समजून घेवूया मानवी मेंदूच अनाकलनीय कोडं

(साभार – महाराष्ट्र टाइम्स, नागपूर)

-डॉ. श्यामल सराडकर

स्मृतीभ्रंश हा सिंड्रोम आहे. नुसता इतर आजारांसारखा साधा आजार नाही. फक्त डॉक्टर अन् पेशंट पुरताच हा मर्यादीत नाही, तर सामाजिक, कौटुंबिक, मानसिक, शारीरिक, भावनिक, स्पिरीच्युअल, असे सारेच पैलू त्यासोबत जुळलेले आहेत. म्हणून स्ट्राँग सपोर्ट सिस्टीम, जिव्हाळा, प्रेम, करूणा, वात्सल्य हेही औषधांबरोबर तितकच महत्त्वाचे असते. कुणालाही होऊ शकणारा हा आजार असल्याने इम्पॅथी महत्त्वाची असते. स्वत:ला रुग्णाच्या जागी अनुभवून, परिस्थिती समजून घेता आली पाहिजे…

 

मानवी मेंदू अन् त्याचं कार्य (मन) हे अनाकलनीय, न झेपणारं कोडं आहे… अगदी अस्तित्वासारखंच गूढ, गहन विचारांच्या, तर्काच्या, आवाक्यापल्याडलं… अन् आपल्या मेंदूत, करोडो मिलीयन-ट्रिलीयन मोजता न येणाऱ्या असंख्य पेशी आहेत. ताऱ्यांसारख्या, आकाशगंगेसारख्या पसरलेल्या… कॉम्प्लेक्स नेटवर्क जाळं. (न्युरॉन्स, न्युरोट्रान्समीटर्स)!

या पेशींमधे आपआपले केमिकल्स असतात… रसायनांचा हा खेळ अविरतपणे अव्याहतपणे सतत सुरू असतो… जन्मापासून तर जगाच्या अंतापर्यंत..! केमिकल लोचा! सर्कीट वगैरे! आपल्याही नकळत..! लढाईच असते जणू. काही रसायनं कमी होतात, काही वाढतात. काही पेशीतच लपून बसतात तर काहींना निघताच येत नाही. हा मेंदू अन् ही रसायनंच खरं तर आपले मायबाप..! आनंद, वेदना, स्मृती, विस्मृती, तत्त्वज्ञान, देशप्रेम, राग, लोभ, करुणा, माया, ममता, मत्सर ही त्याचीच पिल्लं… अन् याच्या अवतीभवतीच मानवी आयुष्याचं गूढ आहे. हे कोडं सोडवण्याचा माणूस आपल्या परीनं प्रयत्नात असतोच. २१ सप्टेंबर रोजी ‘जागतिक अल्झायमर दिनानिमित्त या आजाराबाबत देशभरात जनजागृती करण्यात आली. ‘डिमेंशिया-स्मृतिभ्रंश-अल्झायमर’ हा असाच स्मृती-विस्मृतींचा खेळ…

विस्मृती जिंकते, स्मृती हारते, अन् हा आजार जडतो… हळूहळू तयार होणारा, वेग घेणारा हा तसा जुनाट आजार… विसराळूपणा, मूड स्विंग्स, चिडचिडेपणा वाढतो तसेच कार्यक्षमता अन् सामाजिकता मंदावते. माणूस एकाकी होतो अवतीभवतीच्या गर्दीतही! पण आता वृद्धांच्या पाठोपाठ तरुणाईलाही या आजाराने आपल्या विळख्यात ओढले आहे…

तंत्रज्ञानाचा वाढता प्रसार, मोबाइल, औद्योगीकरण, जागतिकीकरण, निसर्गापासून दूर जाणारी जीवनपद्धती, ताणतणाव, जेवण-झोप असमतोल. व्यायामाचा अभाव, बैठी लाइफस्टाइल ही छोटी वाटणारी काही महत्त्वाची मोठी कारणं..!

तसे मेडिकल सायन्सनुसार डिमेंशियाचे, स्मृतिभ्रंशाचे बरेच प्रकार असतात. अल्झायमर, रक्तदाबावर नियंत्रण नसल्यानं मेंदूत होणारा रक्तस्त्राव (वास्कूलर डिमेंशिया), आनुवांशिक कारणं, टॉक्जीन्स, खाद्यपदार्थात फवारणीतील विषारी तत्त्व, हेवी मेटल्समुळे होणारे औषधांचे साइड इफेक्ट्स, मेटॅबोलिक विटामीन बी, फोलेटचे कमी प्रमाण, हार्मोनचा असमतोल, किडनी आजार, ट्युमर, रेडियेशन हायपॉक्झिया कार्बन मोनॉक्सॉइड व इतर वायू…

