दंतकथा बननेल्या आमदारांची कुळकथा

डावीकडून पाचव्या क्रमांकावर काळी टोपी घातलेले शंकरराव थोरात. त्यांच्या बाजूला यशवंतराव मोहिते, त्यांच्या बाजूला काळ्या पॅन्टमध्ये डीआयजी दिनकरराव थोरात .अगदी शेवटचे माजी आमदार रंगराव पाटील थोरात . वडगाव येथील त्यांच्या जुन्या वाड्यासमोर घेतलेले हे छायाचित्र.

-संपत मोरे 

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी मतदारसंघाचे आमदार रंगराव नामदेव पाटील हे आमदारकीच्या काळात तालुक्याचा बैलगाडीतून दौरा करीत. दौर्‍यादरम्यान ते आपल्यासोबत तांदूळ आणि स्वयंपाकाच्या वस्तू जवळ ठेवत. ज्या गावात ते जात त्या गावातील चावडी अथवा धर्मशाळेत राहत. तिथे जेवण बनवत आणि गावकर्‍यांना सोबत घेऊन जेवण करत गावातील लोकांशी संवाद करीत. गावातील लोकांना आपल्या खाण्याजेवण्याची झळ लागू नये, त्यांना आपला त्रास होऊ नये, ही भूमिका त्यांची असायची.

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी हा आडवळणी मतदारसंघ. या मतदारसंघात १९५२  साली वडगाव या गावचे रंगराव पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारी केली. त्यात त्यांचा विजय झाला. आमदार असताना त्यांनी जो साधेपणा दाखवला. त्यावेळी असलेल्या प्राप्त आणि प्रतिकूल परिस्थितीत तालुक्यातील जनतेची जी सेवा केली, त्याची आठवण तालुक्यातील तिसर्‍या चौथ्या पिढीचे लोक काढतात. माजी आमदार पाटील यांच्याबाबत लिखित स्वरूपात काहीही साहित्य आढळत नाही; मात्र मौखिक माध्यमातून हा माणूस, त्यांचे कार्य, त्यांच्या कामाचे वेगळेपण लोकांनी जपले आहे. हा माणूस आता लोकांच्या स्मरणनोंदीत जिवंत आहे. जुन्या लोकांनी त्यांच्याबाबत जे सांगितले आहे, तेच नवी पिढी सांगते.

शाहूवाडी हा तालुका सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या शेजारील तालुका. आम्ही आज याच शाहूवाडीला निघालो होतो. आमच्या वाटेला अनेक गावं आली. या गावांची वैशिष्ट्य सुद्धा वेगवेगळी. प्रत्येक गावाने आपली नवी ओळख जपलेली. त्या त्या गावातून जाताना या गोष्टी आठवत होत्या. देशात ब्रिटिशांची सत्ता असताना ही सत्ता उथलवून लावण्यासाठी ज्या गावांनी पुढाकार घेतला, सातारा जिल्ह्यात स्थापन झालेल्या पत्रीसरकार चळवळीला बळ दिलं तो हा परिसर. कुंडल आणि वाळव्याचा हा परिसर. या दोन गावात तसं अंतर, पण हे अंतर पार झालं राष्ट्रीय विचारांनी. इंग्रजी सत्ता घालवून इथं स्वराज्य आणायचं, हा विचार गावागावात गेला. गावच्या गाव पेटून उठली. गावगाडा लढण्याच्या तयारीत असायचा. त्यावेळच्या दिवसाचं वर्णन या लढ्यातल्या शूरवीरांनी आपापल्या परीने केले आहे. काहींनी लिहिलं आहे, तर काहींच्या सोबत मीही संवाद केला आहे. त्यातील अनेक क्रांतिकारक आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. आज त्यांच्या मुलुखात असल्यावर त्यांची आठवण होणार नाही, असं थोडंच आहे? त्यांच्या आठवणी आणि ब्रिटिश सत्तेसोबतच्या त्यांच्याकडून ऐकलेल्या लढती मला आठवत होत्या. आज माझ्यासोबत जो सहकारी आहे, त्याचं नाव चंद्रकांत यादव. अठरा वर्षाचा तरुण. आयटीआय शिकणारा. माझा मामेभाऊ. त्याला मी हा सगळा परिसर सांगतोय. मला जेवढा समजला, तेवढा इतिहास त्याला ऐकवतोय. त्यालाही ते ऐकण्याची गोडी लागली आहे. यातील बरंच त्यानं ऐकले आहे; याला कारण म्हणजे या भागातील लोकांच्यात असलेलं इतिहासाचं वेड. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्रीसरकारच्या लढाईत ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांच्यावर या परिसरातल्या लोकांनी अफाट प्रेम केलं. त्यांच्या आठवणी सतत जागत्या ठेवल्या. या तरुण मुलाच्या कानावरून यापैकी इतिहासाची काही पान गेलेली. आजही तो एकाग्रतेने ऐकत होता.

