स्पर्धा परीक्षेच्या दिंडीचा वारकरी- प्रा. अमोल पाटील

संतोष अरसोड

   विद्येचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या पुणे येथील औंध परिसरात काही तरुण एकत्र येऊन एका अकॅडमीची स्थापना करतात. एका खोलीतून सुरू झालेला हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणास्पद ठरलेला आहे. युपीएससीची परीक्षा देण्याचे वय संपले म्हणून तीन तरुण एकत्र आले आणि 1997 ला या तीन तरुणांनी पायाभरणी केली एका स्वप्नाची.  हे स्वप्न साधेसुधे नव्हते तर या स्वप्नांमध्ये दडले होते हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांचे भवितव्य. आज हे स्वप्न राज्यभर साकार होताना दिसत आहे. ज्ञानाच्या भुकेनं व्याकूळ झालेल्या वंचितांच्या लेकरांना आधार देणारं हे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करत असताना या तीन तरुणांना प्रचंड संघर्ष करावा लागला. स्पर्धा परीक्षेच्या या वारीत अनेक वारकरी सहभागी झालेत. विश्वास नागरे पाटील, आनंद पाटील, प्रवीण दराडे आदी वारकरी मंडळी याच वारीतील. एका खोलीमध्ये स्थापन झालेल्या या ज्ञानकेंद्राचं नाव आहे युनिक अकॅडमी. या युनिक अकॅडमीच्या निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा उचलला तो अमरावतीच्या प्राध्यापक अमोल पाटील यांनी.

