आंद्रे आगासीच्या बाबाची कहाणी

गेल्या दोन-तीन महिन्यात चार चांगली पुस्तके वाचण्यात आली. त्यापैकीच एक म्हणजे आंद्रे आगासी ची ऑटोबायोग्राफी “OPEN”. लहानपणापासून तर त्याचा टेनिस मधून निवृत्ती पर्यंतचा काळ खूप छान शब्दबद्ध केलाय. मला टेनिस ची आवड मी नववी दहावीत असताना लागली. त्यामुळे त्याचा टेनिस मधला सुरुवातीचा प्रवास वाचताना खूप मजा आली. अक्षरशः माझ बालपण पुन्हा माझ्या डोळ्यासमोरून तरळले. पुस्तक खूप छान आहे, संधी मिळाली तर जरूर वाचा.

आंद्रेचा बाबा खूप कडक होता. अगदी हिटलरी कडक, खूप अतिरेकी स्वभावाचा. जबरदस्ती करणारा, मुलांच्या आयुष्याची रूपरेषा स्वतः आखणारा आणि मुलाकडून हिटलरी स्वभावाने ती रूपरेषा पाळून घेणारा. आंद्रे ने आपल्या आत्मकथेत वडिलासोबतचे संबंध व्यक्त करताना कुठलाही आडबंध ठेवला नाही. अगदी शेवटपर्यंत त्याने त्याच्या वडिलांना माफ केले नाही. पण खरं सांगू का? मला आंद्रेच्या बाबाच्या बाजूने बोलावेसे वाटते. असेल हि तो हिटलरी, कदाचित थोडा वेगळा वागू शकला असता तो. पण त्याच्या त्या वागण्यामागे मुलाचे चांगले व्हावे हीच इच्छा होती असेच वेळोवेळी दिसून येते. तोही एक सर्वसामान्य बाप होता शेवटी!

ईराणी ख्रिश्चन म्हणून इराण मधल्या जाचाला आणि अन्यायाला कंटाळून कसातरी पळून अमेरिकेत आला. अमेरिकेत आल्यावर शिकागो मध्ये प्रोफेशनल बॉक्सर म्हणून थोडे दिवस नशीब आजमावले. त्यानंतर लास-व्हेगास मध्ये कुठल्यातरी कॅसिनो मध्ये दरबान म्हणून लागला. चार मुले जन्माला आली. आंद्रे सगळ्यात लहान. त्याने सगळ्यांना टेनिस मध्ये अव्वल बनवण्यासाठी प्रयत्न केले. त्याचा एक नियम होता. वर्षाला एक मिलियन (१० लाख वेळा) बॉल हिट करायचे. तेवढे केले तर तुम्ही निदान टॉप ३-४% प्लेयर मध्ये तरी गणल्या जाल. थोडे विषयाबाहेर जातोय, हा नियम खूप प्रसिद्ध आहे, याला १०,००० तास प्रॅक्टिस नियम पण म्हणतात. तुम्हाला प्रो व्हायचे का? कुठलाही खेळ असो कि छंद असो, १०००० तास सराव करा, तुम्ही त्या कलेत, क्षेत्रात निपुण व्हालच अशी थोड्याफार प्रमाणात खात्री हा नियम देतो. आंद्रेच्या बाबाने तोच नियम अवलंबला. गणीत केले तर, वर्षाला १,०००,००० वेळा टेनिस बॉल मारायचा म्हणजे, दिवसाला २७४० वेळा, याचा अर्थ, निदान दिवसाला त्याला किमान ३-४ तास टेनिस कोर्ट वर सराव करावा लागेल. सहा वर्षाच्या मुलाला ४ तास सक्तीने, कधी कधी ६ तास सक्तीने एक गोष्ट करायला लावा, त्याचा परिणाम तिरस्कारातच होईल. आंद्रेनी कितीतरी वेळा पुस्तकात म्हटलंय, “मला टेनिस आवडत नाही”, कुणी जर हसण्यावारी नेले तर तो पुन्हा म्हणायचा “No, really I hate tennis”.

टेनिस कोर्ट बनवता यावा म्हणून ७८ X २७ फूटाच्या आकाराचे अंगण असलेले घर विकत घेतानाची त्याच्या बाबाची धडपड किंवा आंद्रे ला फ्लोरिडा टेनिस अकेडमी ला पाठवताना साठवलेली  ३०००-४०००$ ची आयुष्याची कमाई त्याला देताना मला फक्त त्याच्यात एक बाप दिसत होता. TV वर फ्लोरिडा च्या टेनिस ऍकेडेमी बद्दल जेव्हा त्याच्या बाबाने जाहिरात बघितली तेव्हा आंद्रे ला बोलावले आणि बोलला.

