वेश्याव्यवसायाचा इतिहास

– समीर गायकवाड

वेश्याव्यवसायाचा इतिहास पाहायला गेलं तर जगातला एक प्राचीन उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे. हे तत्व सर्वत्र लागू होते. याला आपला देशही अपवाद नाही. वेश्याव्यवसाय प्रामुख्याने स्त्रियाच करतात. परंतु प्राचीन काळापासून पुरुषांचाही यासाठी वापर झाल्याचा आढळतो मात्र त्याला व्यवसायचे स्वरूप मिळाले नाही. हल्ली मात्र ‘जिगोलो’च्या रूपाने पुरुष वेश्यावृत्ती पहावयास मिळते. त्याच बरोबर किन्नरांचाही देहविक्री व्यवसाय जारी असल्याचे दिसून येतेय. ‘वेश्याव्यवसाय हा जगातला सर्वात प्राचीन व्यवसाय आहे’ हे वाक्य घासून गुळगुळीत झालेलं आहे. तरीही, हा प्राचीन व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या इतिहासाबद्दल अनेक गोष्टी आजही लोकांना माहीत नसतात. अनेकांच्या मते ह्या व्यवसायातल्या स्त्रिया शोषितच असतात आणि त्या नेहमीच शोषित होत्या; किंवा, हा व्यवसाय जाणूनबुजून पत्करणं म्हणजे नैतिक अध:पतनच, असं मानणारे लोकही पुष्कळ आहेत. अन्यथा ‘ही आमची बावनखणी, काय तिथल्या लावण्यखणी’; ‘गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी’ असे उमाळे काढणारे लोकही खूप असतात. वेश्याव्यवसायाचा इतिहास पाहिला, तर त्यात शोषण आणि शौक दोन्ही आढळतात.

ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये असे म्हणतात, याची व्यक्तिशः अनुभूती मी तरी घेतलेली नाही; मात्र हे विधान अनेक ठिकाणी प्रमाण म्हणून स्वीकारल्याचे वाचनात आले आहे. याच्या जोडीला वेश्यांचाही समावेश व्हायला हवा असे वाटते; कारण वेश्यांचे मूळ शोधणे, हे एक अत्यंत जिकिरीचे आणि कठीण काम आहे. या लेखात यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. याला अनेक कंगोरे आहेत; जे कुणाला आवडतील, तर कुणाला याचा तिरस्कार वाटेल.

वेश्याव्यवसायाचा इतिहास पाहायला गेलं, तर हा जगातला एक प्राचीन उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे. हे तत्त्व सर्वत्र लागू होते. याला आपला देशही अपवाद नाही. मराठी भाषाकोशात याची व्याख्या केली गेलीय- ‘चरितार्थासाठी तसेच अधिक धनाच्या वा मौल्यवान वस्तूंच्या मोबदल्यात प्रस्थापित झालेले दोन परक्या व्यक्तींमधील लैंगिक संबंध म्हणजे वेश्यावृत्ती वा वेश्याव्यवसाय, असे स्थूलमानाने म्हणता येईल. पैशाच्या आमिषाने, कमीअधिक प्रमाणात अनिर्बंधित स्वैर स्वरूपाचे कायमचे अथवा तात्पुरते लैंगिक संबंध ठेवण्याची पद्धत, म्हणजे वेश्याव्यवसाय होय.’ वेश्याव्यवसाय प्रामुख्याने स्त्रियाच करतात. परंतु, प्राचीन काळापासून पुरुषांचाही यासाठी वापर झाल्याचा आढळतो; मात्र त्याला व्यवसायाचे स्वरूप मिळाले नाही. हल्ली मात्र ‘जिगोलो’च्या रूपाने पुरुष वेश्यावृत्ती पाहावयास मिळते. त्याच बरोबर किन्नरांचाही देहविक्री व्यवसाय जारी असल्याचे दिसून येतेय. ‘वेश्याव्यवसाय हा जगातला सर्वात प्राचीन व्यवसाय आहे,’ हे वाक्य घासून गुळगुळीत झालेलं आहे. तरीही, हा प्राचीन व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या इतिहासाबद्दल अनेक गोष्टी आजही लोकांना माहीत नसतात. अनेकांच्या मते या व्यवसायातल्या स्त्रिया शोषितच असतात आणि त्या नेहमीच शोषित होत्या; किंवा हा व्यवसाय जाणूनबुजून पत्करणं म्हणजे नैतिक अध:पतनच, असं मानणारे लोकही पुष्कळ आहेत. अन्यथा ‘ही आमची बावनखणी, काय तिथल्या लावण्यखणी’; ‘गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी,’ असे उमाळे काढणारे लोकही खूप असतात. वेश्याव्यवसायाचा इतिहास पाहिला, तर त्यात शोषण आणि शौक दोन्ही आढळतात हे खरंच आहे; पण सांगण्यासारखं आणखी वेगळं त्यात काही सापडेल का ?

