अशोकराव, ‘डिलर’चे ‘लीडर’ झालात! 

– मधुकर भावे 

श्री. अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाले.  तसा त्यांना भाजपामध्ये जायला उशीरच झाला. पाच महिन्यांपूर्वी याच जागेवर मी लिहिले होते.. ‘अशोकराव, जायचं तर खुशाल जा…’ अनेक वाचकांनी काल फोन करून त्या लेखाची मला आठवणही दिली.  खरं म्हणजे, ज्या दिवशी राधाकृष्ण विखे-पाटील भाजपामध्ये गेले त्याच दिवशी अशोकराव जायचे… राधाकृष्ण विखे-पाटील भाजपामध्ये जाण्यापूर्वी त्यांना पत्रकारांनी विचारलेच होते…  ‘तुम्ही भाजपामध्ये जाणार आहात, अशी चर्चा आहे…’ त्यावर ते म्हणाले हाेते, ‘माझ्या रक्तातच काँग्रेस आहे … मी कसा जाईन?’ फडणवीस यांनी टाचणी लावली आणि ते रक्त इतक झटकन शोषून घेतले की, अशोक चव्हाण यांना पत्ता लागायच्या आत विखे-पाटील भाजपामध्ये दाखलही झाले. महसूलमंत्रीही झाले. अशोकराव त्याचवेळी जायला हवे होते कारण, भाजपामध्ये प्रवेश केल्यावर पत्रकार परिषदेत त्यांच्या तोंडून ‘काँग्रेस’ हा  शब्द आलाच…  तो सवयीचा भाग होता. आता हळूहळू ‘भाजपा’ शब्दांची उजळणी  करत ते सवय करून घेतील.

अनेकांनी म्हटले की, ‘४० वर्षे काँग्रेसमध्ये असलेले अशोकराव भाजपामध्ये गेले.’मी तसे मानत नाही. अशोकराव काँग्रेसमध्ये नव्हतेच… काँग्रेस सत्तेत होती… म्हणून ते काँग्रेसमध्ये होते… काँग्रेस सत्तेत नसती तर ते  काँग्रेसमध्ये असते की नाही, याची शंकाच आहे. महराष्ट्रात काही नेते असे आहेत… ते सत्तेशिवाय जगू शकणार नाहीत. रमू शकणार नाहीत. आणि त्यांना स्वस्थता वाटणार नाही. अशोकरावांच्या अगोदर काँग्रेसमधून अनेकजण भाजपामध्ये जावून बसलेले आहेत. यादी खूप मोठी आहे… ते सत्तेच्या पक्षात आहेत. पण, त्यांच्या हातात सत्ता नाही. त्यामुळे त्यांची अस्वस्थता ते जाहीरपणे सांगू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना झोप शांत लागत असली तरी  त्यांची घुसमट नक्की चालू आहे. त्यात आता अशोकरावांची भर पडली. आणखीही दोन-चार जण जाणार… लोकसभा निवडणुकीची तिकीटे जाहीर झाली की, ‘माझ्या मुलीला तिकीट दिले नाही…’, ‘माझ्या सुनेला तिकीट दिले नाही…’ अशी कारणे देवून दोघे-तिघे जाणार आहेत.

