सेक्स…आणि मी…

मीडिया वॉच दिवाळी अंक -२०१८

–मनश्री पाठक

‘बाईलाही सेक्सची गरज असते या ऐवजी सेक्ससाठी बाईची गरज असते’ हेच आजपर्यंत अधोरेखित होत आलंय…बाईच्या आयुष्यात जर सेक्स आलाच तर तो केवळ तिचं कौमार्यभंग करुन तिला माता बनवणारा असावा हेच सांगितलं गेलं…त्यामुळे ती स्वत कधीच शारिरीक सुख मिळवण्यासाठी आक्रमक झाली नाही, तिनं कधी कुणावर बळजबरी, बलात्कार केले नाहीत, तिची वासना कधीच कुणाच्या आयुष्याची माती करणारी ठरली नाही…याबदल्यात तिच्या शरिराची कायम विटंबना झाली, कोणत्याच रात्री तिची इच्छा काय हे कधीच विचारलं गेलं नाही…

 

खरं सांगू का, या लेखाचं शिर्षक लिहीतांना मी ते दहा वेळा खोडलंय, बदललंय आणि पुन्हा लिहीलंय…वर हे लिहीतांना मला कुणी बघत तर नाहीय ना, माझ्या स्क्रीनवरचं कुणी काही वाचत नाहीय ना, हे सुद्धा चेक केलंय…कारण डायरेक्ट सेक्सवर आणि ते ही बायकांनी लिहीणं, बोलणं जरा अवघड आहे…आता असं म्हणटलं तर तुम्ही म्हणाल कळलं, या लेखाचं फक्त शिर्षकच काय तेवढं बोल्ड दिसतंय, बाकी त्याच त्या बायकी रडकथा…पण, खरंच सांगते सेक्स आणि त्यापुढे मी हा शब्द जोडला गेला की लिहीणारे हात त्यातल्या त्यात सेफ शब्द शोधायला लागतात..आताआतापर्यंत तर बायकांच्या सेक्सवर लिहीणं काय अगदी मनातल्यामनात स्वत:शी बोलणंसुद्धा अशक्य वाटत होतं…तसे आता बाईच्या सेक्स बद्दल, तिच्या लैंगिक स्वातंत्र्याबद्दल बोलणारे सिनेमे आलेत, काही पुस्तकंही आहेत…वीरे-द वेडींग मधली स्वरा, लस्ट स्टोरीजमधली कायरा,लिप्सटिक अंडर माय बुरखा मधली रत्ना या त्यात काम करणा-या बायका उघड उघड त्यांच्या सेक्सच्या गरजांविषयी बोलल्यायेत, त्यांनी त्यांचे सीन्सही उत्तम वठवलेत…पण, शेवटी त्या पडद्यावर काम करणा-या बायका, त्या पडद्यावर बोलणार…एखाद्या कियाराला धडधडीत ‘’मेरी हसरत पुरी ना हो तो?’’ हा प्रश्न पडद्यावर विचारायला काय जातंय…पण, आम्ही हेच सिन पाँपकाँर्न खात बघणा-या बायका आहोत…आपली हसरत पुरी होते का हा प्रश्न आम्हांला स्वत:ला मनातल्या मनातही विचारावासा वाटत नाही…शाळेत शिकवलेल्या मुलभूत गरजा कोणत्या या प्रश्नाला अन्न, पाणी, निवारा एवढंच उत्तर पाठ केलेल्या पिढीतले आम्ही…सेक्स ही सुद्धा मुलभूत गरज असते हे बराच काळ माहितीच नव्हतं…त्यानंतर सेक्स ही हौस नाही गरज आहे हे कळता कळता विशी-पंचविशी उलटली…अर्थात यात मधला-अधला रोमान्स, लाँग नाईटआऊट, त्या त्या वयात थेटरमधल्या अंधारातले,   सारसबाग, झेड ब्रीज, मरिनड्राईव्हवर फुलणारे तारुण्यसुलभ अविष्कार हेही होतेच…मग, लग्नं झालं…आणि लग्नानंतरही सेक्स ही गरज असली तर ती नव-यासाठी बाहेर जावं लागु नये म्हणून आणि बायकोसाठी पोरं जन्माला घालता यावीत म्हणून हेच बिंबवलं गेलं होतं…बाईचं स्वतचं शारिरीक सुख नक्की कशात हे काही फार शोधलं गेलं नाही…बाईसाठी सेक्स ही खरोखऱ गरज असते का या प्रश्नाचं सविस्तर उत्तर काही चटकन सापडलं नाही…मुळात हा प्रश्नच लागु की गैरलागू आहे हेच ठरवण्यात बराच वेळ गेला…

