सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली प्रत्येक क्षेत्रात मुस्कटदाबी-अरुणा सबाने

विदर्भ साहित्य संघाचे सातवे लेखिका संमेलन नुकतंच नागपूरजवळच्या थडीपवनी येथे पार पडलं . या संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा सबाने याचं अध्यक्षीय भाषण जोरात गाजलं. स्त्रियांना पंरपरेच्या नावाखाली पारंपारिक चौकटीत अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती आणि प्रवृतीचा खरपूस समाचार घेण्यासोबतच साहित्यिक , सामजिक , सांस्कृतिक क्षेत्रात होत असलेली मुस्कटदाबी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच याविषयातही त्यांनी जोरदार आवाज उठविला . एकीकडे अरुणा सबाने  साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मुस्कटदाबी विरोधात बोलत असताना विदर्भ साहित्य संघाने या भाषणाच्या लिखित प्रती साहित्य रसिक आणि माध्यमांपर्यंत पोहोचणार नाही याची ‘काळजी’ घेतल्याने या भाषणाची अधिकच चर्चा झाली . लेखिका संमेलनातील अरुणा सबाने यांच्या भाषणाचे हे संपादित अंश …

…………………………………………………………..

माझे सर्व बंधू भगिनी, सखेसोयरेहो,

या विचारपीठावरून आज केवळ साहित्याविषयी, त्यातील प्रश्‍नांविषयी बोलायचे आहे, याची मला जाणीव आहे. साहित्य, मी, तुम्ही आणि आपण यावर आज मी आपणासोबत संवाद साधणार आहे. माझ्या स्वत:बद्दल बोलायचे झाल्यास, मी एका श्रीमंत शेतकरी कुटुंबातून आले. लहानपणापासूनच राजकीय आणि सामाजिक वातावरणाचे बाळकडू मला मिळाले. घरातच प्रचंड ग्रंथ, नियतकालिकं उपलब्ध असायची. घरात भाऊ , काका राजकारणात असल्यामुळे राजकारण्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घर सारखं गजबजलेलं असायचं. त्यामुळे आपोआप अनेक गोष्टींचे संस्कार झालेत. खुद्द आईलाच वाचनाची खूप आवड असल्यामुळे लहानपणीच उत्तम पुस्तके वाचायला हातात यायला लागलीत. मी कधी लिहिती झाले मला कळलेही नाही. पण सातवीत असतानाच  आकाशवाणीच्या ‘बालविहार’वरून माझी स्वरचित कविता प्रसारित झाली आणि माझ्या घरच्यांनी हेतुपुरस्सर मला वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून देणे सुरू केले. नागपुरात आल्यावर माझ्या या आवडीला खतपाणी घालणारं वातावरण मिळालं. म. य. दळवींसारख्या जाणकार आणि पुरोगामी विचारांच्या संपादकांच्या  सहवासात मला दोन वर्षे घालवता आली आणि अतिशय लहान वयातच माझ्यावर लेखनाचे संस्कार झालेत. त्यांनी ‘लोकमत’लाच मला लिहितं केलं. त्यांच्यानंतर कमलाकर धारप सरांनी माझी दखल घेतली. वर्धेमध्ये असताना ‘प्रतापगडचे वारे’ सारख्या छोट्याशा सायंदैनिकातून लिहिणारी मी, मला चक्क ‘लोकमत’ मधून लिहायची संधी मिळाली. त्यामुळे माझी लेखनाची उमेद वाढली. आकाशवाणीसारख्या प्रसारमाध्यमाचे उमेदीच्या काळात आपल्या सार्‍यांनाच फार अप्रुप असते. त्यावेळी पुष्पाताई काणे आणि अनंत अडावदकर यांनी मलाच काय अनेक बहुजन नवलेखकांना संधी दिली. माझ्या सुरुवातीच्या लेखनकार्यात ‘लोकमत’, ‘नागपूर पत्रिका’, ‘बायजा’, ‘मानुषी’ आणि आकाशवाणी यांचा फार मोठा वाटा आहे. याचा इथे मी उल्लेख करणं हे माझं कर्तव्यच आहे. साहित्य हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, हे मला फार लवकर गवसले. त्यामुळे मेडिकलला जायला म्हणून नागपुरात आलेली मी, कधी मराठी साहित्यिकांच्या गोतावळ्यात रमायला लागले मलाच कळले नाही. एकीकडे समाजातले प्रश्‍न मला दिसायचे, ते कसे सोडवावे याचा मी विचार करायचे आणि त्यातूनच मी लिहिती झाले हे खरे आहे.

१९७५ नंतरचा काळ हा नवविचार करणार्‍यांसाठी, आंदोलन, मोर्च्यांनी प्रेरित झालेल्यांसाठी फार महत्त्वाचा होता. विदर्भात सीमाताई साखरे, रुपाताई कुलकर्णी, वामन निंबाळकर, कुमुद पावडे, नलिनीताई लढके यांच्या चळवळींसोबतच सगळीकडे स्त्रीमुक्तीचे वारे वाहायला लागले होते. नेमकी याच काळात मी नागपुरात आले आणि या सर्वच चळवळींनी मला आकर्षित केलं. यातून माझ्यासकट अनेक लेखक तयार झालेत. चळवळीतून येणार्‍या लेखकांच्या लेखणीला अनुभवाची धार होती, शब्दांमध्ये कडवटपणा होताच, पण तो व्यवस्थेवर, जातींच्या भिंतींवर प्रहार करणारा होता. अन्यायाविरुद्ध लढणारा आवाज होता. न्याय देणारा होता. स्त्रीवाद म्हणजे काय हे मला कळण्याच्या आतच वाचकांनी माझ्यावर मी स्त्रीवादी असल्याचा शिक्का मारला. आजच्या काळात वावरताना अनेक लेखकांच्या अनुभवाच्या अस्सलपणापेक्षा चकचकीत जगाची आस त्यांच्या लेखनातून दिसते. सुखलोलुप आयुष्य जगत असताना सुखाचा इतका मेद अंगावर चढलेला असतो की त्या लेखकांना श्रमजीवींचे प्रश्‍न, शेतकर्‍यांचे प्रश्‍न, शोषित स्त्रीपुरुषांचे प्रश्‍न, कामगार, बालकामगार, वेश्या यांचे प्रश्‍न दिसतच नाही. एवढेच कशाला शिक्षणातले, बेरोजगारांचे तरी प्रश्‍न किती लेखकांना दिसतात ? आजही जागतिकीकरणाचा ग्रामीण जीवनावर होणार्‍या परिणामाबद्दल किती लेखक लिहिताना दिसतात ? इतर काय लिहितात याचा विचार आपण करण्यापेक्षा ज्येष्ठ विचारवंत आम्हा सर्वांचे आदरणीय आ. ह. साळुंखे सर म्हणतात तसे ‘आता आमच्या धडावर आमचंच डोकं असलं पाहिजे.’ शोषितांच्या प्रश्‍नांना त्यांची ओळख मिळवून देण्यासाठी आता आपणच त्या पद्धतीनं लिहिलं पाहिजे असं आ. ह. सांगतात.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी २००४ मध्ये आम्ही काही कार्यकर्त्यांनी सर्व राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कलावंत सर्वांना एकत्र केले होते. अनेकांनी आपला पाठिंबा भाषणातून व्यक्त केला. त्यावेळी एक  फार मोठे  साहित्यिक तिथे उपस्थित होते. आम्ही त्यांनाही दोन शब्द बोलण्याची विनंती केली. ते म्हणाले, ‘शेतकरी आत्महत्या करतात, हे फक्त मी रोज वर्तमानपत्रातून वाचतो. बाकी या विषयातले मला काहीही माहिती नाही. या विषयाशी माझा दुरान्वयानेही संबंध नाही. इथे मला कशाला बोलवले मला कळतच नाही.’ एक संवेदनशील लेखक इतकं बेजबाबदार विधान कसं काय करू शकतात? म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय बोलता किंवा लिहिता येत नसेल तर लब्धप्रतिष्ठित सुखवस्तू केवळ स्वत:चं आयुष्य जगणारी माणसं आणि महान लेखक यांच्यात काय फरक असणार? कृषिप्रधान देशातला एक  प्रथितयश कलावंत साहित्यिक असं म्हणतात, याचे मलाच नव्हे त्यावेळी अनेकांना नवल वाटले. शेतकर्‍यांचे दु:ख जाणून घ्यायला, ते आत्महत्या का करतात, हे जाणून घ्यायला प्रत्यक्ष शेतकरीच असायला हवे काय? किंवा आपल्या घरातच आत्महत्या व्हायला हवी काय? परदु:ख जर आपल्या मनाला शिवतच नसेल, तर आपण कुठल्या कॅटेगरीतले लेखक आहोत? याचा विचार त्यांनीच करायला हवा. ते मान्यवर लेखक आहेत यात मला शंकाच नाही, त्यांच्या साहित्याबद्दल मला प्रेमच आहे; पण मग अशी ‘पोझ’ का घ्यावी? ‘मला याबद्दल काही माहितीच नाही’, असं सांगताना आपण काहीतरी वेगळेच आहोत, असंच दाखवायचं असतं काय? ज्यांचे सांस्कृतिक वर्चस्व समाजावर असते, असे अनेक लेखक, साहित्यिक-सामाजिक प्रश्‍नांची माहिती घेऊन त्यावर भूमिका घेऊ इच्छित नाही, याचे मला दु:ख आहे. सर्वांना सर्वच माहिती असायला पाहिजे हे आवश्यक नाही, याचीही मला जाणीव आहे, पण शेतकरी आत्महत्या हा रोज वर्तमानपत्रांमधून वाचण्यात येणारा प्रश्‍न आहे. आपल्या जगण्यामरण्याच्या विषयाशी संबंधित विषय आहे, त्याबद्दल एखादा लेखक असे विधान कसे करू शकतो, ही माझी खंत आहे. सुखलोलुप आणि ‘स्व’च्या चौकटीत मग्न असल्यामुळे ‘श्रमजीवी वर्ग’ अशा लेखकांना क्षुल्लक वाटतो हेच खरे.