Gigalo

वेश्याव्यवसायात मुख्यत: स्त्रिया पुरुषांसाठी देहविक्रय करतात. पण, पुरुषांनी पुरुषांबरोबर सामान्यत: समलिंगी संबंधात केलेल्या वेश्याव्यवहाराची काही उदाहरणे आढळतात. स्त्रियांनी पैसे मोजून पुरुष वेश्यांकडून लैंगिक सुख घेण्याचा प्रकार अस्तित्वात असला, तरी तो अल्प प्रमाणात आढळतो. वेश्याव्यवसायातील व्यक्तीची मोबदला देणाऱ्या अनेक व्यक्तींशी लैंगिक संबंध ठेवण्याची तयारी असते. आपल्या ग्राहकाची निवड त्याचे वय, आरोग्य, वंश वा जात असे निकष लावून करणारी वेश्या आढळणे दुर्मीळ! ग्रीक व रोमन काळांतील ग्रंथांमध्ये वेश्यावृत्तीचे उल्लेख आढळतात. भारतीय समाजातही वेश्याव्यवसाय पूर्वापार चालत आलेला आहे. इतर अनेकविध कारणांप्रमाणेच काही अनिष्ट अशा धार्मिक व सामाजिक रूढी-परंपरांतूनही या व्यवसायाला चालना मिळाली. आपल्याकडची देवदासींची प्रथा याच वर्गात मोडते. वेश्याव्यवसायाचा इतिहास मानव जेव्हापासून समूह करून राहू लागला, तेव्हापासूनचा आहे. केतकर ज्ञानकोशात याची तपशीलवार व्याख्या देण्यात आलीय. त्यातील काही मजकूर इथे देतोय. ‘मानवसमाज जेव्हा वसाहती करून स्थिर, सामुदायिक जीवन जगू लागला, तेव्हा लैंगिक संबंधांवर अनेक प्रकारचे नीतिनियम व निर्बंध लादण्यात आले. प्रस्थापित कुटुंबसंस्था व त्यासाठी रूढ अशी विवाहसंस्था ही सामाजिक स्थैर्यासाठी आवश्यकच होती. त्यामुळे काही प्रकारचे लैंगिक संबंध हे समाजमान्य व प्रतिष्ठेसाठी अनिवार्य ठरले. त्याचबरोबर एकाच कुटुंबातील निकटवर्ती नात्यागोत्यांतील व्यक्तींना परस्परांत लैंगिक संबंध ठेवण्यापासून परावृत्त करण्यासाठी कठोर नियमने अस्तित्वात आली. उदा. आई-मुलगा, वडील-मुलगी, बहीण-भाऊ अशा निकटच्या नात्यांतील अगम्य आप्तसंभोग सर्वच समाजांत निषिद्ध मानला जातो. प्रत्येक समाजात विवाहसंस्था भक्कम राखणे, औरस संततीचे संगोपन व कुटुंबसंस्थेचे संवर्धन करणे, ही सामाजिक व्यवस्थेची अविभाज्य अंगे मानली जात. मात्र, अनिर्बंधिक लैंगिक संबंध ठेवण्याबाबत सामाजिक नियम नेहमी संदिग्ध राहिले. विशेषत: पुरुषप्रधान सामाजिक व्यवस्थेमध्ये स्त्रीकडे उपभोगाचे साधन म्हणून पाहिले जाते. या प्रवृत्तीमधून वेश्या-व्यवसाय हा प्रत्येक समाजात निर्माण झाला. वेश्यावृत्तीला एका बाजूने निषिद्ध मानले जाते व वेश्याव्यवसाय करणारी स्त्री कलंकित व हीन समजली जाते. तरीदेखील, वेश्याव्यवसाय प्रत्यके समाजव्यवस्थेत, प्रत्येक काळात पाय रोवून उभा राहिलेला आढळतो; कारण ही पुरुषांची गरज आहे आणि समाज बहुतांशी पुरुषसत्ताक आहेत!

मानवाचे लैंगिक जीवन हे साधारणत: संस्कार व रूढी यांनुसार आकारित होते. स्त्री-पुरुष संबंधांना सहजप्रवृत्तीनुसार किंवा वैयक्तिक इच्छेनुसार व्यक्त करण्याची पूर्ण मुभा प्रगत मानवी समाजात नाही. कायद्याने व सामाजिक रूढींमुळे विवाहाखेरीज लैंगिक संबंध ठेवणे अमान्य ठरते, तरीदेखील वेश्याव्यवसायाचे प्रचलन टाळता येत नाही. याला विविध कारणे संभवतात. लैंगिक संबंध केव्हाही व वेगवेगळ्या रूपात ठेवणे फक्त मानवालाच शक्य असते. वैयक्तिक शारीरिक सुखासाठी, तसेच विशिष्ट हेतू साधण्याच्या दृष्टीनेही लैंगिक संबंधांचा उपयोग होऊ शकतो. जेव्हा लैंगिक संबंध आर्थिक मोबदल्याकरिता अथवा इतर प्रकारचे हेतू साध्य करण्याकरिता (शारीरिक गरज व प्रजनन सोडून) ठेवले जातात, तेव्हा वेश्यावृत्तीची व वेश्याव्यवसायाची सुरुवात होते. मानवी व्यवहार हे सहज प्रवृत्तीपेक्षा बुद्धिपुरस्सरतेवर अवलंबून असल्याचा हा परिणाम आहे. विशेषत: ज्या समाजात लैंगिक संबंधांवर फारशी बंधने नाहीत, तेथे वेश्याव्यवसायाची सामाजिक प्रश्न म्हणून तीव्रता कमी असते, तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या समस्याही सौम्य असतात. उदा. नेदरलँडमध्ये वेश्याव्यवसायाला कायद्याने संमती दिलेली आहे. तेथील वेश्यांना उत्पन्नावर कर भरावा लागतो व त्यांच्यासाठी वैद्यकीय सेवा व इतर कल्याणकारी सोयी उपलब्ध करण्यास सरकार बांधील आहे. विवाहबाह्य लैंगिक संबंध स्वखुशीने ठेवण्याच्या व्यवहाराला जरी समाजमान्यता नसली, तरी त्यात आर्थिक मोबदल्याची देवाणघेवाण नसल्याने, ती वेश्यावृत्ती ठरत नाही. वेश्याव्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बहुतांश समाजामध्ये हेटाळणीचा असला, तरीदेखील एक सामाजिक वस्तुस्थिती या दृष्टीने ते मानवी व्यवहाराचे अविभाज्य अंग बनले आहे, असेही मत आढळते. मात्र, व्यक्तिगत कल्याणाच्या दृष्टीने हे चुकीचे आहे. कारण, हे मत जर योग्य आणि नैतिक मानले, तर ठरावीक स्त्रियांच्या शोषणाचा अधिकार समाजाला आपसूक प्राप्त होतो आणि त्याला अधिष्ठान दिल्यासारखे होईल.

