हृदयी वसंत फुलतांना…!

कथित संस्कृतीरक्षकांच्या नाकावर टिच्चून आज पुन्हा ‘व्हॅलेंटाईन्स डे’ साजरा होतोय. आज जग इतक्या जवळ आलेय की एकमेकांपासून हजारो किलोमीटर अंतरावर राहत असले तरी कुणीही प्रेमाची अभिव्यक्ती करू शकतो. यामुळे गेल्या काही वर्षांपासून वादग्रस्त ठरलेला हा दिवस आता प्रतिकात्मकरित्याच उरलाय हे सत्य नाकारता येत नाही.

love

कुणाच्या मेंदूला कितीही झिणझिण्या येऊ देत; समाजात प्रचंड खुलेपणा आलाय. प्रेम, शरीरसंबंध, रिलेशनशीप याबाबत तरूण पिढी अगदी प्रॅक्टीकल पातळीवरून विचार करतेय. आधुनिक संपर्काच्या माध्यमांनी खरं तर ‘व्हॅलेंटाईन्स डे’ सारख्या प्रेमदिनातील हवाच काढून टाकली आहे. म्हणजे प्रेमीजनांना मानवी इतिहासातील सर्वाधीक कनेक्टिव्हिटी आता मिळालेली आहे. यामुळे अगदी ‘हर दिन होली…हर रात दिवाली’ याप्रमाणे प्रत्येक क्षणाला कुणीही-कुणालाही प्रपोज करू शकते. मात्र एखादा दिवस हा आपल्या प्रिय व्यक्तीला आपल्या मनातील भावना कळविण्यासाठी ‘राखीव’ असावा यातील काव्य समाजाने ओळखायला हवे. आजच्या पिढीने जीवनाला सर्व बाजूंनी स्वीकारले आहे. खरं तर आपल्या पुर्वजांनीही याचा स्वीकार केला होताच. याचमुळे धर्म,अर्थ आणि मोक्ष यांच्यासोबत ‘काम’देखील जीवनाचा अविभाज्य घटक मानला गेला. यातूनच खजुराहोसारखी मैथुनशिल्पे कोरण्यात आली. हा जीवनाचा संपुर्ण स्वीकारच होता. याचप्रमाणे प्राचीन भारतात वसंतोत्सव आणि मदनोत्सव आदी उत्सवांमधून प्रेमी जनांना भेटण्याची नामी संधी मिळत असे. काही आदिवासी समुदायांनी वेगवेगळ्या माध्यमातून ही परंपरा टिकवून धरली आहे. अर्थात सभ्य नागरी समाजातून ती कधीच हद्दपार झालीये. आता अत्याधुनिक सोशल मीडियामुळे तर भौगोलिक बंधनेही गळून पडल्याने ‘व्हॅलेंटाईन्स डे’ची तशी गरजही नाही. मात्र तसे म्हटले तर केवळ औपचारिकता म्हणून देण्यात येणारी आपट्याची पाने आणि तिळगुळ आपण दसरा आणि संक्रातीला चालवून घेतो. याचप्रमाणे एखादा दिवस प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी असल्यास हरकत काय? असो.

‘व्हॅलेंटाईन्स डे’ निमित्त माझ्या मनात एक प्रश्‍न सहज तरळला. झाले असे की- माझ्या कार्यालयातील संस्कृतीमध्ये गाणी आणि विनोद हे अविभाज्य घटक आहेत. दोन दिवसांआधीच मी ‘व्हॅलेंटाईन्स डे’ निमित्त प्रत्येक सहकार्‍याने त्याच्या आवडीच्या प्रेमगीतांची यादी देण्याचे सांगितले. यातून निवडक गाणी या दिवशी ऐकायचे नियोजन करण्यात आले. लागलीच दोघांनी लिस्ट तयार करूनही दिली. तर काही करण्याच्या तयारीला लागले. माझी स्वत:ची लिस्ट करतांना खूप तारांबळ उडाली. जवळपास प्रत्येक गाण्यात प्रेमाचा भाव असतोच. यामुळे निवडायचे तर कोणते? हा प्रश्‍न मनात आला. लागलीच अनेक गाणी मनात रूंजी घालू लागली. एक गाणे लागलीच ओठांवर आले ते- ‘हृदयी वसंत फुलतांना प्रेमास रंग यावे…’ किती समर्पक आहे नाही! हृदयातील वसंत आणि प्रेम! कुणीही लागलीच रोमांचित झाल्याशिवाय राहत नाही. मात्र प्रेमाचा रंग फक्त हृदयातील आणि अर्थातच आयुष्यातील वसंताशीच निगडीत का असावा? मग अन्य ऋतुंचे आणि आयुष्यातील कालखंडाचे काय?

