अलीकडे खूप वर्षाने गावी गेलो होतो. वयाची सुरुवातीची १३ वर्ष या गावात गेली. जेव्हा गावं खरोखर गावं होती, शहराचे वारे गावाला लागले नव्हते अशा काळात मी गावात होतो. स्वाभाविकच खूप साऱ्या रम्य आठवणी आहेत या गावाच्या. तसं पिढीजात वगैरे म्हणतात तसं हे माझं गाव नाही. आई वडील दोघेही इथे दीर्घ काळ शिक्षक असल्याने सारं बालपण येथेच गेलं. त्यामुळे अकोला बाजारच माझं गाव, हे मी पूर्वीपासून सांगत असतो.
१९८३ मध्ये गाव सोडल्यानंतर पहिल्यांदाच गावात मुक्कामी गेलो. (मधल्या वर्षात २-३ धावत्या भेटी झाल्यात) विजय कदम, संजय घुमनर हे तेव्हाचे आणि आताही मित्र असलेले सोबती होते.
लहान असताना जिथे जिथे भटकायचो, उंडारायचो त्या साऱ्या ठिकाणी जाऊन आलो. तिथे असताना ज्या दोन घरात भाड्याने राहिलो ती घरं, प्राथमिक, माध्यमिक शाळा, गावलगतची नदी, मंदिरं, धर्मशाळा, पांदण, मित्रांची शेती, अंधारे गल्लीबोळ, आठवडी बाजार असे खूप काही भटकलो.
या एवढ्या वर्षात खूप काही बदलले आहे. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत जिथे राहिलो, ते मातीचं घर जमीनदोस्त झालं आहे. त्या घरासमोरची एकेकाळची नांदती विहीर बुजली आहे. त्या विहिरीवर असणारी लाकडी खिराडी, अजूनही आठवते . पहाटे उठून बहीण आणि मी ज्या पारिजातकाची फुलं वेचायला जायचो. पहाटे साडेपाच – सहाला पारिजातकाचा सडा पडलेला असायचा . बुंधा हलविला की पारिजातक अंगावर फुलांचा वर्षाव करायचा . बहिण सुषमा आणि शेजारची विद्या सोबत असायची . तो पारिजातक नेणिवेत एवढं घट्ट रुतून बसला आहे की आजही कुठे पारिजातक दिसलं की मी पार ४० वर्ष मागे जातो . ते झाड आता नाही. भोवतालच कोणतंही घरं, इतर झाडंही आता जागेवर नाही. तेव्हाची अनेक माणसंही नाहीत.
१९७७ ला येथील मातीच्या घरात अंधार पडला की कंदीलाच्या उजेडात मी अभ्यास करायचो . पहिल्या वर्गाला आम्हाला शिकविणाऱ्या शिंदे बाई तुळशीजवळ दिवा लावला की मला घेवून बसायच्या . अभ्यास घ्यायच्या आणि खूप साऱ्या कथाही सांगायच्या. ते लख्खपणे आठवलं. त्या कुठे आहेत, अनेकांना विचारलं. कोणालाच नव्हतं माहीत. त्या आता नसतीलही या जगात. नसतीलच. याच घरात १९७७ ला अगदी छोटया आजाराने बाबा गेले . तेव्हाचा आईचा आक्रोश आणि काय झालं याची उमज नसलेले ५ आणि ३ वर्षाचे आम्ही दोघे बहिण भाऊ , ती दुखरी आठवण त्या जागेवर गेल्यावर मनाच्या तळातून वर आली.
बाबा गेल्यानंतर विठ्ठलराव जाधव यांच्या वाड्यात आम्ही राहायला गेलो . ते दुसरं घर अद्याप जागेवर आहे, पण पार उदासकळा आली आहे . एकेकाळी माणसांनी गजबजलेला, चैतन्याने रसरसलेला तो मजबूत वाडा शेवटचे दिवस मोजतो आहे, हे पाहून गलबलून आले. त्या वाड्यात घरमालकाच्या घरातील गणेशोत्सव, महालक्ष्मी पूजन, दसऱ्यानंतर पाच दिवस म्हटली जाणारी भुलाबाईची गाणी, तुळशी विवाह..ते सारं चित्र एवढ्या वर्षानंतर डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं राहिलं. घरमालकीण काकूंचा दिवस पहाटे ४ ला सुरु व्हायचा . पाठोपाठ आई ४.३० -५ ला उठायची . ५.३० – ६ पर्यंत आम्हीही जागे व्हायचो.