वेश्याव्यवसाय जगभरात कशा पद्धतीने अस्तित्वात होता, याची माहिती वेधक आहे. प्राचीन काळातील ग्रीक व सायप्रसमधील संस्कृतींमध्ये विवाहयोग्य स्त्रियांना हुंड्याची रक्कम जमविण्यासाठी वेश्याव्यवसाय पत्करावा लागे. बॅबिलोनियन संस्कृतीमध्ये विवाहापूर्वी मुलींना इश्तार या देवतेला अर्पण करीत व तेथील राजपुरोहिताबरोबर संबंध आल्यानंतर ती विवाहयोग्य समजली जाई. इश्तार ही सुफलतेची देवता मानली होती व तिच्या मंदिरात धार्मिक मान्यतेने वेश्याव्यवसाय चाले. प्राचीन काळात चीनमध्ये वेश्यांची वस्ती स्वतंत्र व विशिष्ट ठिकाणी असे. त्यांना विवाह समारंभात विशेष महत्त्व असे व नवविवाहित दांपत्याबरोबर अनेक रखेल्या (काँक्यूबाइन्स) पाठवल्या जात. रूढी व परंपरेमुळे ही प्रथा समाजात दृढमूल झाली. जपानी संस्कृतीमध्ये कुटुंबसंस्थेच्या संवर्धनाला अतिशय महत्त्व होते. आपल्या मातापित्याचे व भावंडांचे पालनपोषण करण्यासाठी जी स्त्री शरीरविक्रय करी, तिला ‘जोरो’ असे संबोधले जाई व तिची प्रतिष्ठा कमी होत नसे.

प्राचीन ग्रीक समाजात ‘हिटायरा’ (चांगल्या मैत्रिणी) हा उच्चवर्गीय वेश्यांचा प्रकार होता. रोमन संस्कृतीतही प्रतिष्ठित, सुशिक्षित आणि बहुश्रुत गणिका आढळत. त्यांपैकी थिओडोराची कहाणी विलक्षण आहे. तिच्या सौंदर्यावर आणि बुद्धिमत्तेवर रोमन राजपुत्र पहिला जस्टिनिअन भाळला. रोममध्ये वेश्याव्यवसायाला प्रतिष्ठा होती, पण त्यांना विशिष्ट कपडे वापरावे लागत आणि केस तांबूस, पिंगट रंगात रंगवावे लागत. तसेच, वेश्यांना गावातील विशिष्ट भागात वास्तव्य करावे लागे; वेश्याव्यवसायासाठी परवाना घ्यावा लागे व वेश्यांच्या उत्पन्नावर कर आकारला जाई. ग्रीसमधील अतिशय सुशिक्षित स्त्रियांमध्ये वेश्यांपैकीच काही स्त्रिया असत. तर, रोममध्ये अत्युच्च दर्जाच्या स्त्रिया आपली वेश्यावर्गात गणना करून घेत असत. ग्रीक संस्कृतीत वेश्यांचे जे विविध प्रकार होते, त्यात भारतीय गणिकांप्रमाणे ‘हिटायरा’ (hetaíra) हा वर्ग अतिशय प्रतिष्ठित होता. त्या सुशिक्षित असत. त्यांना आपली मालमत्ता राखण्याचं स्वातंत्र्य होतं. (वेश्यांना किंवा गरती स्त्रियांना हे स्वातंत्र्य नव्हतं.) त्यांची राहणी विलासी असे. डिमॉस्थिनीझ (इसवी सन पूर्व तीनशे चौऱ्यांशी ते तीनशे बावीस कालखंड) या अथेनियन वक्त्याचे उद्गार असे होते – “हिटायरा या आपसुखाच्या अपेक्षेने पदरी बाळगतो, रखेल्या या आपल्या दैनंदिन व्यक्तिगत देखभालीसाठी असतात, तर पत्नी वैध संतती देण्यासाठी व इमानेइतबारे कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी असते.” ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात अथेन्समधल्या अ‍ॅस्पेझिया नावाच्या हिटायराकडे विविध क्षेत्रातले महत्त्वाचे लोक येत असत. सुशिक्षित असल्यामुळे ती सार्वजनिक वादविवादात भाग घेत असे. पेरीक्लीज या अथेन्समधल्या एका महत्त्वाच्या मुत्सद्द्याची ती सखी होती. ज्या काळात स्त्रियांचं समाजातलं स्थान फारसं महत्त्वाचं नव्हतं, अशा काळातही पेरीक्लीजसारख्या प्रभावशाली माणसावर तिच्या विचारांचा प्रभाव होता. तत्त्वज्ञ सॉक्रेटिस आणि नाटककार सोफोक्लीजही तिच्याकडे चर्चेसाठी येत असत. तिचं घर हे अथेन्समधलं एक प्रमुख सांस्कृतिक आणि वैचारिक केंद्र होतं. त्या काळात अथेन्समधल्या प्रतिष्ठित स्त्रियांनाही एक ‘पालक’ असणं बंधनकारक होतं; इतर अनेक स्त्रिया तर गुलामच असत. त्यामुळे अ‍ॅस्पेझिया अशा काळातली एक स्वतंत्र स्त्री होती, हे विशेष लक्षात घेण्याजोगं आहे. मध्ययुगीन युरोपातल्या प्रतिष्ठित वेश्यांना Courtesan ही संज्ञा रूढ होती. सोळाव्या शतकात व्हेनिसमधली व्हेरोनिका फ्रँको ही कूर्तिझान विशेष प्रसिद्ध होती. भोगविलासाचं शहर म्हणूनही पॅरिसची ख्याती होती. पॅरिसच्या प्रसिद्ध नाईटलाईफच्या जडणघडणीत अनेक घटकांचा सहभाग होता. ‘पॅरिसच्या सम्राज्ञी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कूर्तिझान स्त्रियांचाही त्यात समावेश होता.

