सबरीमालाचा संघर्ष आता कशासाठी?

-सारंग दर्शने

    

केरळचे मुख्यमंत्री पिनारी विजयन यांनी सोमवारी सबरीमाला मंदिर प्रकरणातील आपले मौन निर्णायकपणे सोडले आहे. केरळ राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अमलात आणण्यासाठी सर्वतोपरी कटिबद्ध आहे, असे विजयन यांनी म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेचे स्वागत. सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी ऐतिहासिक निकाल देऊन या मंदिरात सर्वांना सर्वकाळ मुक्त प्रवेश असेल, असे जाहीर केले होते. त्यानंतर, तातडीने प्रतिकूल प्रतिक्रिया उमटल्या नाहीत. मात्र, काही दिवसांनी त्या उमटू लागल्या. केरळात या निर्णयाला जोरदार विरोध सुरू झाला आहे. या मंदिराचे व्यवस्थापन असणारा ट्रस्ट सर्वोच्च न्यायालयातही गेला आहे. तेथे त्यांनी फेरविचार याचिका सोमवारीच दाखल केली. काही संघटनांनी हा धार्मिक विषय असून त्यात सर्वोच्च न्यायालयाने किंबहुना, न्यायसंस्थेनेच पडू नये, असे म्हटले आहे. या साऱ्या भूमिकांचा सुबुद्ध, सुशील भारतीय नागरिकांनी शांतपणे विचार करायला हवा.

भारतात असंख्य प्रकारच्या श्रद्धा आहेत. असंख्य चालीरीती आहेत. असंख्य समजुतीही आहेत. यातल्या अनेक परस्परांच्या विरोधात जाणाऱ्याही असतात. केरळातल्या या सबरीमाला मंदिरातही साधारण दहा ते पंधरा वर्षापासून मुलींना प्रवेश बंद होतो. ही प्रवेशबंदी थेट पन्नाशी येईपर्यंत चालू राहते. हे मंदिर अय्यप्पाचे म्हणजे, आपल्या गणपतीच्या भावाचे-कार्तिकेयाचे आहे. कार्तिकेय हा ब्रह्मचारी आहे. त्यामुळे, ज्या महिला ऋतुमती असू शकतात, त्यांनी या ब्रह्मचाऱ्याचे किंवा त्याने अशा महिलांचे तोंड पाहू नये, असा या मागचा रूढिसंकेत आहे. मात्र, हा संकेत भारतीय राज्यघटनेतील सर्व नागरिक समान असल्याच्या मूलभूत भूमिकेला तडा देतो का, हा प्रश्न आहे. तसा तो तडा देतो, हे उघडच आहे.

खरेतर, श्रद्धेच्या प्रांगणात समजुती व चालीरीती यांना महत्त्वाचे स्थान असते. मग ज्या समजुती किंवा चालीरीती सरळ सरळ समाजघातक, हिंस्र अथवा दमनकारी नाहीत, त्या बदलण्यासाठी न्यायव्यवस्थेचे साह्य का घेतले जाते, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. सबरीमालाचेच उदाहरण घेऊया. ज्या महिलांना असे वाटते की, आपल्याला कार्तिकेयाचे दर्शन घेण्याचा हक्क व अधिकार आहे आणि तो आपल्याला मिळायला हवा, त्या महिलांची या देवावर श्रद्धा आहे का, आणि तशी ती श्रद्धा असेल तर त्याचे दर्शन घेण्याबाबत ज्या समजुती आहेत, त्यांची व्यवस्था या महिला कशी लावतात? म्हणजे, आपण ऋतुकाळ येणाऱ्या महिला असलो आणि तरीही आपण दर्शन घेतले तर अय्यप्पाला चालणार आहे, असा त्यांचा समज आहे का? तो समज अय्यप्पावरील अतीव प्रेमातून आला आहे का? आणि तसा त्यांचा समज नसेल तर या महिला अय्यप्पाच्या दर्शनाचा आग्रह मग कशासाठी धरत आहेत? असा आग्रह खरा करून घेण्यात ईश्वरश्रद्धा आणि ईश्वरनिष्ठा मागे पडून, आधुनिक अर्थाने नागरिक म्हणून असणारा हक्क महत्त्वाचा ठरतो आहे का? तसा तो मंदिरात जाऊन बजावला जाणार असेल तर भक्त आणि ईश्वर यांच्यातील अनन्य नात्याचे मोल त्यांच्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे उरत नाही. यातून निर्माण होणारे प्रश्न दिसतात तितके सवंग आणि सोपे नाहीत. देव आणि भक्त यांच्या नात्याचा हा कमालीचा नाजूक प्रांत आहे..

