दादा, सगळं ‘दान’ तुमच्याबाजूने पडले तरी… ‘मतदान’ गृहित धरू नका… 

-मधुकर भावे

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला  ‘घड्याळ’ हे चिन्ह मिळाले. पक्षाचे नावही मिळाले. दादा जेव्हा शिंदे-भाजपा सरकारात सामील व्हायचे ठरले, त्याच दिवशी पुढच्या सगळ्या गोष्टी विनातक्रार मान्य होणार आहेत  हेही ठरलेच होते. पंतप्रधानांनी ज्या दिवशी दादांवर थेट हल्ला केला त्यानंतर दादा २४ तासांत आपला पक्ष घेऊन शिंदे-फडणवीस सरकारात सामील झाले.  त्याचदिवशी ‘दादा म्हणतील, ते-ते मान्य होणार’ हे ठरल्यासारखेच होते.

 निवडणूक आयोग ही ‘स्वायत्त संस्था’ असली तरी  त्या संस्थेमधील ‘स्वा’ किती आहे, याची सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळे ‘घड्याळ’ चिन्ह दादा गटाला मिळणे हे ठरल्यात जमा होते. शिंदे गट फुटला तेव्हा शिंदे गटालाच ‘धनुष्य-बाण’ मिळणार, हेही ठरले होते. शिवसेनेला ‘मशाल’ चिन्ह दिले गेले. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून गेल्या १६ महिन्यात ‘धनुष्यबाण’ चिन्ह मिळाले असतानाही, त्यांच्या गटाने एकही निवडणूक लढवलेली नाही. अंधेरीच्या विधानसभा पोट निवडणुकीत शिवसेनेने ‘मशाल’ या चिन्हावर निवडणूक लढवली आणि जिंकली. शिंदे मुख्यमंत्री असताना ३२ वर्षे भाजपाकडे असलेला कसबा मतदारसंघही भाजपाने गमावला. नागपूरचा पदवीधर मतदारसंघ भाजपाचा अड्डा… अमरावतीचा शिक्षक मतदारसंघही भाजपाच्या प्रभावाखाली… शिंदे मुख्यमंत्री असताना त्या दोन्ही जागा गेल्या. काँग्रेसने जिंकल्या.  कसबाही गेले. पिंपरी -चिंचवडला त्यावेळच्या ‘राष्ट्रवादीच्या’ अजितदादांचा माणूस फोडून फडणवीसांनी मतविभाजन होईल, याची काळजी घेतली. फोडलेल्या उमेदवाराचीही अर्थपूर्ण काळजी घेतली. त्यामुळे थोड्या मतांनी ती जागा भाजपाने जिंकली.

भाजपाला महाराष्ट्रात एकट्याच्या ताकतीवर बहुमत मिळणे शक्य नाही, हे स्पष्ट झाल्यामुळे अगोदर तगडा मराठा उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील हा प्रयोग पाच वर्षांपूर्वी सुरू झाला. विधान परिषदेत पाच वर्षे तोंड न उघडलेले त्यावेळचे भाजपाचे आमदार चंद्रकांत पाटील महसूलमंत्री होताच ‘चंद्रकांतदादा’ झाले. ‘भाजपाचे उद्याचे मुख्यमंत्री’, अशीही त्यांची जाहिरात सुरू झाली. पण या नेत्याला आवाका नाही. स्वत:चा मतदारसंघ नाही. कोल्हापुरातून ते निवडून येऊ शकत नाही, म्हणून कोथरूडमध्ये ‘भावे-आपटे-गोडबोले’ यांचे मताधिक्य असलेल्या मतदारसंघात त्यांना उभे करून निवडून आणले. आता त्यांचे महत्त्व एकदम संपलेले आहे. फडणवीस भाजपाच्या बहुमताचे राज्य आणू शकत नाहीत. मग ‘शिंदेप्रयोग’ सुरू झाला. शिंदे यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्यावर ‘दादाप्रयोग’ झाला.. दादांचा राष्ट्रवादी गट सामील झाल्यावर ‘आमचे स्वतंत्र अस्तित्त्व ठेवणार’ अशी जाहिरात झाली. पण, शरण आलेल्याला स्वत:चे अस्तित्व नसते, याचा प्रत्यय लगेच येऊ लागला. दादांनी मोदींचा जयजयकार सुरू केला.  तेच पंतप्रधान होणार, असे दादा सांगू लागले. त्यामुळे सगळी ‘दाने’ दादांच्या बाजून पडणार, हे स्पष्टच होते. त्यामुळे दादांना घड्याळ मिळाले, यात फार मोठी धक्कादायक गोष्ट काही नाही. निवडणूक आयोगाचे दान दादाच्या बाजूने पडणार, हे ठरलेच हाेते.