वेश्याव्यवसायावर सामाजिक प्रतिबंध घालण्या विषयीचे निर्देश बायबलच्या ‘जुन्या करारा’त आढळतात. पेगन वेश्या ज्यू समाजाला धोकादायक असल्याची समजूत होती. ज्यू पित्यांनी आपल्या मुलींना वेश्याव्यवसायापासून परावृत्त करावे, असे निर्बंध होते. आद्य ख्रिस्ती लेखकांनी वेश्याव्यवसाय हे अनिवार्य असे दुष्कृत्य मानले. सेंट ऑगस्टीनने (इसवी सन पूर्व तीनशे चौपन्न ते चारशे तीस) म्हटले आहे, की मानवी वासनेला वेश्यांनी वाट काढून दिली नाही, तर समाजात बलात्कारासारख्या दुर्घटना घडतील. मध्ययुगात युरोपमध्ये सर्वच मोठ्या नगरातून सार्वजनिक वेश्यागृहे मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. त्यांना कायद्याचे संरक्षण व आधार होता आणि वेश्याव्यवसायाला परवानाही दिला जात असे. सार्वजनिक वित्तव्यवस्थेमध्ये वेश्याव्यवसायापासूनच्या उत्पन्नाचा वाटा मोठा होता. सोळाव्या शतकात गुप्तरोगाची संसर्गजन्य साथ सर्वत्र पसरली; तेव्हा वेश्याव्यवसायावर कडक नियंत्रणे लादली गेली. धर्मसुधारणा आंदोलनामुळे (सोळावे शतक) लैंगिक वर्तनासंबंधीचे नवे नीतिनियम प्रस्थापित झाले व त्यातूनही वेश्याव्यवसायाला पायबंद बसला. परिणामी, युरोपमधील अनेक वेश्यागृहे बंद पडली. गुप्तरोगाच्या बळींची संख्या जशी वाढत गेली, तसे या व्यवसायावरचे निर्बंध जास्तच कडक झाले. स्त्रियांच्या व मुलींच्या अनैतिक व्यापाराला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदे करण्यात आले.

रेड लाइट एरिया या संज्ञेमधले ‘रेड लाइट’ हे शब्द कोठून आले, याबाबत मतमतांतरे आहेत. रेड लाईट डिस्ट्रिक्टस् वा प्लेजर डिस्ट्रिक्ट हा शब्द पाश्चिमात्य देशातून आलाय. वेश्यावृत्ती वा सेक्ससंबधित व्यवसाय, असा याचा मोघम अर्थ अपेक्षित आहे. यात सेक्सशॉप्स, स्ट्रिप क्लब्ज आणि प्रौढांकरिताची थियेटर्स याचा समावेश होतो. जगभरातील मोठ्या शहरात असे रेड लाईट डिस्ट्रिक्ट्‌स अस्तित्वात आहेत. ‘रेड लाईट’ ही संज्ञा अस्तित्वात येण्याचं कारण म्हणजे, त्या काळात कुंटणखान्यांवर टांगलेले लाल दिवे. जेणेकरून तिथे काय चालते याचा होरा लोकांना यावा. ‘वुमन्स ख्रिश्चन टेम्परन्स युनियन’च्या १८८२ सालच्या बैठकीच्या मिनिट्‌समध्ये ही संज्ञा लेखी स्वरूपात सर्वात आधी आढळली. तर, ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार याचे पहिले अवतरण १८९४ मध्ये प्रकाशित झालेल्या ओहिओ प्रांतातील सॅण्डुस्की शहरातल्या ‘सॅण्डुस्की रजिस्टर’ नामक वृत्तपत्रात आहे. लेखक पॉल वेलमन सुचवतात की, हा उल्लेख आणि अमेरिकन ओल्ड वेस्टशी संबंधित याच अर्थाचे अन्य उल्लेख कन्सास प्रांतातील डॉज शहरातील संदर्भाशी निगडित आहे. एकोणिसाव्या शतकात इथे रेड लाईट हाऊस सलून्स होते. पण, याची खातरजमा अद्यापही झालेली नाही, हा तेथील लोककथांचा लोकोपवाद असू शकतो, असं काहींचं मत आहे. यानुसार प्रारंभीच्या काळातील रेल्वे लाईनवर काम करणाऱ्या कारागिरांना सुरक्षिततेचे साधन म्हणून दिलेले लाल प्रकाशाचे कंदील दिलेले असत. मुक्कामाच्या वेळी ते या सलून्समध्ये जात आणि आपल्या ‘क्रू’मधील अन्य सदस्यांना आपण कुठे आहोत हे लक्षात यावं, म्हणून ते त्या सलून्सवर कंदील टांगून ठेवत. त्यांच्या सहकाऱ्यांना कळावं म्हणून त्यांनी ही युक्ती वापरली, पण कालांतराने सर्वच लोक या लाल दिव्यांच्या घरांना वेश्यावृत्ती चालणारी घरे म्हणून ओळखू लागली आणि तेथूनच ‘रेड लाईट एरिया’ हा शब्द अस्तित्वात आला.

रेड लाईट डिस्ट्रिक्ट्‌स पौर्वात्य देशात ‘आकासें’ (akasen) या जपानी संज्ञेने ओळखले जात. याचा जपानी भाषेतला अर्थ ‘लाल रेषा’ असा होतो. जपानी प्रशासनाने जेव्हा प्राथमिक शहरी नकाशे बनवले होते, तेव्हा वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या भागाला लाल रेषेत वेगळे दाखवले होते, तेथून या भागास हे नाव रूढ झाले. त्याच वेळी या नकाशात काही भाग निळ्या रेषांतदेखील दर्शवला होता, ज्याचा अर्थ बेकायदेशीर भाग (aosen) असा होता. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात ‘स्पोर्टिंग डिस्ट्रिक्ट्‌स’ ही संज्ञा खूप लोकप्रिय झाली होती, पण तिचा अर्थ वैध ‘रेड लाईट डिस्ट्रिक्ट्‌स’ असा होता. त्या त्या शहरातील महापालिका प्रशासनांना या व्यवसायाच्या नियमनाचे अधिकार दिलेले होते. आताच्या नेदरलँडमधील डी वॉलेन हे शहर असो की जर्मनीमधील रिपेरबान शहर असो, तिथे वैध वेश्यावृत्ती नियमनाची हीच प्रशासकीय पद्धत आजही अस्तित्वात आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय असलेल्या हेग शहरात रेड लाईट डिस्ट्रिक्ट्‌सचा पूर्ण इलाखा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीत आहे.

