Robert Waldinger हे हार्वर्ड विद्यापीठात गेल्या ७५ वर्षांपासून ‘आनंदी जीवन’ या विषयावर सुरू असलेल्या संशोधन प्रकल्पाचे संचालक आहेत. ७२४ लोकांच्या जीवनाचा सातत्याने अभ्यास करून या प्रकल्पकार्याच्या हाती आलेला प्रमुख निष्कर्ष असा -‘जीवनात आनंद मिळवण्यासाठी कशाची गरज आहे? या प्रश्नाचे उत्तर पैसा, पद, प्रतिष्ठा – असे काहीही असले, तरी आयुष्याच्या उत्तरार्धात माणसाला महत्त्वाचे वाटतात ते नातेसंबंध! चांगले संबंध तुमच्या मनासोबत तुमच्या शरीरालाही सुदृढ ठेवतात. ते तुमच्या जीवनातील तणाव नियंत्रक असतात. शरीर जास्त वेळ तणावग्रस्त राहिले, तर तुमचा आनंद संपून जातो व शरीरातील यंत्रणा बिघडतात. आनंद टिकवायचा, तर चांगले नातेसंबंध जपणे महत्त्वाचे आहे. संकटात ज्याला तुम्ही हक्काने हाक मारू शकाल, अशी किमान एक व्यक्ती तरी तुमच्या आयुष्यात असावी.’
‘मीडिया वॉच’चे संपादक आणि माझे मित्र श्री. अविनाश दुधे यांनी मला दिवाळी अंकासाठी ‘भारतीय लोक आनंदी का नाहीत?’ या विषयावर लेख मागितला. मी गेल्या अनेक वर्षांपासून ‘सुखी माणसाचा सदरा’ अशा सकारात्मक विषयावर व्याख्यान देत आलो आहे. माणसाला सुखी करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या पुस्तकांचे वाचन करीत आलो आहे. तरीही, माझ्या मित्राने मला हा विषय दिला! कदाचित, “तुझ्या भाषणांनी समाजात कवडीचा फरक पडला नाही,” असा अभिप्राय सभ्यपणे माझ्यापर्यंत पोहोचविण्याचा हा एक चांगला पर्याय त्याला वाटला असावा!
विनोद बाजूला ठेवू. हा विषय सुचविण्याचे कारण म्हणजे फिनलंड या छोट्याशा देशाला (लोकसंख्या अवघी साडेपंचावन्न लाख – म्हणजे आपल्या उण्या-पुऱ्या पुण्याएवढी!) जागतिक आनंद निर्देशांक यादीत WHI सलग सहाव्यांदा मिळालेले प्रथम स्थान… आणि त्याच यादीत भारताला मिळालेले 126 वे स्थान!! फिनलंड एवढा आनंदी देश कसा? या प्रश्नाचे उत्तर याच अंकातील श्री. शिरीन कुळकर्णी यांच्या लेखात निश्चितपणे मिळते. त्यांच्या मते GDP, सामाजिक पाठबळ, आरोग्यमान, स्वातंत्र्य, औदार्य आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवहार – या सहा निकषांवर फिनलंड पुरेपूर उतरणारा देश ठरला आहे. त्याशिवाय कष्टाळू, प्रामाणिक, शिस्तप्रिय व देशप्रेमी नागरिक, प्रदूषणमुक्त हवा, आनंदपूरक जीवन व कार्यशैली आणि मत्सररहित निकोप वातावरण यामुळे त्या देशाच्या आनंदात भरच पडली आहे. हे त्यांचे मत पटण्यासारखे आहे. या निकषांवर भारताला तपासले, तर आपण 126 व्या क्रमांकावर का आहोत, हे आपणास कळू शकेल.
आनंद निर्देशांक या वस्तुस्थितीकडे दुसऱ्या दृष्टिकोनातूनही पाहता येईल. आनंद ही फार व्यक्तिनिष्ठ आणि समाज-संस्कृतिनिष्ठ बाब आहे. त्यामुळे आनंदाच्या व्याख्या स्थल-काल-संस्कृतीप्रमाणे बदलू शकतात. कुणाला आवडीचे पदार्थ खाण्यापिण्यात आनंद वाटेल, तर कुणाला आवडीचे कपडे घालून मिरवण्यात; कुणाला पर्यटनाचा आनंद महत्त्वाचा वाटेल, तर कुणाला जनसेवेचा. कुणाला भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास हवासा वाटेल, तर कुणाला समलिंगी व्यक्तीचा. हे आनंद दैहिक म्हणून कमी महत्त्वाचे ठरत नाहीत. आचार्य रजनीश तर म्हणायचे, “ज्यांना साध्या देहाचे नैसर्गिक आनंद घेता येत नाहीत त्यांनी उन्नत अशा आत्मिक आनंदाचा बाता मारू नये!” माणसाने या दैहिक आनंदासोबत आणखी किती तरी प्रकारचे आनंद निर्माण करून ठेवले आहेत. त्याच्या मेंदू-मनाचा फार सूक्ष्म आणि तरल पद्धतीने विकास झाला असून, त्यातून माणसाचे एक अनोखे आणि संपन्न भावविश्व आकाराला आले आहे.
