सनातन संस्था ही हिंदू तालिबान

 

सनातन मुख्यालयातील आँखों देखा हाल

 जुलै २०१० मध्ये सुप्रसिद्ध धर्मनिरपेक्षतावादी कार्यकर्ते सुरेश खैरनार यांनी सनातन संस्थेच्या गोवास्थित मुख्यालयी अनेक तास घालविले आणि तेथून ते अशी पक्की खात्री करूनच परतले की सनातन संस्था ही आजपावेतो निर्माण झालेल्या हिंदू संघटनांपैकी सर्वाधिक जहाल आणि आक्रमक अशी संघटना आहे. हिंदूंचे तालिबानीकरण करण्यासाठीच ती सातत्याने प्रयत्नशील आहे. या गोवा भेटीनंतर खैरनारांनी ही मुलाखत Communilasm Combat या मासिकाला दिली होती . दाभोळकर व गौरी लंकेश हत्येप्रकरणी सनातनच्या अनेक साधकांना अटक होत असताना आणि सनातन आणि त्या संस्थेची कार्यपद्धती पुन्हा एकदा चर्चेत असताना सुरेश खैरनार यांची ती मुलाखत महाराष्ट्रातील वाचकांसाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत . – संपादक , मीडिया वॉच पब्लिकेशन

  सौजन्य-  Communilasm Combat 

अनुवाद – अखिलेश किशोर देशपांडे

 …………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………

 

प्रश्न:खैरनारसाहेब,  तुम्ही खास सनातन संस्थेच्या कार्यालयाला भेट देऊन त्या संघटनेच्या कार्य आणि उद्दिष्टांबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिताच गोव्याचा विशेष दौरा केलात. आपण असा निर्णय का घेतलात?

उत्तर:- गेली दोनेक वर्षे सनातन संस्था सातत्याने बातम्यांमध्ये आहे. महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने तिला ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये ‘आम्ही पाचपुते’ या नाटकाचा खेळ चालू असताना जो बॉम्बस्फोट झाला त्यासाठी जबाबदार धरले आहे. याच नाटकाचा खेळ चालू असताना अशीच एक घटना पनवेलमध्ये पण आधी घडली होती. तेंव्हाच पहिल्यांदा मी या संघटनेबद्दल ऐकले. त्यानंतर २००९ मधील दिवाळीच्या सुमारास मडगाव मध्ये एक अपघाती स्फोट होऊन दोन माणसे मृत्युमुखी पडली. कुठेतरी बॉम्ब लावण्याचा प्रयत्न करीत असतानाच हा अपघात घडला असे प्रथमदर्शनी आढळून आले. या घटनेनंतर मला गोवास्थित अनेक धर्मनिरपेक्षतावादी कार्यकर्त्यांचे दूरध्वनी आले. काय माहीत पण काही लोकांना असे उगाच वाटते की मी कुठलाही तपास करण्यात अतिशय तज्ञ माणूस आहे. पण त्यावेळी माझ्या अन्य कार्यबाहुल्यामुळे मी जाऊ शकलो नाही. त्यानंतर अगदी आत्ता पंधरवड्यापूर्वी (जुलै २०१० मध्ये) मी वृत्तपत्रांमध्ये सनातन संस्थेचे एक विधान वाचले. त्यामध्ये असा दावा केला गेला होता की त्यांनी (म्हणजेच सनातन संस्थेने) गृहमंत्रालयाकडे माहितीच्या अधिकाराअंतर्गत एक अर्ज करून अशी माहिती मागवली होती की संस्थेला कुठल्या दहशतवादाशी निगडीत बाबींमध्ये गोवण्यात आले आहे काय आणि तसे असेल तर कुठल्या आधारावर? त्या विधानात असाही दावा करण्यात आला की गृहमंत्रालयाने सनातन संस्थेला क्लीनचीट दिली आहे. या बातमीमुळे प्रस्तुत संघटनेबद्दलची माझी उत्सुकता अधिकच चाळवल्या गेली. माझे वास्तव्य असणाऱ्या नागपूर शहरात सनातन संस्थेचे कुठलेच अस्तित्व नसल्याने या घटकाबद्दलची अधिक माहिती मिळविण्याकरिता मी माझ्या गोव्यातील मित्रांशी संपर्क साधला. पण त्यांनी असा आग्रहाच धरला की मी गोव्याचा दौरा करून स्वतःच तपासणी केली पाहिजे. त्यामुळेच मी तयार झालो आणि १९ जुलै २०१० रोजी गोव्याला रवाना झालो. तिथे पोहोचताच मी सरळ सनातन संस्थेच्या ‘रामनाथी’ या मुख्यालयाकडे मोर्चा वळवला. मडगावपासून वीस किलोमीटर अंतरावर चार एकरांच्या भूभागात पसरलेला असा तो परिसर आहे. तेथील स्वागतकक्षापाशी मी माझी खरी ओळख सांगितली आणि त्याचबरोबर माझ्या येथे येण्याचे प्रयोजनदेखील विषद केले. त्याचबरोबर मी सनातन संस्थेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यासोबत भेट घालून देण्याची विनंती केली. मला स्वागतकक्षातच अर्धा तास बसवून ठेवण्यात आले. जवळजवळ पाच-सहाशे चौरस फुटाचा आणि १५ फूट उंच छत असलेला असा तो अतिशय आकर्षक असा कक्ष होता. भिंतीवर सर्वत्र “हिंदूंनो जागे व्हा” आणि “ हिंदुरक्षणासाठी प्रतिबद्ध राहा” अशा आशयाच्या घोषणा असलेली पत्रके, हिंदी व मराठी भाषेत लावलेली होती. ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्यावर निशाणा साधून हल्लाबोल करणाऱ्या अत्यंत चिथावणीखोर अशा अनेक घोषणा होत्या.