आज मात्र आपण सर्वच फार वेगळ्या मार्गावर येऊन उभे आहोत. एकविसाव्या शतकात आज आपण वावरतो आहोत. विसाव्या आणि एकविसाव्या शतकातील अनेक महत्त्वाच्या घटनांचे आपण साक्षीदार आहोत. जे जे परिवर्तन झाले, त्याचा मराठी साहित्यावर अपूर्व असा खोलवर परिणाम झालेला आहे. मधला काळ राजकीय स्वातंत्र्य की सामाजिक स्वातंत्र्य या तणावातही गेला. तत्कालीन समाजमनावर परंपरेचा, रुढीवादाचा, जातीयवादाचा फार मोठा पगडा होता. परंतु १९ व्या शतकाच्या मध्यापासून सामाजिक स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या ज्योतिबा फुले, न्या. रानडे, गोपाळ गणेश आगरकर, छत्रपती शाहू महाराज,  इ. सामाजिक कार्यकर्त्यांनी अफाट प्रयत्न केलेले दिसतात. त्याचवेळी सावित्रीबाई फुले आणि आमच्या विदर्भाच्या ताराबाई शिंदे यांनीही आपल्या शब्दांच्या फटकार्‍याने समाजात जागृती आणण्याचे काम केले. ताराबाई शिंदे या त्या काळातल्या अशा क्रांतिकारक लेखिका आहेत की ज्यांनी अख्ख्या समाजालाच प्रश्‍न विचारला होता आणि त्यासाठी एक निबंधच लिहिला की, व्यभिचारातून बाळ जन्माला आले, आणि समाजाच्या भीतीने जर आईने नवजात अर्भकाला रस्त्यावरील कचर्‍याच्या ढिगारावर फेकले तर शिक्षा आईला होते, मात्र ज्या पुरुषाच्या समागमामुळे बाळ जन्माला आले त्या अर्भकाच्या बापाला कोणती शिक्षा? त्यावेळी ताराबाई केवळ बोलून किंवा लिहून थांबल्या नाहीत तर तो खटला त्या लढल्या, जिंकल्या आणि बाईला न्याय मिळवून दिला. त्यानंतर त्यांनी  ‘स्त्रीपुरुष तुलना’ या नावाने एक छोटीशी पुस्तिका छापली. त्यावेळच्या समाजकंटकांनी ती  दडपून ठेवण्याचा प्रयत्न केला. य. दि. फडक्यांनी तर त्या पुस्तिकेला ‘चोपडी’ म्हणून हिणवले. पण आजही त्या चोपडीचे महात्म्य संपलेले नाही. वीस पानांच्या चोपडीवर अनेकांनी प्रबंध लिहिले. मालशेंनंतर आज डॉ. विलास खोले, डॉ. सीमा साखरे, डॉ. नागनाथ कोतापल्ले सारख्या अभ्यासू लेखकांनी त्यावर पुस्तकं लिहिलीत. हा करिष्मा कार्यकर्त्यातून लेखक होणार्‍यांचा असतो. पहिल्याच दिवशी कर्तृत्वहीन नवर्‍यासोबत राहायचं नाही, असं स्पष्टपणे वडिलांना सांगून आयुष्यभर परत सासरी न फिरकणार्‍या, लग्न झालं असूनही नवर्‍याचं नाव न लिहिणार्‍या, मंगळसूत्र न घालणार्‍या महाराष्ट्रातील पहिल्या क्रांतिकारक लेखिका ताराबाई शिंदेच आहेत हे या विचारपीठावरून आज मी सांगितलंच पाहिजे. कारण नवर्‍याचं नाव सोडायचं असेल, आईचं नाव मुलांना लावायचं असेल तर आजही स्त्रियांना, मुलांना त्यासाठी संघर्ष करावाच लागतो आहे.ताराबाई, सावित्रीबाई यांनी आपल्या लेखणी आणि कृतीद्वारे, सत्यशोधक चळवळीतून बहुजन समाजाला हजारो वर्षांच्या विषमतावादी प्रवृत्तीच्या अंधारातून समतावादी ज्ञानाच्या प्रकाशात आणण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यानंतरच्या बाबासाहेबांच्या चळवळीतून तर अनेक लेखिका समोर आल्यात. हळूहळू आधुनिक मराठी साहित्यात सामाजिक जाणीव मोठ्या प्रमाणात दिसायला लागली, हळूहळू लिहित्या स्त्रियांचेही प्रमाण वाढायला लागले. आंबेडकरी, किंवा पुरोगामी चळवळीतून निर्माण झालेल्या लेखिकांची अस्मिता जागृत झाली होती. हजारो वर्षांपासूनच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी आता त्यांची झाली होती. त्यांनी आपल्या साहित्यात माणसाला केंद्रबिंदू मानले. त्याचे सुख:दुख साहित्यात मांडले.

