सोप्पंय- सगळं खापर उदारमतवाद्यांवर

प्रताप भानू मेहता

अनुवाद – मुग्धा कर्णिक

काहीही वाईट झालं की खापर उदारमतवाद्यांवर फोडायचं हा आजचा युगधर्म झाला आहे. उदारमतवादी म्हणजे नेमकं कोण- हा काही सरळसोपा प्रश्न नाही असं तुम्हाला वाटत असेल- पण तसं आता नाही. अघदी सोपंय उत्तर. कुणालाही दोष द्यायचा असेल तर त्यांना उदारमतवादी ठरवून टाका.
अगदी खऱ्या अर्थाने उदारमतवादी म्हणता येतील असे लोक भारतात मूठभर असतील याची आम्हाला चिंताच वाटत असे. पण आता मात्र, ते सर्वत्र फैले हुए हैं असं वाटायला लागलंय- किरकोळ पातळीवर समतेचा विजय व्हावा म्हणून कारस्थाने करणारे, व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे, लादल्या गेलेल्या अस्मितांवरून हिंसक होणाऱ्यांना विरोध करणारे, वादविवादात तर्कबुद्धीचा वापर आवश्यक मानणारे, धर्माबाबत शंका उपस्थित करणारे, वैज्ञानिक मूल्यांचे रक्षण करू पाहाणारे, जगात वैविध्य रहावे म्हणून शर्थ करणारे, सत्तेच्या भयंकर केंद्रीकरणाविरुद्ध आवाज उठवणारे, पर्यावरणाचे रक्षण करू पाहाणारे, स्वत्व आणि समाज यांमधील अज्ञात दुव्यांचा अभ्यास व्हावा म्हणून मुक्त अवकाश जपणारे, इतिहासामधील अचपळ गुंतागुंतीचा शोध घेणारे, छळवादी हुकूमशाहीचा उदय होऊ नये म्हणून संस्थात्मक कार्य करणारे, -आणि खाण्यापिण्यात वाईन आणि चीज लोकप्रिय व्हावं म्हणून प्रयत्न करणारे- सारेच उदारमतवादी. हे उदारमतवादी इतके बलवान आहेत की या सर्व मूल्यांचा विजय झालेलाच आहे.

उदारमतवाद्यांचा उदय म्हणजे देश खड्ड्यातच चालला हो. हे उदारमतवादी जर नष्ट झाले तर भारताचा इतिहास जरा सुधरेल, सगळे आर्थिक प्रश्न सटतील, चीन थरथर कापेल, कायद्याचे राज्य येईल आणि देशात कोणतेही धार्मिक-जातीय भेदाभेद उद्भवणार नाहीत.

