सोशल मीडिया डिप्रेशनचे बळी

-मुक्ता चैतन्य 

युनिसेफ नुसार भारतातील १५ ते २४ वयोगटातील प्रत्येक ७ नागरिकांपैकी १ जण डिप्रेस आहे. सोशल मीडियाच्या ऍक्टिव्ह वापरकर्त्यांना नैराश्य येऊच शकतं पण पॅसिव्ह वापरकर्तेही (म्हणजे असे युजर्स जे सोशल मीडियावर एकही लाईक, लव्ह देत नाहीत, एकही कॉमेंट करत नाहीत, एकही पोस्ट करत नाहीत. त्यांचं फक्त अकाउंट असतं पण त्यावर काहीही हालचाल नसते, पण ते सतत सोशल मीडियावर असतात. कोण काय करतंय, कुणाचे काय सुरु आहे याकडे त्यांचे बारीक लक्ष असते आणि अनेकांच्या प्रोफाईल्सवर जाऊन ते पोस्ट वाचत असतात. मात्र त्यावर व्यक्त होत नाहीत. काहीवेळा ऍक्टिव्ह युजर्सपेक्षा पॅसिव्ह युजर्सच सोशल मीडियावर अधिक काळ असतात.) मोठ्या प्रमाणावर सोशल मीडिया डिप्रेशनचे बळी ठरत आहेत. सोशल मीडिया वापरणाऱ्या ५ पैकी चार जणांना कधी ना कधी नैराश्य आणि अस्वस्थतेला सामोरं जावं लागलेलं आहे. जर हे माध्यम माणसांना एकमेकांशी जोडून संवाद साधण्याचं, मनोरंजनाचं, मनातल्या गोष्टी व्यक्त करण्याचं आणि अभिव्यक्तीचं माध्यम आहे तर मग हा ताण आणि हे नैराश्य का आणि कुठून निर्माण होतोय हे समजून घेणं आवश्यक आहे. 

सोशल मीडिया डिप्रेशनमध्ये दोन महत्वाचे मुद्दे असतात. एक म्हणजे भावनिक गरजांच्या पूर्ततेसाठी सोशल मीडियाचा वापर आणि दुसरा त्यातून निर्माण होणारं अवलंबत्व. प्रत्येक माणसाची त्यांच्या वयानुसार काही ना काही भावनिक गरज असते. प्रत्यक्षात भावनिक गरजांची पूर्तता ही गुंतागुंतीची गोष्ट असू शकते कारण त्यात आपल्या जवळचे, लांबचे नातेवाईक-मैत्रपरिवार असतात. आणि त्या प्रत्येक नात्याला काही इतिहास असतो. पण सोशल मीडियावर तसं नसतं. “मला बरं वाटत नाहीये, ताप आला आहे किंवा आजचा दिवस फार छान गेला, मस्त वाटतंय किंवा अमुक तमुक ठिकाणी माझा अपमान झाला मग मीही अमुक तमुक ऐकवले” अशी कुठलीही गोष्ट शेअर केली की लगेच सपोर्टिव्ह कॉमेंट्स यायला लागतात. माणसांना भावनिक गरजांच्या पूर्तीसाठी अनेकदा खांद्यांची गरज असते, कुणाशीतरी बोलण्याची गरज असते. कुणीतरी आपलं ऐकून घेतंय हेही पुरेसं वाटतं. प्रत्यक्ष जगात जी भावनिक गरज भागवायची आहे, भागवली जात नाहीये ती पूर्ण करण्यासाठी एक सोपा पर्याय म्हणून अनेकदा सोशल मीडियाकडे बघितलं जातं. माणसं हे जाणूनबुजून करतील असं नाहीये, या गोष्टी नकळतही होऊ शकतात. पण होतात हे लक्षात घेणं आवश्यक आहे.