रंगराव पाटील थोरात

आम्ही रंगराव पाटील या एका आगळ्यावेगळ्या आमदाराचा इतिहास शोधायला निघालोय. वाटेत इस्लामपूर. या मतदारसंघाने महाराष्ट्राला राजारामबापू पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, डॉ.एन. डी. पाटील यांच्यासारखे नेते दिले. लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांनीही काही काळ या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. वाळवा तालुका राजकीयदृष्ट्या आजही चर्चेत राहिला आहे. अनेकवेळा मंत्रिपद भूषविलेले जयंत पाटील, विधानपरिषदेत १८ वर्षे सदस्य म्हणून काम केलेले आणि माजी मंत्री असलेले अण्णासाहेब डांगे, शेतकरी चळवळीत मोलाचे योगदान देणारे रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत हे राज्यस्तरावरचे नेते याच तालुक्यातील. साहित्य, कलाक्षेत्रात अनेक लोक या भागातील. सिनेअभिनेते विलास रकटे, आचार्य जावडेकर, महाराष्ट्र केसरी पैलवान भगवानराव मोरे, आप्पासाहेब कदम, डबल महाराष्ट्र केसरी गणपत खेडकर हे तीन महाराष्ट्र केसरी वाळवा तालुक्याने कुस्ती क्षेत्राला दिले. दक्षिण महाराष्ट्रातील प्रगतिशील तालुका. पुरोगामी विचारांचा तालुका म्हणून ओळख.

शिराळा, सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागातील डोंगरी तालुका. या तालुक्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपली ओळख निर्माण केली आहे. शिवाजीराव देशमुख यांना अनेकदा राज्याचे काँग्रेसचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांची ओळख. शिवाजीराव नाईक. शिराळा तालुक्यातील या दोन शिवाजींनी काही वर्षांपूर्वी राजकारणात दबदबा निर्माण केला होता. त्यांच्या राजकीय वाटचालीचे साक्षीदार-कार्यकर्ते आजही तालुक्यात आहेत. देशमुख काळाच्या पडद्याआड गेले आहेत. शिवाजीराव नाईक यांनी विधानसभेच्या पराभवानंतर पुनश्च आपली कारकीर्द सुरू केली आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्यात हा प्रदेश आणला. पुणे-बंगळूर हायवेच्या पश्चिमेला वाटेगाव हे त्यांचं गाव. आपण वारणा नदीच्या परिसरात आल्यावर अण्णाभाऊंच्या वारणेच्या वाघाची आठवण येते. हा सगळा डोंगरी मुलूख. या मुलखात आयुष्यातल्या आडवाटा तुडवत चालणारी या मुलखातली माणसं त्यांनी मराठी साहित्यात आणली. त्यांचा अनेक पातळीवरचा संघर्ष पुस्तकात, कथाकादंबरी बनून आला. इथल्या माणसाचेच नाहीत, तर शिवारांचे प्रश्न त्यांनी साहित्यात मांडले. त्याला वाचा फोडली. या परिसरातील माणसं मराठी साहित्यात अमर केली. मला वाचलेली पुस्तक आणि माणसं आठवत होती. वारणाकाठी होतो आम्ही..

शाहूवाडी

‘पाव्हणं, गाव कोणतं?’ असा प्रश्न सागाव आणि सरूड या दोन गावातील लोकांना जगाच्या पाठीवर कुठेही विचारला तर ती सांगतात. ‘आम्ही सरूड सागावचं.’

