सरसंघचालकांचा अखंड भारत एक राहणार कसा ?

-दत्तप्रसाद दाभोळकर

इंग्रजांनी मनावर बिंबविलेली अखंड भारताची कल्पना भागवतांच्या मनात असेल, तरीही एक प्रश्न मनात येतो. हा असा अखंडित, सुसंघटित, एक घटनात्मक भारत किती काळ विघटित न होता राहील?- आज प्रचंड सैन्य बरोबर ठेवूनही काश्मीरमध्ये आपली दमछाक होत आहे. या देशातील वीस कोटी मुसलमान स्वत:ला दुय्यम नागरिक आणि असुरक्षित समजताहेत. बांगलादेश, पाकिस्तान यातील मुसलमान यात सामील झाल्यावर काय होईल? हा देश स्थिर कसा राहील?
………………………………………………………….

सरसंघचालक मोहनराव भागवत म्हणालेत, ‘विवेकानंदाच्या मनातील सनातन अखंड हिंदू राष्ट्र आम्ही लवकरच साकार करू.’

अस्वस्थ करणाऱ्या ज्वालाग्राही प्रश्नांचा ‘मीडिया वॉच’चे दिवाळी अंक सातत्याने आणि नेमकेपणाने वेध घेतात . त्यांच्या २०१६ च्या दिवाळी अंकातील परिसंवादाचा विषय होता. ‘संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का?’ त्या परिसंवादावर त्याच नावाचे पुस्तकही निघालेले आहे. त्यानंतरही काही दिवाळी अंकात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे या प्रश्नाचा वेध घेतला गेला आहे.- मात्र सर्वात महत्त्वाचा आहे, हा पहिला परिसंवाद… आणि आता या अंकातील कळसाध्याय वाटावा असा हा परिसंवाद. फार महत्त्वाचा, अस्वस्थ करणारा… आणि धमाल विनोदी!

मात्र या वेळच्या परिसंवादाला स्पर्श करण्यापूर्वी पहिल्या परिसंवादातील काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. त्या परिसंवादात संघाचे बौद्धिक क्षेत्रातील तेव्हाचे सर्वोच्च मा. गो. वैद्य यांनी सांगितले होते, ‘होय ते नक्की होईल. ते साकार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.’ ती प्रक्रिया सुरू झाली आहे, हे त्यावेळी माझ्या लक्षात आलेले नव्हते. पण ते होईल, हे सांगताना मी ठामपणे सांगितले होते ‘या देशातील घृणास्पद जातिव्यवस्था आणि विशेषाधिकार संपवत बौद्ध धर्म या देशात निर्माण झाला. आजही अवघड वाटणारा चीन, जपान, कोरिया असा प्रवास, त्यावेळच्या प्रवासातील आणि भाषेतील अडचणी लक्षात न घेता आणि हातात तलवार न घेता तो तेथे पोचला आणि स्थिरावला. मग तो भारतातून पूर्णपणे हद्दपार कसा झाला?’ या प्रश्नाचे उत्तर आपल्या शिष्यांना देतांना विवेकानंदांनी त्यांना सांगितले, ‘शंकराचार्यांनी कितीतरी बौद्ध श्रमणांना वादात हरवून जाळून मारले.’ विवेकानंद पुढे विचारतात ‘वादात हरला, म्हणून जाळून मारणे हा कुठला न्याय?’ पण जिंकला कोण आणि हरला कोण, हे शिवाचे गण ठरवत होते आणि मग शांततामय मार्गाने जीवन जगणाऱ्या आणि वादविवाद करणाऱ्या श्रमणांना जाळून मारण्याएवढा दहशतवाद त्यांनी पसरवला होता! त्या दहशतवादाने काय केले हे सांगताना विवेकानंदांनी सांगितलंय, ‘पुरीचे जगन्नाथ मंदिर हा बौद्धविहार होता. तो नष्ट करून हिंदूंनी तिथे त्यांचे हे मंदिर उभारलंय; आणि अशी अनेक मंदिरे आज बौद्धविहाराच्या जागी उभी आहेत.’- म्हणजे या पद्धतीने या देशात हिंदुराष्ट्र निर्माण होण्याची शक्यता मी मांडत होतो आणि मा. गो. वैद्य ते हिंदू राष्ट्र साकार होण्याची एक प्रक्रिया सुरू झाली आहे, असे जे म्हणत होते, ते शतप्रतिशत खरे होते आणि ते माझ्या त्यावेळी अजिबात लक्षात आलेले नव्हते.- कारण त्यावेळी विज्ञानातील बेडकाची ती मिथक कथा मला माहीत नव्हती.

ती गोष्ट आपण आता नीटपणे लक्षात घ्यावयास हवी. ती गोष्ट अशी आहे. ‘तुम्ही एखाद्या भांड्यातील पाणी साठ अंश सेंटिग्रेडपर्यंत तापवलेत आणि त्यात बेडूक टाकलात तर तो लगेच जिवाच्या आकांताने उडी मारून बाहेर पडतो आणि वाचतो. पण, जर तुम्ही पाण्याच्या भांड्यात बेडूक ठेवलात आणि नंतर सावकाश पाण्याचे तापमान ३० अंश, ४० अंश, ५० अंश आणि नंतर ६० अंश सेंटिग्रेड असे वाढवत गेलात, तर तो बेडूक तापमान साठ अंश सेंटिग्रेडवर गेल्यावर उडी मारून बाहेर येत नाही. शांतपणे काही काळ पाण्यात पाय मारत राहतो आणि नंतर काही क्षणात मरण पावतो.’- म्हणजे सर्वधर्मसमभाव आणि लोकशाही मानणारी रचना अशी अगदी सावकाश न कळत नाहीशी करता येते का? मा. गो. वैद्य म्हणताहेत ते खरे आहे का?