पण,  महाराष्ट्रातील मतदारांचे ‘मतदान’ दादांच्या बाजूने पडणार की नाही, हे अजून ठरायचे आहे.  दादांनी अमोल कोल्हे यांना सांगून टाकले, ‘गेल्यावेळी मी तुला निवडून आणले होते… आता कसा निवडून येतोस, बघतोच…’ अर्थात कोल्हे निवडून येणे किंवा ते पराभूत होणे, हा निर्णय दादांच्या हातात नाही. तो मतदारांच्या हातात आहे. दादांच्या हातात सत्ता आहे… पण, मतदारांना ते जे गृहित धरीत आहेत तिथेच त्यांची फसवणूक होईल.  या महाराष्ट्रातील मतदारांना गृहित धरू नका… घड्याळ मिळाले… फटाके फोडा… पेढे खा.. पण, थोडे सबुरीने घ्या. कोल्हे यांना पराभूत केल्यानंतर ‘मी पाडले’ म्हणा… आगोदर बोलून तुमचे हसे होईल… यापूर्वी भाजपाविरोधात तुम्ही काय काय बोलत होतात. आणि आता काय बोलताय… लोकांना एवढे गृहित धरू नका.

निवडणूक चिन्ह म्हणजे सर्वस्व नव्हे… मतदार आता एवढे मूर्ख राहिलेले नाहीत. तेही दिवस लोकांना माहिती आहेत, जेव्हा इंदिरा गांधी यांची ‘गाय-वासरू’ ही निशाणी रद्द झाली. नवे चिन्ह घ्यायची सूचना आली. अपक्ष उमेदवारांसाठी अडगळीत पडलेली जी चिन्हे होती त्यात ‘हाताचा पंजा’ही पडलेला होता. वसंत साठे यांनी तो शोधून काढला. इंदिराजींना सांगितले… आणि त्या पंजाने काय चमत्कार केला… हे दुनियेने पाहिले. चिन्ह म्हणजे सर्वस्व नव्हे. आता ‘शरद पवार यांच्यावर आपण विजय मिळवला’ अशा घमेंडीमध्ये दादा आणि त्यांचा गट फटाके फोडत आहेत… आनंद साजरा करीत आहेत…  त्यांच्या आनंदात विरजण कशाला घाला? करू देत साजरा… पण, भाजपाचे ‘घी’ त्यांनी बघितले असले तरी ‘बडगा’ बघितलेला नाही. शिंदे असोत किंवा दादा असोत, त्यांच्याबद्दल भाजपाला काहीही पडलेले नाही. आता आपल्याला जे उपयोगी आहे, त्याचा वापर करायचा…  आणि जे आपल्या बाजूला आले तेही हुरळून जाणारे असल्यामुळे… त्यांना वापरून घेतील आणि गरज संपली की विषय संपेल… हा एका वर्षाचा अनुभव नाही. दादा, तुमचे तर साेडून द्या… तुमच्या हातात सत्ता नसेल तर तुम्ही नेमके किती मोठे नेते आहात, हे महाराष्ट्र जाणतो.

