हिंदू कट्टर होतोय याला पुरोगामी जबाबदार!

– समीर गायकवाड

हिंदुत्ववाद्यांवर पुरोगामी वा उदारमतवादी लोकांना मात करायची असेल तर त्यांनी आधी हिंदू धर्म, हिंदुत्व आणि हिंदूत्ववाद यांची खिल्ली उडवणे बंद करावे लागेल.
कोणत्याही धर्माच्या कट्टरतावादापासून वा कडवटतेपासून कुणास परावृत्त करायचे असेल तर त्याचे आधी मतपरिवर्तन होईल यासाठी आधी काम करावे लागते. तसे करण्याऐवजी त्याच्या विचारधारणांची खिल्ली उडवणे सुरु झाले की व्यक्ती अधिक वेगाने कट्टरतावादाकडे झुकू लागतो.

उदाहरणार्थ – गोमुत्र उपयुक्तता, गोरक्षणवाद या घटकावरून मध्यंतरी देशभरात धुडगूस सुरु असताना बहुतांश पुरोगामी – उदारमतवादी त्यांची टवाळकी करत होते. अशा वेळी या घटकांविषयी मनात आत्मीयता असलेला वर्ग अनपेक्षितपणे कट्टरतावादयांकडे ओढला जातो. कारण त्याच्या धारणा दुखवल्या जातात. अशा वेळी या घटकातील फोलपणा दाखवणाऱ्या विचार – आशयास प्राधान्य द्यायला हवे होते ते झाले नाही. परिणामी धार्मिक उजव्या विचारसरणीच्या लोकांची सरशी होत गेली. किंबहुना यामुळेच कडव्या धार्मिक विचारांच्या संघटना, पक्ष यांचे संगोपन होत गेले. एमआयएमचे अस्तित्वही याच सिद्धांतास अनुसरून वाढत गेले आहे. श्रीरामसेनेपासून ते सनातनपर्यंत आणि मिल्लीपासून ते शिवसूर्यजाळापर्यंतचे अनेक दाखले देता येतील.
सध्याच्या सरकारच्या हिंदुत्ववादाबद्दलच्या धारणा पक्क्या आहेत. त्यांच्या अनेक राजकीय – प्रशासकीय धोरणांवर लोकांची नाराजी आहे, ही धोरणे मोठ्या प्रमाणावर फसून देखील सरकारला मते देणाऱ्यांची संख्या त्या प्रमाणात अजिबात कमी होताना दिसत नाही याचे मूळ या समस्येत आहे.

उजव्या विचारसरणीचे तोटे, त्यातला फोलपणा आणि इतिहासाशी त्याची सुयोग्य सांगड घालून वर्तमान बदलताना भविष्यात काय वाताहत होऊ शकते व कशी होऊ शकते हे ठसवणे गरजेचे आहे. तथापि असे विचारपूर्वक व नियोजनपूर्वक कुठे होताना दिसत नाही. कोणत्याही संघटना, पक्षप्रणाली, संस्था या विषयाला अनुसरून अशा पद्धतीचा कालबद्ध आराखडा नेमून त्याबर हुकुम काम करताना दिसत नाहीत. जोवर हे होत नाही तोवर उजव्या विचारसरणीचा पराभव केवळ विकास व प्रगतीच्या मुद्द्यावर होणे नजीकच्या काळात होणे नाही.
हिंदू म्हणून असलेल्या ओळखीबद्दल तुम्ही तिरस्कार व्यक्त करू लागाल, या ओळखीची खिल्ली उडवू लागाल तर बहुसंख्य समाज अस्वस्थ होतो. काहीसा भयभीतही होतो आणि तो कडव्या लोकांकडे वळतो. हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात बुद्धिवाद्यांकडून होणाऱ्या जोरकस प्रचारामुळे अशीच भावना अल्पसंख्यांकांच्या मनातही निर्माण होते व समस्या गुंतागुंतीची होते. स्वातंत्र चळवळीपासून इंदिरा गांधींपर्यंतच्या काँग्रेसच्या नेत्यांना भारतीय मानसिकतेची नेमकी ओळख होती. अल्पसंख्यांकांच अनुनय सुरू असला, तरी हिंदूंच्या आचारविचारांबद्दल तिरस्काराची भावना नव्हती. महात्मा गांधी हे सनातनी हिंदू होते. राजाजींच्या मुलीशी होणारा देवदासचा विवाह धर्मविरोधी आहे काय, ही समस्या त्यांना भेडसावित होती. कारण गांधी वैश्य तर राजाजी हे ब्राह्मण. हा प्रतिलोम विवाह होता. पण हा विवाह धार्मिक परंपरेनुसार आहे हे लक्ष्मणशास्त्री जोशी व त्यांचे गुरू स्वामी कुवलयानंद यांनी शास्त्राधार काढून दाखवून दिले. लक्ष्मणशास्त्री हे वेदातील आचार्य, पण मार्क्सवादाचा त्यांच्यावर प्रभाव होता व नंतर त्यांनी रॉयवादाची दीक्षा घेतली होती.

