‘सत्तातुराणां न भयं , न लज्जा’ 

-प्रवीण बर्दापूरकर

सध्या कर्नाटकात सुरू असलेला राजकीय तमाशा आणि गोव्यात जे सत्तांतर झाले त्याचे वर्णन करण्यासाठी ‘सत्तातुराणां न भयं , न लज्जा’ याशिवाय दुसरे कोणते चपखल शब्द असूच शकत नाहीत . आपल्या लोकशाहीच्या उज्ज्वल परंपरा आणि तिच्या पवित्र्याला कसा डाग लागलेला आहे , स्वत:ला लोकशाहीचे भोई म्हणवणारे कसे निष्ठानिर्लज्ज झालेले आहेत , याचे बीभत्स स्वरुप म्हणजे या अलीकडच्या घटना आहेत आणि त्यातून आपल्या लोकशाहीत ‘माणूस’ नाही तर केवळ ‘सत्ताप्राप्ती’च केन्द्रस्थानी आहे , हे पुन्हा एकदा समोर आलेले आहे . भाजपला जोरदार चपराक मिळाल्यावर कर्नाटकात जनता दल आणि काँग्रेसचे सरकार सत्तारुढ झालेले सरकार पाहिल्या दिवसापासूनच अस्थिर आहे आणि त्या अस्थिरतेत भर घालण्याची कोणतीही संधी भारतीय जनता पक्ष सोडत नाही , हे कांही आता लपून राहिलेलं नाही हे जितके खरे आहे , तितकेच जनता दल आणि काँग्रेस नेत्यांचेही अपयश या अस्थिरतेसाठी जबाबदार आहे . भाजपला दारुगोळा पुरवण्याचे काम कॉंग्रेसचेच सिद्धरामय्या करत आहेत हे समजूनही कॉंग्रेसचे नेते डोळ्यावर कातडे ओढून बसलेले आहेत .  कॉंग्रेसचे महाराष्ट्र आणि गोव्यातील  विधानसभेतील चक्क विरोधी पक्ष नेते आणि त्यांच्यासोबत दोन डझन आमदार फुटतात तरी  त्याची चाहूल ( वैदर्भीय भाषेत ‘भणक ‘ !) आधी पक्षाच्या नेत्यांना लागत नाही आणि मग ते भाजपवर आगपाखड करण्यातच धन्यता मानतात , हे कांही राजकीय शहाणपणाचे लक्षण मानता येणार नाही ; एकुणातच कॉंग्रेस पक्ष सर्व पातळ्यांवर निर्नायकी झाल्याचे हे चित्र आहे .

कर्नाटकात जे काही घडते आहे  त्यावरुन भाजप , कॉंग्रेस आणि जनता दल या तिन्ही पक्षांना राजकीय नीतीमत्ता , निष्ठा आणि राजकीय अधिष्ठान याच्याशी काहीही घेणं-देणं उरलेलं नाही ; सत्ता प्राप्तीसाठी हे तिन्ही पक्ष निर्लज्जपणाच्या एकाच पातळीवरचे आहेत हेच  आजवरचा इतिहास पाहता स्पष्ट झालेले आहे . स्वातंत्र्यानंतर या देशात आजवर जे काही चांगले  आणि विधायक घडत आलेले आहे , या देशाची जी काही प्रगती झालेली आहे , त्याचे नि:संशय श्रेय जसे कॉंग्रेसला आहे तसेच संसदीय लोकशाहीचा जो काही चिंताजनक  संकोच झालेला   आहे ; आपल्या देशाच्या लोकशाहीत सत्ताप्राप्ती आणि निवडणुका जिंकण्यासाठी जे अनिष्ट पायंडे पडले किंवा ठरवून पाडले गेलेले आहेत , त्यासाठीही कॉंग्रेस हा पक्ष आणि या पक्षाचे एकजात सर्व नेते जबाबदार आहेत . लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचे जे कांही रुदन काँग्रेसचे नेते आज करत आहेत तो कोणताही भेसळ नसलेला भंपकपणा आहे हे स्पष्टपणे सांगितलेच पाहिजे . सत्ताप्राप्ती आणि निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष आज ज्या काही भल्या-बुऱ्या उचापती करतो आहे ; त्या उचापतींची चाकोरी गेल्या साठ वर्षात कॉंग्रेसने आखून ठेवलेली आहे ; जे करायला कॉंग्रेसला साठ वर्षे लागली ते अवघ्या पांच-साडेपांच वर्षात करून दाखवण्याचा भीम पराक्रम भाजपने केलेला आहे , हाच जो काही आहे तो या दोन पक्षातील ‘डिफरन्स’ आहे !