दुसऱ्या महायुद्धापर्यंत युरोपात, अमेरिकेत कुंटणखाने व वेश्यावस्ती प्रत्येक मोठ्या शहरात होती. युद्धकाळात वेश्याव्यवसायाला चालना मिळाली. मात्र, युद्धोत्तर काळात बदलत्या नीतीमूल्यांमुळे तेथील समाजातील लैंगिक निर्बंध हळूहळू सैल होत गेले आणि स्वैर, अनिर्बंध व मुक्त लैंगिक संबंधांचे प्रमाण खूपच वाढले. विवाहपूर्व तसेच विवाहबाह्य संबंध, कुमारी मातांचे वाढते प्रमाण, कुटुंबसंस्थेचे विघटन या सर्व घडामोडींमुळे वेश्यावृत्तीचे स्वरूप पालटले. उच्चवर्गीय, नोकरदार स्त्रियांमध्येही ‘कॉलगर्ल’ म्हणून पैसे कमावण्याची प्रवृत्ती काही प्रमाणत वाढीस लागली. तसेच, वेश्याव्यवसायाशी निगडित इतर अनैतिक व्यवहार व अंमली पदार्थांच्या व्यापारासारखी गुन्हेगारी कृत्ये वाढीस लागली. मद्यपानगृहाच्या माध्यमातून वेश्या पुरवल्या जाऊ लागल्या. एड्ससारख्या भयंकर रोगाचा फैलाव झाला. पश्चिमी जगातल्या बहुतेक मोठ्या शहरांतून वेश्याव्यवसाय खपवून घेतला जात असला, तरी या व्यवसायाशी निगडित असलेल्या गुन्हेगारीवर मात्र कायद्याने कडक कारवाई केली जाते. ब्रिटिश संसदेने 1959 मध्ये केलेल्या कायद्यानुसार वेश्यांना उघडपणे खुल्या जागी गिऱ्हाईके पटवण्यावर मनाई आहे; मात्र त्यांना घरबसल्या हा व्यवसाय चालवता येतो. तथापि, ज्यांना या व्यवसायातून बाहेर पडावयाचे आहे, त्यांना पुनर्वसनासंबंधी योग्य प्रशिक्षण दिले जाते. स्कँडिनेव्हियन देशांतले (मुख्यत: डेन्मार्क, नॉर्वे व स्वीडन) या व्यवसायावरचे निर्बंध हे मुख्यत्वे आरोग्यविषयक बाबींसंबंधी आहेत. अमेरिकेत सर्व राज्यांत कायद्याने वेश्याव्यवसाय निषिद्ध ठरविला असला, तरीदेखील वेश्यावृत्तीला बांध घालणे तेथेही अशक्य ठरले आहे.

वेश्याव्यवसायास कारणीभूत ठरणारे घटक: कोणत्याही समाजात वेश्यावृत्ती व वेश्याव्यवसाय निर्माण होण्यास व फोफावण्यास कारणीभूत ठरणाऱ्या अनेकविध घटकांमध्ये मुख्यत्वे पुढील बाबींचा समावेश होतो – वेश्याव्यवसायास चालना देणाऱ्या प्रेरक घटकांमध्ये स्त्रियांची कौटुंबीक पार्श्वभूमी महत्त्वाची ठरते. आईवडिलांमधील सततचे तणाव व संघर्ष, व्यसनाधीन वडील किंवा वेश्याव्यवसाय करणारी आई-बहीण असणे, अशा परिस्थितीमुळे स्त्रीवर ही आपत्ती ओढवू शकते. स्त्रीला वेश्याव्यवसायाकडे आकृष्ट करणारे घटक मुख्यत: आर्थिक स्वरूपाचे असतात. दारिद्य्र व उपासमारीमुळे ग्रामीण भागातील स्त्रियांना फसवून, नोकरीची वा विवाहाची खोटी आमिषे दाखवून कुंटणखान्यात आणून विकले जाते. अनाथ तसेच परित्यक्ता स्त्रियांना कधीकधी शरीरविक्रयाखेरीज इलाज उरत नाही. त्याचप्रमाणे, चंगळवादी शहरी संस्कृतीमुळे अधिक पैसा कमविण्याकरिता काही स्त्रिया ‘कॉलगर्ल’चा व्यवसाय पत्करतात. यातील काही नोकरीच्या व्यतिरिक्त कमाईसाठी कुमार्गाला वळतात. शहरातील हॉटेल, क्लब व इतर मनोरंजनाच्या ठिकाणी या स्त्रियांचे दलाल गिऱ्हाईक पटवितात व अनैतिक व्यवहारांना संघटित स्वरूप प्राप्त होते. वेश्याव्यवसाय पत्करण्यामागचे निर्णायक घटक (प्रिसिपिटेटिंग फॅक्टर्स) हे प्रामुख्याने निराधार व फसविल्या गेलेल्या स्त्रियांच्या बाबतीत बलवत्तर ठरतात. कुमारी मातांना कुटुंबातून बहिष्कृत केले गेल्यास त्यांची दयनीय परिस्थिती होते. अशिक्षित व गरीब मुलींना असाहाय्यतेमुळे वेश्याव्यवसाय करावा लागतो.

जगभरातील वेश्याव्यवसायाची स्थिती अभ्यासताना आपल्याकडील अवस्थेवर देखील प्रकाश टाकल्यास, नेमकी परिस्थिती कळते. भारतीय समाजात वेश्याव्यवसाय फार प्राचीन काळापासून प्रचलित असल्याचे उल्लेख प्राचीन ग्रंथांत आढळतात. वेदवाङ्मयात देखील वेश्याव्यापाराविषी उल्लेख आढळतात. पुंश्चली, महानग्नी वगैरे शब्द वेश्या अर्थाचे होत. वाजसनेयी संहितेत हा एक धंदा म्हणून उल्लेखिला आहे. ऋग्वेदात अशा स्त्रीला ‘साधारिणी’ म्हणून संबोधले जाई. पुरुषांना; विशेषत: धनिकांना, अमीर-उमरावांना कामवासनेच्या पूर्तीसाठी रखेल्या ठेवण्याची किंवा वेश्यांकडे जाण्याची मुभा होती. ‘धर्मसूत्रां’त वेश्यांसंबंधी अनेक विचार प्रकट केलेले आहेत. गौतम धर्मसूत्रात वेश्याव्यवसायाबद्दल माहिती आहे. अशा स्त्रियांच्या दयनीय अवस्थेबद्दल उल्लेख करून, त्यांच्या विविध स्तरांची कल्पना धर्मशास्त्रात दिलेली आहे. गौतम ऋषींनी ‘दासी’, ‘गणिका’ व ‘पण्य स्त्री’ असे वेश्यांचे वर्गीकरण दिले आहे. दासी ही एकाच पुरुषाची सेवा करणारी, तर पण्य स्त्री सामान्य श्रेणीची वेश्या मानली जाई. नृत्य-गायनात व इतर कलांमध्ये कुशल असणारी गणिका उच्च श्रेणीची मानली जाई. ‘मृच्छकटिक’ या संस्कृत नाटकातील नायिका वसंतसेना ही गणिका सुसंस्कृत व कलावती म्हणून वर्णिली आहे.