ज्यांच्याकडे लेखनवाचनाची परंपरा फार जुनी आहे, त्यांच्याकडून  लेखन फार मोठ्या प्रमाणात लिहिल्या गेले हे खरे आहे. मात्र त्याची नोंद किती आणि कुणाची घ्यावी हा प्रश्‍नच आहे, असे मी नाही, अनेक समीक्षकांनी म्हटलेलेच आहे. ‘लेखिका लिहितात तरी काय ?’ असा प्रश्‍न भालचंद्र फडक्यांनी ‘चिंता आणि चिंतन’ या पुस्तकात केला आहे. पण ‘स्त्रिया लिहितात काय?’ असे विचारताना यात दोष कुणाचा हाही विचार व्हायला हवा. घरात एक लेखक असणे आणि लेखिका असणे यात फरक आहेच. घरातल्या पुरुषाला म्हणजेच लेखकाला कधीही लेखनासाठी वेळ उपलब्ध होऊ शकतो. त्याच्या लेखनात अडथळा येणार नाही, त्याची तंद्री भंगणार नाही, याची सर्वतोपरी घरातली स्त्रीच काय सगळेच काळजी घेतात. मात्र स्त्रीला आपल्या लेखनासाठी वेळ काढावा लागतो. घरातल्या सर्वच जबाबदार्‍या पार पाडूनच ती लेखन करू शकते. अनेक अनुभव त्या त्या क्षणीच पकडावे लागतात, शब्दबद्ध करावे लागतात. केशवसुत म्हणतात तसे, ‘क्षणात नाहिसे होणारे, दिव्य भास’ हे भास त्या क्षणी नाही पकडता आलेत की गेलेच म्हणून समजा. अनुभवसंपन्नता येण्यासाठी बाहेरचं जग बघावं लागतं, संवाद साधावा लागतो. अशी संधी फार कमी लेखिकांना मिळते. ज्यांना मिळते त्याही त्याचं सोनं करतीलच असं नाही. बहुतांश लेखिकांचा कल हा हलकंफुलकं लिहिण्याकडे असतो. प्रेम, पाऊस, निसर्ग, प्रेमातला त्रिकोण, विवाहबाह्य संबंध, ज्येष्ठ नागरिक, आई असेच विषय अजूनही जास्तीत जास्त लेखिका हाताळताना दिसतात. त्यांचा कल कुठल्याही वादात न पडण्याकडे असतो. नवीन आलेल्या विषयांना भिडण्याकडे तर नसतोच. पारंपरिक विषयाला धरून सुरक्षितपणे लिहावे आणि घरच्यांसोबतच ज्या संस्थांची मर्जी संपादन करता येईल, कुणीही नावं ठेवणार नाही, असे लेखन करावे याकडे आजच्याही लेखिकांचा कल असतो. कारण तेच संस्कार त्यांच्यावर झालेले असतात. इंदिरा संत म्हणतात तशा, ‘चौकटीत ती चंदन पुतळी, ती भींतीवर; मी एकांती’ पंधरा-वीस वर्षांपूर्वी जेव्हा ‘लीव्ह इन रिलेशनशीप’ हा विचार समाजात नव्यानं रुजू पाहत होता, त्यावेळी मी या विषयाला धरून एक कथा लिहिली. त्यानंतर त्यावर सविस्तर लेखही लिहिला. कॉलेजच्या स्टाफरुममध्ये, ग्रंथालयांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये त्यावर खूप उलटसुलट चर्चा झाली. संस्कृतिरक्षकांनी तर माझ्यावर एवढा हल्ला चढविला की, मी कशी संस्कृती बुडवायला निघाले आहे, म्हणून खूप ताशेरे मारले गेले. पण या विषयावर मी नेटाने लिहीत राहिले. कालांतराने विदर्भात अशी अनेक जोडपी आपल्याला दिसू लागली.  त्यानंतर पल्लवी चौधरी, सुमती वानखेडे, माधुरी अशिरगडे, वर्षा किडे कुलकर्णी यांनीही या विषयाला हात घातला. सुमती वानखेडेने तर पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा गे हा शब्दही उच्चारला जात नव्हता, त्या काळात ‘गे’ विषयावर कथा लिहिण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

मित्रांनो, हे विदर्भाचे लेखिका साहित्य संमेलन आहे. त्यामुळे इथे केवळ लेखिकांचाच विचार होणार आहे. माझ्यासारख्या समतावादी लेखिकेला ही गोष्ट जड जाते आहे, पण प्रत्येक गोष्टीचा एक नियम असतो, त्याला प्रत्येकवेळी तोडण्याची गरज नसते. लेखिकांची ही सूची फार मोठी होऊ शकते, पण साठोत्तरी काळापासून नोंद घ्यायचे ठरविले तरी विदर्भात किती महत्त्वाच्या लेखिका आहेत याची जाणीव पुण्याच्या विख्यात समीक्षक आणि संशोधक मंदा खांडगे यांनी भगिनी मंडळ, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या ‘स्त्रीसाहित्याचा मागोवा’ या ग्रंथात जी नोंद घेतली, त्यावरून लक्षात येते. साहित्याचा संबंध मानवी जीवनातील अनेक घटकांशी येतो. त्याला आलेल्या विविध अनुभूतींचं प्रकटीकरण त्याच्या साहित्यातून होत असताना आपल्याला दिसतं. आजच्या केवळ कवयित्रींचा विचार केला तर प्रभा गणोरकर, कुमुद पावडे, ज्योती लांजेवार, सुगंधा शेंडे, श्रद्धा पराते, मृणाल चिंचाळकर, सुलभा हेर्लेकर, सुरेखा भगत, अरुणा देशमुख, आशा थोरात, उषाकिरण आत्राम, कुसुम आलाम, कविता आत्राम, जुल्फी शेख, अरुणा देशमुख, विमल गाडेकर, रेषा आकोटकर, दीपमाला कुबडे, शोभा रोकडे, अरुणा पवार, माधुरी अशिरगडे, सुचित्रा कातरकर पासून तर  सुमती वानखेडे, रेषा आकोटकर,  सुनीता झाडे, मनीषा साधू, नेहा भांडारकर, भाग्यश्री पेठकर, पल्लवी चौधरी, अंजनाबाई खुणे, पद्मरेखा धनकर, कल्पना नरांजे, मोहिनी कडू, माधवी भट, मीनल येवले, सुनंदा पाटील वैद्य, अरुणा भोंडे यांच्यासारख्या अनेक कवयित्रींनी स्त्रीजीवनाच्या डागण्या, स्त्रियांनी भोगलेले भोग, अपमान, दु:ख, अत्याचार अशा अनेक भावतरंगांना आपल्या कवितेतून न्याय दिला आहे.

काव्यनिर्मिती हा सर्वांचाच आवडता प्रांत आहे; पण अनेकदा कवयित्री लय, छंद, गेय, वृत्त या सार्‍यांकडेच इतकं दुर्लक्ष करतात की त्या म्हणतात, ‘ही कविता आहे म्हणून आपण त्याला कविता म्हणायचं’, असे निरीक्षण आहे. एरवी मला तर अनेकदा प्रश्‍न पडतो की ही कविता आहे की निबंध. केवळ हौसेखातर केलेलं ते लेखन असतं. असं करून आपण काव्यप्रांताची विटंबना करीत आहोत, याचं त्यांना भानही नसतं. मुळात अशा कवींजवळ काव्यदृष्टीच नसते. तीच नसेल तर काव्यनिर्मिती कशी होणार, पण लिहिण्याच्या सोसातून त्या लिहीत राहतात आणि स्वत:ला विनोदाचा भाग करवून घेतात. त्यांच्यावर  चेष्टा होतात. त्यामुळे कविता या कलाकृतीकडे गंभीरपणे बघणार्‍या कवयित्रींची मात्र फार गोची होताना दिसते. आजकालच्या कवयित्रींना तर इतरांच्या कविता वाचणेच काय ऐकणेही नकोच असते. जे कविताच वाचत नाहीत ते  ऐकतील कसे ? खरं तर वाचन आणि श्रवण या दोन गोष्टी वाङ्मयाच्या अभ्यासकांसाठी कधीही न संपणारी गोष्ट आहे. पण अलीकडचे कवी स्वत:तच रममाण झालेले असतात किंवा आपापल्या कंपूत रममाण होतात. विदर्भात काव्यप्रवाहाबरोबरच गझलवर प्रेम करणार्‍या गझलकारांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. यात स्त्रियाही मागे नाहीत. विमल गाडेकर, आशा पांडे, क्रांती सडेकर, सुनंदा पाटील वैद्य यांनी गझलेच्या प्रांतात आपला ठसा उमटवला आहे.