भाजपामध्ये जायला कारण लागत नाही आणि भाजप त्यांना घेताना भाजपाचे नेते त्यांना कारण विचारतही नाहीत. ‘चारसौ पार’ करायचा असल्यामुळे जेवढी गर्दी होईल तेवढी भाजपाला हवीच आहे.  पण, आता भाजपच्या नेत्यांना जे गोड वाटत आहे, एक दिवस  याच मुद्द्यांवरचा संताप लोक  तडाकून व्यक्त करतील, त्या दिवशी अगोदर गेलेले आणि आता भाजपवासी झालेले अशोकराव हे सगळे किती बिनकामाचे होते, याची आठवण भाजपाला येईल. शिवाय आता सध्या मूळ भाजपाची जागा काँग्रेेसच्या नेत्यांनी गर्दी करून व्यापलेली आहे.  त्यामुळे भाजपमध्येही खदखद सुरू आहे. निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांची अवस्था ‘सतरंज्या घालणे’ आणि  व्यासपीठावर ‘तांब्या भांडे’ ठेवण्यापूरती आहे.  भाजपामधील अनेक निष्ठावंत मित्र आज बोलत नाहीत. उद्या बोलतील. आमचे माधव भंडारी… अत्यंत निष्ठावंत भाजप कार्यकर्ता… कोण विचारतोय त्यांच्या निष्ठेला…  सध्या ‘चारसौ पार’ करायचे असल्यामुळे जे जे येतील ते-ते हवे आहेत. कारण भाजपाजवळ आश्वासक चेहरा नाही.

मोदी आणि शहा यांना महाराष्ट्रभर फिरवायचे असेल तर बाकीच्या राज्यांमध्ये दुसरे चेहरे कोण आहेत? आणि महाराष्ट्रात मोदी-शहा किती काळ फिरू शकतील… शिवाय आजच्या महाराष्ट्राच्या भाजपा नेत्यांमध्ये लोकांचा विश्वास असलेला नेता कोण? ही फोडा-फोडी त्याकरिता चालली आहे. फडणवीस तावडे, गावडे, शेलार महाराष्ट्र जिंकून देवू शकत नाहीत. त्यामुळे बाकीच्या पक्षात आमंत्रण देवून बोलावले जात आहे. अशोकरावांचा प्रवेश झाला. त्यादिवशी एक आठवण झाली… मला वाटते १८-१९ डिसेंबर २०१९ ती घटना आहे. त्या दिवशी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असलेले अशोकराव यांनी नांदेडला एक काँग्रेसचे शिबिर घेतले होते. त्या दिवशी फडणवीस नांदेडमध्येच होते. त्यांचेही भाषण चालू होते.  त्या भाषणात ते सांगत  होते की, ‘अशोक चव्हाण हे काही ‘लीडर’ नाहीत… तर ते ‘डिलर’ आहेत..’ अशोकरावांचे अभिनंदन केले पाहिजे… त्यांना ‘डिलर’पासून ‘लीडर’व्हायला सहा वर्षांचा कोर्स करावा लागला आणि फडणवीसांनी सर्टीफिकेट दिल्यानंतर एक प्रभावी लीडर म्हणून भाजपाने त्यांना स्वीकारले. भाजपात प्रवेश झाल्याबरोबर अशोकरावांना  राज्यसभेची उमेदवारी दिली गेली आहे. अशोकराव दोनदा खासदार हाेते. १९८६ ते १९८८ आणि २०१४ ते २०१९ लोकसभेत निवडून आले हाेते. त्यामुळे आता या वयात राज्यसभेत खासदार होण्यासाठी भाजपमध्ये जायचे इतकी त्यांची दयनीय अवस्था व्हावी?

त्यांच्याच मतदारसंघातील लोकांना विचारा… काय मत आहे त्यांचे? किती  वर्षे होते सत्तेत अशोकराव? शंकरराव चव्हाण यांच्याबददल मला आदर आहे. महाराष्ट्राच्या बांधणीमध्ये त्यांचे खूप काम आहे.  अर्ध्या महाराष्ट्राची तहान शंकरराव पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी बांधलेल्या धरणांतून भागते आहे.  त्यांचे एक चारित्र्य होते. शंकररावजी सलग ५० वर्षे सत्तेत होते. १९५० साली नांदेड नगरपरिषदेचे ते अध्यक्ष होते. १९५२ साली पहिल्यांदा हादगाव विधानसभा मतदारसंघातून विधानसभेला ते उभे राहिले. पराभूत झाले.. तरीही १९५५ पर्यंत ते नगराध्यक्ष होतेच…  १९५७ ला विधानसभेत निवडून आले. १९६२, १९६७, १९७२, १९७७ अशी एकूण पाच वेळा त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली. कायम मंत्री राहिले. १९७५ ते १९७७ राज्याचे मुख्यमंत्री झाले. १९८६ ते १९८८ पुन्हा मुख्यमंत्री म्हणून आले. १९८० पासून लोकसभेत गेले. केंद्रात शिक्षणमंत्री, गृहमंत्री अशी मोठी पदे भूषवली. २००० सालापर्यंत ते राज्यसभेचे खासदार होते. सलग ५० वर्षे सत्तेत राहिलेले ते महाराष्ट्राचे एकमेव नेते आहेत.