नर-मादी मिलनाच्या केवळ दैहिक पातळीवर न राहता तो आता प्रेम, समर्पण, मैत्री, स्नेह, करुणा, सहानुभाव अशा उन्नत भावनांमध्ये जीवनाचे साफल्य शोधत आहे. यांशिवाय शब्द, सूर, रंग, रेषा, आकार, अभिनय, नृत्य, नाट्य यांच्या कलात्मक आकारांतील सौंदर्याच्या आस्वादाने बेभान होण्याची (इतर पशुपक्ष्यांमध्ये न दिसणारी) एक वेगळीच सौंदर्यवृत्ती त्याने उत्क्रांतीच्या ओघात आत्मसात केली आहे. आत्मजाणिवेतून तो चिंतनशील बनला आहे व त्याने तत्त्वज्ञानासारखे जीवनाचा अर्थ लावणारे किती तरी विषय निर्माण करून ठेवले आहेत. हे विश्व कुणी निर्माण केले? या प्रश्नाच्या चिंतनातून त्याने ईश्वर नावाच्या शक्तीची कल्पित, पण भव्य आणि उदात्त प्रतिमा निर्माण केली आणि तिच्याविषयीच्या उत्कट भक्तिभावनेतून विविध उपासना पद्धती, गीते, नृत्ये, चित्र, नाट्ये, मूर्ती, शिल्पे, मंदिरे- अशा कितीतरी कलांचा कल्पनातीत विकास घडवून आणला आहे. इतर प्राणी नैसर्गिक सहजप्रेरणांच्या चौकटीत जगतात, तर माणसाने या सहजप्रेरणांच्या विरुद्ध जाऊन वर्तन करण्याची क्षमता प्रदान करणारी मूल्यव्यवस्था निर्माण केली आहे. म्हणूनच, आत्मरक्षणासाठी एरवी तत्पर असलेला एखादा माणूस प्रसंगी देशासाठी, समाजासाठी आनंदाने आत्मबलिदान करू शकतो.
माणसांच्या उत्क्रांत मेंदूने निर्माण केलेले हे नवनवे आनंद लक्षात घेता, जागतिक आनंदाच्या निर्देशांकासाठी निश्चित करण्यता आलेल्या वर उल्लेखित सहा कसोट्या पुरेशा वाटत नाहीत. त्यामुळे जगभरातील लोकांचा आनंद मोजण्याचे अंतिम निकष म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल की नाही, याबाबत मी साशंक आहे.
भारतीय लोकांचा आनंदाचा विचार करताना येथील आत्यंतिक विविधता नजरेआड करून चालणार नाही. जात, पंथ किंवा धर्म, भाषा, संस्कृती, आर्थिक वर्ग, सामाजिक स्थान याबाबत येथे कमालीची भिन्नता आणि काही ठिकाणी टोकाची विषमता आढळते. महानगरे, शहरे, निमशहरे, खेडी, पाडे असा रहिवासनिहाय विचार केला, तरी आनंदाचा निर्देशांक बदलू शकतो. प्रस्तुत लेख हा काही संशोधनावर आधारलेला लेख नाही. सर्वसाधारण निरीक्षणे आणि व्यक्तिगत अनुभव यांवर विसंबून मी लिहीत आहे. माझे सर्वसाधारण निरीक्षण असे आहे की, आपण जसजसे महानगरांकडून- शहरांकडे, शहरांकडून-निमशहरांकडे आणि खेड्यांकडून-पाड्यांकडे जातो, तसतसे आनंदी राहण्याचे प्रमाण वाढून गेलेले दिसते. खरे म्हणजे, या क्रमात GDP, भौतिक सुविधा, स्वातंत्र्य या गोष्टींचा संकोच होताना दिसतो. त्यामुळे आनंद कमी होत जायला हवा. मात्र, या क्रमात समूहभावना, निसर्गप्रेम, कलाप्रेम, पशुपक्ष्यांवरील प्रेम, परंपरा, श्रद्धा यांचे प्रमाण वाढत जात असल्याने हे आनंदाचे प्रमाण वाढत असावे. या आनंदाला कालसापेक्षतेचेही एक परिमाण दिसून येते. अलीकडच्या भूतकाळातील समाज हा वर्तमान समाजामध्ये जास्त आनंदी होता, असेही वाटते.