ते असो! ते आपण पुढे पाहाणार आहोत. त्यापूर्वी लक्षात घ्यावयास हवा ‘कहाणीतला ट्विस्ट!’- भागवतांचे तुफान विनोदी वाक्य! त्यांना विवेकानंदांच्या मनातील, रचनेतील सनातन अखंड हिंदू राष्ट्र निर्माण करायचंय! विवेकानंदांच्या मनातील सनातन हिंदू राष्ट्र आम्हाला निर्माण करायचंय असे म्हणणे म्हणजे, एखाद्याने ‘महात्मा गांधींच्या मनातील परदेशी दारू आणि मासे-मटण यांची भारतभर विक्री करणारी एक बहुराष्ट्रीय कंपनी मला स्थापन करावयाची आहे,’ असे म्हणण्यासारखे आहे किंवा एखाद्याने ‘गुरु गोळवळकर यांना अभिप्रेत असलेली संपूर्ण भारतभर ताजे गोमांस पुरविणारी यंत्रणा मी प्रस्थापित करतोय?’ असे म्हणण्यासारखे आहे.

म्हणजे, आपण प्रथम विवेकानंदांनी हा देश, हिंदू धर्मग्रंथ, हिंदू या देशातील दलित आणि मुसलमान यांच्याबद्दल काय मांडणी केली आहे, ती लक्षात घ्यावयास हवी.

१)हिंदू धर्माबाबत विवेकानंद काय म्हणालेत ते लक्षात घ्या. १८९७ मध्ये अमेरिका- युरोपमधून परत आल्यावर विवेकानंदांनी बेलूर मठाची स्थापना करावयास सुरुवात केली. त्यावेळी ५ मे, १८९७ रोजी धीरामाता यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले. ‘आजचा हिंदुधर्म जो अनेक घृणास्पद गोष्टींनी भरलेला आहे. तो दुसरे तिसरे काही नसून अवकळा प्राप्त झालेला बौद्धधर्म आहे, हे आपण हिंदूंना समजावून देऊ शकलो, तर फारशी खळखळ न करता तो सोडून देणे त्यांना शक्य होईल.

२) त्या आधी १९ मार्च, १८९४ रोजी (म्हणजे सर्वधर्मपरिषदेनंतर केवळ सहा महिन्यांनी) अमेरिकेतून वराहनगर मठातील आपला गुरुबंधू रामकृष्णानंद यांना पत्र पाठवून विवेकानंद सांगताहेत, ‘‘आपल्या देशातील बहुजन समाज अर्धपोटी आणि अर्धनग्न आहे आणि या धर्माने ज्यांना विशेषाधिकार दिलेत ते ब्राह्मण आणि पुरोहित त्यांच्याच जीवावर चैनीत राहताहेत. त्यांचे रक्त शोषताहेत- हा काय देश आहे की नरक? हा काय धर्म आहे का हे आहे सैतानाचे तांडव?’’

३) या देशाच्या अवनतीला विशेषाधिकार मिळालेले ब्राह्मण कारणीभूत आहेत, हे त्यांनी २० सप्टेंबर, १८९३ रोजी लिहिलेल्या (म्हणजे सर्वधर्मपरिषदेच्या एक वर्ष आधी लिहिलेल्या पत्रात सांगितलंय. त्या पत्रात ते लिहिताहेत, ‘‘देवा ब्राह्मणांच्या रूपाने आज या देशात हिंडणाऱ्या या राक्षसांच्यापासून माझ्या देशाचे रक्षण कर.’’

४) या देशाच्या अवनतीला घृणास्पद जातिव्यवस्था कारणीभूत आहे आणि ही रचना सनातन धर्मग्रंथांनी निर्माण केलेली आहे, हे विवेकानंदांनी अगदी खणखणीत शब्दात ७ ऑगस्ट, १८८९ रोजी पत्र पाठवून पूज्यपादांना सांगितले. त्यांनी आपल्या पत्रात लिहिलंय, ‘आपल्या देशातील प्राचीन धर्मग्रंथांच्याप्रमाणे जातिविभाग हा वंशगत मानलेला आहे. याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि स्पार्टा देशातील लोकांनी तिथल्या गुलामांच्यावर किंवा अमेरिकेतील लोकांनी तेथील निग्रोंच्यावर जेवढे अत्याचार केले, त्याहूनही अधिक अत्याचार आपण आपल्या देशातील दलितांवर केलेले आहेत.

५) विवेकानंद याच्याही पुढे जातात. या आपल्या प्राचीन धर्मग्रंथात अनेक कालबाह्य पूर्णपणे अवैज्ञानिक गोष्टी आहेत. त्या नाकारा असे ते सांगतात. १७ ऑगस्ट, १८८९ रोजी पूज्यपादांना पाठविलेल्या पत्रात ते त्यांना विचारतात, ‘‘ऋषींची वाणी म्हणजे वेद आणि ऋषी आणि वेद म्हणजे सर्वज्ञ. मग आजच्या विज्ञानातील साधे, सोपे, प्रयोगसिद्ध सिद्धांत जे सांगतात, ते हे वेद कसे काय नाकारतात? हे धर्मग्रंथ सांगताहेत ‘पृथ्वी ही त्रिकोणी असून, ती शेष नागाच्या मस्तकावर आहे.’- हे असले ज्ञान बरोबर घेऊन आपला आजच्या जगात कसा काय निभाव लागेल?’’