आता त्यांचे चिरंजीव अशोकराव हे सलग पाच वेळा महाराष्ट्र विधानसभेत आमदार, आधी राज्यमंत्री, मंग मंत्री, मग शंकरराव यांच्याप्रमाणेच दोनवेळा मुख्यमंत्री, मध्येच दोनदा खासदार आणि आजतागायत आमदार…  म्हणजे अशोकरावही १९८५ पासून आजपर्यंत २४+१५ वर्षे म्हणजे ३९ वर्षे या ना त्या प्रकारात, सत्तेत आहेतच. आता २७ फेब्रुवारीला निवडणूक झाली की,  ते लगेच खासदार होतील. म्हणजे ३९ वर्षांत ते सत्तेत नसलेला काळ म्हणजे १३ फेब्रुवारी २०२४ ते २७ फेब्रुवारी २०२४. गेल्या ३९ वर्षांत अशोकरावांना जी काही सत्ता मिळाली ते काँग्रेसमुळे मिळाली. त्यांचे सगळे लाड काँग्रेसने केले. आता भाजपामध्ये जावून त्यांना जास्तीत जास्त काय मिळणार? ते  काँग्रेसचे दोनदा मुख्यमंत्री राहिलेत. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेत. त्यांना भाजपावाले पुन्हा  मुख्यमंत्री करणार आहेत? प्रदेशाध्यक्ष करणार आहेत? त्यांना काय हवं आहेआणि ते कशासाठी गेले आहेत?  त्यांच्या मतदारांना त्यांनी हे उत्तर दिले पाहिजे.

‘राजकीय अपघात’ असे शब्द वापरून त्यांची सुटका होणार नाही. भाजपाकडून त्यांच्यावर काय दबाव होता? आज ना उद्या त्यांना सांगावेच लागेल… आणि ज्या भाजपाला ४०० जागांच्या पुढे आपण जागा जिंकणार आहोत, याची एवढी खात्री आहे, तर त्यांना ही फोडाफोडी कशाकरिता करावी लागत आहे? आणि महाराष्ट्र त्याकरिता का टार्गेट केला जात आहे… याचे मुख्य कारण म्हणजे… आज पुन्हा सांगतो… आजचे महाराष्ट्रातील भाजपाचे नेते महाराष्ट्र जिंकून देऊ शकत नाहीत. ती त्यांची कुवत नाही.  विधानसभा तर ते जिंकूच शकत नाहीत. अशोकरावांना मंत्री असतानाही नांदेड जिल्ह्यातील विधानसभेच्या सगळ्या जागा काँग्रेससाठी जिंकून देता आल्या नाहीत. त्यांचा उजवा हात असलेले डी. पी. सावंत यांनाही निवडून आणता आले नाही. वर्षभर मतदार संघात तळ ठोकून बसले तेव्हा कशीतरी स्वत:ची जागा निघाली. त्या अशोकरावांची भाजपाला किती मदत होईल?   आज महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्याच्या बाहेर अशोक चव्हाण यांच्या सभेची कोणत्या मतदारसंघात लोक वाट पाहात आहेत, असे एक गाव सांगा…