आता कर्नाटकात निर्माण झाली तशीच स्थिती १९६७ साली राजस्थान विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झाली होती . तेव्हा राजस्थान विधानसभेच्या १८४ जागा होत्या आणि कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार ८८ जागी विजयी झाले होते ; म्हणजे बहुमतासाठी कॉंग्रेसकडे ५ जागा कमी होत्या हे लक्षात घेऊन लगेच कॉंग्रेसेतर सर्व पक्षांचे नवनिर्वाचित ९५ विधानसभा सदस्य एकत्र आले आणि त्यांनी एक संयुक्त आघाडी स्थापन करुन राजस्थानात सत्ता स्थापनेचा दावा केला .( सत्तालोलुपता कशी राजकीय विचार विरहित असते ते बघा- या संयुक्त आघाडीत भारतीय कम्युनिस्ट आणि जनसंघ हे एकमेकांचे कट्टर विरोधक पक्ष मांडीला मांडी लावून सोबत होते !) कॉंग्रेसचे मोहनलाल सुखाडिया यांनीही निकालानंतर सर्वात मोठा पक्ष आपला असल्याकडे लक्ष वेधत सरकार स्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे केला . राजस्थानचे राज्यपाल तेव्हा डॉ. संपूर्णानंद होते . त्यांनी सभागृहातला सर्वात मोठा पक्ष म्हणून कॉंग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले . विरोधक रस्त्यावर आले ; मोठे जन आंदोलन उभे राहिले . ते आंदोलन   तीव्रही झाले . आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना कराव्या लागलेल्या गोळीबारात ९ लोक ठार झाले . राजधानी जयपूरमधे संचारबंदी लागू करावी लागली . तरी मोहनलाल सुखाडिया यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली . एवढेच नव्हे तर बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांकडून मिळालेल्या अवधीत कॉंग्रेसने संयुक्त आघाडीतील काही सदस्य फोडले आणि त्यांच्या बळावर सभागृहात बहुमत सिद्धही केले . तेव्हा कॉंग्रेसमध्ये पक्षांतर करणारे पहिले सदस्य होते राम चरण आणि ते आता ‘पार्टी वुईथ डिफरन्स’चा दावा करणाऱ्या  भारतीय जनता पक्षाचा पूर्वसूरी असलेल्या जनसंघाचे उमेदवार म्हणून विधानसभेवर  निवडून आलेले होते !

जानेवारी १९८०त तत्कालीन जनता पक्षाचे हरियानातील भजनलाल यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण सरकारच पक्षाच्या सर्व आमदारांसह ‘पावन’ करुन घेण्याचा पराक्रम कॉंग्रेसने केलेला आहे . सत्तेच्या गैरवापराचीही आणखी अनेक उदाहरणे आहेत , त्यापैकी काँग्रेस आणि भाजपच्या काळातील एकेक सांगतो म्हणजे , आपल्या देशातले राजकीय पक्ष कसे सत्तालोलुप म्हणून कसे एकाच माळेचे मणी आहेत हे त्यातून स्पष्ट होईल . आंध्रप्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत लोकप्रिय अभिनेते एन.टी. रामाराव  यांच्या नेतृत्वाखालील तेलगू देसमने , इंदिरा गांधी आणि इंदिरा काँग्रेसच्या नाकावर टिच्चून सत्ता संपादन केली . निवडणुकीतला हा पराभव तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेसला इतका बोचत होता की एन.टी. रामाराव परदेशी गेलेले आहेत हे बघून त्यांचे सरकारच केंद्र सरकारने बरखास्त केले आणि काँग्रेसचे एन. भास्करराव यांची मुख्यमंत्रीपदी प्रतिष्ठापनाही करुन टाकली . रामाराव तातडीने मायदेशी परतले आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले पण , दरम्यान सभागृहात बहुमत सिद्ध करता येणारच नाही हे स्पष्ट झाल्यावर नाईलाजाने एन. भास्करराव यांना राजीनामा द्यावा लागला आणि रामाराव पुनः मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले !

