आध्यात्मिक अनुभव म्हणजे मेंदूतील रसायनांचा लोच्या!

-डॉ. प्रदीप पाटील

मेसकालीन, एलसीडी, सिलोसायबीन, गांजा किंवा कॅनाबिस, अफू, एमडीएमए ही भ्रम निर्माण करणारी औषधे आहेत. या औषधांना भ्रम निर्मितीची औषधे किंवा सायकेडेलिक ड्रग्ज म्हणतात. ही औषधे.. मनाचे भ्रम, डोळ्याचे भ्रम, कानाचे भ्रम, तर निर्माण करतातच, पण, आपली नेहमीची जी सजगता असते ती सुद्धा बिघडवून टाकतात! याला आल्टर्ड स्टेट ऑफ काॅन्शियसनेस म्हणतात. एवढेच नव्हे तर “अतींद्रीय मनोवस्था” किंवा ध्यानधारणेत निर्माण होणारी मनाची अवस्था ही औषधे निर्माण करतात! म्हणजे थोडक्यात ही औषधे देवाधर्माशिवाय तुम्हाला तथाकथित “अध्यात्मिक अनुभूती” देतात.

……………………………………………………….

मेसकालीन, एलसीडी, सिलोसायबीन, गांजा किंवा कॅनाबिस, अफू, एमडीएमए या औषधांमध्ये . ट्रिपटामाईन, सेरोटोनीन, वगैरे अनेक रसायने असतात . यांचे काम म्हणजे झक्कास पैकी आपल्या संवेदनांना वाकड-तिकडं करून टाकणे. म्हणजे पंचंद्रियाच्या आधारे जेव्हा आपण एखादी माहिती घेतो, तेव्हा मेंदूत ती आल्या आल्या तिचा पार भुगा करून टाकण्याचे सामर्थ्य या औषधांमध्ये असते! ज्यांना ‘कॉग्नेटिव्ह डिस्टाॅर्शन्स’ असे म्हणतात.


अध्यात्मिकांना जेव्हा स्वतःचा ‘स्व’ हा पंचतत्त्वात पूर्ण विलीन झालाय असा वाटतो तेव्हा हीच औषधे त्याच भावना निर्माण करतात. म्हणजे स्वतःचा ‘स्व’ हा स्वतःलाच कळत नाही की तो कुठे गेला आहे!! ही एक भ्रमिष्ठावस्था असते. ज्याला ‘इगो डेथ’ म्हणतात. ही गुंगी निर्माण करणारी आणि भ्रम निर्माण करणारी औषधे बहुसंख्य वेळा धार्मिक लोक, मंत्र तंत्र करणारे लोक, भूते काढणारे लोक, अध्यात्मिक गुरु, सेवन करत असतात आणि त्यांना अनुभूती येत असते.गुरू,महाराज, तांत्रिक, यांचे हे अद्भुत साक्षात्कार म्हणजे मेंदूतील केमिकल लोच्या असतो. ख्रिश्चनांमध्ये ‘सेंट पीटर कॅक्टस’ नावाचे वनस्पती औषध सेवन करतात. ते स्वर्गात घेऊन जाते अशी जाम आणि ठाम श्रद्धा आहे! दक्षिण अमेरिकेत ही औषधे खाऊन ‘डिव्हायनेशन’ म्हणजे शकुन-अपशकुन, भविष्यं सांगतात. त्याचबरोबर मंत्र तंत्र विद्या सुद्धा चालते.

गुरू,महाराज, तांत्रिक, यांचे हे अद्भुत साक्षात्कार म्हणजे मेंदूतील केमिकल लोच्या असतो. ख्रिश्चनांमध्ये ‘सेंट पीटर कॅक्टस’ नावाचे वनस्पती औषध सेवन करतात. ते स्वर्गात घेऊन जाते अशी जाम आणि ठाम श्रद्धा आहे! दक्षिण अमेरिकेत ही औषधे खाऊन ‘डिव्हायनेशन’ म्हणजे शकुन-अपशकुन, भविष्यं सांगतात. त्याचबरोबर मंत्र तंत्र विद्या सुद्धा चालते.