महाभारत काळात, राजाच्या दरबारात नृत्यगायन क्षेत्रातील कलावंतिणी राजाच्या छत्राखाली आपली कला जोपासून दरबारात मनोरंजन करीत. महाभारताच्या ‘आदिपर्वा’त गांधारीच्या अनुपस्थितीत, धृतराष्ट्राची सेवा अशा दासींकडून होत असल्याचे म्हटले आहे. ‘उद्योगपर्वा’त देखील कौरवांच्या दासींचा उल्लेख आहे. या स्त्रिया राजदरबारातील नर्तिकाही असत व राजघराण्यातील पुरुषांच्या रखेल्याही असत. मत्स्यपुराणात वेश्यांची विविध कर्तव्ये नमूद केली आहेत. बौद्ध काळात (इसवी सन पूर्व 700 ते 500 वर्षे) अनेक धार्मिक व सामाजिक स्थित्यंतरे घडली. बौद्ध मठांमध्ये गणिकांना प्रवेश दिला जात असे. जातककथांमध्ये तसेच अन्य बौद्ध वाङ्मयातही ‘आम्रपाली’ या नृत्यनिपुण गणिकेसंबंधीचे उल्लेख आढळतात, जिला नगरवधू घोषित केले गेले होते. सुमारे पाचशे वर्षे बौद्ध धर्माचा अंमल भारतीय समाजावर राहिला, त्या काळात वेश्येला बहिष्कृत केले जात नसावे. गणिकेला सामाजिक प्रतिष्ठा होती. गणिकेला राजाकडून सन्मान व गुणीजनांकडून प्रशंसा लाभत असे, असा उल्लेख नाट्यशास्त्रात आढळतो. ती अभिगमनास व चिंतन करण्यास योग्य अशी असावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

कौटिलीय अर्थशास्त्रात (इसवी सन पूर्व चौथे शतक) वेश्यांचे नऊ वर्ग वर्णिले आहेत. तसेच, वेश्याव्यवसायाचे नियंत्रण करण्यासाठी नियमावली दिली आहे. वेश्यांच्या उत्पन्नावर करवसुलीचा अधिकार राजाला असल्याचे नमूद केलेले आहे. राजदरबारात वेश्यांना असलेल्या प्रतिष्ठेचा उल्लेख कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रात केला आहे. वात्सायनाने रचलेल्या कामसूत्र (इ. स. तिसरे वा चौथे शतक) ग्रंथातील ‘वैशिक’ या अधिकरणामध्ये विविध प्रकारच्या वेश्यांसंबंधी माहिती आली आहे. या काळात वेश्यागमन जरी समाजमान्य असले, तरी विविध जातींच्या वेश्यांना वेगवेगळे स्थान असावे. कामसूत्रामध्ये कुंभदासी, परिचारिका, स्वैरिणी, कुलटा, नटी, शिल्पकारिका, रूपाजीवा व गणिका असे वर्ग नमूद केले आहेत. ज्या वेश्येला चौसष्ट कला अवगत आहेत, ती ‘गणिका’ होय. भारतात गणिकांची मोठी परंपरा आहे. त्या सुशिक्षित असत. काव्य-कला-शास्त्रादी विद्यांत त्या निपुण असत. त्यामुळे निव्वळ देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांपेक्षा त्या वरच्या दर्जाच्या असत. त्यांना समाजात प्रतिष्ठा होती. मंगलकार्ये, सणसमारंभ अशा प्रसंगी त्यांची उपस्थिती शुभ मानली जाई. चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र परतले आणि भरताला भेटले, तेव्हा ‘घोडे, हत्ती आणि गणिका यांचा क्रीडेकरिता वापर करत होतास किंवा नाही?’ असा प्रश्न त्यांनी भरताला विचारला होता (संदर्भ:‘बावनखणी’ – द. ग. गोडसे). रतिक्रीडा ही एक क्रीडाच मानली जाई. त्यात काही वावगं समजलं जात नसे. पुरुषांना वश करण्याच्या गणिकांच्या क्षमतेमुळे गुप्तचर म्हणूनही त्यांचा वापर केला जाई. कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार हा व्यवसाय वंशपरंपरागत नव्हता; तर त्यात प्रवेश करण्याआधी पुष्कळ प्रशिक्षण घ्यावं लागत असे. गणिकांच्या वर्तनावर शासकीय नियंत्रण असे. त्यांनी नियमबाह्य वर्तन केलं, तर त्यांना कठोर शिक्षा किंवा दंड होई. एखाद्या पुरुषाला रिझवण्याविषयीच्या राजाज्ञेविरोधात जाऊन गणिकेनं जर ते करायला नकार दिला, तर तिला शिक्षा होई. गणिकांना कर भरावा लागे. थोडक्यात, इतर स्त्रियांपेक्षा त्या स्वतंत्र आणि प्रतिष्ठित होत्या, तरीही त्या राजसत्तेच्या अधीन होत्या. तत्कालीन सत्ताधारी वर्गाच्या मर्जीनुसार वेगवेगळ्या काळात भारतीय गणिका कमीअधिक प्रमाणात स्वतंत्र होत्या.

