हा डाव उधळायला हवा!

– संजय आवटे
—————————

‘हिंदू आणि मुस्लिम’ अशी आपल्याच माणसांची विभागणी करण्याचे प्रयत्न सध्या वेगाने सुरू आहेत. वारिस पठाण एकटाच नाही. हिंदूंना मुस्लिमांचे, तर मुस्लिमांना हिंदूंचे भय वाटावे, असे प्रयत्न जोर धरत आहेत.

आणि, त्याचवेळी ‘शिक्षणामुळे घटस्फोट वाढतात’, असे मोहन भागवत म्हणताहेत. ‘मुलींनी बापालाही मिठी मारू नये’, ‘नव-याला चहा देतानाही हात थरथरायला हवेत’, अशी अपर्णा रामतीर्थकरांची विधानं पुन्हा वाजवली जाताहेत. पुढे जात असलेल्या मुलींना रोखले जातेय.

या सगळ्या घटनाक्रमात एक सूत्र आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

जातपितृसत्ताक व्यवस्थेचा हा डाव आहे.

म्हणजे, ब्राह्मणी व्यवस्थेचा डाव आहे. त्याचा ब्राह्मण जातीतील कोणाशी काही संबंध नाही. ज्ञानेश्वरांपासून ते आगरकर – कर्वे- दाभोलकरांपर्यंत अनेकांना ज्या व्यवस्थेने संपवण्याचा प्रयत्न केला, ती ही व्यवस्था.

आमचे मित्र दिलीप चव्हाण त्यांच्या ‘जातीअंताची दिशा’ या पुस्तकात म्हणतात त्याप्रमाणे: परधर्मद्वेषावर राष्ट्रवादाला उभे करून जातपितृसत्तेला गोंजारणारा हा राष्ट्रवाद आहे.

दुस-या धर्माच्या द्वेषावर आधारलेला राष्ट्रवाद विकसित करायचा अणि या धामधुमीत धर्माची मांडणी आपल्या सोईने करत न्यायची.

जातसत्ताक आणि पितृसत्ताक ही एकाच व्यवस्थेची दोन तोंडे आहेत, हे लक्षात न आल्याने आपली मोठी गफलत झाली. या दोन चळवळी त्यामुळे सुट्या झाल्या आणि प्रस्थापित व्यवस्थेच्या लाभार्थ्यांनीही त्या चळवळींचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच, जातसत्ताक व्यवस्थेची पाठराखण करणा-यांनी पितृसत्तेला आव्हान देण्याचा भ्रामक प्रयत्न केला किंवा उलटेही घडले. जातीचा प्रश्न आणि स्त्रियांचा प्रश्न याचे मूळ एकाच व्यवस्थेत आहे, हे भान सुटल्याने व्यवस्थेला आव्हान देता आले नाही.

पितृसत्तेला धोका निर्माण झाला की जातव्यवस्था संपते आणि जातव्यवस्था संपली की आपल्या सोईचा धर्म संपतो. म्हणून स्त्रिया कितीही पुढारल्या, तरी त्यांनी व्यवस्थेला हादरे देऊ नयेत, असा प्रयत्न या व्यवस्थेचा दिसतो.

गम्मत अशी आहे की, मोहन भागवत आणि त्यांच्या ‘लष्कर- ए- होयबा’तील जवानांनी जेवढी आंतरजातीय लग्नं केलीत, तेवढी शिवराय- शाहूंचा जयजयकार करणा-यांनीही केली नसतील! फुले- आंबेडकरांचा उद्घोष करणा-यांच्या घरातही नसेल असे, स्त्रियांसाठी खुले वातावरण कदाचित रामतीर्थकरांच्या घरात दिसेल. पण, व्यवस्था म्हणून मात्र जातपितृसत्तेला कोणी आव्हान देता कामा नये, ही ती व्यूहरचना आहे. कडव्या इस्लामवाद्यांची भूमिकाही यापेक्षा वेगळी नाही. पाकिस्तानला इस्लामी राष्ट्र बनवणारे जिना व्यक्तिगत जगण्यात किती आधुनिक होते, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. बेनझीरपासून ते इम्रानपर्यंतही असे सांगता येईल. पण, जाहीरपणे त्यांची मांडणी काय? अमेरिकेच्या आधी पाकिस्तानात आणि बांग्लादेशातही महिला राष्ट्राध्यक्षा झाल्या, पण म्हणून तिथे महिलांना ‘स्पेस’ आहे, असे कोण म्हणेल?

स्त्री आपली वाहक आहे, हे व्यवस्थेला माहीत आहे!

त्यामुळे,’हिंदू’ वा ‘मुस्लिम’ फक्त दाखवण्याचे शत्रू. पितृसत्ता अबाधित राखण्याचा हा डाव आहे. आणि, तिथे कडवे हिंदुत्ववादी आणि कडवे इस्लामवादी दोघेही सोबत आहेत.

स्वतः भंगीकाम करणा-या, आंतरजातीय लग्नांना प्रोत्साहन देणा-या; तसेच महिलांना घराबाहेरच्या लढाईत उतरवणा-या गांधींचा नथु-रामतीर्थकरांनी खून केला, कारण ही व्यव्यस्थाच गांधी उधळू पाहात होते. ‘मी सनातन हिंदू आहे’, असे गांधींनी सांगितले खरे, पण प्रत्यक्षात मात्र जातपितृसत्तेला गांधींनी हादरा दिला.

सध्याच्या या सांस्कृतिक राष्ट्रवादाकडे अशा अंगानेही पाहावे लागते.

(लेखक ‘दिव्य मराठी’ चे राज्य संपादक आहेत)

[email protected]

Previous articleगोविंद पानसरे : डोंगराला भिडणारा म्हातारा
Next articleडिजीटल कंटेंटसाठी हवेत नवीन निकष
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here