६) सर्वात महत्त्वाचे म्हणजे सनातन हिंदुराष्ट्र राहू दे, हा भूभाग अजून देशही बनलेला नाही. याची खंत त्यांच्या मनात आहे. लंडन येथे १८९६ मध्ये त्यांनी दिलेली मुलाखत स्वामी विवेकानंद ग्रंथावलीच्या सातव्या खंडात येते. त्या मुलाखतीत ते म्हणतात, ‘भारतात विविध मानववंशाचे एक राष्ट्र तयार होत आहे. युरोपात मानववंशाची जशी विविधता आहे, तशी ती भारतातही आहे. मला कधी कधी असे वाटते, आपण ज्यांना लोकशाही पद्धतीचे विचार म्हणतो ते स्वीकारले जाऊन भारतात एक राष्ट्र निर्माण होईल.’

७) महत्त्वाचे म्हणजे, हा भूभाग देश म्हणून उभा करावयाचा असेल, तर हिंदू-मुसलमान सहकार्य नव्हे, तर समन्वय हवा आणि ती समन्वयाची प्रक्रिया सुरू झाली आहे, हे विवेकानंद लक्षात आणून देतात. १० जून, १८९८ रोजी सर्फराज मोहंमद हुसेन यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘आमच्या वेदांतातील सिद्धांत कितीही सूक्ष्म आणि सुंदर असले, तरी समतेचा संदेश सर्वप्रथम व्यवहारात आणला तो इस्लामनेच. आम्ही व्यवहारातील समता इस्लामकडून शिकतोय.’ त्यापूर्वी १८९५ मध्ये ब्रह्मानंदांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘शिंप्यानी शिवलेले कपडे घालायलासुद्धा आपण मुसलमानांकडून शिकलोय.’ मात्र, हे सांगत असतानाच या दोन धर्मामधील आदानप्रदान सुरू झाले आहे, हे विवेकानंद लक्षात आणून देतात. अमेरिकेत बोस्टन येथे ट्वेंटिथ सेंच्युरी हॉलमध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, ‘भारतातील इस्लामवर वेदांतातील उदारमतवादाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे तो सहिष्णू आहे. जगभरच्या इस्लामपेक्षा वेगळा आहे.- या देशातील व परदेशातील धर्मांध शक्ती आमचा समन्वय तोडण्याचा प्रयत्न करताहेत. त्या धर्मांध शक्तींनी असे करू नये म्हणून आपण जागरूक असले पाहिजे.

८) धर्मांध शक्ती सांगत असलेल्या, मुसलमानांच्याबद्दल मनात द्वेष निर्माण करणाऱ्या गोष्टी खोट्या आहेत, हे सांगत हा दार्शनिक उभा आहे. त्यांची दोन पत्रे महत्त्वाची आहेत. पहिले २० सप्टेंबर, १८९२ रोजी (म्हणजे सर्वधर्म परिषदेच्या एकवर्ष आधी) आणि दुसरे नोव्हेंबर १८९४ मधील (म्हणजे सर्वधर्मपरिषदेनंतर एक वर्षांनी लिहिलेले) या दोन्ही पत्रात ते आठवण करून देतात ‘या देशातील धर्मांतरे मुसलमानांनी तलवारीच्या जोरावर केली, असे समजणे हे ‘महामूर्खपणाचेच’ आहे. त्यांनी धर्मांतरे केली पुरोहितांच्या आणि उच्चवर्णीय हिंदू जमीनदारांच्या जाचातून मुक्त होण्यासाठी! स्वाधीनतेसाठी! आत्मसन्मानासाठी!’

९) मुसलमान राजवट वाईट नव्हती. ती चांगली होती हे लक्षात घ्या म्हणून सांगताना विवेकानंदांनी दोन गोष्टी लक्षात आणून दिल्या. ‘भारताचा ऐतिहासिक क्रमविकास’ या निबंधात ते म्हणतात ‘मोगलाच्या दरबारात जे बौद्धिक वैभव होते, त्याचा अंशमात्र सुद्धा आपणाला पुण्याच्या आणि लाहोरच्या दरबारात दिसत नाही.’ आणि ‘भारताचा भावी काळ’ या आपल्या भाषणात ते आठवण करून देतात. ‘कोणतीही राजवट पूर्णपणे चांगली वा पूर्णपणे वाईट नसते. मुसलमान राजवटीचे या देशातील योगदान म्हणजे गरिबांची आणि दलितांची स्थिती सुधारली आणि विशेषाधिकार संपले.’