सरूड कोल्हापूर जिल्ह्यात, तर सागाव सांगली जिल्ह्यात. मध्ये वारणा नदी. अलीकडे सागाव पलीकडे सरूड. दोन्ही गाव भावंडांसारखी एकमेकांना जोडलेली. तालुके आणि जिल्हे वेगवेगळे असले, तरी नाव एकमेकांना जोडून. गावातील ऋणानुबंध तसेच. मैत्री, नातेसंबंध, आर्थिक देणंघेणं या माध्यमातून गावात जिव्हाळा आहे. दोन्ही गावाच्या मध्ये वारणा नदी. या नदीवर पूर्वी पूल नव्हता, तेव्हा दोन्ही गावांच्या दरम्यान नाव (होडी) असे. सरूडच्या लोकांना सांगलीला जायचं असेल, तर नावेतून बसून अलीकडच्या सागावामध्ये यावं लागे. तिथून एसटीने पुढं प्रवास सुरू होई. सागाव येथील लोकांना कोल्हापूरला जायचे असेल, तर सरूडला नावेने यावे लागे. माजी आमदार रंगराव पाटील हे अनेकदा यांनी अनेकदा नावेने प्रवास केल्याचे लोक सांगतात. शिराळा-वाळवा मतदारसंघाचे आमदार यशवंतराव चंद्रोजी पाटील (वाय.सी.पाटील) व त्यांच्या पत्नी अनेकदा कोल्हापूरला जाताना नावेतून सरूडला यायच्या, अशी आठवण भारत पाटील सांगतात. शिराळा तालुक्यातील कनदूर हे त्यांचे गाव. या गावाच्या बरोबर पलीकडे रंगराव पाटील यांचे वडगाव आहे. उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यावर हे दोन आमदार नदीतून चालत एकमेकांना भेटायला येत असत, असेही इथले लोक सांगतात. आजच्या काळात राजकारणी लोकांच्यात झालेला बदल बघता, या गोष्टी नक्कीच लक्ष वेधून घेणार्‍या आहेत.

सरूड हे शाहूवाडी तालुक्यातील महत्त्वाचे गाव. शाहूवाडी तालुक्याचे माजी आमदार बाबासाहेब पाटील सरूडकर या गावचे. या गावापासून अवघ्या दोन किलोमीटरवर रंगराव पाटील यांचे वडगाव. या वडगावची कथा सांगताना लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात यांनी लिहून ठेवले आहे, ‘सातारचे छत्रपती शाहू आणि कोल्हापूरच्या छत्रपती ताराराणी यांच्या संघर्षात थोरात यांनी ताराराणी यांच्यासोबत राहून त्यांना मदत केली. शाहू आणि ताराराणी यांच्यात खेडचा तह झाला. त्या तहाच्या अगोदर २५  वर्षे त्यांच्यात संघर्ष होता. यावेळी थोरात यांनी ताराराणी यांना मदत केली,’ असे त्यांनी म्हटले आहे.

सरूड आणि कापशी या गावाच्या दरम्यान गवळटेक म्हणून ओळखला जाणार्‍या भागात साधारण तीनशे वर्षांपूर्वी या गावात कुंडल, वाळवा, कोर्टी या गावातून थोरात आडनावाचे लोक आल्याच्या नोंदी सापडतात. याच गावात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृषितज्ज्ञ पी.सी.थोरात, लेफ्टनंट जनरल शंकरराव थोरात, माजी आमदार रंगराव पाटील असे कर्तबगार लोक घडले.