तसं आतापर्यंत बायकांच्या प्रश्नांवर बरंच लिहीलं, बोललं गेलंय…स्त्रीस्वातंत्र्यावर ब-याच चर्चा झाल्या…पण,त्याच स्त्रिचं लैंगीक स्वातंत्र्य हा प्रश्न मात्र विचारलाच गेला नाही…असा प्रश्न पडुच शकत नाही, पडु नयेच हेच ठसवलं गेलं…बाईला तीचं लहानपण, तरुणपण, म्हातारपण कसं सुरक्षित, सन्मानाने जगता येईल याचा विचार झाला…पण, बाईला बाईपण कसं जगता येईल याकडे फारसं कुणाचं लक्ष गेलं नाही…ते कुणाला द्यावंही वाटलं नाही…

बाईचं बाईपण म्हणजे वेगवेगळ्या वयातले बायकांचे बाईपणाचे सोहळे एवढंच गृहित धरलं गेलं…वयात येणे,नटणे-मुरडणे, मखरात बसणे, ओटीपोट धरुन व्हिवळणे, लग्नानंतर दुधाचा ग्लास हातात घेऊन जाणे, त्या दुधाच्या ग्लास वाल्या रात्रीसाठी ए टू झेड शाँपींग करणे, डोहाळजेवणात झोपाळ्यावर बसणे, प्रेग्नेंसी फोटोशुट करणे, लेबर रुममध्ये जाणे-बाहेर येणे, पोरांना पदराखाली घेत मोठं करणे आणि चाळीशीनंतर या सगळ्यातून निवृत्त होत रजोनिवृत्ती घेणे यात हे बाईपणाचे सोहळे आणि बाईचं खरं सुख सामावलेलं असतं असं आम्हांला मोठ्या बायकांनी शिकवलंय… पण, पुरषाला मिळतं तसं बाईचं शारिरीक सुख कोणतं, ते नेमकं कशात आहे, ते कसं मिळवायचं यावर कधी कुणी काहीही बोललं नाही…

आताआता काही चित्रपटांमधून ते दिसायला लागलं…आणि घराघरातल्या मध्यमवर्गीय बायकांपर्यंत पोहोचलं…यातले बरेच सिन बोल्ड सिन च्या नावाखाली वादात सापडले…अश्लील ठऱले…यात स्वरा भास्करचं पडद्यावरचं हस्तमैथुन कुणाच्या पचनी पडलं नाही, तर लस्ट स्टोरीज मधल्या नवीनच लग्नं झालेल्या कायराचं व्हायब्रेटर वापरणंही पाहवलं नाही…पण, या काही सिन्सने बायकांच्या मनात खळबळ माजवली हे खरंय…आणि याच बायकांना आपली हसरत, आपलं सुख शोधायला लावलं हे ही खरंच…

हा लेख लिहीतांना मी स्वतसोबतच माझ्या मैत्रिणींशी, वयानं लहान-मोठ्या असलेल्या बायकांशीही बोलले…जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा कळलं की यात बोलण्यासारखं आणि करण्यासारखंही बरंच काही आहे…

माझ्यासारख्या, माझ्या वयातल्या मुली स्वतच्या सेक्सलाईफबाबत ब-यापैकी खुललेल्या आहेत…लग्नाआधी आणि लग्नानंतरचा सेक्स अशी काही सेक्सची विभागणी त्यांनी केलेली नाही…अर्थात उघड उघड हे मान्य करणा-या कमीच…कारण, तसं मान्य केलं तर त्या बँड गर्ल ठरतील…पण, लग्नाआधी फक्त हातात हात आणि वरवरचा रोमान्सच पुरे हा नियम त्यांनी मोडलाय…पण, जाहिरपणे याचं समर्थन करता येईल इतकी हिंमत त्यांच्यात नक्कीच नाही…