याच्या अगदी उलट, कडवा मुसलमान द्वेष आणि ‘हिंदूचाच हिंदुस्तान’ हा एककलमी कार्यक्रम घेऊन संघ आणि संघ परिवार उभा आहे. संघ फक्त हिंदुंच्याचसाठी होता. मग त्यांनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ यांच्याऐवजी ‘हिंदू स्वयंसेवक संघ’ असे का म्हटले नाही? हिंदू सोडून या देशातील इतर कोणीच राष्ट्रीय नाहीत, असे सांगण्याचा हा प्रयत्न होता. गुरु गोळवळकरांनी आपल्या ‘विचारधन’ या पुस्तकात लिहिलंय ‘फाळणीनंतर या देशात राहिलेले सारे मुसलमान पंचमस्तंभी आहेत.’ त्यांनी लालबहादूर शास्त्री यांना भेटून मुसलमानांचा मतदानाचा हक्क काढून घ्या म्हणून सांगितलंय. त्यांचा मुसलमान द्वेष या देशाच्या स्वातंत्र्यापेक्षाही मोठा आहे. ‘विचारधन’ या पुस्तकात त्यांनी सांगितलंय. ‘१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध फसले, कारण ज्यावेळी सैनिकांनी बहादुरशाह जफर याला बादशाहा म्हणून जाहीर केले, त्याचवेळी हिंदू या स्वातंत्र्यसंग्रामातून बाहेर पडले. मुसलमान बादशहापेक्षा इंग्रज बरे, हे त्यांनी ओळखले होते.’- आणि संघाचे सर्वात सर्वसमावेशक असे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी सांगितलंय आमचा फक्त एककलमी कार्यक्रम आहे ‘हिंदूचाच हिंदुस्तान म्हणजे हे हिंदू राष्ट्र आहे आणि ज्यावेळी आम्ही हिंदुराष्ट्र म्हणतो, त्यावेळी भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज आणि एकचालकानुवर्तीत्व देश हे आपोआपच येते.’

संघ आणि विवेकानंद या अशा दोन पूर्णपणे वेगळ्या आणि परस्परविरोधी विचारधारा घेऊन उभे आहेत; आणि छोट्या मोठ्या व्यावहारिक पातळीवरही तो किती टोकाचा आहे, हे लक्षात घ्यावयास हवे. मूठभर उच्चवर्णीयांनी हा विशाल भूभाग आपली वसाहत म्हणून वापरला आणि बहुजन समाजाला पाशवी वागणूक दिली. त्यांनी त्यांच्यासाठी संस्कृत भाषा निर्माण केली आणि वापरली. त्यांचे साहित्य, विज्ञान, धर्मग्रंथ आणि कायदे फक्त त्यांच्या भाषेत होते. त्या भाषेतील ग्रंथ वाचण्याचीसुद्धा बहुजन समाजाला परवानगी नव्हती. तसे काही करण्याचा प्रयत्न केला, तर अगदी रामराज्यातसुद्धा शंबुकाला मृत्युदंड होता. उच्चवर्णियांच्या हातातील पिळवणुकीचे महत्त्वाचे साधन असलेली संस्कृत आता मृत भाषा होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, संघाला ती राष्ट्रभाषा म्हणून हवी आहे. संघाने आपली एक शाखा म्हणून जनसंघ स्थापन केला त्यावेळी काय झाले, हे ‘हिंदू राष्ट्र’ या आपल्या पुस्तकात बलराज मधोक यांनी दिलेले आहे. ते लिहितात, ‘आम्हाला आमच्या घटनेत हिंदू राष्ट्र आणि संस्कृत ही राष्ट्रभाषा म्हणून उल्लेख करावयाचा होता.’ पण, त्यावेळी पटेलांची दहशत एवढी मोठी होती की, आम्ही तो विचार सोडून दिला. मात्र, १९५० मध्ये कानपूर येथे झालेल्या जनसंघाच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनात ‘संस्कृत ही राष्ट्रभाषा असावी आणि रामायण, महाभारत, उपनिषदे शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात असावी असा ठराव आम्ही पारित केला.’ आज संस्कृत ही हिंदुराष्ट्राची भाषा बनविण्याचा संघाचा कार्यक्रम सुरू आहे. त्यांची ‘संस्कृत भारती’ संस्था त्यासाठी कार्यरत आहे. ‘संस्कृत परिवार योजना’, ‘संस्कृत ग्राम योजना’, ‘संस्कृत बालकेंद्रम्’ असे त्यांचे उपक्रम आहेत. कर्नाटक राज्यातील मत्तुर नावाचे गाव त्यांनी पूर्ण संस्कृतमय केलंय. या गावात सर्वजण आता कन्नडमध्ये नव्हे, तर आपापसात संस्कृतमध्येच बोलतात म्हणून ही संस्था अभिमानाने सांगते! याचा अर्थ, एका गावातून प्रादेशिक भाषा हद्दपार करून आम्ही तेथे संस्कृत बसवली आहे, असा होतो आणि उत्तर प्रदेशाच्या बागपत जिल्ह्यातील बावली गाव! मध्यप्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील मोहद गाव, मध्यप्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील झिरीगाव आणि राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील गनोडा गाव या मार्गाने मार्गक्रमण करताहेत.

