एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत
आणि कच्छपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत हळहळ व्यक्त व्हावी, प्रत्येकाला आपल्या घरातील माणूस गेल्याचं दु:ख व्हावं, त्याच्या मृत्यूने प्रत्येकाचे डोळे पाणावले जावेत, असं जाती-धर्माचे कळपं करून राहणार्या भारतासारख्या खंडप्राय देशात क्वचितच होतं. धर्म, पंथ, जाती व भाषांच्या र्मयादा पार करून जनमानसाच्या मनात अढळ स्थान निर्माण करण्याची किमया या देशात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या महानायकांना साधली आहे. डॉ. अब्दुल कलाम त्या अद्भुत नक्षत्रमालेत जाऊन बसले आहेत, हे त्यांच्या निधनाने दाखवून दिलं. महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंच्या निधनानंतर देशातील प्रत्येक घर शोकाकूल होण्याचा प्रसंग देशाने प्रथमच अनुभवला आहे. एवढा लोकप्रिय राष्ट्रपती या देशाने पहिल्यांदाच पाहिला. लोकांमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींपेक्षा राष्ट्रपती भवनाच्या हस्तदंती मनोर्यात बसणारा स्वप्नाळू डोळ्याचा माणूस या देशाला वेडावून टाकतो, हे या पिढीने याची देहा, याची डोळा अनुभवल.े. पंडित नेहरूनंतर लहान मुलं व तरुणांमध्ये एवढं प्रचंड लोकप्रिय असलेलं व्यक्तिमत्त्व या देशात दुसरं झालं नाही, असं म्हटलं तर अजिबात अतिशयोक्ती होणार नाही. डॉ. कलामांमध्ये असं काय होतं की देश त्यांच्यामुळे वेडावून गेला?…याचं उत्तर आहे, या माणसाने देशाला स्वप्नं दाखविली… त्या स्वप्नांपर्यंत जाण्याचा मार्ग दाखविला आणि देशातील तरुणाईला स्वत:तील सत्त्वाची जाणीव करून देतानाच अफाट आत्मविश्वासही दिला. एकीकडे राजकारणी एकमेकांवर चिखल उडविण्याच्या पारंपरिक खेळातून बाहेर यायला तयार नसताना विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राजकारण्यांशिवायही देशाला नवीन दिशा दाखवता येऊ शकते हे कलामांनी दाखवून दिले. प्रतिभावंत शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आतापर्यंत काही कमी झाले नाहीत. मात्र देशातील युवापिढीला समृद्ध करण्याची आणि देशाला बलवान करण्याची डॉ. कलामांची आंतरिक तळमळ संपूर्ण देशाला भिडली. हा माणूस माझं आणि माझ्या देशाचं भवितव्य बदलविणारं महत्त्वपूर्ण काही सांगतो आहे, हा विश्वास कलामांनी निर्माण केला आणि बघता बघता कलाम प्रत्येक घराघरात, मनामनात वसलेत.