 

प्रश्न:- यासंदर्भात आपण काही उदाहरणे देऊ शकता?

उत्तर:– हो, बिलकूल. “गोव्यातील ख्रिश्चनांनी हिंदूंवर चालविलेल्या अत्याचार आणि दडपशाहीविरोधात आवाज उठविलाच पाहिजे.”, “बघा जगभरात मुसलमान काय थैमान घालताहेत.” इत्यादी इत्यादी.

प्रश्न:- पुढे काय झाले?

उत्तर:- पुष्कळ वेळ वाट पाहिल्यानंतर संस्थेचे मुखपत्र असलेल्या ‘सनातन प्रभात’ चे मुख्य संपादक श्री. पृथ्वीराज हजारे मला भेटायला आले. सनातन प्रभात हे मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये प्रकाशित होते. नुकतेच त्यांनी याच नावाचे एक दैनिक वृत्तपत्र देखील सुरु केले आहे. जेंव्हा मी वाट पाहत थांबलो होतो तेंव्हा मी त्यादिवशीच्या सनातन प्रभातचा अंक चाळला. ‘हिंदुंवरील अत्याचारांना वाचा फोडून त्याविरोधात निषेध नोंदविणारे वृत्तपत्र’ या शब्दांत त्याचे ध्येय उघडपणे विषद केले होते. मला अत्यंत आश्चर्य वाटले की नेहमीच्या राजकीय घडामोडी, भाववाढ, बेरोजगारी, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असणाऱ्या कुठल्याही समस्येवर त्या चार पानांच्या वर्तमानपत्रात एकही बातमी नव्हती. सर्वच्या सर्व बातम्या या फक्त हिंदुंवरील अत्याचाराशी निगडीत होत्या.

प्रश्न:उदाहरणार्थ?