आणि विवेकानंदांनी ब्राह्मणांच्या हातातील पिळवणूकीचे एक भयानक हत्यार असलेली संस्कृत भाषा बुद्धदेवांनी किती प्रयत्नपूर्वक दूर ठेवली, हे ११ सप्टेंबर, १८९३ ते २८ सप्टेंबर, १८९३ या १७ दिवस चालेल्या सर्वधर्म परिषदेत सांगितलंय. त्यांनी सांगितले ‘बुद्धदेवांनी आपला सारा उपदेश त्यावेळच्या पाली वगैरे लोकभाषेत केला. त्यांचे काही ब्राह्मण शिष्य होते, ते म्हणाले, ‘आम्ही याचे संस्कृतमध्ये भाषांतर करतो.’ बुद्धदेवांनी त्याला ठामपणे विरोध केला. घृणास्पद जातिव्यवस्था निर्माण करून जोपासणारी आणि विशेषाधिकार जपणारी ही भाषा दूर ठेवा हा त्यांचा आदेश होता.
आणखी एक गोष्ट आहे. संघाला मनुस्मृतीवर आधारलेली घटना आणि कायदे हवे होते. देश स्वतंत्र झाला, त्यावेळी ऑर्गनायझर सातत्याने तसे लिहीत होता. ३० नोव्हेंबर, १९४९ च्या अंकात संपादकीयात त्यांनी लिहिले, ‘मनुस्मृतीतील कायदे आजदेखील अवघ्या जगाच्या प्रशंसेस पात्र आहेत. पण, आपल्या संविधान पंडितांना त्याचे काहीच पडलेले नाही आणि ११ जानेवारी, १९५० च्या लेखात त्यांनी म्हटलंय, ‘आंबेडकर हा एक खुजा माणूस आहे. गलिव्हर ट्रॅव्हलमधील अंगठ्याएवढा माणूस! मनुसारख्या हिमालयाची उंची असलेल्या माणसाबरोबर त्याची तुलना करणे चुकीचे आहे!
आणि विवेकानंदांनी ३ मार्च, १८९४ रोजी अमेरिकेतून सिंगारवेलू मुदलियार यांना पत्र पाठवून सांगितले ‘धर्माचा संबंध फक्त आत्म्याशी आहे. धर्माने सामाजिक नियंत्रणाचे कायदे बनवले, ही धर्माची सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळे आज सारी मानवजात दु:ख भोगते आहे. आणखी एक आहे. गोहत्या बंदी आणि लव्ह जिहाद हे संघाचे प्रमुख आवडते कार्यक्रम! गोहत्या बंदी या विषयाची विवेकानंदांनी खिल्ली उडवली आहे आणि लव्ह जिहाद व हिजाब या गोष्टींबाबत विवेकानंदांनी २४ जानेवारी, १८९४ आणि १९ मार्च, १८९४ रोजी अमेरिकेतून आपल्या मद्रासमधील शिष्यांना पाठविलेल्या पत्रात त्यांना सांगितलंय, ‘माणसाला जिवंत राहण्यासाठी फक्त हवा, पाणी, अन्न पुरेसे नसते. त्याला स्वातंत्र्य हवे असते आणि स्वातंत्र्य म्हणजे केवळ विचार आणि उच्चार याचे स्वातंत्र्य नव्हे, तर जोपर्यंत इतरांचे नुकसान होत नाही, तोपर्यंत विवाह कोणाशी करावा, कपडे कोणते घालावेत आणि कोणते अन्न खावे, याचे प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य हवे.’

पुढे जाण्यापूर्वी अगदी आवश्यक असे थोडे विषयांतर करावयास हवे. आजचा भा.ज.प. नीट लक्षात घ्यावयास हवा. संघ आणि भाजप यांचे आजचे नातेही समजावून घ्यावे लागेल. आपण अनेकदा एक गोष्ट विसरतो, कोणतीही संघटना, कोणताही पक्ष, त्यांच्या विचारधारा आपण समजतो तशा एकसंघ नसतात. बाहेर दाखवला जातो, तो चातुर्याने निर्माण केलेला आभासी, अस्थिर पण आपणाला स्थिर वाटतो, असा गुरुत्वमध्य! त्या अस्थिर गुरुत्वमध्याच्या दोन्ही बाजूला, इतरांच्या फारसे लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने गुरुत्वमध्याला आपल्या बाजूला ओढणाऱ्या डाव्या आणि उजव्या किंवा पुरोगामी आणि प्रतिगामी विचारधारा असतात.

नेहरू समाजवादी आहेत, पण काँग्रेसमधील समाजवादी गट ‘काम कमी उपद्रव जास्त’ या प्रकारातील आहे, असे लक्षात आल्यावर त्यांनी आणि (गांधीजींनीही?) त्यांना अगदी सहजपणे पक्षाच्या बाहेर जावयास लावले. अर्थातच, हे खरे की खोटे, यावर मतमतांतरे असू शकतात. मात्र, त्यानंतर काँग्रेसमध्ये एक सशक्त हिंदुत्ववादी गट कायम कार्यरत राहिला. राजेंद्रप्रसादांच्यासारखे काही मोठे नेते त्याचे नेतृत्व करत होते. देश स्वतंत्र होण्याच्या फक्त सात दिवस आधी राजेंद्रप्रसादांनी नेहरूंना पत्र पाठवून सांगितले, ‘आता गोहत्या बंदीचा कायदा झाला पाहिजे. गांधीजींची इच्छा अशीच आहे.’ अनेक व्यापात गुंतलेले असतानाही नेहरुंनी त्यांना अगदी लगेच पत्र पाठवून कळविले, ‘बापूंची इच्छा गायींचे रक्षण व्हावे, अशी आहे. त्यांना असा कायदा व्हावा, असे वाटत नाही. ज्यांना हा देश पाकिस्तानच्या मार्गाने न्यावयाचा आहे. (म्हणजे ज्यांना हा देश हिंदुराष्ट्र व्हावे असे वाटते) असा समाजातील एक गट त्यासाठी कार्यरत आहे. आपण सावध राहिले पाहिजे.’ मात्र नेहरुंनी एवढ्या स्पष्ट शब्दात सांगूनसुद्धा हा गट कार्यरत होता. २ एप्रिल, १९५५ मध्ये शेठ गोविंददास यांनी गोहत्याबंदीचा कायदा व्हावा म्हणून लोकसभेत विधेयक आणले. अनेक काँग्रेस खासदारांचा त्यांना छुपा पाठिंबा होता. हे विधायक बारगळले, कारण विधेयकाला उत्तर देताना नेहरुंनी सांगितले, ‘असा काही कायदा या देशात होणार असेल, तर नेहरु उद्यापासून या देशाचे पंतप्रधान नसतील!’

