हमीद दलवाई- कट्टर परंपरेविरुद्ध बंड करणारा कार्यकर्ता

हमीद दलवाई हे मुस्लिम समाजातील सुधारणावादी सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांच्या काळात त्यांनी केलेलं काम क्रांतिकारक स्वरूपाचं होतं.  त्यांच्या ४२ वा स्मृतिदिनानिमित्ताने त्यांच्या कर्तृत्वाची नव्याने उजळणी झाली . ५० वर्षापूर्वी नवल वाटावे असे काम करणाऱ्या दलवाई यांच्याबाबत त्यांच्या निधनानंतर नामवंत विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेला हा लेख प्रत्येकाने वाचावा असा आहे.

……………………………………………………………………

हमीद दलवाई
हमीद दलवाई यांच्या निधनाला ३ मे १९७८ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. ३ मेला त्यांची प्रथम पुण्यतिथी येत आहे. या योगाचे निमित्त करून मुस्लिम राजकारणाचे विवेचन करणारी दलवाईंची एक जुनी पुस्तिका व अगदी शेवटच्या दिवसांतील त्यांची एक मुलाखत पुन्हा एकत्र करून पुनर्मुद्रित करण्यात येत आहे. दलवाई हे नानाविध कारणांनी आपली कर्मठ धर्मश्रद्धा टिकवून ठेवणाऱ्या मुस्लिम समाजात उदयाला आलेले लोकविलक्षण धडाडीचे आणि आपल्या लोकप्रियतेचा कोणत्याही क्षणी होम करण्यास तयार असलेले कार्यकर्ते होते. आधुनिक भारतीय राजकारणाच्या इतिहासात दलवाईंच्या इतका मूलगामी चिंतन करणारा निर्भय विचारवंत दुसरा नाही. महात्मा फुले यांच्या काळात त्यांचे कार्य जितके अवघड होते, त्यापेक्षाही दलवाईंचे काम काही बाबतीत अधिक कठीण होते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली तर दलवाईंना त्यांच्या समाजातून फार मोठा प्रतिसाद कधीच का मिळू शकला नाही, यावर थोडासा प्रकाश पडेल. महात्मा फुले आणि हमीद दलवाई यांना समोरासमोर ठेवून विचार करताना माझ्यासमोर त्यांची तुलना करणे हा हेतू नाही. माझा हेतू अगदी मर्यादित आहे. आणि तो म्हणजे, मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजात दलवाईंना पाठिंबा मिळण्यास अडचण कोणती आली, या बाबींकडे लक्ष वेधणे. तेवढ्या सीमित प्रश्नापुरताच हा मुद्दा विचारात घ्यायचा आहे.

महात्मा फुले यांचा काळ कितीतरी जुना. जवळजवळ एका शतकाचे अंतर दोघांच्यामध्ये आहे. फुले यांच्या काळी हिंदू समाज आजच्या मानाने कितीतरी रूढीप्रिय, अंधश्रद्ध आणि परंपरावादी होता. पण हिंदू समाजाची रचना व जडण-घडण पुष्कळशी विस्कळित आणि विविधतेला वाव देणारी अशी आहे. वेगवेगळ्या जातीजमाती, चालीरीती, परस्परविरोधी (भिन्नभिन्न) विचार हिंदू समाजात नेहमीच वावरत आले. सुसंघटित व एक ग्रंथाचे प्रामाण्य मानणारा असा हिंदू समाज नव्हता; आजही नाही. विचार मांडण्याच्या बाबतीत खूप मोठे स्वातंत्र्य हिंदू समाजात राहत आले आणि सर्व विचारांना माना डोलवीत त्याच वेळी चिवटपणे आपला परंपरावाद जतन करण्याची हिंदू मनाची शक्तीही फार अफाट आहे. आजही महात्मा फुले यांचा पुरस्कार व जयजयकार करीत परंपरावाद जतन करण्याची मनोवृत्ती हिंदूंच्यामध्ये दिसते. महात्मा फुल्यांचे पुतळे उभे करणे, आपले महान नेते म्हणून त्यांना लक्ष अभिवादन करणे आणि आपले बुरसटलेले मन तसेच जतन करून ठेवणे, हे हिंदूंना अजिबात कठीण वाटत नाही. मुस्लिम समाज यापेक्षा निराळा आहे.