जेव्हा भाजपवाल्यांनी रामाला वापरले, गंगा माईला वापरले…. नंतर याच भाजपवाल्यांनी अनेक वर्षांनी रामाला वनवासात पाठवून दिले होते. गरजेपुरता राम नामाचा गजर करणारे…बहुमत मिळाल्यानंतर शिंदे आणि दादांची पत्रास काय ठेवणार आहेत? दादांना ते नंतर कळून येईल.. तो दिवस फार लांब आहे, असे दादा समजू नका. शरद पवारसाहेबांच्या पक्षाचे नाव आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ असे आहे. थोडे मनाला विचारून पहा…. जेव्हा ‘राष्ट्रवादी’ नाव होते तेव्हाही तो पक्ष ‘शरद पवार’ याच नेत्यामुळे उभा होता. आज दादांच्या भोवती जो गोतावळा जमा झालाय आणि ज्या गोतावळ्याने स्वत:ला सर्व अर्थाने मजबूत करून घेतल्यानंतर, पवारसाहेबांपासून जे दूर झाले आहेत ते आजचे सगळे… धनवंत, गुणवंत, ज्ञाानवंत, प्रज्ञाावंत, अर्थवंत…. एकजात सगळे… शरद पवार या नावावरच मोठे झालेत… ‘घड्याळ’ हे निमित्त होते… सत्ता येते आणि जाते.. ‘कृतज्ञ’ आणि ‘कृतघ्न’ यातील फरक इतिहासात कायम राहतो…  निवडणुकीतील जय आणि पराजय…. इतिहास जरा तपासा… अकबराच्या दरबारात मानसिंग… हा शरणागत मानसिंग ‘राजा’ झाला… पण, अकबरापुढे झुकूनच त्याला उभे रहावे लागे. आणि महाराणा प्रताप ताठ मानेने उभा राहिले… इतिहासात मानसिंग मोठा की महाराणा प्रताप? याची उत्तरे आहेत…

‘कोणत्याही मार्गाने सत्ता’ हे जीवनाचे यश नाही.  खंबीर राजकीय भूमिका, आपल्या मूळ पक्षाच्या निष्ठा, या जीवनाच्या कसोट्या आहेत. महाराष्ट्रात तरी अशा नेत्यांना अत्यंत आदराने पाहिले जाते.. भले त्यांच्याकडे बहुमत नसेल… सत्ता नसेल… सत्तेसाठी ५१ सदस्यांची गरज आहे… पण, लोकांचे प्रश्न घेवून रस्त्यावर उतरणाऱ्यांसाठी महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आदराचे स्थान आहे. मग ते कॉ. बर्धन असोत… सुदाम देशमुख असोत… उद्धवराव पाटील असोत… एन. डी. पाटील असोत… गणपतराव असोत, विदर्भात लढणारे जांबुवंतराव असोत…  सत्तेमुळे ही माणसं मोठी झाली नाहीत. पक्ष बदलून ही माणसं मोठी झाली नाहीत. अर्थात दादा हे तुम्हाला सांगण्यात काही अर्थ नाही. आजच्या तारखेला तुमच्या बाजूने ‘दान’ पडले…  त्यामुळे फटाके फुटतील हे मान्य आहे. पण, सगळे दिवस सारखे नसतात, एवढे लक्षात ठेवा. मी अनेक दिवस लिहितो आहे… आज पुन्हा लिहितो… महाराष्ट्र विधानसभेत शिंदे , फडणवीस, दादा हे व्यक्ती म्हणून, त्यांचा जो काही पक्ष आहे, तो पक्ष म्हणून, आणि अगदी दिल्लीहून मोदी-शहा यांच्या गल्लीगल्लीत सभा लावल्या तरीही महाराष्ट्रातील जनता आताच्या चेहऱ्याच्या सरकारला पुन्हा सत्तेवर बसवणार नाही, हे पुन्हा सांगतो… तो निकाल जेव्हा लागेल तिथर्पंत मी जिवंत असेनच. दादा, तुम्हाला तर १०० वर्षांचे आयुष्य मिळो. कारण तुमचे निर्णय चुकले, त्याचा पश्चाताप होण्यासाठी तुम्हाला भरपूर जगायचे आहे. ‘कोणत्याही मार्गाने सत्ता हे आयुष्याचे समाधान नाही.’ हे तुम्हाला एक दिवस पटेल… तो दिवस फार लांब नाही.