उत्तर: ‘हिंदू मुलीची छेडखानी केल्याबद्दल मुस्लीम युवकांना दिग्रसमध्ये( गोव्यापासून शेकडो किलोमीटर दूर असणारे महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील एक छोटे गाव) धोपटून काढण्यात आले.’ बाकीच्या सर्व बातम्या यादेखील हिंदू-मुस्लीम किंवा हिंदू-ख्रिश्चन तणाव अथवा संघर्ष ठळकपणे अधोरेखित करणाऱ्या होत्या. बातम्यांमध्येच “अजून किती दिवस हिंदू आपल्यावरील अत्याचार सहन करत राहणार?”, “अजून किती दिवस हिंदू आपल्या स्त्रियांची होणारी बेअब्रू सहन करत राहणार?” अशा आशयाच्या संपादकीय टिप्पण्या घुसडलेल्या होत्या. या टिप्पण्या मूळ बातमीच्या मजकुरापेक्षाही अधिक मोठ्या व ठळक अक्षरात छापलेल्या होत्या. मी हजारेंना ‘ऑल इंडिया सेक्युलर सिटीझन्स फोरम’ चा राष्ट्रीय निमंत्रक अशी स्वतःची ओळख करून दिली. सनातन संस्थेला दहशतवादी कारवायांच्या संदर्भात गृह मंत्रालयाने क्लीनचीट दिल्याची बातमी खरी आहे काय असे मी त्यांना विचारले असता त्यांनी होकारात्मक प्रतिसाद दिला. मी त्यांना सरळच विचारले की ठाणे-पनवेल येथील बॉम्बस्फोट आणि गोव्यातील अपघाती स्फोटांमध्ये संस्थेवर अधिकृतपणे ठपका ठेवण्यात आल्यानंतरही हे कसे काय शक्य झाले तर त्यावर ते म्हणाले की गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात असे निवेदन दिले आहे की सनातन संस्थेचा अतिरेकी कारवायांशी कुठलाच संबंध नाही. त्यांनी असाही दावा केला की आजतागायत सनातन संस्थेच्या कोणत्याही कार्यकर्त्याला न्यायालयात शिक्षा ठोठावण्यात आलेली नाही. त्यानंतर त्यांना मी सनातन संस्थेचा इतिहास, तिची उद्दिष्टे व कार्यपद्धतीबद्दल विचारले असता ते म्हणाले की डॉ. जयंत आठवले नामक व्यावसायिक पातळीवर कार्यरत असणाऱ्या मुंबईतील एका मानसोपचार तज्ञाने ती स्थापन केली आहे. तेथे उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीकडे अंगुलीनिर्देश करीत ते म्हणाले की अणुबॉम्ब, लढाऊ विमाने, संगणक यांसारख्या आधुनिक वैज्ञनिक शोध म्हणविल्या जाणाऱ्या गोष्टींचा उल्लेख आपल्या हिंदूंच्या पुरातन धर्मग्रंथांमध्ये कसा सापडतो आणि हे सारे कसे आपल्या ऋषीमुनींना अगोदरच माहीत होते या गोष्टी साबित करण्याचे श्रेय त्यांना पहिल्यांदा जाते. दुसऱ्या शब्दांत परकीय आक्रमकांनी हल्ले करून आपले पूर्वसंचित नष्ट करण्याअगोदर भारत हे एक अतिशय प्रगत सभ्यता व संस्कृती असलेले राष्ट्र होते. डॉ. आठवलेंच्या तेथे उपस्थित ‘त्या’ आदरकर्त्यामुळेच गोवा हे आम्ही आपले मुख्यालय म्हणून निवडले. तत्पूर्वी, मी जेव्हा हजारेंची वाट पाहत बसलो होतो तेंव्हा स्वागतकक्षातील प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या काही पुस्तकांच्या खटकणाऱ्या शीर्षकांनी माझे लक्ष वेधून घेतले. ‘दागिन्यांचे महत्व’, ‘दागिने आपल्या शरीराला कसे प्रभावित करतात’, ‘आपला पेहराव आणि खानपानाच्या सवयी आपल्या मानसिक प्रक्रियांना कशा प्रभावित करतात’, यांसारखी शीर्षके असलेली ती पुस्तके आणि पुस्तिका तर मला बुद्धीनियंत्रणाचा प्रयत्न करण्यासाठी वापरात आणण्यात येत असलेली हत्यारेच वाटत होती. गंमत म्हणजे डॉ. आठवले देखील संमोहनविद्येवर कार्यशाळा आयोजित करण्यासाठी प्रख्यात आहेत. सध्या तर सनातन संस्थेसाठी ते  केवळ डॉक्टर नसून ‘परमपूज्य परमहंस’ आहेत. मी जेव्हा हजारेंशी बोलत होतो त्यावेळी मला असे लक्षात आले की संस्थेच्या भव्य परिसरात अनेक परदेशी लोक विशेषतः परदेशी महिला भारतीय वेषांमध्ये वावरत आहेत. विचारपूस केली असता मला असे सांगण्यात आले की ही लोकं सनातन संस्थेच्या साहित्याने प्रभावित होऊन हिंदू जीवनपद्धती आणि अर्चनापद्धतीचे शिक्षण घेण्यासाठी येथे स्वतःहून आलेली आहेत. सनातन संस्थेचे जगभरात १,३१५ केंद्र आहेत असा दावादेखील हजारे यांनी केला.

प्रश्न:पण मग अशा परिस्थितीत सनातन संस्था आणि तिचे नेते डॉ. आठवले यांना आपण प्रचंड मोठा परदेशस्थ भक्तपरिवार लाभलेल्या सध्याच्या नव्या युगातील अध्यात्मिक गुरूंच्या मांदियाळीत नाही बसवू शकत काय?    

