स्वप्न-वास्तवाच्या सीमेवर तरंगणारा ‘रजनीगंधा’

 

-प्रमोद मुनघाटे

‘रजनीगंधा’चा प्रारंभ रेल्वेतील प्रसंगापासूनच होतो.  तो आठवतो का कुणाला? नायिका दीपा एका धावत्या  ट्रेनमध्ये आहे. तिला झोप लागली आहे. जाग येते तेव्हा संपूर्ण ट्रेन रिकामी दिसते. तिला कळत नाही काय करावे. ती ट्रेन थांबविण्यासाठी चेन ओढते. पण त्या चेनचा दांडाच तिच्या हाती येतो. मग कुठे तरी ट्रेन थांबते. ती उतरते. स्टेशन निर्जन असते. ती पुन्हा सैरभैर होते. ज्या ट्रेनमधून ती उतरते त्याच ट्रेनमध्ये परत चढण्याचा ती प्रयत्न करते, पण ती सुटते. ट्रेनचा पाठलाग करत ती बरेच अंतर धावत जाते. पण तिला पकडता येत नाही.

अर्थात हे स्वप्न असते. अत्यंत अस्वस्थ मनस्थितीत ती जागी होते तेंव्हा ती आपल्या घरी दिल्लीला आपल्या भावाकडे असते.

तसं पाहिलं तर परत परत पाहावा असा आहे का सिनेमा? पण तो आवडता मात्र आहे ना.  आवडलेल्या गोष्टी पुनः पुन्हा करतोच ना आपण? कशासाठी हा तर्क तिथे उरत नाही.  आपल्याला आवडणारी गाणी पुनः पुन्हा आपण ऐकतो. त्यांचा कंटाळा येत नाही. उलट कंटाळा घालविण्यासाठी आपण आपल्या आवडीची गाणी ऐकतो. नवीन गाण्यांच्या वाट्याला आपण सहजासहजी  जात नाही. पुस्तकांचेही तसेच आहे. आवडलेली कथा, कविता, कादंबरी पुन्हा पुन्हा हातात घ्यावीशी वाटते. नाही वाचलं पूर्ण, तरी त्या नुसत्या स्पर्शात आपण त्या कथा-कादंबरीतील माणसांना पुनः पुन्हा भेटत जातो. आपली ओळख अधिक घट्ट होत जाते.

सिनेमाचेही असेच आहे माझ्यासाठी  आवडणारा सिनेमा पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो.  एक सिनेमा म्हणजे एक नवीन स्वतंत्र सृष्टी असते. तेथील माणसे, निसर्ग, घरे, त्यांचे संवाद, गाणी भांडणे आणि प्रेम यांचा  आपणही एक घटक बनून जातो. सिनेमातील गोष्ट सांगणारा निवेदक, कॅमेरामन आणि दिग्दर्शक जसा अदृश्य असतो, तसेच आपणही दिसत नाही त्या सृष्टीत, पण आपण असतो तिथे. प्रत्येक फ्रेमचा साक्षीदार म्हणून नव्हे तर आपण भागच असतो, त्या सिनेमातील प्रतिसृष्टीचा. आपल्याशिवाय जणू अस्तित्वच नसते त्या सगळ्या खेळाला. म्हणून  पुनः पुन्हा त्या खेळाचा आपण एक भागच बनतो.

विद्या सिन्हा आणि अमोल पालेकर ही या सिनेमातील दोन नावे सत्तरीच्या दशकातील भारतीय सिनेमाच्या संदर्भात खरोखरच वेगळी होती. ही एक गोष्ट या सिनेमाच्या आकर्षणाचा एक भाग आहेच.  त्यापेक्षाही सलील चौधरीचे संगीत असलेली गाणी आजची विविध भारतीवर अत्यंत ‘लोकप्रिय’ असली तरी ती फार वेगळी वाटतात.