आता उदाहरण ज्यांच्या आदर्शवादाचे भजन सतत भारतीय जनता पक्षाचे एकजात सर्व नेते रात्रंदिवस करत असतात ते अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाचे आहे . या सरकारने कोणतेही सबळ कारण नसतांना बिहारमधील राबरी देवी यांच्या नेतृत्वाखालील सरकार ११ फेब्रुवारी १९९९ रोजी बरखास्त केले आणि बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली ; त्यावेळी बहुदा अटलबिहारी वाजपेयी परदेशी दौर्‍यावर होते . सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यावर अखेर ९ मार्च १९९९ रोजी राबरी देवी यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली . इतिहासाचा धांडोळा घेतल्याशिवाय वर्तमानातील अनेक घटनांचा संदर्भ अचूक लागत नाही आणि कोणत्याही निष्कर्षाप्रत ठामपणे पोहोचता येत नाही म्हणूनच वरील सर्व घटना नमूद केलेल्या आहेत . काँग्रेसच्या नेत्यांचे एक बरे असते त्यांना फक्त सत्ता उपभोगायची असते आणि त्यासाठी त्यांना एक ‘गांधी’ नेता म्हणून लागतो . त्याग करणे , विचार मांडणे , संघटनात्मक जबाबदारी पार पाडणे आदीच्या भानगडीत कॉंग्रेस नेते पडतच नाहीत . काँग्रेस नेते त्याग वगैरेबाबत कायम गांधी घराण्याचे उदाहरण देत असतात ; काँग्रेसचा म्हणून जो कांही विचार कोट करतात तोही कुणा तरी गांधी किंवा नेहरु यांचाच असतो . सत्तेची ‘मांडवली’ करण्यात काँग्रेसचे नेते माहीर असतात . भारतीय जनता पक्षातील मूळ नेते आणि कार्यकर्त्यांचे तसे नाही असा त्यांचा दावा असतो . त्यांच्याकडे म्हणे प्रखर राष्ट्रभक्तीचा संस्कार असतो , त्यागाने त्यांची पोतडी गच्च भरलेली असते शिवाय ते एकजात रामाचे भक्त असतात म्हणून ते आणि त्यांचा पक्ष ‘डिफ्रंट’ असतो .

‘पार्टी वुईथ डिफ्रंट’ असल्याने खरे तर , भारतीय जनता पक्षाने सत्ताप्राप्ती आणि आमदार/खासदार फोडण्यासाठी काँग्रेसी वाट न निवडता त्यांच्या कथित राष्ट्रवादाने प्रेरित असणारे मार्ग शोधायला हवे होते पण, तसे घडतांना दिसत नाही . या बाबतीत ते कॉंग्रेसने आखून दिलेली तीच मळकी वाट चोखाळत , त्याच वाटेवरुन चालत आहेत  . म्हणूनच म्हटले हे दोन्ही पक्ष ‘सत्तातुराणां न भयं न लज्जा’ या बाबतीत एकाच  माळेचे  मणी आहेत .

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

9822055799
Previous articleसोहाचे मनस्वी आत्मकथन – दि पेरील्स ऑफ बीइंग मॉडरेटली फेमस …
Next articleगांधीजी आणि फोमो
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.