सोन्याची अंडी देणारा व्यवसाय

संतोष अरसोड

बुलडाणा येथील संदीप शेळके यांची साता समुद्रापार झेप

….. तुम्हाला जर काही करायचे असेल तर तुमच्या कडे काय आहे याचे भान असले पाहिजे. भान आले की मग माणूस बेभान होतो अन यातूनच मग वाळवंटातही नंदनवन फुलवता येतं. ग्रामीण भागात प्रचंड क्षमता असलेले तरुण आहेत मात्र ग्रामिण उद्योगाविषयी सरकारचे असलेले उदासीन धोरण आणि बँकांची नकारघंटा यामुळे ग्रामीण भाग पुरता कोलमडला आहे. शेती बेभरवशाची झाली आहे. शेती ला पूरक असे कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय ग्रामीण भागात उभा राहू शकतो.मात्र या संदर्भात पाहिजे तसा पुढाकार शासकीय व प्रशासकीय पातळीवरून घेतला जात नाही.
एकीकडे असे निराशाजनक चित्र असले तरी काही तरुण यावर मात करीत आपल्या क्षमतेच्या भांडवलावर नवनिर्माण करीत आहेत. ‘उद्योगाचे घरी। रिद्धी सिद्धी पाणि भरी।’ हा संत तुकोबारायांचा संदेश  काही तरुण आपल्या मेंदुवर कोरून घेतात अन त्यातूनच मग डोळे दिपवून टाकणारे काम उभे होते.  बुलडाणा येथील संदीप शेळके या तरुणाने केवळ आणी केवळ कल्पकता आणि आत्मविश्वास या भांडवलावर पोल्ट्री व्यवसायात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. केवळ स्वतःपुरता हा व्यवसाय सिमीत न ठेवता तो शेतकरी वर्गापर्यन्त पोहचवून त्यांना त्यांच्या पायावर कसे उभे करता येईल यासाठी त्याची धडपड सुरू आहे. दररोज 70 हजार अंडी उत्पादन करणारा त्यांचा पोल्ट्री व्यवसाय हा आता सोन्याची अंडी  देणारा व्यवसाय ठरत आहे. बुलडाणा ते बेहरीन हा संदीप शेळके यांचा प्रवास निराशेचे मळभ दूर करणारा आहे.

संदीप शेळके हा तरुण मुळातच कल्पक आणि जिद्दी आहे. जे स्वप्न पाहिलं ते प्रत्यक्षात कसे उतरवता येईल या साठी त्याची धडपड सुरू असते. काम हाच आपला गुरू आहे या भावनेतून तो दिवसरात्र मेहनत घेत असतो. शेती व्यवसाय कसा तोट्याचा आहे हे संदिप ला ठावुक होते आणि त्यामुळेच त्याने पोल्ट्री व्यवसाय उभारण्यात रस घेतला. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील पोखरी येथे 5 एकर शेतात पोल्ट्री चे लेअर युनिट उभारले. लेअर फार्म म्हणजे अंडी उत्पादन देणारा व्यवसाय. खरं तर हे फार मोठं धाडस होतं. मात्र आकाशाला गवसणी घालण्याची सवय असलेल्या संदीपने छातिला माती लावून या व्यवसायाची शेतात पायाभरणी केली.5 एकर शेतात भव्य असे 5 शेड उभारले. मागील 5 वर्षापूर्वी त्यानी हा व्यवसाय सुरू केला. आज हा व्यवसाय महाराष्ट्राला एक नवी आशा देतो आहे.

पाच एकर शेतात भव्य असे पाच शेड उभारले आहेत.39 बाय 400 फूट असा शेडचा आकार आहे. या शेडमध्ये दीड बाय दीड चा 1 पिंजरा असून त्या एका पिंजऱ्यात पाच पक्षी राहतात.हे पिंजरे एकामेकास कनेक्ट करण्यात आले आहेत. एका शेडमध्ये 20 हजार पक्षी ठेवण्यात आले आहेत. यांची निगा राखण्यासाठी एका डॉक्टरची नेमणूक करण्यात आली आहे. लसीकरण ते चोच खुडणी व इतर औषधोपचार न चुकता केले जातात.  एका शेडमध्ये 20 हजार याप्रमाणे 5 शेडमध्ये 1 लाख पक्षी ठेवू शकतात मात्र येथील 5 शेडमध्ये 80 हजार पक्षी ठेवण्यात आले आहे.त्यामुळे दररोज 70 हजार अंडी उत्पादन याठिकाणी घेतले जाते.
ब्रायलर फार्म वर गेले की तिथे मोठया प्रमाणात दुर्गंधीचा सामना करावा लागतो मात्र या ठिकाणी योग्य नियोजन केल्यामूळे दुर्गंधी मात्र दिसत नाही. अंडी देणाऱ्या कोंबड्याच्या विविध जाती आहेत. शेळके यांनी बोन्स नावाची जात अंडी उत्पादनासाठी निवडली आहे. 250 रु नग याप्रमाणे नाशिक वरून याची खरेदी केली जाते. 15 आठवडयाचा हा पक्षी 20 व्या आठवडयापासून अंडी दयायला सुरुवात करतो. जवळपास 86 आठवडे एक पक्षी अंडी देतो. त्यामुळे या फार्मवर वर्षभर अंडी उत्पादन घेतले जाते. रोजचे 70 हजार अंडी उत्पादन म्हणजे जवळपास 2 लाख 31 हजार रु ठोक भावात ही अंडी रोज विकली जातात.  बुलडाणा, मलकापूर, जळगाव, भुसावळ, औरंगाबाद येथी ठोक विक्रेते ही अंडी नेतात. असे असले तरी अंड्याची वाढती मागणी लक्षात घेता हे उत्पादन कमीच आहे. यावर उपाय म्हणून शेळके यांनी नाशिक येथे दुसरे युनिट सुरू केले असून त्या युनिट मध्ये दररोज 60 हजार अंडी उत्पादन घेतले जाते.

