माणसं: साधी आणि फोडणीची.. भाग तीन
*******
-मिथिला सुभाष
*******
ती संसाराचा गाडा ओढत होती. घरातली खाणी-जेवणी, मुलांच्या फिया, रोज रात्री नवऱ्याला दारू प्यायला पैसे देण्यापर्यंत सगळे खर्च तीच करत होती. भाडी येत होती पण खर्चही वाढत होते. कुठे कोणाचं लग्न जमव, कुठे कोणाची जागा विकून दे, अशी कामं करत होती. महिन्यातून एकदा गुपचूप जाऊन रक्त देऊन यायची. मग रस्त्यावर उभी राहून उकडलेली अंडी, ज्यूस वगैरे प्यायची. आपल्या अंगात रक्त वाढलं तर ते आपल्या संसाराच्या कामी येईल हे तिला कळत होतं. तिचा संसारीपणा बघून लोक तिला नावाजायचे. पण तिचं हे रस्त्यात उभं राहून अंडी खाणं वगैरे तिच्या मुलांना कळलं होतं. घरात एक भाजी, एक आमटी असते आणि आई रस्त्यावर उभी राहून अंडी खाते हे काही त्यांना बरोबर वाटत नव्हतं. काय सांगणार होती सुमीकाकी त्यांना? गावात हळूहळू सुमीकाकीची वट वाढायला लागली होती. कधी-कधी ती हसत म्हणायची, खिशात नाय झाट आणि वरवरचा थाट!
सुमी देसायांच्या घरचं माप ओलांडून आली तेव्हा सोळा-सतराची होती. त्या काळाच्या मनाने घोडनवरीच. पण वडील नव्हते, घरात आजारी आई, कुटुंबप्रमुख आजी, एक मोठा भाऊ आणि एक धाकटा भाऊ. दूर कुठेतरी मामा-मावश्या, काका वगैरे होते. पण ते तितपतच. सुमी गरिबीत खालमानेने जगत होती. एका लग्नात अप्पा देसायांनी तिला पाहिली आणि श्रीरंगसाठी पसंत केली. गोरीपान, नक्षत्रासारखी देखणी, कुरळे केस, कपाळावर झेपावणाऱ्या बटा आणि सालस नजर. खालमानेने वावरत होती. रंगा तिच्याहून साताठ वर्षांनी मोठा, शिक्षणाच्या नावाने शून्य. नाहीतरी त्याला काय गरज होती शिक्षणाची! गावात छोटेखानी वाडा होता. रंगा एकुलता एक मुलगा, एक बहिण होती, ती सासरी सुखात नांदत होती. मार्केट रोडवर अप्पा देसाईंचं कापडाचं दुकान होतं. छान खातंपितं घर होतं. देसायांच्या मुलासाठी मागणं आलं म्हंटल्यावर चौकशी करण्याची, नकार देण्याची ऐपतच नव्हती सुमीच्या आजीची. देसायांनीच दोन्हीकडचा खर्च केला आणि सुमीचं लग्न झालं. लग्नात टिकलीएवढ्या वाट्यांचं मणीमंगळसूत्र आणि पायात पैंजण, जोडव्या, काचेचा चुडा.. एवढेच दागिने होते तिच्या अंगावर. लग्न लागल्यावर वरात निघाली तेव्हा सासरच्या लोकांनी सुमीला दागिन्यांनी मढवून टाकली होती. सुमीची सासू अतिशय मायाळू बाई होती. एरवी कथानायिकेची असते तशी दुष्ट सासू नव्हती. कारण ही कथा नाहीये, सत्य आहे.
लग्न करून आली आणि एका आठवड्यात सुमीला काही गोष्टी कळल्या. तिचे सासरे रात्री घरी येत नाहीत. सासूबाई एकट्या देवखोलीत झोपून राहतात. रंगा रोज दारू पिऊन घरी येतो आणि सुमीला ओरबाडून झालं की पाठ करून झोपी जातो. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे, पुरणाचे दागिने!