या काळातील समाजव्यवस्थेत वेश्याव्यवसायाला विशिष्ट स्थान व दर्जा दिलेला आहे. समाजाचे ते एक अविभाज्य अंग असे. जैन राजांच्या कारकिर्दीमध्ये (इ. स. दुसरे शतक) राजदरबारातील कलावंतीण ही राजाची रखेली असे व तिने इतर पुरुषांबरोबर संबंध ठेवणे निषिद्ध होते. मात्र, सामान्यजनांना रिझविणाऱ्या ‘सामान्य वेश्या’ इतर वर्गातील पुरुषांबरोबर संबंध ठेवू शकत. मात्र, काळाच्या ओघात वारांगना व गणिका हा भेद नष्ट होऊन त्यांची निर्भर्त्सना व अवहेलना होऊन त्यांना अमीर-उमरावांकडून उपमर्द सोसावा लागला. चाणक्य नीतीसार या ग्रंथात सामान्य वेश्यांची दयनीय अवस्था वर्णिली आहे.

भारतातील पारंपरिक समाजव्यवस्थेमध्ये वेश्या वा कलावंतीण ही ‘अखंड सौभाग्यवती’ म्हणून संबोधली जाई. दक्षिण भारतात नववधूचे मंगळसूत्र कलावंतीण ओवून देत असे. दुर्गापूजेसाठी देवीच्या मूर्तीसाठी शकुन म्हणून वेश्येच्या घरातील माती आणून सुरुवात करीत. लैंगिक संबंधाचे नियमन करताना पारंपरिक समाजात विविध रूढी-परंपरेमुळे काही प्रमाणात विवाहबाह्य संबंधांना मान्यता होती. भारतातील रूढी – परंपरांनुसार काही धार्मिक भावना आणि अंधश्रद्धा देवदासी प्रथेला पोषक ठरल्या. तिसऱ्या शतकातील धार्मिक ग्रंथांत व साहित्यामध्ये या प्रथेचा उल्लेख आढळतो. अथर्ववेदामध्ये देवदासींना ‘गंधर्व गृहिता’ असे म्हटले आहे. कालिदासाच्या ‘मेघदूत’मध्ये देवदासींचे काव्यात्म वर्णन आढळते. कल्हणाच्या राजतरंगिणी ग्रंथात सातव्या शतकापासून ही प्रथा उत्तर भारतात रूढ असल्याचे म्हटले आहे. वाराणसीच्या विश्वनाथ मंदिरात नृत्यनिपुण देवदासी होत्या. महाराष्ट्रातही खंडोबाला मुरळी म्हणून मुली वाहिल्या जातात. काही मुरळ्याही वेश्याजीवन पत्करत. मुरळीचे जीवन थोडेफार सुकर होऊ शकले, पण देवदासींना ते सुख अजूनही पूर्णत्वे मिळालेलं नाही. 26 फेब्रुवारी 1923 रोजी देवदासीच्या नावाखाली होणारा वेश्याव्यापार बंद करण्याच्या दुसऱ्या कायद्याचा ठराव लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये सर माल्कम हेले यांनी आणला होता. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाराला शिक्षा करण्याची तरतूद पीनल कोडात पूर्वीच केलेली होती. तशा कृत्याला मदत करणाराला शिक्षा करण्याचा या विधेयकाचा हेतू होता. हा मुद्दा विशेष आहे. यात आपला देहविक्रय करण्यास कबुली देण्याच्या बाबतीत स्त्रीचे वय कमीत कमी सोळा वर्षाचे असावे, असे त्यांनी सुचविले होते. अब्रूच्या बाबतीत निर्णय करण्यास हे वय निदान अठरा तरी असावे, अशी नी. म. जोशी यांनी सूचना आणली होती, ती शेवटी मंजूर झाली; पण या ठरावाची अंमलबजावणी सरकारने आपल्या हाती घेतली.

भारतात ब्रिटिश अंमल सुरू झाल्यानंतर या व्यवसायाला वेगळे स्वरूप प्राप्त झाले. उदा. कोलकाता व मुंबई येथील युरोपीय व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी, ब्रिटिश सैन्याच्या शारीरिक सुखासाठी कुंटणखाने निर्माण झाले. कोलकाता शहरातील कलिंगा बाजार व चितपूर येथील वेश्यावस्तीसंबंधीचे उल्लेख तत्कालीन जनगणनेत सापडतात. बंगालमध्ये ‘कुलीन’ पद्धतीमुळे ब्राह्मणांना बहुविवाह करण्यास मुभा होती. कौटुंबीक प्रतिष्ठेसाठी अनेक आईबाप भरमसाठ हुंडा देऊन आपली मुलगी उच्चजातीय ब्राह्मणांना देऊ करीत. जरठ पतीच्या निधनामुळे अनेक अश्राप मुली बालविधवा होत. ज्या सती जात नसत त्यांची अवहेलना होई व त्यामुळे त्यांना कुंटणखान्यात आश्रय घ्यावा लागे. तत्कालीन बंगाली साहित्यातदेखील कलानिपुण वेश्यासंबंधी उल्लेख आढळतात. शरच्चंद्र चतर्जींच्या ‘श्रीकांत’, ‘देवदास’ कादंबऱ्यांमधून या स्त्रियांची संस्कृती व पिळवणूक यांचे चित्रण आढळते. श्रीमंत जमीनदार व व्यापारी रखेल्या ठेवणे ही प्रतिष्ठेची बाब समजत. रखेल्यांना ‘बंधा’ वेश्या म्हणत. त्यांना घरदार व दागदागिने दिले जात.

वेश्या ही कलंकित समजली जात असली, तरीदेखील या पेशासंबंधी परस्परविरोधी व संदिग्ध मतप्रणाल्या प्रचलित आहेत. स्त्रियांचे अपहरण करणे, कुंटणखाने चालविणे इ. कायद्याने निषिद्ध ठरविलेले असले, तरी या कायद्यांचा अंमल मर्यादित प्रमाणात आढळतो. 1974 नंतरच्या स्त्रीमुक्तिवादी चळवळीच्या प्रवर्तकांनी वेश्याव्यवसायास ‘अत्यंत हीन व स्त्रियांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व आणि आरोग्यास बाधक ठरलेला धंदा’ असे म्हटले आहे. पितृसत्ताक विचारसरणीमुळे ही विदारक वस्तुस्थिती समाजात मान्यता पावते व केवळ कायद्याने तिचे निर्मूलन होऊ शकत नाही, या बाबीला या चळवळीच्या नेत्यांनी प्राधान्य दिले.