बासुदांचे सिनेमे मला आवडतात. उघडपणे कुठलेही राजकीय किंवा सामाजिक संदर्भ नाहीत. बटबटीतपणे काही शिकविण्याचा आव तर नाहीच नाही. सगळ्या कविता काही सांगण्यासाठीच लिहिल्या जातात असे नाही, पण त्या वाचल्या जातात. कुणाला त्या आपल्या आतल्या आवाजासारख्या जाणवतात. ते जाणवणे बासुदा नेमक्या फ्रेम मध्ये आणि संवादात पकडतात. विद्रोह किंवा प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान अशा भानगडीत त्यांचा सिनेमा उघडपणे नसतोच.  पण त्याला मानसशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय विश्लेषणाचे अस्तर मात्र अवश्य असते. या विश्लेषणाला कथात्म रूप देण्याचा प्रयत्न मला फार आकर्षक वाटतो. ‘आस्था’ हे तर त्याचे फार सुदंर उदाहरण आहे.

कलात्मकतेचा आवही त्यांच्या निर्मितीत नाही. उघडपणे ‘मध्यमवर्गीय’ मानसिक चौकटीचा ते कॅनव्हॉस म्हणून वापर करतात. मध्यमवर्गीय अभिरुचीला भावणारे भाव-संगीत वापरतात. रोमांटीक प्रतीके व प्रतिमा वापरतात.  ते सगळे दर्शनीय करतात. पात्रांची सांस्कृतिक पार्श्वभूमी, घटनांचे स्थळ-काळ, नट-नट्यांची निवड ही काहीशी महानगरी ( काही अपवाद आहेत)  स्वरूपाचीच असते. पण म्हणून ते प्रस्थापित, व्यवस्थाधार्जिणे, समस्यांचे सुलभीकरण करणारे असते असे मला वाटत नाही. प्रत्येक कलावंतांचा अनुभव घेण्याचा आणि मांडण्याचा एक पिंड असतो. प्रेक्षक म्हणून आपल्यालाही स्वातंत्र्य असतेच. स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा. या संदर्भात मला त्यांचा सिनेमा आवडतो. रजनीगंधा असाच आहे म्हणून पुनः पुन्हा पहावासा वाटतो.

प्रेम हा तर हिंदी सिनेमाचा घासून घासून गुळगुळीत झालेला विषय. त्याचे अनेक कंगोरे अनेक सिनेमात सांगितले गेलेले. कधी हळुवारपणे तर कधी अतिशय रांगड्या पद्धतीने. कामभावना आणि प्रेमभावना ह्यांच्या सीमारेषा पुसून टाकणारे. या पार्श्वभूमीवर बासुदांचे सगळेच सिनेमे खूप वेगळे. लोकप्रिय व व्यावसायिक असा शिक्का असलेले तरीही वेगळे.

