सत्य असत्यासि मन करा ग्वाही…

-सारंग दर्शने

मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांची राज्य सरकारने तडकाफडकी केलेली बदली धक्कादायक आहे. त्यांना आता पाणी पुरवठा खात्यात पाठविण्यात आले आहे. त्यांच्या बदलीचे कारण, त्यांनी गांधींबाबत केलेले ट्वीट आहे. या ट्वीटचा अर्थ काय, अशी विचारणाही आता त्यांच्याकडे सरकारने कारणे दाखवा नोटीस बजावून केली आहे. निधी यांनी ट्वीट केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे सदाहरित जाणते राजे शरद पवार यांनी टीकेचा आसूड ओढला होता. त्यांच्या या संदेशाची योग्य ती दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ्यांनी मुंबईत निदर्शने केली. निषेध केला. विषय फारसा तापायच्या आतच राज्य सरकारने निधी चौधरी यांना शिक्षा देऊन टाकली…

निधी चौधरी या खरोखर गांधीद्वेष्ट्या आहेत का, त्यांचा पूर्वेतिहास काय आहे, त्या सोशल मिडियावर अशा का व्यक्त होत आहेत, याची खातरजमा करण्याची कोणीही तसदी घेतली नाही. ‘कुत्र्याला आधी वेडे ठरवा आणि गोळ्या घाला..’ या अर्थाची जी इंग्रजी म्हण आहे, त्यानुसार त्यांना जंगली न्याय देण्यात आला आहे. त्यांची शिक्षारूपी बदली केवळ याच कारणाने झाली असेल तर त्यांच्यावर तो अन्याय तर आहेच, पण त्यांच्यावर ठेवला गेलेला नैतिक ठपका अधिक मानहानिकारक, कोणत्याही संवेदनशील माणसाचे मन मोडून टाकणारा आहे..

काय ट्वीट केले होते निधी चौधरींनी? गोडसेभक्तांचा देशभर जो धुमाकूळ चालू आहे, त्यामुळे व्यथित होऊन त्यांनी उपहासात्मक म्हणजेच व्यंगात्मक टिपणी केली. त्या लिहितात, ‘वा, दीडशेव्या जयंतीचे काय अजब सोहळे चालू आहेत! आता त्यांचे नोटेवरचे चित्र काढून टाका. जगातील त्यांचे सगळे पुतळे काढून टाका आणि त्यांचे नाव असणाऱ्या संस्था आणि रस्ते यांची नावेही बदलून टाका. आपल्या सर्वांकडून हीच त्यांना खरी श्रद्धांजली होईल. ३० जानेवारी, १९४८ साठी, गोडसे धन्यवाद!‘ या मजकुराखाली नथुराम गोडसेचा नव्हे तर बापूंच्या गोळ्यांनी वेध घेतलेल्या निश्चेष्ट देहाचा फोटो निधी यांनी वापरला आहे. निधी चौधरी यांच्या या लेखनातील व्यंजना आणि वेदना कोणत्याही संवेदनशील माणसाच्या मनाला व्यथित केल्याशिवाय राहणार नाही. पण सोशल मिडियाचा कोलाहल इतक्या टिपेला गेला आहे की, तेथे लक्षणा काय किंवा व्यंजना काय, यांना काही अवकाशच शिल्लक राहिलेला नाही. तेथे उरली आहे केवळ उग्र, उथळ आणि उठवळ अभिधा.

गांधींचे समर्थक म्हणवले जाणारेही किती आक्रमक आणि अन्याय्य वर्तन करू शकतात, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ज्या रीतीने निदर्शने केली, त्यावरून दिसतेच आहे. हे बापूंना तरी आवडेल का? ‘सत्याचा शोध’ न घेता कुणाला तरी आरोपी व गुन्हेगार ठरवून असा छळ करणे, हे कोणत्या सामाजिक नीतिमत्तेत बसते? शरद पवार यांनी तर मुख्यमंत्र्यांना थेट पत्रच लिहिले आणि या राष्ट्रीय प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले. जरा खोलात जाऊन, पडताळून पाहण्याचीदेखील उसंत या कोणी दाखवली नाही. यावर कडी राज्य सरकारने केली. शरद पवार यांची अत्यंत उथळ आणि असत्य तक्रार खरी मानून सरकारने निधी चौधरी यांना लगेच शिक्षा देऊन टाकली. सत्यशोधनाचा आळस केला. अर्थातच, अशी कारवाई होते, तेव्हा निमित्ताइतकीच इतर अदृश्य कारणेही असू शकतात. किंबहुना असतातच. पण त्यांचा विचार न करता समाजापुढे जे आले, ते तसे मानून विचार करायला हवा.