कथा हा वाङ्मयप्रकार कथन साहित्याला प्राधान्य देणारा आहे. कथाकाराची पूर्ण क्षमता पणाला लागत असते. जीवनाचा एखादाच पदर कथेत महत्त्वाचा ठरतो. विदर्भातील कथावाङ्मय एकूणच मराठी कथेत समृद्ध असल्याचे दिसते. इंदुमती शेवडे यांनी ‘कथा : उद्गम आणि विकास’  यात कथा वाङ्मयप्रकाराचा संपूर्ण धांडोळा घेतला आहे. कथेच्या क्षेत्रात विदर्भ म्हटला की पहिली नावं येतात ती कुसुमावतीबाई देशपांडे, आशाताई बगे, प्रतिमा इंगोले यांची. कुसुमावतीबाईंच्या संस्कारशील कथेचा वारसा आशाताईंनी खूप पुढे नेला. सुनीती आफळे, शैलजा काळे, अरुणा सबाने, शुभांगी भडभडे, माधुरी अशिरगडे, सुप्रिया अय्यर, विजया ब्राह्मणकर, ज्योती देवपुजारी, शैलजा काळे, जयश्री रुईकर, छाया कावळे, आशाताई कावळे, सुमती वानखेडे, भारती सुदामे,  विजया डबीर, शुभा साठे, मीरा ठाकरे, शैलजा गावंडे, मालती निमखेडकर, मंजुषा सावरकर, इत्यादी मोजक्या लेखिका सोडल्या तर मुख्य साहित्यप्रवाहात फार मोठी पोकळी निर्माण झाल्याचे लक्षात येते. सुनिता कोंडबत्तुनवार, कल्पना नरांजे अशा काही लेखिका आता नव्याने प्रस्थापित होऊ पाहात आहेत. काही लेखिकांनी नाव जरी कमावले असले तरी अनुभवाच्या अभावाने किंवा सुरक्षित आणि चौकटीतलं आखीवरेखीव आयुष्य त्यांच्या वाट्याला आल्यामुळे दलित, ग्रामीण, आदिवासी, मुस्लीम इ. प्रवाहातून आलेल्या लेखिकांच्या शब्दांमध्ये असणारी दाहकता आणि तीव्रतेचा अभाव तिथे जाणवतो. दलित, ग्रामीण लेखिकांची अनुभूती ही ज्वालेसारखीच असते. कला शेवटी काय आहे? आयुष्यात घेतलेले अनुभव शब्दबद्ध केलेत की तेच साहित्य होतं आणि असे अनुभव उपेक्षित वर्गाकडे आहेतच. वेगवेगळ्या प्रकारे गोष्टी सांगण्याचं कौशल्य उपेक्षित समाजाकडे पूर्वापारपासून आहे. कारण याच कौशल्याच्या आधारे जगण्याचे तपशील वेचत तो त्यातून वाङ्मयनिर्मिती करत आला. आपल्या डोळ्यांसमोर दिसणार्‍या वास्तवापलीकडचं वास्तव कल्पनेनं उभं करण्याची उपजत कला त्याच्याजवळ होती. त्यातूनच भारतीय कथासाहित्याचा उदय झाला. या कथासाहित्याचा मूलस्रोत इथला आदिवासी आहे. अर्थात उच्चभ्रू  समाजातल्या लेखिकेजवळ लिहिण्याचे विषय नसतात, असेही नाही. तसे असते तर आशाताई बगे, प्रभा गणोरकर, कुसुमावती देशपांडे, यमुनाताई शेवडे, प्रज्ञा आपटे ही नावं महाराष्ट्राबाहेर गेलीच नसती. प्रज्ञा आपटे या  संतसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. या लेखिकांजवळ सांगण्यासारखंही खूप आहे, आणि त्याला कलात्मक मांडणी करण्याचं कसबही आहेच. त्यांना स्वत:ची इतरांपेक्षा वेगळी वाट सापडलेली आहेच. आणि ती फक्त प्रतिभावंतालाच दिसते. यांचा तिसरा डोळा उघडलेला आहे. प्रत्येक व्यक्ती ही स्वत:च एक विश्‍व असतं आणि तिच्यात अनेक ताण असतात. प्रत्येक स्त्री ही एक कथा आहेच, या न्यायाने तिनं आपलं अंतर्भूत कोठार रिकामं करण्याचं धाडस करायला हवं. ती ते मनाच्या खोल गुहेत गाडून टाकते. लेखकाने समस्यांची उत्तरं देणं बंधनकारक नाहीच, त्यानं प्रभावीपणे आपली मांडणी करणं आणि वाचकाला जगण्याचं व्यापक भान आणून देणं हीच त्याची जबाबदारी आहे. असं न केल्यास अस्सल निर्मितीपासून लेखक दूर राहील आणि चांगले अनुभव वाचण्यापासून वाचक मुकेल. कथेतले कथाबीज हळूहळू हरवत चालले आहे. मध्यमवर्गीय वळणेच कथाकार गिरवताना दिसतात. मुख्य प्रवाहाला छेद देऊन विदर्भात ग्रामीण, दलित, आदिवासी, मुस्लिम, झाडीबोली या साहित्यप्रवाहांनी मात्र चांगलेच मूळ धरले. या साहित्यप्रवाहावर इंग्रजीचा अजिबात प्रभाव नाही. सुगंधाबाई शेंडे, कुमुद पावडे, शांताबाई गवई, या पहिल्या पिढीपासून सुरू झालेली ही परंपरा आजही जोमदारपणे चालू ठेवली आहे. प्रतिमा इंगोले, शोभा जुमळे, विजया ब्राह्मणकर, स्मिता वानखेडे, डॉ. मालती बोदेले, जुल्फी शेख, तुळसा डोंगरे, कल्पना नरांजे, सुजाता लोखंडे, सुनंदा जुलमे, संघमित्रा खंडारे, सरिता सातरडे, शशी डंभारे अशी अनेक नावे घेता येतील. मराठी कादंबरी: पहिले शतक  असा महत्त्वाचा ग्रंथ खुद्द कुसुमावतीबाईंचा प्रसिद्ध झालेला आहे.