माझ्या एका मैत्रिणीचं ब्रेकअप झालं, पार्टनर सोडून गेला, एकीला कुणी भेटलंच नाही तर मग काय… आयुष्यात दुसरा पुरुष येईपर्यंत वाट पाहायची आणि तेव्हाच काय ती गरज भागवायची असं या मुलींना वाटतं…अर्थात पुरुषाशिवायही तात्पुरती गरज भागु शकेल हे त्यांना माहितीय…त्या पाँर्न फिल्मही पाहतात…इ-क्रांतीमुळे हस्तमैथुन संकल्पना आणि शास्त्र याबाबतचं थेरॉटिकल ज्ञानही त्यांनी मिळवलंय…पण, इतकं काही लगेच डोक्यावरुन पाणी गेलं नाहीय…आताची गरज भागवायची म्हणून लगेच बाजारात जाऊन व्हायब्रेटर आणण्यापेक्षा एक कायमस्वरुपी हक्काचा व्हायब्रेटर निवडून संसार करणं त्यांना जास्त सोयीचं वाटतं…

अर्थात अनेकींच्या मते लग्नाआधीच्या काळातले हे हक्काचे व्हायब्रेटर बदलु शकतात…लग्नाआधी संध्याकाळच्या सोयीसाठी कुणीतरी असावं एवढीच अपेक्षा असते…मग, रोमान्स फुलायला लागला, त्याच्या सोबत असतांना जमिनीपासून जरा चार पावलं वर जायला लागली आणि हाच तो पर्मनन्ट व्हायब्रेटर असं वाटायला लागलं की, लग्नं करणार ते याच्याशीच हे नक्की होऊन जातं…मग, मात्र एकदा निश्चित केलेला व्हायब्रेटर सहजासहजी बदलता येत नाही…आणि मग ‘लग्नं तर करणारच आहोत ना मग झालं तर’ असं म्हणत लग्नाआधीचा सेक्स अचानक जायज होऊन जातो…आणि मग अश्या रितीनं अख्खं आयुष्य एकाच मॉडेलच्या व्हायब्रेशनवर काढायचं नक्की होतं…

आता हे झालं लग्नाआधी चाचपणी करुन, डेमो पाहुन निवडलेल्या नव-याबद्दल…पण, अँरेंज मँरेज करायचं म्हणजे पहिलं टेन्शन — आपलं अनुभवीपण उघडं पडू नये…त्यासाठी वेगळी कसरत…काहींनी सांगीतलं की, चहा-कांदेपोहे कार्यक्रमानंतर तुम्ही भेटून, बोलुन काय ते ठरवा असा थोरामोठ्यांच्या आदेशाचा आणखी एक कार्यक्रम असतो…या कार्यक्रमादरम्यान पूर्वायुष्यातल्या घडामोडींबाबत माफक देवाणघेवाण होते…माझ्याही आधी कुणी होता किंवा होती तर असू दे आता मी आहे इतका मोकळेपणा आणि सहजताही येते…

पण, जर पाटी दोन्ही बाजूंनी कोरीच असेल तर मात्र पंचाईत…लग्नानंतरच्या रात्री सुरुवात कुठून, कशी आणि कुणी करायची हे समजत नाही…मी अनेकींना विचारलं तुम्ही घेता का पुढाकार तर तशी काही गरजच पडत नाही हेच उत्तर आलं…अनेकींना तर स्वतच्या सुखाचा परमोच्च बिंदु कुठला हे सांगताच येत नाही…नवरा,जोडीदार सुख देण्यात कमी पडतो का आणि कमी पडला तर काय करणार या प्रश्नावर मात्र माझ्या पिढीच्या मुली असं काही नसतं म्हणून मोकळ्या होतात…आणि जोपर्यंत मनं जुळतायेत तोपर्यंत दुसरा पर्याय शोधण्याचा विचारही करणार नाही म्हणतात…

यातून कुणी एखादी असलीच बेडवर आक्रमक, तिनं केले नाँनव्हेज जोक फॉरवर्ड, किंवा मारल्याच अनुभवीपणाच्या रसाळ गप्पा तर ती ‘तसलीच’ ठरते…जोडीदार, नवरा नाही देऊ शकत सुख म्हणून एखद्या मित्रासोबत तिनं भागवलीच स्वतची गरज तर ती वेश्याच…आणि बायकोच्या गरोदरपणातही धीर न धरवणारे नवरे गेले बाहेर तर ते नुसतेच रस्ता चुकलेले…