डोक्याला मार, अपघात, नशा दारूचे व्यसन, मेंदुशी संबधित इतर आजारांचा परिणाम उदा. पार्किंन्सन, मोरेज, सिन्ड्रोम ही सारी वेगवेगळी कारणं अन् प्रकार. सर्वेक्षणानुसार सामान्यत: शंभरातल्या पाचजणांना साठीनंतर हा आजार उद्भवण्याची शक्यता असते. वयाच्या ८५ नंतर हे प्रमाण ३० ते ४० टक्क्याइतकं आढळते. या साऱ्या प्रकारांपैकी त्यातल्या त्यात प्रामुख्याने अल्झायमर हा प्रथम क्रमांकावर तसाच सर्वात कॉमन! निम्मे पन्नास टक्के रुग्ण ग्रासित. सोप्या शब्दांत सांगावयाचं झाल्यास ‘म्हातारपणातला विसरभोळेपणा!’ १९०७ला अलॉयस अलझायमर याने तो शोधून काढला म्हणून हे या आजाराचंही हेच नाव. १, १४, २१ क्रोमोजोम्समधले जेनेटिक बदल होतात. यामुळे अमॉयलॉइड नावाचा प्रोटीनचा थर साचतो. अमॉयलॉइड प्लेक्स अन् मेंदूचे आठवणींचे कार्य मंदावते. एसिटॅल्कोलीन, नोरेपाइनफ्रीन ही रसायनं कमी होतात. कोलीन एसीटॅल्ट्रासफेरास हे एन्जाइम कमी तयार होते. ही झाली मेंदुची सायंटीफिक भाषा. यामुळे पुढे आजाराचं चक्र सुरू होते.

लक्षणं अन् निदान

निदानासाठी, न्युरॉलॉजिस्ट, सायकियाट्रीस्ट एमएमएसई नावाची पद्धत वापरतात. यात काही तंत्रशुद्ध प्रश्नावली असते. अन् मग त्याच्या स्कोअरनुसार डाटा तयार केला जातो. आजार कुठल्या पातळीला गेला आहे, हे त्यावरून कळते. सुरुवातीला नातेवाईक, मित्रांकडून माहिती घेतली जाते. असंबद्ध बोलणे, रस्ता विसरणे, वेळ, माणसं, ठिकाण न ओळखता येणं. सोपी गणितं, बेरीज वजाबाकी न कळणे, मुलांचीही नावं विसरणे. जुन्या घटना न आठवणे, बोलण्याचा स्पीड व टोन कमी होणे, शुन्यात जाणे, एकटक बघणे, कधीकधी कपड्यात लघवी होणे, भान नसणे, बोलताना शब्द न सापडणे, हालचाली न समजणे किंवा करता न येणे, अचानक मूड स्विंग्स, रडायला येणे, कपड्यांचं भान नसणे, थकवा येणे, चिडचिड होणे, निराश होणे, चेहऱ्यावर भाव नसणे किंवा असंबद्ध भाव असणे. भास भ्रम होणे (हॅल्युसिनेशन्स), बाथरूममधून रूमपर्यंत येता न येणे, घरातल्या घरातच रस्ता विसरणे. समाजापासून दूर होणे, अशी लक्षणे आढळतात. व्यक्तिमत्त्वात लाक्षणिक बदल दिसतो. सनडोनर्स सिंड्रोम्स, सायंकाळी काही लक्षणांची तीव्रता वाढते. सुस्ती चिडचिडेपणा, रडायला येणे, तोल जाणे, चक्कर येणे, विसरभोळेपणा अशी लक्षणे आढळतात. बरेचदा वाढत्या वयाचाही असा परिणाम असतो…

एज रिलेटेड मेमरी एम्पायरमेंट किंवा कॉग्निटिव्ह डिस्टर्बन्सेस!

या आजारात, माणुस कार्यक्षम अन सोशल असतो. फार त्रास होत नाही. तरुणाईतला प्रकार मात्र थोडा वेगळा असतो… ‘मेमरी लॉस’ म्हटल्याचे अनेक संवाद-शब्द प्रामुख्यानं आपल्या कानावर येत असतात. ‘आधी आठवायचं याला. पण, आता हा विसरतो. छोट्याछोट्या गोष्टी, गुणाकार-भागाकार सोडवितानाही गडबड करतो. तारीख, वेळ! विसरतो.’ ताणतणावाचं नियोजन न झाल्यानं विसरल्यासारखं होतं. चिडचिड वाढते. मन लागत नाही, अस्वस्थ वाटतं, क्रियाशीलता कमी होते. बऱ्याचदा नैराश्य किंवा इतर मानसिक किंवा न्युरॉलॉजिकल आजारांचा तो परिणामही असू शकतो..!

