सोनाली हा एका वट्ट कादंबरीचा विषय आहे, राव!

लेखिका सोनाली नवांगुळ यांनी अनुवादित केलेल्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरीला शनिवारी साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार जाहीर झाला. सन्मानचिन्ह, ५० हजार रुपये व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे . साहित्य क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटविलेल्या सोनालीचा काही दिवसांपूर्वीच वाढदिवस झाला . त्यावेळी संपादक राम जगताप यांनी रेखाटलेले तिचे हे व्यक्तीचित्र. नक्की वाचा .

……………………………………………..

– राम जगताप

मी तिच्यावर लिहितोय खरा, पण ती माझ्यापेक्षा माझ्या बायकोची, आणि तिच्यापेक्षाही आमच्या साडेचार वर्षांच्या मुलीची खरी मैत्रीण आहे. आमची मुलगी सोनाली मावशीशी व्हॉटसअॅप कॉलवर बोलताना जेवढी खूश असते, तेवढी ती इतर कुणाशीही बोलताना नसते. त्या दोघींच्या गप्पा हा विविध कलागुणदर्शनाचा बहुरंगी, बहुढंगी कार्यक्रमच असतो. त्यात नानाविध कलाविष्कार असतात. त्यांचा संवाद कधी कधी हिंदीमध्येही चालतो, तोही अर्धा अर्धा तास. शिवाय मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांसह हावभावाची, अनेक सांकेतिक आणि गूढ भाषांची नुसती रेलचेल असते! असो.

सोनाली ही एक अफलातून मुलगी आहे. एखाद्या परिकथेची किंवा सिनेमा वा कादंबरीची नायिका म्हणून ती शोभण्यासारखी आहे. तिचं व्यक्तिमत्त्व खळाळतं, रसरशीत आणि चैतन्यशील आहे. अगदी कॅलिडोस्कोपसारखं. प्रत्येक रूप विलोभनीय. विंदा करंदीकरांच्या ‘झपताल’ या कवितेतल्या शब्दांचा आधार घेत सांगायचं, तर ‘दिवसाच्या चोवीस मात्रा’ पाठीवर बांधून ती ‘वावरत\जगत’ असते. ती ‘सुहासिनी’, ‘यक्षिणी’, ‘पक्षिणी’, ‘संहिता’, ‘स्वप्नसती’ जशी आहे, तशीच संवादिनी, मधुरभाषिनी, सुगरण, गृहकृत्यदक्ष गृहिणीही. केवळ एवढंच नव्हे, तर चांगली लेखिका, कुशल अनुवादक, संपादक, स्तंभलेखक, शब्दांकनकार, सूत्रसंचालक, मुलाखतकारसुद्धा आहे. दर्दी रसिक, उत्कृष्ट श्रोता, साहित्यप्रेमी, सिनेमाची जाणकार आहे. कोल्हापुरातल्या अनेक संस्था, समित्या यांच्यासाठीही ती काम करते. आणि सर्वांत मुख्य म्हणजे – ती कधी सदगुरू वामन पै यांना भेटलेली नसली तरी ‘तीच तिच्या जीवनाचा शिल्पकार’ही आहे!

तिच्या नावावर सात पुस्तकं आहेत. ‘स्वच्छंद’ हे ललितलेखन, ‘जॉयस्टिक’ हा मुलांच्या गोष्टींचा संग्रह, ‘मेधा पाटकर’ हे मुलांसाठीचं माहितीपर पुस्तक आणि ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ (मूळ लेखिका – सलमा), ‘ड्रीमरनर’ (ऑस्कर पिस्टोरिअस), ‘वरदान रागाचे’ (मूळ लेखक – अरुण गांधी) आणि ‘वारसा प्रेमाचा’ (मूळ लेखक – अरुण गांधी) हे चार अनुवाद.

विकीपिडियावर तिच्या नावाचं पेज आहे. यु-ट्युबवर तिचे अनेक व्हिडिओ आहेत. ‘Breaking the barriers of mind’ हा तिचा २० मिनिटांच्या भाषणाचा व्हिडिओ ‘TEDx Talks’वर आहे. ‘वेलकम जिंदगी – एका आनंदी जगण्याची कहाणी’ या नावाने ‘Think Bank’वर ३८ मिनिटांची मुलाखत आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या एका कार्यक्रमातली मुलाखत आहे. याशिवाय तुम्ही गुगल सर्च दिलात तर तिचे वेगवेगळ्या प्रकाशनांत प्रकाशित झालेले अनेक लेख तुमच्यासमोर येतील.

