सभा पावसातली… सभा उन्हातली!

– मधुकर भावे

१२ डिसेंबर २०१९ रोजी पवारसाहेबांचा ७९ वा वाढदिवस होता.  सातारा येथील जाहीर सभेने संध्याकाळी तो साजरा झाला. पवारसाहेबांचे अभिनंदन करायला जोरदार पाऊस आला. त्या पावसाची पर्वा न करता, साताराची ती सभा तडाखेबाज झाली. त्या एका सभेने ‘सह्याद्री भिजला’ ही घोषणाच तयार  झाली. राजकीय वातावरण बदलायला ती सभा कारण ठरली. जवळजवळ ४ वर्षांनी बीड येथे झालेली पवारसाहेबांची तळपत्या उन्हातली १७ ऑगस्टची सभा. दुपारी १२ वाजल्यापासून हजारो लोक सभेला जमले होते. सभा ५ तास चालली. पवारसाहेब सत्तेत नाहीत. त्यांचे डावे-उजवे हात भलत्या रस्त्याला गेले. पण, ‘जे गेले ते गेले…’ त्यांची पर्वा न करता ८३ वर्षांचा योद्धा पाच तास बीडच्या सभेत ठामपणे बसून होता. ४० मिनिटे दणदणीत भाषण करून गेला. ‘पवारसाहेबांचे वय झालेय’ अशी कारणे देवून, त्यांना सोडून गेलेल्या त्यापैकी कोणाचेही नाव न घेता ‘थोडी माणुसकी ठेवा…’ अशा शेलक्या शब्दांत पवारसाहेबांनी त्यांची संभावना केली.

जे गेले ते सत्तेसाठी गेले, हे उभा महाराष्ट्र जाणतो. ‘पवारसाहेबांच्या जिथं सभा होतील, तिथं अजितदादांच्या सभा घेतल्या जातील’ असे जाहीर झाले आहे. अजितदादा ज्या दिवशी फुटले त्यानंतरच्या वांद्रे येथील पहिल्या मेळाव्यात दादांनीच हे जाहीर करून टाकले होते. आता बीड येथे दादांची सभा होईल. भाजपाला जे हवे होते ते नेमके घडले आहे. कारण मोदी-शहा आणि फडणवीसांचे ढोल  सत्तेच्या पिकल्या जांभुळ झाडाखाली कितीही बडवले तरी, एकट्या भाजपाच्या जोरावर महाराष्ट्रात भाजपा सत्तेवर येणे शक्य नाही, हे लिहून ठेवा. फडणवीसांची कितीही स्तुती केली तरी राजकीय इतिहासात आता ‘तोडफोड कारागिर’ म्हणूनच त्यांची नोंद झाली आहे, त्यांच्या गळाला म्हणजे, सत्तेच्या गळाला ८-९ मासे लागले. शिंदे गट फुटला त्यापेक्षाही दादांसोबत जे गेले त्यांचा ‘विश्वासघात’ अधिक गंभीर आहे. यात सर्वजणांना पवारसाहेबांनी शून्यातून कुठे पोहोचवले होते. माकडाचे सरदार झाले होते… आणि सरदाराचे सेनापती झाले होते.  हे सर्व मिळेपर्यंत पवारसाहेब त्यांचे दैवत होते. विठ्ठल होते. यापैकी सर्वांनी पवारसाहेबांबद्दल केलेल्या स्तुतीच्या भाषणाचे पुस्तक काढले तर आणि त्यांनाच वाचायला दिले तर ‘माणसं किती कृतघ्न असतात’ त्याचा तो पुरावा ठरेल.

सत्ता आज असते आणि उद्या नसते. दादा आणि त्यांच्या टीमने कितीही जोर लावला, पैसा ओतला… माणसं फोडली तरी येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रात तरी भाजपा, शिंदेगट, दादा सगळे मिळून महाराष्ट्रात त्यांचे सरकार आणू शकत नाहीत. उलट ‘सत्तेसाठी हापापलेले गेले’ हे फार बरे झाले. त्यांच्या अंगावर चढलेली नेतृत्त्वाची झूल सत्तेची होती. लोकांच्या प्रेमाची नव्हती. हे आता मतदार दाखवून देतील आणि ह्या सगळ्यांची कशी फजिती होते, ते बघा. शिंदे आणि त्यांच्या गटाच्या फुटीपेक्षाही दादा गटाची फूट ही अधिक किळसवाणी आहे. पवारसाहेब फार जोरदार बोलले.  दादांसारख्या माणसांनी आणि  त्यांच्या  चेले- चपाट्यांनी आयुष्यात कोणामुळे मोठे झालो, हे सत्तेच्या चार तुकड्यासाठी विसरून जावे, याच्यासारखी कृतघ्नता नाही. पवारसाहेबांचे फोटो वापरून त्यांच्या प्रतिमेचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला तरी, आता पवारसाहेबांनी स्पष्ट बजावलेले आहे, ‘खबरदार माझे फोटो वापराल तर…’

