कहाणी बच्चूभाऊ आणि नयनावहिनीसोबतच्या स्नेह्बंधाची!

 -अविनाश दुधे

 महाराष्ट्राचे शिक्षण व जलसंधारण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू आणि त्यांच्या पत्नी नयनाताई कडू यांच्यासोबतचा माझा स्नेहबंध १६ वर्षाचा.

मी ‘लोकमत’ ला असतांना २००५ च्या मे महिन्यात यवतमाळहून बदली होऊन अमरावतीला आलो . बच्चूभाऊंना आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून यायला तेव्हा काहीच महिने झाले होते. मात्र बच्चू कडू, त्यांचं अनोखं व्यक्तिमत्व, त्यांच्या भन्नाट आंदोलनांची ख्याती तेव्हा सर्वत्र पसरली होती.

स्वाभाविकच मलाही त्यांच्याबद्दल उत्सुकता होती . काही दिवसांतच त्यांची भेट झाली. त्यानंतर अनेकदा भेट होत राहिली. त्यांची अनेक आंदोलनं ‘ऑन स्पॉट’ जाऊन मी कव्हर केले. ‘हे पाणी इतरांपेक्षा वेगळं आहे’, हे लगेच लक्षात आलं.आतापर्यंत जेवढं ऐकलं, त्यापेक्षा हे प्रकरण फारच अद्भुत आहे. हे जरा खोलात जावून समजून घेतलं पाहिजे , याची जाणीव झाली . त्यांचे कार्यकर्ते, जवळचे मंडळी त्यांच्याबद्दल खूप औत्सुक्यपूर्ण गोष्टी सांगत असतं. पण माझं समाधान होतं नव्हतं. बच्चू कडू हे ‘रसायन’ नेमकं काय आहे, ते नेमकं तयार कसं झालं ? हे जाणून घेण्याची अपार उत्सुकता निर्माण झाली.मला बच्चू कडू हा एक ‘माणूस’ म्हणून समजून घ्यायचा होता.

 

काही महिन्यानंतर २००६ मध्ये मी ‘लोकमत’ ला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींच्या व्यक्तिचित्रणाचा कॉलम सुरू केला. त्यात सर्व आमदार पत्नींच्या मुलाखती घ्यायचे मी ठरवले. त्यांच्या बोलण्यातून त्यांचा आमदार नवरा तर समजून घ्यायचा होताच . सोबत एका आमदारासोबतचा संसार करतांना त्यांना काय अनुभव येतात , काय काय सहन करावं लागतं, हेही जाणून घ्यायचे होते .

 एका आठवड्यात सौ. नयना बच्चू कडू यांच्यासोबत भेट- मुलाखत ठरली. ती मुलाखत नव्हतीच. तब्बल ६ तास आम्ही बोलत होतो. मी बच्चूभाऊंसोबत खूप सारे प्रश्न विचारत होते, या अशा भन्नाट माणसासोबत संसार करतांना काय भोगावं लागतं, हे समजून घेत होतो.

 वहिनी मनातलं सारं काही अगदी मनापासून बोलत होत्या. त्यांनी सांगितलेल्या एकेक आठवणी अजूनही ताज्या आहेत . समाजासाठी वाहून घेतलेल्या कलंदर माणसासोबचं सहजीवन किती अवघड असते , हे त्यातून कळत होतं .

लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीची आठवण सांगताना नयना वहिनी म्हणाल्या होत्या – ‘ लग्नानंतरची पहिली दिवाळी कुठल्याही नवविवाहितेसाठी किती महत्वाची असते ! पण हा बहाद्दर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मला घेवून पूर्णा नदीच्या पात्रात उपोषणाला बसला. तेव्हाच लक्षात आलं – आपला संसार म्हणजे रोजची परीक्षा असणार आहे. एकदा यांनी अर्धदफन आंदोलन केलं. स्वतःला जमिनीत गाडून घेतलं . दोन – तीन दिवसानंतर त्या आंदोलनातील भयावहता मला कार्यकर्त्यांकडून समजली . तेव्हा आयुष्यात प्रथमच भीती मी अनुभवली . तेव्हा आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली – हा माणूस जिवावर बेतेल, ते आपल्याला सांगेलच असं काही नाही.’ त्या मुलाखतीत बच्चू भाऊंची एक वेगळीच सवय नयनावहिनींनी सांगितली होती . – ‘ तुम्हाला ऐकायला नवल वाटेल पण ; मोटार सायकल चालविताना अनेकदा थकव्यामुळे यांचा डोळा लागतो . ५०० -७०० मीटर मोटार सायकल तशीच पुढे जात राहते . मग मोटार सायकल एकदम आडवी तिडवी चालायला लागली की मागील व्यक्तीला लक्षात येते . तो यांना धक्का देतो . मी देवाच्या (मुलगा) वेळेस प्रेग्नंट होते तेव्हाची गोष्ट आहे . एकदा चांदूरहून बेलोऱ्याला येत असतांना असाच प्रकार घडला . मी समोर वाकून पहिले , तर हे चक्क झोपलेले . माझा थरकाप उडाला . मी लगेच मोटार सायकल थांबावायला सांगितली. यांना एका झाडाखाली काही वेळ विश्रांती घ्यायला लावली. पण तेव्हापासून सतत काळजी वाटायला लागली . हे रात्री – बेरात्री कधीही घरी येतात . थकले असतात . मोटार सायकल चालविताना अशीच झोप लागली तर ? हा विचार अनेक महिने महिने माझ्या डोक्यातून जात नव्हता . मी कायन चिंतेत राहायची. अनेक रात्री मी जागून काढल्या . सोबतच्या कार्यकर्त्यांना मी रोज सांगायचे , यांना एकट मोटारसायकलवर येऊ देऊ नका . 

मुलाखतीत हा प्रसंग लिहिताना मी एक कॉमेंट केली होती – ‘थोरला बाजीराव घोड्यावरच झोप घेत असल्याच्या कथा आपण ऐकून आहोत . मात्र बच्चूभाऊंचं हे मोटारसायकलवरचं झोपणं नवीन दंतकथांना जन्म देणारं आहे’.

मुलाखतीदरम्यान हा माणूस सर्वसामान्यासाठी लढतांना कसा बेभान होतो. सारं काही पणाला लावतो, हे सांगतांना त्यांना त्यांच्या जीवाची चिंता नसते….हे सांगताना वहिनीच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. तेव्हा बच्चूभाऊ व नयनावहिनीचा देवा (मुलगा) केवळ एक वर्षाचा होता. बच्चूभाऊ महिनोमहिने बाहेर असतात. सतत पोलीस केस, तुरुंग..यामुळे येणारं दडपण , चिंता त्यांच्या बोलण्यात जाणवत होती. मात्र जगावेगळ्या आपल्या नवऱ्याचा सार्थ अभिमानही त्यांच्या बोलण्यात वाक्यागणिक डोकावत होता. नयना वहिनींची ती मुलाखत ‘वादळासोबतचा संसार’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ मध्ये संपूर्ण पानभर ८ कॉलममध्ये प्रसिद्ध झाली. (तेव्हा ‘लोकमत’ आजच्या एवढा कमर्शियल झाला नव्हता. त्यामुळे एवढी जागा का दिली, असा जाब तेव्हा मला तेव्हा कोणी विचारला नव्हता) ती मुलाखत प्रचंड गाजली. शेकडो लोकांनी मला, वहिनींना फोन करून बच्चूभाऊंबद्दल खूप सारी माहीत नसलेली वेगळी माहिती मिळाल्याचे सांगितले. अनेक दिवसपर्यंत त्या मुलाखतीची चर्चा होती . (ती मुलाखत वाचण्यासाठी समोरील blue लिंकवर क्लिक करा – वादळाचा संसार- https://bit.ly/3yq5Sr6)