उत्तर:– अजिबात नाही. माझ्या मते सनातन संस्था ही मला आजपर्यंत ठाऊक असणाऱ्या सर्व हिंदू संघटनांपैकी सर्वात जज्ज्वजहाल आणि आक्रमक अशी संघटना आहे. निश्चितच गेल्या काही दशकांमध्ये असे अनेक साधू, महंत आणि महाराज होऊन गेलेत ज्यांनी भारताच्या ‘हिंदुकरणात’ आपापला वाटा उचलला आहे.(जसे मुसलमानांचे पद्धतशीर ‘इस्लामीकरण’ घडवून आणण्यात आले त्याचप्रमाणे). परंतु माझ्या आयुष्यात जे काही तथाकथित हिंदू अध्यात्मिक नेते आणि गट माझ्या पाहण्यात आले त्यापैकी सनातन संस्था ही सर्वाधिक आक्रमक आहे. ती एका तऱ्हेची ‘हिंदू तालिबान’च आहे.

प्रश्न:- पण तुम्ही असे कशाच्या बळावर म्हणता?

उत्तर:– गोव्यातील ‘रामनाथी’ आश्रमात त्यांचे जे काही लिखित साहित्य माझ्या पाहण्यात आले, जे काही त्यांच्या कार्यपद्धतीचे मी निरीक्षण केले आणि तसेच त्यांच्या झपाट्याने झालेल्या विस्ताराकडे पाहू जाता मी हे विधान काळजीपूर्वक करतो आहे. अशी अन्य कुठलीही संघटना माझ्या माहितीत नाही जी केवळ १७ वर्षांमध्ये एवढया झपाट्याने फोफावली असेल. ही संघटना १९९३ मध्ये स्थापन झाली आणि बघता बघता २०१० मध्ये तिचे मुखपत्र पाच वेगवेगळ्या ठिकाणांवरून विविध भाषांमध्ये प्रकाशित काय होते, ती स्वतःचे दैनिक वर्तमानपत्र काय चालवते, शेकडो पुस्तके आणि पुस्तिका छापण्याबरोबरच राष्ट्रव्यापी अस्तित्व असल्याचा दावा सुद्धा करते. या सगळ्या गोष्टींमधून नेमकं काय दिसून येते?

प्रश्न:तुम्ही संघ परिवाराबद्दल देखील असेच म्हणाल काय?

उत्तर:– नाही, मी तसे नाही म्हणणार. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमधेच राहतो. त्यांनी नवीन काय प्रकाशित केले आहे, कुठले नवे कृती कार्यक्रम योजिले आहेत याचा मागोवा घेण्यासाठी मी नेहमीच संघाच्या मुख्यालयात जात-येत राहतो. संघाचे लिखित साहित्य देखील फार पूर्वीपासून माझ्या परिचयाचे आहे. परंतु आजतागायत मला तेथे असे काहीही आढळले नाही ज्याची तुलना सनातन संस्थेच्या कामाशी होऊ शकेल.

प्रश्न:- पण असे का? गेल्या हजारेक वर्षांपासून हिंदुंवर अन्याय-अत्याचार होताहेत असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील सारखे बोलत नसतो काय?

उत्तर:- बरोबर ते तसे म्हणतातच पण अतिशय आडून आडून शब्दच्छल करत. सनातन संस्था तसे उघड रांगडेपणाने म्हणते. तिला बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे गोष्टी शिंगावर घ्यायला आवडतात. पण या मंडळींच्या तुलनेत ठाकरे अगदीच ‘बाळ’ आहेत. माझ्या मते तर सनातन संस्था ही ठाकरे, प्रवीण तोगडिया, साध्वी ऋतुंभरा यांसारख्या लोकांच्याही कैकयोजने पुढे आहे. लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्या ‘अभिनव भारत’ सारखेच हे एक पूर्णतः स्वंतंत्र असे संघटन आहे. सगळ्यात कळीची आणि अस्वस्थ करणारी बाब म्हणजे एरवी शांत-निवांत भासणाऱ्या गोव्यासारख्या समाजात तिने आपले विशिष्ट असे स्थान निर्माण केले आहे.गोव्यात सनातन संस्थेचा प्रभाव झपाट्याने वाढतो आहे. येत्या काही वर्षांमध्ये सनातन संस्थेने गोव्यामध्ये काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण केली तर मला काहीच आश्चर्य वाटणार नाही. गमतीचा भाग म्हणजे त्यांचे सुरुवातीचे मुख्यालय पनवेल येथे होते जेथून ते गोव्याला हलविण्यात आले.