कादंबरीच्या क्षेत्रात मात्र विदर्भातून बरेच काम झालेले दिसते. आशा बगे, शुभांगी भडभडे, जयश्री रुईकर, अरुणा सबाने, ज्योती देवपुजारी, श्रद्धा पराते, मनिषा साधू, विजया ब्राह्मणकर, सुप्रिया अय्यर, डॉ. प्रतिमा इंगोले, नयना धवड, शुभा साठे अशी अनेक नावे आहेत.आत्मचरित्राच्या क्षेत्रात विदर्भातून फार कमी लेखन झाले असे खेदाने म्हणावे लागेल. यात कुमुदताई पावडे, लता कामत, शिवरंजनी कुलकर्णी, शुभदा मुंजे, शोभा जुमळे, सुजाता लोखंडे अशा काही आत्मचरित्र लेखिका आहेत.नाटकाच्या क्षेत्रात डॉ. प्रतिभा कुलकर्णी, शुभांगी भडभडे, छाया कावळे, माला केकतपुरे, वीणा कुलकर्णी, सुनंदा साठे, मालती निमखेडकर,अशी नावे येतात. पद्मगंधा प्रतिष्ठानने तर दरवर्षी नाट्यमहोत्सव घेऊन एक विक्रमच प्रस्थापित केला आहे.विनोदी लेखनात फक्त प्रतिमा इंगोले, सुप्रिया अय्यर, छाया कावळे, हेमा नागपूरकर अशी फारच कमी नावेसमोर येतात.ललित लेखनात आशा बगे, प्रज्ञा आपटे, सुलभा हेर्लेकर, अरुणा सबाने, सुप्रिया अय्यर, सुमती वानखेडे, सुनिता झाडे, निशा शेंडे, नयना धवड, भाग्यश्री पेठकर. समीक्षेत प्रभा गणोरकर, डॉ. प्रज्ञा आपटे, डॉ. जया द्वादशीवार, अरुणा देशमुख, उषा देशमुख, सुशीला पाटील, आरती कुलकर्णी, वीणा मुळे, श्यामला मुझुमदार, मोना चिमोटे, संध्या अमृते, शोभा रोकडे, अरुंधती वैद्य, छाया नाईक, मालती निमखेडकर यांची नावे उल्लेखनीय आहेत.

फक्त संख्येकडे बघायचे तर विदर्भातून विपुल लेखन झाले असे आपण म्हणू शकतो. पण कसदार किती हा प्रश्‍न आहेच. स्त्री लिहू लागली हे खरे आहे, पण काय लिहिते, का लिहिते, कशासाठी लिहिते, हे महत्त्वाचे आहे. काय सांगायचं याच्यासोबतच कसं सांगायचं हेही महत्त्वाचं आहेच. हे प्रश्‍न तिला पडतात काय? काही मैत्रिणी किरकोळ मानधनासाठी लिहितात, काही केवळ प्रसिद्धीसाठी लिहितात तर काही  कुणालातरी खुश करण्यासाठी लिहितात. लेखन ही एक साधना आहे. ही शक्ती फार कमी लोकांना मिळते. याचा अनुभव आम्हाला आम्ही आयोजित केलेल्या पाच  लिहित्या स्त्रियांच्या कार्यशाळेतून आलाच आहे. एकट्या नागपूरची लोकसंख्या आज तीस लाखाच्या घरात आहे, त्यातल्या दहा लाख जरी स्त्रिया लक्षात घेतल्या तर लिहितात किती? पन्नास ते शंभर. म्हणजे किती वेगळी कला आपल्याला निसर्गाकडून मिळाली आहे? त्याला लहानपणापासून खतपाणी घालून आपण ती अधिक समृद्ध केली आहे. लेखक असा सहजच होत नाही. त्यालाही घडावं  लागतंच. त्याच्याजवळ प्रतिभाही असावी लागते. सर्वांनाच सुरेश भट, ग्रेस होता येत नाही. सर्वच आशा बगे, प्रभा गणोरकार असू शकत नाहीत. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत किती लोक घेतात? विशिष्ट स्वार्थी हेतूने जर आपण लेखन करीत असू, त्याच्या प्रसिद्धीसाठी नाना क्लृप्त्या करीत असू, तर लेखनाप्रति हा केलेला विश्‍वासघात आहे. हा साहित्यातला भ्रष्टाचारच आहे. भ्रष्टाचार फक्त आर्थिक होतो असे नाही, राजकारणात होतो असे नाही, साहित्यक्षेत्रात तो कमालीचा होतो. सध्या तो फार बोकाळला आहे, हे आम्ही डोळ्यांनी बघतो आहोत याचा त्रास होतो. आपणच मानधन देऊन पारितोषिक पटकावणार्‍यांची संख्या जशी वाढते आहे, त्याची बातमी नुकतीच आपण वर्तमानपत्रातून वाचलीच आहे, तशीच अशाच पद्धतीचा गैरवापर करून लेखिका होणार्‍यांचीही संख्या वाढते आहे. आपल्या कलाकृतीवर मेहनत न घेता असेल तसे छापून येण्यासाठी होणारे गैरप्रकार क्लेशकारकच आहेत. आशा बगे स्वत: सांगतात, ‘भूमी वर मी सातदा काम केलं.’ सुप्रिया अय्यरची नुकतीच प्रकाशित झालेली कादंबरीवरसुद्धा त्यांना प्रकाशकाने बरीच मेहनत घ्यायला लावली. माझी कथा तीनदा परत आली होती. मेहनत घ्यावीच लागते. माझी माझ्या सर्व लिहित्या मैत्रिणींना या विचारपीठावरून कळकळीची विनंती आहे की, कृपा करून आपण साहित्याला असे बाजारू स्वरूप नको आणू या. आपल्याला लिहिण्याचा हा अधिकार, आपला आत्मस्वर ठामपणे मांडण्याचा हा अधिकार आपल्या आधीच्या पिढीने फार कष्टाने, जिकीरीने मिळविला आहे, त्याचा अनादर होईल असे आपण नको वागू या. आपण जे लिहितो, त्यात जिवंतपणा असावा आणि काही खडक फोडण्याची ताकद असावी लागते, याचा विचार व्हावा.

काही लेखिका असं म्हणतात, ‘आता पहिला खर्डा लिहून झाला, आता बस ब्युटी पार्लरचा हात फिरला की पाठवतेच तुमच्याकडे आकांक्षासाठी कथा.’  पहिला खर्डा लिहून झाल्यावर पुनर्लेखन करावंच लागतं, यात शंकाच नाही. पण जातिवंत सौदर्य असलेली स्त्री फक्त पावडर लावलं तरी सुंदरच दिसते, नाहीतर कितीही पार्लरमध्ये पैसा ओता, सौंदर्यात भर ती किती पडणार? जिवंत कलाकृती निर्माण करण्यासाठी आणि ती वाचल्यानंतर वाचकांनी अस्वस्थ होण्यासाठी किंवा त्याचा पुरेपूर आस्वाद त्यांना लाभण्यासाठी आधी आपल्याजवळ संवेदनक्षम मन हवे, परदु:ख समजून घेण्याची ताकद हवी, आणि जे मांडावयाचं ते निर्भयपणे मांडण्याची तयारी हवी. आधी त्या प्रश्‍नाने स्वत:ला रक्तबंबाळ करून घ्यायला हवे. तेव्हाच हाती महत्त्वाचा ऐवज येणार. ग्रेस म्हणतात तसे, ‘जो वीज खुपसतो पोटी, तो एकच जलधर होता.’  फार कष्टानं मिळालेल्या या स्वातंत्र्याचा आपण आदर करणार आहोत की मूल्यांना पायदळी तुडवणार आहोत, याचा आपण विचार करावा. खरं तर आज संवादच हरवला आहे. मोबाईल नावाचं गोंडसं खेळणं आपल्या हातात आलं मात्र अनेक गोष्टी आपल्या हातातून निसटून गेल्यात. एकमेकांमधला संवाद संपला, कट्टे लयास गेलेत, कसदार कविसंमेलनांची संख्या कमी झाली. वाङ्मयीन कार्यक्रमांना उपस्थिती तर चिंताजनक झालीय. संवाद वाढण्याच्या दृष्टीनं मला आजचं हे संमेलन फार महत्वाचं वाटतं. या लहानशा गावात इतकं सुंदर संमेलन घडवून आणून आणि आम्हाला आपापसात संवाद करण्याचं कारण उपलब्ध करून देऊन वि.सा. संघ आणि कृषी विकास प्रतिष्ठानने आम्हा सार्‍यांना ही एक पर्वणीच दिली आहे. हा संवाद आम्हा लेखकांचा एकमेकांसोबतचा आहे, हा संवाद श्रोत्यांसोबतचा आहे. हा संवाद आम्हा सग्यासोयर्‍यांमधला आहे.

