आपण, शब्द आणि इमर्जन्सी

-प्राजक्ता काणेगावकर

मोबाईलच्या आधी पेजर लॉंच झाले त्या काळातली गोष्ट आहे ही. मी एका ऑफिसमध्ये एक महिन्याभरासाठी रिसेप्शनवर अशीच उगाच एक फुटकळ नोकरी केली होती. त्या ऑफिसमध्ये सागळ्या साहेबांकडे पेजर होते. काही महत्त्वाचा निरोप असेल आणि साहेब बाहेर असतील तर पेजरवर निरोप टाकायचा अशी पद्धत होती. मला यातलं काही फारसं माहित नव्हतं. एके दिवशी निरोप घेऊन ठेवले एका सरांचे. खूप निरोप जमा झाल्यावर त्यांना प्लीज कॉल म्हणून पेज केलं. अर्ध्या तासात त्यांचा फोन आला. त्यांना मी सगळे निरोप सांगितले. बहुधा पलीकडे त्यांच्या कपाळाला आठ्या पडल्या असाव्यात. पण ते फोनवर काही बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. एव्हाना मी काहीतरी गडबड केलीय हे माझ्या लक्षात आलं होतं. पण त्यांनी शांतपणे मला पेजर सिस्टिम समजावून सांगितली. लाईफ अँड डेथ व्यतिरिक्त सगळ्या इमरजन्सीज या थोड्या वेळाने सोडवल्या जाऊ शकतात किंवा हँडल होऊ शकतात हे कळलं.

सध्या आपण नोकरीधंदा करत असू तर आपण किमान दहा ते बारा तास घराबाहेर असतोच असतो. कुठल्याही आपत्तीच्या क्षणी आपल्याशी पटकन संपर्क साधता यावा म्हणून प्रगत संपर्क साधने वापरणे आवश्यकही आहे.

पण खरंच अशी इतकी इमर्जन्सीची वेळ खरंच किती येते? मी मोबाईल वापरायला लागल्यापासून मी स्वतः फक्त दोनदा असे कॉल घेतलेले आहेत आणि त्याबद्दल मी नेहमीच मोबाईल या प्रकाराचे आभार मानेन. आणि तरीही मला खरंच मनापासून वाटतं की “इमर्जन्सी” चा आपण बाऊ करतोय का? तीन तास मोबाईल सायलेंटवर ठेवला किंवा व्हायब्रेशन मोडवर ठेवला तर चालत नाही का? मी फक्त नाटकसिनेमाबद्दल नाही बोलत आहे. एकंदरीतच संपर्क माध्यमांचा अतिरेकी त्रास होत नाही का?

मारी कॉंडो म्हणून एक जगप्रसिद्ध कन्सल्टंट आहे. ती लोकांना घर कसं आवरावं याचं कन्सल्टेशन देते. लगेच असले कसले बिझनेस हे लोकाचं घर आवरण्याचे पैसे घेतात वगैरे करु नका. आणि बाय द वे तिच्या अपॉईंटमेंट्स वर्षासाठी फुल असतात. नेटफ्लिक्सवर तिच्या घर आवरण्याच्या टेक्निक्सवर एक सिरिज आहे. तिचं मूळ पुस्तकही फार सुंदर आहे. आपण काय काय बॅगेजेस घेऊन जगत असतो ते कळते वाचताना. मिनीमलिस्टिक लाईफस्टाईल सुरू करायची असेल तर आणि एकूणच तिचे पुस्तक वाचण्यासारखे आहे.

