सुखदुःखांची ‘बॅलेन्स शीट’

आशुतोष शेवाळकर


सुख आणि दुःख या दोनच प्रमुख संवेदनांभोवती आपलं सगळं आयुष्य घोटाळत असतं. दुःखाला भिण्यात आणि सुखाची सतत लालसा बाळगण्यातच आपलं आयुष्य खर्ची जातं.
सुखदुःखाच्या या संवेदना उत्पन्न कुठे होतात, डोक्यात की हृदयात, की या उत्पन्न होणारं मन हे एक वेगळंच आस्तित्त्व आहे? संवेदना उत्पन्न होण्याचं नेमकं असं काही केंद्र असेल का आणि त्या केंद्राला विद्युत वा चुंबकीय लहरींनी उत्तेजीत ठेवून सतत सुखातच राहणं आपल्याला शक्य होऊ शकेल का?


लॉस एंजेलीसच्या एका मराठी वैज्ञानिकानी व्यायामानी शरीरात काही ‘एन्झाइम्स’ तयार होतात व त्यांनी आनंदाची निर्मिती होते असा शोध लावून त्यांना ‘आनंदामाईडस’ असं नाव दिलं आहे. मेंदूतलं ‘सेरॉनटेनीन’ नावाचं रसायन कमी झालं की ‘डिप्रेशन’ येतं असंही संशोधन आहे. ‘अॅसिडिटी’ वाढली की ‘डिप्रेशन’ येतं असा बहुतेकांचा अनुभव असतोच. कुठल्याही विशिष्ट लौकिक घटनेशिवाय आपल्याला विनाकारण येणारे सुख-दुःखांचे ‘मुडस्’ हा बहुतांशी ‘केमिकल लोच्याच’ असतो कां?
एकाग्रतेचा आणि आनंदाचा जवळचा नातेसंबंध आहे. आपण जेव्हा केव्हा कुठल्याही कारणानी काही वेळेपर्यंत सतत एकाग्र राहतो तेव्हा मनात आनंदाची, उत्साहाची निर्मिती होत असते. एकाग्रतेचा सहभाग असलेले वाचन, लेखन, संगीत म्हणूनच आपल्याला अधिक उच्च प्रतीचा आनंद देतात. कुठलाही सुखोपभोग मग ते साधं जेवण का असेना आपण जितक्या एकाग्रतेनी घेऊ तितकाच आपल्याला त्यापासून जास्ती आनंद मिळत असतो.
तसा आपल्या आयुष्यातला बहुतांशी काळ फारसं सुख किंवा दुःख असं काहीच नसलेला जात असतो. वाचन, संगीत, छंद, खेळ, इतरांसाठी काही करणे असं करून हा काळ आनंदात परिवर्तीत करता येतो. भौतिक सुखापासून तात्कालिक आनंद सोडला तर फारसं काही मिळत नसतं. कितीदाही आणि कितीही उत्कटतेनी भोगलेल्या सुखानी आपली त्या सुखाविषयीची लालसा कधीच पूर्ण तृप्त होत नसते, उलट पुनरावृत्तीची तृष्णाच अधिक वाढते. पण बौद्धिक सुखांपासून मात्र मानसिक उन्नयनही होत असतं. दुःखाचा प्रत्येक अनुभव आपल्याला काही ना काही शिकवून, शहाणा करून, अधिक परिपक्व करून जातो. अवकाशाचा अभ्यास जसा ग्रहणाच्या काळातचं चांगल्या रीतीनी होऊ शकतो तसाच स्वतःच्या मनाचा अभ्यास दुःखाच्या काळातच चांगल्या तऱ्हेने होतो. संकटाच्या, दुःखाच्या काळांमुळे आपल्यात झालेल्या बदलांनी त्यानंतर आयुष्यात आपल्या पदरी कितीतरी सुखं घातलीत असंही मागे वळून विश्लेषण करताना लक्षात येतं. तात्पुरता आनंद देऊन आसक्त, आधीन करणाऱ्या, माज आणून माणूस म्हणून एक पायरी खाली उतरवणाऱ्या सुखांपेक्षा कधी कधी आयुष्यात उत्थान घडवून आणलेली दुःखच मग श्रेष्ठ वाटू लागतात.


सुखाच्या मागे आणि दुःखापासून दूर अशा दोन्हीमधे केवळ धावण्याव्यतिरिक्त आयुष्याला दुसरा काही अर्थच नाही का, असा प्रश्न मनाला मग कधीतरी पडतो. हा प्रश्न पडतो तीच आयुष्याचा खरा अर्थ उलगडायची सुरवात असते.

तटस्थ एकाग्र भावनेनी हे दोन्ही भोग घेतलेत की आपल्या आतमधे काहीतरी वाढीला लागतं, त्या वाढीतच मजा असते, जीवनाचं सार्थक असतं हे मग लक्षात यायला लागतं. त्रयस्थ एकाग्रतेच्या अवस्थेत राहण्यातच सुख असतं, या अवस्थेत सगळी सुखही अधिक उत्कट होतात आणि दुःखही थोडी बोथट होतात हे ही मग कळायला लागतं. रोज आतून उठणाऱ्या वेगवेगळ्या वृत्ती आणि त्यांची विनाकारणची सुख-दुःखही मग निरपेक्षपणे पाहता येतात. अशा एकाग्रतेच्या अवस्थेनी कुठल्याही भौतिक घटनेच्या मौताज न राहता केवळ आपल्या आस्तित्त्वाचंच सुख अनुभवत मग जगता यायला लागतं.
सध्या मार्च महिन्याचे वारे आहेत, त्यानिमित्तानी सुखदुःखांची ही ‘बॅलेंन्स शीट’.

(लेखक नामवंत व्यावसायिक आहेत)

+91 98224 66401

Previous articleकोई मिल गया…!
Next articleआपल्याकडे माणूस नाही, आपल्या ‘जातीचा माणूस’ जन्माला घातला जातो!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here