 त्या मुलाखतीनंतर बच्चूभाऊ आणि नयना वहिनीसोबतचं माझं नात कौटुंबिक स्नेहसंबंधात परिवर्तित झालं. त्याच कालावधीत आमदार पत्नींच्या मुलाखत संग्रहाचे ‘आमदार सौभाग्यवती’ हे माझं पुस्तक प्रकाशित झालं. त्या पुस्तक प्रकाशन समारंभात मी एक वेगळा प्रयोग केला.सर्व आमदार पत्नी मंचावर आणि त्यांचे मंत्री -आमदार पती प्रेक्षकांत अशी व्यवस्था होती. भाषण-मनोगत फक्त आमदार पत्नींचेच. ( डॉ सोनाली सुनील देशमुख , सौ . निर्मला हर्षवर्धन देशमुख, प्रीती संजय बंड, उत्तरा वीरेंद्र जगताप , विजया साहेबराव तट्टे या सर्व आमदार पत्नींनी अतिशय रोखठोक मनोगतं त्या कार्यक्रमात व्यक्त केली. त्या कार्यक्रमाला तुफान गर्दी होती . सध्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर , आमदार सुलभा खोडकेसह सगळे राजकीय नेते , अधिकारी वर्ग झाडून त्या कार्यक्रमाला हजर होता. त्या कार्यक्रमात नयना बच्चू कडू यांचे भाषण सर्वाधिक गाजले.दुसऱ्या दिवशी ‘लोकमत’ सोबत इतर वर्तमानपत्रांनाही त्या कार्यक्रमाला ठळक प्रसिद्धी दिली. अनेक दिवसपर्यंत हा कार्यक्रम अमरावतीकरांच्या चर्चेचा विषय होता.

 त्यानंतर दोन – तीनदा बच्चू भाऊंच्या मतदार संघातील काही कार्यक्रमांना प्रमुख पाहुणा म्हणून मला त्यांनी आमंत्रित केलं होतं . त्यादरम्यान आर्थिक ताणामुळे होणारी होणारी त्यांची फरफट माझ्या लक्षात येत होती . एकदा चांदूरला मी कुठल्यातरी कार्यक्रमाला गेलो होता . कार्यक्रम आटोपल्यावर मी निरोप घ्यायला गेलो . वहिनी म्हणाल्या , ‘मला अमरावतीला एक काम आहे . आमच्यासोबतच चला .’ मी , नयना वहिनी आणि तेव्हा ३- ४ वर्षाचा असणारा चिमुकला देवा बच्चू भाऊंच्या सेकंड hand मारुती ओम्नीतून अमरावतीकडे निघालो . मे महिना होता . मे महिन्यात विदर्भाचे तापमान ४६-४७ डिग्रीवर असतं . त्या गाडीला AC नव्हता . त्या तळपत्या दुपारी अक्षरशः भाजत आम्ही अमरावतीत पोहोचलो . त्या प्रवासातही खूप साऱ्या गप्पा झाल्यात . तोपर्यंत बच्चुभाऊंना आमदार होवून ३-४ वर्ष झाली होती . मात्र एका आंदोलक नेत्याची वैयक्तिक आयुष्यातील ओढाताण -फरफट कायम होती .

 

तेव्हा वहिनी म्हणाल्या होत्या – ‘हे बदलणार नाहीत . संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे . Settlement वगैरे शब्द यांना कळत नाही . तो विषय ते कधी गंभीरतेने घेतही नाही . किमान घर व्यवस्थित चालावं एवढीच माझी किमान अपेक्षा असते . आमदारकीच्या मानधनाने आर्थिक वणवण थोडी कमी झाली . पण गर्दी ,इतर व्याप आणि खर्चही तेवढेच वाढले .’

 बच्चू कडूंचे आयुष्य हे असंच चालणार होतं. पत्रकार म्हणून मी त्यांच्या प्रवासाकडे जवळून लक्ष ठेवून होतो . व्यवस्थेविरुद्ध लढणे , झगडणे , खूप सारे अभिनव आंदोलने करणे , लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी अनोखे प्रयोग करणे, हे त्यांचं सतत सुरु होतं ( बच्चू कडूंची अनोखे आंदोलनं हा शोध प्रबंधाचा विषय आहे. )