तिच्या पुस्तकात तिने एक अप्रतिम किस्सा सांगितला आहे. एका क्लायंटचं घर तिनं छान आवरुन दिलं. काही दिवस गेल्यानंतर तिला क्लायंटचा फोन आला की घरात अशांत वाटतंय. मारी जरा चक्रावली. कारण असं याआधी कधी झालं नव्हतं. ती क्लायंटच्या घरी पोचली तेव्हा तिलाही घरातून अशांत व्हाईब्ज जाणवल्या. तिने घरभर हिंडून पाहिलं. पसाऱ्याचा प्रश्नच नव्हता. शेवटी तिने घरातली कपाटं उघडली. मग तिला कळलं की अशांततेचं मूळ कुठे आहे ते. प्रत्येक कपाटातल्या प्रत्येक वस्तूवर, स्टोरेजचे बॉक्सेस, बरण्या, कंटेनर्सवर लेबल्स लावलेली होती. स्वयपाकघरात तर प्रत्येक भांड्यावर डब्यावर लेबल चिकटवलेलं होतं.

मारीने ती सगळी लेबल्स काढायला लावली. तिने पुढे असं लिहिलं आहे की शब्द प्रत्यक्ष उच्चारला गेला नाही तरी तो वाचला जातो. नजर त्याची दखल घेते. मेंदू त्याचं प्रोसेसिंग करतो. ही प्रक्रिया अव्याहत चालू असते. त्याने नाद होतो. आवाज होतो. त्याने शांतता ढवळली जाते. घरात पसारा असेल तर हे शब्द ऐकू येत नाहीत कारण बाकीच्या गोष्टींच्या नादामध्ये त्यांचे नाद लपून जातात. घर रिकामं झाल्याने त्यांचा नाद, आवाज अधिक सुस्पष्ट ऐकू येऊ लागला. त्यामुळे लेबल्स काढली. क्लायंटने नंतर तिचं म्हणणं मान्य केलं.

सतत शब्द आदळत असतात आपल्यावर सगळीकडून. आपण झोपताना नाद मनात ठेवून झोपतोय आणि दिवसाची सुरुवात त्यानेच करतोय. त्याने शांतता हरवतेय का आपली हे तपासून पाह्यला पाहिजे. जर तसं होत असेल तर आपणच काही करु शकतो ना त्यावर उपाय म्हणून.

आता तर मोबाईलमुळे सतत शब्द खिशातच घेऊन फिरतो आपण. खरंच सतत काहीपण बघणं गरजेचं असतं का? इतकी इमर्जन्सी खरंच असते का? वर म्हणल्याप्रमाणे लाईफ अँड डेथ सिच्युएशन सोडून.

मी माझ्यापुरता यावर उपाय काढला एक. सर्वप्रथम रात्री झोपायची वेळ फिक्स केली. त्यावेळेच्या आधी किमान एक ते दीड तास फोन बघत नाही मी. फोन दुसऱ्या खोलीत असतो. एक इलेक्ट्रॉनिक कॉर्नर केलाय तिथे. माझ्या झोपेच्या आणि विश्रांतीच्या क्वालिटीमध्ये फरक पडला चांगलाच. ट्राय केलं म्हणून सांगावसं वाटलं इतकंच. त्याहून महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यासाठी मला रात्रीत इमर्जन्सी म्हणून जावं उठावं लागेल त्या सगळ्यांना फोन असो नसो माझ्याशी संपर्क कसा साधावा हे शंभर टक्के माहित आहे.

सप्तशतीमध्ये शु़ंभ दैत्याच्या मृत्यूसमयाचं वर्णन करताना एक खूप सुंदर वाक्य वापरलं आहे. दिग्जनित शब्द शांतावला असं. इथे शब्द कोलाहल या अर्थी वापरला आहे.

Sound is indestructible असं असलं तरी शब्द शांतवण्यासाठी प्रत्येकाने स्वतःचा मार्ग शोधणं म्हणूनच गरजेचं झालंय फार.

Previous articleलाईबी ओइनम: जिगरबाज ऑटो रिक्षाचालक
Next articleऑनलाईन शिक्षण: ‘अक्षरनंदन’ शाळेने संवेदनशीलतेने केली अडचणींवर मात
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here