स्वप्ने त्यांना साद घालतात

प्रसिद्ध लेखक-विचारवंत आणि सामजिक कार्यकर्ते गणेश देवी यांना नुकताच औरंगाबाद येथे स्वातंत्र्यसैनिक श्यामराव बोधनकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यानिमित्ताने देवी यांच्या उत्तुंग कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला मागोवा…

रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ

……………………………………………………………………………………

प्रसिद्ध लेखक-विचारवंत आणि सामजिक कार्यकर्ते गणेश देवी यांना आज औरंगाबाद येथे स्वातंत्र्यसैनिक श्यामराव बोधनकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, त्यानिमित्ताने देवी यांच्या उत्तुंग कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला मागोवा…
मी खूपदा मनाशी एक गंमतीचा खेळ खेळतो. एखाद्या व्यक्तीचे नाव घ्यायचे आणि त्याबरोबर आपल्या मनात कोणते शब्द आधी उमटतात ते बघायचे. त्यातून त्या व्यक्तीबद्दल आणि आपल्या अंतर्मनातील तिच्या प्रतिमेबद्दल आपल्याला मोलाचे काही कळते, असा माझा अनुभव आहे. गणेश देवींचे नाव घेतल्यावर माझ्या मनात पहिल्यांदा शब्द उमटले – ‘समास’ आणि ‘त्रिज्या’, त्याचीही कहाणीच आहे!

बारा वर्षांपूर्वीची गोष्ट. आत्माराम राठोड – माझा जिवलग मित्र, एक अस्वस्थ व शापित व्यक्तित्व लाभलेला मराठीतला एक जबरदस्त कवी. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा अभ्यास करणाऱ्या एका चमूसोबत यवतमाळ जिल्ह्यात फिरताना तो ऊन लागून गेला. मला ही बातमी कळली तेव्हा त्या घटनेला कित्येक महिने उलटून गेले होते. हे कळल्यावर माझ्या जीवाची तगमग झाली. आयुष्यभर तो दुर्लक्षित, उपेक्षित राहिला होता आणि त्याचा अंत हा असा! पण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्याला गणेश देवींनी जवळ केले व त्याच्याकडून काही मोलाची कामगिरी करून घेतली, एवढे मात्र मला कळले. बडोद्याला गेल्यावर देवींना पहिल्यांदाच भेटलो. त्यांनी मला त्यांनी स्थापलेल्या तेजगढच्या आदिवासी अकादमीत पाठवले. तिथे भटक्या-विमुक्तांविषयीच्या दालनात आत्माराम राठोडचा फोटो सन्मानाने लावला होता. सोबत त्याने लिहिलेली (खरे तर त्याच्याकडून देवींनी लिहून घेतलेली) पुस्तके ठेवली होती. बंजारा समाजाबद्दल त्याने मानववंश, भाषा, लोकसाहित्य, लोकपरंपरा अशा विविध दृष्टीकोनातून केलेले मौलिक संशोधन मला तिथे दिसले. त्यातील एक पुस्तक तर साहित्य अकादमीने प्रकाशित केलेले होते. सर्वांनी वाऱ्यावर सोडलेल्या माझ्या ह्या गुणी मित्राशी देवींनी नाते जोडले, त्याच्या मनातील उमेद जागवली आणि त्याच्याकडून समाजाला अनेक दशके मार्गदर्शक ठरेल असे काम करून घेतले. आज बंजारांसह विविध जमाती-जातींच्या ‘हिंदुकरणा’चा प्रयत्न जोरात सुरू असताना आत्मारामचे बंजाऱ्यांचे हिंदू समाजापासून असणारे वेगळेपण अधोरेखित करणारे संशोधन मैलाचा दगड ठरले आहे. देवी हे निव्वळ मोठे लेखक-विचारवंतच नाही, तर पुरोगामी मंडळींमध्ये क्वचितच आढळणारा ‘समासा’चा म्हणजे जोडण्याचा, माणसे जोडण्याचा गुण त्यांच्याजवळ आहे, हे मला अधिक मोलाचे वाटते.

‘निर्मिणे’ व ‘मोकळे होणे’

गणेश देवी ह्या व्यक्तीच्या या गुणविशेषांचे महत्त्व ते जेव्हा संस्थानिर्माती करतात किंवा संघटक बनतात, तेव्हा कित्येक पटींनी वाढते. गेल्या दोन शतकात आपल्या देशात व मराठी मुलुखात जी महत्त्वाची परिवर्तने घडली, त्यामागे थोर व्यक्तींनी दूरदृष्टीने निर्मिलेल्या संस्था व संघटनांचे योगदान फार मोठे आहे. आज महाराष्ट्रात व देशात एकांडे शिलेदार बरेच आहेत, पण ठोस वैचारिक आधारावर संस्था व संघटना निर्माण करणे, त्यांना वाढविणे व मुख्य म्हणजे टिकविणे ही जबाबदारी घेताना कोणीही दिसत नाही. गणेश देवी ह्या बाबतीत अपवाद म्हणावे लागतील. मगाशी उल्लेखिलेल्या तेजगढच्या संस्थेची त्यांनी केवळ स्थापना केली नाही, तर तिला भक्कम पायावर उभे करून त्याची सूत्रे नव्या पिढीच्या स्वाधीन करून ते अन्य महत्त्वाची कामे करण्यास ‘मोकळे झाले’. ही ‘मोकळे होण्याची’ किमया महाराष्ट्रातील इतर थोर संस्थाचालकांना जमलेली दिसत नाही. वेगळी माणसे, संस्था, संघटना, विचारधारा ह्यांच्यामध्ये सेतू बांधण्याचा हा गुण अंगी असल्यामुळेच देवी भारतीय भाषा सर्वेक्षण लोकप्रकल्पाचे काम हाती घेऊन तडीला नेऊ शकले. स्वातंत्र्यानंतरच्या ७२ वर्षांत जे काम कोणतेही सरकार करू शकले नाही, ते ७८० भाषांच्या सर्वेक्षणाचे काम त्यांनी ३५०० कार्यकर्ते-अभ्यासकांच्या मदतीने पूर्ण केले. आता त्यापुढे जाऊन जगभरातील ६,००० जिवंत भाषांच्या सर्वेक्षणाचे काम त्यांनी अंगावर घेतले आहे.