‘व्हॅलेंटाईन’ नावाचा प्रेमिकांचा एक लाडका संत होऊन गेला. त्याच्या नावानं ‘१४ फेब्रुवारी’ हा दिवस साजरा केला जातो. तुमच्या-आमच्यापैकी कुणीच त्या व्हॅलेंटाईनला पाहिलेलं नाही. पण तो कसा असेल याचा अनुभव, पडताळा तुम्हाला घ्यायचा असेल, तर तुम्ही सोनाली नवांगूळ या मुलीला भेटा. ती महाराष्ट्रातली ‘लेडी व्हॅलेंटाईन’ आहे!

सोनाली हे तसं ‘बडा जबरा’ प्रकरण आहे. तिची आठवण आली की, मनाला आपोआप प्रसन्नता येते. तुम्ही तिच्याशी व्हॉटसअॅपच्या माध्यमातून सुरुवातीला संवाद करायला सुरुवात करा. ती तुम्हाला तिचं किडूकमिडूक लेखन पाठवणार नाही की, त्यावर तुमचा अभिप्राय मागणार नाही. किंवा जगाच्या कल्याणाची व्यर्थ चिंता वा खंत किंवा पश्चात्ताप वा तिरस्कार ऐकवून ऐकवून पकवणार नाही. तुम्ही प्रत्यक्ष प्रयोग करून पहा.

ती कायम संवादाला आसुसलेली असते. कारण तिला माणसांची गोडी आहे. तिच्याकडे आपला-परका, नात्याचा-गोत्याचा, ओळखीचा-अनोळखीचा, डावीकडचा-उजवीकडचा, बाया-बापे, लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा कुठलाही भेद नाही. तिला तो करताच येत नाही.

याचा अर्थ ती रिकामटेकडी आहे, असं मुळीच नाही. ती बरीच कामं करते. जगण्यासाठी आवश्यक तो पैसा मिळवण्यासाठी तिला काम करावंच लागतं. ‘स्पर्श-ज्ञान’ या ब्रेल-पाक्षिकाचं काम ती गेली दहा वर्षं करते आहे. दै. ‘तरुण भारत’, ‘सकाळ’, ‘लोकमत’ या वर्तमानपत्रांत, साप्ता. ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकात आणि ‘रिलायन्स दृष्टी’ या हिंदी ब्रेल पाक्षिकासाठीही तिनं सदरलेखन आणि नैमित्तिक लेखन केलेलं आहे. सध्या ती दै. ‘लोकमत’मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या मान्यवरांच्या मुलाखती घेते. ही तिची मुलाखतमालिकाही उत्तम चालली आहे.

पण तुमची तिच्याशी कितीही घनिष्ठ मैत्री झाली तरी ती तुम्हाला ‘माझी पुस्तकं वाचलीत का?’, ‘या पुस्तकाचा अनुवाद मी खूप कष्ट घेऊन केलाय रे, त्याच्यावर लिही ना तू कुठेतरी’, असं काहीही विचारून पिडत नाही.

याशिवाय ती रोज नवनवीन पदार्थ करून पाहते. अतिशय निगुतीनं, मन लावून पदार्थ करते. (त्याची छायाचित्रं पाठवून तुम्हाला जळवतेही!) तिला खायला आणि खिलवायलाही आवडतं. घर सजवायलाही आवडतं. वेगवेगळ्या रचना करून ती तिचं छोटंसं घर सजवत राहते.

इतरांचं लेखन वाचून त्याच्यावर आपली मतं कळवते. तुम्ही तिचे लेख वाचून तिला कळवलं नाही, तरी ती तुमचे लेख वाचून तुम्हाला तिचा अभिप्राय न चुकता कळवत राहते.

तिला सिनेमे पाहायलाही आवडतात. कुठले कुठले सुंदर सुंदर सिनेमे ती पाहत असते. त्यांच्याविषयी भरभरून बोलत राहते. तिला साज-शृंगार करायलाही आवडतो. लिपस्टिकपासून पावडरपर्यंत आणि दागिण्यांपासून कपड्यांपर्यंत सगळ्याची तिला आवड आहे.

ती कोल्हापुरात राहते. त्यामुळे रंकाळा हा तिचा पहिला प्रियकर आहे. पण हा एकच नाही, असे तिचे खूप प्रियकर आहेत. तिची ‘पॉवर चेअर’, काम करण्याची जागा, तिचा मोबाईल… त्यांची एक भलीमोठी यादीच आहे.