१९७५ सालापासून आपल्याकडे उदयास आलेले स्त्रीमुक्ती, स्त्रीवाद हे शब्द १९८० पर्यंत चांगलेच मूळ धरून बसले. पण सुरुवातीला या शब्दांचीच खूप टिंगल झाली. स्त्रीवादी लेखन, स्त्रीमुक्तीवाल्या स्त्रिया म्हणजे जणू काय परग्रहावरून आलेल्या कुणी वेगळ्याच जगातल्या या महिला आहेत असाच त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होऊ लागला.

स्त्रीवाद म्हणजे दुसरंतिसरं काहीही नसून स्त्रीला व्यक्तीसारखं जगू द्या, तिच्याकडे सन्मानाने बघा, तिलाही एक मन आहे, तिच्याही काही भावना आहेत, ती आदरास पात्र आहे आणि तीही हाडामांसाची एक व्यक्ती आहे, तिचेही काही अधिकार आहेत, ते आपण मान्य करायला हवेत. बस हाच स्त्रीवाद आहे. स्त्रीवादी जाणीव म्हणजे एकच एक साचा अथवा एकाकार नसतो. इतिहासाच्या भिन्न टप्प्यावर, विविध परिप्रेक्ष्यातून स्त्रीवादी भान घडत असतं. साहित्याच्या आविष्कारातील कोणत्या साहित्याला स्त्रीवादी म्हणता येईल, हा एक गुंतागुंतीचा प्रश्‍न आहे. परंतु केवळ स्त्रीकेंद्री लिहिणे, किंवा केवळ तिच्या दु:खाच्याच रडक्या कहाण्या दयेच्या अथवा उद्धाराच्या भूमिकेतून मांडणे, तसेच स्त्री आहे म्हणून कारण नसताना तिच्या शौर्यगाथेचे झेंडे फडकविणे आणि त्याला स्त्रीवादी साहित्य म्हणणे हे चूक आहे. स्त्रीवाद हा स्त्रीला मानुषतेशी जोडणारा हवा. थोडक्यात, स्त्रीपुरुषांनी स्वतंत्र व्यक्ती म्हणून सन्मानाने जगण्यासाठी केलेले पुनर्विचार आणि पुनर्रचना म्हणजे स्त्रीवाद, अशी सोपी व्याख्या मी स्त्रीवादाची करते.

स्त्रीवादाचा अंगीकार करण्यासाठी आवश्यक असणारी मानसिक जडणघडण अद्याप आमच्या लेखिकांमध्ये आलेली दिसत नाही. प्रभा गणोरकरांच्या कवितेत, कुमुद पावडेंच्या लेखांमधून ती आढळते. सीमा साखरे, निशा शेंडे, नयना धवड, प्रज्ज्वला तट्टे ह्या स्त्रीवादी चळवळीतूनच पुढे आल्यामुळे त्यांच्या लेखनात पूर्णपणे स्त्रीवाद आढळतो. प्रसंगी त्यांच्या नायिका बंडखोरी करतात आणि त्याची किंमतही चुकवतात, पण कुठलीही तडजोड न करता. ताराबाई शिंदेंचे स्मरण त्या कायम ठेवताना दिसतात. त्यानंतरचा प्रयत्न माधुरी अशिरगडे, सुमती वानखेडे, सुनीता झाडे,  मंजुषा सावरकर, भाग्यश्री पेठकर यांनी केलेला दिसतो.

सध्या एका बाईंचं भाषण फार गाजतं आहे. त्या म्हणतात, ‘मुलींची १८ वर्षे पूर्ण झालीत की लग्न करून द्या. शिक्षणाच्या नावाखाली या मुलींनी संस्कृतीचा बट्टयाबोळ केला आहे. २५-२६ वर्षांच्या घोड्या होऊन लग्न करतात, यांना नवरा कसा वठणीवर आणणार? कशाला यांना नोकर्‍या करायला हव्यात? ७ च्या आत मुली-सुना घरी आल्याच पाहिजे. घरात तिनं आपली मतं मांडायची नाहीत, आपल्याला एक मेंदू आहे, हे विसरूनच जायचं. तिनं मोठं होण्याची स्वप्न बघायची नाही. ज्या स्त्रिया स्वत:च्या करिअरला महत्त्व देतात, त्या बदफैली असतात.’ एकएक भयंकर विधाने आहेत या बाईंची.

६ वर्षांची मुलगी झाली की तिच्या वडिलांनी सुद्धा तिला जवळ घ्यायचं नाही, तिचे लाड करायचे नाहीत, तिची पप्पी घ्यायची नाही. पूर्णपणे मनुसंस्कृतीकडे परतीचा प्रवास सुरू करण्यासाठी या बाईंना काही संस्थांनी मोकाट सोडलेलं आहे. दुसर्‍यांच्या मुलीसुनांनी ७ च्या आत घरात आलं पाहिजे आणि या बाई गावोगाव भाषणं देत फिरतात, असल्या विचारांची गरळ ओकतात, स्त्रीमुक्तीवाल्यांचे वाभाडे काढतात, त्यांना नवरे नको असतात, त्या दुसर्‍यांचे संसार उद्ध्वस्त करतात, वगैरे फालतू बकवास करतात, हे सारे उपद्व्याप करून या बाई किती वाजता घरी पोचत असतील ? पण आज अशाच वक्त्यांची त्यांना गरज आहे. त्यांच्या या सांस्कृतिक दहशतवादाला मी स्वीकारलं आहे. सोशल मीडियावरून या बाईंना आव्हान दिलं आहे, यांनी नागपुरात भाषण द्यायला यावं आणि आम्ही विचारू त्या प्रश्‍नांची भर सभेत उत्तरं द्यावीत. तुमच्या सार्‍यांच्या समक्ष पुन्हा एकदा  बाईंना मी दिलेल्या शब्दांची आठवण करून देते. इथे जर कुणी त्यांचे फॉलोअर्स असतील तर त्यांना पुन्हा एकदा माझा हा निरोप द्या. आम्ही बधणार नाही. स्त्रीवादी लेखिका खमक्या आहेत. आपल्या योग्य विचारांची पेरणी करण्याची हिंमत त्यांच्यात आहे, आणि त्यासाठी द्यावी लागणारी किंमत त्या चुकवण्याची क्षमताही ठेवतात. आपल्या घरावर आलेले दगडधोंडे हसत स्वीकारण्याची त्यांची तयारी असते. या देशासाठी, या समाजात नवविचार प्रस्थापित करण्यासाठी, स्त्रियांना त्यांचे म्हणून असलेलेच हक्क मिळवून देण्यासाठी त्या कधीही तत्पर आहेत. यांच्याच घरात लेकीसुना जाळल्या गेल्या, मारल्या गेल्या, बलात्कार झालेत, अशावेळी मोर्चा काढायला स्त्रीमुक्तीवाल्यांकडेच येतात ना. ‘अहो, तुमच्या शब्दाला मान आहे, तुमच्यावर लोक विश्‍वास ठेवतात, तुम्ही म्हणाल तर कुणीही येऊ शकतं,’ वगैरे शब्दांची भलावण करत ते याच मार्गाने येतात ना? अशावेळी कुठे जातो यांचा स्त्रीवादी लेखिका आणि कार्यकर्त्यांवरचा राग? एक लक्षात घ्या स्त्रीमुक्तीवाल्या कुणाचंही घर फोडण्याची भाषा करीत नाही, चुकलेल्याला वठणीवर आणण्याचं काम करतात, मग ती स्त्री असो वा पुरुष. स्त्रीला न्याय देण्यात ती कुठेही कसूर करत नाही आणि आपल्या लेखनाला, वागण्याला बाजारू स्वरूप आणत नाही. महत्प्रयासाने सावित्रीबाई, ताराबाईं शिंदेंनी जे वाण आमच्या पदरात टाकलं आहे, त्याचा अवमान होणार नाही, याची पुरेपूर काळजी त्या घेताना दिसतात.