आपण लक्षात घ्यावी अशी गोष्ट म्हणजे, काँग्रेसचे शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात ‘गोहत्या बंदी’चा कायदा पारित झाला. हैद्राबाद संस्थानात आयुष्यातील सुरवातीची वर्षे गेल्याने नरसिंहराव आणि शंकरराव या हिंदुत्ववादी गटातील आहेत. त्यातून सत्यसाईबाबा आणि चंद्रास्वामी यांच्या पाया पडत त्यांनी राजकारणाचा प्रवास केलाय! शंकरराव केंद्रीय गृहमंत्री असताना आणि नरसिंहराव पंतप्रधान असताना कायदा आणि संसद यांना आम्ही मानत नाही, असे सांगत हिंसक जमाव रस्त्यावर उतरवून बाबरी मशिदीचा विध्वंस झाला. या आणि अशा अनेक कृतींच्यामधून काँग्रेसमधील हिंदुत्ववादी गटांनी ‘हिंदूंचाच हिंदुस्थान’ हा एककलमी कार्यक्रम असलेल्या पक्षाला सत्तेत केंद्रस्थानी आणण्यास फार कौशल्याने मदत केली.
आणखी एक गोष्ट आहे. जनसंघाचे मोठे नेते नानाजी देशमुख उदारमतवादी होते, पण ते राजकाणातील चाणक्य होते . त्यांनी सांगितलं, ‘जनसंघ वाढत नव्हता. माझ्या लक्षात आले. या देशातील जनता संघ, जनसंघ यांना गांधींचा हत्यारा मानते आणि गांधींच्या हत्यारा असलेल्यांना या देशातील लोक जवळ उभे करणार नाहीत. म्हणून मी लोहिया आणि जयप्रकाश यांच्या जवळ गेलो. त्यांनी जनसंघाला स्वीकारले. मग या देशातील लोकांनी जनसंघाला स्वीकारले.’ मधू लिमये असे काही करू नका म्हणून लोहिया आणि जयप्रकाशांना सांगत होते. पण, या दोन महानायकांनी त्यांचे सांगणे ऐकले नाही. ते असो! वळचणीला असलेल्या संघ, जनसंघ, भाजप यांना सत्तेच्या केंद्रस्थानी आणण्यात फार मोलाचे योगदान काँग्रेसमधील हिंदुत्ववादी गट आणि लोहिया जयप्रकाश यांचे आहे.

खरं तर, हे विषयांतरातील विषयांतर झाले! ते गरजेचे होते की चुकीचे, हे प्रत्येक वाचकानेच ठरवायचंय! मात्र काँग्रेसमध्ये होते, त्याहूनही प्रबळ अंतर्गत विरोधी गट संघ आणि जनसंघ म्हणजे नंतरचा भाजप यांच्यामध्ये होते. संघामध्ये वेगळ्या प्रकारच्या कार्यपद्धतीची मांडणी आणि मागणी करत देवल, पेंडसे उभे राहिले. त्यांना संघ सोडावा लागला किंवा त्यांना गुरुजींनी बाहेरचा रस्ता दाखवला आणि अगदी वेगळी कडवी भूमिका घेऊन आणि अशा प्रकारची संघटना कशी उभारता येते, हे सांगत संभाजीराव भिडे उभे होते. त्यांनाही संघ, शाखा सोडावी लागली.
संघाने आपली एक शाखा म्हणून जनसंघ स्थापन केला. त्यावेळी संघात फक्त हिंदूनाच प्रवेश होता. जनसंघात मात्र हिंदू- मुसलमान दोघांनाही प्रवेश होता. गुरुजींनी फार कौशल्याने त्यात कडवा हिंदुत्ववाद मांडणारे बलराज मधोक, सर्वसमावेशक हिंदुत्व सांगणारे नानाजी आणि या दोन टोकांच्या भूमिकेत समन्वय साधणारे वाजपेयी, अडवाणी अशी रचना केली होती. या चौघांच्यात झालेली झटापट समजून घेणे, हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. मात्र, त्यातील चार महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यावयास हव्या.

१) वाजपेयी, नानाजी जनसंघातून मधोक यांना बाहेर फेकण्यास यशस्वी झाले.
२) दीनदयाळांचा खून नानाजी आणि वाजपेयी यांनी मिळून केलाय म्हणून सांगणारे पुस्तक मधोकांनी प्रसिद्ध केले. त्या दोघांना बदनाम करण्याची फार मोठी मोहीम मधोकांनी राबवली. स्वत: राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून उभे राहिलो, तर भाजपमध्ये उभी फूट पाडता येईल, ही व्यूहरचना मधोकांनी फार कल्पकतेने राबविण्याचा प्रयत्न केला.२
३) बाबरी मशिदीचा विध्वंस करणे ही फार भयावह घटना आहे. त्यामुळे अखंड भारत निर्माण करणे अशक्य आहे, हे नानाजींनी सांगितले.३
४) संघाचे स्वयंसेवक हिंदुत्व म्हणजे मुसलमान आणि ख्रिश्चन द्वेष असे समजतात, हा देश अखंड ठेवण्याच्या मार्गातील ही फार मोठी अडचण आहे, हे नानाजींनी सांगितले.४

