सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे..!!

-मिथिला सुभाष
*************

कल्पना करा, तुमच्या आसपास एक यक्षिणीसम सुंदर युवती विहरते आहे. तिचे विभ्रम तुम्हाला मोहवत आहेत.. ‘साफ़ छुपते भी नहीं, सामने आते भी नहीं,’ असे, तिच्या अंगावरचे एकच झिरझिरीत वस्त्र कधीही ओघळेल आणि ती तुम्हाला तिच्या देहावरच्या वळणं-वेलांट्यांसह पूर्ण दिसेल.. आकळेल..!! पण तो क्षण कधी येईल ते माहीत नाही तुम्हाला.. ती हवीशी वाटतेय, तिला मिठीत घ्यावंसं वाटतंय.. पण कुठेतरी एक अनामिक भीतीही आहे, कारण ती तुम्हाला ‘कळलेली’ नाहीये.. तिच्याबरोबर केलेला संग तुम्हाला एखाद्या अजब जादुई दुनियेत घेऊन जाणार आहे की तुम्हाला उचलून खडबडीत जमिनीवर पटकणार आहे, ते तुम्हाला माहीत नाहीये.. पण तरी तिचं गारुड मनातून जात नाहीये…

कारण..???

कारण ती ‘ग्रेस’ची कविता आहे..!!

ग्रेसची प्रतिमासृष्टी उलगडता आली तर तो क्षण साक्षात्काराचा असतो..!! त्यातून जो आनंद मिळतो त्याची तुलना फक्त Orgasmic Pleasure शी होऊ शकते. साक्षात्कारातला आनंद आणि Orgasmic Pleasure, या दोघांची प्रत, Density आणि Volume समान असतं आणि ते ग्रेस’च्या प्रतिमासृष्टीत दडलेलं असतं. म्हणून त्यांची कविता ‘कळली’ नाही तरी ‘आवडते!’ Orgasm आणि साक्षात्कार या दोन गोष्टी तरी कोणाला धड कळतात?? पण तरी आवडतातच ना..??
म्हणूनच, “ही कविता मला खूप आवडते, पण कळत नाही!” असं फक्त ग्रेसच्या कवितेच्या बाबतीतच म्हंटलं जाऊ शकतं. “कळली नाही मग आवडली कशी?” हा प्रश्नच उद्भवत नाही. याला कारण ग्रेसची विलक्षण अद्भुत प्रतिमासृष्टी. (याच कारणाने जीए आवडतात.)

‘भय इथले संपत नाही’ ही कविता तशीच आहे. अनेकांना ‘आवडते’ पण ‘कळत’ नाही. त्यात शब्दांची चमत्कृती नाही पण उपमांची भरपूर आहे. मला ती जशी ‘कळली’ आहे, तशी मी लिहिते. कुठलीही चांगली कविता ही प्रत्येक वाचकासमोर वेगळे विभ्रम घेऊन येत असते. प्रत्येकजण त्यातून वेगळे अर्थ काढत असतो. तो कवीच्या अर्थाशी जुळेल किंवा जुळावा असा काहीही नियम चांगल्या कवितेला लावता येत नाही. त्यात वाचकाची बुद्धी, त्याची आकलनशक्ती, त्याची संवेदनशीलता आणि त्याची त्या-त्या वेळची मनोवस्था, याचा खूप मोठा सहभाग असतो. मला लागलेला अर्थ जेव्हा मी ग्रेसना सांगितला होता तेव्हा ते फक्त हसले होते. पण त्यानंतर एका विद्वानांच्या बैठकीत त्यांनी मला तो अर्थ सांगण्याचा आग्रह केला होता.
तो हा मी लावलेला अर्थ…

भय इथले संपत नाही…मज तुझी आठवण येते…
मी संध्याकाळी गातो…तू मला शिकविली गीते…

“भय इथले संपत नाही” हे काही भित्र्या मनाचे कन्फेशन नाहीये. ते वैचारिक स्थित्यन्तराचे वळण आहे.. त्यातली संध्याकाळ हा आयुष्याचा संधिकाल आहे. तारुण्य पूर्ण गेलेलं नाही, वार्धक्यात काय वाढून ठेवलेले असेल हे नीटसं माहीत नाही, असा जीवाला रुखरुख लावणारा संधिकाल. देवाची याद यायला लागलेली असते, पण जवानीत केलेल्या मस्तीची सय मनामागे गेलेली नसते.. काही चुकांच्या सावल्या भेडसावत असतात.. अशी ही आयुष्याची संध्याकाळ..!! कातरवेळ..!!
या कवितेची सुरुवातच अनपेक्षित होते, हे आणखी एक सौंदर्यस्थळ.. एक, दोन, तीन, चार करत दहापर्यंत जात नाही ही कविता.. पाच, सहा, सात…. मग एक, दोन, तीन, चार आणि मग सफाईदारपणे आठ, नऊ, दहा असा प्रवास आहे तिचा…

पुढच्या पंक्ती-

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

यातले ‘झरे’ हे लैंगिकतेचं प्रतिक आहे.. पृथ्वीचे भगवे सन्यस्तपण ही ‘माया’ म्हणजे खोटी वाटावी, असं वय.. आपल्यातून पुन्हा-पुन्हा काहीतरी, कोणीतरी ‘उगवत’ राहावे या ओढाळ असोशीपायी सततचा लैंगिक संग… उफ्फ….

झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया…

(माणसाला तंत्र-विद्येत ‘झाड’ म्हणतात. ग्रेसना अशा गूढ गोष्टींचे आकर्षण होते. त्यांच्या-माझ्या मैत्रीचा समान दुवा होता तो. या गूढाच्या आकर्षणापाई त्यांच्या प्रतिमा खूपदा गूढ असत. तंत्रविद्येत सामान्य माणसाला शून्य किंमत असते. तो तांत्रिकाच्या हातातले बाहुले असतो, झाड असतो. संसारात असतांना आपली किंमत ही शून्य असते. आपण ‘त्या वरच्या तांत्रिका’च्या हातातले बाहुले असतो. झाड असतो.. आणि ही झाडं एकमेकांना भिडत असतात, जुगत असतात.. “झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया…!!”माणसाला असणाऱ्या ‘वंशसातत्या’च्या ओढीवर केलेला प्रहार आहे हा..!!)

त्या वेली नाजुक भोळ्या, वाऱ्याला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातिल जणू अंगी राघव शेला

या चारी ओळी म्हणजे तारुण्यातल्या आनंदाचा, शृंगाराचा काळ.. आणि त्या शृंगाराला आलेलं फूल.. आपलं अपत्य..!! त्याचे ते बोबडे बोल माणसाच्या पूर्ण आयुष्याचा ताबा घेतात. सीतेला हाकलून दिल्यानंतर तिच्याजवळ रामाचा एक शेला होता. त्याचा स्पर्श तिला आनंद द्यायचा, समाधान द्यायचा. पण ते खोटं होतं. अखेर तिला धरणीच्या पोटातच आधार घ्यावा लागला. आपली मुलं त्या शेल्यासारखी असतात/असू शकतात. अंत एकाकीच असतो.

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ, फुटला खांब
थरथरत्या बुबुळापाशी, मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फुलासम, मी नटलो शृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

हाकेच्या अंतरावर देऊळ होतं.. पण मी, संध्येतील कमल फुलासम, नटलो शृंगाराने.. सगळे चोचले देहाचे.. दैहिक इच्छांचे रान माजलेले.. आणि मी याचक.. प्रेम द्या, सुख द्या.. माझ्या भुका भागतच नव्हत्या.. माझी प्यास शमतच नव्हती… आणि अशातच एक दिवस, मी पसरलेल्या माझ्या ओंजळीतच तो खांब फुटला… ज्या खांबातून नरसिंहाने उग्र दर्शन देऊन विलासात लिप्त असलेल्या माझ्या राक्षसरूपी मनाचे निर्दालन केले. (हे नरसिंह-हिरण्यकश्यपू कथेचे रूपक आहे.)

आणि मग…

स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

आता मी इतका रूपांतरित झालोय की माझ्या इंद्रियांना आता तुझ्या स्तोत्राशिवाय काही सुचत नाही. त्यांना पूर्वीची ओढ आजही लागते. पण ते कुणातरी परक्याचे दु:ख आहे असंच वाटतं मला.. कारण.. आता माझ्या स्मरणात फक्त तू आहेस.. हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

‘लागा चुनरी में दाग’ हे कळलं आणि ‘छुपाऊं कैसे’ हा घोर लागला..!! डोळ्यावर आलेले ते धुके म्हणजे डोळ्याचा भ्रम होता हे लक्षात आल्यावर देवा, आता मला तुझ्याकडे परतायची घाई झाली आहे.. सगळ्या इच्छा पूर्ण होऊन गळून पडल्या आहेत, (आता मला बोलावून घे तुझ्याकडे… कारण आता हे जग मला भीतीदायक वाटतं, ते मला तुझ्यापासून दूर नेतं..) भय इथले संपत नाही.. मज तुझी आठवण येते.. मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवली गीते..

देवत्वाची प्रचिती आल्यावर प्रामाणिकपणे केलेली ही आर्त आळवणी आहे, प्रार्थना आहे..!!

(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)

9967023653

हेही वाचायला विसरू नका शब्बे फुर्कत का जागा हूँ फरिश्तोhttps://bit.ly/2IiffET

Previous articleजमलं तर मेंदू आणि हृदयाचं सॅनिटायजेशन करा!
Next articleशब्बे फुर्कत का जागा हूँ फरिश्तो…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

4 COMMENTS

  1. ‘भय इथले संपत नाही’ चा प्रवास करतांना आपण एका खोल,गूढ अश्या गुहेकडे निळसर तिरीप पकडण्यासाठी झेपावतो आहोत असे वाटत राहाते.
    आपण हा प्रवास सुसाह्य केला.

  2. किती लाजवाब लिहिलं आहे हे !
    ही सर्व रूपकं आणि हे शब्दांचे साज नकळत अनावृत्त होत जातात नि उरतो फक्त निसंग प्रेमभाव ! कदाचित असंच काहीसं ग्रेसियस असणार आहे.
    माझ्या जाणीवा समृद्ध केल्याबद्दल मिथिलाताईस धन्यवाद…

  3. अप्रतिम लिहीले. प्रत्येक वेळेस वाचताना तितकंच आवडून वाचते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here