1952 ची विधानसभा निवडणूक. या निवडणुकीत वडगावसारख्या छोट्या गावातील रंगराव पाटील शेतकरी कामगार पक्षाकडून उभे राहिले. त्यांच्याविरोधात होते काँग्रेसचे उदयसिंहराव गायकवाड. या निवडणुकीत पाटील विजयी झाले. तालुक्याचे पहिले आमदार ठरले. आमदार होण्याच्या अगोदर ते भाई माधवराव बागल यांनी स्थापन केलेल्या प्रजा परिषदेचे तालुकाध्यक्ष होते. क्रांतिसिंह नाना पाटील जेव्हा ब्रिटिश सत्तेच्या विरोधात लढत होते, त्यावेळी विद्यार्थी असलेल्या रंगराव पाटील यांनी शाहूवाडी तालुक्यात एक विद्यार्थी परिषद घेऊन त्यांना पाठिंबा दिला होता. शाहूवाडी हा डोंगराळ परिसर. या तालुक्यात अनेक भूमिगत क्रांतिकारकांना त्यांनी आश्रय दिला होता. त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवून, त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांनी केली होती. विद्यार्थी असल्यापासून ते चळवळे होते. त्यांचा कल सामाजिक आणि राजकीय कामाकडे होता. त्याकाळी मॅट्रिक शिक्षण होऊनही त्यांनी नोकरी व्यवसायात न पडता पूर्णवेळ स्वतःला शेतकरी कामगार पक्षाच्या कामाकडे वाहून घेतले. तेव्हा त्यांना काँग्रेसकडून अनेक ऑफर आल्या, त्यांचे अनेक जवळचे मित्र काँग्रेसचे मोठे नेते होते, मात्र त्यांनी शेतकरी कामगार पक्ष सोडला नाही. १९५२  च्या एका विजयानंतर त्यांना 1957 साली निवडणुकीत अपयश आले, त्यांचे भाऊ शंकरराव पाटील १९६२ साली पराभूत झाले, पण पराभव होऊनही त्यांनी प्रस्थापित वाट पकडली नाही. अगदी मरेपर्यंत ते शेकापमध्ये राहिले.

मुक्काम वडगाव

आम्ही रंगराव पाटील यांच्या घरी गेलो. त्यांचे सुपुत्र भारत पाटील भेटले. तेही शेतकरी कामगार पक्षात आहेत. तेही सत्तर वर्षाच्या जवळपास आहेत, त्यांनीही वडिलांचा लालबावटा आजवर सोबत घेतला आहे. तालुक्यातील राजकीय परिस्थिती बदलत गेली, तरी ते त्याच पक्षात आहेत. बदलत्या राजकीय परिस्थितीत शेतकरी कामगार पक्षाची पडझड झाली, मात्र ते त्या पक्षासोबत आहेत. तीन वेळा त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आहे.

‘माझ्या वडिलांचा तसा मला फार सहवास लाभला नाही. मी आठवीत असताना ते गेले. त्यांची राजकीय कारकीर्द मला बघता आली नाही. मात्र, जेव्हा जेव्हा मी महाराष्ट्रात फिरायचो, तेव्हा मात्र मला लोक त्यांच्याबद्दल सांगायचे. तालुक्यात फिरताना जुनी लोक आजही त्यांची आठवण काढून गहिवरून जातात. म्हातारी लोक मला त्यांचा मुलगा म्हणून खूप मान देतात,’ असे ते सांगू लागले.

आमचा तालुका हा असा. निसर्गाच्या अडचणी. वाटेत नद्या, ओढे, कुठे डोंगर असा हा तालुका. आजही दौरा करताना अडचणी येतात. मग त्यावेळी कसे वातावरण असेल? नुकतेच देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. अजून विकासयोजना गावोगावी यायच्या होत्या. तेव्हा दीडशे गावांना भेटी देणे, त्यांचे प्रश्न समजून घेण, त्यांच्या सुखदुःखप्रसंगी जाणे या गोष्टी अवघड होत्या. पण, वडील घरी फार कमी काळ असत. ते सतत तालुक्यात असत. सतत लोकांच्यात असत. गावोगावी जाऊन मुक्काम करीत. सकाळी उठून दुसर्‍या गावाला जात. दिवसात शक्य तितक्या गावांना भेट देत. जिथं रात्र होईल तिथं देवळं, धर्मशाळेत थांबत. घरातून जाताना तांदूळ, मीठमिरची, स्वयंपाकाला लागणारी भांडी सोबत असत. विद्यार्थी असल्यापासून त्यांना स्वतः स्वयंपाक बनवून जेवण्याची सवय होती. आपल्या मतदारसंघातले लोक गरीब आहेत, आपण त्यांच्याकडे गेल्यावर त्यांची अडचण होऊ नये, म्हणून त्यांनी स्वतः जेवण बनवणे आणि लोकांना सोबत घेऊन जेवण करणे, हा पायंडा पाडला होता.