व्यक्तिगत अनुभवापासून सुरुवात करतो.
माझा जन्म (१९६५ ) विदर्भातील छोट्याशा खेड्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला. गावात आजूबाजूला जास्तीत जास्त शेतकरी, कष्टकरी व शेतीला पूरक व्यवसाय करणारे लोक. त्यांची सर्व सुखदुःखे शेतीशी जोडलेली. पाऊस चांगला झाला, पेरण्या वेळेवर साधल्या आणि पिके चांगली पिकली की, तेथील सरासरी माणूस हा बऱ्यापैकी खुशीत दिसे. शिवाय, शेतीचा व्यवसाय हा समूहजीवनाशी पक्का बांधलेला. शेतातील सर्व कामे-धामे, गावातील सण-उत्सव, परिसरातील जत्रा-यात्रा, मंदिरातील भजन-कीर्तने, कुटुंबातील लग्नकार्ये यांचे स्वरूप अपरिहार्यपणे सामूहिक असे. सर्व कामे सहकारी तत्त्वावर चालत. त्या समूह जीवनात माणूस एकमेकांची सुखदुःखे वाटून घेत. पराकोटीच्या दुःखातही कुणाला फार एकटे पडण्याची खंत नसे. शारीरिक कष्टाची कामे, मैदानी खेळ, ठावे-झडत्या, लोकगीते-संगीत, स्त्रीगीते आणि त्यांचे खेळ- यांमध्ये ग्रामीण लोकांनी बर्यापैकी सुख शोधले होते. गावात श्रीमंत-गरीब, श्रेष्ठ-कनिष्ठ असे भेद होते, पण त्यांच्या राहणीमानात फार फरक दिसत नसे. गावकुसाबाहेरचा वर्ग याताल अर्थातच अपवाद होता. मात्र, त्यांच्याही जगण्यात सामूहिकतेचे सूत्र होतेच. सर्वच प्रकारची प्रतिकूल परिस्थिती असूनही हा वर्ग डफडे-सनई-चौघडा-ढोलकी आणि गायन या कलांमध्ये पुढे होता.
अपवाद वगळता कष्टाची कुणाला लाज वाटत नसे. कामात आनंद आहे; आणि काम करतानाच ईश्वराचे नामस्मरण करता येते, हा वारकरी संतांचा विचार समाजात बर्यापैकी रुजलेला होता. स्पर्धा किंवा ईर्षा नव्हतीच असे नाही, पण त्यावर संयुक्त कुटुंबाच्या किंवा समाजाच्या संस्कारांचे थोडे तरी नियंत्रण होते. गरजा कमी होत्या. कितीही श्रीमंत कुटुंब असो, त्या घरातील सर्व मुलांसाठी एकाच प्रकारच्या कापडाचे कपडे शिवले जात. शाळेचे कपडे तेच बाहेरचे कपडे; आणि बाहेरचे कपडे तेच झोपायचे कपडे – असे काटकसरीचे सूत्र सर्वत्र दिसे. दप्तर म्हणून ‘महाबीज’च्या पांढर्या पिशव्या आणि रेनकोट म्हणून खताचे पोते असत. सामाजिक-राजकीय वातावरणात बर्यापैकी स्थैर्य आणि शांतता होती. पाऊस आजच्याएवढा लहरी नव्हता. नद्या भरून वाहत होत्या. प्रदूषण आजच्याएवढे नव्हते. रेडिओ ऐकायला मिळणे ही खूप मोठी श्रीमंती होती. पुढे दूरदर्शन आले, तेव्हा आठवड्यातून एक चित्रपट आणि एक चित्रहार पाहायला मिळणे, ही आनंदाची परमावधी होती. गावात असलेली जिल्हा परिषदेची सरकारी शाळा, हा गावातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेला शिक्षणाचा एकमेव पर्याय होता.
