-किशोर देशपांडे
त्या विजेचे नांव आहे प्रा. डॉ. तसनीम पटेल. तसनीमचा अर्थ स्वर्गातली एक नदी. पण धरतीवर तिच्या जन्मापासूनच अंधाराचे अनेक थर तिच्या भोवती गडद झाले होते. तिचं स्वतःचं शरीर हा पहिला थर होता. आई आणि मोठी बहिण गोऱ्यापान, सुंदर होत्या. मोठा आणि धाकटा भाऊ देखील गोरे आणि देखणे होते. ही मधली मात्र काळी आणि कृश जन्मली. अब्बांशिवाय कोणालाही हिचे कौतुक नव्हते. दुसरा थर होता हिच्या कुटुंबाला वेढून असलेल्या अठराविश्वे दारिद्र्याचा. पाटीलकीच्या इनामात अब्बांना मिळालेली शंभर एकर जमीन, बरीचशी कुळकायद्यात आणि सतत आजारी असलेल्या अम्मीसाठी महागडी औषधे घेता यावी म्हणून विकटाक करण्यात खपली. संध्याकाळी तरी पोटात काही जाईल की नाही, याची दिवसा खात्री नसे. नुसती पेज मिळाली तरी हायसे वाटावे अशी हिच्या शालेय शिक्षणापर्यंत घराची अवस्था. मोठ्या घरातून लहान व अधिकच लहान घरांमध्ये बिऱ्हाड हालवावे लागायचे, कारण घर भाडे सतत थकीत असायचे. अंगाला व कपड्यांना साबण आणि डोक्याला तेल या चैनीच्या न परवडणाऱ्या वस्तू होत्या. कपडेच मुळात धड नव्हते. अब्बांना उत्पन्नाचं साधन नव्हतं. तिच्या भोवतीचा अंधाराचा तिसरा थर हा पुरुषप्रधान समाजव्यवस्थेचा होता. मुलींपेक्षा मुलांना घरात आणि बाहेर वेगळी म्हणजे अधिक पक्षपाती वागणूक पदोपदी मिळत होती. चौथा थर होता ती ज्या धर्मात जन्मली त्या धर्मातील चालीरितींचा. तिचे कुटुंब तर सय्यद सादात संप्रदायाचे व स्वतःला स्थानिक मुस्लिमांपेक्षा श्रेष्ठ व कट्टर धार्मिक मानणारे असे होते.
अशा सगळ्या अंधारांना चिरतच जिद्द, चिकाटी, धाडस, हुशारी, तल्लख स्मरणशक्ती, स्वतःला सिद्ध करण्याची आकांक्षा, त्यासाठी कठोर परिश्रमांची तयारी, फर्डे वक्तृत्व या गुणांच्या आधारे (व अब्बांसारखाच तापटपणा अंगी मुरवून) अगदी बालपणापासूनच विजेसारख्या तळपत व लखलखत राहिलेल्या तसनीम पटेल यांचे ‘भाळ-आभाळ’ हे आत्मचरित्र म्हणूनच अत्यंत वाचनीय झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील ‘बिलोली’ हे त्यांचे गाव. तेथेच त्यांचे पहिल्या वर्गापासून दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. पाचवीत असल्यापासून तसनीमने मराठी वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेणे सुरु केले आणि सातत्याने पहिले पारितोषिक ती मिळवत राहिली. शिक्षकांचे आणि संस्था प्रमुखांचे तिला उत्तेजन मिळत राहिले. घरची गरिबी तर अशी होती की पुस्तके सोडाच, एक छोटी वहीदेखील घेण्याची ऐपत नव्हती. स्वाभिमान कोणापुढे हात पसरू देत नव्हता. मैत्रिणीचे पुस्तक आणून, ते संपूर्ण पाठ करून ती लगेच परत करीत असे. शाळा सुटल्यावर भुकेल्या स्थितीत घरी येताना, सायंकाळी जेवायला मिळेल की नाही यापेक्षाही वाचनासाठी चिमणीत जाळायला रॉकेल मिळेल की नाही, याची तिला अधिक चिंता असायची. गणित सोडून इतर सर्व विषयांमध्ये ती अव्वल असायची.
