजकारणाची धोकादायक रेषा ते ओलांडणार तर नाहीत ना, ही काळजी!

(लेखक नामवंत पत्रकार आहेत)

Previous articleमुसलमानांच्या मुसक्या बांधताना !
Next articleअराजकाच्या दिशेने राज
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.