दुसरा मुद्दा आहे डिपेन्डन्सीचा. प्रत्येक वयोगटातील सोशल मीडिया गरज वेगळी आहे. किशोरवयीन मुलांसाठी त्यांचं वय हा आयडेंटिटी क्रायसिसचा काळ असतो. ते आपली ओळख, आवडीनिवडी, मित्र परिवार सगळंच शोधत असतात. त्यामुळे या वयोगटाला हे सगळं शोधण्याचा सोपा मार्ग सोशल मीडिया वाटतो. सतत लाईक्सचा मारा कितीही छान वाटला तरी तो एक पिंजरा आहे हे या वयात अनेकदा लक्षात येत नाही आणि त्या लाईक्स आणि लव्ह वरती आपण चांगले की वाईट हे मुलं ठरवायला लागतात. यावयात सोशल आयडेंटिटी हा या मुलांसाठी महत्वाचा मुद्दा असतो, पण व्हर्चुअल जगात अनेक प्रकारचे आभास निर्माण होतात. ते आभास आहेत हे लक्षात आलं नाही की गोंधळ होतो. अपेक्षाभंगाचं एक सत्र सुरु होण्याच्या शक्यता असते ज्यातून पुढे सोशल मीडिया अँझायटी आणि डिप्रेशन येताना दिसतं. त्यामुळे मुलांना स्वतःचे फोन देताना, त्यावर सोशल मीडिया अकाउंट्स उघडण्याची परवानगी देताना याविषयी बोलणं अत्यावश्यक आहे. अजून एक प्रकार किशोरवयीन मुलांच्या बाबत बघायला मिळतो तो म्हणजे आपण जे नाही ते दाखवण्याची धडपड. पिअर प्रेशर मधून मुलं असं वागत असतात. त्यामुळे त्यांच्यात एक अंतर्गत द्वंद सुरु होतं. सोशल मीडियावर जी आपण स्वतःची इमेज तयार केली आहे ते आपण आहोत की आपण खऱ्या आयुष्यात जसे आहोत ते आपण आहोत. हा गुंता वाढत गेला तर त्यातूनही अनेकदा नैराश्य येण्याची शक्यता असते.

मोठ्यांच्या बाबतीत वेगळे मुद्दे आहेत. एकटेपणा असतो, जॉब सॅटिसफॅक्शन नसतं, लैंगिक इच्छांची पूर्ती झालेली नसते, नात्यांमध्ये ताण असतो मग जे खऱ्या जगण्यात नाही ते व्हर्चुअल जगात शोधण्याकडे माणसं लागतात. इथेही आपण जे प्रत्यक्षात नाही ते आभासी जगात तयार करण्याकडे कल असतोच. आपण आपलाच एक मुखवटा तयार केलेला आहे हेही माहित असतं, त्याचाही ताण असतो. या सगळ्याचा मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतोच. पण अर्थात लगेच होत नाही. सुरवातीला सोशल मीडियावर वेळ चांगला जातो, आपलं कौतुक करणारे अनेक चेहरे दिसायला लागतात, ते कौतुक आवडायला लागतं आणि काही अंशी त्या कौतुकातून सोशल मीडियावर भावनिक पातळीवर अवलंबून राहायला सुरुवात होते. पण हळूहळू सोशल मीडियातूनही आपला एकटेपणा जात नाही, पॉर्न बघून प्रत्यक्षातल्या लैंगिक गरजा पूर्ण होत नाही, मित्र चिकार असले तरी मनातलं वाटून घेता येत नाही अशी विचित्र कोंडी अनेकदा माणसांची होते आणि नैराश्याला आमंत्रण मिळतं.

या सगळ्या गुंतागुंतीत आपला मेंदूही सक्रिय सहभागी असतो हे विसरता कामा नये. भावनिक पातळीवर जे काही सुरु असतं त्याला मेंदूतल्या न्यूरोट्रान्समीटर्सची सोबत मिळते. कुठलीही चांगली गोष्ट झाली की आपल्या मेंदूत डोपामाईन स्त्रवत. आणि आपल्याला सुखाची, आनंदाची जाणीव होते. मस्त वाटतं. ताण हलका होतो. एक लाईक मिळाला की छान वाटतं आणि मेंदूला रिवार्ड मिळतं. हे मेंदूला सवयीचं होतं. गरजेचं वाटायला लागतं. पण आधीसारखाच आनंद परत परत मिळवायचा असेल तर डोपामाईन अधिक स्रवावं लागतं. पूर्वीच्या डोपामाईन पातळीत पूर्वीचाच आनंद मिळत नाही. हळूहळू हे डोपामाईन स्रवण्याचं प्रमाण इतकं वाढतं की डोपामाईन रेसिस्टन्स तयार होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर खूप लाईक्स, लव्ह मिळूनही छान वाटत नाही, आनंद होत नाही आणि माणसं निराश वाहायला लागतात.