मोदी सरकारच्या हातात सर्व यंत्रणा असल्यामुळे निवडणूक आयोग ‘राष्ट्रवादी’ पक्ष हे नाव आणि  चिन्ह ‘घड्याळ’  हे दादा गटाला नक्की देईल, कारण त्या बोलीवरच ही मंडळी फुटली. कारण २०२४ पर्यंत यांना त्यांचे अस्तित्व वेगळे दाखवायचे आहे. आणि तिथपर्यंत त्यांचे अस्तित्त्व वेगळे ठेवायला भाजपाच्या नेत्यांची हरकत नाही. कारण त्यांना लोकसभा निवडणुकीचा मतलब साधून घ्यायचा आहे. अटी घालून भाजपा त्यांना वापरत आहे. दादा पवारसाहेबांना भेटायला गेले, पण पवारसाहेबांनी दादांना धुडकावून लावले, म्हणून सगळा डाव फसला. आता २०२४ पर्यंत भाजपा नेते या सगळ्यांच्या नाड्या आपल्या हातात घेतील आणि ‘वेगळे अस्तित्त्व म्हणणारे’ हे लोक आपोअप शरण जातील. मूळात शरणागतीला वेगळे अस्तित्व नसतेच. कारण आता दादा आणि त्यांच्या गटाचे जे लोक निवडणुकीला उभे राहतील ते ‘भाजपाने पाठिंबा दिलेले उमेदवार असतील…’ तिथं भाजपाचा उमेदवार असणार नाही.  मग वेगळे अस्तित्व कुठे राहिले?

बीडच्या सभेने सिद्ध केले आहे की, सामान्य मतदाराला पुढे घडणारे हे राजकारण पूर्णपणे समजलेले आहे. आणि  त्या मतदाराची मानसिक तयारी एका बीडच्या सभेनेच झाली असल्याचे दिसते. ही सभा बीडमध्ये असली तरी महाराष्ट्राची प्रातिनिधीक सभा होती. असेच त्या सभेचे स्वरूप होते. बीडचा एक तरुण आमदार  संदीप क्षिरसागर ८३ वर्षाच्या योद्धयासोबत उभा राहतो आणि सभा दणकेबाज करून दाखवतो.  मुंबई-पुण्यातील सभेला जी शिस्त दिसत नाही, त्यापेक्षा कितीतरी पटीने शिस्तित, भव्य व्यासपीठ उभारून जबरदस्त सभा झाली. वातावरण तयार होण्याकरिता या सभेने महाराष्ट्रात खूप चांगला संदेश गेला. हेच वातावरण वर्षभर कायम ठेवावे लागेल.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी मी तुलना करत नाही. परंतु त्यावेळी जे वातावरण तयार झाले होते, तेच वातावरण महाविकास आघाडीला तयार करावे लागेल. भाजपा आणि त्यांच्यासोबत सत्तेसाठी लाचारीने गेलेल्यांचा कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात पराभव करायचा आहे, या एकाच मुद्यावर या महाविकास आघाडीने वातावरण तयार केले पाहिजे. देश उद्धवस्त होण्याची वेळ आली. देशातील २५ टक्के संस्था विकल्या गेल्या.  ७५ टक्के बाकी आहेत. महागाईचा कडेलोट झालेला आहे. रोजगार देण्याच्या घोषणा खोट्या ठरलेल्या आहेत. जागतिक सन्मान आणि जगात भाषण करत फिरणाऱ्यांनी या देशातील रुपयाची किंमत १४ पैशांवर आणून ठेवली आहे. मणिपूर पेटले. भगिनी अपमानित झाल्या. जणू आपण त्या गावचे नाहीत, इतक्या सहजपणे या गंभीर घटना घेतल्या गेल्या.