तसनीमची मोठी बहीण थर्ड क्लासमध्ये दहावी पास झाली. मोठा भाऊ तर नापास झाला. दहावीपर्यंत सातत्याने पहिला दुसरा नंबर येणाऱ्या तसनीमला दहावीत मात्र ५९% गुण मिळाले. गणितात ती फारच कच्ची होती. तिच्या सुदैवाने शेजारच्या गावी नवीन महाविद्यालय सुरु झाले आणि एका मैत्रिणीसह तसनीम त्यात दाखल झाली. कॉलेजमध्ये त्या दोघीच मुली होत्या. तसनीम ‘हिजाब’ घेत नसे. आता तिचे वय वाढले होते. अब्बांनी मोठ्या बहिणीला हिजाबाची सक्ती केली होती. अम्मी तर इतकी कर्मठ होती की, मरणासन्न अवस्थेत देखील पती घरी नसताना आलेल्या डॉक्टरला नाडी-परीक्षेसाठी (पतीची तशी आज्ञा नसल्यामुळे) तिने आपल्या शरीराला हात लावू दिला नव्हता. तसनीमचे कॉलेजमध्ये जाणे तिच्या मोठ्या भावाला मुळीच आवडत नव्हते. तिने हिजाब करावा यासाठी अम्मी-अब्बांना तो बोलला. परंतु, कर्मठ अम्मीने त्यावेळी मात्र फार मार्मिक उत्तर दिले. हिजाब पोशाखात नसतो, नजरेत असतो असे ती म्हणाली. तसनीमच्या नजरेत मला निर्मळ शालीनता दिसते. त्यामुळे तिला हिजाबाची वेगळी गरज नाही, असे अम्मी म्हणाली आणि अब्बांनाही ते पटले. त्यांच्या संमतीने तसनीमने नाटकात देखील काम केले. कॉलेजमध्ये असतानादेखील तसनीमने वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेणे व प्रथम पारितोषिक मिळविणे चालूच ठेवले. तिच्या स्पर्धकांमध्ये प्रमोद महाजन, बा. ह. कल्याणकर असे गाजलेले अनेक वक्तेदेखील असायचे. हळूहळू तसनीमची ख्याती सर्व मराठवाड्यात पसरली. तिच्या पारितोषिकांच्या व स्कॉलरशिपच्या पैशांचा कुटुंबाला जगण्यासाठी मोठाच आधार झाला.
एम. ए. साठी नांदेडच्या ‘पीपल्स कॉलेज’मध्ये प्रवेश मिळविणे, वसतीगृहात व्यवस्था होणे, रात्री साडेअकरा वाजेपर्यंत लायब्ररीत बसता येणे, मागे लागणाऱ्या मुलाला समज देणे या सगळ्या कामी प्रा. नरहर कुरुंदकर यांचे तसनीमला मोलाचे सहकार्य लाभले. ते तिचे ‘गुरुजी’च होते. घरून तिला मदत मिळणे अवघड आहे, हे जाणून कुरुंदकरांनी ‘प्रजावाणी’च्या सुधाकरराव डोईफोडेंकडे शब्द टाकला आणि त्यांनी तिला कामावर घेतले. तो आणीबाणीचा कालखंड होता. ‘प्रजावाणी’चे संपादक समाजवादी विचारांचे नि आणिबाणीविरोधी होते. त्यांचे वृत्तपत्र आर्थिक अडचणीत असूनदेखील त्यांनी तसनीमला आधार दिला. आणीबाणी उठल्यानंतर राजकीय वातावरण खूप तापले. त्यावेळी कुरुंदकरांनी तसनीमला शंकरराव चव्हाण यांच्यासाठी प्रचाराची भाषणे करण्यास प्रोत्साहन दिले. मराठवाड्याच्या विकासासाठी शंकरराव सत्तेत असणे महत्वाचे आहे असे कुरुंदकरांचे प्रामाणिक मत होते. तसनीमच्या प्रचारसभा खूप गाजल्या. मात्र प्रत्येक सभेला तिला अब्बांच्या आदेशानुसार मोठ्या भावाला सोबत न्यावे लागत असे.
