सनातन्यांना आताच आवरायला हवं!

हिंदू धर्मरक्षणाचा ठेका आपल्याकडेच आहे, अशा भ्रमात राहणारी काही माणसं जाणिवपूर्वक चुकीचा प्रचार करून बहुजन समाजातील माणसांची माथी कशी भडकवितात, याचा प्रत्यय सरलेल्या आठवड्यात अमरावतीकरांना आला. सनातन संस्था व हिंदू जनजागृती समिती या उघडपणे चातुर्वण्याचा पुरस्कार करणार्‍या आणि दहशतवादी कारवायांमध्ये हात असणार्‍या संघटनांनी शहरातील इतर काही संस्था-संघटनांना सोबत घेऊन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची व्याख्यानमाला होऊ न देण्यासाठी जबरदस्त दबावतंत्राचा वापर केला. समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव हे हिंदू धर्माच्याविरोधात बोलतात. आमच्या श्रद्धास्थानांबाबत अवमानजनक मांडणी करतात, त्यामुळे त्यांना जिल्ह्यात पाय ठेवू देऊ नये आणि त्यांना कुठेही कार्यक्रम घेण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी या संघटनांनी पोलिसांकडे केली होती. 

 
या दबावाला बळी पडून पोलिसांनी पहिल्या दिवशी व्याख्यानमालेचा प्रचार करणार्‍या अंनिसच्या ऑटोंना परवानगी नाकारली. एवढंच नव्हे, तर प्रा. मानव यांना आक्षेपार्ह व कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणारं काही बोलल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, अशी नोटीस बजावली. सनातन संस्था व हिंदू जनजागृती समितीने याअगोदरही ठिकठिकाणी अंनिस व पुरोगामी चळवळीतील प्रबोधनाचे कार्यक्रम यापद्धतीने खोट्या तक्रारी करुन उधळून लावले आहेत. येथे अमरावतीत मात्र काहीही झालं, पोलीसांची परवानगी असली किंवा नसली तरी व्याख्यानमाला होणारचं, असे अंनिसने ठणकावून सांगण्यासोबतच संभाजी ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद या संघटनांनी पाहून घेण्याचा इशारा दिल्याने पोलीस नरम पडले व प्रचंड प्रतिसादात व्याख्यानमाला यशस्वी पार पडली.