गॅस सिलिंडर आता ११०० रुपये आहे. जर ही निवडणूक त्यांना जिंकू दिली तर पुढच्या दोन वर्षात सिलिंडर २००० रुपये होईल. आता सीबीआय., ई. डी. , निवडणूक आयोग, यावरच सरकारचा कब्जा आहे. पुढच्या काळात संसद, संविधान, न्यायालये लोकशाही या सगळ्या संस्था खिळखिळ्या केल्या जातील, याची  भीती आणि जाणीव सामान्य मतदाराला होत चालली आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मतदारांनी उमेदवाराची जात पाहिली नाही. तो कोणत्या गावचा आहे, याचा विचार केला नाही. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या एकाच मुद्द्यावर भल्याभल्यांना मतदारांनी पाणी पाजले. आता हा देश लोकशाही, संविधान वाचवण्याकरिता आणि राजकीय तोडफोड करून देशात अनागोंदी माजवणाऱ्यांच्या विरोधात, मतदाराला एकत्र व्हायचे आहे. बीडच्या सभेचा तोच संदेश आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रात असा दणका दिला पाहिजे की, की, फडणवीस आणि त्यांची ‘तोड-फोड कंपनी’ नादारी जाहीर करेल. त्यासाठी महाराष्ट्र घुसळून काढावा लागेल. तीनच उदाहरणे मुद्दाम देतो. येणाऱ्या निवडणुकीत उमेदवार आणि त्याचा पक्ष महत्त्वाचा नाही हे समजून घ्या. लढाई कशाकरिता आहे, हाच मुद्दा महत्त्वाचा आहे. १९५७ साली रत्नागिरी जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार  जगन्नाथराव भोसले होते. कोण होते हे भोसले? नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे सरसेनापती होते. १९५२ ते १९५७ पंडित नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. त्यांच्या विरोधात संयुक्त महाराष्ट्र समितीने उमेदवार दिले ते प्रेमजीभाई आशर. एक गुजराथी छोटे व्यापारी. मतदारांनी त्यांना डोक्यावर घेतले. जात पाहिली नाही. समोर उभे कोण, याचा विचार केला नाही आणि जगन्नाथराव भोसले पडले. पंडित नेहरू यांनी चौकशी केली, ‘भोसलेजीको हराने वाले ये अशरजी कौन है?’ जनतेने ठरवले तर कितीही तगडी शक्ती असली तरी त्यांना जमिनीवर आणता येते. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मुंबईतील प्रख्यात वकील, रिपब्लिकन पक्षाचे ॲडव्होकेट बी. सी. कांबळे यांना तिकीट दिले गेले आणि ते विजयी झाले. ताडदेवच्या तुळशीवाडीतील धड मराठी भाषाही न येणारे पारसी बाबा नौशेर भरूचा जळगावातून विजयी झाले. ही उदाहरणे याकरिता देत आहे की, ही जात-पात-धर्म- पैसा या सगळ्या प्रलोभनाला बाजूला ठेवून सध्याच्या घातक प्रवृत्तीला सत्तेतून बाजुला  हटवायचे आहे, या एकाच मुद्यावर निवडणूक जिंकायची आहे. देशात काय निकाल लागेल तो लागेल. महाराष्ट्र लाचार कधीच नव्हता. आणि सत्तेच्या पाठीमागे धावणारा नव्हता. हे दाखवण्याची ही वेळ आहे. यासाठी महाविकास आघाडी आहे. जे सत्तेला हापापले हाेते ते गेले. आता पुन्हा महािवकास आघाडी जर सत्तेत आली तर ते जे आठ-नऊ जण गेले ते पवारसाहेबांचे पाय धरायला पुन्हा उद्या सकाळी हजर होतील. त्यांचा मतलब सत्तेशी आहे. म्हणून हे महाराष्ट्राचे सगळे राजकारण नासवले ते महाराष्ट्राला मान्य आहे का? याच प्रश्नावर महाराष्ट्राने निकाल द्यायचा आहे. आणि तो सामान्य माणसं देणार आहेत. बीडची सभा हेच सांगत आहे.

आता पवारसाहेब, उद्धवसाहेब ठाकरे, नानासाहेब पटोले आणि महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा ज्यांना मान्य आहे. ते सर्व राजकीय पक्ष, यांनी एकत्रित येवून महाराष्ट्र घुसळून काढावा. परवा शेतकरी कामगार पक्षाच्या मुंबईतील कार्यालयात यासाठी पुरोगामी विचारांच्या नेत्यांची सभा झाली. शेतकरी कामगार पक्ष असेल, कम्युनिस्ट असतील,ज्यांना ज्यांना भाजपाची राजवट हे देशावरील संकट वाटते आहे, आणि घटनेवरील संकट वाटत आहे, सर्व धर्म समभावावरील संकट वाटत आहे… गुण्या-गोविंदाने नांदणारा हा महाराष्ट्र ज्यांना खिळखिळा करायचा आहे, त्या विरोधात बोलणारे… लिहिणारे, न बोलणारे न लिहिणारे पण अस्वस्थ असणारे अशा सगळ्यांना एकत्र येवून हा निर्णय करायचा आहे.

मी महाविकास आघाडीला दोन गोष्टी सूचवू इच्छितो…. त्यांनी त्याचा विचार करावा.

