साहित्य, भाषा आणि शरद जोशी…

शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांची आज जयंती आहे . त्यानिमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्वातील एका वेधक पैलूवर प्रकाश टाकणारा हा लेख . शरद जोशींच्या व्यक्तित्वाचा समग्र धांडोळा घेणाऱ्या ‘शरद जोशी: शोध अस्वस्थ कल्लोळाचा …’ या पुस्तकाच्या लेखिका वसुंधरा काशीकर यांचा त्या पुस्तकातील हा लेख वाचायलाच हवा.

…………………………………………………….

(साभार: राजहंस प्रकाशन)

भाषा हा शरद जोशींचा अत्यंत आवडीचा, प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा विषय. ते मुळात संस्कृत घेऊन एम.ए. करणार होते. पण झालं असं, की पदवीनंतर सगळे मित्र एकत्र बसले होते. तेवढयात कोणीतरी म्हणालं, जोशीचं काय संस्कृत घेऊन एम.ए करायचं ठरलच आहे. हे वाक्य जोशींना खूप लागलं. आव्हान म्हणून मग त्यांनी, त्यांचा जो कधीच विषय नव्हता, त्या विषयात म्हणजे संख्याशास्त्रात पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केलं. नियतीचे काही संकेत असावेत. त्याच संख्याशास्त्राची त्यांना आत्यंतिक भावूकतेत वाहून जाण्यापासून वाचवण्यात मदत झाली. ज्याचा उल्लेख त्यांनी आपल्या अंगारमळा या पुस्तकात केला आहे. संस्कृतवर त्यांचे विलक्षण प्रेम मला आठवतं की, त्यांच्या वाढदिवसाला २०१४ साली मी त्यांना कालीदासाचं मेघदूत भेट म्हणून दिलं होतं. कुठलंही पुस्तक लागलं की ते, मला किंवा आल्हादला फोन करत. आणि पुस्तक आणायला सांगत. मेघदूतची त्यांनी माझ्याकडे अशीच मागणी केली होती. मेघदूतमधले आणि इतर कितीतरी संस्कृत श्लोक त्यांना पाठ होते. सॉमरसेट मॉमचे कितीतरी संग्रह त्यांच्याकडे होते. कविता, सुंदर वाक्य किंवा कोटेशन्स, उदाहरणं, गोष्टी याची त्यांच्या बोलण्यात रेलचेल असे. विहिणीची पंगतच जणू!

एकदा बोलता बोलता त्यांनी स्वित्झर्लंडमधल्या मुलांच्या स्पर्धेतली गोष्ट सांगितली. ते म्हणाले की, एका मुलीने खूप सुंदर कविता म्हंटली. त्यात एक ओळ होती, All kinds of everything remind me of you… काय ओळ आहे..आणि शरद जोशींची काय तरलता आहे! हे त्या दिवशी लक्षात आलं. अशीच एक कविता त्यांनी मला सांगितली होती ज्याचा आशय असा होता, की अनेक वर्षांच्या कालावधीनंतर दोन एकमेकांवर प्रेम करणारे ते दोघं भेटणार असतात. तो तीला म्हणतो, खूप काही घडून गेलंय, बरंच पाणी वाहून गेलंय…त्यानंतरही तुझं तितकच प्रेम माझ्यावर आहे का?  ते तसं असेल तर आपण नेहमी ज्या ओक वृक्षाच्याखाली भेटायचो, त्या ओक वृक्षाला तू पिवळ्या रंगाची रिबीन बांध. म्हणजे मी समजेन तुझं अजूनही तेवढंच, तसंच माझ्यावर प्रेम आहे. रिबीन नसली तर काय समजेन हे सांगण्याची गरज नाहीच. तो रेल्वेने येत असतो. त्याच्या मनात प्रचंड घालमेल सुरू असते, धाकधूक असते, प्राण कंठाशी आले असतात…खरंच असेल का बरं रिबीन बांधलेली की नाही?  गाडी ठरलेल्या ठिकाणाच्या जवळ यायला लागते…आणि बघतो तर काय!!!…केवळ त्याच ओक वृक्षाला नाही तर आसपासच्या सर्व ओक वृक्षांना पिवळ्या रंगाच्या रिबीनी बांधलेल्या असतात.