याउलट, आता सर्वोच्च न्यायालयाने अधिकार देऊनही ऋतुमती असू शकणाऱ्या किती श्रद्धावान महिला किंवा युवती अय्यप्पाच्या मंदिरात जातील? मला वाटते, एक टक्काही जाणार नाहीत. याचे कारण, त्यांची जर अय्यप्पावर खरोखर श्रद्धा असेल तर त्या मंदिरात जाणार नाहीतच. आपल्याच देवतेला न रूचणारे, न पटणारे वर्तन त्या कशासाठी करतील? त्यांच्या श्रद्धेचे स्वरूप त्यांना तसे करू देणार नाही. मग न्यायालयाने दिलेला आदेश किंवा दिलेला निकाल हा निव्वळ प्रतीकात्मक ठरतो. या निकालाला आपण केवळ आपल्या राष्ट्रीय प्रगतिपुस्तकात ‘पुरोगामी निर्णय’ असे संबोधून आपल्या छातीवरचे एक पदक वाढवतो. त्याने काही होत नाही. अशा असंख्य पदकांनी भारतीयांची छाती आधीच पुरती भरून गेली आहे..!

म्हणूनच, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्वागतार्ह असला तरी त्याने समाज लगेच पुढे गेला किंवा समाजात क्रांती झाली असे कुणी मानू नये. अय्यप्पावर श्रद्धा असणे आणि तरीही त्याला ‘न आवडणारी गोष्ट’ करणे, यातील टिपिकल भारतीय मनाचे द्वंद्व समजावून घेण्याची गरज आहे. श्रद्धेच्या प्रांतातील न्यायालयीन किंवा कायदेशीर हस्तक्षेप भारतासारख्या देशात वारंवार अपयशी का ठरतो, याचेही उत्तर अशा असंख्य द्वंद्वांमध्येच लपलेले आहे.

मग करायचे काय? याचे उत्तर दीर्घकालीन आहे आणि ते थोडक्यात द्यायचे तर समूहमनाच्या श्रद्धांचे उन्नयन होत राहणे किंवा करत राहणे, असेच द्यावे लागेल. असे उन्नयन करण्याचे प्रयत्न शेकडो वर्षे होत आले आहेत. आरण्यके आणि उपनिषदे हा अशा प्रयत्नांमधला पहिला महत्त्वाचा ऐतिहासिक टप्पा होता. महाराष्ट्रापुरते पाहायचे तर भागवत-वारकरी संप्रदाय आणि त्यांचे सकाम भक्तीला अवकाश न देणारे मनोहारी दैवत विठ्ठल हे श्रद्धा उन्नयनाचे उत्तम उदाहरण आहे… अशा सगुण भक्तीची परंपराही खूप जुनी आहे. अय्यप्पा हाही जुना सगुणदेव आणि त्याच्या भक्तीत शिरलेले हे विषमतेचे हीण हेही असेच जुने.

ज्या देशात चक्रधरांसारखा काळाच्या पुढे धावणारा ऋषिवर झाला आणि महिलांच्या ऋतुस्नात असण्याचा अत्यंत सोपा, नैसर्गिक व थेट अर्थ ज्या महानुभाव संप्रदायाने लावला, त्याच देशात एकसिवाव्या शतकात अय्यप्पाच्या मंदिरातील महिलांचा प्रवेश हा ऐन ऐरणीवरचा मुद्दा बनू पाहतो…

पण In Great Indian Discourse आपण सारेच sense of proportion गमावून बसतो आहोत. त्यातच आपल्या समाजाला घातक रंगांधळेपण आले आहे. आपल्याला कोणताही प्रश्न लगेच जीवनमरणाचा वाटतो. आणि गंमत म्हणजे असा जीवनमरणाचा प्रश्न क्षणोक्षणी बदलत असतो. समाजाला असा ’मीडियामहारोग’ होणे, हे काही स्वास्थ्याचे लक्षण मानता येणार नाही…

महिलांची साक्षरता, महिलांचे आरोग्य, महिलांचे आयुर्मान… या व अशा बऱ्याच महिलाकेंद्री गोष्टींमध्ये केरळ भारतात इतर सर्व राज्यांपेक्षा कितीतरी पुढे आहे, ही तळटीपही या निमित्ताने मनाशी बाळगायला हरकत नाही…

(लेखक महाराष्ट्र टाइम्समध्ये सहायक संपादक आहेत)

  98215 04025

Previous articleमहात्मा गांधींची अनोखी प्रेमकहाणी
Next articleगांधी मरत का नाही ? – चंद्रकांत वानखडे
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here