“माझाकडे जे काही होते ते सगळे मी तुला शिकवलंय. जी चूक मी तुझ्या तीन भावंडांसोबत केली ती मला तुझासोबत करायची नाही आहे. तू फ्लोरिडा ला निक बोलीटरी कडे जा, या पुढे तोच तुला तयार करेल. तुझ्या तीन महिन्याच्या कोचिंग पुरते पैसे आहेत माझ्याकडे”

“पण पॉप्स, आपल्याकडे पैसे नाहीत. आणि तसेही “I hate tennis” , मला नाही जायचेय”

“पैशाची काळजी नको करुस, आमची बचत तुला देतोय, चीज कर”

निक बोलेटेरी ने आंद्रेला खेळताना बघितले. आणि त्याच्या बाबाला फोन केला. याच्यापुढे आंद्रे माझ्याकडेच राहणार. पैशाची काळजी नको. तो लाखो ने कमवणार आहे तेव्हा मी घेईन त्याच्याकडून माझी फी. पोरगा दूर गेलाय. पण मोठा होणार या आशेने त्यावेळी आंद्रेच्या बाबानी फोनवर आवंढा गिळला.

विम्बल्डन ला, १९९२ साली गोरान इव्हान्सव्हिच ला हरवून जेव्हा आंद्रे पहिले ग्रँडस्लॅम जिंकला तेव्हा दुसऱ्या दिवशी त्याने त्याच्या बाबाला फोन केला.

“पॉप्स, मी जिंकलो”

फोन च्या दुसऱ्याबाजूने बराच वेळ आवाज आला नाही.

चांगला मिनिटानंतर आवंढा गिळून बाबा बोलला “गुड जॉब”

आंद्रे कडे जेव्हा बक्षिसांचा, नाईके च्या स्पॉन्सरशिप चा पैसा यायला लागला तेव्हा, आंद्रे गाडी घ्यायला गेला. आई बाबाना सोबत नेले. १९८५ ची कोर्व्हेट घ्यायची होती त्याला. गाडीची किंमत ३८,०००$. रंग फिक्स झाला, सगळे तयार झाले. सेल्समन बोलला पेपरवर्क करतोय. एव्हडे पैसे भरा. ३८५०० $. आंद्रेचा बाबा भडकला ना एकदम. बोलला हे ५०० जास्तीचे कशाला लावलेत?

सेल्समन बोलला, पेपरवर्क आणि हँडलिंग फी आहे.

बाबा भडकला, बोलला नाही. तुम्ही लोक लुटंताय. ३८००० फिक्स झालेत ना. त्याच्याउपर एक दमडी देणार नाही.

वीस वर्षाच्या तरुण रक्ताचा आंद्रे बाबावरच ओरडला. बाबा माझ्याकडे पैसे आहेत, विनाकारण सिन करू नका. देतो मी त्याला. ५०० च  तर मागतोय ना.

आंद्रे चा बाबा आधीच तापट स्वभावाचा. बोलला, ५०० म्हणजे फक्त ५०० झालेत तुझ्यासाठी, आज पैसा आहे म्हणून कालचे दिवस विसरलास. वेगास च्या कोर्टवर ५ रुपये जिंकण्यासाठी २ तासाची मॅच खेळायचास तू. आमचे सगळे सेविंग चे पैसे तुला ट्रैनिंग ला पाठवायला खर्च केले आम्ही. आणि मला शिकवतोय तू फक्त ५०० च आहेत म्हणून.

शेवटी आंद्रेचा बाबा मला सामान्य बाबाच वाटतो. मी जेव्हा भारतात पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा संबंध कुटुंबाला जेवायला बाहेर घेऊन गेलो, १६०० रुपयाच्या बिलावर मी १०० रुपये टीप ठेवली. बाबा ओरड्ले माझ्यावर. हे जास्तीचे १०० कशाला. मी बोललो बाबा टीप आहे ती वेटर साठी.

बाबा बोलले, टीप द्यायची ना २० रुपये दे. आणि ती बाहेर दरवाज्यावर असलेल्या चौकीदाराला दे. त्याला जास्त गरज आहे पैशाची. वेटर ला भेटतो नीट पगार. आणि तसाही तू एवढा श्रीमंत झाला नाहीयेस १०० च्या नोटा उडवायला. शेवटी माझेहि बाबा सामान्य बाबा सारखेच वागले.

आंद्रेचा बाबा कधीच प्रकाशझोतात आला नाही. कधी त्याच्या प्लेअर बॉक्स मध्ये दिसला नाही. नाही कधी त्याने आंद्रेच्या यशाचा वाटा उचलायचा प्रयत्न केला. अगदी आंद्रे कमवायला लागला तेव्हा सुद्धा त्याच्या बाबाची लाइफस्टाइल काही तेवढी चेंज नाही झाली. याचा अर्थ काय, आंद्रे ला घडवण्यात जरी त्याने महत्वाची भूमिका बजावली होती पण त्याचे फळ भोगण्यासाठी कधी मुलाच्या प्रसिद्धीवर-पैशावर कधी हक्क गाजवला नाही. सामान्य बापचं होता शेवटी तो.

कधी चुकत हि असेन बाबांचं. पण वडाच्या सावलीत वावरताना कधी कधी वारा-वादळामुळे त्याच्या पारंब्या झोंबतात अंगाला!

Previous article‘लैला’-भविष्यातील भारताचे भयावह चित्र
Next articleमॅड, यंग, प्रेमाची झिंग आणणारा ‘कबीर सिंग’
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here