अशीच एक आठवण २००८ ची . आम्ही अमरावतीतील काही पत्रकार मित्र राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांच्या आमंत्रणावरून मुंबईला गेलो होतो . खोडके तेव्हा आर .आर . पाटील यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) होते . मंत्रालयात त्यांचा दबदबा होता . ते आम्हाला कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या सर्व वजनदार मंत्र्याच्या भेटी घडवून आणत होते . आमच्या अमरावतीचे पत्रकार आले त्यांना वेळ द्या ,असे आपुलकीने सांगत होते . खोडके ओळख करून देत आहे म्हटल्यावर सगळेच नेते अघळपघळ बोलत होते. तेव्हा उपमुख्यमंत्री असलेल्या आर . आर .पाटील यांच्याकडे आम्ही गेलो . त्यांनी चहा बोलावला . गप्पा सुरु झाल्या . पण त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी लपत नव्हती . एकदम बोलता बोलता ते म्हणाले , ‘अरे तुम्ही अमरावतीचे ना …अरे तुमचे ते बच्चू कडू उपोषणाला बसले . डॉक्टर म्हणताहेत , जीव धोक्यात आहे . मी त्याला समजावतो आहे , तो ऐकायला तयार नाही . हट्टी आहे . सरकारला काही निर्णय घ्यायला वेळ लागतो , पण मी करतो ना . प्लीज तुम्ही त्यांना समजवा .’ आबांना बच्चुभाऊबद्दल प्रेम होतं , जिव्हाळा होता. तो त्यांच्या बोलण्यात जाणवत होता. त्यांनी लगेच सचिवाला सांगून बच्चू भाऊंना फोनवर घ्यायला सांगितले . आणि फोन माझ्या हातात दिला , म्हणाले, ‘बोला …समजवा’ .

 

मला बच्चूभाऊंचा स्वभाव माहीत असल्याने काय करावे कळत नव्हतं . पण थेट फोनच लावल्याने इलाज नव्हता. मी म्हणालो, ‘बच्चू भाऊ , जीव पणाला लावू नका .आबा मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत आहे . ते पूर्ण झाले नाही तर आम्ही अमरावतीचे पत्रकार संपूर्ण ताकतीने सरकारला फोडून काढू . पण तुम्ही उपोषण सोडा .’ आबांनी आमचे आभार मानले . आम्ही अमरावतीला येईपर्यंत उपोषण संपले होते . लवकरच मागण्याही पूर्ण झाल्या .

 बच्चूभाऊंच्या लढ्याच्या अशा खूप आठवणी आहेत .लिहितो म्हटलं तर एक पुस्तक होईल. ‘इंडिया बुल’ या वीज प्रकल्पाविरूद्धचे बच्चूभाऊंच्या नेतृत्वाखालील आंदोलन २०१० मध्ये प्रचंड गाजले होते . तेव्हा बच्चूभाऊ थेट पोलिसांना भिडले होते . वातावरण अतिशय तणावपूर्ण होते . पोलिसांनी रायफल काढल्या होत्या . गोळीबार होतो की काय, अशी स्थिती होती .मी काही फुटावरून हे सगळं टिपत होतो . सुदैवाने काही झालं नाही .

 दरम्यानच्या काळात काही प्रसंगी बच्चूभाऊंविरुद्ध लिह्ण्याचेही प्रसंगही आलेत . काही प्रसंगी ते तात्पुरते नाराजही झालेत . पण मनात कटुता अजिबात ठेवली नाही . येथे एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी . मी माझ्या ‘मीडिया वॉच’ या स्तंभात मध्ये माजी मंत्री सुनील देशमुख विद्यमान मंत्री यशोमती ठाकूर , राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके , शिवेसेनेचे माजी खासदार अनंतराव गुढे , भाजप नेते अरुण अडसड , जगदीश गुप्ता, हर्षवर्धन देशमुख ,रवी राणा अशा अनेकांविरुद्ध अतिशय कठोर लिहिलं . पण एखाददुसरा अपवाद वगळता कोणीही मनात द्वेषभावना बाळगली नाही वा राग केला नाही .अद्दल घडविण्याची भाषाही केली नाही . या सर्वांसोबत आजही माझे उत्तम स्नेहबंध आहेत . )

 पुढे २०११ ला माझी ‘लोकमत’ ला ‘अकोला आवृत्ती संपादक म्हणून बदली झाली. तिथे मन न रमल्याने मी वर्षभरात दैनिक ‘पुण्यनगरी’च्या अमरावती -अकोला आवृत्तीचा संपादक म्हणून जॉईन होवून अमरावतीत आलो होतो. मी ‘पुण्यनगरी’त जॉईन झालो कळताच बच्चू भाऊ भेटायला कार्यालयात आले होते . त्या कालावधीत ‘आम्ही सारे फौंडेशन’ या संस्थेची स्थापना आम्ही विदर्भातील मित्रमंडळींनी केली . ‘आम्ही सारे’ च्या अनेक कार्यक्रमाला बच्चू भाऊंना मी आमंत्रण द्यायचो आणि तेही घरचे कार्य समजून अगदी नियमित यायचे .