या निधी चौधरी (यांचा प्रस्तुत लेखकाशी दुरान्वयेही परिचय अथवा संबंध नाही.) मूळ राजस्थानातील आहेत. त्या स्वच्छ, नेक अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. आपल्या ट्वीटवरून गदारोळ होताच, त्यांनी ते काढून टाकले. मात्र, नंतर त्यांनी आपल्या अनेक जुन्या ट्वीट सर्वांसाठी क्रमाने टाकल्या, तेव्हा त्यांची गांधीभक्ती, गांधीनिष्ठा पाहून कोणालाही सुखदाश्चर्य वाटेल. आजच्या तरुण पिढीपर्यंतही बापूंचे अपील कसे टिकून आहे, हे त्यांच्या या अनेक ट्वीटमधून दिसते. यंदाच १७ मे रोजी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले होते, सोशल मिडियावर ज्या प्रकारे नथुराम गोडसे यांचा उदो उदो चालला आहे, ते पाहून असे वाटते की, जणू तोच हुतात्मा असावा आणि गांधीच त्याचे मारेकरी असावेत! दोन ऑक्टोबर १६ ला गांधी सिनेमा पुन्हा एकदा पाहून त्यांना अल्बर्ट आइन्स्टाइनच्या जगविख्यात उदगारांचे स्मरण होते. निधी यांनी देशभर गांधीधाम यात्रा तर केली आहेच, पण दर दोन ऑक्टोबरला गांधी चित्रपट पाहण्याची आपली सवय आपल्या मुलालाही लावली आहे.

हे सगळे हा गोंधळ झाल्यावर निधी यांनी स्वत:च लिहिले आहे. कोणत्याही निरपराध व्यक्तीवर असा खुलासा करण्याची वेळ येणे, हे किती दुर्दैवी आहे! ‘तुम्ही मला समजताय, तशी मी नाही. माझे ऐकून तरी घ्या…’ हा निधी चौधरी यांचा हा आक्रोश बापूंच्या देशात कुणालाही लाज वाटावी, असा आहे. आमचे राजकीय नेते होत्याचे नव्हते करून किंवा असत्याचे पर्वत उभे करून आपल्या राजकारणाची निमित्ते का शोधत आहेत? मोठे, देशव्यापी, समाजाच्या हिताचे सारे प्रश्न संपले आहेत का? म्हणून त्यांना असली निमित्ते काढून समाजात असंतोष माजवावा लागत आहे का? राज्य सरकारनेही खंबीर राहून या राजकारणाचा पर्दाफाश करण्याची तयारी दाखवली नाही. ते निधी यांची बदली करून रिकामे झाले.. जाऊ दे.. कटकट नको…

या सगळ्या प्रकरणाचा एक अदृश्य व्यत्यास म्हणजे, निधी यांच्यावर कारवाई झाल्याचा खऱ्या गोडसेभक्तांना होऊ शकणारा आनंद! कारण, निधी यांचे रूप गोडसेभक्तीशी जुळणारे नाहीच..

ते निखळ गांधीवादी आहे…

या निमित्ताने एक झाले… स्वघोषित गांधीभक्त आणि गोडसेभक्त यांची अशी अनोखी एकी होऊन त्यांचे टार्गेट एकच झाले.
एक निष्पाप आयएएस अधिकारी…
या दोघांचाही असा आसुरी विजय होताना निधी यांच्या जोडीला असतील बापू.
निधी यांनी त्यांची साथ कधी सोडू नये,
ते रस्ता दाखवत राहतीलच…

(लेखक ‘महाराष्ट्र टाइम्स’ चे सहायक संपादक आहेत) 

Previous articleगोडसेभक्ती आता मुख्य प्रवाहात
Next articleओबीसी चळवळ मेलेली आहे, तिला काहीही भवितव्य नाही
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here