या औषधांमुळे भन्नाट अशा भ्रमांची निर्मिती होते. जसे की..सगळीकडे रस्त्यांवर आणि घराघरांवर जाळी पसरलेली आहेत असे सांगणे !वास्तवात काही नसताना तिथे वेगवेगळ्या गोष्टी दिसणे. म्हणजे भूत किंवा आत्मा म्हणतो आपण ते दिसणे. ज्याला ‘परीडोलिया’ असे म्हणतात. काही जणांना तर आपल्या शरीरातून आत्मा वर चालला आहे असे दिसते. हे सारे भ्रम निर्माण करण्याची ताकद या औषधांमध्ये असते. जर आपल्या मेंदूतील रसायने नीट काम करत नसतील तर असे भ्रम निर्माण होतात. बहुसंख्य जे धार्मिक अनुभव, आध्यात्मिक अनुभव येतात ते अशा प्रकारचे मेंदूतील रसायनांच्या बदलातून येतात. आणि तसेच भ्रम सायकेडेलिक ड्रग्स किंवा औषधे हे सहजगत्या ते निर्माण करू शकतात! आपल्याकडे सामान्यांनी या औषधांचा वापर केल्यास शिक्षा होते, आध्यात्मिक गुरुंनी केल्यास त्यांचा गौरव केला जातो!!तेव्हा अध्यात्मिकांच्या अतींद्रीय शक्तीच्या गप्पा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मेंदूतून निघणाऱ्या भ्रमांच्या गोष्टी आहेत एवढे लक्षात ठेवले तरी पुरे.आध्यात्मिक अनुभव म्हणजे मेंदूतील रसायनांचा लोच्या!

‘‘विश्वाशी तादात्म्य पावतो… त्यात विरघळून गेलोय…’’
‘‘सर्वत्र पवित्र… सर्वोच्च सुखाचा वर्षाव होणारे वातावरण… याचा अत्युच्च आनंद अनुभवतोय…’’
‘‘साक्षात देवाचे दर्शन! लख्ख उजळणारा अनुभव!’’
‘‘सारी अहंपणाची विरक्ती निर्माण होत पुनर्जन्माचा अत्यानंदी अनुभव…’’
‘‘सर्वत्र शांती… सौख्य… शरीरातील चक्रे आणि उर्जा यांचे मिलन…’’

अशाप्रकारच्या ‘जाणिवा’ जेव्हा निर्माण होतात, तेव्हा त्या गूढ समजल्या जातात. त्या अतिंद्रिय शक्तीच्या समजल्या जातात. म्हणजे त्या इंद्रियापलीकडे जाऊन निर्माण होतात, असे सांगितले जाते. जेव्हा असे म्हटले जाते, तेव्हा अर्थातच एखादी शक्ती; मग ती अज्ञात असो वा वैश्विक, ती हे सर्व करवून घेते असे म्हटले की, आपसूकच या ‘जाणिवांना’ दैवी समजले जाऊ लागते.

असे व अशाप्रकारचे अनुभव हे धार्मिक आणि गूढ असतात. त्यामुळे त्याची तपासणी करता येत नाही, असे सुनावले जाते. जगातील सर्व धर्मांत आणि परंपरांत अशा अनुभवांची खैरात असते.
अशा प्रकारचे अनुभव ‘जाणवणे’ म्हणजे नेमके काय असते? याचा शोध सातत्याने विज्ञानाने घेतला आहे. ‘जाणीव’ म्हणजे अंतर्गत व बाहेरील अस्तित्व याविषयी जागृत असणे. शरीरांतर्गत व शरीरबाह्य अस्तित्वाचं भान राहणे जेव्हा घडते, तेव्हा ते मेंदूने साकारलेले असते. यात विचार, भावना, समजुती, कल्पना इ. अनेक घटकांनी ते घडते. सतर्कता हे त्याचे लक्षण बनते.

