साहसी, निर्भीड-पी.के. ऊर्फ अण्णासाहेब देशमुख

– सोमेश्वर पुसतकर
                भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अमरावतीच्या ज्या लोकनेत्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेत. त्यापैकी देशभक्त श्री.पी.के. ऊर्फ अण्णासाहेब देशमुख हेही एक महत्त्वाचे नेते होते.
                ७ नोव्हेंबर १९०७ रोजी अण्णासाहेब देशमुख यांचा जन्म झाला. बालपणापासूनच त्यांचा कल देशसेवेकडे होता. त्यामूळे स्वातंत्र्य आंदोलनापासून ते दूर राहू शकले नाही. देशभक्तीने भारावलेल्या पी.के. देशमुख यांनी १९४२ च्या ‘चलेजाव’ किंवा भारत छोडो आंदोलनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबईला अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात ०८ ऑगस्ट १९४२ रोजी चलेजाव चळवळीचा ठराव संमत झाला. महात्मा गांधीजींनी भारतीयांना ‘करा किंवा मरा’ हा संदेश दिला. चले जावचा ठराव मंजूर झाल्यानंतर अखिल भारतातून आलेल्या काँग्रेसच्या प्रतिनिधींना आपआपल्या जिल्ह्यात संदेश पोहचविण्याची जबाबदारी दिली. परंतु त्याच रात्री सर्व देशात स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेणार्‍या बिनीच्या पुढार्‍यांची धरपकड सुरू झाली. त्यामुळे अनेक स्वातंत्र्य सैनिकांना भूमिगत व्हावे लागले आणि गुप्तपणे गावोगावी संदेश पोहचवण्याचे काम पार पाडावे लागले.
                अमरावतीवरून याच अधिवेशनाला प्रतिनिधी म्हणून गेलेले पी.के. उर्फ अण्णासाहेब देशमुख मुंबईवरून परतताना थेट अमरावतीला न येता मुर्तिजापूर येथे उतरलेत आणि त्यांनी महात्मा गांधीनी दिलेला मंत्र लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम मोठ्या तडफेने केले. अण्णासाहेब गुप्तपणे अमरावतीला आपल्या घरी पोहचलेत. घराजवळील श्री देवकिसनजी झंवर यांच्या घरी जाऊन पुढील कारवाईची योजना आखून जाहीर भाषणाचा कार्यक्रम घोषित केला आणि  देवकिसनजी झंवर यांच्यावर सभेच्या आयोजनाची जबाबदारी सोपविली.
                मुंबईत झालेल्या ठरावाचा मसुदा ऐकण्याकरिता अमरावतीला हजारो लोक सभेला उपस्थित होते. सभेमध्ये संदेशाच्या शेकडो प्रती वाटपाकरिता तयार करण्यात आल्या होत्या. सदर सभेभोवती पोलिसांचा जबरदस्त बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तणावग्रस्त वातावरणात सभा सुरू झाली. सभेत श्री बालकिसनजी भंडारी यांचे प्रास्ताविकपर भाषण झाले. नंतर सुंदरसिंगजी यांनी सभेला उद्देशून विचार मांडलेत. सभेतील लोकांमध्ये पी.के. देशमुखांची चर्चा होती. पोलीसांकडे पी.के. देशमुखांच्या नावाचा वॉरंट होता. पोलीस पी.के. देशमुखांचा शोध घेण्यासाठी डोळ्यात तेल घालून चौफेर नजरा फिरवीत होते. त्या दरम्यान अत्यंत घाईने व थोडक्या शब्दात पी.के. देशमुखांनी महात्मा गांधीचा संदेश सभेतील जनतेला मोठ्या आवेशात दिला. पी.के. देशमुख यांच्या प्रभावी भाषणाने सभेतील जनतेनी ‘पी.के. देशमुख की जय’ अशा स्वयंस्फूर्त घोषणा दिल्यात. या घोषणांनी पोलीस जागे झालेत आणि पोलिसांनी पी.के. देशमुखांना ताबडतोब अटक केली.
                पी.के. देशमुखांना पोलिसांनी अटक करताच सभेतील लोक संतापले, घोषणा देऊ लागले, दगडफेक करू लागले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार सुरू केला. त्यामध्ये अनेकजण जखमी झालेत. सभेकरिता वेगवेगळ्या भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी व कार्यकर्त्यांनी आपआपल्या गावी गांधींजीची संदेशपत्र नेलीत. अशाप्रकारे सर्वत्र ‘करा किंवा मरा’ हा संदेश अमरावती जिल्ह्यात सर्वत्र पोचला. पुन्हा १० ऑगस्टच्या दिवशी पी.के. देशमुख जोग चौकात भाषण करीत असताना त्यांना पोलिसांनी पकडले. पोलिसाद्वारे सभा उधळली गेल्यानंतर शहरात जाळपोळ व तोडाफोडीचे प्रकार सुरू झालेत. १९४२ मध्ये महात्मा गांधीचा ‘करा किंवा मरा’ हा संदेश पी.के. देशमुखांनी व त्यांच्या साथीदारांनी हरप्रकारे न घाबरता अमरावती जिल्ह्यात नाट्यमयरित्या जनतेपर्यंत पोहोचविला. यामुळे जिल्ह्यात स्वातंत्र्यलढ्याला खर्‍या अर्थाने सुरूवात झाली.
                १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीतून पी.के. देशमुखांची साहसीवृत्ती, निर्भिडपणा आणि त्यांची देशभक्ती याची प्रचिती येते. स्वातंत्र्योत्तर काळातही अण्णासाहेब देशमुख यांनी अनेक क्षेत्रात कार्य केले. २५ फेब्रुवारी २००६ रोजी त्यांचे वृध्दापकाळामुळे निधन झाले.
(लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत)
९८२३०७२०३०
Previous articleस्वातंत्र्याचा मार्ग आम्ही शोधलाच पाहिजे…
Next articleस्मरणातले विलासराव…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here