शेळके यांच्या पोखरी येथील युनिट मध्ये जवळपास 30 कर्मचारी काम करतात. शेडमध्ये सर्व व्यवस्था अत्याधुनिक आहे. फीड हे मशीनने पक्षापर्यन्त जाते. उन्हापासून रक्षण व्हावे म्हणून अत्याधुनिक फॉगर बसवले आहेत. विशेष म्हणजे इतर राज्यातुन येणारी अंडी बरेचदा जुनी असतात. संदीप शेळके यांनी त्यांच्या व्यवसायात अधिक विश्वासार्हता यावी म्हणून एक्सपायरी डेट टाकण्यात येणार असल्याचे सांगितले.

  मॉलमध्ये अंडी
संदीप शेळके यांनी अंडी विक्री व्यवसाय अधिक आकर्षक व्हावा म्हणून औरंगाबाद येथील एका मौलमध्ये अंडी ठेवली आहेत. Eggs4u| असे त्यांनी ब्रँडिंग केले असून ते अल्पावधीतच लोकप्रिय सुध्दा झाले. यासाठी लागणारे पॅकिंग युनिट ही त्यांनि उभारले आहे.हा यशाचा प्रवास इथेच थांबला नसून आता संदीप शेळके यांनी एक्स्पोर्ट चा परवाना काढला आहे. Green agro bazar exports pvt. Ltd  या नावाने बुलडाणा येथील ही अंडी आता विदेशी जाईल. बेहरीन येथे या वर्षी विक्री सुरू होईल असे शेळके सांगत होते. बुलडाणा ते बेहरीन हा प्रवास खरच प्रेरणादायी आहे.यापुढे  तुम्ही काय करणार असे विचारले असता संदीप यांनी त्यांच्या डोक्यातीळ कल्पना सांगितली. त्या दृष्टीने त्यांनी पावलं सुद्धा उचलली आहेत. शेतकऱ्याना या व्यवसायात शेळके यांना उभे करायचे आहे. जवळपास 500 शेतकऱ्याना त्यांच्या शेतात फार्म उभा करण्यास ते मदत करणार आहेत. शिरपूर व मोंडाळा येथे त्याची सुरुवात ही झाली आहे. इच्छुक शेतकरी त्याच्या शेतात 15 बाय 130 चे शेड उभारेल ज्यामध्ये 2 हजार पक्षी ठेवता येईल. एका युनिट ला जवळपास 11 लाख खर्च अपेक्षित आहे. शेड उभारणी, पक्षी यासह सर्व मदत शेळके करतील. तसेच नियमित डॉ मोफत देण्यात येईल. नाबार्ड कडून कर्ज उपलब्ध करून देणे व सबसिडी काढून देण्यात ही मदत करण्यात येणार आहे. शेतकरी वर्गास पोल्ट्री साठी चे खाद्य तर पुरवण्यात येईलच पण अंडी खरदी ची पूर्ण हमी घेण्यात आली आहे. यामुळे आता एक नवा आधार शेतकरी वर्गास देण्यात संदीप शेळके यांनी पुढाकार घेतला असुन त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.स्वतः साठी उभारलेला व्यवसाय लोकाभिमुख करून त्यांचे जीवन आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा विचार करणारा हा तरुण ग्रामीण उद्योगक्षेत्रात आपल्या कर्तृत्वतेजाने तळपत राहील यात काही शंका नाही. संदिपची समर्थ पावलं त्याच दिशेने आगेकूच करीत आहेत.

संदीप शेळके यांचा मोबाईल नंबर -96895 53333

(लेखक मीडिया वॉच नियतकालिक आणि वेब पोर्टलचे असोसिएट एडिटर आहेत )

9623191923

Previous articleजाणतो मराठी, मानतो मराठी
Next articleसुरमई
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.