अशा, म्हणजे धर्मनिष्ठ पण परिवर्तनशील व्यक्तींना काँग्रेसने आपल्यात सामावून घेतले होते. ही मंडळी धर्मात राहून धर्मात सुधारणा करीत होती व त्याला काँग्रेसचे पाठबळ होते. याचे अनेक दाखले देता येतात. मात्र पुढे, डाव्या पक्षांच्या प्रभावाखाली, ही परिवर्तनाची परंपरा खंडीत झाली. डाव्या गटांनी हिंदू शास्त्रे, हिंदू तत्वज्ञान यांचा अभ्यास सोडला. पुरोगामी विचारांशी गाठ हिंदूंच्या मूलतत्वांशी घालून लोकांचा दृष्टिकोन बदलण्याऐवजी कडवट आणि चेष्टेखोर टीका करण्यावर भर दिला. दुसरीकडे निवडणूक निष्ठेपायी काँग्रेसने उघड अल्पसंख्यांकांचा अनुनय सुरू केला. यातून पुरोगामी-उदारमतवादी मूल्यव्यवस्था व बहुसंख्य समाज यांच्यात दरी पडत गेली. “ल्युटेन्स दिल्ली’ व जेएनयूतील पुरोगामी पत्रकारांनी कर्नाटकमधील तरूणांच्या मनात काय खदखदत आहे याचा शोध घ्यावा व हिंदूंच्या भावनांची कदर करावी, असा सल्ला इन्फोसिस’चे माजी संचालक मोहनदास पै यांनी “एनडीटीव्ही’वरील चर्चेत निवडणुकीपूर्वी दिला होता. तो महत्वाचा होता. रिफॉर्मिस्ट लेफ्ट हे व्हिएटनाम युद्धानंतर कल्चरल लेफ्ट झाले व अमेरिकेवरील त्यांचा प्रभाव कमी होत चालला असे लिबरल फिलॉसॉफर रिचर्ड रॉरटी यांनी “अचिव्हिंग अवर कंट्री’* या पुस्तकात म्हटले होते. तसेच भारतात होत आहे. यामुळेच ट्रम्पसारखी व्यक्ती सत्तेवर येईल, असा इशारा त्यांनी १९९८मध्ये दिला होता.
पुरोगामी – उदारमतवादी धारणांना उजव्या विचारांवर विजय हवा असेल तर आधी त्यांच्यात स्वतःमध्ये परिवर्तन होणे अनिवार्य आहे. अन्यथा येणाऱ्या काळात त्यांचीच खिल्ली उडवली जाणे अधिक कॉमन होत जाईल. परिणामस्वरूप त्यांच्या मतांना लोक गांभीर्याने घेणार नाहीत.

– समीर गायकवाड.

Previous articleग्लॅडिएटर्स
Next articleतुझं माझं नातं भाडोत्री असतं तर बरं झालं असतं…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.