जिथे शहरातल्या मोकळ्या वातावरणात वाढलेल्या बायका-मुलींना असं काही लैंगीक स्वातंत्र्य वगैरे असतं याची जाणिव नाही…तिथे गावात राहणा-या बायकांची कथाच निराळी…दोन मुलं झाली की सेक्स वगैरे गुंडाळून माळ्यावर टाकण्याच्या गोष्टी ही त्यांची ठाम मतंयेत…जर कधी नव-याला हुक्की आलीच तर मात्र नाही म्हणता येत नाही…शेवटी नवरा आहे आणि आपण नाही म्हणटलं तर बाहेर जाणार…यानं बायका आणखी कोरड्या होत जातात…किरक-या होतात…रात्रभर वाजणा-या पलंगावरुन सकाळी उठल्यानंतर त्यांना आयुष्य सुंदर वगैरे बिल्कुल वाटत नाही..त्या आपलं लग्नानंतर भटजींनी सांगितल्याप्रमाणे कर्तव्यभावनेनं नव-याच्या हाताला हात लाऊन मम म्हणत असतात…सेक्स हा मुलं जन्माला घातली की संपतो ही त्यांची ठाम भावना असते…

अर्थात, बाई कुठलीही असो, कोणत्याही वयातली असो, नव-यानं गुपचुप येऊन मारलेली मिठी, माळलेला गजरा आणि सगळ्यांदेखत मिचकावलेले डोळे यासाठी ती बाई जीवाचं रान करेल…त्यावेळी कोणत्याही वयात असो ती नव्या फुलासारखी डवरुन येईल…पण, माणूस रसीक हवा ही तिची सुप्त इच्छा ब-याच नव-यांना लवकर ताडता येत नाही…आणि बायकांचा रोमान्स आणि सेक्स मधला रस संपत जातो…

नोकरी करणा-या, एकत्र कुटुंबात संसाराचा गाडा ओढणा-या, चाळीतल्या दोन खणी खोलीत राहणा-या बायकांची कथा आणखी केविलवाणी…नोकरी करुन, चार लोकल बदलून घरी येईपर्यंत बाईला तो तजेला कसा टिकवून ठेवायचा याचं गणित जुळत नाही…थकलेला नवरा थकवा घालवण्याचा उपाय म्हणून सेक्स कडे पाहतो हे कळल्यावर ती आणखीनच निरस होते…महानगरांतल्या पुढारलेल्या, हक्कांबाबत डोळस असणा-या बायकांचंही सेक्स लाईफ हे खरंच आनंदी असतं का या प्रश्नाचं खरं उत्तर कदाचित कधीच दिलं जाणार नाही…लग्नानंतर नुसतीच अंगापिंडानं भरलेली प्रत्येक बाई पलंगावरचं तिला हवं असलेलं नेमकं सुख उपभोगत असेलच असं नाही…कारण बाईला तिच्या पुढ्यात असणारं सुख उपभोगतांनाही लाज वाटत असते…स्त्रीसुलभ भावना या नावाखाली बांधल्या गेलेल्या लज्जेच्या आणि मर्यादांच्या भींती अश्या काही आडव्या येतात की देणारा आणि घेणारा कधीच पूर्ण शंभर टक्के सुख देऊ-घेऊ शकत नाही…

एकत्र कुटुंबात तर जोडप्याच्या पलंगाच्या आवाजावर कान ठेऊन ‘माळ्यावरचा पाळणा कधी काढायचा सुनबाई’असं विचारणारे महाभागही असतात…कित्येक ठिकाणी तर पद्धतच आहे घरी आलेल्या नव्या सुनेला तिच्या नणंदेनं गृहप्रवेशाच्या वेळीच दारात अडवून विचारण्याची. ‘मला तुझी मुलगी सुन म्हणून देशील तरच माप ओलांडू देईन’…इथे त्या नव्या सुनेला नव्यानं अंगावर येणा-या आपल्या नव्या सुनपणाचं टेन्शन, त्यात वाट पाहणारा पहिल्या रात्रीचा बेहद रोमांचकारी सामना…आणि नणंदेला पडलीय तिच्या होणा-या सुनेची…

यातून, बाईसाठी लग्न आणि सेक्स म्हणजे केवळ पोरे जन्माला घालण्याची व्यवस्था असा ठाम समज दृढ करुन ठेवला…येणा-या सुनेनं वंशावळीत भर घातलीच पाहिजे म्हणून नव-यालाही खूष ठेवलंच पाहिजे हा नियम…