ही जाणीव, ही सतर्कता-जागरुकता जेव्हा थोडी कमी होते, तेव्हा सुस्तपणा येतो. जेव्हा ती विस्कळीत होते, तेव्हा ती मोठ्या प्रमाणावर खालावते. जेव्हा झोपेतून जागे होणेदेखील अवघड बनते, तेव्हा ती ग्लानी अवस्था असते. जेव्हा ही जाणीव कोणत्याही गोष्टीला प्रतिक्रिया देऊ शकत नाही, तेव्हा त्याला बेशुद्धी म्हटले जाते. ती जाणीव जेव्हा संपते, तेव्हा आपण म्हणतो, निर्जिवावस्था किंवा निर्जीव होणे घडते!

वरील सर्व जाणिवेच्या अवस्था, या जाणिवेच्या हललेल्या किंवा बदललेल्या अवस्था म्हटल्या जातात. यातील विस्कळीत अवस्था जी असते, त्या अवस्थेत आपली लक्षपूर्वकता बिघडते. जागरुकता बिघडते. ज्ञानीपणा बिघडतो. यामुळे घडते हे की, चित्र-विचित्र अनुभूतींची जाणीव होऊ लागते. यामुळे घडते हे की, चित्र-विचित्र अनुभूतींची जाणीव होऊ लागते, ज्याला भ्रम म्हणतात किंवा हॅल्युसिनेशन म्हणतात भ्रमांची उत्पत्ती ही धड जागरुक नाही, ना धड पूर्ण झोपलेला नाही, अशा अवस्थेतून पैदा होते. झोपेच्या अनेक अवस्था असतात. यात वेगोन डोळे फिरविण्याची जी अवस्था असते, ज्याला ‘रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप’ किंवा ‘रेम’ अवस्था म्हणतात, त्या अवस्थेत स्वप्नांचा रथ उधळलेला असतो. भडक, स्पष्ट, हुबेहूब स्वप्नांच्या अनुभवातून आपण जात असतो. ज्यात मेंदूतील अॅसिटील कोलीन, हिस्टामीनप, सेरोटोनीन इत्यादी अनेक रसायने भाग घेतात. या रसायनांच्या इंजेक्शन्सचा वापर करून झोपेच्या स्थितीला निर्माण करता येते.

मनाची ही अवस्था ही भ्रमांना जन्म देते, तेव्हा वास्तवातील संवेदना नसतात. कल्पनांच्या भराऱ्या असतात. विचारांना जखडून टाकले गेल्याने विचारभ्रमावस्था देखील तयार होते!
अशा अवस्था तयार होण्यामागील कारणे विविध असतात. ठळकपणे अवैद्यकीय आणि वैद्यकीय कारणे या मागे असतात. जाणिवेची बिघडलेली अवस्था, संमोहन, ध्यानधारणा, शरीरातून मृत्यू जाताना पाहणे या अवैद्यकीय कारणांनी भ्रमांची निर्मिती होते. तर, वैद्यकीय कारणांमध्ये मेंदूरोग, इजा, संसर्ग, ऑक्सिजन वायूची कमतरता, झोपेचे विकार, उपवास ही कारणे मोडतात.
भ्रम निर्माण करता येतात. अगदी काही रसायनांनी किंवा औषधांनी, ज्यांना ‘एनथिओजेन्स’ म्हणतात. हे पदार्थ संवेदना, मूड, जाणीव, ज्ञानानुभव, गूढ आणि धार्मिक अनुभवांची ‘प्रचिती’ येते! फार पूर्वीपासून हे पदार्थ धार्मिक विधीत, जादूटोण्यावेळी, मांत्रिकांच्या मंत्र-तंत्र उपचारात वापरले जायचे. थोडक्यात ‘गूढवाद… गूढवाद’ म्हणून जे प्रचारकरतात, तेच असे पदार्थ वापरून ‘दैवी अनुभव’ मिळाल्याचा ढोल पिटतात. वेगवेगळ्या प्रकारे भविष्य-ज्योतिष सांगणारे, ध्यानधारणा करणारे, योगीपणा करणारे, तपस्या-प्रार्थना-अनुष्ठान- जप यातून परमानंद मिळविणारे, भजनात गुंगून जाणारे अशांनी पदार्थांचा वापर न केल्यास नवलच! जेव्हा धर्माच्या व परंपरेच्या नावे विविध प्रकारचे विधी होत असता. त्यावेळी नृत्य, वादन, मंत्रोच्चार करताना अशा पदार्थांच्या सेवनाने ‘परमोच्च दैवी आनंदात’ तल्लीन होण्याचा आनंद उपभोगला जायचा.