१६ ते २४ वयोगटाला तरुण-तरुणींमध्ये अति काळजी, लहानसहान प्रसंगात पॅनिक होण्याची सवय, जरासाही ताण सहन न होणं अशा अनेक गोष्टी होतात ज्यांना सोशल मीडिया खतपाणी घालतं. मानसशास्त्रीय भाषेत जनरलाईज्ड एन्झायटी डिसऑर्डर, पॅनिक डिसऑर्डर, सोशल एन्झायटी डिसऑर्डर आणि ओसीडी (ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर) यांचेही प्रमाण समाज माध्यमांचा सातत्याने वापर करणाऱ्यांमध्ये किंवा सोशल मीडियाच्या व्यसनाशी झुंजणाऱ्या व्यक्तीमध्ये बघायला मिळतंय. जे लोक दोन तासांपेक्षा जास्त काळ फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर असतात त्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात आहे असं अनेक सर्वेक्षणं आता सांगू लागली आहे.

अमेरिकेतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या वतीने पौगंडावस्थेतल्या मुलामुलींना घेऊन एक प्रचंड मोठं संशोधन २०१५ मध्ये सुरु झालं. या संशोधनात ९ ते १० वर्ष वयोगटातली ११,७५० मुलं मुली सहभागी झाली आहेत. ज्यात २१०० जुळे आणि तिळे सुद्धा आहेत. या मुलांच्या मेंदूच्या वाढीचा अभ्यास सलग १० वर्ष सुरु आहे. या संशोधनाचे नाव आहे ABCD म्हणजे ऍडोलसन्ट ब्रेन कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट स्टडी. यात त्या मुलांच्या  आजूबाजूचे वातावरण, त्यांच्या सवयी, झोपेचा पॅटर्न, ड्रग्स, आर्टपासून ते स्क्रीन टाईम पर्यंत विविध गोष्टींचा मुलांच्या मेंदूच्या आकलन विकासावर म्हणजे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट वर काय आणि कसा परिणाम होतो याचा अभ्यास सुरु आहे. त्यासाठी वर्षातून एकदा किंवा दोनदा या सगळ्या मुलांच्या ब्लड प्रेशरपासून एमआरआय पर्यंत अनेक चाचण्या, त्यांच्या मुलाखती, वर्तणुकीय निरीक्षणं अशा अनेक गोष्टी केल्या जातात.

या अभ्यासाची काही निरीक्षणे २०१९ मध्ये शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार ज्या मुलांचा स्क्रीन टाइम खूप जास्त आहे त्यांच्या मेंदूतल्या कॉर्टेक्सचा स्तर पातळ होतोय. कॉट्रेक्स हे मेंदूचं बाहेरचं आवरण असतं. ज्याचा संबंध थेट आपल्या आकलनाशी असतो. कॉग्निटिव्ह विकासाशी असतो. हे आवरण पातळ होत जाणं ही काही चांगली गोष्ट नाहीये. हा रिसर्च अजूनही सुरु आहे. त्यामुळे सततच्या स्क्रीन टाईममुळे हे होतंय की अजून कशामुळे यावर अधिक खोलात जाऊन संशोधन चालू आहे. पण पहिल्या निरीक्षणानुसार ज्या मुलांचा स्क्रीनटाईम दोन तासांपेक्षा जास्त आहे त्या मुलांना थिंकिंग अँड लँग्वेज टेस्ट म्हणजे विचार आणि भाषा यांच्याशी निगडित चाचण्यांमध्ये अतिशय कमी मार्क मिळाले.

अति स्क्रीन टाईमचे मनोसामाजिक परिणाम तर आता आजूबाजूला दिसायला लागलेच आहेत पण स्क्रीन टाईमचा थेट परिणाम माणसांच्या मेंदूच्या रचनेवर होतोय का, हे या अभ्यासातून येत्या काही वर्षातच पुढे येईल. नेमका किती स्क्रीन टाईम योग्य? स्क्रीनचं व्यसन लागू शकतं का? त्यामुळे आपल्या एकूण आकलनावर काय परिणाम होऊ शकतो याची सायंटिफिक उत्तरं पुराव्यासहित येत्या काही वर्षात आपल्याला बहुदा या संशोधनातून मिळतील.

