सीमा शेटे-रोठेंचे ‘गाव कारागीर’ : शोध भूमी सत्वाचा!

– डॉ. श्रीकांत तिडके

प्रसार माध्यमावरील कार्यरत अधिकारी जर कल्पक असले तर कार्यक्रमांना नवीन झळाळी प्राप्त होते. बा. सी. मर्ढेकर, पु. ल. देशपांडे इत्यादींनी प्रसारमाध्यमांना लोकाभिमुखता तर प्राप्त करून दिलीच पण कार्यक्रमांना अभिजात दर्जा प्राप्त करून दिला. तसेच अनेक वर्षे आकाशवाणीवर विविधांगी काम करणाऱ्या सीमा शेटे-रोठे यांनी आकाशवाणीला माहिती संपन्न व सर्वच स्तरापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. अकोला आकाशवाणी आणि त्याचे कार्यक्रम हे नेहमीच कौतुकास्पद होते आणि आजही आहेत..

निरलंकृत साधी पण वर्ण विषयाला भिडणारी निवेदन शैली

या पुस्तकातील लेखांचे स्वरूप आकर्षक आहे. सीमाच्या या लेखांवर चिकित्सेची छाया कोठेही पडलेली दिसत नाही. लेखिका स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने गावगाड्यातील अनेक व्यवहारांकडे त्यांनी आत्मीयतेने पाहिले आहे. त्यामुळे या लेखाला लेखनाला अनेक ठिकाणी स्मरणरंजनतेचे स्वरूप तर काही ठिकाणी अनिल अवचट यांच्या रिपोर्ताजची आठवण व्हावी, असे चित्रदर्शी रूप प्राप्त झाले आहे.

या पुस्तकातील बलुतेदार व अलुतेदार यांचा परस्पर संबंध आणि त्यांचे कौशल्य लेखिकेने मनोज्ञ पद्धतीने प्रकट केले आहे. ‘ऋतुचक्र असे हे’ असे ग्रामीण जीवनाचे स्वरूप सांगताना विविध व्यावसायिकासंबंधी त्यांनी जे छोटे छोटे लेख लिहिले आहेत, त्याचे शीर्षक अनेकार्थ सूचित करणारे आहेत. ‘फिरतं चाक’ हे कुंभार या व्यवसायाचं वर्णन, खेड्यातील सोनाराचे काम ‘परिस स्पर्श’ या लेखातून तर ‘पायाची वहाण’, ‘चाकाची धाव’ यासारख्या लेखातून त्या त्या व्यावसायिकांचे कष्टरूप त्यांनी उलगडले आहे. दवडी, फळे, सूप अशा बुरड व्यवसायाबरोबर शेतीला लागणारी अवजारे करणारे सुतार आणि केशकर्तन करणारे न्हावी ‘आम्ही वारिक’ चित्रमय पद्धतीने साकारले आहे. पाथरवट आणि त्यांचे छन्नी हातोड्याचे काम, कपड्यावर रंगकाम करणारे रंगारी, कष्टकरी महिलांचे किन किन वाजणारे कंकण भरणाऱ्या कासारांचे गावाशी असणारे आपुलकीचे नाते, लेखिकेने शब्दबद्ध केले आहे.

“गाव कारागीर ही लेखिकेची लेखमाला आकाशवाणीवरून प्रसारित झालेली असल्याने आणि आकाशवाणीला व त्याच्या प्रसारणाला शासकीय प्रसारण नियमाची जाण ठेवावी लागत असल्याने, या बलुतेदारी पद्धतीच्या रचनेवर स्पष्ट भाष्य करणे शक्य नव्हते. विल्यम एच. वाइनर या समाजशास्त्रज्ञाने बलुतेदारीचा सखोल अभ्यास केला. ही बलुतेदारी शेतीव्यवसाय करणाऱ्या कास्तकाराची, कुणब्याशी निष्ठ असल्यामुळे या बलुतेदारांना एका चौकटीतच काम करावे लागे, ही वस्तुस्थिती आहे. दया पवार यांच्या ‘बलुतं’ या आत्मचरित्रातून बलुतेदारी पद्धतीमागील वेदना व्यूह साकारला आहे. बलुतेदारी पद्धती, जजमानी पद्धती हा ग्रामीण भारतातील गाभा होता. आणि हा गाभा कायम ठेवीत. त्यातील जातीय विखार व शोषण दूर सारीत महात्माजींनी ग्रामस्वराज्य याचा नवा विचार भारताला दिला. विनोबांनी सुद्धा ‘गाव लक्ष्मीची उपासना’ अशा दीर्घ लेखाद्वारे या व्यवसायामधील सुसूत्र रूप विधायक करण्याचे जन आंदोलन उभे केले. भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्था, दळणवळणाची साधने कमी प्रमाणात उपलब्ध असताना, या गाव कारागिरांनी एकमेकांना हात देऊन तोलून धरली. अशा कृषिनिष्ठतेचे सांस्कृतिक मूल्य व संवेदनविश्व भालचंद्र नेमाडे यांनी ‘देशीयता’ या संकल्पनेने विस्ताराने मांडले. भालचंद्र नेमाडे यांच्या या देश्य संस्कृती व देशीयतेचे विशालरूप पाहूनच त्यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार प्राप्त झाला.

औद्योगीकरण आणि जागतिकीकरण यांच्या रेट्यामुळे गावकारागीर व त्यांची दुरावस्था झाली. कोरोनाकाळात सैरभैर झालेले कामगार “गड्या आपला गाव बरा” असे म्हणत हजारो मैल पायपीट करीत आपल्या गावात गेले.त्यावेळी अर्थतज्ञांना व सुबुद्धांना गावातील रोजगार गावातच उपलब्ध असावा हे गांधीवादी सूत्र प्रकर्षाने आठवले. ग्रामीण कौशल्य दर्शवणारी प्रदर्शने ‘स्किल इंडिया’ असे वरपांगी प्रयत्न सुरू आहेत. पण कृषिनिष्ठ ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतमालाला श्रमावर आधारित बाजारमूल्य मिळाल्याशिवाय गावगाडा आणि गावगाड्याचा हा देश सुखाने राहू शकत नाही. तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील ‘ग्रामनाथ’ सर्वार्थाने सुखी होण्यासाठी ‘गावकारागीर’ आणि त्यांची बाजारपेठ याचा मूलभूत विचार होणे गरजेचे आहे..

सीमा शेटे रोठे यांच्या या लेखमालेतून ग्राम व्यवस्थेतील भूमीतत्वाला सहृदयतेने स्पर्श केला आहे. आणि तो विचार प्रवृत्त करणारा आहे.

पुस्तक Amazon.in वर उपलब्ध -समोरील लिंकवर क्लिक करा- https://amzn.to/3zGa9KO

(लेखक नामवंत समीक्षक व वक्ते आहेत)

8669359252

(पुस्तकाच्या लेखिका सीमा शेटे-रोठे यांचा क्रमांक)

9422938040

Previous articleनवयुगाचा नवयोग
Next articleअजूनही तिन्हीसांज रोज येतच राहते    
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.