आता प्रश्न असा आहे की, या निवडणुकीत काय होईल? सगळा मीडिया भाजपाच्या बाजूला आहे. सत्ता,संपत्ती, सगळ्या यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या हातात आहेत. आता महाराष्ट्र एका अराजकाच्या परिस्थितीतून जातोय. पोलीस स्टेशनमध्ये आता जे काही गोळीबाराचे धिंगाणे झाले आहेत, ते जर काँग्रेस राजवटीत झाले असते… तर हेच फडणवीस… हेच शेलार, रस्त्यावर थय-थया नाचले असते.. कायदा-सुव्यवस्था हा विषय खूप मोठा आहे. आजचा सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न आहे तो, सामाजिक धटींगणपणाचा… कोणालाही न जुमानण्याची जी सामाजिक प्रवृत्ती वाढीला लागलेली आहे, ती आटाेक्यात आणणे, सरकारला आता शक्य नाही. विषय साधे असले तरी धटींगणाचेच ते निदर्शक आहेत. रस्त्याच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या वाहनांच्या समोर डाव्याच बाजूने  लाईट लावून समोर वाहने येतात. त्याला हटकले तर तो मारामारीच्या तयारीत उतरून सांगतो, ‘लाईट लावलेला दिसत नाही का?’ हा धटींगपणा एका दिवसात आलेला नाही. राजकारणातून तो पाझरत समाजात आलेला आहे. आता आम्ही काहीही केले तरी आमचे कोणी वाकडे करू शकत नाही. असा अभिनिवेश समाजात ज्यावेळी निर्माण होतो, त्यावेळी समाजव्यवस्था कोलमडून पडते. आज पोलीस यंत्रणेवर असलेला ताण… गृहमंत्र्यांना तरी त्याची कल्पना आहे का?

एकच समाधानाची गोष्ट आहे की, सामान्य माणूस या धटींगणाबद्दल बोलत नसला तरी तो मनातून संतप्त आहे. जे-जे राजकीय धिंगाणे चालू आहेत ते शांतपणे तो पाहात आहे.  आणि ही ‘शांतता’ हेच त्या माणसाचे सगळ्यात मोठे सामर्थ्य आहे. धटींगणपणाचा पराभवही हीच शांतता करणार आहे. आणि या अस्वस्थ असलेल्या सामान्य माणसाचे मतदान.. आजच्या घटकेला तरी कोणाला ‘दान’ झालेले नाही. त्यामुळेच देशाच्या पंतप्रधानांनासुद्धा दहा वर्षे राज्य केल्यावर लोकसभेतील अर्थसंकल्पीय चर्चेच्या उत्तरात अजून ‘गांधी-नेहरू’ यांची नावे घेऊनच त्यांच्याविरोधात भाषण करावे लागत आहे. गांधी-नेहरू यांना जावून किती  वर्षे झाली. तरी त्यांची अजून भिती वाटते आहे. मोघल सैन्याच्या घोड्यांना पाणी पिताना ‘संताजी-धनाजी’ दिसत होते.  आज एवढा प्रचंड विकास केल्यानंतर, प्रभूरामाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर, ३७० कलम रद्द केल्यानंतर, सगळ्या गॅरेंट्या दिल्यानंतरही, तुम्हाला गांधी-नेहरू- कॉग्रेसची भिती वाटण्याचे काहीच कारण नाही. तुमचा नारा चारसौ पार आहे.. मग सकाळपासून रात्री झोपेपर्यंत गांधी-नेहरू आणि काँग्रेस यांच्याबद्दल कशाला बोलता? तुमचे काहीतरी सांगा…