सनातन्यांचा इरादा अमरावतीत यशस्वी झाला नसला तरी या प्रकरणातून पुरोगामी संस्था-संघटनांनी सावध होण्याची गरज आहे. पोलिसांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या डझनभर संघटनांपैकी काही संघटनांची नावं आश्‍चर्यात टाकणारी होती. महानुभाव पंथ, छावा संघटना, गायत्री परिवार अशा संघटनेच्या पदाधिकार्‍यांची सनातन्यांनी हिंदू धर्मरक्षणाच्या नावाखाली दिशाभूल केल्याचे स्पष्ट दिसत होते. या संघटनांचे जे पदाधिकारी निवेदन देणार्‍यात आघाडीवर होते त्यातील बरेच जण बहुजन समाजातील, अठरा पगड जातीतील माणसं आहेत. असे असतांनाही ज्यांनी वर्षानुवर्ष जातीव्यवस्थेच्या नावाखाली सर्व प्रकारचं शोषण केलं, अशांच्या नेतृत्वाखाली ती माणसं गाडगेमहाराजांचा वारसा चालविणार्‍या अंनिसच्या प्रबोधनकारी चळवळीला विरोध करतात, यावरून त्यांच्या डोक्यात सुनियोजित पद्धतीने येथील जुनीच व्यवस्था कशी उत्तम होती हे पेरण्यात आलं आहे, हे सहजपणे कोणाच्याही लक्षात येते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा गेल्या ३0 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड तपासला, तर समिती व तिचे पदाधिकारी कुठेही, कोणत्याही धर्माच्या विरोधात मांडणी करत नाही, हे सार्‍यांनाच माहीत आहे. अंनिसमध्ये आततायी मांडणीला जागाच नाही. ‘आमचा देवा-धर्माला विरोध नाही. मात्र देवाधर्माच्या नावावर सामान्य जनतेला लुबाडणार्‍या, फसविणार्‍या, लैंगिक शोषण करणार्‍या तथाकथित तांत्रिक-मांत्रिक, बुवा-बाबा, देवी-देवता या भोंदूच्या विरोधात आमची लढाई आहे’, ही अंनिसची अधिकृत भूमिका आहे. या भूमिकेनुसार अंनिसने आतापर्यंत हजारो बुवा-महाराजांचे बुरखे फाडले. त्यांचा भंडाफोड केला. हे करतानाही त्यांनी कोणा व्यक्तिला टारगेट केले नाही. संबंधित बुवा-महाराज जी फसवणूक करतो, ती त्यांनी फक्त जगजाहीर केली. हे करतांना आसारामबापूसारख्या ज्यांचे पराक्रम सार्‍या जगाला माहीत झाले आहेत यांच्याबद्दल किंवा बहुजन समाजातील तरुणांना ‘ह्यूमन बॉम्ब’ बनविणार्‍या सनातनच्या डॉ. जयंत बाळाजी आठवलेंच्या प्रतापाबद्दल खरी माहिती दिली, तर ज्याचं खरोखर धर्मावर प्रेम आहे, त्यांना वाईट वाटायचं काहीही कारण नाही. या दोघांचंही जे काही साहित्य उपलब्ध आहे त्यातून ही माणसं समाजाला कुठल्या दिशेला नेऊ इच्छितात, हे अगदी स्पष्ट दिसते. (उत्सुकता असणार्‍यांनी ‘सनातन प्रभात’ हे दैनिक, मासिक व आसारामबापूंचे ‘महान नारी’ व इतर पुस्तक अवश्य वाचावीत.)

अशा बुवा-महाराजांबद्दल जागृत करण्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम हे खरं तर धर्मशुध्दीचं काम आहे. हिंदू धर्मातील ज्या दोषांमुळे एक मोठा समाज धर्मापासून दूर गेला आहे, ते दोष दूर करण्याचा, ती मानसिकता बदलविण्याचा प्रय▪अंनिस करत आहे. खरं तर या प्रयत्नाबद्दल सर्वांनी कृतज्ञ असायलं हवं. मात्र ज्यांच्या वर्षानुवर्षाच्या दुकानदार्‍या या प्रबोधनाच्या कामामुळे धोक्यात येतात, त्यांना हे होऊ देणं सोयीचं नाही. या लोकांची येथील लोकशाहीवर, येथील संविधानावर श्रद्धा नाही. त्यांचं संविधान मनुस्मृती आहे. त्यांना पुन्हा एकदा चातुर्वण्यावर आधारित व्यवस्था आणायची आहे. प्रश्न फक्त हा आहे की, आपण हे होऊ देणार का? ज्ञानेश्‍वर, तुकाराम, कबीर, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज अशा अनेक संत व समाजसुधारकांनी भरपूर हालअपेष्टा सहन करून व्यवस्था बदलण्यासाठी जीवाचं जे रान केलं, त्यांची मेहनत पाण्यात घालणार का? काळाची काटे उलटे फिरविणार्‍यांना आताच रोखलं पाहिजे. किमान गाडगेबाबा, तुकडोजी महाराज व डॉ. पंजाबराव देशमुखांच्या जिल्ह्यात या प्रवृत्ती पुन्हा डोकं वर काढणार नाही, यासाठी आपण सार्‍यांनीच कंबर कसली पाहिजे.

(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत)

भ्रमणध्वनी-८८८८७४४७९६

Previous articleनिजामाच्या चित्तरकथा
Next articleभारतीयांना नवजीवन बहाल करणारा मान्सून
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here