आज अमरावतीच्या पंचवटी चौकातील युनिक ॲकॅडमी जरी प्राध्यापक अमोल पाटील चालवत असले तरी तब्बल 21 वर्षांपूर्वी पहिला प्रयोग त्यांनी पुण्यात केला होता. अमरावती येथील अमोल पाटील, सातारा येथील प्रवीण चव्हाण आणि जळगावचे मल्हार पाटील या तीन तरुणांनी पुण्यामध्ये युनिक अकॅडमीची स्थापना केली. केवळ पैसा कमावणे हा या ॲकॅडमीचा उद्देश नसून एक चळवळ म्हणून त्यांनी या अकॅडमीची स्थापना केली आहे. स्पर्धा परीक्षेच्या या चळवळीने अनेक अभावग्रस्तांच्या मनोभूमीत आत्मविश्वासाची क्रांती बीजे पेरली. खचलेली , आत्मविश्वास हरवलेली ग्रामीण भागातील अनेक पोरं स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत आणण्याची ही चळवळ खरच प्रेरणास्पद आहे. ग्रामीण भागातील शेती आणि त्यात राबणारा शेतकरी यांच्या जीवनाचे वाळवंट झालेलं आहे. अनेक पिढ्या या शेतीत गारद होत आहेत. ही पिढी मात्र यातून बाहेर पडली पाहिजे, या पिढीने ज्ञानाच्या क्षेत्रात सृजनशील झाले पाहिजे हा ध्यास प्राध्यापक अमोल पाटील यांना स्वस्थ बसू देत नव्हता. तरुण पिढीच्या मेंदूला नवे अंकुर दान देणारा, त्यांच्या डोळ्यांना नवी दृष्टी देणारा, पंखांमध्ये उडण्याचे बळ धरणारा हा माणूस खऱ्या अर्थाने ज्ञानयात्रिक आहे. अमरावतीच्या पंचवटी चौकातील त्यांची युनिक ॲकॅडमी अनेकांसाठी प्रेरणा केंद्र ठरत आहे, नव्हे ज्ञानवंचितांचे ते माहेरघर बनले आहे.
युनिक अकॅडमी पुणे च्या निर्मितीची कहाणी मोठी रंजक आहे. अमोल पाटील यांनी इंग्लिश या विषयात एम. ए. आणि एम फील पुणे येथे केले. सोबतच रानडे इन्स्टिट्यूट मध्ये पत्रकारितेचे शिक्षणही घेतले. नाशिक येथे काही काळ ते ‘सकाळ’ या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणूनही कार्यरत होते. दरम्यान यूपीएससी परीक्षा देण्याचा विचार त्यांच्या डोक्यात आला. दोन्ही वेळेला अमोल पाटील यूपीएससीची परीक्षा पास झाले. पूर्व मुख्य आणि तोंडी परीक्षेचा किल्ला त्यांनी सर केला. असे असले तरी त्यांना कुठलीही पोस्ट त्यावेळेला देण्यात आली नाही. त्यात दुर्दैव असे की यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी आवश्यक असलेली वयोमर्यादा संपल्यामुळे अमोल पाटील यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले. झाडाच्या फांद्या छाटल्या नंतर झाडाला नव्या फांद्या फुटतात हा निसर्गाचा नियम आहे. मी नाही झालो अधिकारी तरी चालेल पण मला मात्र अधिकाऱ्यांची खाण निर्माण करायची आहे हा विचार अमोल पाटील यांना स्वस्थ बसू देत नव्हता.
अशातच त्यांच्या डोक्यामध्ये एक भन्नाट कल्पना आली. युपीएससीची परीक्षा देण्यासाठी प्रयत्न संपलेले मित्र त्यांनी गोळा केले. प्रवीण चव्हाण, मल्हार पाटील यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतूनच पेरले गेले एक नवे स्वप्न .स्पर्धा परीक्षेच्या तयारीचे. औंध परिसरातील एका खोलीत वर्ग सुरू करण्यात आले. या तीनही तरुणांनी मग त्या ठिकाणी स्वतः खुर्च्या धुतल्या अन् प्रारंभ झाला स्पर्धा परीक्षेतील ज्ञानदानाला. स्पर्धा परीक्षेच्या या वर्गामध्ये पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी येऊ लागलेत. विश्वास नागरे पाटील, आनंद पाटील, प्रवीण दराडे हा जो सोबत अभ्यास करणारा मित्र परिवार होता त्यांनी या खोलीतूनच यशाची उत्थानगुंफा कोरली. या पहिल्या यशाने एक प्रचंड मोठा आत्मविश्वास अमोल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना प्राप्त झाला. पुढे याच युनिक ॲकॅडमीला नवे पंख फुटले. औंधमधील ही शाखा नवी भरारी घेत शिवाजीनगर मध्ये विसावली. शिवाजीनगर मध्ये सुरुवातीला एकाच खोलीत हे वर्ग सुरू झालेत. पुढे त्याच घरमालकाने उर्वरित दोन खोल्या सुद्धा भाड्याने दिल्या आणि भाडे ठरले महिना आठ हजार रुपये.
युनिक अकॅडमी शिवाजीनगरात आली. शिवाजी ज्या शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी लढत होते, ज्यांच्या हाती तलवारी देत होते त्याच शेतकऱ्यांच्या लेकरांच्या हातात ज्ञानाच्या तलवारी देण्यासाठी ‘युनिक’ चा किल्ला तयार होता.’ ज्ञानातून सक्षमीकरण ‘हे ब्रीद ठरविण्यात आले. याठिकाणी प्राध्यापक अमोल पाटील विद्यार्थ्यांना इतिहास हा विषय शिकवत होते. रक्ताच्या प्रत्येक थेंबा थेंबात चळवळ अंकुरीत झाल्यामुळे या तीनही मित्रांनी प्रचंड मेहनत घेतली अन तरुणांना प्रशासकीय सेवेची दारे खुली  करून दिली. याचवेळी प्राध्यापक अमोल पाटील यांच्या मनात एक विचार आला. माझ्या विदर्भातील मुलं स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात का येत नाहीत? हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करीत होता. त्यांचे संवेदनशील मन या प्रश्नाने व्याकुळ व्हायचे.
अशातच सन 2002 मध्ये अमरावती येथे एक सेमिनार आयोजित करण्यात आला होता. यूपीएससीची तोंडओळख व्हावी म्हणून या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. आय. आर . एस .अभिनय कुंभार व प्राध्यापक अमोल पाटील या सेमिनारमध्ये प्रमुख मार्गदर्शक होते. यावेळी अमरावती शहराला यूपीएससी काय भानगड आहे याबाबत फारशी माहिती नव्हती. नवीन पोरं एमपीएससीच्या बाहेर पडण्यास तयार नव्हती. ह्या सेमिनार मधून प्राध्यापक अमोल पाटील यांनी तरुण मुलांच्या मनातील युपीएससीची भीती पार काढून टाकली व सभागृहातच ‘चलो पुणे ‘चा नारा दिला. त्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत बारा मुलं पुणे येथे यूपीएससीच्या तयारीला गेली. या मुलांना अमोल पाटील यांनी पुणे येथे यूपीएससीच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन करून यशाच्या मार्गावर नेऊन ठेवले.