अर्थात, शहरातल्या सुपरवुमनचे आणि खेड्यातल्या कष्टकरी बायकांच्या सेक्सलाईफचे वांदे तसे सेम आहेत…शहरातल्या बायकांना स्वातंत्र्य या शब्दाची किमान ओळख तरी झालीय…खेडोपाडीच्या कित्येक बायका आजही स्वत:ला स्वत:पासूनच दूर ठेऊन आहेत…एकत्र कुटुंबात सर्वांची उठबस करुन, शेतात काबाडकष्ट करुन रात्री अंगावर पडणारा नवरा त्या कश्या झेलत असतील याची कल्पनाही करवत नाही…अर्थात सगळ्याच ग्रामिण भागांतल्या बायकांकडे या एकाच चष्म्यातून पाहण्याची गरज नाही…कदाचित तिथे बायकोला पुरेसा वेळ देऊ शकणारा नवरा असतो, जो कधी घरी येतांना ऑफिसच्या कामाची कटकट, चिडचिड घेऊन येत नाही, शहरी नव-यांच्या तुलनेत तो ब-यापैकी रसीकही असतो… असा नवरा अगदी मोकळा-ढाकळा, समंजस असला तरी या समंजस नव-याला ‘आज रात्री माझा मुड आहे बरं का रेडी रहा’ म्हणणा-या बायका फारश्या नाहीत…

तसंही, पोरबाळं जन्माला घालुन फँमीली प्लानींगला फुलस्टॉप म्हणजे रात्रीच्या कसरतींनाही फुलस्टॉपच समजला जातो…बरेचदा नव-यासाठीच कसरतींवर लावलेला हा फुलस्टॉप पुसला जातो…त्यावर नव-याला गरज लागली तर तो जाईल कुठे??हा प्रश्न.. बाई चाळीशीची होऊन मोनोपॉजमध्ये असली तरी तिनं नव-याला सुख हे द्यायलाच हवं…पण, बाईनंच जर चाळीशीनंतरही बेडवर नव-याकडून पंचविशीतल्या अपेक्षा ठेवल्या तर मग झालंच…अनेक वर्ष पतिव्रता असणारी बाई अचानक चवचाल होऊन बसते…चाळीशीनंतर पुढाकार घेणारी बाई म्हणजे पाय घसरलेलीच…तेव्हा तिनं सेक्स तर सोडाच पण नव्या डिझाईनच्या मँचीग चड्डी, ब्रा खरेदी केल्या तरी ‘शोभतं का हे असलं या वयात’ च्या नजरा रोखलेल्या असतात… केस पांढरे  झालेले असतांना स्लिव्हलेस वनपिसवर गोव्याचा फोटो असलेली बाई ही कंपलसरी श्रीमंताचीच असली पाहिजे हा आपला आग्रह…एखाद्या पन्नाशीतल्या विमल, कमल सारख्या मध्यमवर्गीय बाईनं विनाकारण लिपस्टिक लावणंही गुन्हा…

बाई वयात येते तसं तिनं नेमकं फुलायचं केव्हा, लाजायचं केव्हा, नेमकं कधी हॉट, सेक्सी दिसायचं, कधी सोज्वळ प्राजक्ताचं फुल व्हायचं, कधी शयनेषु रंभा व्हायचं आणि कधी अनंत काळाची माता व्हायचं हे सगळं आपली वर्षानुवर्ष चालणारी सो कॉल्ड संस्कृती, परंपरा ठरवतायेत…याच संस्कृतीनं बाईच्या शरिराला पुजलं, देवी, माता वगैरे म्हणटलं.. पण, तिच्या शरिराच्या गरजा या सुद्धा गरजाच आहेत आणि त्यासुद्धा नैसर्गिकच आहेत हे कधीच मान्य केलं नाही…

