हरिजन सेवा

गांधी कथा -४

सेवाग्राम आश्रमात एका दिवस भल्या सकाळी गांधीजीनी केस कापायच्या मशीनला साफ करून  तेलपाणी दिलं आणि समोर आरसा ठेवून स्वत:चे केस कापायला लागले. साधू बाबांचा भक्त तिकडून जात होता. हे साधूबाबा आश्रमातच रहात होते आणि त्यांचा हा भक्त जातीने न्हावी होता.  शिष्याला बधून साधूबाबा गांधीजींना म्हणाले ” भीमाला केस कापायला सांगा. तो चांगले कापतो. त्याचा व्यवसायच तो आहे.”

गांधीजींनी ठीक आहे म्हणत त्याला बोलावले. भीमाने गांधीजींच्या डोक्यावर मशीन फिरवायला सुरवात केल्यावर गांधीजीनी त्याला विचारले ” माझ्या मते आपल्या हरिजन मंडळींचे केस कापायला तुला कोणती अडचण नसेल ना?”

भीमा अडखळत म्हणाला ” मनात तसं काही वाटत नाही.”

बापू म्हणाले ” ते मला माहीत आहे. जसे माझे केस कापतोयस तसेच तू इतर हरीजनांचे कापशील ?”

तो पुन्हा अडखळला. गांधीजीनी साधू महाराजांना सांगितले ” मला असं वाटलं की याला माझे केस कापायला द्यायच्या आधी तुम्ही याची माहिती काढली असेल.”

साधू महाराज म्हणाले ” लक्षात नाही आलं त्यावेळी.”

गांधीजी म्हणाले ” तर मग आता मला यावर विचार करायला लागेल की केस कापणं अर्ध्यावरच थांबवून भीमाला जायला सांगावं.”

भीमा न राहवून म्हणाला ” नका करू असं. मी सहसा हरीजनांचे केस नाही कापत. पण आता तुम्हाला वचन देतो . आजपासून त्यांच्याशी भेदभाव करणार नाही. ”

……………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………

गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत असतानाच आपल्या जवळचं सर्वकाही आश्रमाला देउन टाकलं होतं. भारतात परतल्यावर वडिलोपार्जित मालमत्तेवरील वारसाहक्काचा त्यांनी त्याग केला होता. सर्वस्व देउन ते निष्कांचन बनले होते. ते स्वता:च्या व्यक्तिगत खर्चासाठी कोणाही कडून पैसे घेत नसत. खरं तर त्यांना व्यक्तिगत असा काही खर्चच नव्हता. गोकीबहन नावाची गांधीजीची विधवा बहीण होती. तिची संसाराची काही सोय व्हावी म्हणून त्यांनी आपले जुने मित्र डॉ.मेहता यांना तिला दरमहा दहा रुपये पाठवायला सांगितले. डॉ मेहता पैसे पाठवत असत.

काही दिवसांनी गोकी बहनची मुलगी विधवा होवून आईकडे माहेरी परतली. महिन्याला दहा रुपयात दोघींचे भागणे कठीण झाले. बहिणीने गांधीजींना लिहीले ” आता खर्च वाढलाय. पैसे पुरत नाहीत म्हणून आम्हाला शेजाऱ्यांचे दळण दळून देउन भागवावे लागत आहे.”

गांधीजीनी उत्तर दिले ” दळण दळणे खूप चांगलं असतं. दोघींची तब्येत चांगली राहील. आम्ही इथे आश्रमात सुद्धा दळण दळतो. तुला जेव्हा वाटेल त्यावेळी हक्काने आश्रमात या आणि जमेल तेवढी जनसेवा करा. जसे आम्ही राहतो तसंच तुला राहावं लागेल. मात्र घरी मी काहीही पाठवू शकत नाही किंवा मित्रांनाही सांगू शकत नाही.”

लोकांची दळणे दळून मोलमजुरी करणाऱ्या बहिणीला आश्रमाचं जीवन कठीण नव्हते. मात्र आशामात हरिजन रहात होते. ही जुन्या वळणाची माणसे त्यांच्या सोबत रहाणं, जेवणं कसं करू शकणार ? ती बहीण आली नाही. गांधीजीनी सुद्धा तिच्यासाठी पैशाची व्यवस्था केली नाही.

सौजन्य – विजय तांबे

Previous articleआयबीएन लोकमतच्या राजीनाम्याची गोष्ट
Next articleगांधींची भाषा : लिखाण, विचार आणि कृतीतील – डॉ . गणेश देवी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here