लग्नकार्यात वेगळी ब्युटीपार्लरवाली, मेंदीवाली किंवा रांगोळीवाली नसे. स्वयंपाकासाठी कंत्राट दिलेले आचारी नसत. सारांशरूपाने सांगायचे, तर जीवनात व्यापक समूहभाव आणि पारंपरिक संथपणा होता. बाहेर काय सुरू आहे? महानगरांमधील, परदेशांमधील श्रीमंत लोक, नट-नट्या, उद्योगपती कसे राहतात, याची फारशी कुणाला जाणीव नव्हती. या लोकांशी तुलना करायला हाताशी खात्रीशीर माहिती उपलब्ध नव्हती. सामाजिक धारणा स्थिर होत्या. मग त्या चुकीच्या का असेनात! शिक्षक कितीही सामान्य बुद्धीचे असोत, त्यांचा आदर करावा; घरातील प्रौढ कितीही तिरसट किंवा सनकी असोत, त्यांचा मान ठेवावा; वडीलधारे ठरवतील त्या जोडीदाराशी लग्न करावे, अशा स्थिर जीवनात एक सुरक्षिततेचे सुख असते. फार महत्त्वाकांक्षा नसल्याने अपेक्षाभंगाचे तीव्र दुःखही नसते. थोडक्यात म्हणजे, बहुतांश लोक जीवनात अल्पसंतुष्ट राहून सुख मानून घेणारे होते.
पुढे या संथ जीवनात दूरचित्रवाणीच्या खाजगी वाहिन्यांनी (झीटीव्ही-१९९२ ) प्रवेश केला; आणि हा शांत प्रवाह ढवळायला सुरुवात झाली. आता येथील साध्या-भोळ्या लोकांना दुरून का होईना, पण जगाचे व्हर्च्युअल दर्शन व्हायला लागले.
या जगदर्शनाने त्यांचे डोळे तर विस्फारलेच, पण त्यांच्यातील तुलनाभाव उफाळून वर आला. या इस्टमनकलर आणि नेत्रदीपक विश्वदर्शनाने त्याला त्याचे पारंपरिक आणि संथ आयुष्य निरस आणि अळणी वाटू लागले. उंची राहणी, चकचकीत घरे, महागड्या गाड्या, मोठमोठे समारंभ, पार्ट्या, पब, डान्सबार यांबद्दल सर्वसामान्य माणसाच्या मनात विलक्षण आकर्षण निर्माण झाले. याचा परिणाम असा झलाा की, अनेकांचा त्यांच्या सर्वसाधारण जीवनातील साध्या सोप्या आणि सहजप्राप्य आनंदावरचा विश्वास उडायला लागला. गावातील भजन-कीर्तने बोअरिंग वाटायला लागले. सण-उत्सव, जत्रा-यात्रा निरर्थक वाटू लागल्या. कबड्डी हुतूतू, कुस्त्या, मल्लखांब या मैदानी खेळांमधील त्याचे स्वारस्य संपून गेले. (अपवाद आहेत, पणते अपवादच!) म्हणजे आता या माणसाच्या मेंदूत आनंदाच्या नव्या कल्पना रुजवल्या गेल्या. त्यामुळे त्याला त्याच्या व वरच्या वर्गाच्या जीवनातील तफावत तीव्रतेने जाणवू लागली. पुढे संगणक, इंटरनेट आणि भू-स्थिर उपग्रह यांवर आधारित फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टा, ट्विटर, ब्लॉग या समाजमाध्यमांनी तर आणखीच कहर केला! माहिती व मनोरंजनाचे अवघे ‘ब्रह्म’ आता त्याच्या बोटाच्या क्लिकवर ‘सत्य’ होऊन नाचायला लागले. एका चित्रपटासाठी किंवा गाण्यासाठी आठवडाभर तगणारा हा माणूस आता हज्जारो चित्रपट आणि लाखो गाणी खिशात घेऊन फिरत होता!! माध्यमांच्या जगातली ही ‘कोपर्निकस क्रांती’ होती!!