ट्रीटमेंट, थेरपीज सर्वात महत्त्वाचं-निदान..!

नातेवाईकांना हितचिंतकांना ही बाब सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवी. वेळ वाया न घालवता संबंधित डॉक्टरांचा सल्ला घेणे ही प्राथमिक बाब. मॉडर्न औषधांनी हा आजार वाढण्यापासून, पसरण्यापासून थांबवता येतो. गंभीर स्टेज टाळता येते. कारणं शोधली की, इतर औषधं, उदा. रक्तदाब बीपी वाढलेला असल्यास कमी करण्याची, तसेच विटामिन्स-बी, फोलेटची कमी असल्यास, सुरू करता येऊ शकतात. डोनेपेझील, मेम्यांटीन, रिवास्टीग्मीन ही काही औषध कोलिनीस्टरेज नावाचे एन्जाइम कमी होण्यास मदत करतात… त्याची पातळी नियंत्रित ठेवतात. त्यामुळे सकारात्मता अन् मेमरी वाढवण्यास मदत होते!

चिंता, निराशेसंबंधीतसुद्धा काही सुरक्षित औषधे वापरता येतात. जगणं सोपं व्हावं, त्रास कमी व्हावा, हा त्यामागचा उद्देश. डॉक्टरांच्या सल्ल्यानं ती घेता येऊ शकतात. स्मृतीभ्रंश हा सिंड्रोम आहे. नुसता इतर आजारांसारखा साधा आजार नाही. फक्त डॉक्टर अन् पेशंट पुरताच हा मर्यादीत नाही, तर सामाजिक, कौटुंबिक, मानसिक, शारीरिक, भावनिक, स्पिरीच्युअल, असे सारेच पैलू त्यासोबत जुळलेले आहेत. म्हणून स्ट्राँग सपोर्ट सिस्टीम, जिव्हाळा, प्रेम, करूणा, वात्सल्य हेही औषधांबरोबर तितकच महत्त्वाचे असते. कुणालाही होऊ शकणारा हा आजार असल्याने इम्पॅथी महत्त्वाची असते. स्वत:ला रुग्णाच्या जागी अनुभवून, परिस्थिती समजून घेता आली पाहिजे… मदतीचा, आधाराचा, माणुसकीचा भावही तितकाच महत्त्वाचा असतो..!

नर्सिंग केअर, स्वच्छता, निसर्ग सान्निध्य, संगीत, इंस्ट्रुमेंटल गाणी, छंद, नवीन टास्क, मेमरी चॅलेंज तसेच समुपदेशन फार महत्त्वाचे असते. खासकरून नातेवाईकांचे समुपदेशन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यांची खूप चिडचिड होत असते. गिल्ट, राग येतो, अवेअरनेस, तसेच सायकोएज्युकेशन महत्त्वाचे असते..! समाजाला या स्लो पण सातत्यानं वेग पकडणाऱ्या क्रॉनिक आजाराची ओळख व्हायला हवी. प्रिवेंटीव मेजर्स महत्त्वाचे आहेत. तरुणाईतील रोगप्रतिकारशक्ती, लाइफस्टाइल, व्यसनमुक्ती, निसर्गाच्या सान्निध्यातील सहज जीवनपद्धती, मनावरचं नियंत्रण, अँगर मॅनेजमेंट, ताणतणावाचं नियोजन, नेमका आणि संतुलीत आहार, झोप, रिक्रियेशन, कला, छंद… या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात…

समाजाची नैतिक जबाबदारी

समाजाचा जबादार आणि प्रमुख घटक म्हणून आपला समाज सुंदर, स्वस्थ करणं ही आपली नैतिक, सामाजिक जबाबदारी आहे. समाज स्वस्थ निरोगी तर आपण निरोगी. जन्मापासून अंतापर्यंतच्या प्रवासात आठवणीच तर सोबत असतात. त्या हरवल्या की जगणं तितकं सुंदर राहत नाही. चेतनेचे, कल्पकतेचे, करुणेचे, भावनांचे पंख मनातल्या पाखराला सदैव हवेहवेसे वाटत असतात. त्यामुळे क्लिष्ट मानवी जीवन सोपे करण्यासाठी प्रयत्न करीत ही लढाई जिंकणं ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे.

(लेखक विदर्भातील  प्रसिद्ध न्युरोसायकियाट्रीस्ट आहेत.)

साभार – महाराष्ट्र टाइम्स, नागपूर

Previous articleसंघामुळे नव्हे ; तर भांडवलदारांच्या पाठिंब्याने झालेत मोदी पंतप्रधान
Next articleनेमाडे – कसबे वाद आणि आपण वाचक
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here