जाणिवेची निरोगी पातळी सोडण्यास ही भ्रम निर्माण कणारी रसायने आजही उपलब्ध आहेत. ज्यांना ‘सायकेडेलिक्स’ म्हणतात. मेंदूतील अनेक व्यवहारांत सहभागी असणोर ‘सेरोटोनीन’ रसायन हे प्रामुख्याने या मनभ्रमित पदार्थांमुळे सैरभैर होते. जशी अवस्था ध्यानावस्थेत किंवा भावातीत भ्रमावस्थेत असते, तशीच मनोवस्था हे पदार्थ निर्माण करतात.प्रामुख्याने डी.एम.टी. (डायमिथिल ट्रीप्टामाईन), एल.एस.डी. (लिसर्जिक ॲसिड डायइथिलामाईड), मेस्कालीन सिलोसिन हे पदार्थ मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. लॅटिन अमेरिकेत डी.एम.टी. असणारा ‘अयाहुआस्का’ नावाचा पदार्थ, पेरुव्हियन टॉर्च वगैरे… आध्यात्मिक, गूढ आणि धार्मिक अनुभव यावेत यासाठी तिथे मांत्रिक व गुरु वापरीत असत-आहेत. हीच गोष्ट ॲमेझॉन खोरे, मेक्सिको इ. प्रदेशांत घडत असे, जिथे कौल लावणे, दैवी शक्तीला आवाहन करणे, अतिनैसर्गिक शक्तीस वश करणे वगैरे प्रकार चालायचे.

आजही हे भ्रमनिर्मितीसाठी वापरले जाणारे पदार्थ जवळपास १/४ लोकांत जगभरात वापरले जातात. यापैकी दक्षिण अमेरिकेत सर्वात जास्त वापरले जाणारे ‘अयाहुआस्का’ हे मांत्रिकगिरी आण. इतर धार्मिक विधीत वापरले जाते. पेरू, ब्राझील, कोलंबिया आणि इक्वेडोर येथे त्याचा उगम आढळतो. ॲमेझॉनमधील मंत्र-तंत्र विधी, कारदेसिस्ट भूतविद्या, उबांदा व कांडोम्बले सारखे आफ्रिकन-ब्राझिलियन धर्म-संप्रदाय यांच्यात याचा स्वैर वापर होतात. तेथील मांत्रिक आणि वैदू हे हडळ व वाईट आत्मे यांचा बंदोबस्त करण्यासाठी या पदार्थाचा वापर करतात. दुसऱ्याची उर्जा शोषून घेऊन चेटूक करण्यासाठी याचा वापर होतो, असे ते मानतात. रात्रभर त्यासाठी समारंभ करतात. सहभागी होणाऱ्यांना सेक्स व मटणास मनाई असते आणि उलट्या-जुलाब ज्यांना होतील त्यांच्यातील नकारात्मक उर्जा गेली, असे मानले जाते. या अयाहुआस्काचे डी.एम.टी. व इतर नशिल्या पदार्थाचे प्रकार होतात. या पदार्थांमुळे उलट्या व जुलाब होतात; पण ज्यांना पोटाचा अल्सर व गर्भारपण असते, त्यांच्यावर घातक परिणाम होतात. मानसिक रोग, जसे की, स्किझोफ्रेनिया, व्यक्तिमत्त्व दोष, बायपोलर रोग यांच्या गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागते. काहीजणांत ‘सेरोटोनीन सिंड्रोम’ नावाचा मानसिक बिघाड उद्‌भवतो.