१९७४ मध्ये भारताने अणुचाचणी केल्यानंतर अमेरिका, युरोपसह बहुतांश जगाने भारतावर प्रचंड निर्बंध घातले होते. अणुतंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आवश्यक युरेनियमचा पुरवठा बंद केला होता. मात्र त्यामुळे अजिबात न डगमगता संकटं हे संधी घेऊन येत असतात हे भारतीय शास्त्रज्ञांनी तेव्हा दाखवून दिले. दक्षिण भारतात मोठय़ा प्रमाणात आढळणार्या थोरियमचा वापर करून युरेनियम तयार करता येऊ शकते हे सिद्ध करणार्या भारतीय तंत्रज्ञांमध्ये डॉ. कलाम हे आघाडीवर होते. थोरियमच्या वापरामुळे भारतीय अणू कार्यक्रम गोठविण्याची अमेरिका व युरोपीय राष्ट्रांची स्वप्नं स्वप्नच राहिलीत. भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातही कलाम यांचं योगदान डॉ. विक्रम साराभाई, डॉ. सतीश धवन, डॉ. ब्रह्मप्रकाश, डॉ. अनिल काकोडकर आणि इतर मोठय़ा वैज्ञानिकांएवढंच महत्त्वाचं आहे. आज युरोपीय देशांचे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करून परदेशी चलनात आपण जो पैसा कमवितो त्यामागे कलामांची मोठी मेहनत आहे. या कामामुळे कलामांचं नाव झालं असलं तरी ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग हा सामान्य माणसाच्या जीवनात बदल होण्यासाठी होत असेल तरच ते ज्ञान कामाचं असं डॉ. कलाम मानत. त्यांनी तसे प्रयोगही केलेत. पूर्वी वेगवेगळ्या कारणांमुळे अपंगत्व आल्यामुळे चालता न येणार्यांच्या पायात जड धातूंचा समावेश असलेले कॅलिपर बसविले जात. त्याचे वजन तीन-चार किलो असे. एकदा हैदराबादच्या एका रुग्णालयातील डॉक्टरांनी हे वजन कमी करता येईल का याची विचारणा त्यांना केली. कलामांनी काही दिवसातच नवीन धातुसंमिश्रे वापरून केवळ ३00 ग्रॅम वजनाची नवीन साधनं तयार करून स्वत: हॉस्पिटलला नेऊन दिली. कलामांच्या त्या शोधामुळे अपगांच्या आयुष्यात एक नवीन क्रांती आली.हृदयरोग्यांसाठीही डॉ. सोमा राजू यांच्यासोबतीने त्यांनी असाच कमी किमतीचा स्टेंट तयार केला. अँजिओप्लास्टी करताना हा स्टेंट वापरला जातो. वैद्यकशास्त्रात कलाम-राजू स्टेंट असं त्याचं नाव आहे. विज्ञानाचा उपयोग सामान्य माणसांचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी व्हावा आणि देश मजबूत व्हावा ही दोन मिशन घेऊन कलामांनी आयुष्यभर काम केलं. नवीन पिढीच्या डोक्यातही त्यांनी तीच स्वप्नं पेरलीत. झोपेत स्वप्न पाहू नका. जागे असताना मोठी स्वप्न पाहा आणि ती साकार करण्यासाठी स्वत:ला झोकून द्या, हेच त्यांचं नेहमी सांगणं असे. समाज आणि देश समृद्ध झालेत तर तुम्ही आपोआपच समृद्ध होता, असं त्यांचं सांगणं असे.
त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात मोठं होण्यासाठी कलामांनी कधीही प्रय▪केले नाहीत.राष्ट्रपतिपदावर निवड होण्यापूर्वी ते चेन्नई विद्यापीठाच्या एका छोट्या खोलीत राहत असे. पाच वर्षांनंतर राष्ट्रपतिपदावरून नवृत्त झाल्यानंतरही ते त्याच खोलीत राहावयास निघाले होते. मोठय़ा प्रयत्नाने समजूत घालून त्यांना जरा मोठं निवासस्थान घेण्यास राजी करण्यात आलं. डॉ. कलामांना कुठल्या सुखसुविधांचा लोभ नव्हता. अतिशय साधेपणाने ते संपूर्ण आयुष्य जगलेत. राष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर आपली संपूर्ण वैयक्तिक मिळकत त्यांनी वेगवेगळ्या संशोधन संस्थांना दान करून टाकली. ‘माझ्या उर्वरित आयुष्यातील गरजा आता फार कमी आहेत. माजी राष्ट्रपती म्हणून सरकारही माझी काळजी घेते. आता पैशाचं काय काम..’ असे म्हणत त्यांनी संपूर्ण बचत वाटून टाकली. काही वर्षांपूवी राष्ट्रपती भवनाच्या भेटीत तेथील कर्मचार्यांसोबत संवाद करण्याची संधी मला मिळाली होती. तेव्हा त्या कर्मचार्यांनी डॉ. कलामांचे जे किस्से सांगितलेत ते ऐकून त्यांच्याबद्दलचा आदर अधिक वाढला. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींसाठी दररोज देशाच्या वेगवेगळ्या भागातून हजारो रुपयांची ताजी फळं बोलाविली जातात. प्रत्यक्षात राष्ट्रपती त्यातील एखाददुसरं फळ खातात. बाकी फळं कर्मचारी वर्ग खातात किंवा वाया जातात. डॉ. कलामांच्या ते लक्षात येताच मला दिवसातून एखादं फळ लागतं. त्यासाठी रोज ७0 हजारांची फळं कशाला हवीत? असं म्हणत त्यांनी ती खरेदीच थांबविली. राष्ट्रपती भवनातील अनावश्यक सारे खर्च त्यांनी बंद केले. मला वापरण्यासाठी एक खोली पुरेशी आहे. बाकी ३६४ खोल्या बंद करून ठेवा, असे त्यांनी कर्मचार्यांना बजावले होते. राष्ट्रपती भवनाचं उद्यान आणि भवनाचा बराचसा भाग त्यांनी सामान्य नागरिकांना पाहण्यासाठी वर्षभर खुला केला. त्यांचे भाऊ, नातेवाईक किंवा जवळचे स्नेही राष्ट्रपती भवनात आल्यानंतर त्यांचा संपूर्ण खर्च कलामांनी स्वत:च्या खिशातून केला. एवढंच काय राष्ट्रपती भवनाची वाहनं त्यांनी नातेवाइकांसाठी कधी वापरू दिली नाहीत. कलामांचे भाऊ आणि नातेवाईक टॅक्सीने यायचे आणि टॅक्सीनेच जायचे. कलाम राष्ट्रपती झाल्यानंतर दोन सुटकेस घेऊन आले होते. परत जातानाही त्याच दोन सुटकेस घेऊन ते परत गेलेत. राष्ट्रपती व वैयक्तिक भेट म्हणून मिळालेल्या अनेक वस्तू होत्या. मात्र त्यातील एकही वस्तू त्यांनी सोबत नेली नाही. एवढंच काय भेटीदाखल मिळालेली पुस्तकंसुद्धा त्यांनी तेथेच ठेवलीत. असे अनेक किस्से राष्ट्रपती भवनाच्या कर्मचार्यांनी सांगितले होते. कलामांच्या नंतर राष्ट्रपतिपदावर बसलेल्या प्रतिभा पाटलांनी राष्ट्रपती भवनाचा ज्या पद्धतीने गैरवापर केला त्या पार्श्वभूमीवर कलामांचा हा साधेपणा मनावर अमीट छाप सोडून जाणारा होता.
आपल्याजवळ जे काही आहे ते मुक्तपणे समाजाला दिलं पाहिजे. ज्ञान-तंत्रज्ञान शेवटच्या घटकापर्यंत झिरपलं पाहिजे. ते काही लोकांची मिरासदारी होता कामा नये, हे ते प्रत्येक ठिकाणी सांगत. त्यामुळे जिथे कुठे ते जात अतिशय तळमळीने आपल्याजवळचं सारं ज्ञान, अनुभव ते देऊन जात. आज कलामांच्या जाण्यानंतर त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सल्लागार श्रीजनपालसिंग यांनी एक मोठी हृद्य आठवण शेअर केली आहे. देशाने तुमची कशासाठी आठवण केली पाहिजे? राष्ट्रपती, वैज्ञानिक, लेखक, मिसाईल मॅन, भारत २0२0 चे व्हिजन की आणखी काही… असा प्रश्न सिंग यांनी त्यांना विचारला होता. कलामांचं उत्तर सिंग यांना अचंबित करणारं होतं. ते म्हणाले होते, शिक्षक. परवा शिक्षकाच्या भूमिकेमध्ये शिलाँग आयआयएमच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना ते कोसळले. काम करताना, कोणताही आजार मागे न लागता ताठपणे मरण यावं ही कलामांची इच्छा होती. ‘अखेरचा निरोप हा नेहमी छोटाच असावा, खूपच छोटा..’, असं ते नेहमी म्हणत.तसाच निरोप त्यांनी घेतला. कोणालाही कसलाही त्रास न देता… मात्र देशाला प्रचंड चुटपूट लावून ते गेलेत.
अविनाश दुधे
(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)