प्रश्न:हे स्थलांतर म्हणजे तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक आणि विचारांती  केलेली एक चाल वाटते काय?

उत्तर:– यात काहीच शंका नाही. गोव्यामध्ये ख्रिश्चनांची बऱ्यापैकी मोठी संख्या असल्याने व त्यातील बहुतांश सुखवस्तू असल्याकारणाने ते आपल्या ‘शत्रूपक्षाचे’ आहेत असे हिंदूंना समाधानकारकपणे पटवून देणे तुलनेने सोपे आहे. मी हजारेंना विचारलेच की सनातन संस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात नेमका काय फरक आहे. ते म्हणाले की आमचे प्रयत्न हे एकापरीने एकमेकांना पूरक असे आहेत आणि आम्ही त्यांच्याकडे प्रतिस्पर्धी म्हणून पाहत नाही. संघटनात्मकदृष्ट्या ते कुठे संघाशी जुळले आहेत का असे विचारले असता हजारे म्हणाले की, नाही. सनातन संस्था हा पूर्णतः स्वतंत्र असा पुढाकार आहे. स्वागतकक्षात मी जे दोनेक तास घालवले त्यादरम्यान माझ्या अवतीभवती वावरणाऱ्या १५ लोकांची तरी मी दखल घेतली. त्यानंतर मला दुपारच्या जेवणासाठी आमंत्रित करण्यात आले आणि पहिल्या मजल्यावरील भोजनगृहात नेण्यात आले. तेव्हा माझ्या ध्यानात आले की जवळपास तीनचारशे लोक वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आपापल्या कामात व्यग्र आहेत. त्या जागेत भरून राहिलेल्या सर्वव्यापी शांततेमुळे, तेथे वावरणाऱ्या लोकांच्या एकूणच संमोहनावस्थेमुळे मी थक्कच झालो. कुठलेही हास्यविनोद नाहीत, हलकेफुलके संवाद नाहीत, काही कुठे खिदळणे नाही, काहीच नाही. जणू तिथे असलेला प्रत्येकचजण एका कुठल्यातरी हेतूने अथवा ध्येयाने भारलेला/भारावलेला आहे. मला तो परिसर दाखविण्यात आला आणि काही लोकांशी ओळख करून देण्यात आली. तिथे एकजण अशीही होती की तिने गोवा विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आणि सनातन संस्थेत भरती झाली. एक संगणक अभियंता होता ज्याने आपली नोकरी सोडली होती. एक सनातन संस्थेचा बांधकाम अभियंता होता ज्याने इथे येण्यासाठी आपले पूर्वीचे ज्येष्ठ नागरी अभियंत्याचे पद सोडले होते.

प्रश्न:पण त्यांनी असे कशासाठी केले?

उत्तर:- मला असे सांगण्यात आले की ज्याप्रमाणे मुसलमान आणि ख्रिश्चन आपापल्या धर्माची सेवा करतात त्याचप्रमाणे ते येथे हिंदू धर्माची सेवा करण्यासाठी आले आहेत. मला असेही सांगण्यात आले की लोकांना आमच्या संघटनेत येऊन आत्मसमाधानाची प्रचिती येत असल्याकारणानेच आमचा संदेश सगळीकडे वेगाने पसरतो आहे. तरीही या वरवरच्या भूलथापांना बळी न पडता माझी अशी पक्की खात्री झाली की जर्मनीतील नाझी राजवटीने आणि त्याचप्रमाणे सोविएत रशियातील कम्युनिस्ट राजवटीने जे केले त्याचाच कित्ता गिरवत डॉ. आठवले हे मानवी जाणीवेबद्दलच्या आपल्या आकलनाचा उपयोग करून बुद्धीनियंत्रणाचे प्रयोग करीत आहेत. सध्याच्या पिढीला भावेल अशा पद्धतीने विज्ञान आणि अध्यात्म यांचे वैशिष्ट्यपूर्ण असे संमिश्रण साधण्याचा प्रयत्न केला जातोय.

प्रश्न:- परंतु सनातन संस्था करीत असलेला हिंदू कर्मकांड आणि अध्यात्माचा प्रचार आणि त्यांना ज्या दहशतवादी कारवायांसाठी जबाबदार धरण्यात आले आहे यांच्यात तुम्ही जो संबंध जोडू पाहताय तो अजूनही नीटसा उलगडत नाहीये. तुम्ही त्यांना संघ परिवारापेक्षादेखील अधिक घातक असे म्हणताहात, त्यांना ‘हिंदू तालिबान’ असे संबोधताहात. तुम्ही जरा अतिसंवेदनशील होऊन जास्तीचीच प्रतिकिया देण्याची आगळीक तर नाही करीत आहात ना?