१) प्रचाराची दिशा ठरवताना तीन स्वरूपात असावी. उद्याच्या महाराष्ट्राचे नेते म्हणून मला तरी तीन-चार तरुण नेते समोर दिसतात.. त्यात आदित्य ठाकरे (शिवसेना), रोहित पवार (राष्ट्रवादी), रोहित आर. पाटील (आबांचा मुलगा), ऋतुराज पाटील (काँग्रेस), प्रणिती शिंदे (काँग्रेस), संग्राम थोपटे (काँग्रेस) या तरुणांनी महाराष्ट्रात तरुणांच्या सभा घ्याव्यात.  जिल्हा, तालुका पातळीवर घ्याव्यात.. सर्व जाहीर सभांना सगळ्या नेत्यांनी गर्दी करू नये. दिवस कमी आहेत. साधनं कमी आहेत. सत्ताधारी पक्ष पोत्याने पैसा ओतेल.प्रलोभन दाखवील. कसबा पोटनिवडणुकीत हे सगळे प्रकार झाले आहेत. मतदार त्याला पुरून उरले. एवढेच नव्हे तर एक नवीन प्रकार कसब्यात आला. रविवार पेठेत अनेकांच्या घरी जावून निवडणुकीच्या आदल्या दिवशी डाव्या हाताच्या बोटाला शाई लावून, महात्मा गांधी यांचे फोटो भेट दिले.  हा नवीन प्रकार सुरू झाला आहे. या सगळ्यांना पुरून उरून भाजपाचा पराभव तिथे झाला.  त्याचदिवशी राष्ट्रवादी तोडायचा निर्णय फडणवीस यांनी केला आणि हे नऊ मासे गळाला लागले.

२) महिलांची आघाडी तयार करून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीतील काही प्रमुख महिलांनी एक गट एकत्र करावा. जसे सुषमा अंधारे मॅडम, यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण, आणखीन त्यांना ज्या हव्या त्या महिलांना एकत्रित करून, या महिला आघाडीने महिलांच्या सभांवर जोर द्यावा…  एकूण मतदानात ५० टक्के मतदान महिलांचे आहे, हे लक्षात घ्या. महागाईचे सर्वात जास्त चटके घरात त्यांनाच सहन करावे लागतात. त्यामुळे पाच वर्षात काय घडलेय, याची माहिती त्यांना जास्त आहे. वातावरण तयार करण्याकरिता महिला आघाडी खूप प्रभावी ठरू शकेल.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजमाध्यमे पूर्णपणे भाजपा, दादा गट, शिंदे गट यांच्यासोबत राहतील. शिंदे गटाची निराशा लवकर होईल, हे आजच सांगून ठेवतो. त्यांना बाजूला टाकण्याचा विषय हळूहळू सुरू झालेला आहे. पण एक गोष्ट मान्य केली पाहिजे की, शिंदे शिवसेनेतून फुटले तरी त्या नेत्याला माणुसकी आहे. संवेदना आहेत.  ईरशाळ वाडीवर दरड कोसळली. हा नेता भर पावसात रेनकोट घालून किती तरी मैल चालत गेला.  हा विषय महसूल खात्याच्या कक्षेत येतो. महसूल मंत्री विखे-पाटील यांना कोणी पाहीले तरी का तिथे? ठाण्यात एका रुग्णालयात एकाच रात्रीत १८  रुग्णांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री शिंदे लगेचच धावत गेले. महाराष्ट्राचा आरोग्य मंत्री कोण? हे पटकन सांगता येईल का हो कोणाला? ते आरोग्य मंत्री रुग्णालयात कुठेच दिसले नाहीत. शिंदे गटातील अनेक मंत्री असे आहेत. त्यांची नावेही महाराष्ट्राला पटकन सांगता येणार नाहीत. एकनाथ शिंदे यांना डावलण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. कारण भाजपाचा एकच निकष आहे. ‘महाराष्ट्रात ४८ पैकी किमान ४० जागा त्यांना हव्या आहेत.’ त्या जागा जिंकण्यासाठी जो कोणी मदत करेल त्याला जे हवं ते मिळणार. मतलब साध्य होईपर्यंत. दादागटाला त्याचकरिता जवळ केले आहे. गरज संपली की, काय होते बघा.. आणि मग दादा गटाची जी काही फजिती होईल, इतकी वाईट राजकीय परिस्थिती कोणावर येवू नये. पण असे झाले तर त्याला तेच कारणीभूत असतील.

(लेखक नामवंत पत्रकार व वक्ते आहेत)

9892033458

Previous articleसीमाताई साखरे – सासूनं नव्वदी ओलांडली !
Next articleमाझे हरेगाव, आम्ही हरेगावकर
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.