भ्रामक स्थिती या अयाहुआस्काची वैशिष्ट्यपूर्ण असते! जे हे अमली पदार्थ घेतात, त्यांना लक्षणे सुरू होतात भ्रमांची. गूढ अनुभव, साक्षात्कार, आध्यात्मिक जाणीव इत्यादी! असे वाटू लागते की, या पृथ्वीवरच आहोत ना आपण! इथे का आलोय? आपण सर्वोत्तम कसे होऊ? आपण सर्वेसर्वा होणे चूक की बरोबर? इत्यादी मनात संचारलेले विचार म्हणजेच ‘आध्यात्मिक अनुभूती’ समजले जाते. अनेकांना शरीराबाहेर आपण तरंगल्याचा अनुभव येतो. ज्याला ‘आत्मा’ समजले जाते. बऱ्याचजणांना आत्मा शरीराबाहेर पडताना दिसतो, म्हणजे साक्षात मृत्यूचे दर्शन घडते, असे समजले जाते. काहींना वर्णन करता येणार नाही अशा आध्यात्मिक अनुभूती दिसतात आणि त्या दैवी समजल्या जातात. आजू बाजूचे चित्रविचित्र नाचणारे ‘आत्मे’ देखील दिसतात. या ‘समजुती’ निर्माण होतात जेव्हा अयाहुआस्काचा अंमल चढतो.

हे असे का घडते? हे भास का होतात? याचा तळ गाठण्यासाठी संशोधकांनी शोध घेतला. आढळले असे की, अमली पदार्थ हे स्मृती व दृष्टीची मेंदूतील केंद्रके ही जोमाने उद्दिपित करतात आणि ‘आतली समजूत’ किंवा ‘समजुती’ पेटतात.अशा अमली पदार्थांचा औषधाच्या मात्रेत उपयोग होऊ शकतो. अशी औषधे ही भ्रम निर्माण करतात. त्यांना सायकेडेलिक डिसोसिएटिव्हज्‌ किंवा डिलिरियंट्‌स म्हटले जाते. या औषधांची खासियत ही असते की, त्यांचा विचार, मूड्‌स आणि संवेदनांवर परिणाम होतो. स्मृती किंवा बुद्धिमत्तेवर थोडाचा परिणाम होतो. सेरोटोनीन, ग्लुटामेट, कोलिनर्जिकवर परिणाम करणारे असतात.

ही औषधे दृष्टिभ्रम निर्माण करतात (व्हिज्युअल अल्टरेशन). गूढानुभव निर्माण झाले, तर ते मोजण्याची चाचणी देखील असते. उदा. हूड मिस्टिसिजम स्केल, स्पिरिच्युअल ट्रान्सेंडेन्स स्केल किंवा मिस्टिकल एक्सपिरियन्स प्रश्नावली.डिसोसिएटिव्हज्‌ म्हणून समजली जाणारी औषधे वास्तवतेपासून दूर (डीरिअलायझेशन) घेऊन जातात. बाह्य जग स्वप्नवत दिसते, धूसर किंवा अवास्तव आभास होतो. स्वतःलाच वेगळे समजणे किंवा पाहणे (डिपर्सनलायझेशन) घडते. यात आपल्या हालचाली आपणांस दिसतात, पण त्या विषयी खात्री नसते. केटामीन, मिथोक्सेटामीन, फेनसायक्लीडीन, डेक्स्ट्रोमिथरफान, नायट्रस ऑक्साईड इ. अनेक औषधे यात मोडतात. आपल्या देशात भांग, चरस इ. अमली पदार्थ हेच काम करतात. पण, हे घडते धार्मिक विधी म्हणून! एल.एस.डी. किंवा सिलोसायबीन यांचा वापर मोठ्या प्रमाणावर जगात वाढला आहे.