शंकरराव यांच्या कृपेने जे काही मिळाले त्यातही समाधान नाही.. काँग्रेसने सर्व लाड पुरवले… याची कृतज्ञता नाही. ज्यांनी ‘डिलर’ म्हटले, त्यांच्या हाताखाली जावून काम करायचे… महाराष्ट्राचे राजकारण इतके गलिच्छ होईल, असे शंकररावांनाही वाटले नसेल… शंकररावांच्या काही चुका झाल्या…  पण, १९७७ साली काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला.  म. स. का.  तोही इंदिरा गांधी यांच्याशी चर्चा करूनच… मुख्यमंत्री असलेले शंकरराव शरद पवारांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून गेले. तीही त्यांची चूकच… अशोकरावांनी तीच चूक केली. आपण ज्या जागा भूषविल्या त्यात समाधान मानले असते तर मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या व्यक्तिने एका टुकार मंत्रीपदासाठी चार पायंड्या खाली उतरायचे..  यात धन्यता मानणारा स्वाभिमान नाही. (पृथ्वीराज बाबाने मुख्यमंत्रीपदानंतर मंत्रीपद नाकारले… याचे महत्व त्यामुळेच वाटते.)

सत्तेसाठी हवं ते करणारे, अशी अशोकरावांची आता प्रतिमा झाली आहे. तुमचे आणि माझे व्यक्तिगत, कौटुंबिक संबंध आहेत..  शंकरराव असल्यापासून आहेत. शंकररावांनी माझ्यावर प्रेम केले… त्यांच्यात काही मोठे गुण होते…पण, तुमचा कोणावरच विश्वास नाही. तुमच्या स्वत:वरही नाही. आज तुम्हाला हे कडू वाटेल. परंतु भाजपवाल्यांनी  तुम्हाला कितीही सन्मान दिले तरीसुद्धा… अशोकराव, एक वेळ अशी येईल की,  तुम्हाला पश्चाताप होईल… आज काँग्रेसचे घर काहीसे अडचणीत आहे… पण, आपले घर अडचणीत असताना घर सोडून जाणाऱ्याला पळपुटा म्हणतात. तुमच्या या सगळ्या पळापळीमध्ये तुम्ही आता काँग्रेसला दोष द्याल… आरोप कराल… प्रत्यारोप कराल… पण, तुमच्या प्रवेशाचा  संताप महाराष्ट्रातल्या मतदारांना किती प्रमाणात आलेला आहे, याची तुम्हाला कल्पनाही नसेल.  महाराष्ट्रातील आजचे एकूण सगळे घाणेरडे राजकारण महाराष्ट्रातला मतदार शांतपणे पाहात आहे… तुम्हाला संपूर्ण नांदेड जिल्हा एकदाच  जिंकता आला… तुम्ही मुख्यमंत्री असताना… आता तुमची तीही ताकद नाही… तुमच्या प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यात ‘आनंदी आनंद’ झाला, असा तुमचा समज असेल तर थोड्या दिवसांनी लोक त्याचा हिशेब चुकता करणार आहेत.

संबंध महाराष्ट्रातच आजच्या महाराष्ट्राच्या घाणेरड्या राजकारणाबद्दल मनामनात संताप आहे, हे लक्षात ठेवा. त्या संतापाला वाचा फोडणारा आचार्य अत्रे यांच्यासारखा संपादक आज नाही. आणि ताकतीचा नेताही नाही. पण याचा अर्थ लोक मुर्दाड आहेत, असे समजू नका. भाजपावाले मनातून घाबरलेले आहेत… ही फोडा-फोडी, पळवा-पळवी त्यामुळेच सुरू आहे. पंचायत समिती, नगर परिषद, जिल्हा परिषद, महानगरपालिका… दोन-दोन वर्षे झाली निवडणुका नाहीत… जर महाराष्ट्रातील भाजपवाले एवढे शूर असते तर सगळ्या स्थानिक संस्थांना दोन-दोन वर्षे कुलूप लावून ठेवले नसते. लोकशाहीलाच कुलूप लावलेले आहे. कारण मनात एक भिती आहे.  नगरपालिका जिंकण्याची जर खात्री वाटत नसेल तर विधानसभा आणि लोकसभेच्या गोष्टी कशाला करता..? पण पहिल्या प्रथम ‘चारसौ पार…’ मग एवढी खात्री आहे तर चार आमदार निवडून न आणू शकणारे तुम्हाला का हवेत? कारण प्रसारमाध्यमे हातात आहेत. काँग्रेस तुटली-फुटली-संपली असा प्रचार करायला आता मोकळे आहेत. अजूनही फडणवीस सांगत आहेत, ‘आगे आगे देखो होता हैं क्या….’ म्हणजे अजूनही फोडा-फोडी होणार आहे. होऊद्या…  जाऊ द्या… ज्यांना जायचे आहे त्यांना जाऊ द्या… भाजपामध्ये गर्दी होऊद्या… मग कल्याणमध्ये जसा निष्ठावंत भाजपवाल्याने आवाज उठवला तसा आवाज महाराष्ट्रभर उठेल.