युगानुयुगं शय्येवर असणा-या बाईचं वर्णन करतांना ती कशी लज्जेनं मान झुकवलेली, शरिराचा अणु-रेणु गोळा करुन स्वतभोवती स्वतालाच लपेटणारी आहे हे दाखवलं गेलं…दुधाचा ग्लास, आणि घुंघट उघडल्यानंतरचा प्रत्येक सीन हा एकतर अंधारात लुप्त झाला नाहीतर टेबलावरच्या फुलदाणीवर जाऊन थांबला…कंडोमच्या पाकिटावरच्या फोटोतली, सेंट, साबणांच्या जाहिरातीतली बाई दाखवतांनाही त्या बाईमुळे पुरुषाच्या आयुष्यात कसा आनंद पसरलाय हेच दाखवलं गेलं…एखाद्या बाईच्या अश्या आनंदासाठी मात्र पुरुषाला सेक्स मॉडेल म्हणून कधीच वापरलं गेलं नाही…

बायकोनं आव्हान दिलंय आणि नव-यानं ते खिलाडूपणे पेलंलय हे कधी दाखवलं किंवा सांगितलंही गेलं नाही…आणि जर आव्हान देणारी जर बाई कधी रंगवलीच असेल तर ती आव्हान देण्या-घेण्याच्याच कामाची बाई…ती आव्हान देणारी बाई ही कधीच कुणाची बायको असु शकत नाही, किंबहुना बायको असं आव्हान नव-याला देऊच शकत नाही हेच ठसवलं गेलं…यामुळे, बाईला स्वतच्या शरिराचा मुलभूत हक्क कळलाच नाही…तिनं कधी स्वतासाठी तो सुखसोहळा अनुभवलाच नाही…

‘बाईलाही सेक्सची गरज असते या ऐवजी सेक्ससाठी बाईची गरज असते’ हेच आजपर्यंत अधोरेखित होत आलंय…बाईच्या आयुष्यात जर सेक्स आलाच तर तो केवळ तिचं कौमार्यभंग करुन तिला माता बनवणारा असावा हेच सांगितलं गेलं…त्यामुळे ती स्वत कधीच शारिरीक सुख मिळवण्यासाठी आक्रमक झाली नाही, तिनं कधी कुणावर बळजबरी, बलात्कार केले नाहीत, तिची वासना कधीच कुणाच्या आयुष्याची माती करणारी ठरली नाही…याबदल्यात तिच्या शरिराची कायम विटंबना झाली, कोणत्याच रात्री तिची इच्छा काय हे कधीच विचारलं गेलं नाही…

पण, आता काळाची चक्र वेगानं फिरतायेत… तिला आत्मभान येतंय…तिच्या शरिराच्या निर्मीतीचं एकेक रहस्य तिला उलगडतंय…तिला तिच्या शरिराचा आणि स्वताचाही शोध लागतोय…पुढ्यात असणारं सुख ती दोन्ही हात पसरुन कवेत घेऊ पाहतेय…सुख उपभोगतांना समाधी फक्त पुरुषालाच लागावी असं नाही…त्या समाधीसाठी ती ही तितकीच आसुसलेली आहे…त्यामुळे, वर्षानुवर्ष फक्त नव-याला रिझवण्याचंच काम वाट्याला आलेली बाई आता बदलतेय… आता ती निमुट बेडवर बसून मित्रांच्या टोळक्यात उशीरापर्यंत गप्पा हाणून येणा-या नव-याची ती वाट बघत बसेलच असं नाही…जोडीदार निरस वाटत असेल तर ती त्याच्या रसिक होण्याची वाट बघेलच असं नाही…दोन पोरं झाल्यावरही तिच्यात जूना उत्साह पुन्हा उसळी घेईल..अगदी चाळीशीनंतरही ती पुन्हा पुन्हा नॉनव्हेज जोक वाचेल, खळखळून हसेल…अभी तो मै जवां हुँ म्हणत ती सजेल, नटेल… तिची वेल पुन्हा पुन्हा फुलेल, डवरेल…ती जिथे जाईल तिथे स्वतला उधळून देत स्वतच्या शरिराचा नवा सोहळा अनुभवेल…कारण, तिला ओरबाडणं ठाऊकच नाही तीला फक्त उधळणं ठाऊक आहे…आणि आता ती त्याच्यासोबतच स्वतच्या सुखासाठीही स्वताला उधळेल…

(लेखिका एबीपी माझा वृत्तवाहिनीत विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत)

[email protected]

#mediawatch #manshreepathak #mediawatchdiwaliank2018

Previous articleराजकारणापलीकडचे राजकारणी !
Next articleभारतामधलं ‘अॅंटि सोशल’ नेटवर्क
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.