तालुक्यात निसर्गाने अडचणी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे प्रगती होत नाही. पण, शिक्षणाचा अभावही यासाठी कारणीभूत आहे, हे आमदार पाटील यांनी ओळखले. तालुक्यात शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी त्यांनी खूप प्रबोधन केले.

भेटल्यावर ‘मुलं शाळेत जातात का?’ हा त्यांचा पहिला प्रश्न असायचा. त्यांनी अनेक पालकांना मुलांना शाळेत घालण्यासाठी प्रवृत्त केले. आजही जेव्हा भारत पाटील यांना सरकारी सेवेतून निवृत्त झालेली लोक भेटतात, तेव्हा तुमच्या वडिलांनी आमच्या वडिलांना मला शाळेत घालायला लावले, असं सांगतात.

आमच्या तालुक्यात प्राथमिक शाळा व्हाव्यात म्हणून दादांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्यावर शाहू महाराजांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. ते ज्ञानलालसी होते. तालुक्यातील त्यावेळी असलेल्या शाळांना ते भेटी देत. शिक्षणखात्यातील अधिकार्‍यांनी जे काम करायचं ते काम करत. अगदी अलीकडच्या काळात मला काही ठिकाणी त्यांनी शाळेला भेट देऊन तिथल्या अभ्यागत पुस्तकात केलेल्या नोंदी मिळाल्या होत्या. त्यात त्यांनी शिक्षक व हुशार विद्यार्थ्यांची प्रशंसा केली होती. शाळा सक्षम झाल्या, तर आपला मतदारसंघ सक्षम होईल, अशी त्यांची भूमिका होती, भारत सांगत होते.

गावांना विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल, तर दळणवळणाच्या सोयी झाल्या पाहिजेत, हे रंगराव पाटील यांनी जाणले होते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (त्यावेळेचे स्टेट ट्रान्सपोर्ट) कारभाराबाबत त्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात स्वतःची भूमिका मांडली. स्वतःच्या शाहूवाडी मतदारसंघात जास्तीत जास्त गावात एसटी कशी येईल, यासाठी प्रयत्न केलेच. पण, त्यांचे महत्त्वाचे काम म्हणजे, एसटी महामंडळाचा कारभार सुधारावा, म्हणून त्यांनी विधिमंडळाच्या सभागृहात आवाज उठवला. स्वतः प्रवास करून त्यांनी एसटी महामंडळाच्या कामातील उणिवा शोधून काढल्या. नेमक्या चुका आणि सरकारी पातळीवरची एसटीबाबतची चुकीची धोरणे त्यांनी मांडली.

एसटीच्या भाडेआकारणीपासून ते अगदी प्रवास करणार्‍या लोकांना ऊन वारा पाऊसात एसटीची वाट पहायला लागू नये, यासाठी थांब्याजवळ निवारा करावा, ही मागणी त्यांनी लावून धरली. आज गावोगावी जी पिकअपशेड दिसत आहेत, ती मागणी ही रंगराव पाटील यांनी केली आहे. केवळ प्रवाशीच नाही तर मोठ्या गावात एसटी थांब्यावर कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना सुद्धा निवारा असावा, अशी मागणी त्यांनी केली. तिचा पाठपुरावा केला. गाड्यांच्या फेर्‍या वाढवा, अशी सामान्य लोकांची मागणी त्यानी विधानसभेत केली आहे. आजच्या काळात लोकांच्या प्रश्नांत खूपच बदल झाला आहे. प्राधान्यक्रम बदलले आहेत. मात्र, त्यांनी सामान्य लोकांना भेडसावणारे प्रश्न शोधले आणि मांडले. पूर्वी सामानाची वाहतूक करण्यासाठी एसटीची सेवा होती, पण या सेवेत लोकांच्याकडून जाण्याचे आणि येण्याचे, असे दोन्ही मार्गाचे भाडे वसूल केले जाई. त्यामुळे लोक एसटीच्या सेवेचा वापर न करता खाजगी वाहतुकीकडे जातात, हा मुद्दाही त्यांनी मांडला.