खरे म्हणजे, त्या नव्या माध्यमांमुळे माणूस अधिक सुखी व्हायला हवा होता. त्याचा इतर माणसांशी संपर्क वाढायला हवा होता. त्याच्या नातेसंबंधांचा व मैत्रीचा परीघ विस्तारायला हवा होता… थोडक्यात म्हणजे, तो अधिक आनंदी व्हायला हवा होता! मात्र, मानवी उत्क्रांतीत गोष्टी दिसतात तेवढ्या सरळ रेषेत पुढे जातीलच, असे नाही! समाजमाध्यमांवर हज्जारो मित्र असलेली अनेक माणसे आतून एकटी होत गेलेली दिसतात. एका गाण्यासाठी झुरणार्या माणसाच्या बोटाच्या क्लिकवर आज हज्जारो गाणी हजर आहेत. मात्र, एखादे सुंदर गाणे सलग ऐकण्यातला स्वाभाविक आनंद तो गमावून बसला आहे. तेच चित्रपटांचे. असे का व्हावे? ‘समृद्धीचा शाप’ शीर्षकाचा पु.ग. सहस्रबुद्धे यांचा लेख मला आठवतो. त्या लेखात ते म्हणतात, ‘एखादी गोष्ट दुर्मीळ असेल तर तिच्या प्राप्तीतला आनंद मोठा असतो. तीच गोष्ट सहज उपलब्ध होत असेल, तर तिच्या प्राप्तीला फारसा अर्थ राहत नाही. म्हणजे, वस्तूंच्या आवश्यकतेपेक्षा जास्त उपलब्धता तुमचा आनंद कमी करते.’ सहस्रबुद्धे यांचा विचार वर्तमानात खरा ठरताना आपण पाहत आहोत.
या माध्यमांचा तारतम्याने वापर करण्याचा विवेक आपण घालवून बसलो आहोत का? असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. या प्रक्रियेत संपूर्ण दोष माणसांचाच आहे, असेही म्हणता येत नाही. एखाद्या श्रेष्ठ कलाकृतीचा तुम्ही सलग आस्वाद घ्यावा किंवा एखादा महान ग्रंथ तुम्ही सलग वाचावा यासाठी ही माध्यमे बनलेलीच नाहीत. जाहिरातींकडे आकृष्ट करण्यासाठी तुम्हाला सतत विचलित करणे व विशिष्ट उत्पादन विकत घेण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणे, हा त्यांचा हेतू असतो. त्यामुळे भीमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी, कुमार गंधर्व यांसारख्या व्रतस्थ गायकांच्या अजरामर गाण्यांमध्ये वाट्टेल त्या ठिकाणी जाहिराती घुसतात… आणि या कलाकृतींचे शतखंडित तुकडे ऐकण्याचे दुर्भाग्य रसिकांच्या वाट्याला येते!
या समाजमाध्यमांचे काही फायदे निश्चित सांगता येतील. ते नाकारण्यात अर्थ नाही. मात्र, दुसऱ्या बाजूने विचार केल्यास असे लक्षात येते की, या माध्यमांनी प्रत्यक्ष मानवी नातेसंबंधांना पर्याय म्हणून व्हर्च्युअल मैत्रीचा पर्याय लोकांपुढे ठेवला आहे. नातेसंबंध निर्माण करून टिकवायचे, तर त्यासाठी कृतिशीलता अपेक्षित असते. या गोष्टीचाही या माध्यमांनी बहुतेकांना विसर पाडायला लावला आहे. येथे तुम्ही केवळ शब्दांच्या फुग्यांमध्ये इमोजींची हवा भरून या आभासी नात्यांना वाट्टेल तेवढे फुगवू शकता! अशी नाती टिकवायची, तर प्रदर्शनबाजी आपसूक महत्त्वाची ठरते. जीवनाची चकचकीत, गुळगुळीत बाजू दाखवून कटू वास्तव लपवण्याच्या कलेत आता आपण बहुतांश लोक तरबेज झालो आहोत. यापेक्षाही वाईट गोष्टी म्हणजे, एका जागी बसून अतिरेकी मनोरंजनाची नशा या माध्यमांनी स्वस्तात उपलब्ध करून दिली आहे. ‘हातपाय न हलवता होणारे मनोरंजन’ हे अफूच्या गोळीसारखे असते, त्याची नशा मात्र सतत वाढत राहावी लागते,’ या बर्ट्रांड रसेलच्या वचनाचा अर्थ नवमाध्यमांच्या लोंढ्यात पुरता वाहून गेला आहे. या सर्वांचा परिणाम असा झाला की, लोकांसाठी ‘स्क्रीन टाईम’ हा ‘पीपल टाईम’पेक्षा महत्त्वाचा होता गेला. त्यामुळे मानवी नात्यातील जीवनपोषक उबदारपणा कमी होत गेला. ‘फेसबुकवर लाख मित्र अन् गल्लीत विचार नाही कुत्रं!’ ही या काळाचे अपत्य असलेली म्हण बरेच काही सांगून जाणारी आहे.