लग्न झाल्यावर साताठ दिवसांनी तिच्या सासूने तिला सांगितलं की सूनबाई, हातातले तोडे, पाटल्या, बांगड्या काढून ठेव, गळ्यात पण नुसतं डोरलं राहू दे. बाकी लक्ष्मीहार, चपलाहार वगैरे काढून ठेव. सुमी हो म्हणाली पण हातात होतं ते काम करून काढू दागिने म्हणून कामं करत राहिली. तिला थोडं विचित्र जरूर वाटलं. पण ती एवढी समजूतदार होती की आपल्याला जे मिळालंय तेच खूप याच धोरणाने ती वागत होती. ती पाण्यात कामं करतेय हे पाहून सासू पुन्हा म्हणाली, “काढ ग ते दागिने. पुरणाचे दागिने हायेत, पाणावले तर रया जायची.” ‘पुरणाचे दागिने’ आणि ‘पाणावले’ म्हणजे काय ते तिला कळलंच नाही. ती बघतच राहिली. सासूनेच पुढे होऊन तिच्या हातातले तोडे, पाटल्या, बांगड्या काढल्या, गळ्यातले दागिने काढले. “कुणी यायचं असेल तर, किंवा सणावाराला, हळदीकुंकवाला देत जाईन हो तुझे दागिने तुला! तुझेच हायेत ते..” सुमाने मान डोलावली. सासू तिच्या गालाला हात लावत हसत म्हणाली, “तुझ्या रूपावर नजर ठरत नाय, हवेत कशाला तुला दागिने?” असं म्हणून ती दागिने घेऊन गेली. सुमी ओकीबोकी झाली. घरून आला होता तो चुडा, पैंजण आणि जोडव्या राहिले फक्त अंगावर. पण ती गरिबाघरची होती, बऱ्यापेक्षा वाईटच दिवस जास्त पाहिले होते. आरशात बसून स्वत:शीच हसली आणि म्हणाली, “आता दागिने नायत अंगावर.. सासूबाई म्हणाल्या तुझ्या रूपावर नजर ठरत नाय.. बाकी कोणाची नको ठरू दे, पण माझ्या नवऱ्याला कळेल का की मी देखणी आहे..? तो वळून बघेल का माझ्याकडे.. नुसता मेला अंगाला झोंबतो आणि त्राण गेल्यागत कोसळतो!”
रात्री तिची सासू फक्त पेलाभर दूध घ्यायची. सुमी तिच्यासाठी दूध घेऊन गेली तेव्हा सासूने तिला हाताला धरून बसवून घेतलं. सासू एका मऊ फडक्याने सुमीचे दागिने पुसून निगुतीने एका डब्यात ठेवत होती. सुमी तिच्याजवळ बसली. सासू म्हणाली, तुला कळलं नाय ना पुरणाचे दागिने म्हणजे काय ते? सुमी काहीच बोलली नाही. सासूच पुढे म्हणाली, अग सोन्याच्या पालिशात चांदीचं पुरण भरलंय. असं म्हणून सासू तोंडभर हसली. सुमी चकित झाली होती. त्या रात्री सासूने तिला सांगितलं, तिच्या सासऱ्याने एक बाई ठेवली आहे. ते रात्री तिथेच असतात. दुकानाचा सगळा गल्ला त्याच घरी जातो. त्या बाईला पण दोन मुलगे, एक सून आहे. स्वत:चा आब राखला जावा म्हणून त्यांनीच हे चांदीचे दागिने बनवून त्यांना सोन्याचं पालिश केलंय. म्हणूनच त्यांना गरीबाची मुलगी सून म्हणून हवी होती. हे आज ना उद्या तुला कळणारच होतं. हा संसार आता तुझा आहे. वरवर दिसणारी श्रीमंती आहे. तरी तू संसार पुरणपोळीसारखा गोड कर. तुझ्या वाट्याला आलेले भोग मला दिसतायत. पण आतलं पुरण गोड राहू दे. हसत हसत संसार कर. हे दागिने जसे सोन्याचं पालिश घेऊन चमचमतायत, तसा दिसू दे तुझा संसार.