मुस्लिम समाजातही शिया-सुन्नींच्यासारखे मतभेद आहेत. त्याहून थोडे दूर असणारे अहमदियाही आहेत. पण हा फरक फारसा नाही. एक प्रेषित, एक धर्मग्रंथ यांमुळे आणि जवळपास एक असणाऱ्या कायद्यामुळे मुस्लिम धर्माचे स्वरूप हिंदूंच्या मानाने कितीतरी सुसंघटित आहे, आणि विचारस्वातंत्र्याची त्यांची परंपराही मर्यादित आहे. प्रेषित, कुराण आणि परंपरा यांचा मला परिपूर्ण पाठिंबा आहे असे मानणाऱ्या दोन माणसांत जितका मतभेद असू शकतो, तितकेच विचारस्वातंत्र्य मुस्लिम समाजात असे. एक विचार जाहीर रीतीने मान्य करायचा, तो विचार मांडणारा आपला नेता समजायचा व तरीही परंपरावादी मन जतन करायचे, असा दुटप्पीपणा मुस्लिम समाज फारसा पेलू शकत नाही. आचार-विचारस्वातंत्र्य यांची परंपरा नसणाऱ्या या समाजात दलवाई उदयाला आले होते. त्यामुळे फुले यांच्यापेक्षा त्यांच्या समोरच्या अडचणींचे स्वरूप उग्र होते, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे.

दुसरी बाब अशी की, आपला पराभव झाला, आपले राज्य गेले त्या अर्थी आपल्या परंपरेतच काही मूलभूत चूक आहे, असे मानण्यास हिंदू समाज क्रमाने शिकत होते. आपल्या धर्माची, परंपरेची कठोर चिकित्सा करणारे लोक फुले यांच्या शेजारी होते. लोकहितवादी या मंडळींत सर्वांत महत्त्वाचे. आपला पराभव झाला, कारण आपल्या धर्मात, आपल्या परंपरेत, आपल्या समाजरचनेत काहीतरी उणिवा आहेत, असे मानण्याकडे हिंदू विचारवंतांचा कल दिसतो. म्हणून परंपरेच्या चुका दाखवणारा विचारवंत हिंदू समाजात आचारांचा मार्गदर्शक होत नसला तरी सभ्य ठरतो. मुस्लिम समाजालासुद्धा इंग्रजी राजवट आल्यामुळे आपला पराभव झाला, असे वाटतच होते. पण या पराभवाचे कारण आपल्या धर्मात अगर परंपरेत काही चूक आहे असे त्यांना वाटत नसे. आपला धर्म व परंपरा निर्दोष आहेत; पण या धर्मावर मुसलमानांची श्रद्धा पुरेशी बळकट नाही म्हणून आपला पराभव होतो असे या समाजातील नेत्यांना वाटे. इंग्रजी विद्या व ज्ञान यांविषयी आस्था असणारे सर सय्यद अहमदखानसुद्धा आधुनिक शिक्षणाचा पुरस्कार करतात; स्त्रियांच्या शिक्षणाचा पुरस्कार करतात, पण यापुढे जाऊन इस्लामची चिकित्सा ते करत नाहीत. ग्रंथप्रामाण्य झुगारून देऊन चिकित्सा करणारे पहिले मुस्लिम हमीद दलवाई हेच होत. दलवाईंची चिकित्सा ही नेहमीच मुसलमानांच्या हिताला बाधक आहे, असे त्यांच्या समाजाला वाटत आले. मुस्लिम समाजातील विचारवंतांचे मनच धर्माच्या चिकित्सेला फारसे तयार नसते. आजही ते तयार नाही. मुस्लिम समाजात राजकीय पराभव विचारवंतांना अधिक कर्मठ आणि परंपरावादी होण्याची प्रेरणा देतो, ही दलवाईंच्यासमोर दुसरी अडचण होती.