सोनालीची अजून एक खासीयत आहे. ती गॉसिप बहाद्दर नाही. कुटाळक्या, कुचाळक्या करायला तिला आवडत नाहीत. राजकारण, छक्के-पंजे, लाव्यालाव्या, लफडी-कुलंगडी यात तिला इंटरेस्ट नसतो. तिला तुमच्या जातीत, धर्मात, लिंगातही इंटरेस्ट नसतो. तिला थेट तुमच्यातच रस असतो. आणि तो ती रसरशीतपणे दाखवून देते.

‘फुलांचे बोल’ या नावाचं एक सुंदर पुस्तक आहे. त्यात २८ फुलांच्या जन्मकथा आहेत. ‘फेअरी टेल्स’ असं त्यांचं स्वरूप आहे. या पुस्तकातल्या जवळपास प्रत्येक फुलाच्या गंधकोषात एक गर्द निळी जांभळी वेदना दडलेली आहे. सोनालीतही ती आहेच.

तुम्ही कधी ‘गुरू’ हा हिंदी सिनेमा पाहिलाय? त्यातली विद्या बालन ही सोनाली नवांगूळचीच प्रतिकृती आहे. त्या विद्यासारखाच मृत्यु सोनालीच्याही दारावर यमदूतासारखा उभा आहे. पण त्याला तसाच तिष्ठत ठेवून ही आपली मजेत जगतेय. वयाच्या नवव्या वर्षी सोनाली बैलगाडीतून पडली आणि तिच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली. तेव्हापासून ती ‘व्हिलचेअरवर’च असते. कमरेखालच्या शरीरात ना संवेदना, ना नैसर्गिक विधींवर नियंत्रण! पूर्ण परावलंबी असा हा शरीराचा अर्धा भाग. सतत तिचं काहीतरी दुखत-खुपत असतं. याचा अर्थ सोनाली परावलंबी आहे असं नाही. गेल्या १३-१४ वर्षांपासून ती स्वावलंबी आयुष्य जगतेय. केवळ शारीरिक नाही, तर आर्थिकसुद्धा.

ऑस्कर पिस्टोरिअस हा दोन्ही पाय नसताना वेगवान धावू शकणारा द. आफ्रिकेचा धावपटू. त्याच्या ‘ड्रीमरनर’ या आत्मचरित्राचा सोनालीने अनुवाद केला आहे. हा ऑस्कर स्वत:च्या शारीरिक अक्षमतेला अंगावरच्या तिळाइतकी किंमत देतो. सोनालीचंही तसंच आहे. ऑस्करसारखीच तीही जिद्दी आहे. रडारड, मेलोड्रामा किंवा ‘विकलांग माणसांचा दीपस्तंभ’ असा ठेका स्वत:कडे घ्यायला तिलाही आवडत नाही.

सोनाली काही काळ कोल्हापूरच्या नसीमा हुरजूक यांच्या ‘हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड’ या संस्थेच्या ‘घरोंदा’ या वसतिगृहात राहिली. अनुभवांची एक शिदोरी पाठीशी मारली, पण वसतिगृहाच्या मर्यादांमुळे तिला साहित्य-सिनेमा-कला यांचा अनुभव घेता यायचा नाही. त्यामुळे तिची तगमग व्हायची. मग तिने त्या वसतिगृहातून बाहेर पडून स्वत:च्या घरात जाण्याचा निर्णय घेतला. पण वसतिगृह आणि संस्था सोडताना तिला बराच त्रासही झाला. धमक्याही दिल्या गेल्या. पण ही पठ्ठी डगमगली नाही. उलट ती कोल्हापुरातच पाय रोवून उभी राहिली. आता तिच्या घरालाच एका संस्थेचं रूप आलंय.

सोनाली तशी खंबीर, ‘तडाखे’बहाद्दर मुलगी आहे. अपंग म्हणून तिच्याबद्दल कणव, सहानुभूती दाखवणाऱ्यांना किंवा तिला सन्मानित करून शेखी मिरवू पाहणाऱ्यांना ती तिथल्या तिथं सरळ करते. २०१० साली तिला ‘राजर्षी शाहू युवा पुरस्कारा’नं सन्मानित करण्यात आलं. पण हा पुरस्कार ज्या सभागृहात होता, तिथं जाण्यासाठी तिला दोन-तीन जणांची मदत घेऊन जावं लागलं. मग पुरस्कार स्वीकारताना तीने आयोजकांच्या प्रेमाचा, अगत्याचा नम्रतेनं स्वीकार केला, पण पुरस्काराची २० हजार रुपयांची रक्कम तिथल्या तिथं त्या सभागृहात अपंगांसाठी सुधारणा करण्यासाठी देणगी म्हणून देऊन टाकली.