सासूच्या डोळ्यात पाणी आलं. सुमीने त्यांच्या हातावर हात ठेवला. आणि रिकामा पेला घेऊन ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी सासू झोपेतून उठली नाही!
आणि.. सुमीचा संसार सुरु झाला!
लग्नाला वर्षं व्हायच्या आत तिला पहिला मुलगा झाला. बाळंतपण माहेरी झालं. पण घरात करणारं कुणी नाही म्हणून अप्पा देसायांनी तिला पंधरा दिवसात घरी आणलं. घराचा उकिरडा झालेला होता. आठ-दहा दिवसांचे कपडे धुवायचे पडले होते. स्वैपाकखोलीत उंदरा-झुरळांची जत्रा भरली होती. पंधरा दिवसांच्या बाळाला पाळण्यात झोपवून सुमीने घर आवरलं, धुणी धुतली. स्वैपाक सुरु झाला. घराला घरपण आलं.
आणि हे दर वर्षाचं झालं. दीड-दोन वर्षांनी सुमीचं बाळंतपण यायचं. ती बाळंत होऊन घरी यायची आणि कामाला लागायची. तिला एक-दोन नव्हे ओळीने सात मुलगे झाले. त्या तेवढ्या वर्षात अप्पा देसाई वारले. त्यांचं प्रियपात्र दुकानावर कब्जा करून बसलं. सुमीच्या आई-आजी वारल्या. मोठा भाऊ कुठे परागंदा झाला आणि धाकटा चंदू सुमीच्या घरी राहायला आला. सुमीने सासूच्या शब्दांची खूणगाठ बांधून ठेवली होती. “संसार पुरणपोळीसारखा गोड कर!” सुमीच्या चेहऱ्यावरचं हसू त्या दिवसानंतर मावळलंच नाही. जगाच्या थपडांनी तिला बोलायला शिकवलं. ती आता हसरी, हजरजबाबी सुमीकाकी झाली होती. एकामागून एक सात मुलगे झाले तेव्हा प्रत्येकवेळी देवाला सांगायची, देवा, मला एक तरी मुलगी दे. पण नंतर तिच्या वाट्याला जे आयुष्य आलं तेव्हा आपल्याला मुलगी नाही याचं तिला समाधानच वाटायचं.
मुलगे मोठे होत होते. सगळ्यात मोठा पंधराचा, धाकटा चारचा. आणि एका रात्री रंगा तिला उठवायला आला. सुमीकाकी उठली, दिवा लावला आणि एका हातात चटई-उशी घेतली, दुसऱ्या हाताने रंगाला धरलं आणि थेट वाड्याबाहेर आणलं. सडकेवर चटई फेकून त्याला सांगितलं, “आजपासून हितं झोपायचं. पोरांच्या पोटाला अन्न घालायची अक्कल नाय ना, मग पोरांडा वाढवायचा नाही आता.” रंगा सर्द झाला. सुमी बदलली होती याचा अंदाज होता त्याला. चार वर्षामागे ती अप्पांच्या रखेलीच्या घरी जाऊन राडा करून आली होती. तिच्या घराबाहेर उभी राहून एवढ्या शिव्या दिल्या की ती बाई घाबरली आणि तिनं दुकानाचं भाडं सुमीकाकीला द्यायची सुरुवात केली. त्याच दरम्यान सुमीकाकीने वाड्यात चार भाडेकरू ठेवले. त्यातला एक दूधवाला होता. त्याच्या जवळपासच्या गावाहून सकाळी रग्गड दूध यायचं, ते तो विकायचा आणि दिवसभर घरी राहायचा. सुमीने त्याला सांगितलं, तू मला अर्धंच भाडं दे, आणि रोज दूध देत जा. पोरांच्या दुधाची सोय झाली. लोक म्हणायचे, बाप कामधंदा करत नाही पण पोरं रेड्यासारखी माजलेली आहेत. या सगळ्या भाड्यावर सुमी सात पोरं आणि एक नवरा यांचा संसार करत होती. शिवाय धाकटा भाऊ चंदू होताच. तो एक वेगळाच विषय होता. लोकांच्या घरून सायकल मागून आणायची आणि विकून टाकायची. कोणाला सांगायचं मला दोन शेर दही घरी न्यायचं आहे, तुमच्या घरचा डबा द्या. तो डबा घ्यायचा आणि विकून टाकायचा. मग सुमी सगळ्यांचे पैसे फेडत राहायची. पण माहेर म्हणून तो एक भाऊ शिल्लक राहिला होता. त्याने आजीचं घर केव्हाच फुंकून टाकलं होतं. त्याला कुठे पाठवायचं म्हणून सुमीने घरात ठेऊन घेतला होता.