या वाड्यातून घरमालकाच्या बैलगाडीतून दसऱ्याला सोने लुटायला जाणे, जवळच्या गावातील म्हसोला व इतर यात्रांना जाणे, ते सारं सारं आठवलं. या वाड्यासमोर अनेक वर्षे जुने कडुनिंबाचे दोन वृक्ष होते. रात्री त्या झाडांवर घुबड येऊन बसायचे. त्यांचा तो भीतीप्रद आवाज आणि त्या अंधाऱ्या रात्रीत घरमालकाचे वृद्ध काका भुतांच्या गोष्टी सांगायचे. तेव्हा गावातील अनेक झाडांवर भूत आहे, असे सांगितले जायचे. रात्री तिथून जाताना जाम टरकायची. एकदा तर रामलीला पाहून रात्री उशिरा घरी येताना एका वडाच्या जुन्या झाडाखाली मी आलो आणि उलटा पळत सुटले होतो.त्या तेव्हाच्या साऱ्या भुतांच्या झाडांना भेटी देऊन आलो. पण तेव्हा अक्राळविक्राळ वाटणारी ती झाडं यावेळी ‘बिचारी’ वाटत होती. (भिण्याचीही एक गमंत असते, ती गंमत आता उरली नाही)
गावातील शाळांची हालत घरांप्रमाणेच .उदास आणि उजाड. प्राथमिक शाळेची जुनी इमारत अद्याप आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांना आग्रह करून जुन्या काही गोष्टी असतील तर दाखवायची विनंती केली. (आई याच शाळेत शिक्षिका होती. तरी काही चूक झाली की शिक्षक, विशेषतः दख्खणकर सर तळहातावर स्केलने फटके द्यायचेत.) माझा किंवा आईचा उल्लेख असलेले जुने हजेरीपत्रक किंवा इतर रेकॉर्ड खूप शोधला. पण नाही सापडला. नाही म्हणायला माझ्या काळातील शाळेची घंटी सापडली. पुस्तकाची एक लाकडी पेटी सापडली.
माध्यमिक शाळेची कौलारू इमारत १५ वर्षांपूर्वीच पडली असे समजले. ज्या मैदानात आम्ही खेळायचो ते पार आक्रसलेले आहे. त्या काळात ८-१० वर्षाचे आम्ही कॉर्क बॉलने क्रिकेट खेळायचो . दर महिन्याला पगारासाठी आईला यवतमाळला जावे लागायचं . मी सोबत असायचोच. आईच्या मागे हट्ट करून मी कॉर्क बॉल घेवून यायचो . सोबत साठवणे बुक डेपोतून ६०-७० पैशात मिळणारी गोष्टींची पुस्तकं . माझ्याजवळ एवढी पुस्तकं जमा झाली होती की मी ५ पैसे शुल्क घेवून इतरांना वाचायला द्यायचो . मात्र तेव्हा मोजून २-४ ग्राहक होते.
माध्यमिक शाळेची जुनी कौलारू इमारत खूपच टुमदार होती. तीनच खोल्या होत्या , पण लाकडी डेस्क-बेंच वगैरे होते. मी ज्यावर्षी पाचवीला गेलो त्याच वर्षी दोन नवीन खोल्या बांधल्या. त्या खोल्या शेण आणून आम्हा विद्यार्थ्यांनाच सारवाव्या लागतं असे. या नवीन खोल्यांमध्ये खाली जमिनीवर बसावं लागायचं .जुन्या टुमदार इमारतीतील वर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असायचे .त्या इमारतीच्या दर्शनी भागात कृष्ण कमळाचा सुंदर वेल होता . शाळेचे शिपाई निखाडे काका यांचा माझ्यावर खूप जीव होता. ते मला ती फुलं काढून द्यायचे . आता जुन्या इमारतीच्या ठिकाणी नवीन इमारती आडव्यातिडव्या बांधून ठेवल्या आहेत. पण जुनी इमारत एवढी मनात ठसली आहे की या नवीन इमारतीचे फोटो नाही घ्यावे वाटले . या शाळेत माझं रेकॉर्ड पहायला मिळालं. खूप छान वाटलं.