खरे तर रजनीगंधाचं कथानक दोनचारपाच वाक्यात सांगून टाकता येईल असे आहे. मात्र संपूर्ण सिनेमा म्हणजे  कथानक नव्हे. तर बासूदांनी ते कथानक ‘कसे’ सांगितले आहे, त्याचा हा सिनेमा आहे. दीपा (विद्या सिन्हा) दिल्लीत भावाकडे राहत असते. संजयवर (अमोल पालेकर)  तिचे प्रेम असते.  तो तसा टिपिकल मध्यमवर्गीय मनोवृत्तीचा सरळमार्गी तरुण आहे.  दोघांचे लग्नही होणार असते. दीपा लेक्चररच्या पदाच्या मुलाखतीसाठी मुंबईला जाते. तिथे तिला घ्यायला नवीन (दिनेश ठाकूर) येतो. तो तिचा कॉलेजमधील  पहिल्या  प्रेमाचा प्रियकर असतो. पाच-सहा वर्षानंतर नवीनला नव्याने भेटताना दीपाच्या संथ मनाच्या पाण्यात वादळी भोवरे निर्माण होतात. त्याचे हिप्पीसारखे वाढवलेले केस. त्याचा गॉगल, त्याचे सिगारेट ओढणे,लग्न न करता बेफिकीर जगणे, त्याचे उच्चभ्रू पार्टीत वावरणे, त्याच्या जाहिरातिच्या क्षेत्रातील ग्लामर हे तिला आवडते. त्याच्यासोबत मुंबईत फिरताना ती परत त्याच्या व्यक्तिमत्वाकडे ओढली जाते. पण दुसऱ्याच क्षणी निशिगंधाच्या फुलांचे गुच्छ आणून देणारा संजय तिच्या डोळ्यासमोर येतो. त्या मानसिक द्वंद्वाच्या वेदना तिला होतात.  पण अखेर दिल्लीला परत आल्यावर मुंबईच्या नोकरीची ऑफर येऊनही ती झुगारते. रजनीगंधाच्या फुलांचे गुच्छ घेऊन आलेल्या संजयला मिठी मारून स्वत:च्या मनाशी ती उद्गारते, ‘यही सच है’

दीपाचे संजयवर प्रेम आहे. ते खरेच आहे. तरीही तिचा जुना प्रियकर नवीन तिला नव्याने भेटतो आणि ती पुन्हा स्वतःला त्याच्या प्रेमात पाहते. हेही खरेच असते. तो भास नसतो. नवीनच्या मिठीत असल्याचे दिवास्वप्न ती बघते. ते स्वप्न ती झटकून टाकते. पण ते दिवास्वप्न म्हणून त्याचे एक अस्तित्व असतेच. ते नाकारण्याचा प्रश्नच नसतो. संजय तिला निशिगंधाची फुलं आणून देतो. त्या फुलांच्या गंधाने जसे तिचे सगळे अस्तित्वच झंकारून जात असते, तसे नवीनचे सगळ्या अर्थाने लिबरल जगणे तिला खूप आवडते. मग मनात द्वंद्व सुरु होते. त्याच्या सहवासात घालवलेले क्षण आठवून त्याच्या विरहाने व्याकूळ होते. पण अखेर ती संजयच्याच बाहुपाशात स्वतःला झोकून देते.

नाटक किंवा सिनेमाच्या प्रयोगाला आपण खेळ म्हणतो. पण प्रत्यक्षात नाटक-सिनेमाच्या खेळात आपण फक्त प्रेक्षक असतो. रंगमंचावरील खेळ आणि प्रत्यक्ष जीवनातील खेळ ह्यात फरक करतो. प्रत्यक्ष जीवनातील खेळाचा आपण एक भाग असतो. पण रंगमंचावरील खेळ तटस्थपणे पहायचा असतो. भारतीय नाट्यशास्त्रात तसा नियम सांगितला आहे. प्रेक्षक जर स्वतःला रंगमंचावरील खेळाचा भाग मानू लागला तर ते रसविघ्न ठरते. पण प्रत्येक वेळी नियम पाळले जातात का? पाळले पाहिजेत का? तसे असते तर सामाजिक वर्तनशास्त्र हे यंत्रवत झाले असते. रंगमंचावर मानवी भावभावना, नीतीअनीती आणि नातेसंबंध यांचा खेळ सुरू असतो, तेव्हा प्रेक्षक असे नियम तोडतात. विद्या सिन्हा किंवा अमोल पालेकर हे पडद्यावरचे राहत नाहीत. म्हणून एका पिढीच्या प्रेमाचे, प्रणयाचे आणि रोमांटिक जगण्याचे ते प्रतिनिधित्व करतात.