ती संसाराचा गाडा ओढत होती. घरातली खाणी-जेवणी, मुलांच्या फिया, रोज रात्री नवऱ्याला दारू प्यायला पैसे देण्यापर्यंत सगळे खर्च तीच करत होती. भाडी येत होती पण खर्चही वाढत होते. कुठे कोणाचं लग्न जमव, कुठे कोणाची जागा विकून दे, अशी कामं करत होती. महिन्यातून एकदा गुपचूप जाऊन रक्त देऊन यायची. मग रस्त्यावर उभी राहून उकडलेली अंडी, ज्यूस वगैरे प्यायची. आपल्या अंगात रक्त वाढलं तर ते आपल्या संसाराच्या कामी येईल हे तिला कळत होतं. तिचा संसारीपणा बघून लोक तिला नावाजायचे. पण तिचं हे रस्त्यात उभं राहून अंडी खाणं वगैरे तिच्या मुलांना कळलं होतं. घरात एक भाजी, एक आमटी असते आणि आई रस्त्यावर उभी राहून अंडी खाते हे काही त्यांना बरोबर वाटत नव्हतं. काय सांगणार होती सुमीकाकी त्यांना? गावात हळूहळू सुमीकाकीची वट वाढायला लागली होती. कधी-कधी ती हसत म्हणायची, खिशात नाय झाट आणि वरवरचा थाट! तसंही सुमीकाकीच्या तोंडी लागणं कठीण होतं. ती हसत-हसत कधी कोणाची टोपी उडवेल याचा भरवसा नसायचा.
सुमीकाकीचं अवघं आयुष्य कागदावर आणायचं म्हणजे मला एखादी छोटीमोठी लघु कादंबरी लिहावी लागेल. ते इथे तरी शक्य नाही.. म्हणून तिच्या आयुष्यातले टप्पे सांगते फक्त..
एक-एक करत सातही मुलं कुठेतरी नोकरीला लागले. दहा वर्षात सात ही मुलांची लग्नं झाली. त्यांच्यासाठी सुमीकाकीने केलेलं वधूसंशोधन हा एक अख्खा विनोदी अध्याय होता. मुलगे तरुण झाले आणि घरात चिडचिड करायला लागले की सुमीकाकी म्हणायची, रंगरावांचा मुलगा माजावर आला, आता लिंगाला भिंग आणून द्यायला पाहिजे. लग्नात सुमीकाकीनेच मुलीवाल्यांना ‘पुरणाच्या दागिन्यांची’ आयडिया दिली. लग्नात सुना चमकत होत्या. त्यातच सुमीकाकीच्या कष्टाचं बारकं मणीमंगळसूत्र आणि कानातले असायचे, शंभर नंबरी सोन्याचे!