आम्हाला अर्थातच वाटतं की हे उदारमतवादी म्हणजे होमो सेपियन्स आहेत. त्यामुळे आफण उदारमतवादी आहोत असं म्हणणाऱ्या व्यक्तींमध्ये मानवी गुणावगुण असतीलच- जसं की स्वतःवर खूष असणं, ढोंगीपणा, नैतिकता आपल्यालाच कळते असं मानणं, दिखाऊपणा, स्वार्थ, आळस, फार जास्त इंग्रजीचा वापर, ऐकून घेण्याची क्षमता नसणे, कुणाच्या तरी हातातलं खेळणं बनणे, पेहराव-रहाणीतली वाईट निवड. आणि कधीकधी स्वतःची फसवणूकही. सगळ्या मानवजातीने करायला पाहिजे तसंच यांनीही जरा स्वतःचं परीक्षण करायला हवं. पण छे- एवढ्यावर फसू नका. उदारमतवाद्यांचे अवगुण हे जास्तच धोकादायक आहेत.
बाकीच्या विचारप्रणालींचे पाईकांत उदारमतवाद्यांसारखे समाज उद्ध्वस्त करू शकणारे अवगुण नसतात. राष्ट्रवादी लोक तर आरपार लगातार शुद्ध चांगुलपणाच. त्यांच्या मलमल के कुर्तेपर छींट लाललाल… संभवतच नाही. त्या बिचाऱ्यांना तर हिंसा या शब्दाचा अर्थही माहीत नसतो- तर ते हिंसा करणार कुठून… मार्क्सवाद्यांनी तर ऐतिहासिक आवश्यकता त्यांच्या बाजूने आहे हे सांगूनच टाकलेले असते, त्यामुळे ते कशाशी प्रतारणा करतात किंवा ढोंग करतात असं म्हणताच येत नाही. त्यांच्या लालेलाल प्रणालीला आणखी लाल होणे शक्यच नाही. अ-मार्क्सवादी डावे लोक गरीबांच्या वतीने टोकाचे दावे करतात. पण एकदा गरीब जनता हे तुमचं कारण आणि उद्दिष्ट ठरलं की मग तुमचे निर्णय चुकणं शक्य नसतं, भ्रष्टाचार शक्य नसतो आणि दुष्टत्व तर नाहीच.
सर्व रंगी मूलतत्ववादी- मग ते भगवे असोत वा हिरवे, सारे सगळे एका दिव्य उदात्त हेतूचे रक्षक- जिथे दुष्टत्व अस्तित्वातच येऊ शकत नाही. बाकीचे विविध पंथांचे विचारवंत- ज्यांचा एकमेव अजेंडा असतो तो सामूहिक ओळख जपण्याचा- मग तो धर्म असो, वा जात, वा प्रदेश… हे लोक तर चुका करूच शकत नाहीत. एकदा का तुम्ही आपलं व्यक्तित्व बृहत् समष्टीत एकजीव करून टाकलं की मग व्यक्तिगत दुष्टत्वाला स्थानच कुठे रहातं हो?
आंबेडकरवादी, ज्यांचे उद्दिष्ट केवळ न्यायाच्या शोधातच आहे, त्यांच्यात मात्र नक्की काही ना काही दुष्टत्व असते, पण आपण त्यांना इतके विकल करून टाकले आहे की त्यांची फार चिंता करण्याचं कारणच नाही. शिवाय, त्यांना एकदा पटवून दिलं की उदारमतवादी हे ब्राह्मणी असतात, की मग ते तर उदारमतवाद्यांचा निःपात करण्यासाठी आपले दोस्तच होऊ शकतात.
आणि मग शिवाय. भांडवलदार आहेत, ज्यांची प्रगतीची घोडदौड उदारमतवाद्यांनी सतत धारेवर धरली आहे. भांडवलाचे उत्तम प्रकारे वितरण या तत्वाच्या पायावर भांडवलदारांची व्याख्या होते. ते त्यात कसे बरं दुष्टत्व आणतील? आता कळलं का, की केवळ उदारमतवादी हेच धोकादायक आहेत. त्यांच्यात काही खोडी आहेत, दुष्टत्व आहे हा प्रश्नच नाही. त्यांची चूक ही त्याहून अधिक गंभीर आहे, दुष्टता ही केवळ त्यांना आणि त्यांनाच जमते असं स्पष्टच दिसतं.
त्यात भर म्हणजे सहिष्णुतेचा प्रश्न येतो तेव्हा हे उदारमतवादी काय करतात. त्यांचा विविधतेवर विश्वास आहे म्हणे. पण ते एक गोष्ट मात्र मान्य करत नाहीत, की दोन अधिक दोन म्हणजे सात होऊ शकते हे ज्ञान मार्गातील वैविध्यही मान्य करायलाच हवे- जितके आफण दोन अधिक दोन म्हणजे चार हे मान्य करतो. हे त्यांचे तर्कशास्त्र अजब आहे, ही असहिष्णुता आहे. त्यांना व्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षण हक्कांची पायमल्ली करणाऱ्या असहिष्णू लोकांपासून करायचे असते. पण ही देखील एक प्रकारची असहिष्णुताच आहे.
ते वाद घालतात, उरबडवी भाषणबाजी करतात आणि आपल्याला न पटणाऱ्या मुद्द्यांवर आघात करतात. पण लक्षात घ्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संक्षेप करण्यासाठी राज्यसत्तेचा, कायद्यांच्या वापर करण्याइतकंच हेही वाईटच आहे.