 २०१६ ला छगन भुजबळ यांच्याविरुद्ध लिहिल्याने ‘पुण्यनगरी’ ने मला राजीनामा मागितला . मी सक्रिय पत्रकारितेतून बाजूला झालो . (तोपर्यंत ‘मीडिया वॉच’ हे माझं रोपट रुजलं होतं.) मात्र कार्यक्रम व अधून मधून फोन व msg द्वारे आमचा संपर्क सुरु असतो . बच्चूभाऊंचं काही आवडलं वा काही विषयात ते चुकत आहे , असे वाटले तर मी त्यांना msg टाकतो . ते आवर्जून responce करतात . हा कोण कुठला टिकोजीराव… आपल्याला सल्ला देणारा , असे चुकीनेही त्यांना वाटत नाही .वहिनींच्याही अलीकडे भेटी कमी . मात्र ‘मीडिया वॉच’ पोर्टल वरील सगळे लेख त्या आवर्जून वाचतात.

 

२०१९ मध्ये  महाआघाडीचे सरकार आले . बच्चूभाऊंना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते अशा बातम्या प्रकाशित झाल्या . मी लगेच त्यांना msg टाकला . ‘भाऊ , अशी संधी येत असेल तर अजिबात नाकारू नका . तुमचं संपूर्ण आयुष्य व्यवस्थेविरोधात लढण्यात गेले . आता व्यवस्थेत सहभागी होवून लोकांचे प्रश्न सोडविण्याची संधी मिळत असेल तर ती घ्या .’ माझा msg वाचून त्यांनी लगेच फोन केला . आम्ही बराच वेळ बोललो . महाआघाडी व भाजप दोन्हींकडून कशा ऑफर आहेत, वगैरे त्यांनी सांगितले . काही दिवसातच ते मंत्री झाले . त्यांच्या हजारो कार्यकर्ते – चाहत्यांप्रमाणे माझ्यासाठीही तो अतीव आनंदाचा क्षण होता .

आता मंत्री होवून त्यांना जवळपास दोन वर्ष होतं आले . त्यातील दीड वर्ष कोरोनात गेले . काही भरीव करण्याची संधी अजून मिळाली नाही . लाल दिव्याच्या गाडीत आणि सत्तेच्या चौकटीत ते कितपत रमत आहे , याची मला कल्पना नाही . मात्र गेल्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी निराधार लोकांना स्वत:च्या हाताने आंघोळ घालत असतानाचे त्यांचे फोटो वर्तमानपत्रात पाहिले… आणि आमचा बच्चू भाऊ बदलणार नाही , ही खात्री बळकट झाली .हा कुठेही गेला तरी याची बांधिलकी समाजातील शेवटच्या माणसोबतच राहील, हा विश्वास भरभक्कम झाला .

बच्चूभाऊ , नयनावहिनी …तुम्ही संघर्षाच्या लांबलचक वाटेवरून आज इथपर्यंत पोहचला आहात . सत्ता असो वा नसो , तुमचा हा प्रवास सुरूच राहणार , याबाबत तुमच्या विरोधकांच्याही मनात शंका असणार नाही . तुमच्या दोघांच्या या प्रवासाचा काही काळ साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली , याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो . तुमच्या दोघांसोबतचे ऋणानुबंध ही आयुष्यातील मखमली ठेव आहे , हे सांगून थांबतो .

(लेखक ‘मीडिया वॉच’  वेब पोर्टल व दिवाळी अंकाचे संपादक आहेत)

8888744796

Previous articleएक ‘राऊत’ हवाच !
Next articleअंधार कापणाऱ्या विजेचे आत्मवृत्त : भाळ आभाळ
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.