एका फ्रेंच लेखकाची अशीच एक सुंदर गोष्ट त्यांनी सांगितली. एक फ्रेंच लेखक असतो. त्याला एकदा रस्त्यात एक अतिशय सुंदर बाई दिसते. त्या बाईचं काही या लेखकाकडे लक्ष नसतं. या लेखकाला मात्र ती बाई प्रचंड आवडते. तिच्या सौंदर्याने तो वेडापिसा होतो आणि तिच्या मागे मागे जाऊ लागतो. मग अचानक त्या बाईच्या लक्षात येतं की, कुणीतरी आपला पाठलाग करत आहे. ती मागे वळून बघते आणि अहो आश्चर्यम्…त्या लेखकाला लक्षात येतं की ही तर आपली बायकोच आहे…आणि हे लक्षात आल्यावर आधी विस्मय आणि त्यानंतर जो काही आनंद त्याला होतो तो अवर्णनीय, अनिर्वचनीय असतो…

त्यांनी सांगितलेल्या या गोष्टींवरून त्यांची आवड किती अभिजात, किती तरल होती हे लक्षात येतं. ते सतत ‘मी फार रूक्ष आहे’ असं का म्हणत आणि तसं प्रोजेक्ट करत हे मला खरंच कधी कळलं नाही. कारण ते खोटं होतं. त्यांचा तो बचावात्मक पवित्रा होता असं आज वाटतं. त्यांना याची जाणीव होती की, ते भावूक झाले तर नियंत्रणाबाहेर होतील म्हणून कदाचित ते सतत असे पावसापासून स्वत:ला वाचवत असावेत. एरिक फ्रॉमच्या ‘स्वातंत्र्याचे भय’ या पुस्तकाची वेगळ्या अर्थाने इथे आठवण होते आहे. भावूक झालो तर आपण कामच करू शकणार नाही अशी भीती कदाचित त्यांना वाटत असावी.

एकदा अर्पण पत्रिकांचा विषय निघाला. मी जोशींना म्हंटलं, की कुठलंही पुस्तक हातात वाचायला घेतल्यावर मी आधी त्या पुस्तकाची अर्पण पत्रिका वाचत असते. कारण काही काही अर्पण पत्रिका इतक्या सुंदर असतात की, मूळ पुस्तकापेक्षा कधी कधी अर्पण पत्रिका आवडावी. ना.धो. महानोर यांच्या एका कविता संग्रहाची अर्पण पत्रिका मी उदाहरणादाखल सांगितली. ती अशी होती, ‘प्रिय सुलोचना हीस, निसर्गात जरी वेल झाडाच्या आधारानं वाढत असली तरी आपल्या चाळीस वर्षांच्या प्रवासात झाडंच वेलीच्या आधारानं अघटीत घडलं ते तुझ्यामुळे’. शिरीष पैंच्या ‘एका पावसाळ्यात’ या कविता संग्रहाची अर्पण पत्रिका फार सुंदर आहे, ‘या कविता त्यांच्यासाठी जे कवितेसाठी’. एकदा एक व्यक्तिचित्रांचं पुस्तक मी अक्षरधारा ग्रंथप्रदर्शनात चाळत होते. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या काहीतरी काम केलेल्या व्यक्तींबद्दल त्यात लिहिलं होतं. अनुक्रमणिका वाचताना एकदम थांबले, बाबा आमटेंवर लिहिलं होते आणि प्रकरणाचं शीर्षक होतं, ‘विराट अभावाच्या पूर्तीसाठी झगडणारा महामानव’. त्यातलं ‘विराट अभावाच्या पूर्तीसाठी’ हे इतकं काही भिडलं की, मी शीर्षक वाचून पुस्तक घेतलं. हे सगळं जोशींशी बोलत असताना त्यांना ते खूप आवडल्याचं दिसत होतं. मग ते चट्कन म्हणाले, मला आता एका इंग्रजी पुस्तकाची अर्पण पत्रिका आठवतेय. संबंधित पुस्तकाच्या लेखकाने ते पुस्तक आपल्या बायकोला अर्पण केलं होतं. त्याची अर्पण पत्रिका अशी होती, ‘माझ्या प्रिय बायकोला, जी बराच काळ माहेरी जाऊन राहिल्यामुळे मी हे पुस्तक पूर्ण करू शकलो’…हे सांगून नेहमीप्रमाणेच जोशी खळाळून हसायला लागले.