सोशल मीडिया डिप्रेशनमध्ये मनात सतत स्पर्धा आणि तुलनाही चालू असते. कोण कुठे काय करतंय, कसले फोटो टाकतंय, कुठे फिरायला गेलंय, आनंदी आहे की दु:खी यावरून आपण स्वतः आनंदी आहोत की नाही, हे अनेक लोक त्यांच्याही नकळत ठरवत असतात. आणि मग सतत इतरांशी स्पर्धा आणि तुलना केल्याने विचित्र ताण मनावर साठायला सुरुवात होते. आपण काहीच मज्जा करत नाही, किंवा माझ्या आयुष्यात त्यांच्यापेक्षा कमी आनंद आहे इथपासून मिळणाऱ्या लाईकपर्यंत प्रत्येक गोष्ट इतरांवर अवलंबून ठेवण्याची सुरुवात होते. आनंद ही अंतर्गत गोष्ट न राहता बाह्य गोष्टींवर अवलंबून असलेली भावना बनते. खरंतर स्पर्धा आणि तुलना हा माणसाचा मूलभूत स्वभाव आहे, ‘उसकी साडी मेरी साडीसे सफेद कैसे?’ इथंपासून अनेक गोष्टींच्या बाबत माणसं त्यांच्याही नकळत स्पर्धा आणि तुलना करत असतात पण सोशल मीडियाचा वेग, इतरांच्या आयुष्यात काय चालू आहे याच्या सतत मिळणाऱ्या नोंदी या सगळ्यामुळे हा ताण झपाट्याने वाढत जातो. तुलना करण्याची सवयही तीव्र होत जाते. आणि माणसं नैराश्याकडे वळतात.

माणसं सोशल होता होता, एकमेकांशी कनेक्ट होण्यासाठी धडपडताना, मन प्रसन्न राहण्यासाठी जे जे म्हणून करायला हवं, तेच करायचं माणसं विसरून जातायेत. मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकून पडल्याने आईबाबा काहीतरी सांगत असले तरी ते मेंदूपर्यंत पोचत नाही. मुलांचे प्रश्न ऐकू येतात पण समजत नाहीत. त्यांना उत्तर द्यायला स्क्रीनमधून फुरसत मिळत नाही. इतरांचे प्रणय ऑनलाईन जगतात बघता बघता स्वतःच्या आयुष्यातली प्रणयाची उब माणसं विसरून जातात. त्यांचं एकमेकांवर प्रेम नसतं असं नाहीये पण स्पर्शाची गंमत विरत जाते. माणसं एकटी होतात आणि काहीशी एकाकीही! मग तो एकटेपणा घालवण्यासाठी पुन्हा सोशल मीडियाकडे वळतात. एक विचित्र कोंडी या सगळ्यामुळे तयार होते. जी अनेकदा लक्षातही येत नाही. माणसं निराशेने ग्रासली जातात. ही निराशा घालवायला मग पुन्हा सोशल मीडियाच्याच छायेत जातात. जात राहतात. आनंद मिळत नाही. नैराश्याचे फास मात्र आवळले जातात.

सोशल मीडिया हे मुळात आपल्या भावनांच्या पूर्ततेची जागा नाही हे समजून घेणं आवश्यक आहे. मला एकटं वाटतंय, तर सोशल मीडियावर जाऊन तो एकटेपणा जाणार नाहीये, तो गेला असा फक्त आभास निर्माण होणार आहे. किंवा मला खऱ्या आयुष्यात  छान वाटत नाहीये म्हणून ऑनलाईन जगात जाऊन डिपी बदलला तर भरपूर लाईक्स मिळतात, पण त्याने खऱ्या आयुष्यात दीर्घकाळासाठी छान वाटेलच असं नाही. आपल्या भावनांचा निचरा करण्याची जागा म्हणजे सोशल मीडिया नाही. सोशल मीडिया आणि डिजिटल जगाचा अभ्यास करताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे ती म्हणजे आपण सोशल मीडिया, मोबाईल आणि इंटरनेटच्या निमित्ताने जे अनुभवतो आहोत, ते अनुभवणारा मानवी इतिहासातला हा पहिलाच काळ आहे. त्यामुळे या सगळ्या बदलांना, आपल्या मनात, मेंदूत, शरीरात, भावनांमध्ये नेमके काय बदल होतात हे समजून घेणं आपल्यासाठी नवीन आहे. यासाठी कुठलाही मागच्या पिढयांच्या अनुभवातून तयार झालेला सिलॅबस आपल्याकडे नाही. आपणच सिलॅबस तयार करतो आहोत. त्यामुळे आपण एक विलक्षण काळातून जातो आहोत, हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच या सगळ्या बदलांविषयी, आपल्या बदलणाऱ्या जाणिवांविषयी जागरूक होणं, सजग होणं, शिक्षित होणं अत्यावश्यक आहे.

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२३

(लेखिका सोशल मीडियाच्या अभ्यासक व ‘सायबर मैत्र‘ च्या संस्थापक आहेत.)
९३०७४७४९६०

[email protected]

Previous articleदंतकथा बननेल्या आमदारांची कुळकथा
Next articleआधी काँग्रेसची ढासळणारी तटबंदी सांभाळा !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.