‘रजनीगंधा’ हा पडद्यावरील अलौकिक जीवन आणि प्रत्यक्ष जीवन यातील सीमारेषा पुसून टाकणारा सिनेमा आहे. अनेक अर्थाने. अगदी ढोबळपणे सांगायचे तर दीपाचे संजयवर प्रेम आहेच. पण तिचे मन आंदोलित होते. संजयची मध्यमवर्गीय मनोवृत्ती आणि नवीनचे नव्याचा शोध घेणारे आकर्षक जगणे यांची ती तुलना करते. नवीन सोबत दीपा मुंबईत मरीन ड्राइववर फिरताना  ‘कई बार युंही देखा है, मेरे मनकी सीमारेखांए, मन दौडने लगता है’ हेच गाणं पार्श्वभूमीला येते. तिचे मन लौकिक आणि अलौकिक पातळयांवर आंदोलित होते. मन सीमारेषा ओलांडून जाते. दीपाचे मन लौकिक-अलौकिकाचे नियम तोडते, पण प्रत्यक्ष आयुष्यात निर्णय घेताना दीपा मात्र लौकिकाचे नियम जवळ करते.

पण बासुदांचा ‘रजनीगंधा’ त्या पलीकडे जातो. समुद्राची पहिली लाट येते. मग दुसरी. आणि तिसरी त्यापेक्षा मोठी, तसे हे ‘रजनीगंधा’ अनुभवण्याचे स्तर आहेत.  दीपा-संजय आणि नवीनच्या संबंधातील नात्याची ही मूस आहे. आपल्या वास्तव जीवनाला समांतर अशी ही सृष्टी सिनेमात उभी केली आहे. या सृष्टीतील शहर, माणसे, त्यांचे जगणे, त्यांचे रागलोभ आपल्यासदृश्य आहेत, म्हणून आपण त्यात रमतो. पण तरीही ती सृष्टी आपल्या समांतर आहे. आपण लौकिक पातळीवरच आहोत, पण समांतर जाणाऱ्या अलौकिकाला आपण कधी कधी स्पर्श करतो. नकळत जमिनीवरचे पाय वर उचलले जातात. पण अलौकिकाची पातळी आपली नव्हे, हे भान स्वप्नातून बाहेर यावे तसे आपल्याला येत असते.

लौकिक-अलौकिक, स्वप्न-वास्तव यांच्या सीमारेषांचा हा खेळ म्हणजे ‘रजनीगंधा’. सिनेमाच्या सुरवातीचा प्रसंग पुन्हा आठवा. दीपाला जाणीव होते की ते स्वप्न होते. ती अचानक अनोळखी स्टेशनवर गाडीतून उतरल्याचा तिला पश्चाताप होतो, आणि ती आपली गाडी पकडण्यासाठी पुन्हा धाव घेते. स्वप्नदृश्याचा वापर सगळ्याच अभिजात कलाकृती केला आहे. बुद्धाची माता मायाला पडलेले स्वप्न असो की महान रशियन लेखक लिओ टॉल्सटॉय यांची ‘उमरकैद’ ही एक फार छान कथा आहे, ती आठवते. कथेत नायक प्रवासाला निघतो, त्या रात्री त्याच्या बायकोला एक विचित्र स्वप्न पडते. स्वप्नात त्याचे केस पांढरे झाले आहेत. पुढे त्या घटनेचा एका अलौकिक तत्त्वासाठी टॉल्सटॉयने वापर केला आहे. अदृश्य वास्तव किंवा सामान्य माणसाचे अकस्मात अलौकिकाला स्पर्श करणे अधोरेखित करण्यासाठी स्वप्नाचा असा वापर होतो.

‘रजनीगंधा’ ची सुरवातच स्वप्नाने करून बासूदांनी सिनेमाची सगळी ताकद त्या दृश्यात ओतली आहे, असे मला वाटते.

(लेखक नामवंत समीक्षक व नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाचे विभाग प्रमुख आहेत)

7709012078

 

Previous articleयदुनाथ थत्ते
Next articleकोरोना उपचारासाठी नवीन औषध: 2-Deoxy-D-Glucose
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.