अगदी पहिल्यांदा मी जेव्हा आंबेठाणला गेले होते तेव्हा बोलता बोलता मी सहज त्यांना म्हंटलं की, मला गझल आवडते. त्यावर त्यांनी फट्कन प्रतिक्रिया दिली. ‘मला गझल हा काव्यप्रकार अजिबात आवडत नाही’. मला धक्काच बसला. एखाद्याने, जर आपल्याला एखादी गोष्ट आवडते म्हणून सांगितली, तर आपण लगेच, मला अजिबात नाही आवडत ती, असे तोडून नाही ना बोलत. त्यामुळे हे इतके स्पष्ट आणि मुख्य म्हणजे तोडून कसं बोलू शकतात याचं मला आश्चर्यच वाटले. मग लगेच पुढे ते म्हणाले, पण मला त्या ‘अर्थ’ आणि ‘साथ साथ’ मधल्या गझल आवडतात बरं का ? मी विचारलं ‘तुमको देखा तो ये ख्याल आया’…त्यावर त्यांनी मोठ्या आनंदाने मान डोलावली. मग विषय निघाला चित्रा सिंगचा. चित्रा सिंग ही माझी आवडती गझल गायिका. ती अनेकांना आवडत नाही हे खरं आहे. पण मला मात्र तिचा आवाज आवडतो. जगजीतच्या अनेक कंपोझिशन्स तीने अतिशय ताकदीने सादर केल्या आहेत. मी जोशींना विचारलं, ‘तुम्हाला चित्रा सिंग आवडते’ ? त्यावर जोशी, ‘मला नाही आवडत त्या बाईचा आवाज’. मी परत थक्क आणि चुप्प. आणि बाई वगैरे काय एकदम. एखादी गोष्ट आवडली नाही की ती, अगदीच कचरा करून टाकायची हा जोशांचा स्वभाव मला एव्हाना लक्षात आला होता. त्या अर्थाने मला त्यांचा हा तुच्छतावाद आवडत नसे. यापार्श्वभूमीवर एक गोष्ट मात्र आवर्जून सांगावी लागेल. गझल जरी एका फटकाऱ्यात त्यांनी उडवून लावली तरी बबनमामांना त्यांनी आवर्जून ‘साथ साथ’ आणि ‘अर्थ’ या सिनेमाच्या कॅसेट्स वाजवायला सांगितल्या होत्या. त्या अर्थातच मला आवडतात म्हणूनच हे सांगण्याची गरज नाही. हे त्यावेळेला नाही लक्षात आलं आज लिहिता लिहिता येतंय. त्यांचं व्यक्त होणं हे अशा प्रकारचं होतं. त्या अर्थाने त्यांना समजून घेणं हे तसं अवघडच होतं.

मग त्यावरूनच पुढे सरकत ‘मी मुक्तछंदातली कविता ही कविताच मानत नाही’ हा बाँब त्यांनी माझ्यावर टाकला. मी परत संभ्रमात. कारण मला मुक्त छंदातली कविता आवडते. केवळ छंदबद्ध आणि वृत्तातल्या कवितेलाच ते कविता मानायचे. हे बहुदा संस्कृतच्या प्रभावानं झालं असावं असं वाटतं. कितीतरी मराठीतल्या जुन्या कविता त्यांना पाठ होत्या. चौथ्या परभणी जिल्हा मराठी साहित्य संमेलनात शरद जोशींनी भाषण केलं होतं. त्यात त्यांनी मराठी साहित्य अधिक समृद्ध होण्यासाठी काही सूचना केल्या होत्या. त्यात भाषणाच्या शेवटी ते म्हणाले, ‘’समारोपाच्या भाषणात मी थोडा कुचेष्ठेचा स्वर काढला असला तरी ते वेदनेनं बोललो आहे. मराठी भाषेवर माझं अपरंपार प्रेम आहे. काही मोजके लोक सोडले तर, एकाच अर्थाच्या किंवा एकाच वृत्ताच्या कविता म्हणण्याची स्पर्धा लावली तर मी इथल्या सगळ्यांना हरवीन’’.

अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्राच्या विद्वानाला मराठीतल्या वृत्तबद्ध कविता पाठ असणे म्हणजे व्यक्तिमत्वाला आणि बुद्धिमत्तेला किती डायमेन्शन्स आहेत हे लक्षात येते. जेव्हा मी माझ्या मुलीला रेवाला त्यांच्याकडे पहिल्यांदा घेऊन गेले होते तेव्हा तिच्यासाठी त्यांनी कितीतरी मराठी कविता म्हटल्या होत्या. रेवाला ते म्हणाले, ‘चल रेवा मी तुला घर दाखवतो’. मग रेवाचा हात हातात धरून ते घरभर फिरले तीला म्हणाले,  ‘‘रेवा आता तू माझा हात हातात घरून मला सांभाळ’’. त्यावेळी त्यांचा झोक जात होता. त्यांना ते तसं बघणं माझ्यासाठी असहनीय होतं.

मुक्तछंदातल्या बाबतीत अपवाद फक्त ते इंद्रजीत भालेराव यांचा करत. इंद्रजीत भालेराव यांच्या कविता त्यांना खूप आवडायच्या. पण त्याचबरोबर ‘त्या कवितांमधलं शेतकऱ्याचं दु:ख माझ्या सहनशक्तीपलिकडे आहे’ असं ते म्हणत.

उत्तम, कसदार साहित्य निर्मिती व्हावयाची असेल तर अनुभवाचं विश्व विस्तारलं पाहीजे हा एक नवा आणि अत्यंत महत्वाचा विचार शरद जोशींनी मांडला. ‘मी साहित्यिक नाही’ या लेखात ते म्हणतात, ‘’तुमच्या शब्दांचा, प्रतिभेचा फुलोरा हा तुमच्या अनुभवाच्या संपन्न भूमीतून वाढत असतो. मग ज्यांचं आयुष्य दरिद्री, पैशानं नव्हे, तर अनुभवानं; ज्यांचं आयुष्य अनुभवाच्या विविधतेनं नटलेलं नाही अशा माणसांचं साहित्य हे फक्त मुंबईच्या लोकल गाडीतील प्रवासातच वाचायच्या लायकीचं होतं आणि आज वस्तुस्थिती अशी आहे, की मराठीतील मान्यवर लेखकांचं साहित्य हे लोकल गाडीत जर का खारे दाणे विकत घ्यायला पैसे नसतील तर शेजाऱ्याकडून वाचण्यालायक साहित्य झालं आहे.’’