उत्तर:– हे बघा मी गेल्या चाळीस वर्षांपासून सातत्याने सामाजिक कार्यात आहे. आणि १९८९ साली झालेल्या बिहारमधील भागलपूर दंगलींपासून तर मुख्यत: जमातवाद हाच गेली वीस वर्षे माझ्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय राहिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, जमाते-इस्लामी, मुस्लीम लीग, यांसारख्या जमातवादी संघटनांच्या साहित्याचा अभ्यास करण्याबरोबरच मी जे काही हिंदू आणि मुस्लीम जमातवादाबद्दल वाचले आहे, ऐकले आहे, अनुभवले आहे आणि झायोनिझम, तालिबान यांबद्दलचे माझे जे काही आकलन आहे त्यावरून मी निश्चितच असे म्हणू शकतो की सनातन संस्थेची आपली स्वतःची एक वेगळी ओळख आणि स्वतःचा एक वेगळा दर्जा आहे. ज्या गतीने ती गेल्या फक्त सतरा वर्षांमध्ये विस्तारली आहे, सनातन संस्थेच्या परिसरात असणाऱ्या लोकांची जी एक वैशिष्ट्यपूर्ण देहबोली आहे, ते जे सगळेच जणू एका संमोहानावस्थेत वावरत असतात या साऱ्या बाबी काहीतरी भयावह असे सूचीत करतात. उदाहरणार्थ, मी तेथे एक नीळकंठ नावाचा युवक बघितला ज्याला मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. मला त्याची नजर तर अतिशय अस्वस्थ करून गेली. मी त्याच्यापर्यंत चालत जाऊन त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याच्याशी संपर्क होणे अशक्यच होते. तो म्हणजे जणू काही बाह्यनियंत्रणाखाली असणाऱ्या कळसूत्री बाहुलीसारखा त्याला हाताळणाऱ्यांच्या आज्ञेव्यतिरिक्त अन्य कुठलाच विचार करू न शकणाऱ्या यंत्रमानवाप्रमाणे भासत होता. नीळकंठ म्हणजे मला सनातन संस्थेच्या प्रकल्पाची आदर्श अशी निर्मिती वाटली. राहून राहून मला या गोष्टीचे आश्चर्य वाटत होते की न जाणो किती असे नीळकंठ त्यांनी आपल्या विभिन्न केंद्रांमधून निर्मिले असतील? कुतूहलाची बाब म्हणजे मी अनेकवार विचारणा करून आणि पैसे द्यायची तयारी असल्याचे सांगूनही सनातन संस्थेने आपले कोणतेही लिखित छापील साहित्य घेऊन जाण्यास मला परवानगी दिली नाही. आम्ही आमच्या परिसरात कुठलीही साहित्यविक्री करत नाही असे उत्तर मला मिळाले. मला हे लिखित साहित्य कुठे विकत मिळेल असे विचारले असता जवाब मिळाला की आमचे असे कुठलेही विक्रीकेंद्र नाही. मला फक्त एक साफसूत्री निरुपद्रवी अशी प्रसिद्धीपुस्तिका मिळाली ज्यामध्ये डोळ्यांची शिबिरे यांसारख्या कृतीकार्यक्रमांबद्दल माहिती दिली होती. बहुदा ती खास  हेतूनेच तयार केली होती.

प्रश्न:- हे खूपच कुतूहलजनक आहे. एक संघटना जिची जगभरात शेकडो केंद्रे आहेत, अनेकानेक छापील प्रकाशने, पुस्तके, पुस्तिका, सीडीज आहेत तिने आपल्या छापील साहित्य विक्रीबाबत असे संकोचाने वागणे हे फारच विचित्र आहे.