ही माझी मन की बात नाही, ये मेरे दिलकी बात है. काय सुरू आहे आपल्या भारतात सध्या ? या बाईंचं तर वानगीदाखल उदाहरण आहे. पण जो उठतो तो काय मनाला येईल ते बोलतो. प्रत्येक स्त्रीला दहा-दहा मुलं व्हायला पाहिजे. बाईपेक्षा गाय महत्त्वाची. शेतकर्‍यांना कशाला पाहिजे भाववाढ. ‘ते साले’ माजले आहेत. अशा पद्धतीची ‘वैचारिक’  पेरणी सारखी होताना दिसते. आणि त्याचा आम्ही विरोध केला, आमची लेखणी त्यावर काम करू लागली की ते लेखक देशद्रोही होतात. यातूनच पुरस्कारवापसीसारखी चळवळ सुरू झाली तर ती नाटकं वाटायला लागतात. २०१४ नंतर अशा पद्धतीचं लेखन करायला छातीला माती लावायला लागते आहे. लेखकाच्या प्रत्येक शब्दाकडे कृतीकडे आज लक्ष आहे. लेखकाच्याच कशाला, अगदी परवाच एका आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या जेवणात फक्त मीठपोळी वाढलेली बातमी व्हायरल केली म्हणून एका पत्रकाराला तंबी मिळाली आहे. कमालीची असहिष्णूता आणि कमालीचा विघटनवाद, संवादावर सुद्धा बंदी, तुम्ही मोबाईलला कोणती कॉलरट्यून लावता, तिकडे लक्ष, ‘भीमा’ ची कॉलरट्यून असेल तर त्याचा खून, रेल्वेप्रवासात जेवणात गोमांस आहे, या संशयावरून मारझोड करून त्यांचा खून. सगळीकडे भाषा विकासाचीच आहे, पण प्रत्यक्षात  मात्र वातावरण उन्मादाचं आहे. हा दहशतवाद नाही, तर आणखी काय? ही आणीबाणी नाही तर आणखी काय? आणि विकास कोणता? इथे रोज 1 कोटी लोक उपाशी राहतात, लाखो मुले कुपोषणाने मरताहेत, हजारो शेतकरी आत्महत्या करताहेत, रोज शेकडोत बलात्कार होताहेत, खून पडताहेत आणि आपण फक्त बातमी वाचतो आणि पुढे जातो. कारण आपल्याभोवती सारखं विकासाचं गाणं वाजत आहे. फ्रान्झ काफ्काच्या ‘ट्रायल’ नावाच्या कादंबरीतला नायक एके सकाळी उठतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपल्या भोवती पहारे बसवले आहेत. तो कैदेत नाही, तसा तो स्वत:च्या घरात स्वतंत्रच जगतो आहे, पण आपल्यावर सतत कोणाची तरी नजर आहे, हे त्याला जाणवत असतं. आजच्या लेखकांची  परिस्थिती याहून वेगळी नाही. आता आपण कुणाच्यातरी रडारवर आहोत, तुम्ही काय बोलताहात, यावर सतत कुणाचं तरी लक्ष आहे. या देशात महत्त्वाच्या मंत्र्याचे फोन जर टॅप होत असतील तर तुम्ही आम्ही कोण?

स्वातंत्र्यानंतर आपण जी राज्यघटना स्वीकारली, ती सर्वांना समान न्याय देणारी, समान मानणारी, सर्वांचा सारखा आदर करणारी, आणि स्वीकार -नकाराचा अधिकार देणारी अशी आहे. पण आज आपण काय पाहतो? आपल्याकडे सतत फणा काढून उभा राहिलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद हा समरसतेची भाषा बोलणारा असला तरी प्रत्यक्षात राज्यघटनेतील समतेच्या ढाच्याला आव्हान देणारा आहे. आज लेखकांवर, काही प्रामाणिक पत्रकारांवर सेन्सॉरशीप आहे. स्त्रीस्वातंत्र्यावर सारखा बुलडोझर चालतो आहे आणि हीच वेळ आहे, आपल्या होणार्‍या मुस्कटदाबीविरुद्ध बोलण्याची. सांस्कृतिक क्षेत्रात राजकीय आक्रमणाचा हा झंझावात आपल्याला थांबवता आला पाहिजे. साहित्यसंमेलनाच्या विचारपीठावरून हे राजकीय भाषण आहे की काय असे तुम्हाला वाटू शकते; पण हे राजकीय नव्हे, सांस्कृतिक दहशतवादाचे माझे मुद्दे आहेत आणि हे सारे साहित्याशीच जुळलेले आहेत. आपल्या आजच्या संमेलनांमधून ही जीवनमूल्यांची समीक्षा होणे आवश्यक आहे, हे इथे मी आवर्जून सांगू इच्छिते. निर्मिती आणि आस्वाद यामध्ये पूल निर्माण करण्याचे कार्य साहित्यसंमेलनांतूनच व्हायला हवे. संस्कृती आणि साहित्य यांचा जैव संबंध असतो. मग या गोष्टी इथे बोलणार नाही तर कुठे? इतर विषयांसोबतच  शोषित, पीडित, वंचित हे लेखकांच्या लेखनाचे आणि चिंतनाचे विषय रहायला हवेत आणि राजकारणात याच घटकांचा वेगवेगळ्या पद्धतीनं उपयोग करून घेतला जात असतो, हे आम्ही लेखक सतत बघत असतो. आज भारतातील लेखकवर्ग प्रचंड घाबरलेला, असुरक्षित झालेला आहे. महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, कर्नाटकातील निवृत्त कुलगुरू एम. एन. कलबुर्गी, गौरी लंकेश यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. पेरुमल मुरूगन या तामीळ लेखकाने तर २०१६ मध्ये  आपण ‘साहित्यिक आत्महत्या’ करत असल्याचे घोषित केले. म्हणजे यापुढे मी लेखक म्हणून नव्हे तर केवळ प्राध्यापक म्हणूनच जगेन. लेखन बंद. २०१० साली ‘मथोरुभगन’ (अर्धनारीनटेश्‍वर) नावाची कादंबरी प्रकाशित झाली. त्यात  धर्माची नालस्ती केल्या गेली, असा त्यांच्यावर आरोप लावल्या गेला. त्यांना जीव नकोसा करून टाकला;