जोशींनी या लेखामध्ये त्यांचे गुरू डॉ. मुरंजन यांचं उदाहऱण दिलं आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मध्ये काम केलं होतं. अमेरिकेनं त्यांना अमेरिकेतील चलनवाढ कशी थांबवावी यावर चर्चा करायला बोलावलं होतं. अशा दर्जाच्या माणसाने आंतरराष्ट्रीय नाणेव्यवस्था हे पुस्तक मराठीत लिहिलं. त्यावेळी लोकांनी त्यांच्यावर हे पुस्तक इंग्लीशमध्ये लिहायला हवं होतं अशी टीका केली. १९५५ सालची ही गोष्ट आहे. त्या टीकाकारांना डॉ.सुमंत मुरंजनांनी उत्तर दिलं होतं, ‘की माझ्या अनुभवांच्या आधारे ज्यांना आंतरराष्ट्रीय नाणेव्यवस्थेचा अभ्यास करायचा असेल त्याने मराठी भाषा शिकावी अशी माझी इच्छा आहे. इतकी हिंमत दाखवायला तसा समृद्ध अनुभव गाठीशी असावा लागतो. तो मराठी साहित्यिकांमध्ये आहे का’ असा प्रश्न जोशींनी विचारला होता. साहित्यवेलीला लागलेली कीड मारायची असेल तर आधी त्या वेलीवर वेगळी पानं येतील असं काही तरी करा हे जोशींचं म्हणणं होतं. साहित्यामध्ये, भाषेमध्ये नवीन शब्द येत नाहीत, नवीन अनुभूती नाही कारण आमच सगळ्याचं आयुष्य दरिद्री झालं आहे. अमेरिकेत एखादं पुस्तक प्रकाशित करायचं ठरलं तर प्रकाशक पहिली आवृत्ती म्हणून किमान दहा लाखांची काढावी असं म्हणतो. मराठीत एखादं पुस्तक प्रकाशित करायचं ठरलं तर प्रकाशक हजाराची आवृत्ती काढतो. जोशींनी याचाही संबंध गरिबीशी जोडला. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘’मुळात गरिबीचा प्रश्न सुटला पाहीजे. जर का गरिबीचा प्रश्न सुटला नाही, आयुष्य संपन्न झाली नाहीत तर काय होणार आहे?गरिबी असताना आम्ही गरिबीचं विदारक दृश्य दाखवण्याच्या कामात अपयशी झालो आहोत. आणि संपन्नतेचा अनुभव नसल्याने आमचे डोळेच थिटे पडले आहेत. अशा दुष्ट चक्रात साहित्य आणि साहित्यक सापडले आहेत’’ असं जोशीचं म्हणणं होतं. अन् ते खरंही आहे. त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला तो असा, की ग्रामीण साहित्य लिहिलं, ग्रंथाली सारखी चळवळ चालवली, पण ज्या शेतकऱ्याला समोर ठेवून तुम्ही हे लिहिता, त्याचा कापूस खरेदी केंद्रावर विकला जात नाही, कापूस विकला गेला नाही म्हणून मग चेक मिळत नाही अन् चेक मिळाला तरी तो वटून पैसे मिळत नाही अशी स्थिती आहे. मग ग्रामीण साहित्य वाचायचं कुणी? यासाठी काहीतरी केलं पाहीजे असं आवाहन जोशी सातत्यानं करत होते.

माझ्या लहानपणापासूनच मी गझल ऐकतच मोठी झालेली आहे. माझे वडील भुसावळला प्राध्यापक होते. ते कॉलेजमधून घरी आले की, आई चहा करत असे आणि दोघं जगजीत-चित्रा लावून बसत. त्यामुळे खूप कानावर पडत गेलं. मला आठवतं की मी, तीन वर्षांची असेन, तेव्हा पहिल्यांदा अनुप जलोटा यांनी म्हंटलेली, चांद अंगडाईया ले रहा है, ही गझल म्हणायला लागले होते. अर्थात भजनसम्राट असलेल्या अनुप जलोटांचा गझलेत काही सूर लागला नाही हा भाग अलाहिदा. नंतर नंतर मग मी, उर्दू शब्दकोश घेऊन उर्दू शब्दांचे अर्थ बघायला लागले. अर्थ समजावून घ्यायला लागले. गझलेतला विरोधाभास मला खूप आवडला. दोन ओळीत इतका सुंदर विरोधाभास वर्णन करण्याची ताकद मला दुसऱ्या भाषेत तरी आढळली नाही. शरद जोशींचं म्हणणं की, गझलेत फक्त प्रेमभंगाचं दु:खच चघळलं जातं. पण गझल प्रियकर-प्रेयसी या पलीकडे नाही हे ही खोटं आहे. पूर्वी हाच गझलेचा प्रामुख्याने विषय होता हे खरं असलं तरी, आज अनेक शायर सामाजिक विषयांवर गझल लिहू लागले आहेत. निदा फाजली हे त्यातलं मोठं नाव आहे. त्यांचा एक शेर आहे,

‘बच्चा बोला देख कर मस्जिद आलीशान|

अल्लाह तेरे एक को, इतना बडा मकान’ ? 

एक गरीब रस्त्यावर राहणारा मुलगा आहे, त्याला स्वाभाविक प्रश्न पडतो की, मला साधं खोपटंसुद्धा नाही आणि या अल्लाहला एवढी मोठी मशिद! या एकाच शेरमध्ये विषमतेविरूद्ध प्रत्यक्ष अल्लालासुद्धा प्रश्न विचारण्याची ताकद शायर ठेवतो अन् तेही इस्लाममध्ये.

सो जाते हैं फूटपाथपर अखबार बिछाकर|

मजदूर कभी निंद की, गोली नही खाते|

असं एक शायर म्हणतो. शरद जोशींच्याच इंडिया आणि भारतची विभागणी त्याने काव्यात्मक पद्धतीने केली आहे.