रंगा देसाई लिव्हरच्या आजाराने बिछान्याला खिळले होते. सुमीकाकी त्यांचं सगळं करायची. पण एखाद्याचे हात उलटे असतात ना, तसं होतं सुमीकाकीचं. ती तरुण असतांना रस्त्यावरच्या गाडीवर उभी राहून उकडलेली अंडी खायची ते तिला आयुष्यभर पुरलं. मुलांनी आपापल्या बायकांना सांगितलं. याच सासूने आपल्या आई-वडलांना ‘पुरणाच्या दागिन्यांची’ युक्ती सांगितली होती याची जाण न ठेवता सगळ्या सुना सुमीकाकीला त्यावरून आडून-आडून बोलायच्या. “म्हणूनच अजूनही एवढ्या गोऱ्यापान, नितळ त्वचेच्या आहेत.” असं तिला सुनवायच्या. सुमीकाकी हसून साजरं करायची. तिचा संसार तिला पुरणपोळीसारखा करायचा होता. ती लक्ष द्यायची नाही. काळ बदलला होता. मुलगे वाड्यातल्या वाड्यात वेगळे झाले होते. सगळे आपापला संसार करत होते आणि सुमीकाकी तिचा आणि नवऱ्याचा संसार करत होती. कधीतरी एखाद्या सुनेकडे जाऊन सांगायची, वाटीभर भाजी दे ग, मला कणकण वाटतेय आज. आदळआपट करत सून भाजी द्यायची. तिने नाही दिली तर दुसऱ्या सुनेकडे.. तिसऱ्या.. सुमीकाकीची वणवण संपली नव्हती. पूर्वी गावात करत होती, मुलांच्या पोटासाठी. आता घरात करत होती, नवऱ्याच्या पोटासाठी! आणि गावात लोक म्हणायचे सात पुतांची आई आहे, भाग्यवान आहे. तिला येणाऱ्या भाड्यावर मुलं टपलेली असायची. आणि सुमीकाकी टपली होती नवऱ्याच्या मरणावर..! रोज त्याच्या अंगाला स्पंज करतांना त्याला सांगायची, आवरा आता इथला मोह, माझ्यामागे कुणी करणार नाही. तुम्ही माझ्याआधी गेलेला असाल तर माझं पाऊल अडणार नाही. देवाला सांगायची, यांना उचल. आणि एक दिवस देवाने तिचं ऐकलं. रंगाराव देसाई गेले. सुमीकाकीच्या गळ्यातला एकुलता एक दागिना, मणीमंगळसूत्र विकून त्यांचे दिवस घातले गेले.
असाच एक दिवस. भरलेलं घर. रविवारची सकाळ. टीव्हीवर रामायण सुरु होतं. सुमीकाकी एका मुलाच्या घरात गेली. रामायण पाहायला बसणार तोच सून म्हणाली, ती अंडी आणि ज्यूस घेत होतात ना चोरून, ते पैसे वाचवले असतेत तर एखादा छोटा टीव्ही घेता आला असता स्वत:साठी आणि रविवारचा नाश्ता करायला अशी वणवण करावी लागली नसती!
सुमीकाकीने लेकाकडे पाहिलं. तो रविवारचा पेपर वाचण्यात गर्क होता. ती काही न बोलता उठली. आपल्या खोलीत जाऊन झोपली.. आणि.. झोपूनच गेली. सात पुतांची आई एकही पुताला घोटभर पाण्याचाही त्रास न देता कोरड्या घश्याने आपला पुरणपोळीसारखा संसार पूर्ण करून निघून गेली.
तिच्या आयुष्याचा पट आठवणीत उलगडला तरी इंदिरा संतांच्या कवितेतल्या ओळी आठवतात-
अजूनही तिन्हीसांज रोज येतच राहते
निरागस विध्वंसाच्या ढिगावरती टेकते
काळा धूर, लाल जाळ रास राखेची पाहते
काळोखाच्या ओढणीने डोळे टिपत राहते
(फोटो सौजन्य -गूगल)
…………………………………………………………
हे सुद्धा नक्की वाचा –‘नारायणी’ नमोस्तुते! (भाग एक)– समोरील लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/3Q23Cik
हा दोन घडीचा तंबूतिल रे खेळ (भाग दोन ) समोरील लिंकवर क्लिक करा –https://bit.ly/3Q9RVqc
………………………………………………………..