तसे पाहिले, तर वरील सर्व चर्चा आज अनावश्यक आहेत. कारण, आज भाजपने नानाजी, वाजपेयी यांनाच नव्हे, तर अडवाणींनासुद्धा दूर ठेवलंय! संघाने, म्हणजे गुरुजींनी फार चातुर्याने सावरकरांना संघ, जनसंघ यांच्यापासून दूर ठेवले होते. आज भाजपचे सर्वेसर्वा असलेले अमित शहा यांच्या टेबलामागे गुरुजींचा नाही, तर सावरकरांचा फोटो असतो! सावरकरांचा मुसलमान द्वेष पराकोटीचा आहे. स्त्री म्हणजे एक भारवाहू पशु आणि संतती निर्माण करणारे पुरुषांच्या हातातील एक खेळणे एवढेच, त्यांचे सांगणे आहे. आपले हे तत्त्वज्ञान सांगताना त्यांनी शिवाजी महाराजांनाही सोडलेले नाही. ते सांगतात, ‘शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराची सून परत केली, हे चुकीचे आहे. ती परत करणे, म्हणजे शत्रूची वीण वाढवणे. ती आपल्या एखाद्या हुजऱ्याला भेट देत आपली वीण वाढवायला हवी होती.’ सावरकरांनी गुरु गोळवळकरांना जनसंघाबद्दल जे सांगितले होते, ते शतप्रतिशत खरे आहे. त्यांनी सांगितले होते, ‘गुरुजी एखाद्या राजकीय पक्षात केवढी ताकद निर्माण होते, त्याची तुम्हाला कल्पना नाही. जोपर्यंत तुमच्या उंचीचा सरसंघचालक असेल, तोवर तुमची ही राजकीय शाखा संघाच्या नियंत्रणात राहील. मात्र, त्यानंतर ‘अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी’ म्हणून संघ त्या राजकीय शाखेच्या मागे फरफटत जाईल!’

असो! संघाच्या, म्हणजे खरंतर आजच्या भाजपच्या मनातले आणि विवेकानंदांच्या मनात अजिबात नसलेले हे हिंदू राष्ट्र साकार होईल का? किंवा खरंतर मा. गो. वैद्य म्हणतात त्याप्रमाणे ते तरलस्वरूपात साकार झालेलेच आहे? आणि सावकाश तापमान वाढत असलेल्या पाण्यात ५० अंश सेंटिग्रेड तापमानावर सारे काही सुरळीत आहे, असे समजून मजेत पोहत राहणाऱ्या बेडकाप्रमाणे आपण ते लक्षात घेतलेले नाही? खरी गोष्ट अशी आहे की, सर्वधर्म समभाव आणि लोकशाही मानणारी आपली रचना आज खिळखिळी झाली आहे. आज आपल्याभोवती तरल अवस्थेत सर्वत्र आहे, एक घटनात्मक एकचालकानुवर्तीत्व हिंदू राष्ट्र. काही काळाने या राष्ट्रात मनुस्मृतीवर आधारलेले कायदे असतील. गिर्वाणभारती संस्कृत, म्लेंछ लोकांची भाषा असलेल्या इंग्रजीची जागा घेईल. प्रादेशिक भाषांचे अस्तित्व संस्कृतच्या साहाय्याने काही काळ तग धरून असेल. भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज असेल.

मात्र, आता महत्त्वाचा प्रश्न उरतो, तो भागवतांच्या या अखंड भारताच्या सीमा कोणत्या? इंग्रजांनी त्यांचे सैनिकी सामर्थ्य आणि प्रशासकीय कौशल्य यांच्या जोरावर जो भूभाग एकत्र ठेवला तो आमचा अखंड भारत, अशी त्यांची कल्पना असेल, तर बांगलादेश आणि पाकिस्तान त्यात येतात. मात्र, नेपाळ आणि अफगाणिस्तान त्यात येतात की येत नाहीत? इंग्रजांनी १९३७ मध्ये भारतापासून वेगळा केला नसता, तर ब्रह्मदेश या देशाचाच भाग होता. मग तो भागवतांना अखंड भारतात हवा आहे की नको? म्हणजे, खरंतर या अखंड भारतात कोण कोण, हे भागवतांनी एकदा भाजपला विचारून सांगितले पाहिजे. एकवेळ यांच्या मनात सिलोन, जकार्ता, मलेशिया, कंबोडिया, व्हिएतनाम वगैरेसुद्धा होते असे सांगणारे संदर्भ आहेत!
हे वरचे जे जटील प्रश्न जरी बाजूला ठेवले, तरी अगदी पाकिस्तान आणि बांगलादेश एवढ्याच इंग्रजांनी मनावर बिंबविलेली अखंड भारताची कल्पना भागवतांच्या मनात असेल, तरीही एक प्रश्न मनात येतो. हा असा अखंडित, सुसंघटित, एक घटनात्मक भारत किती काळ विघटित न होता राहील? आज प्रचंड सैन्य बरोबर ठेवूनही काश्मीरमध्ये आपली दमछाक होत आहे. या देशातील वीस कोटी मुसलमान स्वत:ला दुय्यम नागरिक आणि असुरक्षित समजताहेत. बांगलादेश, पाकिस्तान यातील मुसलमान यात सामील झाल्यावर काय होईल? हा देश स्थिर कसा राहील? किंवा अगदी आजच्या भारतातही लोकशाही खिळखिळी झाली? लोकशाहीतील फक्त कर्मकांडे बाकी उरली आणि संघराज्याचे एक राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला किंवा यशस्वी न होताही कायम सुरू ठेवला, तर या देशाचे काय होईल?