कोल्हापूर शहरात अपंग व्यक्तींसाठी काय काय सुधारणा करणं गरजेचं आहे, यासाठी तिनं तत्कालीन महापौरांचा पत्राद्वारे पाठपुरावा केला होता. प्रसिद्ध लेखक लक्ष्मीकांत देशमुख कोल्हापूरचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी तिच्या मागण्यांचा विचार करून ‘शाहू स्मारक मंदिरा’त अपंगांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या.

सर्वांत विशेष म्हणजे ती ज्या ‘आधार हॉस्पिटल’मध्ये उपचारासाठी जाते, ते बांधलं जात असताना प्रत्येक टप्प्यावर सोनालीचा सल्ला घेतला गेला आणि अपंगांना या हॉस्पिटलमध्ये येणं-जाणं, वावरणं, उपचार घेणं सोपं जावं, यासाठी तिने केलेल्या सर्व सूचनांचं पालन केलं गेलं. अशाच सोयी कोल्हापुरातल्या एका हॉटेलमालकानेही उपलब्ध करून दिल्या आहेत.

‘कोसला’ या कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकर अजिंठ्याची लेणी पाहताना त्याच्या मनात आलेल्या भावना शब्दबद्ध करताना लिहितो – “एकात बुद्धाची भलीमोठ्ठी उंच मूर्ती. मांडी घालून बसलेली. बुद्ध थेट लेण्याच्या दारातून बाहेर पाहतो आहे. काय पाहतो आहे? फार फार विकल झालेला आहे. त्याच्या पापण्या अर्ध्या मिटलेल्या वाटतात. त्या अर्ध्या उघड्या मंगोल पापण्यांकडे मी टक लावून पहातो. उजव्या हाताची पाची बोचं वर करून डाव्या हाताची बोटं तो मोजतो आहे. हाताची बोटं दहा. त्या बोटांवर ह्यानं सगळ्या उत्पत्तीचा आणि संहाराचा पसारा मोजला. मी पुन्हा वर पहातो. एवढी मोठ्ठी मूर्ती सगळी एका दृष्टीच्या कोनात पहाता येत नाही. वारंवार डोळे फिरवावे लागतात. दगडी तोंडावर संथपणे लहरणारे भाव. अतिशय विकल. विकलता मोठ्ठाल्या पंखांनी झेपावत येते. आणि मला उचलून वर घेऊन जाते. खूप वर. आणि मला सोडून देते. कुठे तरी आदळणार मी. पुढे ही मूर्ती. त्याच्या तोंडावरचं हे दु:ख मोजता येणार नाही. नाहीच मोजता येणार. हे स्थूल आणि सूक्ष्म दु:ख चिमटीत येत नाही. घिरट्या घालणारं दु:ख. दु:ख प्यायलाही दु:खाची ओंजळ लागते. माझ्या कवडीएवढ्या दु:खानं हे वाळवंटाएवढं दु:ख मोजवत नाही. माझी वर्तुळाकिंत दु:खं. त्या एवढ्या फटीतून ह्या चेहऱ्याकडे काय पहाता येणार? त्या दगडी चेहऱ्यावरच्या दु:खात मी कोसळतो. माझ्या दु:खाचा परीघ तोलता येत नाही. मी म्हणालो, माझ्यावर दया कर. अँड पिटी फ्रॉम यू मोअर डिअर दॅन दॅट फ्रॉम अनदर. पण हा बुद्ध आपली कीव करणार नाही. याची करुणा आपल्यासाठी नाही. हा अॅटमबॉम्बसारखा पोटात आग गोठवून बसला आहे.” (पान १२७)

सोनालीच्या गात्रांतही दु:खांचं हलाहल भरलेलं आहे, पण तिच्या माथ्यावर चंद्र आहे. त्याची शांत, शीतल आणि आल्हाददायक माया ती तिच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकावर शिंपत असते. तिच्यात काठोकाठ भरलेल्या हलाहलाचा तुम्हाला कणभरही उपसर्ग होऊ न देता.

पण मराठी साहित्यातल्या महानुभवांचं या मुलीकडे अजून पुरेसं लक्ष गेलेलं दिसत नाही. सोनाली हा एका वट्ट कादंबरीचा विषय आहे, राव!

(लेखक ‘अक्षरनामा’ या वेब पोर्टलचे संपादक आहेत)

[email protected]

TEDx Talksनक्की ऐकाBreaking the barriers of mind’

Previous articleअफगाणिस्तानातील सत्य आणि खोटेपणा
Next articleगेल ऑम्व्हेट…. माझी सखी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.