उत्तर:– आहे की नाही मजेदार? आणखी गमतीदार गोष्ट म्हणजे सनातन संस्थेच्या मुख्यालयातील परिसरात मी १० ते १५ वर्षे वयोगटातील काही लहान मुले पाहिली ज्यांनी सारखाच पोशाख केला होता. सुखवस्तू घरातून आल्यासारखी वाटणारी ती सर्व चटपटीत मुले शेंडी ठेऊन होती. मी हजारेंना त्या मुलांबद्दल विचारले. त्यावर ते म्हणाले की सनातन संस्थेने पुरोहित निर्माण करण्यासाठी ८-१० वर्षांचा पाठ्यक्रम असलेली शाळा सुरु केली आहे. हिंदू उत्सव आणि प्रथा यथासांग पार पाडण्यासाठी पुरोहितांची कमतरता भासायला लागल्यामुळे सनातनने पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरु केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या दाव्यानुसार ती मुले खूप चांगल्या हिंदू कुटुंबांमधील असून त्यांच्या पालकांनी त्यांना पौरोहित्य शिकविणाऱ्या शाळेत टाकायचा निर्णय घेईस्तोवर ही मुले नेहमीच्या शाळांमध्ये उत्तमरीत्या शिक्षण घेत होती. मला असे सांगण्यात आले की आतापर्यंत ११ मुलांची हजेरीपटावर नोंद आहे. कुतूहल चाळवल्याने मी त्यांच्या जातीय पार्श्वभूमीबद्दल चौकशी केली असता मला सांगण्यात आले की त्यातील दहा जण हे ब्राह्मण आहेत तर एक क्षत्रियकुलोत्पन्न आहे. मी त्यावर विचारले की दलित किंवा इतर मागासवर्गीय कुटुंबांमधून कुणी येथे प्रवेश घेऊ शकते काय तर त्यावर हजारे उत्तरले की, बिलकूल, का नाही? सनातन संस्थेला त्याबद्दल काहीच अडचणी नाहीत, पण गरीब कुटुंबांमधून येणारी मुले ही जास्त करियरभिमुख असतात. महिला विद्यार्थ्यांबद्दल काय असे विचारले असता हजारे म्हणाले की, काहीच अडचण नाही आणि सनातन संस्थेच्या परिसरात असणाऱ्या लक्षणीय महिला उपस्थितीकडे त्यांनी लक्ष वेधले.

प्रश्न:- तुम्ही गोव्यातील काही पोलिस अधिकारी, सनदी अधिकारी किंवा राजकारण्यांची भेट घेऊन सनातन संस्थेबद्दल त्यांना काय वाटते यावर चर्चा केली काय?

उत्तर:– नाही. दुर्दैवाने, माझा गोव्यात फक्त एकच दिवस मुक्काम होता आणि इतर मंडळींना भेटण्यासाठी मला वेळच मिळाला नाही. पण सनातन संस्थेच्या मुख्यालय भेटीनंतर मी गोव्यातील विविध जातीधर्माच्या गटातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या जागेबद्दलच्या आणि तेथील लोकांबद्दलच्या माझ्या अनुभवांची मी त्यांच्याशी देवाणघेवाण केली. त्याचबरोबर मला वाटणारी ही चिंतापण व्यक्त केली की येत्या काही दिवसात कदाचित सनातन संस्था गोव्याचे रूपांतर काश्मीरसारख्या संघर्षक्षेत्रात करेल. पण या कार्यकर्त्यांना सनातन संस्थेबद्दल फारच थोडी माहिती आहे; त्यांच्यापैकी कोणीही आजतागायत रामनाथी आश्रमाच्या परिसरात जाऊन आलेले नाहीत. माझा असा अंदाज आहे की सनातन संस्थेचे नाव बॉम्बस्फोटांशी जोडण्यात आल्यानंतर ते भेट देण्याबाबत अधिकच साशंक झाले असावेत.

प्रश्न:थोडक्यात तुमचे सनातन संस्थेचे आकलन काय?

उत्तर:– फॉसिझमविषयीच्या माझ्या आकलनाच्या आधारे मी असे निःशंकपणे म्हणू शकतो की हे एक fascist संघटन आहे. तेथे असणारी बुद्धीनियंत्रणाची योजना, मी तेथे पाहिलेल्या आणि भेटलेल्या लोकांचे संमोहनावस्थेत असणे, त्यांची देहबोली, त्यांच्या नजरेतील भाव, त्यांची उत्तेजित अवस्था या सर्व गोष्टी मला हिटलरच्या जर्मनीतील स्टोर्म स्त्रूपर्स (एस.एस.) या संघटनेच्या कार्याची आठवण करून देत होत्या. मी हिंदू आणि मुस्लीम जमातवादी संघटनांच्या अनेक उत्तेजित तरुणांना भेटलो आहे. पण इथे काही तरी भलतेच अनिष्टसूचक आहे. मी तर असे म्हणेल की मी रामनाथीमध्ये सामान्य मर्त्य माणसे बघितलीच नाहीत. त्याऐवजी, कुठल्यातरी भयंकर अशा भव्य कारस्थानासाठी घडविण्यात येणारे मातीचे गोळे असेच मला ते सगळे भासले.