एसटी हेच त्याकाळात एकमेव वाहन. जीपगाड्या श्रीमंत लोकांच्याकडे असत. त्याही आठ दहा खेड्यात एखादी चारचाकी असे. बैलगाडी किंवा चालत जावे लागत असे. याच काळात तालुक्यातील काही गावात तालुक्याला, जिल्ह्यात जाण्यासाठी एसटी गाड्या आणण्यासाठी ते प्रयत्न राहिले. आमच्या तालुक्यात एसटी आणली, पण यशवंतराव मोहिते परिवहन मंत्री असताना आमच्या वडिलांनी तालुक्यातील अनेक मुलं एसटी खात्यात नोकरीला लावली. शिकलेली मुलं कोणी आहेत का, असं विचारून ते त्या मुलांना चिठ्ठी (नोकरीचे शिफारसपत्र) देत. त्यांच्या शिफारशीने अनेक मुलं एसटीत चालक-वाहक, लेखनिक बनली. आमच्या तालुक्यात एसटी खात्यात जास्त नोकरीला लोक असण्याचे कारण यशवंतराव मोहितेंनी आमच्या वडिलांचा शब्द कधीही खाली पडू दिला नाही. त्यांच्या चिठ्ठीलाही खूप महत्त्व होते, असे भारत पाटील सांगतात.

1952 साली आमदार म्हणून त्यांची निवड झाली, त्याच कालावधीत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली. ‘बेळगाव निपाणी कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,’ म्हणत महाराष्ट्रातील जनता संयुक्त महाराष्ट्राच्या झेंड्याखाली लढू लागली. काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांचा संयुक्त महाराष्ट्राला विरोध होता. मुंबई कोणाची हा प्रश्न उभा राहिला. याच प्रश्नांवर शेतकरी कामगार पक्षाने लढा द्यायला सुरुवात केली. प्रजापरिषदेसारख्या ठिकाणी ज्यांचे नेतृत्व घडले होते, ते शाहूवाडीचे आमदार रंगराव पाटील गप्प बसतील का? त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नांवर आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि लढ्यात उतरले. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून लोकांच्यात प्रबोधन करायला बाहेर पडले. आमदारकीपेक्षा त्यांना संयुक्त महाराष्ट्र महत्त्वाचा वाटत होता. त्यांनी आमदारपदाचा राजीनामा दिल्यावर त्या मतदारसंघात निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली. त्या पोटनिवडणुकीत उमेदवारी करावी, अशी लोकांनी त्यांना विनंती केली. लोकांच्या आग्रहाखातर त्यांनी निवडणूक लढवली आणि सांगायचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांच्या विरोधात कोणीही अर्ज भरला नाही. ते पुन्हा बिनविरोध निवडून गेले.

‘संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, हीच माझ्या मतदारसंघातल्या जनतेची इच्छा आहे; म्हणूनच त्यांनी मला बिनविरोध निवडून दिले आहे,’ असे यावेळी त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले.

आमदारकीची एक टर्म संपली. पुढच्या निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही, म्हणून ते गप्प बसले नाहीत. त्यांनी सतत लोकांच्यात जाणे, त्यांना भेटणे, त्यांचे प्रश्न सोडवणे सुरूच ठेवले. एका सकाळी ते घराच्या बाहेर पडले की, गावातील चार दोन लोक असायची. जसे ते पुढे जात, तशी पुढच्या गावातील लोक त्यांच्यासोबत चालत राहात. बैठका सुरू असत. लोकांचे प्रश्न, गावचे प्रश्न जाणून घेऊन त्याच गावात त्याबाबतचे पत्र लिहून पोस्टात टाकत, अशी त्यांच्या कामाची पद्धत होती. 1962 सालच्या निवडणुकीत त्यांचे बंधू शंकरराव पाटील यांनी उमेदवारी केली, त्यांनाही अपयश आले; पण तरीही या अपयशाने ते खचले नाहीत. त्यांच्या कामात काहीही बदल झाला नाही. मुळात सत्ता हे त्यांचे ध्येय नव्हते. कारण, कसलीही पर्वा न करता आमदारकीचा राजीनामा देणारा हा नेता होता. राजकारणातले जयपराजय त्यांनी मनाला लावून घेतले नाहीत. असं त्यांच्यावर प्रेम करणार्‍या लोकांचं म्हणणं.