नि:संशय वसंत ऋतु जसा ऋतुराज म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे तारूण्यदेखील आयुष्यातील वसंतच आहे. आणि प्रेमाशिवाय यौवनाला अर्थ तरी काय? प्रत्येकाच्या यौवनात कुठे तरी नाजूक गुंतणे असतेच. अगदी ‘वो जवानी जवानी नही…जिसकी कोई कहानी ना हो’ याप्रमाणे. मात्र याच्या पलीकडे काय? निव्वळ आठवणी? अगदी आटपाट नगरातल्या बाळबोध कथांपासून ते लोककथा-गीते, कथा-कादंबर्‍यांमार्गे रूपेरी पडद्यावर गाजलेल्या सर्व प्रेमकथांचा शेवट हा नायक-नायिकेचे मिलन वा कायमची ताटातुट हाच का असावा असा प्रश्‍न आपल्या मनात कधी पडत नाही. कधी कोणत्या कलाकृतीत संपुर्ण आयुष्य एकमेकांच्या निस्सीम प्रेमात व्यतीत केलेल्यांचे वर्णन येत नाही. प्रेमातील शोकांतिकेला संपुर्ण जगात सन्मान मिळतो. आयुष्यात कधी एकमेकांना भेटू न शकणार्‍या प्रेमी जीवांना त्यांच्या मृत्युनंतर समाज डोक्यावर घेतो. त्यांच्या गाथा युगानुयुगे सांगितल्या जातात. खरं तर मनुष्य प्राणीच भंपक आहे. मानवाला आध्यात्मिकता आणि नितीनियमांचे धडे देणार्‍या धर्माच्या नावावर जगाच्या इतिहासात सर्वाधीक अधर्म झालाय. त्याचप्रमाणे जगात प्रेमाला सन्मान आहे प्रेमिकांना नाही. यामुळे त्यांना हेटाळणीने पाहिले जाते. धर्म,वर्ण,भाषा,संस्कृती,प्रांत, वर्ग, जाती आणि श्रीमंत-गरीब यांच्या भेदाभेदांमध्ये आजवर कोट्यवधी जीवांची होरपळ झालीय. मात्र समाजाला याचे काय? त्यांना मरणारा कवटाळणारे प्रेमी आदर्श वाटतात. त्यांच्यावर कथा-कविता रचण्यात येतात. मात्र आपल्या भोवती प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी धडपडणार्‍यांना कठोर नितीनियमांचे पालन करावे लागते. यासाठी धर्म आणि संस्कृतीचे ठेकेदार डोळ्यात तेल घालून तयार असतात. त्यांना चकवत तरूणाई आपापल्या परीने प्रेमाची अभिव्यक्ती करतेच.