देश का फुटतात? कसे फुटतात? किंवा फुटलेले किंवा फोडलेले देश अगदी सहजपणे एकत्र का येतात? जर्मनी अगदी सहजपणे एकसंघ झाला. बांगलादेशाला वेगळे व्हावयाचे होते. मात्र, भारताने तीन हजार सैनिकांचे बलिदान दिले नसते, तर ते त्यांना शक्य नव्हते. म्हणजे, देश तोडायला मदत करणारा किंवा तशी प्रबळ इच्छा असलेला दुसरा प्रबळ देश जवळ टपून बसलेला हवा असतो. मात्र, पुष्कळदा त्याचीही गरज नसते. देश प्रचंड अस्वस्थ असतो. तो फुटण्याच्या उंबरठ्यावर उभा असतो. मात्र, आपण फुटणार हे ही त्याला माहीत नसते. भोवतालच्या जाणकार लोकांनाही याचा अजिबात अंदाज येत नाही. रशिया १९९० मध्ये कोसळला. त्याचे तुकडे झाले. त्यावेळी रशियाकडे सर्वोत्कृष्ट तंत्रविज्ञान होते. अंतराळातील पहिला माणूस युरी गागारिन रशियन होता. रशियाकडे काही हजार ॲटमबॉम्ब होते. सर्वोत्कृष्ट सैन्यदल होते. रशिया कोसळला त्याच्या एक महिना आधी मी रशियात मुक्तपणे भटकलो होतो. अनेक गोष्टी पहिल्या होत्या. अनेक उच्चपदस्थ लोकांशी संवाद साधला होता. त्यावर आधारित ‘लाल ताऱ्यातून धुक्याकडे’ हा प्रदीर्घ लेख किर्लोस्करच्या दिवाळी अंकात लिहिला होता. ‘अक्षर प्रकाशनाने’ प्रसिद्ध केलेल्या ‘ना डावे ना उजवे’ या माझ्या पुस्तकातही तो उपलब्ध आहे. त्या लेखात मी पुन:पुन्हा लिहिले होते. भोवताली सर्वत्र तसं ‘ओके’ दिसतंय, पण माणसे प्रचंड गोंधळलेली आहेत. काहीजण भेदरलेली आहेत. मात्र, त्यामुळे एका क्षणात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे हा देश कोसळेल, असे मात्र माझ्या लक्षात आले नव्हते. जगातल्या कुठल्याही वार्ताहराने वा विचारवंताने अशी काही नोंद केलेली माझ्या वाचनात नाही.

भारतात आज अशी प्रचंड अस्वस्थता आहे. काही कोटी नागरिक भेदरलेल्या अवस्थेत आहेत आणि नेफा, अरुणाचल प्रदेश, लडाख, आसाम यांचे लचके तोडायला बलाढ्य चीन टपून बसलेला आहे. क्षीण का होईना, खलिस्थानचे नारे उठताहेत आणि काही उच्च पदस्थ द्रविडीस्थानची आठवण करून देताहेत!

हे असे असताना आपण आता फक्त वाट पाहायची आहे, ‘यावच्चंद्रदिवाकरौ’ या पृथ्वीवर राहण्यासाठी अवतीर्ण होणाऱ्या हिंदू राष्ट्राच्या सीमा कोणत्या, कोणकोणते देश त्यात सामील असतील, याबद्दल सरसंघचालक मोहनराव भागवत काय सांगताहेत ते ऐकण्याची- कारण ही भारतभूमी ही आर्यवर्त आहे आणि ‘कृप्यन्यू विश्वम् आर्यवत’ ही आमची प्रतिज्ञा आहे.

साभार: ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक -२०२२

(लेखक नामवंत विचारवंत आणि वक्ते आहेत )
९८२२५०३६५६

संदर्भ-

१) नानाजी देशमुख यांनी मला ध्वनिमुद्रितेवर दिलेल्या सविस्तर मुलाखतीत हे सारे आहे. ती मुलाखत कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक १९९५ मध्ये प्रथम प्रसिद्ध झाली. त्यानंतर ‘प्रकाशवाटा, दुर्गा भागवत आणि नानाजी देशमुख’ या माझ्या पुस्तकात त्याचा समावेश करण्यात आलाय.
२) या संदर्भातील आपली पूर्ण रचना सांगणारे स्वहस्ताक्षरित पत्र मला बलराज मधोक यांनी त्यावेळी पाठवले होते. (त्या पत्राची प्रत मी ‘मीडिया वॉच’कडे दिलेली आहे.
३) संदर्भ क्रमांक १ मधील
४) नानाजींच्या मृत्यूनंतर नानाजींचा उजवा हात समजले जाणारे, ऑर्गनायझर, पाञ्चजन्य यांचे एकवेळचे सर्वेसर्वा यादवराव देशमुख यांचा माझा पत्रव्यवहार झाला होता. त्या पत्र व्यवहारातील यादवराव देशमुख यांच्या पत्रातील हे वाक्य आहे.

Previous articleमिशन एआय: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या चित्तथरारक विश्‍वात
Next articleगोव्यातील पोर्तुगाल
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here