आमच्या देशातील पुरोगामी राजकारणाची एक शोकांतिका आहे. महात्मा फुले यांच्या काळी फुले यांच्या प्रयत्नाला इंग्रजांनी फार मोठा पाठिंबा दिला नसला तरी त्यांचे शाब्दिक कौतुक केले. त्यांच्या उपक्रमास गौरवपूर्वक सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. त्यांच्यावर इतरांना सरळसरळ आक्रमण करता येऊ नये याची शासनाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काळजी घेतली. दलवाईंच्या बाबतीत असे घडले नाही. पारतंत्र्याच्या काळात, इंग्रजांनी हिंदू-मुस्लिम मतभेदाचा फायदा घेऊ नये म्हणून मुसलमानांच्याविषयी फारसे बोलायचे नाही, होता होईतो त्यांच्या कर्मठपणाला पाठिंबाच द्यायचा, अशी आमच्या नेत्यांची पद्धत राहिली. पुरोगामी राजकीय नेता हिंदू समाजातील असेल तर तो हिंदू समाजातील परंपरावादावर कडाडून हल्ला करी; पण मुस्लिम समाजातील सर्व परंपरावाद मात्र सांभाळून घेई. मुस्लिम समाजातील कोणताही पुरोगामी नेता आपल्या धर्मपरंपरेवर काही टीका करण्यास धजावतच नसे. इस्लाममध्ये लोकशाही आहेच, इस्लाममध्ये समाजवाद आहेच, असे काहीतरी बोलून आपण इस्लामच सांगतो आहोत, असा आव हे नेते आणीत. स्वातंत्र्योत्तर काळात मते फुटू नयेत म्हणून मुसलमान समाजातील सर्व परंपरावाद जतन करण्याची चढाओढ आपल्या राजकीय पक्षांत सुरू झाली. काँग्रेस तर सोडाच, पण ज्या राजकीय पक्षाशी दलवाईंचा निकट संबंध होतो, तो समाजवादी पक्षसुद्धा दलवाईंना निवडून येण्यासाठी तर सोडा, पण पडण्यासाठीसुद्धा तिकीट देण्याची हिंमत दाखवू शकला नाही!

भारतीय कम्युनिस्ट पक्ष हमीद दलवाईंना हिंदू जातीयवादी आणि अमेरिकन साम्राज्यवादी यांचा हस्तक समजत असे. त्यामुळे ‘धर्म ही अफूची गोळी’ मानणाऱ्या त्या पुरोगामी क्रांतिकारक पक्षाला दलवाईंच्या निषेध करण्यापलीकडे कधी विचार करावासा वाटला नाही! काँग्रेस पक्षाचा पाडाव झाल्यामुळे गेल्या वर्षापासून ही परिस्थिती बदलली आहे, असे समजण्याचे कारण नाही. मुस्लिम समाजातील सर्व परंपरावाद जिव्हाळ्याने जतन करण्याचे काम जनता पक्ष अतिशय चोखपणे व काँग्रेसइतक्याच उत्साहाने पार पाडीत आहे! शासन प्रतिकूल, राजकीय पक्ष प्रतिकूल, यांमुळे तर दलवाईंचे कार्य अधिकच बिकट झाले.

महात्मा फुले यांच्यापेक्षा दलवाईंचे कार्य अधिक बिकट होते, तरीही त्यांना मुस्लिम समाजातील तरुण कार्यकर्त्यांचा एक गट आपल्या अल्पशा आयुष्यात स्वतःभोवती गोळा करता आला. मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि अमरावती अशा वेगवेगळ्या ठिकाणी मिळून तीन-चारशे स्त्री-पुरुष तरुण कार्यकर्ते पाहता पाहता दलवाईंभोवती गोळा झाले. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत इतके कार्यकर्ते दलवाईंना मिळाले, हेच आश्चर्य आहे. हा प्रपंच मुद्दाम नोंदवण्याचे कारण हे की, हमीद दलवाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या मित्रांनीसुद्धा त्यांच्याविषयी लिहिताना दोन गोष्टींचा वारंवार उल्लेख केलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे, दलवाईंना मुस्लिम समाजात फारसा पाठिंबा कधीच मिळाला नाही! आणि दुसरे म्हणजे, आयुष्याच्या अखेरीला दलवाई मुस्लिम समाजापासून तुटून पडलेले होते. दलवाईंच्या कार्यातील अडचणी लक्षात घेता खऱ्या आश्चर्यकारक गोष्टी दोन आहे. पहिली आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांना आजारी पडून मरण्याची संधी मिळाली; त्यांना हुतात्मा व्हावे लागले नाही. त्याहून अधिक आश्चर्याची दुसरी गोष्ट म्हणजे तेराशे वर्षांच्या परंपरेविरुद्ध बंड करणाऱ्या या बंडखोराला पाहता पाहता तीनशे-चारशे अनुयायी मिळाले!