प्रश्न:तुमच्यामते सनातनची शिवसेना किंवा बजरंग दल यांच्याशी काही तुलनाच नाही होऊ शकत. नाही?

उत्तर: – अगदी बरोबर. उदाहरणार्थ आपल्या कार्यकर्त्यांच्या फौजेची वैचारिक जडणघडण करू शकेल असे कुठलेच साहित्य शिवसेनेजवळ नाही. अगदी संघालासुद्धा लिखित साहित्याद्वारे आपल्या कार्यकर्त्यांच्या बुद्धीनियंत्रणात फार काही रस नाही. शाखेवर आणि शिशु मंदिरांमध्ये चालणारा प्रचार हा त्यांच्या उद्दिष्टपूर्तीच्या हेतूने पुरेसा आहे. पण सनातन संस्थेच्या बाबतीत सारेच काही वेगळे आहे. इथे म्हणजे अतिशय योजनाबद्धरीत्या आखलेली सर्वव्यापी किंवा सर्वंकष अशी बुद्धी-नियंत्रणाची विशिष्ट पद्धती अत्यंत विचारपूर्वक राबविण्यात येत आहे. त्यांच्या वाढविस्ताराचा आवाका तर धोक्याची घंटा वाजवतो आहे माझ्या डोक्यात. त्यांच्या दाव्यानुसार ते गोवा, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीचा भाग आणि कर्नाटकात  झपाट्याने विस्तारताहेत.

प्रश्न:- संघ परिवाराच्या हिंदू राष्ट्राच्या ध्येयात सनातन संस्था देखील सहभागी आहे काय?

उत्तर:- अर्थात. हे तर उघडच दिसणारे वास्तव आहे. गोव्याच्या मंत्रिमंडळातील त्या एका मंत्र्याचे नाव मला आत्ता आठवत नाहीये ज्याची बायको ही सनातन संस्थेची स्वयंसेविका आहे आणि त्यांच्या मुख्यालयात जिचे नियामित येणे-जाणे चालू असते.

प्रश्न:- तर येणाऱ्या दिवसांमध्ये सनातन संस्थेबद्दल नक्की काय आडाखे बांधता येतील?

उत्तर:– बघूयात. ठाणे, पनवेल आणि मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून नक्की काय हाती लागतेय ते. कदाचित ते जरा घसरले असतील, त्यांनी काही चुका केल्या असतील आणि आगामी काळात ते आपल्या व्यूहरचनेत काही बदल देखील करू शकतात. विशेषतः गोव्यातील लोकसंख्याविषयक सामाजिक रचनेचा पुरेपूर फायदा उठविण्याचा त्यांचा जो प्रयत्न चालला आहे त्यामुळे मी जास्त चिंतीत आहे.

प्रश्न:असे दिसून येत आहे की सनातन संस्थेला साधन-सामग्रीचा कुठलाच तुटवडा नाहीये.

उत्तर:- हा चांगला प्रश्न विचारलात. याबद्दल मी हजारेंना विचारले होते. पण त्यावर ते म्हणाले की संस्थेच्या वित्त आणि लेखाविषयक बाबींशी त्यांचा कुठलाच संबंध नाहीये.

प्रश्न:- आपणास आणखी काही सांगायला आवडेल?

उत्तर:- मला फक्त इतकेच सांगावयाचे आहे की सनातन संस्था हा एक आक्रमक हिंदू संघटना उभारणीच्या दिशेने चाललेला असा प्रयोग आहे ज्याची अंतिम परिणती ही भारतात एका हिंदू तालिबान च्या निर्मितीत होणार आहे आणि याबद्दल मला किंचितही शंका नाही.

(अनुवाद – अखिलेश किशोर देशपांडे)

 

(सुरेश खैरनार यांचा मोबाईल क्रमांक -08329203734)

[email protected]

सनातन विषयात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांच्या या मुलाखती पहायला विसरू नका . खालील link वर क्लिक करा

https://www.youtube.com/watch?v=TA190Y7ZSkU&feature=youtu.be

LD3MXHuJtpJ4npQJfW9pueTOCS7xrijnp5wba88GzHcqgGvdPEu9fyxZggXw8TkX36d8LJRjmDdobhS7FtdEVAVs-7ky_rsEPsE15KKGNI9bDZ-qtc_-_MP67TVWeV_HxVDPGzX3Cw&__tn__=lC-R

 

Previous articleकाल, पाब्लो मला भेटला!
Next articleअपराजित दाभोलकर
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.