गांधींनी दोन शब्दांत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले हे जग जाणते… नेल्सन मंडेला हे कोण आहेत, ते भाजपाला माहिती आहे ना… त्यांचे गुरू गांधी आहेत. नेहरू १७ वर्षे पंतप्रधान राहिले म्हणून सांगितले जाते… पण, जवळपास १९ वर्षे नेहरू-गांधी कुटुंबाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी सक्त मजुरीच्या शिक्षा भोगल्या. एकदा कधीतरी याचा उल्लेख करा ना… तुम्हाला सगळं आयते हातात मिळालेले आहे. जे आज बोलत आहेत ते चार वर्षांचे होते तेव्हा देशात पाच आय. आय. टी स्थापन झाल्या होत्या. भाक्रा-नांगल धरणाची निर्मिती झाली होती. हा विषय कितीतरी पटीने आणखीन सांगता येईल. मुद्दा एवढाच आहे की, त्या-त्या परिस्थितीत ते- ते सरकार निर्णय करते. आलेल्या सरकारने मागच्या सरकारचे काढायचे नसते… मृत व्यक्तींबद्दल तर बोलायचेही नसते. माजी पंतप्रधानांचा आदर करायचा असतो… इथे तर आपल्या  माजी पंतप्रधानांची (मनमोहनसिंग) ‘ते आंघोळीला जातानाही रेनकोट घालतात’ अशीही टिंगल झाली. लोक हे सगळं शांतपणे पाहात आहेत. ऐकत आहेत… देशभर ऐकत आहेत… महाराष्ट्रातील तमाम जनता खूप शहाणी आणि समंजस्य आहे… या राज्याचे नाव ‘महा’राष्ट्र आहे… या राज्याच्या विधानसभेने केलेले दहा कायदे देशाने स्वीकारलेत…  ती मोठी माणसं आणि ते कायदे एकदा आठवून पहा…

दादा तुम्हाला नम्रपणे सांगायला हवं… ‘दादा, तुम्ही वेगळा गट केलात तेव्हा पवारसाहेबांचा फोटाे लावून मिरवत होतात…’ पवारसाहेबांनीच हरकत घेतली… म्हणून त्या जागेवर आता यशवंतराव चव्हाणसाहेबांचा फोटो आला… कुठे ते यशवंतराव चव्हाणसाहेब… आणि कुठे आताचा कारभार…  कशाची काही तुलना होऊ शकते का दादा…? खूप लिहिता येईल… पण एवढे मात्र नक्की… तुमच्या बाजूने सगळी ‘दाने’ पडली तरी सगळ्यात महत्त्वाची या महाराष्ट्रातील माणसाची जी शक्ती आहे ते म्हणजे प्रत्येक सामान्य माणसाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला एका मताचा अधिकार… जगातील सर्वोच्च न्यायालयाच्या पेक्षाही आणि जगातील कोणत्याही सरकारपेक्षाही हे एक मत सगळ्यात भारी असे ‘शासन’ आहे. शासन बनवणारे ते आहे. आणि चुकीचे वागणऱ्या भल्याभल्यांना त्यांची जागा दाखवून देणारेही तेच एक मत त्यावेळी शासनच बनते. म्हणून तर अनेकजण पराभूत झाले. ते सामान्य माणसांनीच केलेत…

आणि म्हणून तुमच्या बाजूला सर्व शक्तीमान भाजपा असला तरी महाराष्ट्र तुम्हाला जिंकता येणार नाही. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे… सत्तेसाठी तुमचा रस्ता  चुकलेला आहे… तुम्हालाही तुमची जागा मतदार दाखवून देतील… अमोल कोल्हे तर निवडून येईलच… पण ज्यांना राजकारणात आज फार ‘मोल’ नाही, ते साधे- साधे कार्यकर्तेही या निवडणुकीत नवीन चेहरे टाकले तर तेही निवडून येतील… इतिहासाची पानं उलटून बघा… आणि पवारसाहेब थकले असे पुन्हा म्हणू नका… सिंह कधी म्हातारा होत नसतो.. चार महिन्यांनी आपण सगळा हिशेब पुन्हा मांडू या…

(लेखक नामवंत पत्रकार व वक्ते आहेत)

9892033458

Previous article‘रामा’बाबत काँग्रेसचा गाफीलपणा !
Next articleवेश्याव्यवसायाचा इतिहास
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.