दलवाईंना मुस्लिम समाजात फारसा पाठिंबा कधीच नव्हता; तो असणारही नव्हता, हे अगदी उघड आहे. मुस्लिम समाजातील सर्व राजकीय नेते प्रामुख्याने दलवाईंना विरोध करत होते. दलवाईंनी अतिरेकी भूमिका घेतलेली होती, म्हणून मुस्लिम समाज त्यांच्या मागे गेला नाही, हे म्हणणे खरे नाही. दलवाईंनासुद्धा महान विचारवंत म्हणून किर्ती मिळवण्याची इच्छा नव्हती. त्यांना समाजपरिवर्तनाचे आंदोलन अधिक प्रिय होते. महंमद पैगंबर आणि कुराण यांबाबत चर्चा करून दररोज समाजाचे मन दुखवावे आणि पुरुषार्थ मिरवावा असे त्यांनाही वाटत नव्हते. दलवाई स्वतः नास्तिक आणि अश्रद्ध होते; पण मुस्लिम समाजाने नास्तिक व अश्रद्ध असलेच पाहिजे, असा त्यांचा आग्रह नव्हता. समाजाचे आमूलाग्र परिवर्तन होणे आवश्यक आहे, इतके मान्य असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आरंभ म्हणून कोणताही एक छोटासा कार्यक्रम घ्यावा आणि सुधारणेसाठी समाज तयार करावा हे दलवाईंना मान्य होते.

इस्लामवरील श्रद्धा, पैगंबरांवरील श्रद्धा, इस्लामच्या धार्मिक व राजकीय इतिहासावरील श्रद्धा या सर्व चर्चा बाजूला सारून तलाकपीडित महिलांचा प्रश्न हाती घेऊन सामाजिक आंदोलन करायला ते तयार होते. पण दलवाई अतिरेकी जरी नसले तरी सुधारणेचा लहान अगर मोठा कोणताच कार्यक्रम स्वीकारून मुस्लिम मन ढवळण्यास त्या समाजातील कार्यकर्ते तयार नव्हते. कोणत्याही प्रकारचा बदल मान्य न करता आपला परंपरावाद जतन करीतच आपण राहू; तेच आपल्या सोयीचे आहे, असे नेते समजत आणि या सेक्युलॅरिझमच्या सर्वद्रोही नेत्यांना हिंदू पुरोगामी नेते नेटाने पाठिंबा देत. मग दलवाईंना मुस्लिम समाजात फारसा पाठिंबा मिळू नये ही परिस्थिती बदलणार कशी?

माझा आणि दलवाईंचा अगदी आरंभापासून म्हणजे मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापन करण्याच्या काही वर्षे आधीपासून संबंध होता. दलवाईंनी मुस्लिम तरुणांना व कार्यकर्त्यांना पुनःपुन्हा हे सांगण्याचा प्रयत्न केला की, आपण एखाद्या छोट्या प्रश्नापासून आरंभ करू. एकदा तर ते असे म्हणाले की, बाकी सगळे सोडा, आपल्या सर्व सभा जन-गण-मन या राष्ट्रगीताने संपल्या पाहिजेत, इतक्या मुद्द्यावर तरी तुम्ही आंदोलन करायला तयार आहात काय? पण त्यालाही कुणी फारसा प्रतिसाद दिला नाही. आपल्या विजयाचा एके काळचा इतिहास सदैव स्मरणात जागता ठेवणाऱ्या परंपरावाद्यांना परिवर्तनाच्या कार्यक्रमाचा प्रत्यक्षात उतरू शकेल असा कोणताही प्रामाणिक आरंभच नको होता.

तरीही दलवाईंना आरंभाला दहा-वीस कार्यकर्ते मिळालेच. दरसाल हे कार्यकर्ते वाढतच जात होते. तलाकपीडित महिलांच्या परिषदा हळूहळू सर्वत्र भरू लागल्या. आरंभी या परिषदांना पंधरा-वीस मुस्लिम महिला जमणे कठीण होते; पण गेल्या डिसेंबरात अमरावती येथे भरलेल्या तलाकपीडित महिलांच्या परिषदेला संचालकांच्या अपेक्षेच्या बाहेर इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की पुरुष प्रेक्षकांना हॉल रिकामा करून द्यावा लागला! हे चित्र क्रमाने प्रतिसाद वाढत आहे, याचे आहे.. दलवाईंचा विचार क्रमाने समाजात रुजतो, पाझरतो आहे, याचे चित्र आहे. दलवाई समाजातून तुटून बाजूला गेले याचे हे चित्र नाही.