तसे प्रेमात पडणे फार सोपे आहे. हा म्हटलं तर थोडा तारूण्यातील ‘केमिकल लोचा’ आणि स्वप्नाळू वयातील विभ्रमांचे मादक मिश्रणच आहे. नजरेला नजर भिडते…थेट ह्दयात शिरते. मग सुरू होते तगमग व्यक्त करण्याची! कसातरी यातूनही मार्ग काढला जातो. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत प्रेमी जनांचे मिलन होते हा चित्रपटासाठी ‘दि एंड’ असला तरी त्या प्रेमींच्या आयुष्याची तर सुरवातच असते. मात्र असे काय होते की, एकमेकांच्या विरहाने उसासे सोडणारेच आपल्याला भावतात? अन् एकमेकांच्या साथीने आत्यंतिक प्रेमात जीवन व्यतीत करणार्‍यांचे समाजाला काही एक देणेघेणे नसते. म्हणजे पुन्हा तोच मुद्दा. मिलनाआधीचे प्रेम खरे की काळाच्या कसोटीवर टिकणारे? कुठेतरी वाचलेय. एका गरीब तरूणाचा राजकुमारीवर जीव जडतो. राजकुमारीदेखील त्याच्यासोबत प्रेमाच्या आणाभाका घेत त्याच्याशीच विवाह करण्यावर अडून बसते. राजा बिचारा हैराण होतो. अखेर त्याचा चतुर प्रधान यातून मार्ग काढतो. यानुसार ते दोघे प्लॅन शिजवतात आणि त्या तरूणाला बोलावण्यात येते. राजा त्या दोघांना सांगतो की, तुमचे दोघांचे लग्न लावण्यात येईल. अट फक्त एकच आहे की एका झाडाच्या भोवती तुम्हाला दोघांना दहा दिवस बांधून ठेवण्यात येईल. तेथेच तुम्हाला जेवण-पाणी देण्यात येईल. तुमच्यावर दुरवरून पहारा ठेवण्यात येईल. अर्थातच दोघे याला अत्यानंदात होकार देतात. ते म्हणतात की ‘‘आपण प्रेमाच्या गप्पागोष्टी करत सहज दहा दिवस पार करू.’’ मात्र काही तासांतच त्यांना एकमेकांचा कंटाळा येऊ लागतो. ते कसेबसे दहा दिवस थांबतात. जेव्हा त्यांचे दोरखंड सोडण्यात येतात तेव्हा राजा त्यांच्या विवाहाच्या तयारीचे आदेश देतो. मात्र ते दोन्ही एकमेकांशी विवाह करण्यास ठाम नकार देत अक्षरश: पळ काढतात. कारण त्या दहा दिवसांतच त्यांच्यातील विभ्रमाचे जाळे तुटून सत्यस्थिती दोघांनाही उमगते. आपण समजत होतो त्यापेक्षा समोरचा व्यक्ती वेगळाच असल्याचे त्यांच्या लक्षात येते. याचप्रमाणे प्रेम होणे आणि नंतर साथीदारासोबत प्रेमपुर्ण जीवन व्यतीत करणे यांच्यात विलक्षण फरक आहे.

खरे प्रेम हे प्रेमी एकत्र आल्यावर संपत असेल तर उरते काय? फक्त आठवणी, स्मरणरंजनातील काव्य? मग सहजीवनातील प्रेम, आपुलकी, सामंजस्य, सुखदु:खात दिलेली साथ यांना काहीच महत्व नाही? लोणचे हे जसे मुरल्यानंतरच लज्जतदार लागते. याचप्रमाणे आयुष्यातील खाचखळग्यांमधून जात परिपक्व झालेल्या प्रेमाचाही सन्मान व्हायलाच हवा. मग आयुष्यातील वसंतासमान रसरशीत आणि चैतन्यदायी तारूण्य असो की, ‘विरलेली स्वप्ने आणि थकलेली गात्रे’ अशी स्थिती! प्रेमात पडणे अर्थात ‘फॉलिंग इन लव्ह’ फार सोपे असले तरी उर्वरित आयुष्य ‘बीईंग इन लव्ह’ खूप कठीण आहे. यामुळे आज प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी दिवस आहे तर मग प्रेमिकांच्या सन्मानासाठी काही तरी तरतुद हवी का नको? किंबहुना दीर्घ काळापर्यंत गहन प्रेमात असणार्‍यांनीही कोणता तरी दिवस साजरा करण्यासही हरकत नसावी. रूढ अर्थाने प्रेमात पडणारे व प्रेमविवाह करणारेच नव्हे तर पारंपरिक पध्दतीने विवाहबध्द झालेली वा विवाहाची औपचारिकताही पुर्ण न केलेली अनेक जोडपीदेखील एकमेकांच्या निस्सीम प्रेमात असतात. त्यांच्याही सन्मान व्हायलाच हवा. अर्थात यासाठी कथा-कवितांमधील काल्पनिक प्रेमाला सन्मान आणि प्रत्यक्ष प्रेमाचा द्वेष अशी दुटप्पी भुमिका आपण सोडायला हवी. ग्लास अर्धा भरलेला म्हणा की; अर्धा रिकामा-उत्तर एकच! आपला समाज हा प्रेमाचा ग्लास अर्धा भरलेला म्हणण्याच्या मानसिकतेचा होईल त्याच दिवशी वसंतोत्सव-प्रेमोत्सवाची प्राचीन परंपरा आणि व्हॅलेंटाईन्सचे आधुनिक प्रेमदिन स्वीकार्य होतील. अर्थात कुणी कितीही शंख केला तरी तरूणाई सर्व निर्बंध उलथून लावणार हेदेखील अटळ आहेच.

(पत्रकार शेखर पाटील यांचा हा लेख. हा लेख आधी त्यांच्या ‘ओपन स्काय‘ या ब्लॉगवर प्रकाशित झाला आहे. )

Previous articleमस्ती आणि माजोरीला चपराक
Next articleएक मंत्रमुग्ध सत्यशोधन!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.