पण माझ्या या युक्तीवादाचा काही एक परिणाम त्यांच्यावर झाला नाही. आणि काही अंशी त्यांचं म्हणणं खरंही होतं. कारण बहुतांश गझल या दु:खीच आहेत.

मी जेव्हा त्यांना सांगितलं की, मी गझल ऐकते तेव्हा ते मला म्हणाले ‘‘तू गझल ऐकू नकोस, तुझं आयुष्य दु:खी होईल. नुसता दु:खी काव्यप्रकार आहे हा. ज्यात आत्मपीडनाशिवाय काहीही भरलेलं नाहीये’’. हा रोगट काव्यप्रकार आहे असं त्यांना वाटत असे. त्या पार्श्वभूमीवर मराठी शायरीचे जनक भाऊसाहेब पाटणकर त्यांना आवडायचे. त्यांची शायरी हेल्दी आहे असं ते म्हणायचे. मला एकदा ते म्हणाले की, ‘मी अंगारमळा नाव ठेवलं. मला कधी कधी वाटतं की, हे नाव नको होतं ठेवायला. माझं सगळं घर पेटलं. तुम्ही नाव सुद्धा विचारपूर्वक ठेवायला पाहीजे’. कारण जसं नाव ठेवाल तसं घडत जातं आयुष्यात.’

हे काहीसं गुढ आहे खरं. पण बऱ्याच अंशी खरंही आहे. मला नेमका संदर्भ आठवत नाही पण बहुदा लता राजेंच्या पुस्तकातच कुठेतरी वाचलं होतं. एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिच्या आयुष्यात तीने एका नाटकात जी भूमिका केली होती, अगदी त्याचप्रमाणे शोकांतिका घडली. तर्काचा आधार घेऊन या मागचं कारण शोधायचा मी प्रयत्न करते तेव्हा असं लक्षात येतं की, जे तुम्ही सतत बघता, ऐकता किंवा बोलता ते तुमच्या सबकॉन्शस माईंडमध्ये जात असावं किंबहुना जातंच. मग माणसाची तशीच मनस्थिती, विचार बनू लागतात. विचारानुसार कृती हे सूत्र लक्षात घेतलं तर मग तशाच घटना घडणार. गझलेत काही प्रमाणात खरंच आत्मपीडन आहे, दु:ख आहे हे मान्य करावंच लागेल. पण त्याचबरोबर गझल तुम्हाला सहअनुभूती (एम्पथी) शिकवते हे ही नाकारता येणार नाही. तेव्हा जोशींच्या या म्हणण्यानुसार, नावा बाबत तर मी जागरूक झाले पण माझं गझल वेड काही सुटलं नाही. कुसुमाग्रज हे जोशींचे आवडते कवी.

‘एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार’ या कुसुमाग्रजांच्या ओळींवरूनच त्यांना ‘अंगारमळा’ हे नाव सुचलं होतं. ‘विशाखा’ या कुसुमाग्रजांच्या काव्यसंग्रहातल्या कित्येक कविता त्यांना पाठ होत्या. घरांची,माणसांची अशी नावं ठेवायची वेळ आली की ते, जुन्या मराठी कवितांमध्ये शोधत. केशवसुतांच्या

जेथे ओढे वनराजी| वृत्ती तेथे रमे माझी|

कारण काही साक्ष तिथे| मज त्या श्रेयाची पटते|

या ओळींवरून त्यांनी पहिल्या मुलीचं नाव श्रेया ठेवलं होतं. नाविन्याचा ध्यास, शोध हा पण जोशींच्या व्यक्तिमत्वातला एक गुण होता. मला ते म्हणाले होते, जेव्हा मी श्रेया हे नाव ठेवलं तेव्हा ते नाव कधीच कुणाचं ऐकलं नव्हतं. त्यानंतर ते प्रसिद्ध पावलं. तुकारामांबद्दल त्यांना विलक्षण आदर होता. तसं लिहिणं अपने बस की बात नहीं असं ते म्हणत.