गणेश देवींच्या व्यक्तित्वाचा एक विलोभनीय भाग हा आहे की कामाचे डोंगर उपसत असताना ते अजिबात कोरडे किंवा ‘कामसूपणाने ग्रस्त’ होत नाहीत. त्यांच्या स्वभावातील मार्दव, राहणीतील राजसपण, वृत्तीतील सौंदर्यप्रेम ह्यांना अजिबात ओहोटी लागत नाही. भारतीय परंपरेतील रोमँटिसिझम व तिचे रवींद्रनाथांसारखे ‘नायक’ त्यांना नेहमीच भुरळ घालतात. ते नेहमी मोठमोठी स्वप्ने पाहत असतात. कधी कधी तर एकाच वेळी अनेक स्वप्ने त्यांना साद घालतात. ते स्वप्न कधी ‘दक्षिणायन’च्या रूपाने भारतीय साहित्यिक-कलावंतांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या आकांक्षेचे इंद्रधनुष्य विणण्याचे असते, कधी गांधीजींच्या ‘नई तालीम’च्या रोपट्याचे रुपांतर मल्टिव्हर्सिटीच्या डौलदार वृक्षात करण्याचे असते, तर कधी २१व्या शतकातील भारतीय युवकांशी संवादसेतू बांधत त्यांच्या मनातील असंतोषाला क्रांतिकारी वळण देण्याचे असते. ह्यातील किती स्वप्ने साकार होतील हा प्रश्न अलाहिदा, पण आजच्या विषण्ण करणाऱ्या परिस्थितीत देवी अशी सुंदर स्वप्ने पाहू शकतात, अजिबात नाउमेद होत नाहीत, उलट अनेकांच्या मनात आस्थेचे दीप उजळतात, हे विशेष!

हे निव्वळ स्वप्नाळूपण नव्हे. त्याच्या मुळाशी त्यांचे स्वतःचे ‘दर्शन’ आहे व वास्तवाचे प्रखर भानही आहे. त्यांना स्मृतिव्याकूळ होऊन किंवा परंपरेच्या प्रेमापोटी भाषा जगवायची नाही. ‘भाषा बोलणारी माणसे जगली, तर भाषाही तगेल’ हे भान त्यांना आहे. म्हणूनच प्रश्न जागतिकीकरणाच्या धबडग्यात आदिवासी, भटके-विमुक्त ह्यांच्या भाषिकच नव्हे, तर सर्वांगीण अस्तित्वाचा आहे, हे त्यांना समजते. अशा प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अभ्यास, वैचारिक बैठक, संघटना ह्यांचे महत्त्व आहेच. पण त्यासाठी आधी स्वतःला रोज घासून पुसून, वाकवत, आकार देत, अधिक प्रखर, अधिक निर्मळ करावे लागते, हा गांधींचा विचार त्यांना मान्य आहे. त्यासाठी ते रोज जाणीवपूर्वक ‘स्वतःवर काम’ करतात, ही त्यांची ‘खासियत’ आहे.

हे सारे करताना आपल्या माणूसपणाची, संवेदनशीलतेची, विचारांची व प्रत्यक्ष कृतीची ‘त्रिज्या’ सतत विस्तारत न्यावी लागते, हे देखील देवी आपल्याला शिकवितात. त्यामुळेच ते नित्यनूतन राहतात, निराश होत नाहीत. आजच्या घडीला भारतातील सर्व परिवर्तनवादी विचारधारांना जोडू शकेल असे व्यक्तित्व व कर्तृत्व गणेश देवींपाशीच आहे, हे निर्विवाद! त्यांना मानणाऱ्या अशा हजारो लोकांच्या मनातील त्रिज्या विस्तारत नेऊन त्यांचा समास घडविण्याची व ही प्रक्रिया सातत्याने चालू ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आहे. ३० जानेवारी २०१८ रोजी त्यांनी सेवाग्राम ते दीक्षाभूमी असा ‘समास’ आखला होता. भारतीय राजकारणातील दोन ध्रुव – गांधी व आंबेडकर ह्यांना सांधण्याचा हा प्रयत्न होता. त्यासाठी आंबेडकरांच्या नातवाने सेवाग्राम आश्रमात व गांधींच्या नातवाने दीक्षाभूमीत बोलावे आणि दोघांनी मिळून गांधी-आंबेडकर संवादसेतू बांधावा अशी अभिनव कल्पना देवींनी साकार करून दाखविली. आता राष्ट्र सेवा दलाची नव्याने उभारणी करून युवाशक्तीच्या साह्याने नवा भारत उभारण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले आहे. स्वातंत्र्यसैनिक श्यामराव बोधनकर स्मृती पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने देवींच्या उत्तुंग कार्याचे हे स्मरण व त्यांच्या संकल्पपूर्तीसाठी असंख्य शुभेच्छा!

(लेखक नामवंत सामाजिक कार्यकर्ते आहेत)

Previous articleविरुबाई : आंदणी ते मातुश्रीसाहेब
Next articleफराळ मनाला आणि बुद्धीलाही हवा असतो
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.