एवढे सारे करीत असताना अमोल पाटील यांचे लक्ष मात्र पुन्हा पुन्हा अमरावतीकडे जायचं. ‘घार ऊडे आकाशी परंतु लक्ष तिचे पिलापाशी’या उक्तीप्रमाणे अमोल पाटलांच्या मनाची अवस्था झाली होती. माझ्या मातीचे कर्ज कधी फेडू ही भावना त्यांना सतत बेचैन करायची. अशातच एके दिवशी अमरावती विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. वानखडे यांनी प्राध्यापक अमोल पाटील यांना संपर्क केला. युजीसीची स्पर्धा परीक्षेसाठी अनुदान आहे पण शिकवणार कोण? असा प्रश्न डॉ.वानखडे यांनी अमोल पाटील यांना केला.  अमोल पाटील यांनी वानखडे यांना सहकार्य करण्याचे ठरवले. परिणामी सोमवार ते गुरुवार अमोल पाटील पुणे येथे शिकवायचे व शुक्रवार शनिवार व रविवार अमरावती विद्यापीठात येऊन ते जवळपास ८० विद्यार्थ्यांना यूपीएससीचे धडे द्यायचे. यामुळे यूपीएससीच्या संदर्भात एक वेगळं वातावरण विद्यापीठात तयार होऊ लागले. अमरावतीची स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील खडकाळ भूमी नंदनवनाच्या दिशेने कूच करू लागली. विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वासाचे नवे अंकुर फुटू लागले. चेहऱ्यावरील भयग्रस्तता पुसट होऊ लागली. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास अमोल पाटील यांना एक वेगळ बळ देऊन गेला. असे असले तरी अमोल पाटील मात्र पुन्हा एकदा बेचैन झाले.’मन म्हणायचं की चल अमरावतीला. तिथेच कर नव्या ज्ञानक्रांतीचा उदय. भाऊसाहेबांची ही भूमी आहे, शेतकऱ्यांच्या पोरांना तुझी गरज आहे’ .  हा विचार अमोल पाटील यांना सतत अस्वस्थ करायचा. पत्नी सुप्रियाशी त्यांनी चर्चा केली आणि  निर्णय झाला की, आता आपल्या कष्टाने अमरावतीची खडकाळ भूमी पुन्हा फुलवायची.
पुणे सोडण्याचा निर्णय झाला. सन 2006 मध्ये युनिक अकॅडमी पुणेची शाखा अमरावती ला सुरू करण्यात आली. अंबादेवी रोडवरच्या उडान ऑडिटोरियममध्ये वर्ग सुरू करण्यात आले. आलेल्या फीस मधील 30 टक्के रक्कम भाडे  म्हणून देण्याचे ठरले. त्यानंतर पंचवटी चौकातील डॉक्टर आकाश वराडे यांच्या बीएड कॉलेजच्या एका हॉलमध्ये अमोल पाटील यांनी ही शाखा स्थानांतरित केली. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना MPSC, UPSCची ओळख होऊ लागली. सन २००६ च्या पहिल्याच बॅचचे तीन विद्यार्थी एमपीएससीतून निवडल्या गेले. आशेला नवी पालवी फुटू लागली. यावेळी अमोल पाटील हे यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना मात्र घरीच मार्गदर्शन करीत होते. गाव खेड्यांमध्ये युनिकचे वारे वाहू लागले. सन 2010 मध्ये एकाच वेळी 22 विद्यार्थ्यांनी एमपीएससीचा गड सर केला. सन २०१३ मध्ये महाराष्ट्रातील एकमेव महिला आयएएस झाल्यात त्या भाग्यश्री बाणायत युनिक अकॅडमी अमरावतीच्या विद्यार्थिनी आहेत. आयएएस अक्षय खंडारे, आयआरएस अमित निकाळजे, आयआरएस प्रशांत रोकडे, आयआरएस शरयू आढे युनिकच्या झाडाला आलेली फळे आहेत.
यशाच्या या परंपरेला साजेसे काम प्राध्यापक अमोल पाटील गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. हा माणूस संवेदनशील आहे. वडील मनोहरराव यांचं  मनोहारी’स्वप्न म्हणजे अमोल पाटील. वडिलांना शाळा सुरू करायचे होती. वडिलांचे हे स्वप्न युनिक अकॅडमीच्या माध्यमातून अमोल पाटील यांनी पूर्ण केले. शेतकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अमरावतीमध्ये ही अकॅडमी सुरू आहे. ही ॲकॅडमी केवळ अधिकारी तयार करीत नाहीत तर संवेदनशील माणसं तयार करते. मुळात अमोल पाटील यांनाच प्रचंड सामाजिक भान आहे. शेती मातीशी त्यांची नाळ घट्ट झालेली आहे. ज्यांच्या मनात प्रचंड आत्मविश्वास आहे त्यांना कुठलीही फीस न घेता त्यांनी प्रवेश दिला आहे . त्यांच्या ॲकॅडमीत. मायेची ऊब आणि पदराची सावली कशाला म्हणतात ते त्यांनी त्यांच्या कृतीतून सिद्ध केले आहे. त्यांच्या अमरावतीच्या या अकॅडमीत ग्रामीण भागातील जवळपास 80 टक्के विद्यार्थी आहेत. सन २०१७मध्ये शेती उद्ध्वस्त झाली होती. सोयाबीन सारखे पीक हातातून गेले होते. यावेळी अमोल पाटील यांनी ग्रामीण भागातील कोणत्याही  विद्यार्थ्यांकडून उर्वरित फी घेतली नाही. एवढंच नाही तर अनेक विद्यार्थ्यांना एसटीची पास सुद्धा काढून दिली. शिक्षकाला जे आईचं काळीज असावं लागतं ते अमोल पाटील यांचेकडे आहे. सन २००६ ते आजतागायत जवळपास ६०० विद्यार्थी अमोल पाटील यांच्या धडपडीतून प्रशासनात सहभागी झाले आहेत. त्यांच्या या धडपडीस प्राध्यापक अजय वानखडे, अनुप खांडे, धीरज स्थूल, भूषण चांदवडकर, प्राध्यापक सुनील यावलीकर, गणेश हलकारे, सुमित उरकूडकर, यादव तरटे, गजानन घुगे यांचेसह अनेकांचा हातभार लागलेला आहे.
सन २००५ मध्ये मॅकमिलन प्रकाशनाने अमोल पाटील यांचे ‘युनिक ए टू झेड’हे चालू घडामोडी वरील पुस्तक प्रकाशित केले आहे. तसेच ‘आधुनिक जगाचा इतिहास’हे पुस्तक सुद्धा त्यांच्या नावावर आहे.यंदा तर त्यांनी ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना फीमध्ये दहा हजार रुपये सवलत दिली आहे. स्पर्धा परीक्षेसाठी पायाला भिंगरी लावून फिरणारा हा माणूस खरेतर स्पर्धा परीक्षेच्या दिंडीतील वारकरी आहे.