त्याकाळी गावाला खेटून वाहणाऱ्या नदीची हालतही घरं आणि शाळेसारखीच झाली आहे . एकेकाळी या नदीचा प्रवाह वाहता होता, हे आज सांगूनही खरं वाटणार नाही. जिथे गणपतीचे विसर्जन करत होतो, पोहणं शिकण्याचा प्रयत्न करत होतो, गावातील महिला धुणं धुवायला येत होत्या, त्या साऱ्या जागा कधीच्याच गायब झालेल्या. त्या काळात तासनतास आम्ही नदीत पडून राहायचो. डोहात पोहणं शिकण्याच्या प्रयत्नात अर्जुन वृक्षाच्या मुळात पाय अडकल्याने धड पाण्यात नाही आणि धड झाडावर नाही, अधांतरी लटकलो होतो .पोट पार खरचटून निघालं, होतं. रक्ताळलेल्या त्या पोटावर मित्राने झाडपाला आणि मीठ लावलं होतं. (मी अजूनही त्याला गमतीने म्हणतो , जखमेवर मीठ चोळणं काय असते याची प्रत्यक्ष अनुभूती मला अतिशय लहान वयात आली ) त्या साऱ्याच आठवणी ताज्या झाल्यात (विशेष म्हणजे ज्या झाडाच्या मुळ्यात अडकून पडलो होतो, ते झाड सापडलं. ते अजूनही तसंच आहे. डोहही आहे , पण पाणी नसल्यासारखं )नदी आणि पाण्याचं वेड मला तेव्हापासूनच. ज्या नदीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत, तिला अनेक वर्षांपूर्वी दुरून वळविलं आहे, असे सांगण्यात आले. पण तिचीही एकंदरीत अवस्था वाईटच. एक होती नदी…म्हणण्यासारखी.
गावातील मंदिरं अद्याप जागेवर आहेत, पण नुतनीकरण करण्याच्या नादात त्याचा तेव्हाचा साधेपणा उरला नाही. हनुमान, बंदरबाबा, मातामाय ची मंदिरं. मातामायच्या मंदिरात तेव्हा दिवसाही एवढा अंधार राहायचा की भीती वाटायची. अमावस्येच्या रात्री गावातील काही मंडळी तिथे पूजा अर्चा करतात, असे सांगितले जायचे. त्यामुळे तिकडे कोणी फिरकायचे नाही.
गावात जुनी माणसं आता फार कमी उरलीत. बहुतेक शहरात स्थायिक झालेली. जी आहेत, ती थकलेली,झुकलेली. त्यांना भेटल्यानंतर त्यांच्या जुन्याच आठवणी डोक्यात होत्या ते बरं होतं, असं वाटून गेलं . त्यांच्यापैकी अनेकांजवळ अजूनही आई-बाबाच्या आठवणी आहेत. शिक्षक म्हणून दोघेही कसे शिस्तप्रिय होते, हे अनेकांनी सांगितले. बाबांचा मृत्यू इथेच मी केवळ ५ वर्षाचा असताना झालेला. ते गेल्यावरही आई, मी आणि बहीण ६-७ वर्ष येथे राहिलोत. येथे माझी ओळख ‘दुधेबाईंचा अवि’ अशीच. छान वाटते ती ओळख अजूनही.
आई यावर्षीच गेल्याचे सांगताच अनेकजण कळवळलेत. अर्थात आता आई बाबाच नाही तर त्यांच्या काळातील खूप सारी माणसं जगात नाही. गावाशी नात कायम राहावं यासाठी आई ज्या शाळेत शिक्षिका होती तिथे आईच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी वेगवेगळ्या वर्गात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्याचे ठरवून आलो. मुख्याध्यापकांना तसे सांगितले.
तेव्हाचे काही जुने मित्र, अजूनही गावात आहेत, त्यांचीही भेट झाली. पण मधल्या काळातील या एवढ्या वर्षांनी सारेच संदर्भ बदललेले.एकमेकांची ख्यालीखुशाली विचारण्याशिवाय फार नाही बोलता आलं.
जवळच्या मांजर्डा, हातगाव या छोट्या गावातही जाऊन आलो. अडाण नदीपात्रातही गेलो. सारंच खूप काही बदललेलं. बदल गयी दुनिया…हे कठोर वास्तव सांगणारं..
(लेखक ‘मीडिया वॉच’ अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक आहेत)
8888744796
(अविनाश दुधे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.infoया वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –अविनाश दुधे– type करा आणि Search वर क्लिक करा किंवा www.avinashdudhe.com वर क्लिक करा)
अतिशय मर्मस्पर्शी व भावविभोर असे लेखन. वाचताना सहजच डोळ्यांंच्या कडा आपोआपच ओल्या होतात. सगळीकडे हीच परिस्थिती आहे.
धन्यवाद सर !