एम.ए. झाल्यानंतर ती ज्या ‘हुतात्मा पानसरे’ महाविद्यालयात शिकली तिथेच तसनीमला प्राध्यापिकेची नोकरीही मिळाली. आता कुठे तिची आर्थिक स्थिती थोडी सुधारू लागली. मोठ्या बहिणीला तिने बी.ए. पर्यंत शिकवून शाळेत नोकरीसुद्धा मिळवून दिली. मोठ्या व लहान भावाला देखील अम्मीच्या आग्रहावरून तात्पुरती नोकरी मिळवून दिली. मोठ्या बहिणीचे स्वखर्चाने लग्न लावून दिले. मेहताब पठाण हा ‘वसमत’ला कॉलेजमध्ये वरिष्ठ लिपिक असलेला तरूण, अकरा वर्षांपासून तसनीमशी निकाह व्हावा हीच इच्छा बाळगून प्रतीक्षेत होता. त्या दोघांची फारशी ओळख-पाळख नव्हती. परंतु मेहताब हा ‘सर्वोदयी’ विचारांचा अतिशय सालस व लोभस कार्यकर्ता होता. म्हणून तसनीमशी संबंध असलेल्या समाजवादी मंडळींना देखील तो आवडत होता. तिच्या जवळच्या मित्रपरिवाराने तसनीमला मेहताबशी विवाह करण्याची गळ घातली. परंतु तिच्या अम्मी-अब्बांना हा विवाह मुळीच मान्य नव्हता. मेहताब हा त्यांच्यापेक्षा नीच(?) कुळाचा असून, त्याचा आर्थिक व सामाजिक दर्जादेखील तसनीमपेक्षा खालचा आहे असे म्हणून त्यांनी या विवाहास जबरदस्त विरोध केला. अम्मी तर तसनीम घरी येण्याच्या वेळी सुरी, दोर आणि विषाची बाटली घेऊन बसायची आणि आत्महत्येच्या धमक्या देत रहायची. अखेर तसनीमने मेहताबसोबत लग्न केलेच. अब्बांनी मेहताबला घरी येण्यास मज्जाव केला. त्यामुळे तसनीमने लगोलग घर सोडून कॉलेजच्या गावी भाड्याचे घर घेतले आणि स्वतःचे घर बांधण्याची तयारी सुरु केली.
मेहताबविषयी डॉ. तसनीम पटेल यांच्या भावना खूप हळव्या आहेत. त्यांची ‘प्रेमकहाणी’ विलक्षण आहे. तसनीमला मेहताबशी ओळख होण्यापूर्वीच तो स्वप्नात दिसत असे, आणि मेहताबने देखील तिला भेटण्यापूर्वीच तिच्याशी लग्न करण्याचा निश्चय केला होता. त्याने तिला लिहिलेली अनेकानेक पत्रे तसनीमच्या अब्बांनी तिला न दाखवता परस्पर फाडून टाकली होती. पण तो धीर धरून थांबला होता. त्यांच्या भेटीगाठी मुळीच होत नव्हत्या. मी स्वतः मेहताबला १९७०-७१ पासून ओळखतो. तरुण शांती सेनेत आम्ही एकत्र काम केले होते. तो अतिशय सात्विक वृत्तीचा, कोमल, भावनाशील आणि विवेकी माणूस आहे. तसनीम म्हणतात, आमचे ‘प्लेटॉनिक’ लव्ह आहे. आता त्यांची मुलगी व एक मुलगा डॉक्टर असून लहान मुलगा इंजिनियर आहे. तसनीम पटेल यांनी पुढे पी.एच.डी. मिळवून नांदेडच्या पीपल्स कॉलेजमध्येच अध्यापनही केले. सेवानिवृत्त होतेवेळी त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उच्चपदस्थ अधिकारी होत्या. त्यांचा परिवार औरंगाबादला स्थिरावला आहे.