या उदारमतवाद्यांमुळे किती असुरक्षिततेची भावना निर्माण होते, प्रत्येकाला आपण कशाचेतरी बळी आहोत असं वाटू लागतं ते पहा… अगदी पंतप्रधानांपासून ते राष्ट्रपतींपर्यंत. हिंदूंच्या मनात बळी असल्याची भावना निर्माण करण्यास सर्वस्वी तेच जबाबदार आहेत… भारताच्या लोकसंख्येच्या ८० टक्के असलेल्या हिंदूंच्या मनात अशी भावना निर्माण करणे हे यांचेच काम, लक्षावधी सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या बिचाऱ्या राष्ट्रीय संवयंसेवक संघासारख्या अनेक संघटनांमध्येही त्यांनी ही बळी असल्याची भावना रुजवली, भारतातील बऱ्याच राज्यांत ज्यांची सत्ता आहे अशा भाजपामध्येही त्यांनी बळीची भावना रुजवली, अकबर आणि नेहरूंसारख्यांचे गुण एकत्रितपणे ज्याचे ठायी नांदतात अशा पंतप्रधानाच्या मनात त्यांनी ही भावना रुजवली. हे उदारमतवादी म्हणजे फार मोठी आपत्तीच. त्यांच्या टीकेच्या एखाद्या शब्दानेही सारी नागर संस्कृती गुडघे टेकते हो… उदारमतवाद म्हणजे एक कारखानाच आहे… मोठमोठे बाहूबली गटही स्वतःला परिस्थितीचे नि कशाकशाचे बळी समजू लागतात त्यांच्या वक्तव्यांमुळे.
हे उदारमतवादी चिडखोर असतात, खोडसाळ असतात आणि दादागिरी करणारेही. कुठल्याही प्रत्यक्ष हिंसाचारापेक्षा त्यांचे शब्द अधिक विनाशकारी असतात. त्यांचा निःपात कसा करायचा ते पाहून ठेवा- ते जर स्वतः नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ असल्याचं सांगू लागले तर त्यांना ढोंगी म्हणा, त्यांनी व्यक्तीस्वातंत्र्याच्या रक्षणाची भाषा केली तर त्यांना समूहाच्या स्वप्रेमाच्या तोंडी द्या, त्यांनी जरा बऱ्या कल्याणकारी व्यवस्थेची मागणी केली तर त्यांना कट्टरवादी म्हणा, त्यांनी स्वच्छ हवेची मागणी मांडली तर त्यांना विकास विरोधी म्हणा, गर्दीने केलेल्या हत्येचा त्यांनी निषेध आरंभला तर त्यांना फक्त असहिष्णू म्हणा, पुरतं, एखाद्या खुनाबद्दल बोलू लागले तर त्यांना पक्षपाती ठरवा, त्यांनी ज्ञानाची बाजू लावून धरली तर तुम्ही जोरात आरोळी ठोका प्राचीन संस्कृतीची… ते म्हणाले भारताची राज्यघटना- तर म्हणा भ्रष्टाचार भ्रष्टाचार… कुठल्याही संस्थेच्या बाजूने ते बोलू लागले तर एखादा नेता फेका त्यांच्या अंगावर, त्यांना समाजात सर्व प्रकारच्या धारणांना स्थान हवंय म्हणतात- निधर्मी, धार्मिक, अज्ञेयवादी, निरीश्वरवादी… जोरात ओरडा हिंदूद्वेषी हिंदूद्वेषी… हिंसा कमीत कमी असावी असं म्हणाले ते तर म्हणा तुम्ही नेभळट आहात.
उदारमतवाद्यांचं खच्चीकरण करणे, त्यांना ठेचणे यासाठी तुम्ही जे काही धोरण स्वीकाराल ते समर्थनीयच असेल. बाकी काही प्रभावी ठरत नसेल तर मग हिंसाही समर्थनीयच ठरेल. लक्षात ठेवा, त्यांच्याकडे बारीकसारीक अवगुण आहेत, आणि आपलं सर्वांचं ध्येय महान.
उदारमतवाद्यांना ठोकणे किती मजेदार असतं- तुम्ही एकाच वेळी त्यांना उदारमतवादी हे खरे उदारमतवादी नाहीत असंही म्हणू शकता आणि ते उदारमतवादी असल्याबद्दल त्यांना ठोकूही शकता. हे असं केलंत की काय होईल डावे नि उजवे दोघेही सोबत येतील आपल्या. अगदी काही उदारमतवादीही सामील होतील. तसं त्यांनी केलं नाही तर मग आफण म्हणू शकतो की उदारमतवादी हे कडवे असतात. आणि कुठल्याही उदारमतवाद्याला कडवेपणाचा शिक्का अजिबात सहन होत नाही. त्यामुळे ते आपलीच शेपूट पकडून गोलगोल घुमू लागतील. किती सोप्पंय पहा… उदारमतवाद्यांची प्रजाती अस्तंगत करू शकलो ना तर या जगातील सारी तिरस्काराची भावना, असुरक्षिततेची भावना पार नष्ट होऊ शकेल.

प्रताप भानू मेहता
अशोक विद्यापीठाचे कुलगुरू.

Previous articleअमृता, साहिर आणि इमरोज
Next articleहे वेताळाचे प्रश्न नाहीत
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.