एक अलगदपणे अहिंसक, राजकीय अराजक महाराष्ट्रात अवतरत आहे. आणि सत्ताधारी पक्षाकडूनच त्या अराजकाला आमंत्रण दिले जात आहे, सन्मानित केले जात आहे.  पण सामान्य माणूस अजूनही अविचल आहे… ठाम आहे… तो फार शिकलेला नाही… पण शहाणा आहे.. तो शांत आहे… वेळ येण्याची वाट पाहतो आहे.. आणि तो क्षण आला की याच महाराष्ट्रातील मतदार कोण ‘लीडर’ आणि कोण ‘डीलर’ याचा कौल मतपेटीतून व्यक्त केलेला असेल… भाजपवाल्यांनाही सांगणे आहे की, ‘तुम्ही कितीही मोठ्या जागेवर असा… तुमच्या हातातील सत्तेने मतदार घाबरणार नाही. आणि तोच मतदार महाराष्ट्रात १९५७ सारखा चमत्कार करून दाखवतो की नाही ते बघा…’ येणाऱ्या  निवडणुकीत उमेदवार कोण? त्याची जात काय? त्याच्याजवळ पैसा आहे का? या कशाचाही विचार न करता हाच मतदार चमत्कार घडवेल.

फडणवीससाहेब, तुम्हाला आठवण म्हणून सांगतो… अहमदनगर जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाचे मुंबईचे बी. सी. कांबळे यांनी काँग्रेसच्या नगरच्या उमेदवाराला लोकसभेत पराभूत केले. दादासाहेब गायकवाड यांनी नाशिकमध्ये प्रस्थापिताला पराभूत केले. आणि त्यावेळी तुमचा जन्मही नव्हता. तेव्हा तुमच्या जनसंघाच्या उमेदवाराने आझाद हिंद सेनेचे सरसेनापती जगन्नाथराव भोसले… नेहरूंच्या मंत्री मंडळात पाच वर्षे मंत्री, त्यांना पराभूत केले… कारण, सामान्य माणूस  वरून शांत होता… मनातून संतापलेला होता. त्या मताचा चमत्कार त्याने दाखवला. आज महाराष्ट्र त्याच मनोभूमिकेत आहे. आणि तुमचे सरकार, तुमची राजकीय फोडाफोडी, आणि तुमचे राजकारण आजच्या घडीला गवताच्या गंजीवर बसलेले आहे. कितीही फोडा… निवडणूक झाल्यानंतर सगळा हिशेब होईल. आणि तो सामान्य मतदार करील.  अशोकराव, तुम्हाला शुभेच्छा…. राज्यसभेत खासदार झालात तर केंद्रात मंत्रीपद मागून घ्या… गृहमंत्री व्हा… शंकररावजी होते… तुमची ती हौसही एकदा फिटू द्या… आता तुम्ही ‘लीडर’ आहात… फडणवीसांना सांगा आता.

सध्या एवढेच!

   (लेखक नामवंत पत्रकार व वक्ते आहेत)

9892033458

Previous articleआध्यात्मिक अनुभव म्हणजे मेंदूतील रसायनांचा लोच्या!
Next articleकौलाची ही बंडी माझी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.