असे अमली पदार्थ वापरून लोकांना विशिष्ट गोष्टींच्या नादी लावता येईल का? त्यांच्या श्रद्धा, समजुती बदलता येतील का? त्यांची राजकीय मते किंवा त्यांना धर्म बदलायला भाग पाडता येईल का? याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. व्यक्तिमत्त्व, मग ते कोणाचेही असो, ते अनेक वेगवेगळ्या कारणांनी घडते. स्वभाव, समजुती, विचार व भावना यांची बांधणी लहानपणापासूनच होत असते. कोणी काय घेतले व स्वीकारले, त्यावर त्याच्या समजुती व श्रद्धा तयार होतात. या गोष्टी पुराव्यानिपशी की बिनपुराव्यानिशी स्वीकारल्यात, यावर त्या वैज्ञानिक व विवेकी आहेत की नाही, हे ठरते. जेव्हा बिनपुराव्याच्या समजुती मोठ्या प्रमाणावर बाळगल्या जातात, तेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोन फारसा तयार होत नाही. अशावेळी अविवेक आणि मानसिक दुर्बलता मोठ्या प्रमाणावर निर्माण होते. त्यातून विचारदोष, तर्कदोष स्वभावात तयार होतात. हे दोष भ्रमांकडे नेतात आणि हे भ्रम जर त्रासदायक ठरते, तर औषधोपचारांची वेळ येते.

पण, बरेच भ्रम हे दैनंदिन कटकटी, समस्या आणि संघर्षापासून दूर घेऊन जातात. एक प्रकारे ही मानसिक शांतता असली, तरी ती तात्पुरती असते. ध्यानधारणा, प्रार्थना, विधी हे असे तात्पुरते अशांतिशामकाचे काम करतात. त्यामुळे व्यक्ती त्या वारंवार करण्यास उद्युक्त होते. अशावेळी जर इथनोजेन्स, अमली पदार्थ किंवा व्यसनास लावणारे पदार्थ घेऊन शांतता मिळवली, तर तेवढ्या वेळेपुरते बरे वाटते. ‘शॉर्टकट’ हा आजचा फंडा आहे. त्यामुळे ध्यानधारणा असो वा भ्रमनिर्माण करणारे पदार्थ लोकप्रिय व समाजसंमत न झाल्यासच नवल!

खरा उपाय असतो विचार बदल आणि विवेकी समजुती निर्माण करणे. हा मार्ग खूपच खडतर असतो. तो स्वतःच्या तात्कालीन स्वभावावर हातोडा मारून बदलाचा असतो. लहानपणापासून तयार झालेला असा ‘स्व’ तोडायला जे तयार होतात ते विवेकवादाकडे वाटचाल करतात आणि पर्यायाने शांतता अनुभवतात.

पण हे सारे लक्षात घेते कोण?

(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२३)

(लेखक नामवंत क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहेत.) 

9890844468 

………………………………………………..

हे सुद्धा नक्की वाचा –

माझ्या आध्यात्मिक अनुभूतीhttps://bit.ly/3OIDU4f

मेंदूचे गूढhttps://bit.ly/3waL4Id

……………………………

Previous articleआनंदासाठी चांगले नातेसंबंध महत्त्वाचे!
Next articleअशोकराव, ‘डिलर’चे ‘लीडर’ झालात! 
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.