 युनिक अकॅडमी अमरावतीची वैशिष्ट्ये
……………………..
१) सुसज्ज अशी लायब्ररी
२) विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी रीडिंग रूम
३) तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन
४) नियमित टेस्ट सिरीज
५) उन्हाळ्यात आय. ए . एस. फाउंडेशन कोर्स
६) विद्यार्थ्यांचे वैयक्तिक समुपदेशन

 टिप्स
……..
१) देशाची धोरणे अधिकारी ठरवतात म्हणून शेतकऱ्यांची पोरं अधिकारी व्हावीत. त्यासाठी शेतकऱ्यांच्या पोरांनी या क्षेत्राकडे वळणे आवश्यक आहे.
२) कुठलाही क्लास कुणालाही अधिकारी बनवू शकत नाही मात्र अधिकारी बनण्यासाठी आवश्यक दिशा देऊ शकतो.
३) विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची प्रोसेस समजून घेणे आवश्यक आहे. अंधानुकरण करू नये.
४) विद्यार्थ्यांनी विश्लेषणात्मक क्षमता वाढवणे गरजेचे.
५) या क्षेत्रामध्ये संयम आवश्यक आहे.
६) एनसीआरटी व स्टेट बोर्ड चया शालेय पुस्तकांचे वाचन करा
७) स्वतःवर विश्वास ठेवा

(अमोल पाटील यांचा संपर्क क्रमांक ९४२२३५५६६४)

(लेखक ‘मीडिया वॉच’ अनियतकालिक आणि वेब पोर्टलचे असोसिएट एडिटर आहेत)

९६२३१९१९२३

Previous articleआमचा कांबळे
Next articleभारतीय शेती आणि संस्कृतीचा इतिहास
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here