समाजातील कर्मठ वृत्तीच्या लोकांनी केलेला टोकाचा विरोध, बुद्धिमंतांचे सहकार्य, शंकरराव व कुसुमताई चव्हाण यांनी आपली मानसकन्या मानून अडचणीच्या वेळी केलेली बहुमोल मदत, फारशी ओळख नसताना त्यांच्यातले गुण ओळखून शरद पवारांनी देऊ केलेली मोठी पदे या सर्व गोष्टी डॉ. तसनीम पटेल यांच्या आत्मवृत्तात वाचावयास मिळतात. तथापि राजकारणाचा एकूण बाज त्यांच्या स्वभावाला न रुचणारा असल्यामुळे प्राध्यापक तसनीम पटेल पुन्हा आपल्या आवडत्या अध्यापन क्षेत्रात परतल्या. स्वतःच्या अम्मी-अब्बांचे, नरहर कुरुंदकरांचे व मेहताब पठाणांचे त्यांनी फार नेमके व्यक्ती-चित्रण रेखाटले आहे. तसेच, अनेक अलौकिक व गुह्य घटना देखील प्रांजळपणे मांडल्या आहेत.
तसनीमचे अब्बा परंपरावादी नि धार्मिक वृत्तीचे होते. परंतु, एका ‘हरिभक्ती’ करणाऱ्या मुस्लीम जाणत्या वैदूकडे पत्नीच्या प्रकृतीसाठी ते गेले असता, त्या वैदूमध्ये काही ‘गुह्य’ तांत्रिक शक्तींचा प्रत्यय येऊन अब्बा त्याच्या भजनी लागले. मात्र त्या वैदूने ‘काफिर’ देवतांची भक्ती करणे अब्बांना मुळीच पसंत नव्हते. ते अशा प्रकारच्या शक्ती किंवा विद्या प्राप्त करण्यासाठी आपल्या धर्मातील अरेबिक भाषेतील पुस्तकांचा अभ्यास करू लागले. तापट स्वभावामुळे तसनीमपेक्षा मोठ्या असलेल्या भावाला व बहिणीला (ते दोघे वयात आल्यानंतर देखील) क्षुल्लक कारणाने अब्बा झोडपून काढत असत. पण तसनीमच्या अंगाला त्यांनी कधी बोटही लावले नाही. मात्र तसनीमच्या मुलाच्या जन्मानंतर तिच्या बहिणीने त्यांचे कान भरल्यामुळे, अब्बांनी संतापून तसनीमचे संतान मरून जावे अशी शापवाणी उच्चारली. काहीच दिवसांत मेहताबचा अपघात झाला. त्यांच्या दोन्ही मुलांना बालपणीच ‘जीवघेणे’ आजार होऊन मोठ्या इस्पितळांत कठीण शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्याकामी शंकरराव व कुसुमताई चव्हाणांनी तातडीची मदत केली नसती तर मुलांचे वाचणे शक्य झाले नसते. परंतु त्या सर्व संकटकाळात, अजमेरचे ख्वाजा गरीब नवाज आणि अल्लाह आपल्या सोबत आहेत असा विश्वासही तसनीममध्ये दृढावत होता.
एका गाव-खेड्यातील अत्यंत दरिद्री कुटुंबात जन्मलेल्या मुस्लीम मुलीने, केवळ स्व-कर्तृत्वावर घेतलेल्या विस्मयकारी उंच भरारीचा हा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर असंख्य उतार-चढावांच्या कहाणीने भरलेले ‘भाळ-आभाळ’ हे पुस्तक आवर्जून वाचावे. पुस्तकं Amazon.in वर उपलब्ध आहे-https://amzn.to/2H8uCip .
(लेखक नामवंत विधीज्ञ व सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत)
9881574954