हा लेख लिहीत असतानाच TEOTALK या यू-ट्यूब चॅनलवर Robert Waldinger यांचे आनंदी जीवनविषयीचे फार सुंदर भाषण ऐकायला मिळाले. त्याने मी फार झपाटून गेलो. नंतर याच विषयावरची त्यांची एक मुलाखत मी यू-ट्यूबवरच ऐकली. Robert Waldinger हे हार्वर्ड विद्यापीठात गेल्या ७५ वर्षांपासून याच विषयावर सलगपणे सुरू असलेल्या संशोधन प्रकल पाचे चौथे संचालक आहेत. ७२४ लोकांच्या जीवनाचा ७५ वर्षे सातत्याने अभ्यास करून या प्रकल्पकार्याच्या हाती आलेले निष्कर्ष असे –
‘जीवनात आनंद मिळवण्यासाठी कशाची गरज आहे? या प्रश्नाचे तरुण माणसाचे उत्तर पैसा, पद, प्रतिष्ठा – असे काहीही असले, तरी आयुष्याच्या उत्तरार्धात त्याला महत्त्वाचे वाटतात ते नातेसंबंध! चांगले संबंध तुमच्या मनासोबत तुमच्या शरीरालाही सुदृढ ठेवतात. ते तुमच्या जीवनातील तणाव नियंत्रक असतात. शरीर जास्त वेळ तणावग्रस्त राहिले, तर तुमचा आनंद संपून जातो व शरीरातील यंत्रणा बिघडतात. आनंद टिकवायचा, तर चांगले नातेसंबंध जपणे महत्त्वाचे आहे. संकटात ज्याला तुम्ही हक्काने हाक मारू शकाल, अशी किमान एक व्यक्ती तरी तुमच्या आयुष्यात असावी.’
‘सुदृढ नातेसंबंध तुमचे रक्षण करतात हे खरेच, पण तुम्हालाही त्यांचे रक्षण करावे लागते. त्यांना निकोप ठेवावे लागते. शारीरिक स्वास्थ्यासाठी तुम्ही जसे जिममध्ये जाऊन रोज व्यायाम करता व प्रकृती सांभाळता, तसेच नात्यांनाही सांभाळावे लागते.
नातेसंबंध तुम्हाला आनंदी, सुखी व सुदृढ ठेवतात. एकटेपणा माणसाला मारक ठरतो. अशी माणसे मध्यमवयातच आजारी पडतात.’नातेसंबंधाचा विचार करताना हे लक्षात ठेवा की, मित्रांची संख्या महत्त्वाची नाही, तर मैत्रीतील घनिष्टता, आत्मीयता, सहजता महत्त्वाची असते. प्रेमपूर्ण नात्यांमध्ये तुम्ही सुरक्षित असता. चांगली नाती तुम्हाला वृद्धत्वापासून वाचवतात! तुमची स्मृती चांगली ठेवतात. अशा लोकांची शारीरिक पीडा सहन करण्याची क्षमता वाढलेली असते.’
रॉबर्ट वाल्डिंगरने आपल्या भाषणाचा समारोप मार्क ट्वेनच्या एका उद्धरणाने केला आहे. ते असे –
“आयुष्य फार छोटे आहे… भांडण करायला, माफी मागायला, हृदयाच्या जखमा कुरवाळायला, ठोशास ठोसा द्यायला वेळ नाही… फक्त प्रेम करायला वेळ आहे… आणि तेच महत्त्वाचे आहे.”
खरे म्हणजे ही गोष्ट कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनीही फार सुंदर शब्दांमध्ये सांगितली आहे. ‘प्रेमयोग’ या कवितेत ते म्हणतात ः प्रेम कुणावर करावं? कुणावरही करावं कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्य कालातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव…!
शेवटी एवढेच सांगावे वाटते की, जागतिक आनंद निर्देशांकाचे निकष काहीही असोत, चांगले नातेसंबंध तुम्हाला आनंदी ठेवतात, हे निश्चित! आणि हो, आता हा विचार एखाद्या कर्मठ धर्मगुरुचा कोरडा उपदेश राहिलेला नाही. हार्वर्डसारख्या विद्यापीठाच्या ७५ वर्षांच्या दीर्घ संशोधनातून प्रस्थापित झालेले हे एक सत्य आहे!
(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२३)
(लेखक नामवंत वक्ते व समीक्षक आहेत) 9822841190
Robert Waldinger: What makes a good life नक्की ऐका –क्लिक करा