आपण स्वतःच्या मनाशी विचार करतो त्या वेळी सतत एक प्रश्न विचारला पाहिजे की, गुलाम राष्ट्रातील स्वातंत्र्यलढे पुनःपुन्हा पराभूत होतात म्हणून गुलामगिरी अमर राहील असे आपण मानणार आहोत काय? दहा उठाव फसतील, पण शेवटी संपणार आहे ती गुलामगिरी. स्वातंत्र्याची आकांक्षा संपत नसते. आज बोहरी समाजात धर्मगुरूंच्या विरुद्ध आंदोलन चालू आहे. अजून धर्मगुरूंचीच अधिसत्ता समाजावर चालते. पण उद्याचा विजय दाउदी बोहरा समाजाच्या धर्मगुरूंचा असणार नाही; तो स्वातंत्र्य मागणाऱ्यांचा राहील. अतिशय अजिंक्य आणि बलवान असणाऱ्या तटबंद्या कितीही बलवान असोत, त्या शेवटी कोसळत चाललेल्या मावळत्या शक्ती आहेत. या मावळत्या शक्तींचा विजय फार काळ टिकणारा नसतो. मुस्लिम समाजही बदलतच जाणार आहे. तोंडाने ‘नाही नाही’ म्हणत गोषा सोडून बाहेर येणाऱ्या स्त्रियांची संख्या सारखी वाढतच आहे, तिथून वाढतच जाणार आहे. मुस्लिम समाजातही यापुढे नवे विचार वाढतच जाणार आहेत. मुस्लिम समाजातही यापुढे नवे विचार वाढतच जाणार आहेत.

थोडा उशीर लागेल हे मान्य केले तरी अंधश्रद्धा, जळमटलेली मने कायमची गुलाम राहणार नाही. सगळेच हमीद दलवाईंप्रमाणे बंडखोर नसतील; पण कालमानानुसार ‘मुस्लिम पर्सनल लॉ’मध्ये, मुस्लिम समाजात परिवर्तनाची भूक वाढवून दमादमाने बदल घडवून आणावा लागेल, असे म्हणणारे लोक त्याही समाजात तयार होत आहेत. परंपरावाद्यांचे बळ हे शेवटी मावळत्या शक्तींचे बळ असते. दलवाई हा नवा उगवता विचार आहे. दलवाईंच्यावर ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी दलवाईंचा विचार वेगाने पसरत कसा जाईल, याची काळजी घ्यावी. दलवाईंचे चाहते व अनुयायी तो विचार करतीलही, करीतही आहेत. पण उरलेल्यांनी हे लक्षात ठेवावे की पराजय दलवाईंचा होणार नसून परंपरावाद्यांचा होणार आहे. वर्षांची संख्या थोडी वाढेल; पण भवितव्याच्या या दिशेत बदल होण्याची शक्यता अजिबात नाही. ज्या शक्ती कदाचित दहा-वीस वर्षांत विजयी होणार नाहीत, ज्यांना विजयी व्हायला कदाचित शंभर वर्षे लागतील, त्या शक्तीचा पराभव झालेला आहे, असे समजत बसण्यात आपण आत्मवंचनेशिवाय दुसरे काही मिळवत नसतो.

(नरहर कुरुंदकरांचा हा लेख  ‘हमीद’ या पुस्तिकेसाठी लिहिलेला, नंतर तो कुरुंदकरांच्या ‘वाटचाल’ या पुस्तकातही होता. जुलै २०१३मध्ये कुरुंदकरांच्या लेखनाचा पहिला निवडक खंड ‘व्यक्तिवेध’ प्रकाशित झाला. (संपादन – विनोद शिरसाठ. प्रकाशक – देशमुख आणि कंपनी).

Previous articleनिवडणुका नावाचा हा खेळ प्रलोभनांचा ! 
Next articleखरा महाराष्ट्र कसा आहे ?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.