कोलकता – सोनागाची, मुंबई – कामाठीपुरा, दिल्ली – जी.बी.रोड, मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर येथील रेशमपुरा, उत्तरप्रदेशच्या मेरठमधील कबाडी बाजार, हे देशातील पाच सर्वात मोठे रेड लाईट एरिया आहेत. याखेरीज, पुण्यातील बुधवारपेठ, वाराणसीमधील दालमंडी, युपीच्या सहारनपूरमधील नक्कास बाजार, बिहारच्या मुजफ्फरपूरमधील रेड लाईट एरिया आणि नागपूरमधील गंगाजमुना हे भाग देखील याचसाठी कुख्यात आहेत. पैकी कामाठीपुरा हा इंग्रजांनी वसवला होता. या माहितीतही एकमत नाही. 1795 मध्ये आंध्रप्रदेशातून आलेल्या कामाठी महिलांनी देहविक्रयास प्रारंभ केला होता, असेही सांगितले जाते; तर अन्य माहितीनुसार 1880 मध्ये ब्रिटिशांनी अधिकृतरित्या येथे चौदा लेनमधून कामाठी वेश्यांना वसवले आणि ब्रिटिश सैनिकांच्या देहभुकेची तजवीज केली. यामुळेच या भागाचे नाव कामाठीपुरा पडले, असेही सांगितले जाते. ब्रिटिश सैनिकांच्या भारतीय स्त्रीविषयीच्या सेक्स फँटसीची तपशीलवार नोंद घेतली गेली, त्या वर्णनानुसार काळसर करड्या वर्णाची, लकाकत्या तुकतुकीत कायेची नि काहीशा स्थूल देहाची टंच भारतीय स्त्री त्यांना भूक भागवण्यासाठी हवी होती. हे वर्णन कामाठी स्त्रियांना चपखल बसले, म्हणून त्यांची निवड या व्यवसायासाठी केली गेली. त्यांच्यामुळे कामाठीपुरा हे नाव पडले! तर, दिल्लीमधील गारस्टीन बस्टीन रोड (जीबी रोड) चे आधीचे नाव 1965 मध्ये बदलून स्वामी श्रद्धानंद मार्ग असे ठेवण्यात आले होते, पण ते नाव कधीच वापरात आले नाही. याच भौगोलिक भागात मुघल काळात पाच मोठे कोठे होते, जिथे जिस्मफरोशीचा धंदा चाले. ब्रिटिशांनी त्याचे संयुक्तिक स्वरूप बनवून त्याला स्वतंत्र वसाहतीत परिवर्तित केले. जीबी रोडचे वैशिष्ट्य म्हणजे बांगलादेश आणि नेपाळमधून आणलेल्या मुलींचा इथे जास्ती भरणा असतो. दर वर्षी सुमारे सात हजार सेक्स वर्कर्स मुली नेपाळहून भारतात आणल्या जातात. पैकी 66 टक्के मुली ह्या अशा कुटुंबातून येतात, ज्यांचे वार्षिक उत्पन्न केवळ 5000 रुपयांच्या आसपास आहे. या मुली त्यांच्या पालकांकडूनच विकल्या जातात. जोडीनेच विवाहाच्या वादामुळे किंवा आकर्षक नोकरी किंवा अपहरण करून या मुलींना कुंटणखान्याच्या मालकांना विकल्या जाते. यातील 40 ते 50 टक्के मुली अठरा वर्षाखालील असतात. धक्कादायक बाब अशी की, पालकांच्या सहमतीने काही ठिकाणी 9 किंवा 10 वर्षे वयोगटातील मुलींनाही वेश्याव्यवसायात ढकलले जातेय. भारतात आजवर सापडलेल्या केसेसमध्ये सहा वर्षे वयाच्या चाईल्ड सेक्स वर्कर मुलीचा समावेश आहे. जमिनीखालील बंकर्समध्ये या मुलींना दडवले जाते. यात बेकायदेशीर कारवाया करण्यास प्रतिबंध करण्यापासून सरकारने कायदे केलेत.

आज एकट्या दिल्लीमध्ये लाखो रुपयांची उलाढाल या व्यवसायात होते, कोलकत्यात त्याहून अधिकचे व्यवहार होतात, देशभरात करोडो रुपये दिले घेतले जातात. याची न कुठली नोंद न कुठला हिस्सावाटप! मात्र, या बायकांच्या कमाईवर डोळा असणारे गुंड, मवाली, खुनी, मसल-मनी पावरवाले गबरगंड आणि सफेदपोश राजकारणी यांनी मात्र यातला पैसा अक्षरशः शोषून घेतला आहे. अवैध असूनही, याला वैधतेचे स्वरूप देऊन त्यावर आपलं घरदार भरणाऱ्या पोलिस आणि समाज यंत्रणेलाही याची शरम नाही. इतके सारे भोवताली घडत असूनही, नाकाला रुमाल लावून या वस्त्यातून जाणाऱ्या पांढरपेशी माणसांना या बायका जागल्या काय किंवा मेल्या काय, याचे सुतक नसते. अशा सर्व बाबींमुळे या धंद्यांचे अनभिषिक्त मालक सुखेनैव जगत असतात; शिवाय त्यांना राजसत्तेचा आणि प्रशासनाचा वरदहस्तही प्राप्त असतो. वेश्याव्यवसाय अनंत काळापासून सुरू असून, मानवी भावभावनांच्या अंतापर्यंत चालेल अशा स्वरूपाचा असला; तरी त्याला मानवतेच्या चौकटीत बसवून, समाजाने त्यांचा तिरस्कार न करता, त्यांना न्याय्य मानवी हक्क देत त्यांचा स्वीकार करून; आपल्यातलाच एक घटक मानायला हवं, इतकी मागणी तरी किमान आपण सर्वांनी केलीच पाहिजे. मग कुठे त्यांना न्याय मिळेल. वरवर हा वेश्यांचा इतिहास वाटतो, मात्र वास्तवात हा मानवतेला कलंक आहे, ज्याची आपल्याला जराही खंत नाही!

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२३ 

(लेखक नामवंत स्तंभ लेखक ब्लॉगर आहेत.)

8380973977

…………………………………….

समीर गायकवाड यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –समीर गायकवाड– type करा आणि Search वर क्लिक करा.