पण परिस्थिती अजूनही एवढी वाईट नाही. लेखकांना आशेला अजून वाव आहे. त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांमधून त्यांची मुक्तता करताना मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे, ‘लेखकाला त्याला त्याच्या पद्धतीने, त्याला जे आवडेल ते काम करू देऊ यात. त्याने लिहिलेले आपण वाचायचे की नाही, हा पर्याय वाचकाला कायम उपलब्ध असतो.’ किती साधा विषय आहे ना. तुम्हाला एखादे पुस्तक आवडत नसेल तर नका वाचू ना. साहित्यिक अभिरूची ही एकसारखी असूच शकत नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अगदी अलीकडे प्रेमानंद गज्वी यांच्या ‘छावणी’ या नाटकाला थेट राजकीय भाष्य करणारे नाटक आहे म्हणून सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारली. पण त्यावर माध्यमांतून बरेच चर्वितचर्वण झाल्यावर आणि एका जबाबदार सदस्याच्या पुढाकाराने ही बंदी उठवण्यात आली. गांधी आणि आंबेडकरांना भले कितीही डोक्यावर घेतल्याचे दृश्य स्वरूपात दिसू देत; पण खरी मेख वेगळीच असते. ही सर्व उदाहरणे अलीकडची आहेत आणि साहित्याशीच जुळलेली आहेत, हे लक्षात घ्यावे आणि अलीकडच्या काळात लिहू लागलेल्या दलित, आदिवासी, आंबेडकरी लेखिका आणि कवयित्रींनीही याची जाणीव ठेवावी. केवळ सोयीसाठी बाबासाहेब आणि इतरवेळी साध्य करणारे मार्ग वेगळेच हे चालणार नाही. ही लढाई केवळ इतरांसोबतची नाही, आधी ती आपल्यासोबतची आहे आणि ती जिंकणं जास्त कठीण आहे. कुणाला चांगलं वाटावं म्हणून लेखिकांनी लिहू नये, तर मला काय मांडायचं आहे, माझी काय अस्वस्थता आहे, हे आधी ठरवून लिहायला पाहिजे. आज एकविसाव्या शतकातही बहुजनांमधल्या जातपंचायती जातअंतर्गत जातीयतेच्या भिंती बळकट करत आपल्यातल्याच पीडित, निर्धनांचं शोषण करतात, अन्याय करतात, याचं चित्रण तरी बहुजनांच्या लेखणीतून किती उतरतं याचाही विचार  लेखिकांनी करायला पाहिजे.

बहुजनांच्या संवेदनांशी एकरूप होणार्‍या कलाविष्कारांवर होणार्‍या हल्ल्याच्या विरोधात कलावंत कधीतरी एकत्र उभे राहणार आहेत की नाही? खैरलांजी, कोपर्डी, सोनई, खर्डा इथे झालेल्या हत्याकांडांवर, बलात्कारावर किती लेखिकांनी लिहिलं? आणि ज्यांनी लिहिलं त्यात किती लेखिका त्या घटनेशी तादात्म्य पावल्या आहेत? काही लेखिकांनी कथा किंवा कादंबरी लिहिली, पण ती कथा कादंबरी न होता, एम.फील.चा प्रबंध झाला. जो फॉर्म आपण लिहायला घेतो, तो नीट हाताळता आला पाहिजे, त्यासाठी कष्ट घेतले पाहिजे. लेखन ही एक साधना आहे. ती कष्ट केल्याशिवाय फळाला येत नाही. एक लेखिका एकदा मला म्हणाली, ‘अमुक एका पुरस्कारासाठी पुस्तकं मागवली आहेत, त्या संस्थेची ध्येयधोरणं जशी आहेत, त्यांना जसं आवडतं, तशीच एक १०० पानांची कादंबरी मी १५ दिवसात लिहून तयार केली. मला नक्की पुरस्कार मिळणार.’ हा स्तर आणि ही पद्धत आपल्या लेखनाची असेल, इतरांना रिझवण्यासाठी, पुरस्कारासाठी आपण लिहिणार असू तर आपण पुढल्या स्पर्धेत टिकणार कसे? भूमिका घेणार कशा? याचा विचार मैत्रिणींनो नक्कीच व्हायला हवा. याचा अर्थ उत्तम साहित्य आपल्याकडे निर्माण झालं नाही असं मला मुळीच म्हणायचं नाही. अनेक लेखिकांनी आपली नाममुद्रा साहित्याच्या क्षेत्रात उमटवली आहेच. बहुजनवादी जाणिवेतून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केलेलं आहेच, यात शंकाच नाही.

माझा प्रश्‍न आजचा आहे. वर्तमानातला आहे. माझा  वारंवार प्रश्‍न आहे की,  विदर्भातल्या किती लेखिका आज भूमिका घेताना दिसतात? कारण भूमिका घेणं सोपं काम नाही. अनेकांची नाराजी ओढवणं, अनेक पुरस्कारांना तिलांजली देणं आहे; पण संघर्षात्मक परिस्थितीत भूमिका घेणं गरजेचं असताना जर आपण भूमिका घेतली नाही, तर आपण सोकावणार्‍या काळाला मदत करणारे शिलेदार ठरू हे लक्षात घ्या. मित्रमैत्रिणींनो.  पुरस्कारवापसीनं भारतभरातल्या अस्वस्थ लेखकांनी याचं मोल दिलं आहे. त्यातूनच दक्षिणायनसारखी चळवळ उदयास आली. अनेक  लेखक, कलावंत, पत्रकार आज त्याचं मोल देत आहेत. स्पष्टपणे विरोध पत्करत, प्रसंगी एकाकी पडून आपले लेखन करीत राहाणं, परखडपणे आपली  मतं ठामपणे  मांडणं याला मी भूमिका घेणं म्हणते. आणि ‘दक्षिणायन’ हे काम नेटानं करीत आहे. ही राजकारणातली ढवळाढवळ नसून ती केवळ लोकशाही आणि अभिव्यक्ती संवर्धनाची प्रक्रिया आहे. या चळवळीतली मी एक शिलेदार आहे, मी स्त्रीवादी आणि विशिष्ट तत्त्वाला धरून चालणारी  लेखिका आहे, मी भूमिका घेऊन प्रसंगी आपल्याच लोकांना नाराज करणारी आहे, पण मी सामान्य माणसाची प्रतिनिधी आहे, शोषित, पीडित सर्वप्रकारच्या स्त्रीवर्गाची, रोज बळी पडणार्‍या शेतकर्‍याची, कामगारांची प्रतिनिधी आहे. आपण मला आज हा अध्यक्षपदाचा सन्मान दिला, माझ्यावर विश्‍वास ठेवला, या कृतीतून आपण केवळ माझाच सन्मान केला असे नव्हे तर  माझ्यातल्या सामाजिक कार्यकर्तीचा हा सन्मान आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे.

या विचारमंचावरून सांगण्यासारखे मुद्दे खूप आहेत. साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण ऐकण्याच्या मन:स्थितीत फार कुणी नसतं. तरीही शांतपणे आपण माझे भाषण ऐकले. त्यासाठी आपणा सर्वांची मी  आभारी आहे. मुख्य म्हणजे तुम्हा कुणालाही दुखावण्याचा माझा उद्देश अजिबात नाही. अनेकदा काही गोष्टी आपल्या लक्षात येत नसतात म्हणा किंवा आपल्याला त्याचे गांभीर्य समजत नाही म्हणा, माझं हे कटू वाटणारं पण खरंखुरं आत्मचिंतन आहे. आपण ते मैत्रिणीचे बोल म्हणून स्वीकाराल याची मला खात्री आहे. तुम्हा सर्वांच्या लेखनासाठी खूपखूप शुभेच्छा.

माझ्या या भाषणाचा शेवट मी या कवितेतून करते.

 

तुला ठाऊक आहे का?

पुरुषांपेक्षा वेगळा एका स्त्रीचा आकांत?

 

घर, प्रेम आणि जातीपेक्षा वेगळं

एका स्त्रीला तिच्या स्वत:च्या भूमीबद्दल सांगू शकतोस तू?

 

सांगू शकतोस शतकानुशतके आपलं घर शोधणार्‍या

एका बेचैन स्त्रीला तिच्या घराचा पत्ता?

 

जर नाही तर मग काय ठाऊक तुला

स्वयंपाक आणि बिछान्याच्या गणितापलीकडे एका स्त्रीबद्दल ?

 

(अरुणा सबाने यांचा मोबाईल क्रमांक -99700 95562)

 

 

Previous articleराईज अँड फॉल ऑफ अजित पवार
Next articleसर्जनमूर्ती रेणुका
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here