नाव ठेवण्यावरून आठवलं. मला मुलगी झाली तेव्हा मी अन् अभिजित २ महिने नुसते नावावरच विचार करत होतो. रेवा अशी गोरी आणि राखाडी-निळ्या डोळ्यांची, गुबगुबीत दिसायची. तीला बघून आम्हा दोघांनाही वाटे हिचं काही नावच ठेवू नये. नाव ठेवणं म्हणजे पार्थिव होणं..दैवी गोष्टींना नाव नसतं. खूप खूप विचार केला आम्ही. अगदी उदया सकाळी बारसं, तर रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही नाव ठेवू नये हाच विचार करत होतो. शेवटी व्यवहार, जगाची रीत आणि सोय म्हणून आम्ही नाव ठेवलं. हा प्रसंग मी शरद जोशींना सांगितला तेव्हा ते म्हणाले, ‘’अगं अगदी अशीच मनस्थिती आमची गौरीच्या जन्मानंतर झाली होती. ती सुद्धा इतकी सुंदर दिसायची की, हिचं काही नावच ठेवू नये असं वाटे’’.

एकदा मी, माझी आई, जोशी आणि बबनमामा असे चौघंजण सज्जनगडला कारने जात होतो. अचानक रेडिओवर ‘दिवारों से मिलकर रोना अच्छा लगता है’ ही पंकज उदासने गायलेली प्रसिद्ध गझल लागली. ज्येष्ठ शायर कैसर उल जाफरींनी ती लिहिली आहे.  अप्रतीम गझल आहे. प्रचंड एकटेपणा, व्याकुळता त्यात अशी काही वर्णन केली आहे की बस लाजवाब!  कंपोझिशनही अत्यंत सुंदर आहे. यातलं एक अप्रसिद्ध कडवं इतकं सुंदर आहे की, ओशोंनी ते शीर्षक म्हणून घेऊन त्यावर ओशो टाईम्सचा एक अख्खा अंक काढला होता. ते कडवं म्हणजे,

आँखों को भी, ले डूबा ये, दिल का पागलपन|

आते जाते जो मिलता है, तुमसा लगता है|

अतिशय तरल अशी गझल आहे ही. त्यात आणखी एक कडवं आहे.

‘कितने दिनों के प्यासे होंगे यारो सोचो तो

शबनम का कतरा भी जिनको दर्या लगता है’… याचा अर्थ असा की, दवबिंदू किती लहान, आणि त्यातला पाण्याचा थेंब तर विचारायलाच नको. पण तो दवबिंदूतला पाण्याचा थेंबही मला समुद्रासारखा वाटतो. यावरून मी किती दिवसांचा तहानलेला आहे याची तुम्ही कल्पना करू शकता. जोशी म्हणाले. हे कडवं मला खूप आवडतं. मी हा शेर रिलेट करू शकतो. माझ्या स्वत:च्या आयुष्यात माझी अशीच स्थिती आहे. माझ्याशी थोडंही कोणी प्रेमानं बोललं तर मला तो दर्या वाटतो. मी स्तब्ध झाले काय बोलावं तेच सुचत नव्हतं. त्या क्षणी त्यांची व्याकुळता किती खोल आणि तीव्र आहे ते लक्षात आलं. ते स्वत:ला मी अत्यंत रूक्ष आणि कोरडा माणूस आहे असे का म्हणत याचं कोडं मला अजूनही उलगडलं नाही. मला जे जोशी दिसले ते अत्यंत तरल, संवेदनशील, साहित्यातलं, कवितेतलं सौंदर्य टिपणारे, उच्च दर्जाचे आस्वादक आणि खूपच रोमँटिक असे होते. स्वत:बाबत मी रूक्ष आहे असा आभास ते का निर्माण करत हे मला समजत नसे. आपली आत्यंतिक भावूकता लोकांसमोर येऊन ते आपल्याला दुर्बल समजतील का ही भीती असावी का त्यांच्या मनात?

(लेखिका iTransform skill enhancers private limited च्या संचालक आहेत)

[email protected]

 

Previous articleराहुल गांधी शापित आहेत!-विनोद शिरसाठ
Next articleकृत्रिम बुध्दिमत्तेच्या डिजिटल युगात गांधी-आंबेडकरांचे करायचे काय ?  
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.