मी आठवीत शिकत होतो तेव्हा वडील गेले. तरुणपणीच गेले. पुढं मी थोडा कळता झालो आणि मीही वडिलांच्या पक्षात गेलो. आजअखेर इथंच आहे. मी तीन निवडणुका लढवल्या. कॅडर नसल्यानं पराभूत झालो, पण मला त्या पराभवाचे शल्य नाही. माझे वडील आणि चुलते ज्या पक्षात होते त्या पक्षात मी आहे. अगदी अनेक अडचणी, आर्थिक उणिवा आहेत, तरीही मी अन्य पक्षाकडे गेलो नाही आणि भविष्यात सुद्धा जाणार नाही, भारत पाटील सांगत होते.

शाहूवाडी तालुक्यात कोणत्याही गावात गेले, तरी गरिबांसाठी लढणारा माणूस म्हणून त्यांना लोक मान देतात. आदर व्यक्त करतात. भाऊ या नावाने ते परिचित आहेत. एवढे मोर्चे त्यांनी काढले की, मोर्चा म्हटलं की ‘भारत भाऊ’ अशीच एक ओळख झाली. भाऊ शेतकरी कामगार पक्षाची पडझड झाली, हे मान्य करताना हताश होतात. आमच्या वडिलांचा काळ वेगळा होता. आजचा काळ वेगळा आहे. या काळात टिकून राहणं आणि आमच्या पक्षाचे तत्त्वज्ञान पोहोचवण्यासाठी आम्ही कमी पडलो. त्यासाठी इतर कोणाला दोष देणार नाही. मात्र, जेवढं काही आहे आणि जेवढे लोक सोबत येतील, तेवढे घेऊन अखेरपर्यंत मी माझ्या वडिलांनी दिलेला वारसा जपणार आहे, असे ठामपणे ते सांगतात.

भाऊंशी बोलताना संध्याकाळ झालेली आहे. वडगावची रानात गेलेली माणसं गावात यायला लागली आहेत. दिवस मावळतीला निघालाय. शाहूवाडी तालुक्यातील त्या सह्याद्रीच्या डोंगररांगांत तो निघालाय. दोन तासापूर्वी पडून गेलेल्या पावसामुळे थोडा गारवाही जाणवतोय. भारत भाऊ आम्हाला निरोप द्यायला रोडवर आलेत. कधीकाळी तालुक्यातील राजकारण ज्या घरात ठरायचं, तो थोरातवाडा आमचं लक्ष वेधून घेतोय. जुन्या काळातील भव्य वाडा अजूनही तग धरून उभाय. त्याच वाड्याच्या दारासमोर उभे आहोत आम्ही. वयोमानानुसार थकलेले भारत भाऊ आणि त्यांचा मुलगा प्रणव तिथं आहे. वेळ खूप झालाय. घाटमाथ्यावर जायचं होतं आम्हाला. कधीकाळी दंतकथा बननेल्या आमदारांची कुळकथा आणि इतिहास समजून घ्यायला आलो होतो. अनेक प्रश्न घेऊन आलेलो. काहीची उत्तर मिळाली होती. काहींची मिळवायची होती. वेळ झाला होता, रात्र होण्याच्या अगोदर निघायला हवं होतं. आम्ही निघालो.

मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२३

(लेखक हे अनेक वर्षांपासून’ पत्रकारितेत कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी , कुस्ती , साहित्य , स्वातंत्र्य चळवळ व ग्रामीण भागातील प्रश्न हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

९४२२७४२९२५

Previous articleकौलाची ही बंडी माझी
Next articleसोशल मीडिया डिप्रेशनचे बळी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.